Published in Loksatta Lokrang 1st November 2026
...कुपी उघडताच मला एकदम मृद्गंधाची आठवण झाली. तापलेल्या उन्हाने शरीराची काहिली होत असते. तशात पावसाचा शिडकावा झाला की कसा धुंद करणारा मातीचा वास येतो... तीच गंमत त्या मिट्टीच्या कुपीमध्ये होती...
फुक्रानने त्याच्या तळहातावर अत्तराचा एक थेंब घेतला. दोन्ही हात एकमेकांवर हलकेच घासले आणि मग ते हात अतिशय अलगदपणे त्याने त्याच्या शर्टावर... प्रथम छातीवरून, मग खांद्यावरून आणि शेवटी खांद्यापासून मनगटापर्यंत फिरवले आणि त्याच्या सुमधुर आवाजात म्हणाला, ‘हे असं लावतात अत्तर...’, ‘ते परफ्युमपेक्षा थोडं दाट असतं आणि थेट त्वचेवर न लावता कपड्यांवर लावायचं असतं...’ त्याने अधिकची माहिती दिली.
फुक्रानचं बोलणं एकदम लयदार होतं. त्याच्या शब्दांमध्ये जादू होती. त्याच्या बोलण्यात हिंदी, अरेबिक आणि उर्दू भाषेतील शब्दांचा सुंदर मिलाफ होता. त्याचं बोलणं इतकं मधुर आणि काव्यमय होतं की त्याचे शब्द मधाने ओथंबल्यासारखे वाटत होते. त्याचं हे असं बोलणं मी कितीही वेळ ऐकायला तयार होते. त्यानं दाखवलेलं ‘मिट्टी’ नावाचं अत्तर मला भलतंच आवडलं. त्या अत्तराची कुपी उघडताच मला एकदम मृद्गंधाची आठवण झाली. तापलेल्या उन्हाने शरीराची काहिली होत असते. तशात पावसाचा शिडकावा झाला की कसा धुंद करणारा मातीचा वास येतो... तीच गंमत त्या मिट्टीच्या कुपीमध्ये होती. जणू काही पावसाच्या त्या पहिल्यावहिल्या थेंबांचं स्वागत करणाऱ्या, कोरड्या जमिनीचा सुगंधच त्या लहानशा कुपीत साठवून ठेवलेला होता.
बोलता बोलता फुक्रान मध्येच थांबला. आता तुम्ही बसला नाहीत तर मी पुढे काहीही सांगणार नाही. आम्ही त्याचे पाहुणे होतो, त्यामुळे हे असं उभं राहून बोलणं त्याला मान्य नव्हतं. निवांतपणे बसून तबियतीत अत्तराचा सुगंध अनुभवा, मग आवडलं तर खरेदी करा, असं त्याचं म्हणणं होतं. आजवर ज्या लखनवी तहजीबबद्दल मी भरभरून ऐकलं होतं, त्याचा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभव मला फुक्रानच्या दुकानात घेता आला.
‘तहजीब’ या अरबी शब्दाचा ढोबळ अर्थ आहे शिष्टाचार किंवा रीत. लखनौमध्ये ही तहजीब म्हणजे केवळ शिष्टाचार नसतो, ती त्यांची समृद्ध, पिढ्यानपिढ्या जपलेली जीवनशैली आहे. त्यांची ही तहजीब तिथल्या प्रत्येकाच्या बोलण्यात, साहित्यात, मनोरंजनात, पोशाखात, दृष्टिकोनात, कलेत, वास्तुकलेत आणि अर्थातच शहराच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीत बेमालूमपणे मिसळलेली आहे. सर्वत्र तिचं प्रतिबिंब दिसतं.
लखनौला जाण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती, पण तशी संधी काही केल्या मिळत नव्हती. अशातच मित्रांसोबत ‘फूड टूर’ करण्याची एक भन्नाट कल्पना वर्षभरापूर्वी आमच्या डोक्यात आली. त्यातूनच माझं हे बऱ्याच काळापासूनचं अधुरं राहिलेलं स्वप्नही सत्यात उतरलं. असं म्हणतात की, लखनौचा मार्ग पोटातून जातो आणि ते खरंही आहे. या शहरात खवय्यांची चंगळ असतेच, पण त्याहीपेक्षा खूप काही या शहरानं साठवून ठेवलेलं आहे, जपून ठेवलेलं आहे.
बडा इमामबाडा, छोटा इमामबाडा आणि रुमी दरवाजा ही स्थापत्य चमत्कारांची त्रयी ही निःसंशयपणे लखनौची मुख्य आकर्षणं आहेत. आताच्या प्री-वेडिंग फोटोशूटच्या जमान्यात तर ही सगळ्यांची अतिशय आवडती ठिकाणं आहेत. त्याची झलक आम्ही तिथल्या भेटीत पाहिली. हा समृद्ध वारसा लाभलाय तो तिथल्या शासकांमुळे. या शहराला नवाबांची भूमी अशी ओळख त्यांच्यामुळेच तर मिळाली.
‘नवाब’ या शब्दाचा उगम ‘नाईब’ या फारसी शब्दात आहे. नाईबचा अर्थ ‘प्रतिनिधी’ किंवा ‘काळजीवाहू’. राज्यपाल म्हणून प्रजेची व्यवस्था पाहणं, त्यांचं संरक्षण करणं ही नवाबांची जबाबदारी होती. कालांतराने, राजेशाही वैभव, सामर्थ्य, सुसंस्कृतपणा आणि सांस्कृतिक आश्रय यांचं प्रतीक असं या उपाधीला महत्त्व आलं. दुष्काळ निवारणाचा उपाय म्हणून नवाब असफ-उद-दौला याच्या काळात 1784 मध्ये बडा इमामबाडा आणि रुमी दरवाजा यांचं बांधकाम करण्यात आलं. वास्तुविशारद किफायतुल्ला यांनी त्याचं डिझाइन केलेलं आहे. 164 फूट लांब आणि 52 फूट रुंद असा हा बडा इमामबाडा पूर्णपणे विटांनी आणि दर्जेदार चुनखडीने बांधलेला आहे. त्याचं कमानीदार छत हे स्थापत्यकलेतील आश्चर्य आहे. एकही तुळई किंवा खांबाचा आधार न घेता बांधण्यात आलेल्या जगातील तशा प्रकारच्या सर्वात मोठ्या छतांपैकी ते आहे. गेल्या दोन शतकांहून अधिक काळ ही वास्तू मोठ्या ऐटीत उभी आहे. तिचं मूळ वैभव, दिमाख आजही टिकून आहे. या वास्तूतील आकर्षक गोष्ट म्हणजे तिथला भूल भुलैया. अतिशय अरुंद मार्गिका, कलात्मक सज्जे असलेला आणि त्यात शिरणाऱ्यांना पूर्णपणे गोंधळवून टाकणारा हा
भूल भुलैया म्हणजे एकसारखे 489 दरवाजे आहेत.
इमामबाडा ही खरं तर पवित्र वास्तू... उपासनेचं ठिकाण, पण दुर्दैवाने काही काळापूर्वी ती चर्चेत आली ती भलत्याच कारणामुळे. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने इथे नृत्य करून तो व्हिडिओ पोस्ट केला. त्यामुळे खूप गोंधळ झाला. अखेर या जागेचा दिमाख, प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रशासनाने या परिसरात व्हिडिओग्राफीवर बंदी घातली. पर्यटक म्हणून आपण भेट देत असलेल्या ठिकाणांचं पावित्र्य राखणं, आदर ठेवणं, स्वच्छता राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे, याचं भान सगळ्यांनी ठेवायला हवं, हे या निमित्ताने मुद्दाम अधोरेखित करावंसं वाटतं.
या भेटीत आम्ही छत्तर मंझिल म्हणजेच ‘छत्री महाल’ इथेही गेलो. हे एकेकाळी नवाबांचं अतिशय देखणं असं निवासस्थान होतं. आता त्याला भग्नावस्थेमुळे उतरती कळा लागली असली तरी गतवैभवाची झलक त्यातही जाणवते. तिथल्या एकंदरच नाजूक अवस्थेमुळे आम्ही सावधगिरीने पाऊल टाकत त्यातून वाट काढत होतो.
लखनौची जगप्रसिद्ध खाद्यसंस्कृती ही तिच्या लौकिकाला साजेशीच आहे. आम्ही कबाब आणि बिर्याणीसोबत, काली गाजर का हलवा आणि माखन मलाई या खास हिवाळी पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. माखन मलाई हा पदार्थ उत्तर भारताच्या काही भागात ‘मलय्यो’ या नावानेही ओळखला जातो. तिथले विविध पदार्थ, त्यातील वेगळेपणा, त्यांची चव हा खाद्यानुभव एकदम समृद्ध करणारा होता. इथल्या मांसाहारी पदार्थांनी तर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंच, पण त्याचवेळी सगळ्यांना आवडतील असे शाकाहारी पदार्थांचेही भरपूर ऑप्शन्स उपलब्ध होते. आंबट-तिखट चवीच्या चाटची तर मला अजूनही आठवण येते. बहुतेक पदार्थ हे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पाककृतींनुसार तयार केलेले होते. इथलं जेवण तर आम्हाला आवडलंच आणि वर्षानुवर्षं या उत्कृष्ट पाककृती टिकून का राहिल्यात याचं गुपितही कळलं. एक अनुभव तर विलक्षण होता.
नैमत खाना इथे आम्ही घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. ते जेवण अतिशय साधं आणि रुचकर होतं. आमची अगदी ब्रम्हानंदी टाळी लागली होती. आमच्या टूरच्या अखेरच्या दिवशी आलिशान सारका हॉटेलमधल्या अझराक रेस्टॉरंटमध्ये आम्ही मनसोक्त जेवलो. इथली रान ही डिश एकदम खास असते. सुमारे 12 तास मंद आचेवर शिजवलेले रान म्हणजे मासांहारी खवय्यांसाठी पर्वणीच.
इतर कोणत्याही प्राचीन शहराप्रमाणेच लखनौच्या गल्लीबोळात एकापेक्षा एक सरस गोष्टी आम्हाला सापडल्या. छोटेखानी, साधीसुधी हॉटेल्स प्रथमदर्शनी जरा शंकास्पद वाटायची, पण अशाच काही ठिकाणी आम्ही आजवर खाल्लेल्या पदार्थांपैकी काही सर्वात रुचकर पदार्थ खाल्ले. आमच्यासोबत एक लोकल गाईड होता. त्याने आम्हाला ही रत्नं शोधून दिली. त्यांच्या कथा सांगितल्या आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या या खाद्यसंस्कृतीचा आम्ही मनमुराद आनंद घेतला.
अशाच फिरस्तीच्या टप्प्यात आमची भेट झाली ती सुप्रसिद्ध टुंडे गलौटी कबाब यांच्याशी. या कबाबचा इतिहासही त्याच्या चवीइतकाच समृद्ध आहे. तोंडात टाकताच विरघळणारे हे कबाब एका वृद्ध नवाबासाठी तयार केल्याची आख्यायिका आहे. दात पडलेल्या नवाबाचा चवीचा आग्रह कायम होता. म्हणून खास त्याच्यासाठी हे कबाब तयार केले गेले. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही कल्पक पाककृती आजही जगभरातील खाद्यप्रेमींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
अर्थात मला तिथलं सगळंच काही आवडलं
असंही नाही. विशेषत: ‘दबंग’ चित्रपट इथे चित्रित झाल्यानंतर प्रसिद्ध झालेला ‘दबंग टी’ मला फारसा पसंत पडला नाही. तो जरा जास्तच मलाईदार होता. तिथे मी कश्मिरी चहा घेणंही टाळलं. त्याऐवजी गलौटी कबाबवरच मनसोक्त ताव मारला.
लखनौची सोबत आणता येणारी सगळ्यात खास आठवण म्हणजे चिकनकारी भरतकाम. या कपड्यांची खरेदी केल्याशिवाय लखनौमधून बाहेर पडताच येत नाही. पटकन जाता जाता ही खरेदी करावी असं ठरवून आम्ही दुकानात शिरलो आणि तब्बल दोन तासांनी बाहेर पडलो. नाजूक भरतकाम असलेल्या त्या कपड्यांची आम्ही मनसोक्त खरेदी केली. या खरेदीसाठी लखनौमध्ये घाऊक बाजारांपासून ते बुटीक डिझायनर स्टोअर्सपर्यंत असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. लखनौच्या वास्तुकलेचं प्रतिबिंब या चिकनकारीमधील नक्षीकामातही दिसतं. नवाबी कला आणि संस्कृतीत वारंवार आढळणारं मत्स्यचिन्ह हे सुद्धा चिकनकारीत सहजपणे दिसतं. मासा (माही) हे पर्शियन आणि इस्लामिक परंपरांनुसार भाग्य, सुपीकता आणि विपुलतेचं प्रतीक मानलं जातं. पर्शियन वंश असलेल्या अवधच्या नवाबांनी त्यांच्या शासनप्रणाली आणि सौंदर्यशास्त्राचे प्रमुख प्रतीक म्हणून मत्स्यचिन्हाचा स्वीकार केला होता. त्यामुळे हे मत्स्यचिन्ह प्रवेशद्वार, शाही ध्वज, ऐतिहासिक वास्तूंचे दर्शनी भाग असे सर्वत्र आढळते. ते ‘माही-मरातिब’चा भाग असते. ‘माही-मरातिब’ हा नवाबांनी सेनापती आणि अधिकाऱ्यांना दिलेला मोठा सन्मान असतो. समृद्धी आणि संरक्षणाचं प्रतीक असलेलं हे मत्स्यचिन्ह लखनौच्या सांस्कृतिक आणि कलात्मक प्रभावात अगदी खोलवर रुजलेलं आहे.
लखनौचा निरोप घेताना मी थक्क झाले होते. तिथल्या हवेत इतिहासाचा सुगंध दरवळत होता. तिथल्या लोकांच्या आपुलकीची तर बातच काही निराळी आहे. त्यांची काव्यात्मक भाषा लोभसवाणी होती. आमच्यावर तिचा इतका प्रभाव पडला की शेवटी शेवटी तर आम्ही अस्खलित हिंदी बोलू लागलो. लखनौची तहजीब, ती अदब कायम सोबत बाळगण्याची मनोमन शपथ घेऊनच आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला.
हे वर्णन वाचल्यावर तुम्हाला स्वाभाविकच लखनौच्या भेटीची ओढ लागेल. तेव्हा लगेचच वीणा वर्ल्डच्या वाराणसी अयोध्या लखनौ टूरमध्ये सामील व्हा. ही टूर म्हणजे हिंदुस्थानी संस्कृतीचा परिचय करून घेण्याची सुंदर संधी आहे. लखनौच्या वैभवशाली इतिहासापासून ते तिथल्या प्रेमळ लोकांपर्यंत, प्रत्येक क्षण हा आम्हाला एखाद्या सुंदर कथेचा भाग असल्यासारखा वाटत होता, तसाच तो तुम्हालाही वाटेल. तो अत्तराचा सुगंध, ती कबाबची चव, तिथल्या भव्य वास्तू, अप्रतिम नक्षीकाम... हे सारं काही आजही मी माझ्या मनाच्या कुपीत अगदी अलगद साठवलेलं आहे. लखनौ सोडून आम्ही घराकडे निघालो, त्यानंतरही बराच काळ लखनौ आमच्या मनात रेंगाळत होतं. वाटलं, “मुस्कुराइए, आप लखनौ में हैं!” असं म्हणतात, ते काही उगीच नाही!





























Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.