We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

इंटेलिजंट सिटीज्‌

13 mins. read
Neil Patil
Neil Patil
13 Mins Read
October 23, 2026
October 23, 2026

Quick Summary

लेखकाने टोकियो मेट्रोचा व्हिडिओ पाहताना समजलं की लॉजिकल पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम कशी काम करते.

टोकियो मेट्रोमध्ये प्रत्येक लाइनला रंग आणि अक्षर, आणि प्रत्येक स्टेशनला नंबर असल्याने जपानी न येताही प्रवास सोपा होतो.

टोकियो मेट्रोचा सरासरी विलंब सेकंदांत मोजला जातो आणि ट्रेन रद्द झाल्यास अधिकृत दिलगिरी दिली जाते.

टोकियोची व्यवस्था नव्याने आलेल्या लोकांसाठी डिझाइन केलेली आहे, त्यामुळे साइन बोर्ड्स वाचता न येणाऱ्यांनाही गोंधळ होत नाही.

लेखकाला टोकियो, बार्सिलोना, मेलबर्न, न्यूयॉर्क आणि रोममध्ये लँडमार्कपेक्षा शहरातील ‘इंटेलिजन्स’ जास्त जाणवते.

बार्सिलोनामध्ये फिरणं लेखकाला इतकं सोपं वाटलं की त्याला नेमकं कुठे आहे हे सतत कळत होतं.

Published in Maharashtra Times 25th October 2026

...एका जुन्या पायवाटेने नवीन रचनेचा हिस्सा व्हायला

नकार दिला, आणि याचमुळे शहरातील सर्वात

आयकॉनिक इंटरसेक्शन्स अस्तित्वात आली...

 

काही महिन्यांपूर्वी मी उगाचच ऑनलाइन माहितीच्या जाळ्यात कसा गुरफटत गेलो आणि स्वतःचा अमूल्य वेळ कसा वाया घालवला याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याची सुरुवात अगदी सहज, नकळत झाली. मी खरं तर याआधी एक दोनदा नाही, तर तब्बल ‌‘आठ‌’ वेळा टोकियोला जाऊन आलो आहे आणि तरीही एका वीकेंडच्या निवांत संध्याकाळी मी यू ट्यूबवर एक व्हिडिओ बघण्यात गुंतलो. हा व्हिडिओ होता टोकियोमधील मेट्रोची सिस्टीम कशी चालते हे स्पष्ट करणारा. हा तोच मॅप होता ज्याने दशकभरात अनेक पर्यटकांना घाबरवलं होतं आणि शेवटी पराभूत केलं होतं. मी काही ट्रिप प्लॅन करीत नव्हतो, पण मला कुतूहल वाटलं म्हणून मी तो व्हिडिओ पाहायला लागलो. तो मॅप काही गुंतागुंतीचा नाहीये. उलट आजवर उभारण्यात आलेल्या सर्वात लॉजिकल पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं ते उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक लाइनला म्हणजे मार्गाला एक रंग आणि एक अक्षर दिलेलं आहे. प्रत्येक मार्गावरील प्रत्येक स्टेशनसाठी एक नंबर दिलेला आहे. म्हणजे समजा तुम्ही जर गिंझा लाइनवर आहात तर तिचा रंग आहे ऑरेंज आणि अक्षर आहे जी (G) आणि तुम्हाला जर G 07 ला जायचं आहे, तर मग तुम्हाला फक्त आकडे मोजायचे आहेत. तुम्हाला जपानी वाचता येत नसेल तरी चालेल. त्यासाठी स्टेशन्सची नावं लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त नंबर्सचा माग घ्यायचा आहे. ज्या शहरात एकाच वेळी 14 दशलक्ष लोक वेगवेगळ्या दिशांना एकाच वेळी प्रवास करतात, तिथे कोणीतरी शांतपणे बसून एक अशी व्यवस्था निर्माण करतो, जी शहरात नव्याने येणाऱ्यांच्या उपयोगाची असते.

याबाबत आपण नंतर बोलूया, कारण आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा ते ते शहर आपल्यासाठी नवीन असतं. मग कोणीतरी वेळ काढून आपल्यासाठी ते शहर आणखी थोडं ‌‘इंटेलिजंट‌’ व्हावं म्हणून प्रयत्न केले असतील, तर त्याची दखल घ्यायलाच हवी. आज मला मी ज्या ज्या शहरांना भेट दिली आहे, त्यांच्याबद्दल सांगायचंय. टोकियो, बार्सिलोना, मेलबर्न, न्यूयॉर्क, रोम. जेव्हा जेव्हा मी या शहरांचा विचार करतो, तेव्हा मला तिथले लँडमार्क्स किंवा प्रसिद्ध रस्ते आठवत नाहीत, मला प्रकर्षाने जाणवतो तो या शहरांमधला इंटेलिजन्स. प्रत्येक महान शहरामागे एक व्यवस्था असते आणि त्या मोस्टली उघडपणे दिसत नाहीत. तुम्ही कुतूहलाने शोधलंत तरच त्या तुमच्या लक्षात येतात. तेव्हा ज्या शहरामुळे हा विचार मनात आला तिथूनच सुरुवात करुय़ा.

टोकियो - लॉजिकल इंटेलिजन्स

माझ्या मते, टोकियो हे जगाच्या पाठीवरचं सर्वात अत्याधुनिक शहर आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, ते असं दुर्मिळातलं दुर्मिळ शहर आहे जिथल्या सगळ्या व्यवस्था कायम सुरळीत चालत असतात. इथे ट्रेन्स अगदी वेळेवर धावतात. संपूर्ण टोकियो मेट्रो नेटवर्कमध्ये होणारा सरासरी विलंब हा मिनिटांमध्ये नाही, तर ‌‘सेकंदा‌’त मोजला जातो. जर एखादी ट्रेन रद्द करावी लागली, तर रेल्वेकडून अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त केली जाते. दर्जाची ही उच्च पातळी त्यांनीच ठरवली आहे आणि ती ते कायम राखतात.

टोकियो मेट्रो दररोज सुमारे 80 लाख लोकांना सेवा देते. तुम्हाला रंग, अक्षर आणि आकडा या तीन गोष्टी समजल्या असतील, तर जपानी भाषा न येताही तुम्ही सगळ्या शहरांत प्रवास करू शकता. ज्या व्यक्तीला शहराची अजिबात माहिती नाही, अशा व्यक्तीचा कोणत्याच बाबतीत गोंधळ उडणार नाही याची खबरदारी या व्यवस्थेत घेतलेली आहे, कारण ही व्यवस्था स्थानिकांसाठी निर्माण केलेली नाही. स्थानिकांना तर स्टेशन्सची नावं, रूट्स आणि बाहेर पडण्याचे मार्ग माहितीच असतात. ही व्यवस्था शहरात नव्यानेच आलेल्या लोकांसाठी निर्माण केलेली आहे. ज्यांना साइन बोर्ड्स वाचता येत नाहीत आणि स्टेशन्सची नावे उच्चारता येत नाहीत अशा व्यक्तींचा बारकाईने विचार करून ही व्यवस्था उभी राहिली आहे. हे केवळ एक चांगलं डिझाइनच नाही, तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून व्यक्त केलेली सहानुभूती आहे. आठ वेळा भेट देऊनही आजही टोकियो मला आश्चर्यचकित करतं. पण आता जेव्हा मी तिथल्या प्लॅटफॉर्मवर उभा राहून ते नंबर पुढे सरकताना बघतो, तेव्हा मला असं एक शहर दिसतं, ज्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवलं होतं की आपल्याकडे आलेल्या नवीन माणसाची सकाळही इथल्या स्थानिकांप्रमाणेच सुखाची जायला हवी.

बार्सिलोना - व्हिज्युअल इंटेलिजन्स

गेल्या वर्षी मी, माझी पत्नी हेता आणि मुलगी रायाबरोबर बार्सिलोनाला गेलो होतो. या शहरात फिरणं फारच सोपं गेलं, अगदी विश्वास बसणार नाही इतकं सोपं. ज्या शहरात त्याआधी मी कधीच फारसा फिरलो नव्हतो, त्या शहरात मी नेमका कुठे आहे हे मला कायम कळत होतं. बार्सिलोनाची नेव्हिगॅबिलिटी ही चुकून झालेली गोष्ट नाही. 1859 मध्ये ‌‘इडेफोन सेर्दा‌’ या व्हिजनरी माणसाने केलेल्या प्रयत्नांचं हे फळ आहे आणि आजही हाच दृष्टिकोन ह्या शहराने जोपासलाय. तो एक अभियंता आणि अर्बन प्लॅनर होता. जेव्हा बार्सिलोना शहराचा जुन्या तटबंदीच्या बाहेर विस्तार करायचा ठरला, तेव्हा या नवीन भागाची रचना करण्याचं काम सेर्दावर सोपवण्यात आलं. ‌‘इ झॉम्प्लं‌’ म्हणजेच ‌‘द एक्सपान्शन‌’ म्हणून त्याने जी रचना केली, ती इतिहासातील सर्वोत्कृष्ट अर्बन प्लॅन मानली जाते. सेर्दाने एका परफेक्ट चौकोनी जाळ्यासारखी रचना केली. या रचनेत त्याने अशी एक गोष्ट केली ज्यामुळे आकाशातून बार्सिलोना लगेच ओळखू येतं. प्रत्येक चौकाच्या प्रत्येक कोपऱ्याला 45 अंशात कापलं. हे तिरपे कोपरे फक्त सजावटीसाठी नव्हते, तर जाणीवपूर्वक केले होते. त्यामुळे घोडागाड्या वळवणं सोपं झालं. प्रत्येक स्क्वेअरमध्ये त्यामुळे जी मोकळी जागा निर्माण झाली, त्याचा वापर सूर्यप्रकाश, मोकळी हवा खेळवण्यासाठी करता आला. हीच रचना शहरातील शेकडो स्क्वेअर्ससाठी वापरलेली असल्याने इतर शहरांच्या तुलनेत अधिक मोकळे, सुविहित रस्ते असलेलं एक शहर निर्माण झालं. आकाशातून काढलेला बार्सिलोनाचा फोटो बघितला, तर ही गोष्ट लगेच नजरेत भरते. प्रत्येक दिशेला पसरलेली आणि अगदी एकसारखी अशी ती अष्टकोनी रचना लगेच उठून दिसते. जगातलं दुसरं कोणतंही मोठं शहर आकाशातून असं दिसत नाही. यातली मला जाणवलेली सर्वात उल्लेखनीय गोष्ट ही की सेर्दाने मुळात प्रत्येक चौकात एका बागेला जागा असेल अशी रचना केली होती, ज्यामुळे शहरातला माणूस हिरवाईपासून लांब जाणार नाही. काळाच्या ओघात शहराने ही कल्पना गिळून टाकली, पण त्याच्या या संकल्पनेचे अवशेष आजही पाहायला मिळतात.

आणखी एक गोष्ट. तुम्ही जर ‌‘साग्रादा फॅमिलिआ‌’ या अतिशय गुंतागुंतीची रचना असलेल्या आणि आजही पूर्ण न झालेल्या कॅथेड्रलचे किंवा ‌‘पासेज दि ग्रासिया‌’ या लाटांसारख्या, मोझाइकने मढवलेल्या इमारतीचे फोटो बघितले असतील तर तुम्हाला ‌‘अन्तोनिओ गौदी‌’ च्या कामाचा परिचय असेल. त्याने त्याची सगळी कामं सेर्दाच्या चौकटीतच उभारलेली आहेत. सेर्दाने निर्माण केलेल्या शिस्तबद्ध पार्श्वभूमीवर गौदीच्या काहीशा गुंतागुंतीच्या, जरा विस्कळीत कलाकृती अधिकच खुलून दिसतात. एकाशिवाय दुसऱ्याच्या कामाचं मोल करताच येणार नाही. हेता आणि रायाबरोबर त्या रस्त्यांवरुन चालताना मला यातलं काहीच माहिती नव्हतं. मला फक्त या शहरात फिरताना छान वाटत होतं, आता त्यामागचं कारण समजलंय.

न्यूयॉर्क - ग्रिड इंटेलिजन्स

मॅनहॅटनमध्ये भारावून जायला होतं. ते अतिशय ठळक, दाटीवाटीचं, उभं (उंचच उंच) आणि न थांबणारं शहर आहे आणि तरीही पहिल्यांदाच येणारे प्रवासी इथे अगदी सहजपणे वावरू शकतात. 1811 मध्ये, जेव्हा त्यातला बराचसा भाग शहर म्हणून अस्तित्वात यायचा होता, तेव्हा तीन सिटी कमिशनर्स एकत्र आले आणि त्यांनी मॅनहॅटनचं ग्रिड आखलं. उत्तर-दक्षिण असे बारा ॲव्हेन्यूज. पूर्व-पश्चिम असे दीडशे रस्ते. एकाच दिशेने, ठराविक पद्धतीत वाढत जाणारे नंबर्स.

शहराची भविष्यातली वाढ ओळखून, ती प्रत्यक्षात येण्याआधीच केलेलं ते एक धाडसी नियोजन होतं. टीकाकारांनी या रचनेला निष्प्राण म्हटलं, पण प्रत्यक्षात ती सहज कळणारी रचना होती. दोनशे वर्षांपूर्वी ज्या तर्काने एखाद्याने मॅनहॅटनमध्ये रस्ता शोधला असता, तोच तर्क आज नव्याने इथे येणाऱ्या माणसालाही उपयोगी पडतो.

पण न्यूयॉर्कला इंटरेस्टिंग बनवणारी, ग्रिड ही एकमेव गोष्ट नाही. तर या ग्रिडला असलेले अपवाद त्याला आणखी रंजक बनवतात. उदाहरणार्थ ब्रॉडवे. संपूर्ण बेटाला तिरका छेद देणारी ही रेषा या ग्रिडपेक्षाही जुनी आहे. प्राचीन लेनापे ट्रेलचा ती भाग आहे. हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी याच पायवाटेवरुन स्थानिक लोक ये-जा करायचे. कमिशनर्सना ती वाट पुसता आली नाही, त्यामुळे त्यांनी ती तशीच ठेवली. जिथे जिथे ब्रॉडवे या ग्रिडला छेदतात, तिथे तिथे काहीतरी विलक्षण घडलेलं पाहायला मिळतं. टाईम्स स्क्वेअर, द फ्लॅटिरॉन बिल्डिंग, कोलंबस सर्कल... एका जुन्या पायवाटेने नवीन रचनेचा हिस्सा व्हायला नकार दिला, आणि याचमुळे शहरातील सर्वात आयकॉनिक इंटरसेक्शन्स अस्तित्वात आली. नियमांनी शिस्त लावली, पण अपवादाने शहराला चेहरा दिला. इतर कोणत्याही शहरापेक्षा याची खात्री न्यूयॉर्ककडे पाहिल्यावर पटते की हे शहर या दोन्हीच्या संगमामुळे निर्माण झालं आहे.

मेलबर्न - ह्युमन इंटेलिजन्स

मी माझ्या आयुष्यातली चार वर्षं मेलबर्नमध्ये काढली आहेत. आणि अजूनही जेव्हा जेव्हा मी तिथे जातो, तेव्हा तेव्हा तिथे पोहोचल्यानंतर फक्त वीस मिनिटांमध्ये मला हेच जाणवतं की हे शहर लोकांसाठी रचलेलं आहे. म्हणजे नेमकं काय ते पहिल्यांदा पटकन सांगता येत नाही, पण तिथे काही दिवस घालवल्यानंतर ते अगदी स्पष्ट होऊन जातं. इथल्या ट्रामचं नेटवर्क हे संपूर्ण शहरात शिस्तबद्धपणे पसरलेलं आहे. मध्यवर्ती भागात ते अगदी मुक्त आहे आणि इतरत्र अतिशय विश्वासार्ह. इथल्या गल्ल्या, ज्या कदाचित पटकन कळणारही नाहीत, त्या कॉफी शॉप्स, रेस्टॉरंट्स आणि स्ट्रीट आर्ट्स्‌‍नी भरलेल्या आहेत. जर तुम्ही पायी चालला नाहीत आणि तुम्हाला कुतूहल वाटत नसेल तर कदाचित हे काहीच दिसणार नाही. हे शहर जणू पादचाऱ्यांना त्यांच्या चालण्याचं बक्षीसच देतं. इथे नागरी नियोजनाची अशी एक संस्कृती आहे, ज्यात नागरिकांचं दैनंदिन आयुष्य किती सुखावह असलं पाहिजे याचा प्राधान्याने विचार केला जातो. मेलबर्नचे रस्तेच या प्रश्नाचं उत्तर देतात. ‌‘20 मिनिट नेबरहूड फिलॉसॉफी‌’ त्यातूनच उदयास आली. या संकल्पनेनुसार तुमच्या दैनंदिन गरजा भागवणाऱ्या गोष्टी, तुम्हाला 20 मिनिटं चालत जाण्याच्या किंवा बाइकवरुन जाण्याच्या अंतरावर उपलब्ध असल्या पाहिजेत. हे केवळ कागदावरचं धोरण नाही, याचा थेट अनुभव तुम्हाला मिळतो. पार्क्स, शाळा, कॅफेज, मार्केट्स, पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम हे सगळं जाणीवपूर्वक एकमेकांत गुंफलेलं आहे. हे एक असं शहर आहे जे आपल्या नागरिकांवर प्रेम करतं आणि जेव्हा तुम्ही त्याचा अनुभव घेता, तेव्हा ते किती दुर्मिळ आहे हे लक्षात येतं.

रोम - टेम्पोरल इंटेलिजन्स

बहुतेक शहरं रिकाम्या जमिनीवर उभी राहतात. रोम मात्र स्वतःवरच उभं आहे. तुम्ही रोममधून चालता तेव्हा फक्त एकाच शहरामध्ये चालत नसता. तुमच्या पावलाखालच्या रस्त्याखाली मध्ययुगातलं एक शहर असतं. त्याच्याखाली रोमन रिपब्लिक असतं. त्याच्याही खाली असतात प्राचीन लोकसंस्कृतीचे अवशेष, जे ज्युलियस सिझरच्या काळातच पुरातन झाले होते. रोम हे असं शहर आहे जिथे साधारणपणे सलग तीन हजार वर्षं मानवी वस्ती आहे आणि त्यातला कोणताच भाग पूर्णपणे नष्ट झालेला नाही. ते थरावर थर अशा पद्धतीने उभारलं गेलं, त्यामुळे प्रत्येक काळाचा काही ना काही भाग मागे राहिलाच. पँथिऑन हे याचं अगदी स्पष्ट उदाहरण म्हणता येईल. गेली दोन हजार वर्षं ते फारशी मोडतोड न होता उभं आहे. ते आधी रोमन मंदिर होतं, नंतरच्या काळात ते ख्रिश्चन चर्च झालं आणि आता, जगातले सर्वाधिक लोक ज्याला भेट देतात अशी ऐतिहासिक वास्तू आहे. आजही ते अस्तित्वात आहे, आजही ते कार्यरत आहे, आजही त्याचा तो सुप्रसिद्ध, कोणत्याही लोखंडी आधाराशिवाय उभारलेला भव्य घुमट शाबूत आहे पण आधुनिक इंजिनिअरिंग नसताना हा घुमट कसा उभारला? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही.

रोममध्ये कोणत्याही दिशेनं फक्त 10 मिनिटं चालल्यावर तुम्ही कोणत्या तरी पियात्झावर म्हणजे चौकात पोहोचलेले असता आणि प्रत्येक पियात्झा तिथेच का आहे यामागे एक कारण आहे. एखादं जुनं मार्केट, जुन्या देवस्थानाच्या जागी उभारलेलं चर्च, एखादी प्राचीन जलवाहिनी कुठे संपते हे सांगण्यासाठी उभारलेलं कारंजं, असं काही ना काही कारण आहेच. रोममध्ये कोणतीही गोष्ट उगाचच, मनात आलं म्हणून उभारलेली नाही. वरवर पाहता हे शहर फार गोंधळलेलं, अस्ताव्यस्त वाटतं, इथल्या ट्रॅफिकमुळे त्याची खात्रीच पटते. पण त्याखाली इथल्या प्रत्येक कोपऱ्याची एक कहाणी आहे, ती सुद्धा अनेक देशांच्या जन्माआधीची. जे पर्यटक शांतपणे फिरतात, काळजीपूर्वक बघतात आणि एखादी गोष्ट त्याच ठिकाणी का आहे? असा प्रश्न विचारतात, अशांना रोम बरंच काही देतं.

आपल्याला शहरं कशी बघायची ते शिकवलं आहेच. लँडमार्क्स, स्मारकं, बकेट लिस्टमधले स्क्वेअर्स, फेमस रोड्स हे सगळं बघायला आपण तयार होऊन, एक चेकलिस्ट घेऊन येतो आणि त्यातल्या बहुतेक जागांचे फोटो काढून परत जातो. त्यात काही चूक नाही, कारण त्या जागाही उगाचच प्रसिद्ध झालेल्या नसतात. पण पर्यटनाची एक वेगळी पद्धतही आहे. वेगळ्या प्रश्नांनी तिची सुरुवात होते. ‌‘मी त्या शहरात काय बघू?‌’ इतकंच महत्त्वाचं नाही, तर ‌‘ते शहर कसा विचार करतं?‌’, ‌‘ते उभारलं तेव्हा तिथली कोणती समस्या त्यानी सोडवली?‌‘ ‌‘तिथले रस्ते तुम्हाला तिथल्या मूल्यांबद्दल काय सांगतात?‌’ ‌‘ही रचना करणाऱ्यांनी कोणाला डोळ्यांसमोर ठेवून अशी रचना केली असेल?‌’ हे प्रश्नं पडणंही महत्त्वाचं असतं. प्रत्येक शहरात हा लेयर असतोच, पण बहुसंख्य पर्यटकांना तो कळत नाही, कारण ते तसा विचारच करीत नाहीत. त्यामुळेच या सगळ्याची सुरुवात जिथून झाली, तिथे जाणं मला आवश्यक वाटतं.

आठवड्यातली एक निवांत संध्याकाळ, यू ट्यूबवरचा एक व्हिडिओ, अशक्य वाटणारा एक ट्रेन मॅप... आणि मग जाणीव होते की खूप काळापूर्वी टोकियोत कुणीतरी बसून आपल्या शहरात येणाऱ्या नवख्या माणसाची सकाळ खराब होऊ नये म्हणून केलेली ही रचना आहे... मग ते फक्त इंजिनिअरिंग राहत नाही, तर सहानुभूतीची खूण बनते.

पुढच्या वेळी एखाद्या नव्या शहरात जाल तेव्हा नकाशा उघडून तुमच्या यादीतल्या पहिल्या लँडमार्ककडे जाण्याआधी जरा थांबा, ज्या रस्त्यावर तुम्ही उभे आहात, त्यावर एक नजर टाका आणि विचारा की हा इथे का आहे? मग ते शहर तुमच्याशी अशा भाषेत बोलायला लागेल ज्यात शब्दांची आवश्यकताच नसेल आणि त्या क्षणापासून तुमचं पर्यटन अधिक इंटरेस्टिंग व्हायला सुरुवात होईल. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
वीणा वर्ल्ड थायलंड
13 mins, read

वीणा वर्ल्ड थायलंड

Published in Sakal Saptarang 25th October 2026 सॉन्गक्रान फेस्टिव्हल थायलंडमध्ये दरवर्षी एप्रिल महिन्यात थाई नववर्षाच्या स्वागतासाठी सॉन्गक्रान फेस्टिव्हल साजरा केला जातो. या जगप्रसिद्ध फेस्टिव्

सलाम नमस्ते!
13 mins, read

सलाम नमस्ते!

Published in Loksatta Lokrang 25th October 2026 ...न्यूयॉर्कपासून नैरोबीपर्यंत आणि सिडनीपासून सोलपर्यंत, तरुणाईच्या गप्पांमध्ये हे दोन शब्द सहज ऐकायला मिळतात. साधं, मैत्रीपूर्ण आणि कोणत्याही औपचारि

हॉलिडे... कल्पनेतला आणि प्रत्यक्षातला...
13 mins, read

हॉलिडे... कल्पनेतला आणि प्रत्यक्षातला...

Published in Maharashtra Times 18th October 2026 ...तुमच्या यादीतल्या पहिल्या रेस्टॉरंटपाशी तुम्ही येता आणि कळतं की तिथे 90 मिनिटांचं वेटिंग आहे. तिथे रिझर्व्हेशनची फॅसिलिटी नसल्याने तुम्ही ते केले

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!