Published in Maharashtra Times 18th October 2026
...तुमच्या यादीतल्या पहिल्या रेस्टॉरंटपाशी तुम्ही येता आणि कळतं की तिथे 90 मिनिटांचं वेटिंग आहे. तिथे रिझर्व्हेशनची फॅसिलिटी नसल्याने तुम्ही ते केलेलं नसतं. मग तुम्ही...
आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जरा तुमच्या मागच्या हॉलिडेचा विचार करा. म्हणजे जे फोटो तुम्ही पोस्ट केलेत ते आठवू नका किंवा परत आल्यानंतर तुमच्या मित्रमंडळींना आणि कुटुंबियांना ज्या अनुभवांबद्दल अगदी रंगवून सांगितलंत, ते ही आठवू नका. मी तुम्हाला त्या हॉलिडेच्या वेगळ्याच भागाबद्दल विचारतोय. तिथे पोहोचल्यापासून ते त्या ठिकाणाचा प्रत्यक्ष आनंद लुटायला सुरुवात करेपर्यंतच्या काळात घडलेल्या अगदी लहान-लहान गोष्टी, ज्या कदाचित त्रासदायक होत्या, कदाचित विचित्र, हास्यास्पदही होत्या, त्या गोष्टी आठवा.
काही ओळखीचं वाटतंय का?: गेली अनेक वर्षं व्यावसायिक कारणांसाठी आणि वैयक्तिक कारणांसाठी भरपूर प्रवास केल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, ती म्हणजे आपल्या कल्पनेतला हॉलिडे आणि प्रत्यक्षातला हॉलिडे यांच्यात जी गॅप पडते, त्यात अनेक फ्रस्ट्रेटिंग क्षण भरलेले असतात. हे काही असे क्षण नसतात ज्यामुळे सगळंच बिघडतं. पण सुट्टीचे पहिले एक-दोन दिवस खाणाऱ्या अशा क्षणांची मालिका कधीकधी सहज टाळता येऊ शकते आणि कधीकधी या घटना अनपेक्षितपणे मजेदारही असतात. हॉलिडेचा खरा ऱ्हिदम सापडेपर्यंत आपण अशा क्षणांमध्ये विनाकारण अडकतो हे बाकी खरं.
काही दिवसांपूर्वी मी फ्लाइंग फ्रस्ट्रेशन्सबद्दल एक लेख लिहिला होता. विमानप्रवासाचे चार टप्पे आणि आपली मनःशांती ढळू न देता या टप्प्यांमधून कसं पार व्हायचं, याविषयी तो होता. त्या लेखाला मला मिळालेला प्रतिसाद विलक्षण होता. कारण वर्षातून एकदा विमानप्रवास करणाऱ्यांपासून ते दर महिन्याला तो करणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाकडे एक तरी किस्सा असतोच. गेटचा झालेला गोंधळ, तुटलेली सुटकेस, 14 तासांच्या विमान प्रवासात मिळालेली मधली सीट आणि ती सुद्धा अशा व्यक्तीशेजारी ज्याला लगेच तुमच्याशी गप्पा मारायचा मूड आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे, ही फ्रस्ट्रेशन्स फक्त विमानतळापुरती मर्यादित राहत नाहीत, तर तुमच्या हॉलिडेत घुसून तुमच्या ट्रिपची सगळी मजा घालवतात. म्हणूनच आज मी त्याचविषयी बोलणार आहे. आपण नेहमी हॉलिडेच्या चांगल्या आठवणी सांगतो, पण हॉलिडे फ्रस्ट्रेशन्सबद्दल काही बोलतच नाही. पण मी त्यावर काय मार्ग शोधलाय तो मला तुम्हाला सांगायचाय.
प्लॅनिंगचा ट्रॅप: या सगळ्याची सुरुवात ज्या क्षणी तुम्ही हॉलिडेवर जायचं ठरवता, तेव्हापासून होते. आजकाल हॉलिडेचं प्लॅनिंग करणं म्हणजे माहितीच्या भडिमाराला तोंड देणं. एकाच हॉटेलचं वेगवेगळे टेरिफ दाखवणारे विविध बुकिंग प्लॅटफॉर्म्स, परस्परविरोधी रिव्ह्यूज, झालंच तर गेल्याच वर्षी तिकडेच जाऊन आलेल्या मित्रमंडळींच्या शिफारसी, या सगळ्या गोष्टींना आपण सामोरं जातो. त्यांना आवडलेल्या रेस्टॉरंट्समधली काही, आता बंदही झालेली असतात.
माझ्या कामाचा भाग म्हणून मी एक अख्खी संध्याकाळ एका डेस्टिनेशनवर संशोधन करण्यात घालवली. डझनभर हॉटेल्स बुकमार्क करून ठेवली आणि कुठेच बुकिंग न करता माझा लॅपटॉप बंद केला. कारण एकसारख्या दोन हॉटेल्समध्ये मला निवडच करता आली नाही.
फुकटच्या सल्ल्यांची समस्या खरंच गंभीर आहे. तुम्ही सहज सांगता की कुठे जायचा प्लॅन करताय आणि दिवसभरात तुमच्या फोनवर व्हॉट्स अप मेसेजेसचा जणू पाऊस पडतो. सगळे लोक त्यांना माहिती असलेली ठिकाणं सुचवत असतात, जी एकतर आता बंद झालेली असतात किंवा तुमच्या ट्रिपसाठी सोयीची नसतात. आता मी अशाच एक दोघांकडून रेकमेंडेशन्स मागवतो, ज्यांची प्रवास करण्याची पद्धत माझ्याशी जुळणारी आहे आणि जे तिथे अगदी नुकतेच जाऊन आले आहेत.
ओव्हर शेड्युलिंग हा पुढचा ट्रॅप असतो. जेव्हा तुम्ही फ्लाइट्स आणि निवासावर बऱ्यापैकी खर्च केलेला असतो तेव्हा प्रत्येक तास वसूल करुन, सगळं काही एकाच फटक्यात पाहण्याची इच्छा होणं स्वाभाविक असतं. पण अजिबात प्रॅक्टिकल नसलेला प्लॅन प्रत्यक्षात आणण्याच्या भरात तुम्ही दुसऱ्याच दिवशी स्वतःची दमणूक करुन घेता. कोणत्याही ट्रिपवरचे संस्मरणीय क्षण हे कुठल्याही प्लॅनिंग शिवायचेच असतात, त्यासाठीच थोडा मोकळा वेळ ठेवायचा असतो.
हॉटेलकडून मिळणारं सरप्राइज: हॉटेलचे फोटो हे आशावादाचा उत्कृष्ट नमुना असतात. वाइड-अँगल लेन्स, काळजीपूर्वक केलेलं लाइटिंग आणि छायाचित्रात दिसणारा तो खोलीचा एकच सुरेख कोपरा. मी अशा रूम्समध्ये चेक इन केलं आहे, ज्या फोटोत प्रशस्त आणि उजळ दिसत होत्या, पण प्रत्यक्षात यातलं काहीच नव्हतं. ‘सी व्ह्यू’ पाहायला मला खिडकीतून एका विशिष्ट कोनात वाकावं लागत होतं. ‘सिटी व्ह्यू’ म्हणजे बाहेर दिसणारं कार पार्किंग होतं. हॉटेल फोटोज्मधली सूचकता हेरण्यात माझी पत्नी हेता आता चांगलीच तरबेज झाली आहे. बुक केलेल्या हॉटेलचा खरा नजारा कसा असेल याचा तिचा अंदाज सहसा चुकत नाही.
चेक इनच्या वेळेचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा असूनही त्याबद्दल कमीच बोललं जातं. तुम्ही सकाळी 9 वाजता लँड होता आणि चेक इनची वेळ असते दुपारी 2, त्यामुळे एका नव्या शहरात तुमच्या लगेजसह, हातात भरपूर रिकामा वेळ घेऊन तुम्ही पोहोचलेले असता. मग कुठे जायचं? हा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे आता मी जर सकाळी लवकर पोहोचणार असेन तर सरळ आदल्या रात्रीपासून रूम बुक करतो किंवा हॉटेलला आधीच मेल पाठवून अर्ली चेक इन शक्य आहे का ते बघतो. आणि अनेकांना वाटतं त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा तसं करता येतं. याला पर्याय म्हणजे सगळं लगेजचं लोढणं घेऊन फिरायचं. आणि ते तर शक्यच नसतं.
तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दुर्लक्ष केलेले निगेटिव्ह रिव्ह्यूज. प्रत्येक हॉटेलच्या बाबतीत एक तरी रिव्ह्यू असतोच ज्यात आवाजाच्या त्रासाबद्दल, जवळच सुरू असलेल्या बांधकामाबद्दल तक्रार केलेली असते. जवळपास प्रत्येक प्रवासी अशा रिव्ह्यूजकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला काही त्रास होणार नाही अशी समजूत करून घेतो. प्रत्यक्षात तिथे गेल्यावर रात्री तो त्रास किती मोठा आहे हे लक्षात येतं, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. आता मी असे रिव्ह्यूज अतिशय बारकाईने वाचतो आणि ते गंभीरपणे घेतो.
साइटसीइंगशी झटापट: इथे तुमचा हॉलिडे तुम्हाला खऱ्या अर्थाने नमवतो. तुम्ही सगळी माहिती नीट काढलेली असते. नेमकं काय बघायचं हे तुम्हाला माहिती असतं. त्याचा एक सिक्वेन्सही तुमच्या मनात तयार असतो. पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध ओल्ड टाऊन, दुसऱ्या दिवशी अनेकांनी नावाजलेलं म्युझियम, तिसऱ्या दिवशी व्ह्यू पॉइंटवरचा सन सेट असा क्रम तुम्ही ठरवलेला असतो. साइटसीइंगसाठी तुम्ही अगदी तैय्यार असता आणि ते डेस्टिनेशन हळुवारपणे तुमच्या सगळ्या बेताला सुरुंग लावतं. म्युझियम मंगळवारी बंद असतं आणि आजच मंगळवार असतो. शहरातला लँडमार्क रिनोव्हेशनमुळे बंद असतो. शहरातलं आकर्षण स्थानिक सुट्टीमुळे बंद असतं. सनसेट व्ह्यू पॉइंटकडे ज्या रस्त्याने जाऊ शकता तिथे गेल्यावर कळतं की तो रस्ता डागडुजीसाठी तात्पुरता बंद आहे. ओल्ड टाउनमधलं मार्केट फक्त आठवड्याच्या शेवटीच सुरू असतं आणि तुम्ही तिथे गुरुवारी पोहोचलेले असता. आता यातली कुठलीच गोष्ट भयंकर नुकसान करणारी नाही. या गोष्टी टाळता येऊ शकतात, पण तरीही आपल्यापैकी बहुतेकांनी ट्रिपच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर यातल्या कशाचा ना कशाचा सामना केलेला असतो.
आणि मग उभी राहते क्यू म्हणजे लांबलचक रांगेची समस्या. जगात ज्यांना सर्वाधिक लोक भेट देतात, ती आकर्षणे खरोखरच अद्वितीय असतात. पण ती अद्वितीय गोष्ट आणि तुम्ही यांच्यामध्ये तुमच्यासारख्याच माणसांची इतकी लांबलचक रांग असते की तिथे जाण्याचा निर्णय खरोखरच योग्य होता का असा प्रश्न तुम्हाला पडतो. मी स्वतः व्हॅटिकन, आयफेल टॉवर, विविध मंदिरं आणि पॅलेसेससाठी, नॅचरल वंडर्ससाठी अनेकदा अशा लांबलचक रांगेत उभा राहिलो आहे. रांगेत उभं राहिल्यावर वेळ पुढे सरकताना पाहून प्रत्येक वेळी ते ठिकाण बंद व्हायच्या आधी मी तिथे पोहोचेन ना? या एकाच प्रश्नाने मला ग्रासलेलं असतं.
पण जेव्हापासून मी ठराविक वेळेची तिकिटं ॲडव्हान्स बुक करू लागलो, तेव्हापासून मात्र माझा साइटसीइंगचा अनुभवच बदलून गेला. ही सुविधा काही सगळ्या ठिकाणी नसते, पण काही महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे रोममधील कलोसियम, फ्लोरेन्समधील उफिझी, माचूपिचू, लूव्र म्युझियम या ठिकाणी ही सोय आहे. अनेकदा अशा विशिष्ट वेळेच्या तिकिटाची किंमत सर्वसाधारण तिकिटाइतकीच असते, पण त्यामुळे तुमच्या साइटसीइंगच्या अनुभवात मात्र प्रचंड फरक पडतो. इतर लोक रांगेत उभे असताना तुम्ही मात्र सहज आत जाता, त्यामुळे आपणं खूप काही मिळवल्याचा आनंद होतो तो वेगळाच.
साइटसीइंगबाबतचं आणखी एक सत्य म्हणजे गाइड बुक्स तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात अपयशी ठरतात. आता अंतराचं बघा, गुगल तुम्हाला सांगतं की दोन ठिकाणांमधलं अंतर चालत साधारण 12 मिनिटांचं आहे, पण गुगल तुम्हाला हे सांगत नाही की रस्ता चढाचा आहे आणि तो ही दगडी फरसबंदीचा... मग सकाळी जे शूज एकदम कम्फर्टेबल वाटत असतात, तेच दुपारी, भर उन्हात त्या रस्त्यावरुन चालताना इतके त्रासदायक होतात की विचारू नका. आता मी हॉलिडेवर असलो की जराही अपवाद न करता आणि संध्याकाळी आम्ही काय करणार आहोत याचा विचार न करता रोज अतिशय कम्फर्टेबल शूजच घालतो. या लहानशा निर्णयामुळे माझ्या प्रत्येक ट्रिपचा आनंद द्विगुणित झाला आहे.
खाण्यापिण्याचा जुगाड: या विषयाच्या बाबतीत मी जरा जास्तच हळवा आहे. जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा चांगलं जेवण हे ‘मिळालं तर’ असं नसतं, कारण मी प्रवासच मुळी चांगले पदार्थ खाण्यासाठी करतो. एखाद्या प्रदेशातील पदार्थ तुम्हाला त्या प्रदेशाच्या इतिहास-भूगोलाबद्दल, तिथल्या संस्कृतीविषयी, तिथल्या लोकजीवनाविषयी जे सांगतात ते तिथली म्युझियम्सही सांगू शकत नाहीत. हनोईमधला ‘फो’चा बोल, स्पेनच्या किनाऱ्यावरील गावातली ताज्या सीफूडची डिश, नेपल्समधला लाकडावर बेक केलेला पिझ्झा... या सगळ्या अनुभवांची मी कित्येक आठवडे आधीपासून वाट पाहत असतो आणि पुढे अनेक वर्षं ते माझ्या मनात रेंगाळत राहतात. त्यामुळेच वाईट जेवणाचा मला विलक्षण त्रास होतो.
मी अपेक्षेपेक्षा जास्त वेळा एका विचित्र परिस्थितीचा कटू अनुभव घेतलेला आहे. तुम्ही हॉटेल्सबद्दलची सगळी माहिती आधी मिळवलेली आहे, कुठे जाऊन काय खायचं ते ठरवलेलं आहे. तुमच्या यादीतल्या पहिल्या रेस्टॉरंटपाशी तुम्ही येता आणि कळतं की तिथे 90 मिनिटांचं वेटिंग आहे. तिथे रिझर्व्हेशनची फॅसिलिटी नसल्याने तुम्ही ते केलेलं नसतं. मग तुम्ही तुमच्या यादीतल्या दुसऱ्या पर्यायाकडे जाता, तर ते ही भरलेलं असतं. एव्हाना रात्रीचे 9 वाजत आलेले असतात. तुम्ही दमलेले असता आणि मग नाइलाजाने तुम्ही शेजारच्या रेस्टॉरंटचा आसरा घेता, जे बाहेरुन चांगलं वाटत असतं. तिथलं जेवण वाईट नसतं, पण ठीकठाक असतं. तिथे जेवत असताना, याच शहरात कुठेतरी एक उत्तम जेवण सुरू आहे आणि आपण ते मिस केलंय, ही भावना तुम्हाला अस्वस्थ करीत असते. यावरुन शहाणा होऊन मी आता दिवसातलं किमान एक जेवण तरी आधी बुक करतो. सगळी नाही करत, कारण जरा इकडेतिकडे भटकून काही चांगलं मिळतंय का ते शोधायला मला आवडतं. पण दिवसातून असं एक जेवण, ज्याची मी अगदी वाट पाहत असतो, त्याचं रिझर्व्हेशन करायला मी विसरत नाही. या एका लहानशा सवयीमुळे माझं फ्रस्ट्रेशन बरंच कमी झालंय.
जेवणाबद्दलचं आणखी एक फ्रस्ट्रेशन, अगदी मोकळेपणानं सांगायचं तर ते असतं शाकाहारी पर्यायांबाबत. माझी पत्नी हेता शाकाहारी आहे, त्यामुळे हे फ्रस्ट्रेशन मी बऱ्याचदा अनुभवलंय. जरी आता जगात सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये शाकाहारी जेवणाचे विविध पर्याय उपलब्ध असले तरीही आजही काही ठिकाणं, काही रेस्टॉरंट्स, काही एअरलाइन्स अशा आहेत जिथे शाकाहारी जेवणाची अपेक्षा विचित्र मानली जाते आणि त्यासाठी त्यांनी काहीच सोय केलेली नसते. मी असाही अनुभव घेतला आहे की मेन्यूमध्ये शाकाहारी पदार्थांच्या विभागात फक्त फ्रेंच फ्राइज आणि सलाड उपलब्ध होतं. लाँग फ्लाइटवर मी हेतासाठी काळजीपूर्वक शाकाहारी जेवण आधी बुक करुनही भर फ्लाइटमध्ये मला असं सांगण्यात आलं आहे की त्यांच्याकडचं शाकाहारी जेवण संपलंय. म्हणून आता मी नेहमीच बोर्डिंग करण्यापूर्वी आमच्या दोघांच्या जेवणाबद्दल खात्री करुन घेतो. त्याचप्रमाणे जिथे शाकाहारी जेवण मिळणं कठीण असतं, अशा डेस्टिनेशनला गेल्यावर जेव्हा पोटात भूक खवळलेली असते, तेव्हा आशादायीपणे मोबाइलमध्ये न शोधता, तिथे जाण्याआधीच मी त्यासाठीची शोधाशोध गंभीरपणे करुन ठेवतो.
ग्रुपमधील आवडीनिवडी: आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर प्रवास करताना ज्या एका वेगळ्या पद्धतीच्या फ्रस्ट्रेशनला तोंड द्यावं लागतं, त्याचा डेस्टिनेशनशी काही संबंध नसतो. कोणाला उशिरापर्यंत झोपायचं असतं, तर कोणाला सकाळी 8 वाजताच निघायचं असतं. कोणाला शॉपिंगमध्ये रस असतो, तर कोणाला साइटसीइंग महत्त्वाचं वाटतं. बरं सगळ्यांना भूकही एकाच वेळी लागत नाही. त्यामुळे आत्ता जेवायचं की नाही या निर्णयातही एका सुंदर दिवसातली किमान पंचेचाळीस मिनिटं वाया जातात आणि प्रवासाचा वेळ कमी होतो. या सगळ्या अनुभवांतून मी हेच शिकलोय की तुमच्या टूर आयटिनरीमध्ये थोडा वेळ जाणीवपूर्वक मोकळा ठेवावा. प्रत्येक दिवसातले काही तास किंवा चक्क अर्धा दिवसच, जेव्हा सगळे जण आपापल्या मनासारख्या गोष्टी करायला मोकळे असतील. मग रात्री जेव्हा जेवणासाठी सगळे एकत्र येतील तेव्हा प्रत्येकाकडेच सांगण्यासारखं काहीतरी खास असेल आणि दिवसभर सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या धडपडीतला ताणही सोसावा लागणार नाही.
...आणि तरीही हे गोंधळ असायलाच हवेत: हे सगळं जरी मी सांगितलं असलं तरीही माझ्या आठवणीतल्या ट्रिप्समधील फार कमी अशा होत्या ज्या सुरळीत पार पडल्या. मेमोरेबल ट्रिप्समध्ये नेहमीच काहीतरी अडचण उभी राहिली आणि आम्ही तिच्यावर मात केली. ठरवलेलं रेस्टॉरंट भरलेलं होतं, मग आम्ही रस्त्यावरच्या स्टॉलवर गेलो आणि ते त्या ट्रिपमधलं सर्वात उत्तम जेवण ठरलं. व्ह्यू पॉइंट बंद असल्यामुळे आम्ही एका वेगळ्याच रस्त्यावर भटकंती केली. ओव्हर शेड्युल केल्यामुळे दिवसाचं वेळापत्रक कोलमडलं आणि मग आम्ही कुठेतरी बसून, काहीही न करता ती दुपार घालवली, ज्याची आम्हाला खरंच गरज होती.
फ्रस्ट्रेशन्स हा प्रवासाचाच एक भाग आहे. चेकलिस्टमुळे ते कमी होऊ शकतं, पण त्यापासून पूर्ण सुटका होतच नाही. त्यामुळे तुमच्या हॉलिडेमधल्या सर्वात महत्त्वाच्या भागाचं संरक्षण होतं आणि मग जेव्हा काहीतरी अनपेक्षित घडतं तेव्हा तुम्ही अगदी उत्साहाने आणि विनोदबुद्धी वापरुन त्याचा मुकाबला करू शकता.
यातल्या किती गोष्टी, तुम्ही तुमच्या ट्रिपवर अनुभवलेल्या आहेत? माझ्याकडून काही राहून तर गेलं नाही ना? मला तुम्ही अनुभवलेल्या फ्रस्ट्रेशन्सबद्दल, विशेषतः तुम्ही त्याचा मुकाबला कसा करता याबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ.













































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.