We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

सलाम नमस्ते!

8 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
8 Mins Read
October 23, 2026
October 23, 2026

Quick Summary

युरोपियन पार्टनर्सना भेटताना हँडशेक आणि मिठी यांचा गोंधळ होऊ शकतो, म्हणून आधी संकेत समजून घ्या.

प्रवासात नम्रता आणि आपुलकी यांचा समतोल ठेवा, कारण जास्तीचा स्पर्श समोरच्याला अपमानास्पद वाटू शकतो.

पूर्वेकडील संस्कृतीत वाकून अभिवादन, खोल अर्थ असलेले नमस्कार आणि शारीरिक स्पर्श टाळण्याकडे कल असतो.

मलेशियात सलाम करताना हातांना हलका स्पर्श करून हात हृदयावर ठेवतात, तर थायलंडमध्ये वाई करताना तळहात जोडून डोकं किंचित झुकवतात.

भारतामध्ये नमस्ते करताना दोन्ही हात छातीपाशी जोडून दैवी शक्तीला वंदन असा अर्थ व्यक्त होतो.

मिडल ईस्टमध्ये सलाम आलैकुम सारख्या अभिवादनातून शांतता आणि सदिच्छा व्यक्त केली जाते आणि आलिंगन क्वचितच दिलं जातं.

Published in Loksatta Lokrang 25th October 2026

...न्यूयॉर्कपासून नैरोबीपर्यंत आणि सिडनीपासून सोलपर्यंत, तरुणाईच्या गप्पांमध्ये हे दोन शब्द सहज ऐकायला मिळतात. साधं, मैत्रीपूर्ण आणि कोणत्याही औपचारिकतेची अपेक्षा न ठेवणारं हे अभिवादन!...

ही महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. युरोपातील आमचे काही पार्टनर्स आमच्या ऑफिसमध्ये आले होते. या युरोपीय मंडळींचं स्वागत करण्यासाठी आमची टीमही सज्ज होती. पण त्यांचं आगमन झाल्याबरोबर एक गमतीशीर गोंधळ झाला. युरोपियन पार्टनर्सशी हँडशेक करण्यासाठी आमची टीम पुढे सरसावली. त्याच वेळी आमच्या युरोपीय पार्टनर्सनी मिठी मारण्यासाठीs बाहू पसरले. त्याला प्रतिसाद म्हणून आमच्या टीममधील सदस्य मिठी मारण्यासाठी पुढे झुकले. तसे त्या पार्टनर्सनी हँडशेकसाठी हात पुढे केले... हे म्हणजे अचानक सुरू होणाऱ्या एखाद्या नृत्यासारखंच झालं. हँडशेक, मिठीची तयारी, मागे हटणं, आणि पुन्हा त्याच क्रमाने तेच सगळं! काही क्षणातच हा गोंधळ सगळ्यांच्या लक्षात आला आणि आम्हाला हसू फुटलं. त्यातून वातावरण एकदम निवळलं. आम्ही सगळे आरामात स्थिरस्थावर झालो आणि पुढे आमच्या व्यावसायिक गप्पा सुरू झाल्या.

या प्रसंगानंतर एखाद्याला ‌‘योग्य‌’ पद्धतीने ग्रीट कसं करायचं, हा प्रश्न माझ्या मनात पिंगा घालू लागला. प्रवासात तर हा प्रश्न हमखास पडतो. किती प्रमाण असलं म्हणजे अतिरेक होणार नाही आणि काय केल्यावर समोरच्याला अपमानित वाटेल याचा अंदाज बांधणं कठीण होतं. आपण नम्र असायला हवं हे खरं, पण त्याच वेळी आपलेपणाही वाटायला हवा. आदर व्यक्त व्हायला हवा, तसाच स्नेहभावही जपला जायला हवा. अर्थात, या सगळ्या गोष्टी तुम्ही जगाच्या नेमक्या कोणत्या भागात आहात, यावर अवलंबून असतात.

पूर्वेकडील संस्कृती: नम्र अभिवादन, सौजन्य आणि मूक आदर!

आशियामध्ये अभिवादनात शारीरिक स्पर्श नसतो, पण खोल अर्थ दडलेला असतो. जपानमध्ये कमरेतून काहीसे वाकून अभिवादन करतात. तो केवळ नमस्कार नसतो, ती त्यांची खास भाषा आहे. हे अभिवादन जेवढं वाकून केलं जाईल, तेवढा त्यात आदर अधिक असतो. साऊथ कोरियामध्येही असंच आदरपूर्वक अभिवादन केलं जातं. त्यासोबत मंद स्मितही केलं जातं. मलेशियामध्ये ‌‘सलाम‌’ या पारंपरिक अभिवादनाच्या प्रकारात समोरच्या व्यक्तीच्या हातांना हलकासा स्पर्श करून नंतर आपला हात आपल्या हृदयावर ठेवला जातो. त्याला प्रामाणिकपणा आणि मोकळेपणाचं प्रतीक मानतात. थायलंडमध्ये लोक छातीसमोर तळहात जोडून आणि डोकं किंचित झुकवून ‌‘वाई‌’ करतात. आपल्या नमस्कारासारखंच! त्यातून आदर आणि शांतता प्रतीत होते.

आपल्या भारतातला नमस्ते हा अभिवादनाचा सगळ्यात सुंदर आविष्कार आहे. या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधून झालेली आहे. तुमच्यातील दैवी शक्तीला माझे वंदन, असा त्याचा अर्थ होतो. छातीपाशी दोन्ही हात जोडून केलेल्या या अभिवादनातून समानता, नम्रता आणि एकात्मतेची भावना व्यक्त होते. ही अभिवादनाची आदरयुक्त, आरोग्यदायी आणि सगळ्यांना समजणारी पद्धत आहे. पँडेमिक नंतरच्या जगात तर ही अगदीच समर्पक वाटते.

मिडल ईस्ट: सलाम आणि पवित्र जागा

आखाती देशातील आमच्या पार्टनर्ससोबतच्या भेटींमुळे माझ्या असं लक्षात आलं की, त्यांच्याकडे आलिंगन क्वचितच दिलं जातं. एकमेकांपासून अंतर राखण्याकडे त्यांचा कल असतो. परस्परांच्या मोकळीकीचा, स्वातंत्र्याचा ते आदर करतात. त्यांच्या स्वागतातील शब्दांना, अध्यात्मिक अर्थ असतो. ‌‘अस-सलाम आलैकुम‌’ (तुम्हाला शांतता लाभो) असं म्हटल्यावर ‌‘वा-अलैकुम अस-सलाम‌’ (आणि तुम्हालाही शांतता लाभो) असं प्रति अभिवादन केलं जातं. त्यातून परस्परांना शांतता आणि सदिच्छा चिंतली जाते. खास मित्रांमध्ये, आप्तांमध्ये एकमेकांबद्दल विश्वास आणि स्नेह दर्शविण्यासाठी या अभिवादनानंतर हँडशेक किंवा अगदी क्षणभरासाठी हलकेच नाकाला नाक टेकवतात. ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये ही अभिवादनाची सर्वसामान्य पद्धत आहे. अरबी लोकांचं आदरातिथ्यही कमालीचं असतं. स्वागतप्रसंगी समोर आलेल्या अल्पोपहारात बहुतेककरून अरेबिक कॉफी आणि खजूरांचा समावेश असतो.

युरोप: चुंबन, हस्तांदोलन आणि हलकीशी नाट्यमयता

युरोपात अभिवादनात आपुलकी आणि शिष्टाचार या दोन्हींचं अनोखं मिश्रण असतं. औपचारिक प्रसंगी हँडशेक म्हणजेच हस्तांदोलन हाच अभिवादनाचा योग्य प्रकार आहे. परंतु एकदा का मैत्रीचे बंध तयार झाले की मग एक किस किंवा तीन किसेसनी ग्रीट केलं जातं. फ्रान्समध्ये ‌‘बीझ‌’ (चीक किस) घेण्याची प्रथा आहे. बहुतेक वेळा दोनदा किस केलं जातं. स्वित्झर्लंडमध्ये थ्री किसेसची पद्धत आहे. आलटून पालटून एकेका गालावर किस केलं जातं. इटलीमध्ये स्नेहभाव जास्तच असतो. तिथे मी टूर मॅनेजर म्हणून काम केले आहे. ते दिवस मला आजही आठवतात. दररोज सकाळी आमचे वयस्कर ड्रायव्हर थोडं वाकून माझ्या हाताला किस करायचे आणि म्हणायचे, “बुओनजोर्नो, प्रिन्सिपेसा!” एकदम शाही आदरातिथ्य... त्यांच्या या वागण्याने माझी सकाळ आनंदून जायची. छान वाटायचं. ब्रिटिशांच्या शिष्टाचाराची कथाच वेगळी... त्यांचा भर कायम सौजन्याने केलेलं हँडशेक आणि त्यानंतर, ‌‘हाऊ डू यू डू?‌’ अशी एकदम लाघवी, मैत्रीपूर्ण स्वरात केलेली विचारणा... यावर असतो. युरोपातील प्रत्येक देशाची ग्रीट करण्याची स्वतःची खास पद्धत आहे.

अमेरिका: मिठी, उत्साह आणि मैत्रीपूर्ण वागणूक

अमेरिकेत ग्रीट करताना आत्मविश्वास आणि उत्साह जाणवतो. पहिल्यांदा ‌‘हे, हाऊ आर यू?‌’ म्हणजे ‌‘हाय, कसे आहात?‌’- हा प्रश्न येतोच. त्यात सविस्तर उत्तराची अपेक्षा नसते. घट्ट हस्तांदोलन किंवा एक हलकीशी मिठी यामुळे मैत्री अधिक घट्ट होते. अमेरिकन लोकांच्या बोलण्यातील उत्साह आणि आवाजातील चैतन्य यातून त्यांचं आपलेपण व्यक्त होतं.

दक्षिणेकडे, लॅटिन अमेरिकेत अर्जेंटिना किंवा ब्राझीलमध्ये अगदी नव्याने ओळख झालेल्या व्यक्तींच्याही गालावर हलकसं किस केलं जातं, तर मेक्सिकोमध्ये हँडशेकनंतर मिठी मारून आपलं स्वागत केलं जाऊ शकतं. इथल्या अभिवादनाच्या पद्धतीत उत्कटता आहे, आणि मनापासून व्यक्त केलेला जिव्हाळा आहे.

 पॅसिफिक आणि त्यापलीकडे : श्वासापासून आत्मिक नात्यापर्यंत

मी अनुभवलेल्या सर्वांत जिव्हाळ्याच्या अभिवादनांपैकी एक अनुभव न्यूझीलंडमध्ये आला, जेव्हा माझी भेट माओरी कुटुंबाशी झाली. त्यांनी माझं स्वागत केलं ते ‌‘होंगी‌’ या पारंपरिक अभिवादनाच्या पद्धतीने. यात दोन व्यक्ती हळुवारपणे आपली नाकं एकमेकांच्या नाकांना टेकवतात. हा केवळ अभिवादनाचा प्रकार नाही, तर ‌‘जीवनासाठी आवश्यक श्वासाची देवाणघेवाण‌’ मानला जाणारा एक आध्यात्मिक अनुभव आहे. यातून, त्या क्षणापुरतं आपण दोघंही एकाच हवेत श्वास घेत आहोत, याची जाणीव होते.

आफ्रिका : आपुलकी, लय आणि आदर

आफ्रिकेच्या विविध भागांमध्ये अभिवादन करताना लय, आदर आणि आनंद यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो. केनियाच्या काही भागांत मसाई योद्धे एकमेकांना ग्रीट करताना हँडशेक करण्यापूर्वी हातावर हलकेच थुंकतात. हा आशीर्वाद देण्याचा संकेत मानला जातो. नायजेरियामध्ये हँडशेकच्या शेवटी बोटं हलकेच वाजवण्याची पद्धत आहे. एकमेकांशी जोडलं जाण्याची भावना व्यक्त करणारा हा नादही तितकाच आनंददायी असतो.

दक्षिण आफ्रिकेत झुलू भाषेतील ‌‘सॉवुबोना‌’ (Sawubona) या अभिवादनाचा अर्थ होतो, ‌‘मी तुला पाहतो‌’. त्याला उत्तर म्हणून ‌‘न्गिखोना‌’ (Ngikhona) म्हटलं जातं, ज्याचा अर्थ ‌‘मी इथे आहे‌’ असा होतो. हे केवळ अभिवादन नसून, समोरच्या व्यक्तीचं अस्तित्व आणि महत्त्व मान्य करण्याची भावना आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या अस्तित्वाची आणि उपस्थितीची घेतलेली ही दखल म्हणजेच खऱ्या अर्थाने परस्परांचा आदर!

स्कॅन्डिनेव्हिया : मितभाषी, साधेपणाचा आणि प्रामाणिकपणाचा सन्मान

स्वीडन आणि नॉर्वेसारख्या स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये एकमेकांना ग्रीट करताना एक फर्म हँडशेक, हलकीशी मान डोलावणं आणि मनापासून म्हटलेलं ‌‘हेय‌’ (Hej) किंवा ‌‘गुड डाग‌’ (God dag), म्हणजेच ‌‘शुभ दिन‌’ - एवढं पुरेसं असतं. अभिवादनाची ही पद्धत त्यांच्या प्रामाणिकपणा, विनम्रता आणि पर्सनल स्पेसचा आदर करण्याच्या सांस्कृतिक वृत्तीचं प्रतिबिंब आहे.

तरुणाईची वैश्विक भाषा : ‌‘व्हॉट्स अप?‌’

आधुनिक काळात एका वाक्याने देशांच्या सीमा ओलांडल्या आहेत ते वाक्य म्हणजे ‌‘व्हॉट्स अप?‌’ न्यूयॉर्कपासून नैरोबीपर्यंत आणि सिडनीपासून सोलपर्यंत, तरुणाईच्या गप्पांमध्ये हे दोन शब्द सहज ऐकायला मिळतात. साधं, मैत्रीपूर्ण आणि कोणत्याही औपचारिकतेची अपेक्षा न ठेवणारं हे अभिवादन!  ना वाकून नमस्कार करण्याची गरज, ना गालावर चुंबनाची, ना हस्तांदोलनाची! हे वाक्य इतकं लोकप्रिय झालं की त्यावरूनच एका जागतिक मेसेजिंग ॲपचं नाव प्रेरित झालं, ‌‘व्हॉट्सॲप‌’! आधुनिक जगाला जोडणारा हा एक डिजिटल ‌‘हॅलो‌’च जणू! रोज लाखो लोकांना जोडणाऱ्या या ॲपच्या नावामागेही रोजच्या बोलण्यात सहज वापरल्या जाणाऱ्या याच वाक्याची प्रेरणा आहे. एक साधासा ‌‘व्हॉट्स अप?‌’ हा प्रश्न जगभरातील संवादाची पद्धत घडवण्यात हातभार लावेल, असं कोणाला वाटलं तरी होतं का?

शंका असेल तर, फक्त हसा!

पँडेमिकने आपल्याला खूप काही शिकवलं. एकमेकांमधील स्नेह व्यक्त करण्यासाठी कायम शारीरिक स्पर्शाची गरज नसते, ही सुद्धा याच काळाची शिकवण! आदरपूर्वक ठेवलेलं अंतर, जोडलेले हात किंवा अगदी मनापासून म्हटलेलं ‌‘हॅलो‌’ सुद्धा मिठीइतकंच उबदार असू शकतं. जगभरात अभिवादनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या सगळ्याचा गाभा एकच आहे, तो म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाची दखल घेणं, तिच्याशी नातं जोडणं आणि तिच्याबद्दल आदर व्यक्त करणं. मग ते सलाम असो नमस्ते असो, बोंजूर, सावुबोना असो किंवा अगदी उत्साहाने विचारलेलं ‌‘व्हॉट्स अप?‌’... हे शब्द मनापासून आले असतील तर त्यामागची भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचते. आणि कदाचित यातच या सगळ्याचं सौंदर्य दडलं आहे. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असा, तुमचं एखादं मनमोकळं स्मितहास्य आणि आपुलकीने केलेला छोटासा हावभाव एखाद्याला आपलंसं वाटायला पुरेसा असतो. त्यामुळे पुढच्या वेळी प्रवासाला जाल, तेव्हा तिथले लोक एकमेकांना कसं ग्रीट करतात, हे जरा निरखून पाहा. कदाचित तुम्ही एखादा नवा शब्द शिकाल, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी तुम्हाला मिळेल!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
इंटेलिजंट सिटीज्‌
8 mins, read

इंटेलिजंट सिटीज्‌

Published in Maharashtra Times 25th October 2026 ...एका जुन्या पायवाटेने नवीन रचनेचा हिस्सा व्हायला नकार दिला, आणि याचमुळे शहरातील सर्वात आयकॉनिक इंटरसेक्शन्स अस्तित्वात आली...   काही

वीणा वर्ल्ड थायलंड
8 mins, read

वीणा वर्ल्ड थायलंड

Published in Sakal Saptarang 25th October 2026 सॉन्गक्रान फेस्टिव्हल थायलंडमध्ये दरवर्षी एप्रिल महिन्यात थाई नववर्षाच्या स्वागतासाठी सॉन्गक्रान फेस्टिव्हल साजरा केला जातो. या जगप्रसिद्ध फेस्टिव्

हॉलिडे... कल्पनेतला आणि प्रत्यक्षातला...
8 mins, read

हॉलिडे... कल्पनेतला आणि प्रत्यक्षातला...

Published in Maharashtra Times 18th October 2026 ...तुमच्या यादीतल्या पहिल्या रेस्टॉरंटपाशी तुम्ही येता आणि कळतं की तिथे 90 मिनिटांचं वेटिंग आहे. तिथे रिझर्व्हेशनची फॅसिलिटी नसल्याने तुम्ही ते केले

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!