India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

तुम्ही एअरपोर्टवर किती आधी पोहोचता?

12 mins. read
Neil Patil
Neil Patil
12 Mins Read
October 01, 2026
October 01, 2026

Quick Summary

एअरपोर्टवर पुरेसा वेळ आधी पोहोचल्याने तुमच्या प्रवासाचं नियंत्रण तुमच्या हातात असल्याची सुखावणारी भावना येते.

लेखकाने 10 वर्षांत 275 फ्लाइट्स घेतल्या आणि फक्त दोनदा फ्लाइट मिस झाली, म्हणजे काटेकोर प्लॅनिंग उपयोगी पडतं.

हेता बरोबर प्रवास करताना तिचं नियोजन इतकं अचूक असतं की फ्लाइटच्या वेळेच्या आधीच एअरपोर्टवर पोहोचण्याचा तिचा नियम असतो.

विमानप्रवास हा सलग अनुभव नसून घर ते एअरपोर्ट, एअरपोर्ट, आणि पुढचे टप्पे असे वेगवेगळे टप्पे असतात.

एअरपोर्टचा ताण फक्त सिक्युरिटीपासून सुरू होत नाही, तर घराबाहेर पडल्यापासूनच ट्रॅफिक आणि अनपेक्षित विलंबांमुळे सुरू होतो.

सिक्युरिटी रांगेत वेळ वाचवण्यासाठी आक्रमक वर्तन टाळा आणि रांगेच्या वास्तव नमुन्यांचा विचार करून शांतपणे पुढे जा.

Published in Maharashtra Times 4th October 2026

 

...तुम्हाला एअरपोर्टवरचं वातावरण आवडतं का तुम्हाला एअरपोर्ट थकवणारा वाटतो? वेळ वाचवण्यासाठी लहानसहान धोके पत्करायला तुम्ही तयार असता की काहीतरी बिघडेल या भितीने आदल्या रात्री तुमची झोपच उडते?...

 

येस! बरोबर वाचलंत. आजचा प्रश्न हाच आहे की तुम्ही एअरपोर्टवर किती आधी पोहोचता? वरवर पाहता हा लॉजिस्टिक्सचा मुद्दा वाटेल किंवा व्यावहारिक प्रश्न वाटेल, पण मी जितक्या जास्त वेळा एअरपोर्टला गेलो, तसतसं मला हे प्रकर्षाने जाणवलं की हा प्रश्न तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी, धोका पत्करण्याच्या मनोवृत्तीशी आणि प्रवास म्हणजे तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत असतं याच्याशी अधिक निगडित आहे.

मी आणि माझी पत्नी हेता, आम्ही दोघं या बाबतीत दोन ध्रुवांइतके विरुद्ध आहोत. गेली दहा वर्षे मी माझ्या विमानप्रवासाच्या नोंदी जाणीवपूर्वक ठेवत आलो आहे. त्या नोंदींनुसार मी या काळात 275 फ्लाइट्स घेतल्या, 69 एअरपोर्टसवरुन गेलो, 35 वेगवेगळ्या एअरलाइन्सने प्रवास केला. या सगळ्या काळात मी फक्त दोनदा फ्लाइट मिस केली. या दोन्ही वेळा इतक्या दुर्मिळ घडामोडी घडल्या होत्या की कितीही काटेकोर प्लॅनिंग करूनही त्या टाळता आल्या नसत्या.

मला नेहमीच असं वाटतं की विमानप्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं नव्हे, उलट आपण सगळ्यांनीच त्याकडे एक अनुभव म्हणून पाहायला हवं. मला हातात पुरेसा वेळ ठेवून एअरपोर्टवर पोहोचायला आवडतं. वेगवेगळ्या एअरपोर्टस्‌‍वर कामकाज कसं चालतं, विमानांच्या विविध प्रकारांमधील फरक काय असतो, एअरपोर्टची सिस्टीम कशी चालते हे पाहण्यासाठी तो वेळ वापरता येतो. असं आधी पोहोचल्यामुळे घरातून बाहेर पडल्यापासून आपल्या प्रवासाचं नियंत्रण आपल्याच हातात आहे अशी जी भावना मनात तयार होते, ती फार सुखावणारी असते.

पण हेताबरोबर प्रवास करताना मात्र सगळं चित्रच वेगळं असतं. हेताचं एअरपोर्टला पोहोचण्याचं प्लॅनिंग हे अगदी सुईच्या टोकासारखं काटेकोर असतं. जर फ्लाइट 10 वाजताचं असेल तर ती बरोब्बर 9 वाजता एअरपोर्टला पोहोचते, 8.55 ला नाही की 9.10 ला नाही. आणि मग सुरू होते एकच धावपळ. तिच्याकडे एंट्रन्सपासून सिक्युरिटीपर्यंत आणि तिथून बोर्डिंगपर्यंतच्या प्रत्येक मिनिटाचा हिशोब असतो. त्यातला एकही सेकंद वाया जाणार नाही याची ती दक्षता घेते आणि प्रत्येक वेळी, तिच्या वेळेत, ती हे सगळं जमवते सुद्धा.

हेतासाठी तिच्या आयुष्यात तिचा वेळ सर्वात मौल्यवान आहे. त्यामुळे ज्या वेळेत ती दुसरं काही काम पूर्ण करू शकते, अशी जास्तीची 15 मिनिटं एअरपोर्टवर लवकर पोहोचण्यात वाया घालवणं हा तिच्या दृष्टीने अक्षम्य अपराध आहे. एअरपोर्ट हा तिच्या प्रवासाचा हिस्साच नाही. तिच्यासाठी तो घर आणि डेस्टिनेशनमधला, एक अडथळ्यांनी भरलेला मार्ग आहे. त्यामुळे अधिकाधिक कार्यक्षमतेनं तो पार करायचा आणि पुढे चालू लागायचं, ही तिची भूमिका असते. तिच्या या लॉजिकने जरी मी चालत नसलो तरी मी त्याचाही आदरच करतो. त्यामुळे आम्ही दोघं जेव्हा एकत्र प्रवास करतो तेव्हा मला नेहमी हा प्रश्न पडतो की आमच्यातलं नेमकं बरोबर कोण आहे? विचाराअंती माझ्या लक्षात आलंय की तुम्ही प्रवासाच्या कोणत्या टप्प्यावर आहात यावर याचं उत्तर अवलंबून आहे. कारण विमानप्रवास हा एक सलग अनुभव नाही. त्याचे चार वेगवेगळे टप्पे आहेत आणि एअरपोर्टवर पोहोचण्याच्या कित्येक तास आधी, शांतपणे घेतलेला एक निर्णय या टप्प्यांना आकार देतो.

चार टप्पे - एक निर्णय

पहिला टप्पा, ज्याबद्दल आपण कधीच काही बोलत नाही, तो म्हणजे घरापासून एअरपोर्टपर्यंत पोहोचण्याचा. एअरपोर्टवरचा ताण हा सिक्युरिटीपासून सुरू होतो असा बहुतेक सगळ्यांचा समज असतो, मात्र तसं नसतं. तुम्ही घराबाहेर पाऊल टाकता तेव्हापासून तो सुरू होतो. सगळं आपल्या कंट्रोलमध्ये असल्याची आभासी भावना इथूनच तर आपल्या मनात रुजते. तुम्ही गुगल मॅप तपासता, आरामात पोहोचण्याची वेळ बघता आणि निर्धास्त होता. मग सुरू होतं वास्तव. तुमचा ड्रायव्हर एक चुकीचं वळण घेतो. पाच मिनिटांपूर्वी जो चौक मोकळा असतो, तिथे अचानक ट्रॅफिक जाम होतो. अशी एकामागून एक मिनिटं वाया जाऊ लागतात आणि तुमचा बफर टाईम आक्रसायला लागतो. थोड्या वेळापूर्वीचा तुमचा निश्चिंतपणा संपतो आणि मनात धाकधूक सुरू होते की ‌‘चेक इन बंद व्हायच्या आधी मी पोहोचेन ना?‌’, ‌‘आणि जर गेट लवकर बंद झालं तर?‌’...

दुसरा टप्पा एअरपोर्ट हाच असतो. जिथे तुमच्या वेळेच्या गणिताचा प्रभाव फक्त तुमच्यावरच नाही, तर तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवरही पडत असतो. सिक्युरिटीच्या रांगेत काही हमखास दिसणारे नमुने आपण सगळ्यांनीच पाहिलेले असतात, ते म्हणजे रांगेवर विश्वास नसलेले, अतिशय उशिरा आल्यामुळे रांग मोडून पुढे जाण्याची गरज असलेले, आपला ट्रे आधी ठेवण्यासाठी आक्रमकपणे ढकलाढकली करणारे. जर तुम्हालाही उशीर झाला, तर मग तुमची इच्छा नसतानाही तुम्ही यातलेच एक बनता. घाईघाईने येणारा प्रत्येक प्रवासी हा एअरपोर्टवरच्या आधीच ताणलेल्या यंत्रणेवर जास्तीचं प्रेशर टाकणारा ठरतो.

पण जर तुम्ही लवकर पोहोचलात तर हेच एअरपोर्ट एकदम वेगळं दिसतं. तुम्ही अधिक शांत असता, तुमच्याकडे भरपूर वेळ आणि पर्यायाने संयम असतो. त्यामुळे बारीकसारीक गोष्टींनी तुम्हाला वैतागायला होत नाही. टर्मिनल तेच असतं, मात्र अनुभव एकदम वेगळा असतो.

तिसरा टप्पा म्हणजे फ्लाइट. इथे तुम्ही आधी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम हळूहळू जाणवू लागतात. तुम्ही उशिरा बोर्डिंग करता तेव्हा डोक्यावरचे बॅग्ज ठेवायचे स्लॉट्स भरलेले असतात. मग तुम्हाला तुमच्या सीटपासून दहा रांगा मागच्या रॅकमध्ये बॅग ठेवावी लागते किंवा हेताला नेहमी भेडसावणारं दुःस्वप्न म्हणजे गेटवरच तुम्हाला केबिन बॅग चेक इन करायला सांगितलं जातं. अतिशय काळजीपूर्वक केलेलं पॅकिंग एका क्षणात वाया जातं. यातली एकही गोष्ट सुटी असेल तर फार त्रास होत नाही, पण या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या की मग त्याचा परिणाम तुमच्यावर फ्लाइटमधले दोन, चार, आठ तास होत राहतो.

चौथा टप्पा सुरू होतो लँडिंगनंतर. इथे आधीपासून मनात साचलेलं फ्रस्ट्रेशन वर यायला सुरुवात होते. तुमची बॅग जर शेवटच्या क्षणी गेटवर चेक इन झालेली असेल, तर लगेज बेल्टवर तुम्हाला अधिक काळ थांबावं लागतं आणि काहीतरी गोंधळ व्हायची शक्यताही वाढलेली असते. तुम्ही बोर्डिंग करतानाच तणावाखाली असाल, तर इमिग्रेशनच्या रांगा तुम्हाला जास्तच लांबलचक वाटतात, एअरपोर्टच्या बाहेरचं को-ऑर्डिनेशन अधिक गोंधळाचं वाटू लागतं आणि अगदी कॅब शोधण्यासारखी साधी गोष्टही आधीच थकवणाऱ्या दिवसातली, पेशन्सचा अंत पाहणारी ठरते.

एअरपोर्टवरील तुमचं वर्तन तुमच्याबद्दल काय सांगतं?

हेतासारखे जे ‌‘ऑप्टिमायझर‌’ असतात, त्यांना रिकाम्या वेळेचा तिटकारा असतो. त्यांना एअरपोर्टवर घालवलेलं प्रत्येक जास्तीचं मिनिट हे वाया गेल्यासारखं वाटतं. कारण परफेक्ट टाइमिंग हेच तर उद्दिष्ट असतं. चेक इन सुरू होईल त्याच वेळी पोहोचणं, शक्य असेल तिथे बॅगेज टाळणं, गतिमान हालचाली, वेगवान विचार आणि जलद कृती हे जमलं तर तुमच्याइतकं एफिशियंट दुसरं कोणी नसतं. पण जर बिनसलं तर मात्र टोकाचा ताण घेऊन तशीच धावपळ टर्मिनलभर करावी लागते. एफिशियन्सी उच्च असते, पण वेळेचं मार्जिन मात्र अगदीच अल्प असतं.

आणि काही जण माझ्यासारखे ‌‘जिज्ञासू‌’ किंवा अनुभवाचा आनंद घेणारे असतात. अशा प्रकारच्या लोकांसाठी विमानप्रवास म्हणजे फक्त ट्रान्सपोर्टेशन नसतं, तर तो एक इव्हेंट असतो. लवकर पोहोचणं म्हणजे वेळ वाया घालवणं नसून तो प्रवासाचाच एक भाग असतो. अजिबात घाई न करता, आरामात तिथली सिस्टीम कशी काम करते हे पाहण्यातली मजा घेता येते. बोर्डिंगचा तो नियंत्रित गोंधळ सुरू होण्याआधी, सारं काही आपल्या नियंत्रणात आहे ही भावनाच छान असते. एफिशियन्सी कमी, पण एन्जॉयमेंट भरपूर.

याशिवाय काही ‌‘बजेट ट्रॅव्हलर‌’ असतात, ज्यांचे सगळे निर्णय हे किमतीशी जोडलेले असतात. वेळेची पर्वा न करता, सर्वात स्वस्त फ्लाइट निवडणं, पैसे वाचवायला अगदी कमी वेळेतलं कनेक्शन घेणं, जास्तीत जास्त पैसे वाचवण्यासाठी वेळापत्रक ताणणं हे करणारे प्रवासी एकीकडे आणि दुसरीकडे ‌‘बफर बिल्डर्स‌’, म्हणजे जे कायम सावधगिरी बाळगतात, जे लवकर पोहोचतात, दीर्घ ले ओव्हर पसंत करतात आणि बोर्डिंग सुरू व्हायच्या कितीतरी वेळ आधीच गेटजवळ शांतपणे बसून राहतात.

आता यातलं बरोबर कोण? या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर यातले सगळेच बरोबर आहेत आणि तरीही यातलं कोणीच नाहीसुद्धा. कारण एअरपोर्टवरील वेळेचं नियोजन करण्यासाठी सगळ्यांना योग्य आणि साजेशी अशी एकमेव पद्धत अस्तित्त्वात नाही. पण तरीही त्याकडे अधिक सजगपणे पाहणं शक्य असतं.

बफर्स महत्त्वाचे, वेळ नाही!

माझ्या प्रवास करण्याच्या पद्धतीत बदल घडला तो याच विचारामुळे. मला भेटलेल्या सगळ्यात स्मार्ट प्रवाशांना मी कधी वेळेच्या अंगाने विचार करताना पाहिलेलं नाही. ते नेहमी ‌‘बफर‌’ म्हणजे अतिरिक्त वेळेचा विचार करतात आणि एकदा तुम्ही हा मानसिक बदल केलात की मग सगळंच बदलतं. मग तुम्ही ‌‘मी दोन तास लवकर पोहोचायला हवं का?‌’ असा प्रश्न न विचारता अधिक नेमके प्रश्न विचारू लागता, जसं की माझं आजचं ट्रॅव्हल बफर किती आहे? या विमानतळावर अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्यता किती जास्त आहे? प्रत्यक्षात किती स्ट्रेस सहन करण्याची माझी तयारी आहे?

आता मी प्रत्येक फ्लाइटचा विचार तीन लेयर्समध्ये करतो.

पहिला म्हणजे एअरपोर्टवर पोहोचतानाचा बफर टाईम, ज्याच्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केलं जातं. आपल्यापैकी बहुतेक जण गुगल मॅपवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. प्रत्यक्षात मुंबई, दिल्ली, बेंगळुरू किंवा कोणत्याही मोठ्या शहरातलं ट्रॅफिक हे कधीच स्थिर नसतं, तर कायम बदलत-वाढत असतं. त्यामुळे मी एक साधा नियम लावतो. गुगल मॅप दाखवत असलेल्या वेळेला दीडने गुणायचं (बंगळुरूमध्ये असाल तर सरळ दुप्पट करायचं!), म्हणजे गुगल 60 मिनिटांत पोहोचाल असं सांगत असेल, तर मी धरतो 90 मिनिटं लागतील. जर गुगल 40 मिनिटं म्हणत असेल, तर मी 60 मिनिटांचा वेळ गृहीत धरतो. या एका सवयीमुळे नंतरचं चुकीचं वळण, अचानक वाढलेलं ट्रॅफिक, ड्रायव्हरने केलेला उशीर या सगळ्या गोष्टी आरामात मॅनेज होतात आणि मुख्य म्हणजे तुम्ही एअरपोर्टवर पोहोचण्याआधीची तुमची शांत मनोवस्था भंग पावत नाही.

दुसरा बफर एअरपोर्ट आणि तिथली सिस्टीम हाच असतो. एकदा का तुम्ही आत प्रवेश केलात की मग ज्यावर तुमचं नियंत्रण नाही अशा एका सिस्टीममधला तुमचा प्रवास सुरू होतो. प्रवेशाच्या रांगा, चेक इन काउंटर्स, सिक्युरिटी चेक्स, बोर्डिंग गेट्स... एखाद्या चांगल्या दिवशी हे सगळं फक्त पंधरा मिनिटांत पूर्ण होतं, पण जर दिवस खराब असेल तर मात्र यालाच तासापेक्षाही जास्त वेळ लागतो.

डिजी यात्रा, प्रायोरिटी चेक इन, किंवा फक्त केबिन लगेज (चेक इन लगेज न घेता) असे उपाय करुन तुम्ही हा वेळ कमी करू शकता, पण अनिश्चितता नाही. एअरपोर्टस्‌‍ तुमच्या वेळेनुसार चालत नाहीत. इथलं कामकाज कितपत गर्दी आहे यावर अवलंबून असतं. तुम्ही फक्त एवढंच करु शकता की ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीत त्यांना तोंड देण्यासाठी पुरेसं वेळेचं मार्जिन हातात ठेवायचं.

तिसरा आणि सर्वात दुर्लक्ष केलेला म्हणजे तुमचा पर्सनल बफर. याचा एअरपोर्टशी काहीही संबंध नसतो. तो फक्त आणि फक्त तुमच्याशीच निगडित असतो. जर उशीर होऊ लागला तर तुम्हाला लगेच स्ट्रेस येतो का? तुम्हाला एअरपोर्टवरचं वातावरण आवडतं का तुम्हाला एअरपोर्ट थकवणारा वाटतो? वेळ वाचवण्यासाठी लहानसहान धोके पत्करायला तुम्ही तयार असता की काहीतरी बिघडेल या भितीने आदल्या रात्री तुमची झोपच उडते?

हेता अत्यंत अल्प पर्सनल बफर ठेवून प्रवास करते. तिला अगदी शेवटच्या क्षणी पोहोचणं जमतं, तिची मानसिक धारणाच तशी आहे. तिच्यापेक्षा मला भरपूर पर्सनल बफर लागतो. तणावपूर्ण 5 मिनिटांपेक्षा मी जास्तीच्या 30 मिनिटांच्या निवांतपणाला अधिक प्राधान्य देतो. कोणीच चूक नाही, पण तुम्ही कोणत्या प्रकारात येता हे जाणून घेणं हा प्रवासाचं उत्तम नियोजन करण्याचा पहिला टप्पा असतो.

जर सर्वसाधारणपणे सगळीकडे उपयोगी पडणारा नियम हवा असेल तर डोमेस्टिक फ्लाइटसाठी डिपार्चरच्या आधी 2 ते 2.30 तास पोहोचायचं टार्गेट ठेवावं आणि इंटरनॅशनलसाठी 3 ते 3.5 तास आधी. आणि मग त्यावर एक फायनल लेयर जोडा मानसिक शांततेच्या 30 मिनिटांचा. त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही, उलट त्यामुळे तुमचा सगळा अनुभवच बदलून जातो.

आधीच घेतलेला निर्णय

तुमची याआधीची फ्लाइट आठवून बघा, ती कशी होती? शांत-निवांत का गोंधळाची? तुम्हाला बोर्ड करताना ती एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात असल्याचा फील आला होता का बोर्डिंग करतानाच तुम्ही पार थकून गेला होतात? कारण अनेक वेळा तुम्ही एअरपोर्टवर पोहोचण्याआधीच तुमच्या सगळ्या प्रवासाचा सूर सेट झालेला असतो. घराबाहेर पडताना तुम्ही घेतलेल्या एका साध्या निर्णयाने हा सूर ठरलेला असतो.

तसा विचार केला तर विमानप्रवास हाच एक अचाट प्रकार आहे. आपण 37000 फूटांवरून उडत, शहरं, देश, किनारपट्ट्या अक्षरशः काही तासांमध्ये ओलांडतो. ही भन्नाट गोष्ट ज्या विलक्षण तंत्रज्ञानामुळे शक्य होते, त्या तंत्रज्ञानाइतकाच हा अनुभवही विलक्षणच असायला हवा. तरीही अनेकदा आपण हा प्रवास धावपळीत, स्ट्रेस घेऊन आणि जराशा चिडचिड्या मनःस्थितीत सुरू करतो.

यातल्या अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात. म्हणजे अगदी सगळ्याच नसतात. काही वेळा होणारा उशीर टाळता येत नाही, रांगा लागतातच आणि कितीही प्लॅनिंग केलं तरी काही अनपेक्षित अडथळे येतात. पण वेळेचं पुरेसं मार्जिन हातात ठेवलं, प्रवासापूर्वीच्या या प्रवासाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला, तर आपण हा सगळा अनुभव बदलू शकतो. जाणीवपूर्वक प्लॅनिंग केल्यावर रिॲक्शन्स देण्याची वेळच येत नाही आणि आपला प्रवास घाईगर्दीकडून निवांतपणाकडे आरामात होतो.

कधीकधी हा बदल घडण्यासाठी गरज असते ती फक्त घरातून ज्या वेळी बाहेर पडून चालेल असं वाटतं त्यापेक्षा थोडं लवकर निघण्याची. तर मग आता पुढलं फ्लाइट घेताना एअरलाइन काय सांगतेय किंवा गूगल मॅप काय दाखवतोय यापेक्षा स्वतःलाच विचारा की तुम्हाला कोणता अनुभव हवा आहे? तुम्हाला एअरपोर्टवर धावत सुटायचं आहे, का रमतगमत, शांतपणे चालत जायचं आहे? निवड पूर्णपणे तुमच्या हातात आहे. पुन्हा भेटूया, पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
सर्वात पुरातन संस्कृतीपासून, जगातल्या सर्वात उंच स्टॅच्यूपर्यंत... गुजरात वीणा वर्ल्डसोबत!
12 mins, read

सर्वात पुरातन संस्कृतीपासून, जगातल्या सर्वात उंच स्टॅच्यूपर्यंत... गुजरात वीणा वर्ल्डसोबत!

Published in Sakal Saptrang 4th October 2026 भन्नाट सफर गुजरात म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याच्या वाटेवर मध्ये लागणारं एक ठिकाण असं आपण समजतो. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जाताना आपण गु

विवा ला फ्रान्स
12 mins, read

विवा ला फ्रान्स

Published in Losatta Lokrang 4th October 2026 मावळतीच्या वेळी संपूर्ण पॅरिस सोनेरी रंगात न्हाऊन निघालेलं असतं. तिथे उभं राहून पॅरिसकडे पाहताना असं वाटतं की अख्खं शहर खास आपल्यासाठीच पोझ देऊन उभं आह

जशी बॅग, तसा स्वभाव!
12 mins, read

जशी बॅग, तसा स्वभाव!

Published in Maharashtra Times 27th September 2026 ...तिथे अशा विसरलेल्या वस्तूंमुळे एअरपोर्टवर किंवा प्रवासात किंवा एका वेगळ्या देशात अपरात्री मोठा प्रश्न उभा राहू शकतो. म्हणून बारकाईने पाहिलंत, त

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!