We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

द परफेक्ट हनिमून डेस्टिनेशन

8 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
8 Mins Read
October 16, 2026
October 16, 2026

Quick Summary

न्यूझीलंडमध्ये भारतासारखीच ड्रायव्हिंग पद्धत असल्याने मनसोक्त रोड ट्रिप सहज सुरू करा.

सदर्न आल्प्समध्ये स्कायडायव्हिंग करा आणि मिलफोर्ड साऊंडच्या फ्योर्डस्‌मधून नौकाविहाराचा थरार घ्या.

क्वीन्सटाऊनमध्ये स्कायडायव्हिंग, बंजी जंपिंग, जेट बोटिंग आणि माउंटन बाइकिंगसह साहसाचा आनंद घ्या.

वाकाटिपू किनाऱ्यावर संध्याकाळी मिरचीयुक्त हॉट चॉकलेट आणि बॉब्ज पीक गोंडोला राईड मिस करू नका.

वानाकामध्ये सरोवरातून सैर करत ‘दॅट वानाका ट्री’पर्यंतची शांत सफर करा आणि व्हेअर केआ लॉजमध्ये रोमँटिक मुक्काम घ्या.

मिलफोर्ड साऊंडमध्ये उंच पर्वत, वॉटरफॉल्स आणि डॉल्फिन्ससह कॅथेड्रलसारखा नाट्यमय अनुभव घ्या.

Published in Loksatta Lokrang 18th October 2026

...तिथल्या सरोवरात पर्वतांचं प्रतिबिंब इतक्या हळुवार पडलेलं असतं की जणू निसर्ग आपल्यासाठी थोडाकाळ विसावला आहे असं वाटावं...

न्यूझीलंडची पहिली भेट मला आजही लख्ख आठवते. तिथली ड्रायव्हिंगची पद्धत भारतासारखीच आहे. तेवढं साम्य वगळलं, तर बाकी सगळा अनुभव खास न्यूझीलंडमय होता. मनसोक्त ड्रायव्हिंगचा आनंद तिथल्याच रस्त्यांवर मिळू शकतो. माफक रहदारी, आसपास सर्वत्र हिरवाई, त्यात अधूनमधून स्पीड-ब्रेकर यायचे, ते आपल्याच नादात रस्ते ओलांडणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाचे... या सुंदर प्रवासाने माझ्या न्यूझीलंड सहलीची सुरुवात झाल्याने मला पहिल्यापासून सूर गवसल्यासारखं वाटलं. न्यूझीलंडच्या सगळ्या गोष्टींमधील सहजता, मोहकता आणि पहिल्या पावलापासून प्रसन्न करणारा अनुभव यामुळे मी न्यूझीलंडवर फिदाच झाले. गेल्या काही वर्षांत झालेल्या न्यूझीलंड भेटीत मी सदर्न आल्प्सच्या आकाशात स्कायडायव्हिंगही केलं. मिलफोर्ड साऊंडच्या फ्योर्डस्‌‍मधून नौकाविहार केला. या सर्व अनुभवांनंतर मला वाटतं की न्यूझीलंड हा जगातील सर्वाधिक रोमँटिक देश आहे. इथे आपण दिवसभर प्रचंड बिझी राहू शकतो किंवा अगदी काहीही न करता फक्त आराम करू शकतो.

प्रेमासाठी सज्ज असलेल्या या देशाचे नॉर्थ आयलंड आणि साऊथ आयलंड असे दोन मुख्य भाग आहेत. नॉर्थ आयलंड ज्वालामुखीमय आहे. इथे ग्लोवर्म केव्ह्ज्‌‍, हॉट स्प्रिंग्ज आणि व्हायब्रंट सिटीज आहेत, तर साऊथ आयलंडमध्ये बर्फाच्छादित पर्वत, ग्लेशियर्स, लेक्स आणि भव्य फ्योर्डस्‌‍ आहेत. हे पाहिल्यावर, हा देश म्हणजे निर्सगाला लिहिलेलं प्रेमपत्रच वाटतं.

दोन्ही आयलंड्सवर मनसोक्त फिरल्यावर मला असं वाटतं की कोणाच्याही स्वप्नातल्या हनिमून डेस्टिनेशनसाठी यापेक्षा आणखी चांगला पर्याय असूच शकत नाही. विनयार्डमधल्या टुमदार व्हिलाज्‌‍मध्ये सकाळी अलगद झोप उघडावी, उंच इमारतींपेक्षाही उत्तुंग असलेल्या वॉटरफॉल्सच्या शेजारून नौकाविहाराचा थरार अनुभवावा, हॉट स्प्रिंग्जमध्ये मनसोक्त डुंबावं,  वेळ असेल तर ग्लेशियर्सवरून झक्कास हेलिकॉप्टर राईड करावी... हे सगळं एका ट्रिपमध्ये केवळ इथेच शक्य आहे.

क्वीन्सटाऊन - रोमँटिक हृदय, साहसाची राजधानी

राजधानी क्वीन्सटाऊन म्हणजे खोल, निळ्याशार वाकाटिपू लेकच्या काठी वसलेलं, रिमार्केबल्सच्या टोकदार शिखरांनी वेढलेलं फोटोजेनिक शहर. इथे स्कायडायव्हिंग, बंजी जंपिंग, जेट बोटिंग आणि माउंटन बाइकिंगचा थरार अनुभवता येतो. म्हणून या शहराला जगाची ‌‘ॲड्रेनालाईन कॅपिटल‌’ म्हणतात. सूर्य मावळला की हे शहर अधिक रोमँटिक बनत जातं. वाकाटिपूच्या किनाऱ्यावरून फिरत असताना एका संध्याकाळी मी क्वीन्सटाऊनची खासियत असलेल्या मिरचीयुक्त हॉट चॉकलेटचा आस्वाद घेतला. मावळतीच्या सूर्याची किरणं पडून बॉब्ज पीक सोनेरी रंगात न्हाहून निघालं होतं. सगळ्या आसमंतावर संध्याकाळ उतरत होती. बॉब्ज पीकवर जाणारी गोंडोला राईड सरोवराचं विहंगम दर्शन घडवत होती. संधिप्रकाशात आजूबाजूचे बर्फाच्छादित पर्वत उजळून निघाले होते. इथल्या मताकौरीसारख्या लक्झरी लॉजमध्ये मोठमोठी झुंबरे आणि चकाचकपणा नसला, तरी आपलेपणा आहे. त्याची आलिशानता डोळे दिपवत नाही. रिमार्केबल्सच्या पार्श्वभूमीवर, भिंतभर उंचीच्या खिडकीपाशी, शेकोटीच्या शेजारी आरामखुर्चीत बसण्यासारखं सुख नाही. न्यूझीलंड ही साहस आणि शांततेची भूमी आहे, याचा पुरावा म्हणजे क्वीन्सटाऊन. म्हणूनच हनिमूनच्या सुंदर प्रवासाची सुरुवात करण्यासाठी हे एकदम परफेक्ट शहर आहे.

वानाका - प्रसन्न आणि भावपूर्ण

क्वीन्सटाउन हा सळसळता उत्साह असेल तर, वानाका म्हणजे निखळ शांतता आहे. नवविवाहित जोडप्यासाठी सरोवराच्या पाण्यातून छानशी सैर करीत ‌‘दॅट वानाका ट्री‌’ या प्रसिद्ध विलो वृक्षापर्यंत जाण्याची अनोखी सफर असते. व्हेअर केआ लॉजमधलं वास्तव्य तर अत्यंत रोमँटिक आहे. या प्रायव्हेट अल्पाइन शॅलेमध्ये हेलिकॉप्टरने जाण्याची सोय आहे. रात्री न्यूली मॅरिड कपल शेकोटीजवळ बसून वाईनचा आस्वाद घेतं. आकाशात मैलोन्‌‍मैल फक्त तारे असतात आणि सभोवती सदर्न आल्प्सच्या पर्वतरांगा... त्यांच्यासाठी तो क्षण किती खास असेल ना?

मिलफोर्ड साऊंड - दगडात कोरलेलं प्रेम

जगातील ठराविक जागी मिलफोर्ड साऊंडसारखं पावित्र्य जाणवतं. हे आहे जगातील आठवं आश्चर्य! समुद्राचा जमिनीत शिरलेला हा भाग म्हणजे फ्योर्डस्‌‍. हा निव्वळ नाट्यमय अनुभव आहे. एखाद्या कॅथेड्रलप्रमाणे उंचच उंच गेलेले पर्वतांचे कडे, डोळे दिपवणाऱ्या उंचीवरून कोसळणारे वॉटरफॉल्स आणि आपल्या बोटीच्या आसपास विहरणारे डॉल्फिन्स... असं इथलं रमणीय वातावरण असतं. हनिमूनर्ससाठी ही केवळ एक ट्रिप राहत नाही, तो एक आपलेपणाचा, एकमेकांच्या सहवासातील तृप्ततेचा अनुभव ठरतो.

कैकौरा - ओशन रोमान्स

ईस्ट कोस्टवरील कैकौराची भेटही अविस्मरणीय ठरते. एखादं कपल बोटीवर उभं राहून आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घेत असताना महाकाय व्हेल उसळी मारून भेटायला येतो. आसपास डॉल्फिनचा खेळ सुरूच असतो. या सफरीनंतर जेवणात ताज्या क्रेफिशचा आस्वाद घेता येतो. एकंदरीत ही सफर म्हणजे समुद्राने रंगवलेली प्रेमकथाच वाटते.

नॉर्थ आयलंडची जादू

न्यूझीलंडचं नॉर्थ आयलंड कमालीचं वेगळं असलं तरीही त्याची जादू काही औरच आहे.  रोटोरुआमध्ये कपल्सना जिओथर्मल हॉट स्प्रिंग्जमध्ये डुंबायला मजा येते. वायतोमोमधल्या काजव्यांच्या केव्हज्‌‍मध्ये नक्षत्रांची पखरण पाहिल्यासारखं वाटतं. हॉक्स बे आणि मार्लबरो इथल्या विनयार्डस्‌‍मध्ये वाइनची चव घेता येते. ऑकलंड, वेलिंग्टनसारखी शहरं खानपानासह किवी संस्कृतीची झलक दाखवतात. तिथलं नाईट लाईफ आपल्याला धुंद करून टाकतं.

न्यूझीलंडमधील मजा

न्यूझीलंडमध्ये निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी असते. इथे हनिमूनर्स ब्लँकट बे लॉजमधल्या वास्तव्यात, पाण्यातील पर्वतशिखरांची प्रतिबिंब पाहून दिवसाची सुरुवात करू शकतात. कैकौरामध्ये समुद्रात सुरू असलेला व्हेल्सचा खेळ पाहत गरम पाण्यात डुंबण्याचा आनंद घेऊ शकतात. थेट शेतातून आलेल्या ताज्या जेवणाचा आस्वाद घेत त्यासोबत जगभरात प्रसिद्ध असलेल्या वाइनचे घोट रिचवत उत्तम आदरातिथ्याचा अनुभव घेऊ शकतात. इथला प्रत्येक क्षण एकदम खासगी असतो. सेंट्रल ओटागोच्या पिनोट नॉयरची भेट वाइनप्रेमींसाठी अत्यावश्यक असते. शोफर ड्रिव्हन व्हेईकलमधून कपल्स या विनयार्डस्‌‍ची सैर करू शकतात. ही सैर करायला सायकलीही उपलब्ध असतात. डोंगराच्या पलीकडे सूर्य मावळत असतो आणि या मावळतीच्या रंगात, चिअर्सच्या किणकिणाटात वाइन आणखी उजळून निघते.

इथल्या लॉजेसमधील मुक्काम निसर्गाशी जवळीक साधणारा आणि आरामदायी असतो. तौपोमधील हुका लॉज खास आहे. वायकाटो रिव्हरपासून जवळच असलेल्या या लॉजमध्ये खळाळत्या पाण्याची लय ऐकत कधी झोप लागते कळतही नाही. क्वीन्सटाउनमधील आयकार्डस्‌‍ प्रायव्हेट हॉटेलच्या आलिशान स्वीट्समधून वाकाटिपू लेक अप्रतिम दिसतो, तर नॉर्थ आयलंडवरील कौरी क्लिफ्स आणि केप किडनॅपर्स यांना समुद्रकिनाऱ्याची साथ आहे. शिवाय तिथे जागतिक दर्जाचा गोल्फ कोर्स आणि स्पा आहेत. त्यामुळे हनिमूनर्ससाठी इथलं वास्तव्य कायम स्मरणात राहील असं असतं.

नवविवाहितांसाठी न्यूझीलंडच का?

न्यूझीलंडची खासियत म्हणजे इथे एड्रेनालाईनही आहे आणि निवांतपणाही. इथे हनिमूनर्स एखाद्या दिवशी बंजी जम्पिंग करू शकतात, तर दुसऱ्या दिवशी शांत लेकच्या काठी सहलीचा आनंद घेऊ शकतात. कोणी सकाळी ग्लेशियर्सवर ट्रेकिंग करू शकतं आणि संध्याकाळी जागतिक दर्जाच्या वाइनचा आस्वाद घेऊ शकतं. इथला प्रत्येक क्षण, निसर्गसौंदर्यांने भारलेला, चित्तथरारक असतो. त्यामुळे निसर्गही आपल्यासोबत प्रेमाचा उत्सव साजरा करतोय असं वाटतं.

आम्ही न्यूझीलंड हनिमून ट्रिप कशी आखतो?

आम्ही वीणा वर्ल्डमध्ये हनिमूनर्ससाठी अतिशय सुबक, नेटका आणि खास प्लॅन तयार करतो. प्रत्येक प्लॅन वेगळा असतो, कारण सगळी जोडपीही एकसारखी नसतात. शिवाय न्यूझीलंड असं आहे की तिथे प्रत्येकासाठी वेगळं काहीतरी ठरवता येतं. नवविवाहित जोडप्यांना, रोमँटिक सुट्टीच्या शोधात असलेल्या कपल्सनाही आमच्या टूरमधील या काही गोष्टी आवडतात.

स्वतः गाडी चालवण्याचं स्वातंत्र्य: बहुतेक हनिमूनर्सना ड्राईव्ह करण्याचं स्वातंत्र्य हवं असतं. इथले रस्ते एकदम चांगले, आसपासचा नजारा, निसर्ग प्रसन्न करणारा, पत्ते शोधायला एकदम सोपे असे असल्याने तुमच्याकडे फक्त भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स असलं की झालं.

प्रायव्हेट शोफर लक्झरी: काही कपल्सना आरामात बसून प्रवास एन्जॉय करायचा असतो. अशांसाठी आम्ही प्रायव्हेट शोफरची व्यवस्था करतो. म्हणजे मग जोडप्यांना आजूबाजूच्या नजाऱ्याचा आनंद घेत एकमेकांत हरवून जाता येतं.

बुटीक लॉजेस आणि आलिशान रिसॉर्टस्‌‍: पर्वतरांगांचं विहंगम दर्शन घडवणाऱ्या, सरोवराकाठी असलेल्या लॉजेसपासून ते विनयार्डमधील घरांपर्यंत... इथे राहण्याचे असंख्य पर्याय आहेत. हॉट टब, फायरप्लेस यांच्यासोबतच बर्फाच्छादित शिखरं किंवा खळाळता समुद्र यांचं विलोभनीय दर्शन या लॉजेसमधून होतं.

रुचेल असा प्रवास: आम्ही कपल्सच्या प्रवासाची आखणी करताना त्यात वैविध्य राहील, याची दक्षता घेतो. एखाद्या दिवशी फ्रांझ जोसेफ ग्लेशियरला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा साहसी प्रवास केला की त्यावर उतारा म्हणून त्यानंतर वानाका लेकच्या काठी कँडल लाईट डिनर असा बेत आखलेला असतो.

विवाहित भारतीय जोडप्यांसाठी उत्तम सीझन

आपल्याकडे ऑक्टोबरमध्ये लग्नाची धामधून संपलेली असते. या हनिमून सीझनमध्येच न्यूझीलंडमध्ये वसंत ऋतू बहरात असतो. उत्तर गोलार्धात थंडी वाढलेली असते. तेव्हा न्यूझीलंड निसर्गाच्या विविध रंगांनी बहरून जातो. फुलांचे वेगवेगळे रंग, निरभ्र आकाश, मोठे दिवस... असा हा ऑक्टोबर ते मार्चपर्यंतचा सीझन हनिमूनर्ससाठी एकदम योग्य ठरतो, कारण तेव्हा निसर्गाचे विभ्रमही पाहता येतात आणि आरामही करता येतो.

न्यूझीलंडमधील माझ्या आजवरच्या प्रवासाची आठवण झाली की मला स्कायडायव्हिंग, फ्योर्डस्‌‍मधले बोटिंग, मेंढ्यांच्या साथीने केलेले ड्रायव्हिंग... असे कितीतरी अनुभव आठवतात. न्यूझीलंड हा देश फक्त निसर्गसौंदर्यामुळेच नव्हे, तर तिथे मिळणाऱ्या आपलेपणाच्या भावनेमुळेही मला जवळचा वाटतो. मोकळा श्वास घेण्याची, मोकळेपणाने फिरण्याची संधी देणारा आणि एकमेकांशी बाँडिंग वाढवणारा असा हा देश आहे. त्यामुळेच वीणा वर्ल्डमध्ये आम्ही न्यूझीलंड हे हनिमूनसाठी परफेक्ट डेस्टिनेशन मानतो. इथला निसर्ग सिनेमॅटिक आहे. इथे लक्झरी आहे आणि भारतीय हनिमूनर्सच्या हंगामाशी जुळणारं वेळापत्रक आहे. तुम्हालाही हनिमून म्हणजे एक सहल न राहता तो आयुष्यभर लक्षात राहील असा, पर्वतांच्या शिखरांवरचा, सरोवरांच्या काठावरचा आणि ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखालचा संस्मरणीय अनुभव व्हावा असं वाटत असेल, तर तुमच्या रोमँटिक प्रवासातील पहिलं प्रकरण लिहिण्यास न्यूझीलंड सज्ज आहे.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
हॉलिडे... कल्पनेतला आणि प्रत्यक्षातला...
8 mins, read

हॉलिडे... कल्पनेतला आणि प्रत्यक्षातला...

Published in Maharashtra Times 18th October 2026 ...तुमच्या यादीतल्या पहिल्या रेस्टॉरंटपाशी तुम्ही येता आणि कळतं की तिथे 90 मिनिटांचं वेटिंग आहे. तिथे रिझर्व्हेशनची फॅसिलिटी नसल्याने तुम्ही ते केले

'द हार्ट ऑफ इंडिया' मध्यप्रदेश
8 mins, read

'द हार्ट ऑफ इंडिया' मध्यप्रदेश

Published in Sakal Saptarang 18th October 2026 मध्यप्रदेशची ओळख सांगणारी शहरं इंदौर - फूड सिटी भोपाळ - लेक सिटी उज्जैन - स्पिरिच्युअल सिटी ग्वाल्हेर - फोर्ट सिटी महेश्वर - घाट सिटी

व्हिएतनाम
8 mins, read

व्हिएतनाम

Published in Sakal Saptarang 11th October 2026 रंग, संस्कृती आणि कुतूहल यांचा सुंदर संगम   छोटा देश, मोठी शिकवण! काही देश आपण फक्त बघतो आणि परत येतो. काही देश मात्र आपल्याला विचार करा

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!