Published in Maharashtra Times 1st November 2026
...आपल्या घरातील चार जणांना सहज पुरेल अशा पदार्थावर ‘सिंगल सर्व्हिंग’ असं लेबल लावलेलं असतं. सुरुवातीला हे काहीसं गोंधळून टाकणारं असतं, पण एकदा का तुम्ही सरावलात की...
जेव्हा जेव्हा मी नवीन देशात उतरतो, तेव्हा साइटसीईंग सुरू करण्याआधी, तिथल्या लँडमार्कचे फोटो काढण्याआधी आणि कधीकधी तर हॉटेलवर चेक इन करण्याच्याही आधी मी तिथल्या जवळच्या ग्रोसरी स्टोअरला भेट देतो. याचं मुख्य कारण म्हणजे अनेक वर्षं विविध देशांमध्ये प्रवास केल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की तिथल्या सुपरमार्केटमध्ये फक्त 30 मिनिटांत त्या देशाविषयी तुम्ही जे जाणून घेता ते कदाचित तिथल्या सर्वात प्रसिद्ध मॉन्युमेंटपाशी तीन तास घालवूनही समजत नाही.
ही सवय नेमकी कधी आणि कशामुळे लागली ते सांगता येणं कठीण आहे. पण माझ्या या प्रवासातच मी कधीतरी सुपरमार्केटकडे फक्त उपयोगाची जागा म्हणून न बघता, एखाद्या ठिकाणच्या संस्कृतीचा अस्सल अनुभव देणारी जागा म्हणून बघायला सुरुवात केली आणि गंमत म्हणजे आता हे जगभरातल्या इतर लोकांच्याही लक्षात आलं आहे.
अनपेक्षितपणे पुढे आलेला ट्रेंड: 2026 मध्ये हिल्टनने प्रकाशित केलेल्या 2026 ट्रेंड्स रिपोर्टनुसार जगभरातील पर्यटकांमधले 77% पर्यटक हे आधीपासूनच त्यांच्या पर्यटनाचा एक भाग म्हणून स्थानिक खाद्यपदार्थ आणि पेये अनुभविण्यासाठी ग्रोसरी स्टोअर्सना भेट देत होते. स्कायस्कॅनरच्या माहितीनुसार, किमान 36% भारतीय पर्यटकांना त्यांच्या इंटरनॅशनल ट्रिपवर तिथल्या एखाद्या लोकल सुपरमार्केटला भेट द्यायची असते. युरोपियन युनियनने तर याला ‘सुपरमार्केट सफारीज्’ असं मस्त नावही दिलं आहे. आज अनेक लोक म्युझियमला न जाता सुपरमार्केटमध्ये फेरफटका मारणं पसंत करतात हे पहिल्यांदा ऐकायला जरा विचित्र वाटतं, पण तुम्ही जितका खोलात जाऊन विचार कराल, तितका हा मुद्दा पटू लागतो. कारण एखाद्या सुपरमार्केटमध्ये कसला स्टॉक आहे, त्या वस्तूंची किंमत काय आहे, तिथे कोणत्या ताज्या गोष्टी मिळतात आणि कोणत्या गोष्टी फ्रोझन मिळतात, या सगळ्यामधून तुम्हाला जे कळतं ते कोणत्याही गाइडबुकमध्ये, मॉन्युमेंट जवळच्या पाटीवर किंवा गाइडेड टूरमध्येही कळत नाही. तेव्हा आज आपणही ‘सुपरमार्केट सफारी’ करूया.
स्वयंपाकघर अजूनही जिवंत आहे: टर्कीमधल्या इस्तंबूल सिटी मार्केटमध्ये किंवा अंताल्या शहरातील सुपरमार्केटमध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता, तेव्हा त्याचा प्रचंड आकार तुम्हाला भारावून टाकतो. इथले मसाल्याचे शेल्फच भारतातल्या एखाद्या किराणा मालाच्या दुकानाएवढे आहेत. सुमॅक, झा’अतर, अलेप्पो पेपर, ड्राइड मिंट, माहलब... जगभरात अन्य ठिकाणी जे मसाल्याचे पदार्थ एक्झॉटिक मानले जातात, ते इथे रोजच्या जेवणात वापरले जातात. सुकवलेली फळं आणि सुकामेवा हे सुटे वजनावर विकले जातात. त्यांची क्वांटिटीच सांगते की लोक रोजच्या स्वयंपाकात त्यांचा वापर करतात. ऑलिव्ह ऑइल हे स्पेशालिटी सेक्शनमध्ये ठेवलेलं नसतं, तर स्वयंपाकाच्या तेलाशेजारी तेही एक लिटरच्या बाटल्यांमध्ये ठेवलेलं असतं. कारण इथे ते फक्त पदार्थ तयार झाल्यावर चवीपुरतं वापरत नाहीत, तर आपण जसं पदार्थ बनवताना तूप वापरतो, त्याप्रमाणे पदार्थ शिजवायला ते ऑलिव्ह ऑइल वापरतात. व्हिनेगर आणि लेमन ज्यूसच्या मध्ये डाळिंबाचा पाक असा बसलेला असतो की जणू तीच त्याची जागा आहे. टर्कीच्या ग्रोसरी स्टोअरमधले हे शेल्फ तुम्हाला जाणीव करुन देतात की जगातल्या अनेक भागांमधून हळूहळू नाहीशी होत असलेली एक गोष्ट मात्र या देशात अजूनही अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे ‘स्वयंपाकघर’. इथली खाद्यसंस्कृती अजून तरी डिलिव्हरी ॲप्स आणि रेडिमेड जेवणाच्या आहारी गेलेली नाही. इथले लोक आजही तयार पदार्थ न विकत घेता ते बनवण्याचं सामान विकत घेतात.
रामेन आणि राईसमधील सौंदर्य: तुम्ही साऊथ कोरियातील एखाद्या ग्रोसरी स्टोअर्समध्ये पदार्थ विकत घेण्यासाठी गेलात, तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, कारण तिथे इन्स्टंट रामेन आणि राईस केकच्या मध्ये तुम्हाला अख्खा स्किन केअर सेक्शन बघायला मिळतो. शीट मास्क्स, सिरम्स, क्लिन्झिंग ऑइल, स्नेल म्यूसिन हे सगळं खाद्यपदार्थांच्या बरोबर ठेवलेलं असतं. पदार्थ आणि सौंदर्याचा हा अनोखा मिलाफ इथल्या एका अधिक खोलवर रुजलेल्या गोष्टीचं प्रतीक आहे. इथे जिनसेंग हे स्नॅक्स आहे, चहा आहे आणि फेस क्रीमसुध्दा आहे. रेड बीन्स हे जसं गोड पदार्थात वापरतात, त्याचप्रमाणे स्किन केअरसाठीही वापरतात. जगात इतरत्र ज्याप्रमाणे आपण जे खातो आणि जे शरीरावर लावतो यात सीमारेषा असते, तशी साऊथ कोरियात नसते. वेलनेस हा कोरियातल्या दुकानांमधला एक भाग नसतो, तर सगळं दुकानच त्यासाठी असतं. सेउलमधील ग्रोसरी स्टोअरमध्ये जे तुम्हाला फक्त 5 मिनिटांत कळेल, ते कोरियन संस्कृतीवरच्या कोणत्याही म्युझियममध्ये तुम्हाला पाहायलाही मिळणार नाही.
ग्रोसरी खरेदीचा उत्सव: सकाळी 7 वाजता पॅरिसमधल्या मोनोप्रिक्स किंवा कारफोरमध्ये गेलात तर तिथला बागेतला शेल्फ अर्धा रिकामा झालेला असतो. चीजच्या काउंटरवर 40 पेक्षा जास्त व्हरायटी असतात आणि तिथला कर्मचारी तुम्हाला तुम्ही चीज कशाबरोबर खाणार आहात हे विचारुन, कोणतं घ्यावं ते सुचवतो. तिथलं वाइन सेक्शन भारतातल्या कोणत्याही ग्रोसरी स्टोअरपेक्षा आकाराने मोठं आहे. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की फ्रान्समध्ये कोणीही आठवड्याचं शॉपिंग करीत नाही. ते फक्त आजच्यापुरती- एक दिवस पुरेल इतकीच खरेदी करतात. तुम्ही खरेदी करायला उद्या परत याल, याच समजूतीवर इथल्या दुकानांची रचना केलेली आहे. तिथे बल्क पॅक्स नसतात किंवा काहीही फॅमिली पॅकमध्ये मिळत नाही. ताजेपणा हेच इथलं दैनंदिन सूत्र आहे. इथले शेल्फ हेच सांगतात की इथे पदार्थ ही उरकून टाकायची गोष्टच नाही, तो जणू एक विधी आहे. एकदा हे तुम्हाला जाणवलं की याच लयीत रचना केलेलं सुपरमार्केट तुम्हाला जवळचं वाटू लागतं.
थक्क करणारा विस्तार: तुम्ही तुमची कल्पनाशक्ती कितीही ताणलीत तरी अमेरिकन सुपरमार्केटची कल्पनाच करू शकणार नाही, इतकी ती प्रचंड असतात. तिथे सिरिअल्सचा शेल्फ 30 फुटांचा असतो. दूध गॅलन्समधून मिळतं. एअरपोर्टवर कॉफीचा एक कप ज्या किमतीला मिळतो, त्यापेक्षाही कमी किमतीत कॉस्टकोमध्ये सिंगल रोटेसरी चिकन मिळतं. आपल्या घरातील चार जणांना सहज पुरेल अशा पदार्थावर ‘सिंगल सर्व्हिंग’ असं लेबल लावलेलं असतं. सुरुवातीला हे काहीसं गोंधळून टाकणारं असतं, पण एकदा का तुम्ही सरावलात की तुम्हाला यामागचं लॉजिक दिसायला लागतं किंवा यामागची सांस्कृतिक कारणं लक्षात येतात. कोणत्याही गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध असणं हे अमेरिकेच्या रक्तातच भिनलेलं आहे आणि त्याचंच दर्शन सुपरमार्केटच्या रचनेत घडतं. मोठ्ठं म्हणजे चांगलं, सगळं काही अधिक हवं, गुणवत्तेपेक्षा आकारमानावर मूल्य ठरवणं हे अमेरिकेतील समाजात रुजलेलं आहे. अमेरिकेतील ग्रोसरी स्टोअर्समध्ये त्यांची आवड, ते कशाला महत्त्व देतात ते आणि सगळं काही जास्त हवं या हट्टाचं प्रतिबिंब पडलेलं पाहायला मिळतं. वर्तमानपत्रातले शंभर लेख वाचूनही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेविषयी जे कळणार नाही, ते फक्त वॉलमार्टमध्ये एक फेरफटका मारल्यावर सहज कळतं.
शेल्फवरील अँडीज पर्वत: मला सर्वात जास्त आश्चर्यचकित केलं ते पेरुमधल्या सुपर मार्केटने. इथे कोकोची पानं म्हणजे तुळशीची पानं असल्यासारखी सहज विकायला ठेवली होती. प्रिमियम हेल्थ फूड पॅकिंग न करता क्विनोआ चक्क खुल्या डब्यांमधून विक्रीला होता. कारण इथे तो सुपर फूड नाही, तर स्थानिकांच्या रोजच्या आहाराचा भाग आहे. बिवरेजेसच्या शेल्फवर कोका कोलाशेजारीच पर्पल कॉर्नपासून बनवलं जाणारं चिचा मोरादा होतं. अँडियन जमातींमध्ये परंपरागत पद्धतीने गोठवून वाळवलेले बटाटे वापरतात, ज्यांना चुनोह म्हणतात, ते पारंपरिक पद्धतीने तयार केलेले बटाटे आधुनिक सुपरमार्केटच्या शेल्फवर बघितल्यावर वाटलं की जणू काळ इथे थांबलेला आहे. अँडीज पर्वतरांग ही फक्त फोटोतली बॅकग्राऊंड नाही, ती पेरूमधल्या दुकानातल्या शेल्फवरच्या प्रत्येक उत्पादनात आहे.
जिथे कन्व्हिनियन्स म्हणजे कला आहे: मी यापूर्वी शंभर वेळा तरी हे जपानबद्दल सांगितलं आहे. जपानमधील कन्व्हिनियन्स स्टोअर्स म्हणजे कोनबिनीपासून सुरुवात करूया किंवा 7 इलेव्हन, लॉसन, फॅमिली मार्ट यातलं कोणतही घ्या. इथे आल्यावर तुमचं सर्वात आधी लक्ष वेधून घेते ती म्हणजे ‘ओनिगिरी’. भाताचा प्रत्येक त्रिकोण अशा कुशलतेनं पॅक केलेला असतो की तुम्ही त्याची पट्टी ओढून तो उघडेपर्यंत ज्या नोरीत (समुद्र वनस्पतीचं पान) तो गुंडाळलेला असतो ते अगदी कुरकुरीत आणि कोरडं राहतं. फक्त शंभर रुपयात मिळणारं हे स्नॅक आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या मशीनप्रमाणे पॅक केलेलं असतं. तसेच इथले बेन्टो बॉक्सेस बघा. ग्रिल्ड फिश, पिकल्ड व्हेजिटेबल्स, भात... रेस्टॉरंटसारखं उत्तम जेवण या बॉक्समध्ये असतं. तुम्हाला हे जेवण गरम करायचं असेल तर दुकानातच मायक्रोवेव्हही उपलब्ध असतात. कचऱ्याचं पाच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण करणारी रिसायकलिंग स्टेशन्सही तिथे असतात. तिथे असलेली हॉट कॉफी मशीन्स तुमचा कप भरण्याआधी तुम्हाला दूध किती हवयं हे सुध्दा विचारतात.
जपानमध्ये कन्व्हिनियन्स म्हणजे एक तत्वज्ञान आहे. शंभर रुपयांत मिळणाऱ्या समुद्री वनस्पतीच्या पानात गुंडाळलेल्या भाताचा त्रिकोण बनवताना एखाद्या रेस्टॉरंटलाही लाजवेल अशी काळजी घेतली जाते.
दुकानातील रॅकमध्ये दिसणारं इमिग्रेशन : ऑस्ट्रेलिया म्हटल्यावर सर्वात आधी आठवतो तो ‘व्हेजिमाइट’. पण सिडनी किंवा मेलबर्नमधल्या ‘वूल्सवर्थ’मध्ये जरा अधिक आतपर्यंत गेलात तर तुम्हाला ऑस्ट्रेलियाची खरी ओळख करुन देणारे शेल्फ बघायला मिळतील. टिम टॅम्सच्या शेजारी लक्सा पेस्ट, त्यापुढे जॅपनीज करी ब्लॉक्स, त्याशेजारी भारतीय मँगो चटणी अशी रांगच असते. इथे सोअरडफच्या शेजारी वॉनटॉन रॅपर्स आणि हलाल मटणाशेजारी कांगारूचा खिमा सहज ठेवलेला पाहायला मिळतो कारण ऑस्ट्रेलिया हा देशच मुळी इमिग्रेशनमधून घडलेला आहे. स्थलांतरितांच्या लाटांमागून लाटा, दशकानुदशके येत गेल्या आणि त्याचं प्रतिबिंबच सुपरमार्केटच्या स्टॉकमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतं. वूलवर्थमधील एका शेल्फवरच डझनभर देशांची त्यांच्या त्यांच्या पदार्थांमधून ओळख पटते. स्पष्टीकरणाची गरजच नसते.
भारत एका नव्या नजरेतून: एखादा परदेशी पर्यटक जर आपल्या भारतातील स्टोअरमध्ये गेला तर त्याला आपल्याविषयी काय समजेल? त्याला कळणारी सगळ्यात पहिली गोष्ट असेल ती म्हणजे भारतात एकच ग्रोसरी शेल्फ नसतो, तर डझनभर तरी असतात. आणि वर दिलेल्या यादीतल्या देशाप्रमाणेच प्रत्येक शेल्फ एक वेगळी कहाणी सांगत असतो.
महाराष्ट्र - इथल्या फरसाणाच्या शेल्फवर चिवडा, चकली, शेव हे पदार्थ ब्रँडेड आणि सुट्टे सुद्धा शेजारी-शेजारी पाहायला मिळतात. कोकम सरबत आणि सोल कढी मिक्स हे महाराष्ट्राजवळच्या दोन राज्यांमध्ये पाहायलाही मिळणार नाही. टेट्रा पॅकमधला आमरस, जो फक्त विशिष्ट काळातच मिळतो, जणू काही ती लिमिटेड एडिशन लक्झरी आहे आणि खरंच तो तसाच आहे.
गुजरात - इथे तुम्हाला गुळाच्या विविध व्हरायटीज् बघायला मिळतात. पंधरा वेगवेगळ्या स्वादांमध्ये खाकरा मिळतो. इथल्या स्टोअर्समधील फक्त स्नॅक्ससाठी राखून ठेवलेल्या विभागाचा आकारच थक्क करणारा असतो, कारण गुजराती लोक मधल्या वेळेच्या खाण्याचे पदार्थ हा स्वतंत्र प्रकार मानतात.
केरळ - उत्तर भारतातून आलेल्या कोणाचाही गोंधळ उडेल इतक्या प्रचंड प्रमाणात मिळणारं नारळाचं तेल. विविध प्रकारचे बनाना चिप्स-गोड, खारट, मसालेदार, गुळाने मढवलेले. दुकानाच्या चिल्ड सेक्शनमध्ये अप्पम आणि पुट्टुचं पीठ तर असायलाच हवं, कारण इथली सकाळ सुरू होते तीच तांदुळाच्या पीठापासून आणि नारळाच्या दुधापासून.
पंजाब - इथल्या गव्हाच्या पिठाच्या शेल्फवर वीसपेक्षा जास्त ब्रँड्स सहज पाहायला मिळतात. कारण ‘रोटी’ हीच भारताच्या या भागाची ओळख आहे. इथे तुपाचे जे मोठे डबे उपलब्ध असतात ते खास सणासुदीसाठी नाही, तर रोजच्या स्वयंपाकासाठी. लोणच्याच्या विभागात आंबा, लिंबू, लसूण, मिक्स या सगळ्यांच्या तीन तीन स्थानिक व्हरायटी तरी असणारच.
तामिळनाडू आणि आंध्र - इथला मिरच्यांचा सेक्शनच बोलका असतो. गुंटूर, ब्याडगी, काश्मीर असे वेगवेगळे प्रकार ‘लाल तिखट’ या एकाच लेबलात न गुंडाळता, त्यांचा तिखटपणा आणि उपयोग यानुसार वेगवेगळे ठेवलेले असतात. फिल्टर कॉफी कशी भाजलेली आहे त्यानुसार तिचं वर्गीकरण आणि विक्री होते. रेडी टू इट प्रकारात इथे तांदूळाचाच जोर दिसतो, इडली पीठ, डोसा पीठ, मुरुक्कु...
नॉर्थ ईस्ट - जारमध्ये मिळणारे बांबू शूट्स. इथे शेल्फवर नेहमीच्या डाळीबरोबर अखुनी म्हणजे फर्मेंटेड सोयाबीन पाहायला मिळतात. स्मोक्ड मीटचे पदार्थ असतात. मुंबई किंवा दिल्लीतल्या माणसाला इथला ग्रोसरीचा शेल्फ पाहून परदेशात आल्याचा भास होतो. हाच तर मुख्य मुद्दा आहे. पुण्यातलं डी-मार्ट आणि इम्फाळमधलं स्थानिक ग्रोसरी स्टोअर यातला फरक फक्त भौगोलिक अंतरचा नाही, एकाच देशाचा हिस्सा असूनही त्यांच्या खाद्यसंस्कृतीने त्यांना एकमेकांपासून वेगळं केलं आहे.
शेल्फ्सना ठाऊक असलेल्या गोष्टी: आपण आजच्या या लेखात जपान आणि टर्की, फ्रान्स आणि पेरू, कोरिया आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या सहा राज्यांमधून फेरफटका मारून आलो आहोत. आता मला या सगळ्यांना एकत्र बांधणाऱ्या सूत्राविषयी बोलायचं आहे. मॉन्युमेंट्समधून आपल्याला त्या त्या देशाचा जतन केलेला भूतकाळ समजतो. मात्र सुपरमार्केटमध्ये तुम्हाला अनएडिटेड वर्तमानकाळ बघायला मिळतो. इथे देशाची अशी ओळख होते जी खास पर्यटकांसाठी तयार केलेली नसते. सुपरमार्केटमधल्या वस्तूंच्या किमती तुम्हाला तिथल्या अर्थव्यवस्थेचं खरं रूप दाखवतात. पॅकेजिंगमधून त्या देशाची डिझानमधली संवेदनशीलता कळते. जपानी रॅपरमधलं मिनिमलिझम आणि भारतीय पॅकेटवरची रंगांची उधळण हेच सांगते. ताजं काय मिळतं आणि फ्रोझन काय मिळतं यावरुन त्या देशात दर दिवशी खरेदी करायची पद्धत आहे का आठवड्याचं शॉपिंग एकत्र केलं जातं हे कळतं. एखाद्या स्टोअरमध्ये ज्या गोष्टीसाठी सर्वाधिक जागा दिलेली असते त्यावरुन तिथला समाज कोणत्या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व देतो हे कळतं.
हे सगळं कळण्यासाठी कोणत्याही गाइडबुकची जरुरी नसते किंवा एंट्री तिकीट काढून क्यू लावावा लागत नाही. फक्त 30 मिनिटं आणि बघण्याची नजर पुरेशी असते. म्हणूनच तुम्हाला मी एक सल्ला अवश्य देईन की पुढच्या वेळी तुम्ही जिथे कुठे जाल, तिथे पोहोचल्यावर जवळचा लँडमार्क शोधण्याआधी, जवळचं ग्रोसरी शॉप शोधा. तिथे जाऊन आतमधले सगळे शेल्फ्स बघत एक चक्कर मारा. त्या शेल्फ्सवर तुम्हाला त्या देशाच्या वर्तमानाचं दर्शन घडेल. जर तुम्ही हे करुन बघितलंत, तर त्या सुपरमार्केटच्या शेल्फ्सवर दिसलेल्या कोणत्या गोष्टीने तुम्हाला आश्चर्यचकित केलं हे मला जरुर कळवा. माझी खात्री आहे की त्या शेल्फ्सप्रमाणेच तुमची उत्तरं सुद्धा वेगवेगळी आणि इंटरेस्टिंग असतील. पुन्हा भेटूया दिवाळीनंतर, तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!





























Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.