Published in Sakal Saptrang 4th October 2026
भन्नाट सफर
गुजरात म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याच्या वाटेवर मध्ये लागणारं एक ठिकाण असं आपण समजतो. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जाताना आपण गुजरातमधून प्रवास करतो आणि पुढे निघून जातो. पण खरं तर भारतातील सर्वाधिक वैविध्यपूर्ण प्रवासांपैकी एक प्रवास आपल्याला गुजरातमध्ये करता येतो. इतिहास, संस्कृती, निसर्ग, वन्यजीव, अध्यात्म आणि खाद्यसंस्कृती यांचं अतिशय सुंदर मिश्रण इथे पाहायला मिळतं. आणि विशेष म्हणजे, यातील बरीच ठिकाणं अजूनही तुलनेने कमी गर्दीची आहेत.
या प्रवासाची सुरुवात आपण अहमदाबादपासून करू शकतो. भारतातील पहिलं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सिटी असलेलं अहमदाबाद आपल्याला इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा दाखवतं. जुन्या शहरातल्या कोरीव लाकडी हवेल्या, प्रसिद्ध दगडी जाळीकाम असलेली सिद्दी सय्यद मशीद आणि आजही शेजारधर्म जपणाऱ्या पारंपरिक ‘पोल’मधली घरं, शहराची खास ओळख सांगतात. महात्मा गांधी अनेक वर्षं ज्या साबरमती आश्रमात राहिले, तोही अहमदाबादच्या इतिहासातील एक शांत, पण महत्त्वाचा अध्याय आहे. पाटणला गेलात की ‘राणी की वाव’ पाहायला मिळते. अकराव्या शतकात बांधलेली ही पायरीवजा विहीर म्हणजे जणू जमिनीखाली कोरलेलं एखादं उलटं मंदिरच! जवळच असलेलं मोढेरा सूर्य मंदिरही तितकंच भव्य आहे. सूर्योदयाच्या दिशेचा विचार करून उभारलेलं हे मंदिर त्या काळातील स्थापत्यकलेची कल्पकता दाखवतं. या दोन्ही ठिकाणी घाईघाईने फोटो काढून पुढे जाण्यापेक्षा थोडा वेळ थांबून त्यांचं सौंदर्य अनुभवता येतं.
यानंतर प्रवास कच्छकडे वळतो. हिवाळ्यात कच्छचं व्हाईट रण क्षितिजापर्यंत पसरलेल्या मिठाच्या पांढऱ्याशुभ्र चादरीसारखं दिसतं. पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात उजळलेलं हे रण शब्दांपलीकडचा अनुभव देतं. जवळच असलेलं धोलावीरा आपल्याला चार हजार वर्षांहून अधिक काळ मागे घेऊन जातं. 2021 मध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत समाविष्ट झालेलं हे प्राचीन हडप्पाकालीन शहर त्या काळातील विकसित आणि नियोजनबद्ध जीवनाची ओळख करून देतं. वन्यजीवप्रेमींसाठी आवडतं ठिकाण म्हणजे अर्थातच गिर, कारण इथे आशियाई सिंह मुक्तपणे फिरताना आढळतात. गिरची सकाळची सफारी म्हणजे पेशन्सची परीक्षा घेणारा अनुभव असतो. जंगलात बराच वेळ फिरूनही सिंह दिसतोच असं नाही, पण जेव्हा तो अचानक नजरेसमोर येतो, तेव्हा आपण इतकी वाट पाहिल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरील सोमनाथ आणि द्वारका ही देशभरातील भाविकांची श्रद्धास्थानं आहेत. तर केवडियाजवळील 182 मीटर उंच असलेलं ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ गुजरातच्या भव्यतेची वेगळीच ओळख करून देतं.
गुजरातच्या प्रवासात खाद्य संस्कृतीसाठीही खास वेळ राखून ठेवायला हवा. अस्सल गुजराती थाळी म्हणजे गोड, खारट आणि तिखट चवींचा सुंदर बॅलन्स. त्यातली विविधता आणि प्रेमाने वाढण्याची गुजराती पद्धत हा स्वतःच एक अनुभव असतो. सकाळच्या नाश्त्याला फाफडा-जलेबी आणि एखाद्या लोकल शॉपमधील ताजा ढोकळा मिळाला, तर प्रवासाची मजा आणखी वाढते.
गुजरातला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ विशेष सुखद असतो. हवामान आल्हाददायक असतं आणि कच्छमधला रण उत्सवही याच काळात रंगात आलेला असतो. गुजरात मनापासून अनुभवायचं असेल तर किमान आठवडाभराचा वेळ तरी द्यायला हवा. कारण एका प्रवासात इतकं वैविध्य अनुभवता येणारं हे राज्य कुटुंबांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि पहिल्यांदाच ग्रुप टूर करणाऱ्या प्रवाशांसाठीही तितकंच खास आहे. मग तुम्ही कधी जाताय?
आनंदी आठवणींचा हॉलिडे
कच्छच्या पांढऱ्याशुभ्र रणापासून सासन गिरच्या जंगलापर्यंत, द्वारकेच्या श्रद्धेपासून केवडियाच्या आधुनिक भारतापर्यंत... गुजरात हा सतत काहीतरी नवीन उलगडणारा प्रवास आहे. चला जाणून घेऊया या बहुरंगी गुजरातची काही वैशिष्ट्यं.
गुजरात फूड ट्रेल: काठियावाडचा तिखटपणा, उत्तर गुजरातची पारंपरिक पाककला, कच्छचा स्थानिक प्रभाव आणि सुरतचं खाद्यवैविध्य या साऱ्याचा अनुभव आपल्याला एका प्रवासात घेता येतो. गुजराती थाळीतील डाळ, कढी, भाज्या, फरसाण, पोळी, भात, लोणचं आणि गोड पदार्थ आपल्याला तृप्त करतात. ढोकळा, खांडवी, हांडवो, सेव टमेटा नू शाक, खीचू, गाठिया, लिलो चेवडो आणि मोहनथाळपासून हिवाळ्यातील उंधियूपर्यंत प्रत्येक पदार्थाची स्वतःची कहाणी आहे. विविध भाज्या, मसाले आणि पारंपरिक पद्धतीने शिजवलेला उंधियू राज्याच्या पाकपरंपरेचं प्रतीक मानला जातो. प्रवासाचा कायमचा साथीदार असलेला थेपला आणि कच्छची मसालेदार दाबेली तर गुजरातच्या खाद्य ओळखीचा अविभाज्य भाग झाले आहेत.
कारागिरांच्या हातांची जादू: गुजरात भारतातील सर्वात समृद्ध हस्तकला परंपरा जपणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. पाटणची जगप्रसिद्ध पटोला सिल्क, जामनगर-भुज-कच्छची बांधणी, कच्छी भरतकाम आणि आरसाकाम, भुजचे नैसर्गिक रंगातील अजरख प्रिंट्स आणि कच्छमधील दुर्मिळ रोगन आर्ट या प्रत्येक कलाकृतीत शतकानुशतकांची परंपरा जिवंत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना रोगन आर्टचं चित्र भेट दिल्यानंतर या कलेला जागतिक ओळख मिळाली. चांदीचे दागिने, ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी, सांखेडा फर्निचर, पितळीकाम, लेदर क्राफ्ट्स आणि पारंपरिक गरबा वेशभूषा या गोष्टी इथे आवर्जून खरेदी केल्या जातात. अहमदाबादचं लॉ गार्डन नाईट मार्केट, भुजचं हँडिक्राफ्ट मार्केट आणि पाटणमधील पटोला हाऊसेस ही ठिकाणं खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत.
उत्सवप्रिय गुजरात: नवरात्रीत गरबा-दांडियाच्या तालावर रंगणारं गुजरात, संक्रांतीच्या दिवशी रंगीबेरंगी पतंगांनी भरलेलं आकाश, द्वारकेतील भक्तिमय जन्माष्टमी आणि ग्रामीण परंपरांचा रंग उधळणारा तारणेतर मेळा असे उत्सव म्हणजे इथल्या जगण्याची पद्धत आहे. नवरात्रीत पारंपरिक चनिया-चोली, केडिया, ढोल-नगारे आणि हजारो लोकांचा उत्साह संपूर्ण वातावरणाला एक वेगळी ऊर्जा देतो. जानेवारीत उत्तरायणाच्या निमित्ताने आपल्याला घराघरांमधील उत्साह आणि जगभरातून येणारे पतंगप्रेमी पाहायला मिळतात. आणि या सगळ्याचा परमोच्च बिंदू म्हणजे कच्छचा रण उत्सव. धोरडोच्या पांढऱ्याशुभ्र रणावर लोकसंगीत, पारंपरिक नृत्य, हस्तकला आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा उत्सव रंगतो. पौर्णिमेच्या चांदण्यातलं व्हाईट रण, उंट सफारी, एटीव्ही राईड्स, पॅरामोटरिंग आणि हॉट एअर बलूनिंग या अनुभवांसोबत भुज- अंजारची कलासंपदा, धोलावीराची सिंधू संस्कृती, दसाड्याचं लिटल रण ऑफ कच्छ आणि नडाबेटची सीमाभेट हा प्रवास अधिक व्यापक करतात. रण उत्सवामुळे कच्छला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.
आधुनिक भारत आणि वन्यजीवन: गुजरातचा प्रवास हा आधुनिक भारताच्या प्रगतीचीही कहाणी सांगतो. केवडियातील 182 मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, रिव्हरफ्रंट, संग्रहालयं, जंगल सफारी आणि नर्मदा टेन्ट सिटी आधुनिक भारताच्या विकासाचं भव्य दर्शन घडवतात. नर्मदा नदीच्या सान्निध्यात उभं असलेलं हे पर्यटनकेंद्र म्हणजे निसर्ग, वास्तुरचना आणि विकास यांचा सुंदर संगम आहे. याशिवाय गुजरात जगातील आशियाई सिंहांचं एकमेव नैसर्गिक अधिवासस्थान आहे. सासन गिर हे केवळ राष्ट्रीय उद्यान नाही, तर यशस्वी वनसंवर्धनाची प्रेरणादायी कहाणी आहे. दाट जंगलं, गवताळ प्रदेश आणि नदीकाठी मुक्तपणे वावरणाऱ्या आशियाई सिंहांचं दर्शन हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरतो. शिवाय बिबटे, कोल्हे, तरस, मगर आणि पक्षीप्रजातींमुळे गिर वन्यजीवप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी स्वर्गच आहे.
श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्माचा प्रवास: चार धामांपैकी एक म्हणजे गुजरातमधील द्वारका ही भगवान श्रीकृष्णाची नगरी म्हणून ओळखली जाते. दक्षिणेकडे समुद्राच्या साक्षीने उभं असलेलं सोमनाथ मंदिर हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. जुनागढजवळील गिरनार पर्वत हा श्रद्धा आणि साधनेचा आणखी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. गुजरातमधील पोरबंदर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं जन्मस्थान. या ठिकाणी तुम्हाला कीर्ती मंदिर या म्युझियमला आणि महात्मा गांधींशी निगडित स्थळांना भेट देता येते. ही ठिकाणं गुजरातला भारतातील सर्वात महत्त्वाच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांपैकी एक बनवतात.
असं हे गुजरात राज्य प्रत्येक रंगाला आपली एक कहाणी देतं. इथे इतिहास वर्तमानाला भेटतो, परंपरा आधुनिकतेला भेटते आणि श्रद्धा उत्सवाच्या जल्लोषाला भेटते. म्हणूनच गुजरात पाहताना आपण केवळ एक राज्य फिरत नाही, तर भारताच्या अनेक समृद्ध परंपरांमधून एक सुंदर प्रवास करीत असतो. गुजरात प्रत्येक प्रवाशाला त्याच्या आवडीचा एक वेगळा अनुभव देतं आणि म्हणूनच गुजरातचा प्रवास आठवणीत पुन्हा पुन्हा जगला जातो.
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं!
- द्वारका ही भगवान श्रीकृष्णाची नगरी मानली जाते आणि समुद्राखाली प्राचीन द्वारकेचे अवशेष सापडल्याचा दावा केला जातो.
- अहमदाबाद ही भारतातील पहिली ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सिटी’ आहे.
- ‘धोलावीरा’ हे भारतातील पहिलं युनेस्को मानांकन मिळालेलं हडप्पा संस्कृतीचं स्थळ आहे.
- पांढरेशुभ्र कच्छचे रण हे जगातील सर्वात मोठ्या मिठाच्या वाळवंटांपैकी एक आहे.
- सासन गिर हे आशियाई सिंहांचं जगातील एकमेव नैसर्गिक निवासस्थान आहे.
- गिरनार पर्वतावर जाण्यासाठी हजारो पायऱ्या चढाव्या लागतात, पण आता येथे आशियातील सर्वात लांब रोपवेपैकी एक रोपवे आहे.
- भारतीय 100 रुपयांच्या नोटेवर झळकणारी पाटणमधील ‘राणी की वाव’ ही उलट्या मंदिरासारखी रचना असलेली सात मजली बावडी आहे.
- केवडियामधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.
- पोरबंदर हे केवळ समुद्रकिनाऱ्यासाठी नव्हे, तर महात्मा गांधींचं जन्मस्थान म्हणून जगभर ओळखलं जातं.
- ‘लिटल रण ऑफ कच्छ’मध्ये भारतातील वन्य भारतीय गाढवे (इंडियन वाईल्ड ॲस) मोठ्या प्रमाणात आढळतात.
- नडाबेट येथे भारत-पाकिस्तान सीमेवरील बीएसएफ पोस्ट पर्यटकांसाठी खुली असून तिला गुजरातची ‘वाघा बॉर्डर’ म्हणून ओळखलं जातं.
- चंपानेर-पावागढ हे गुजरातचं पहिलं ‘युनेस्को जागतिक वारसास्थळ’ असून येथे हिंदू आणि इस्लामिक वास्तुकलेचा अनोखा संगम पाहायला मिळतो.
- वडोदऱ्यातील ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ हा इंग्लंडच्या ‘बकिंगहॅम पॅलेस’पेक्षाही मोठा खासगी राजवाडा मानला जातो.
लाइट्स कॅमेरा ट्रॅव्हल
गुजरात म्हणजे केवळ ऐतिहासिक वारसा, रंगीबेरंगी संस्कृती आणि चविष्ट खाद्यसंस्कृती नव्हे, तर ते चित्रपटांच्या रुपेरी पडद्यावर खुलणारं एक देखणं जगसुद्धा आहे. कच्छचं पांढराशुभ्र रण, भुजमधील ऐतिहासिक राजवाडे, अहमदाबादच्या जुन्या गल्ल्या आणि मांडवीचा निळाशार समुद्रकिनारा इथल्या प्रत्येक लोकेशनमध्ये एक वेगळी कहाणी दडलेली आहे. ‘लगान’मधून भुजजवळील कुनरिया गावाचा ग्रामीण बाज आणि कच्छचा परिसर पाहायला मिळतो, तर ‘रिफ्युजी’मध्ये कच्छचं ग्रेट रण, बन्नीचा परिसर आणि लखपत किल्ला झळकला आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या काही भागाचं शूटिंग विजय विलास पॅलेस आणि गोंडलचा ऑर्चर्ड पॅलेस इथे झालं आहे. ते गुजरातच्या राजेशाही सौंदर्याची साक्ष देतं. ‘मोहेंजोदारो’ चित्रपटासाठी भुजजवळ भव्य सेट उभारण्यात आला होता, ‘रईस’चं काही शूटिंग अहमदाबादजवळील ‘अडालज की वाव’ इथे आणि ‘2 स्टेट्स’मधील काही भाग अहमदाबादमधील आयआयएम व कालुपूर रेल्वे स्टेशन इथे चित्रित करण्यात आला. शिवाय हॉलिवूडच्या एक्स्ट्रॅक्शन चित्रपटाचंही काही शूटिंग गुजरातमध्ये झालं आहे.
चित्रपटांतून पाहिलेल्या या जागा प्रत्यक्ष अनुभवण्याची मजा काही औरच असते! कॅमेऱ्याच्या नजरेतून टिपलेलं गुजरात, प्रवासात स्वतःच्या डोळ्यांनी पाहताना आणखीच खुलतं. मग तुम्हीही तयार व्हा, आपल्या आवडत्या चित्रपटांच्या लोकेशन्सना भेट देण्यासाठी आणि गुजरातच्या या सिनेमॅटिक सफरीचा भाग होण्यासाठी!
ए हालो ऽऽऽ... गुजरातमा!
गुजरात म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं पांढरंशुभ्र रण, द्वारकेचा आध्यात्मिक वारसा, सोमनाथची श्रद्धा, गिरमधील सिंह, सिंधू संस्कृतीची साक्ष देणारं धोलाविरा आणि जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’. पण गुजरातची खरी मजा तेव्हा येते जेव्हा या सर्व अनुभवांमागचं नियोजन कोणीतरी सांभाळत असतं आणि तुम्ही फक्त प्रवासाचा आनंद घेत असता. म्हणूनच गुजरात वीणा वर्ल्डसोबत अनुभवणं ठरतं आणखी खास!
कस्टमाईज्ड हॉलिडेज्: तुम्हाला गुजरात तुमच्या पद्धतीने अनुभवायचं असेल, तर कस्टमाईज्ड हॉलिडेज् हा उत्तम पर्याय आहे. नर्मदा टेंट सिटीतील मुक्काम, द्वारकेतील सी फेसिंग हॉटेल्स आणि द्वारकाधीश मंदिर, सुदामा मंदिर व पोरबंदर इथल्या कीर्ती मंदिराला भेट, गिरमधील जंगल लॉज, अहमदाबाद इथे हेरिटेज वॉक, धोलावीरा एक्सप्लोरेशन किंवा केवडियामधील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सान्निध्यातील मुक्काम तुमच्या आवडीनुसार आखून घेता येतो. धार्मिक यात्रा असो किंवा सांस्कृतिक प्रवास, फोटोग्राफी टूर असो वा वाईल्डलाईफ एक्स्पिरियन्स किंवा लक्झरी हॉलिडे, गुजरात प्रत्येक वेळी वेगळा भासतो.
कॉर्पोरेट ट्रॅव्हल (MICE): आधुनिक सुविधा आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा संगम म्हणजे गुजरातमधील MICE हॉलिडेज्. तुम्हालाही टीमसाठी काहीतरी वेगळं प्लॅन करायचं असेल तर नर्मदा टेन्ट सिटी, केवाडिया, कच्छमधील टेन्ट सिटी, हेरिटेज प्रॉपर्टीज, कल्चरल इव्हिनिंग्ज, लोकसंगीत कार्यक्रम, टीम-बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज आणि कॉर्पोरेट इव्हेंट्स असं काही ठरवता येईल.
ग्रुप टूर्स: वीणा वर्ल्डच्या ऑल-इन्क्लुसिव्ह गुजरात ग्रुप टूर्समध्ये गरूडेश्वर दत्त मंदिर, स्टॅच्यू ऑफ युनिटी, साबरमती आश्रम आणि कलिकामाता मंदिर या ठिकाणी आध्यात्मिक वारसा अनुभवता येतो. सोमनाथ मंदिरातील आरती, त्रिवेणी संगम अशी ठिकाणं इतिहास आणि श्रद्धेचा संगम घडवतात. गिर आणि सासन गिर परिसरात आशियाई सिंहांची ओळख होते, तर जुनागढ आणि गिरनार परिसर गुजरातचा प्राचीन इतिहास सांगतात. अडालज स्टेप वेल आणि कच्छमधील स्मृतिवन ही सुद्धा गुजरातमधील प्रसिद्ध ठिकाणं आहेत. भुज आणि धोरडो येथे कच्छचं हँडिक्राफ्ट, लोकसंस्कृती आणि व्हाईट रणचं अद्भुत सौंदर्य अनुभवता येतं. रण उत्सवाच्या काळात पांढऱ्याशुभ्र मिठाच्या वाळवंटावर चांदण्यांची उधळण पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो. धोलावीरा या युनेस्को जागतिक वारसास्थळामधून सिंधू संस्कृतीच्या वैभवाचा मागोवा घेता येतो.
वुमन्स स्पेशल टूर्स: वीणा वर्ल्डच्या वुमन्स स्पेशल रण उत्सव विथ नडाबेट, वुमन्स स्पेशल पाटण मोढेरा विथ स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि वुमन्स स्पेशल गुजरात या खास महिलांसाठीच्या टूर्सही उपलब्ध आहेत.
असं हे गुजरात, म्हणजे श्रद्धा, इतिहास, निसर्ग, संस्कृती, हस्तकला यांनी भरलेला आधुनिक भारताचा प्रवास आहे आणि हा प्रवास अधिक समृद्ध, अधिक निश्चिंत आणि अधिक संस्मरणीय बनवतो तो वीणा वर्ल्डचा अनुभव. मग तुम्ही कधी येताय?
वीणा वर्ल्ड सिनियर्स स्पेशल ज्येष्ठांची श्रेष्ठ भ्रमंती
प्रवासाला वयाचं बंधन नसतं, उलट आयुष्यभर जपलेल्या स्वप्नांना पुन्हा एकदा पंख देण्याची ती सुंदर संधी असते. वीणा वर्ल्डची सिनियर्स स्पेशल गुजरात टूर म्हणजे इतिहास, संस्कृती, श्रद्धा आणि निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी भटकंती.
कच्छच्या पांढऱ्याशुभ्र रणाचं नयनरम्य सौंदर्य, रण उत्सवातील रंगीबेरंगी लोककला, भुजचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि गुजरातच्या ऐतिहासिक स्थळांची सफर अनुभवताना प्रत्येक दिवस खास बनतो. आरामदायी प्रवास, नियोजनबद्ध कार्यक्रम, निवास आणि जेवणाची सोय, तसेच अनुभवी टूर मॅनेजरची सोबत यामुळे प्रवास होतो अधिक निश्चिंत आणि सुखकर. समविचारी सहप्रवाशांसोबत गप्पा, गाणी, नवे अनुभव आणि मैत्रीच्या गोड आठवणींची शिदोरी घेऊन, आयुष्याच्या या सुंदर पर्वात पुन्हा एकदा मनमुराद भटकंती करा! चलो, बॅग भरो, निकल पडो!
वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर
गुजरातमध्ये प्रवास करणं म्हणजे श्रद्धा, इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचा एकाच प्रवासात अनुभव घेणं. द्वारकेच्या आध्यात्मिक वातावरणापासून कच्छच्या शुभ्र रणापर्यंत, गिरच्या जंगलांपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या भव्यतेपर्यंत प्रत्येक ठिकाणाची एक वेगळी ओळख आहे आणि हे अनुभव एका सुंदर धाग्यात गुंफण्याचं काम मी, वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर करीत असतो. या प्रवासात कधी एखादा फोटो काढण्यासाठी मी तुमच्यासोबत थांबतो, तर कधी संपूर्ण ग्रुपला पुढच्या अनुभवासाठी सज्ज करतो. कारण गुजरात माझ्यासाठी केवळ एक डेस्टिनेशन नाही, तो अनेक कथा, भावना आणि आठवणींचा प्रवास आहे. या प्रवासात तुम्ही निश्चिंतपणे प्रत्येक क्षण अनुभवत राहावा, म्हणून मी तुमच्यासोबत असतो... पहिल्या दिवसापासून ते निरोपापर्यंत. शेवटी प्रवास संपतो, पण आपण एकत्र अनुभवलेले क्षण कायम सोबत राहतात आणि तेच माझ्या कामाचं खरं समाधान असतं.




































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.