USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

५००० वर्षांचा तरुण देश! साऊथ कोरीया, लेट्स गो...

8 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
8 Mins Read
September 14, 2019
September 14, 2019

Quick Summary

सोलला तुमच्या कोरिया ट्रिपची सुरुवात करा, कारण इथे प्राचीन पॅलेसेस आणि आधुनिक हाय टेक वातावरण एकत्र अनुभवता येते.

सोलमध्ये पाच पॅलेसेस पाहण्यासाठी वेळ काढा, विशेषतः गियाँगबॉकगंग पॅलेस आणि त्याचं 7000 खोल्यांचं ऐतिहासिक महत्त्व.

पॅलेस भेटीदरम्यान हॅनबॉक पारंपरिक ड्रेस रेंट करून कोरियन स्टाईल लूकमध्ये अविस्मरणीय फोटो काढा.

चेरी ब्लॉसम आणि ऑटम कलर्ससाठी चँगदेओकगंग आणि चँगगीयाँगगंग परिसर जरूर एक्सप्लोर करा.

जाँगम्यो श्राईनला भेट द्या, कारण ती जोसीऑन डायनॅस्टीच्या राजा राणीच्या स्मृती जपते आणि कोरियाच्या भूतकाळाची ओळख देते.

जेजू आयलंडसाठी व्हिसा नियम सोपे आहेत, कारण ऑन अरायव्हल व्हिसा मिळतो, त्यामुळे प्लॅनिंग सोपी होते.

आपल्या हॉलिडेवर आपल्याला कधी नुसतंच रीलॅक्स होऊन आराम करायचा असतो, तर कधी अ‍ॅडव्हेंचरच्या शोधात आपण असतो, कधी आपल्याला तिथल्या ट्रेडिशन व कल्चरबद्दल जाणून घ्यायचे असते, तिथले स्थलदर्शन करायचे असते आणि कधी-कधी तर फक्त शॉपिंगच करण्यात आपला इंट्रेस्ट असतो... हे सर्व किंबहूना त्यापेक्षाही अधिक बरेच काही आपल्याला दाखवून अनुभवसंपन्न करणारा देश म्हणजे, ५००० वर्षांचा तरूण देश साऊथ कोरीया....

लंडन देखा, पॅरिस देखा और देखा जापान... आणि आता कुठलं तरी नवं ठिकाण बघायची इच्छा आहे, असा विचार भारतातून परदेशवारीवर निघालेल्या अनेक पर्यटकांच्या मनात वारंवार येतो. सुरुवातीच्या फॉरिन हॉलिडेवर सर्वात लोकप्रिय देशांना भेट दिली की आपण जगातल्या अनेक वेगवेगळ्या देशांचा आविष्कार पाहण्यासाठी सज्ज होतो. आपल्या प्रत्येक नवीन फॉरिन हॉलिडेवर आधीच्या हॉलिडेपेक्षा काहीतरी नवीन बघायची, नवीन अनुभव घ्यायची इच्छा  मनात बाळगणं साहजिक आहे. असाच काहीसा विचार माझ्या मनात घोळत असताना आमच्या सिंगापूर एअरलाईन्स बरोबरच्या एका मीटिंगमध्ये त्यांच्या एअरलाईन नेटवर्कवर स्थित असलेल्या सर्व देशांची लिस्ट घेऊन आपण अजून कुठल्या देशांना भेट दिली नाही ह्याची यादी करायला लागलो आणि बघता बघता कोरीयाला जाण्याचा प्लॅन बनला. काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ कोरीयाला भेट  देण्यात पर्यटकांना फारसा इंट्रेस्ट नसायचा. केवळ पर्यटकच नाही तर अगदी ट्रॅव्हल कंपन्याही जपान किंवा चायनाबरोबर कोरीया  असेच तीन देशांचे एकत्र प्रोग्राम बनवत असत. दोन-तीन दिवसात एखाद्या देशाची केवळ ओळख घडते, परंतु त्या देशाच्या खर्‍याखुर्‍या आत्म्याला ओळखायचं असेल तर मात्र एकावेळी एकच देश पाहिला पाहिजे, या माझ्या मतावर माझा ठाम विश्वास आहे.  आपण हॉलिडेवर जाण्याची अनेक कारणं असतात. कधी नुसतंच रीलॅक्स होऊन आराम करायचा असतो, तर कधी अ‍ॅडव्हेंचरच्या शोधात असतो, कधी आपल्याला तिथल्या ट्रेडिशन व कल्चरबद्दल जाणून घ्यायचे असते, तिथले स्थलदर्शन करायचे असते आणि कधी-कधी तर फक्त शॉपिंगच करण्यात आपला रस असतो. आणि हे सर्व, किंबहूना त्यापेक्षाही अधिक बरेच काही आपल्याला कोरीयामध्ये अनुभवायला मिळते.

कोरीयाची राजधानी सोल ला भेट देण्यासाठी आपल्याकडून डायरेक्ट कोरीयन एअरचा पर्यायदेखील आहे त्यामुळे कोरीयाला भेट देणे अगदी सोपे आहे. बरं इथला व्हिसा मिळणेसुद्धा तितकं काही कठीण नाही. गम्मत म्हणजे कोरीयाच्या बहुतेक जागांना भेट देण्यासाठी आपल्याला जाण्याआधी व्हिसा घ्यायला लागतो. पण कोरीयाचे जेजू आयलंड अशी जागा आहे जिथे भारतीय पर्यटकांना व्हिसा घ्यावा लागत नाही आणि डायरेक्ट ऑन अरायव्हल म्हणजे जेजू आयलंडवर पोहोचून व्हिसा मिळतो. कॅथे पॅसिफिक एअरलाईन्स घेऊन आपण हाँगकाँग आणि जेजू आयलंड असा उत्तम हॉलिडे घेऊ शकतो. कोरीयाच्या हॉलिडेची सुरुवात ही तिच्या राजधानी सोलवरून करावी. प्राचीन संस्कृती व आधुनिकीकरणाचं उत्तम मिश्रण म्हणजे सोल. मॉडर्न स्कायस्क्रेपर्स, हाय-टेक सबवे ट्रेन्स व के-पॉप या पॉप कल्चरबरोबर प्राचीन पॅलेसेस, बुद्धिस्ट टेम्पल्स पाहताना स्ट्रीट मार्केट्सवर फिरण्याचा आनंद लुटत सोलचा हॉलिडे अगदी विविध अनुभवांनी परिपूर्ण ठरतो. सोलची कल्चरल ट्रिप सुरू होते ते इथल्या पॅलेसेसना भेट देऊन. इथे एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क पाच-पाच पॅलेसेस आहेत. जवळ-जवळ सर्व पॅलेसेस हे १३०० ते १६०० शतकातले होते पण त्यातल्या बर्‍याच पॅलेसेसवर जपानी आक्रमण झाल्यामुळे ह्यातले बरेच पॅलेसेस रीडेव्हलप करून परत बांधण्यात आले आहेत. यातला सर्वात मोठा पॅलेस म्हणजे गियाँगबॉकगंग पॅलेस. सर्वात जास्त ऐतिहासिक महत्त्व असलेला व सर्वात भारदस्त पॅलेस म्हणून ह्या पॅलेसची ख्याती, तर म्हणे इथे एकेकाळी ७००० खोल्या होत्या. अगदी कोरीयन स्टाईलमध्ये  ह्या पॅलेसमध्ये दिवस घालवायचा असेल तर हॅनबॉक हा ट्रेडिशनल कोरियन ड्रेस रेंटवर घेऊन अगदी इथल्या ट्रेडिशनल लूकमध्ये आपण हा पॅलेस बघू शकतो आणि आपला एक अविस्मरणीय फोटोदेखील काढू शकतो. ईस्ट पॅलेस कॉम्प्लेक्समध्ये चँगदेओकगंग पॅलेस आणि चँगगीयाँगंग या दोन्ही पॅलेसेसची गणना होते. हे दोन्ही पॅलेसेस ओरिजनल असून जुन्या बांधकामाचे उत्तम प्रतिक आहेत. यातील चँगचियाँगगंग पॅलेसचे प्रशस्त मैदान व इथली झाडे ही चेरी ब्लॉसम व ऑटम कलर्स दोन्हीसाठी प्रसिद्द आहेत. देओकसुगंग आणि गीयाँगहुइगुंग ही त्यामानाने लहान पॅलेसेस आहेत. तर जाँगम्यो श्राईन ही जोसीऑन डायनॅस्टीच्या राजा-राणीच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी बांधलेली श्राईन आहे. या प्राचीन इमारतींनी कोरीयाच्या भूतकाळाची ओळख होते. पण त्याचसोबत इथे दाँगदायमुन डिझाईन प्लाझाच्या नियोफ्युचरिस्टिक शैलीत बांधलेल्या बिल्डिंगला भेट दिल्यानंतर कोरीयाच्या भविष्यकाळाची झलक आपण पाहतो, तेव्हा नक्की भेट द्या. डीडीपी हे जाहा हदिद आणि सामू ह्या आर्किटेक्टच्या आश्‍चर्यकारक डिझाईनमध्ये बांधलेले साऊथ कोरीयाचे फॅशन हब. इथे वेगवेगळे शॉप्स, डिझाईन सेंटर, रूफटॉप पार्क आपल्या टूरवरचं विशेष आकर्षण ठरतात. एखाद्या स्पेसशिपसारखे दिसणारे हे प्लाझा जाणीव करून देते की साऊथ कोरीयाचे लक्ष भविष्यावर केंद्रित आहे. त्यामुळेच सॅमसंग, हुन्दाई, किया अशा अनेक मोठ्या कॉर्पोरेशन्स ह्या कोरीयन आहेत ह्यात काहीच आश्‍चर्यजनक गोष्ट नाही. हल्ली तर बिझनेस टूर्ससाठी अनेक कॉर्पोरेट्स अशा कंपन्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या कॉन्फरन्सेस व इन्सेंटिव्ह टूर्ससाठी कोरीयाची निवड प्रामुख्याने करतात.

काही वर्षांपूर्वी भारतात गंगनम स्टाईल हे गाणे सगळीकडे वाजत होते, पण अतिशय लोकप्रिय ठरलेल्या या गाण्याचं जन्मस्थान मात्र साऊथ कोरीया आहे. इथल्या लोकांच्या राहणीमानाची थट्टा करणारं हे गाणं जगभरात लोकप्रिय होतं, ते ह्या गाण्याच्या मोहक चालीसोबतच, या गाण्याचा सिंगर पीएसव्हाय सायच्या विशिष्ट डान्ससाठी. सोलच्या नवश्रीमंत पीढीचे राहण्याचे स्थान म्हणजे गंगमन डिस्ट्रीक्ट, हे सुद्धा एक कारण या गाण्याची लोकप्रियता वाढण्यामागे असू शकतं. आपणही या गंगनम भागाची सैर करू शकता व नुसते बघण्यात आनंद न मानणार्‍या पर्यटकांना इथे एक डान्सिकल एक्सपरीमेंटचा अनुभवही घेता येतो. इथल्या डान्स स्टुडिओमध्ये गंगनम स्टाईलवर डान्स शिकण्याचे क्लासेससुद्धा उपलब्ध आहेत, तेव्हा सोलच्या एखाद्या संध्याकाळी गंगनम स्टाईलवर थिरकत एका म्युझिकल इव्हिनिंगची मजा लुटून तर पहा. कोरीयन पॉपला के-पॉप म्हणून ओळखले जाते.  तेव्हा संपूर्ण जगात आणि खास करून एशियामध्ये या के-पॉपचा नवीन पीढीवर इतका प्रभाव का पडला आहे, हे एखादे के-पॉप म्युझिक शो किंवा के-पॉप डान्स स्टुडियोला भेट देऊन स्वतःच ठरवा.

दक्षिण कोरीयाचे आपल्या उत्तरेकडच्या नॉर्थ कोरीयाबरोबर शांतता स्थापन करण्यासाठी १९५३ नंतर डीएमझेड किंवा दी मिलिटराईज्ड झोन स्थापन करण्यात आले. सोलपासून जवळ असलेल्याडीएमझेडला आपण भेट देऊ शकता. दोन्ही देशांच्या बॉर्डरवर या जागेत फ्रीडम ब्रिज, थर्ड इन्फिल्ट्रेशन टनल, इम्जिंगाक पार्क, डीएमझेड म्युझियम व डोरा ऑब्झर्व्हेटरी आहेत, त्यांना नक्की भेट द्या. एका बाजूला शांतता अनुभवण्यास देणारं डीएमझेड तर दुसरीकडे मनसोक्त खेळण्याचा आनंद देणारं थीम पार्क्स, दोन्ही अनुभव घेणं तितकेच महत्त्वाचे. इथले लॉत्ते पार्क हे एक अम्युझमेंट पार्क आहे, जिथे लॉत्ते वर्ल्ड अ‍ॅडव्हेंचर आणि लेक पार्क मॅजिक लँडमध्ये फोक म्युझियम, शॉपिंग मॉल, आईस रिंकमध्ये स्केटिंग, हॉटेल व १२३ दुकानांचे डीपार्टमेंट स्टोअर सर्वकाही बघायला मिळते आणि अनुभवायलाही. दुकानाच्या टॉपवर सोल स्काय ऑब्झर्व्हेटरीवरून सोलचा सुंदर नजारा पाहता येतो. तसेच सोल ग्रॅन्ड पार्क हे कोरीयाचे सर्वात मोठे थीम पार्क आहे, ज्यात सोल लॅन्ड अम्युझमेंट पार्क, प्राण्यांचे झू, बोटॅनिकल गार्डन, व नॅशनल म्युझियम ऑफ मॉडर्न अ‍ॅन्ड कंटेपररी आर्टना भेट देता येते. या पार्कलाच एव्हरलँडसुद्धा म्हणतात आणि हा पार्क सॅमसंग इंडस्ट्रीच चालवत असल्याने उत्तम असणार हे गृहितच धरायला हवे.

साऊथ कोरीया आपल्या फूड कल्चरसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आपल्या ओळखीचे व कोरीयाचे सर्वात प्रसिद्ध फूड आयटम म्हणजे किमची. या भाज्यांना फरमेंट करत बाटल्यांमध्ये ठेवण्याची प्रथा सुरू झाली ती इथल्या कडाक्याच्या थंडीतसुद्धा जेवण्याची सोय करण्यासाठी. ही किमची आज इतकी प्रसिद्ध आहे, की कोरीयन्स फोटो काढताना चेहर्‍यावर परफेक्ट स्माइल आणण्यासाठी चीज म्हणण्याऐवजी किमची असे म्हणतात. भाज्या, मीट डिशेस, सूप्स इत्यादी कोरीयन गोष्टी चाखण्यासाठी आपण एखादी फूड टूर घेऊ शकतो. किंवा स्वतः बनवायला शिकायचं असेल तर कुकिंग क्लास देखील घेऊ शकतो. क्लासवरून आठवले की कोरीयामध्ये अनेक अनोखे क्लासेस आपण घेऊ शकतो व आपल्या हॉलिडेवर काही नवीन गोष्टी शिकू शकतो. डान्स क्लास, कुकिंग क्लासबरोबरच बायकांना खास आवडेल तो म्हणजे कोरीयन ब्युटी क्लास. कोरीयन मुली दिसायला फार सुंदर आहेतच पण आपले सौंदर्य जपायला ते बरीच काळजी घेतात. हे रहस्य समजून घ्यायला आपण इथे ब्युटी ट्रीटमेन्ट्स बरोबरच ब्युटी क्लासेससुद्धा घेऊ शकता आणि मेकअप पर्सनलाईज् करून खास स्वत:साठी तो बनवूही शकता. कोरीयामध्ये अजून एक अनोखे आकर्षण आहे ते इथले कॅफेस्. जगभरातल्या कॉफी-टी हाऊसेसमध्ये तिथल्या लोकल्सबरोबरच त्यांच्या जीवनाची झलक पाहता येते. कोरीयामध्ये प्रसिद्ध आहेत ते आगळे-वेगळे पेट कॅफेस्. इथे पाळीव प्राण्यांबरोबर आपण खेळू शकता. मांजरी, कुत्रे, शीप्ससारख्या पाळलेल्या प्राण्यांबरोबर खेळून दैनंदिन स्ट्रेस बराच कमी होतो अशी इथली समजूत आहे. एवढेच काय तर आपण इथे फिशिंग कॅफेमध्ये फिशिंगसुद्धा करू शकतो.

एवढ्या सगळ्या गोष्टी बघून व अनुभव घेऊन दमायला झाले तर कोरीयाकडे त्याचेसुद्धा उत्तर आहे. २४ तास उघडे असणारे इथले जिमजिलबंग हे पर्यटकांमध्ये व लोकल्समध्ये सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहे. गरम व थंड पाण्याचे पूल्स, सॉना मसाज व एंटरटेन्मेंट लॉजेसमध्ये आपण रात्रभर वास्तव्य करत रीलॅक्स होऊ शकतो. कोरीयाच्या शहरांबरोबरच इथली गावं, बीच रीसॉर्टस् व आयलंड्ससुद्धा पर्यटनासाठी उत्तम ठरतात. आपल्या अनोख्या लोकेशनमुळे कोरीयामध्ये चारही ऋतू अनुभवायला मिळतात. वसंतातले चेरी ब्लॉसम, उन्हाळ्यात फुलांनी बहरलेले मैदान, ऑटममध्ये अनोखे फॉल कलर्स व हिवाळ्यात स्कीईंग व इतर स्नो स्पोर्टस्चा आनंद सर्व काही साऊथ कोरीयामध्ये अनुभवता येते. मग एकदा तरी साऊथ कोरीयाला जायलाच हवे नाही का?

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
सर्वात पुरातन संस्कृतीपासून, जगातल्या सर्वात उंच स्टॅच्यूपर्यंत... गुजरात वीणा वर्ल्डसोबत!
8 mins, read

सर्वात पुरातन संस्कृतीपासून, जगातल्या सर्वात उंच स्टॅच्यूपर्यंत... गुजरात वीणा वर्ल्डसोबत!

Published in Sakal Saptrang 4th October 2026 भन्नाट सफर गुजरात म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याच्या वाटेवर मध्ये लागणारं एक ठिकाण असं आपण समजतो. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जाताना आपण गु

तुम्ही एअरपोर्टवर किती आधी पोहोचता?
8 mins, read

तुम्ही एअरपोर्टवर किती आधी पोहोचता?

Published in Maharashtra Times 4th October 2026   ...तुम्हाला एअरपोर्टवरचं वातावरण आवडतं का तुम्हाला एअरपोर्ट थकवणारा वाटतो? वेळ वाचवण्यासाठी लहानसहान धोके पत्करायला तुम्ही तयार असता की काहीतरी

विवा ला फ्रान्स
8 mins, read

विवा ला फ्रान्स

Published in Losatta Lokrang 4th October 2026 मावळतीच्या वेळी संपूर्ण पॅरिस सोनेरी रंगात न्हाऊन निघालेलं असतं. तिथे उभं राहून पॅरिसकडे पाहताना असं वाटतं की अख्खं शहर खास आपल्यासाठीच पोझ देऊन उभं आह

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!