We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
We're open, now in Nagpur, HSR Layout (Bengaluru) & Salt Lake (Kolkata). Locate Us
USA

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

दिव्यमया! प्रसन्नमया! महानया! म्हणजेच देवांचंही लाडकं केरळ

12 mins. read
Veena Patil
Veena Patil
12 Mins Read
October 30, 2026
October 30, 2026

Quick Summary

केरळला भेट देताना निसर्गाइतकंच तिथल्या लोकांच्या विचारांमुळे आणि पर्यटनविश्वामुळेही कौतुक वाटतं.

बॅकवॉटर्समध्ये हाऊसबोट सफर करा, कारण पूर्वीच्या वाहतुकीच्या बोटी आज संपूर्ण अनुभव आणि व्यवसाय उभा करतात.

नारळ, मसाल्यांची शेती, आयुर्वेद आणि वेलनेस यांना पर्यटनाशी जोडून केरळने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मुन्नारमधील चहाच्या मळ्यांसह टी म्युझियम, मट्टुपेट्टी डॅम आणि इको पॉइंट ही ठिकाणं अवश्य पाहा.

थेक्कडी आणि पेरियारमध्ये पेरियार टायगर रिझर्व्ह आणि लेकवरील बोटिंगदरम्यान हत्ती, गौर किंवा हरणं दिसू शकतात.

पर्यटन वाढवताना पर्यावरणाचा समतोल, स्वच्छता आणि वाहतूक यांसारखी आव्हानं लक्षात घेणं गरजेचं आहे.

Published in Sakal Saptarang 1st November 2026

निसर्गाला दिलेली पर्यटनाची दिशा!

जगात निसर्गाने सौफ्लदर्य बहाल केलेली अनेक ठिकाणं आहेत. पण त्या सौंदर्याचं संधीत रूपांतर करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी ठिकाणं तुलनेने कमी आहेत. त्यातलं एक म्हणजे केरळ. म्हणूनच केरळला गेल्यावर मला तिथल्या निसर्गाइतकंच कौतुक वाटतं ते तिथल्या माणसांचं, त्यांच्या विचारांचं आणि त्यांनी उभ्या केलेल्या पर्यटनविश्वाचं.

‌‘गॉड्स ओन कंट्री!‌’ खरं तर किती साधे शब्द... पण या तीन शब्दांनी केरळला जगभर ओळख मिळवून दिली. निसर्गाने केरळला भरभरून दिलंय. समुद्र, डोंगर, जंगलं, नद्या, बॅकवॉटर्स, नारळाच्या बागा, मसाल्यांची शेती... पण निसर्गाची देणगी मिळणं ही एक गोष्ट आणि तिचं जतन करून त्यातून अर्थव्यवस्था उभी करणं ही दुसरी. केरळने या दुसऱ्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलंय.

केरळच्या बॅकवॉटर्समध्ये हाऊसबोटमधून फिरताना माझ्या मनात नेहमी हा विचार येतो. पूर्वी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींचं आज किती सुंदर पर्यटन अनुभवात रूपांतर झालंय! त्या एका अनुभवाभोवती किती व्यवसाय उभे राहिलेत. बोट चालवणारे, स्वयंपाक करणारे, लोकल गाईड्स, मच्छीमार, भाजीपाला पुरवणारे, हँडिक्राफ्ट्स  विकणारे. एका पर्यटकाच्या येण्याने किती घरांची चूल पेटते!

केरळने नारळालाही आपल्या ओळखीचा भाग बनवलं. खाद्यसंस्कृतीपासून हँडिक्राफ्ट्सपर्यंत आणि आयुर्वेदापासून वेलनेसपर्यंत अनेक गोष्टी पर्यटनाशी जोडल्या. कथकली, मोहिनीअट्टम, कलारिपयट्टू या कला, स्थानिक परंपरा पर्यटकांसमोर आणल्या. जे त्यांच्याकडे आधीपासून होतं, त्याचं मूल्य ओळखून ते जगासमोर मांडलं. आजच्या धावपळीच्या जगात, सतत धावणाऱ्या माणसाला आता थोडं थांबायचंय आणि केरळ त्याला ती संधी देतं. मुन्नारमधील टी इस्टेट्स, थेक्कडीची जंगलं, अलेप्पीचे बॅकवॉटर्स, कोवलमचे समुद्रकिनारे ही ठिकाणं आपल्याला शांतपणे स्वतःला वेळ देऊ देतात. इथे फिरताना कळतं की प्रत्येक अनुभवाला वेग असलाच पाहिजे असं नाही. काही अनुभव शांतपणे मनात साठवायचे असतात.

अर्थात केरळमध्ये सगळंच आदर्श आहे असं नाही. वाढतं पर्यटन, पर्यावरणाचा समतोल, स्वच्छता, वाहतूक, हवामानातील बदल अशी अनेक आव्हानं तिथेही आहेत. कारण पर्यटन वाढवणं जितकं महत्त्वाचं, तितकंच त्या वाढीचे परिणाम समजून घेणंही गरजेचं आहे. आज पर्यटकांना आकर्षित करणारा निसर्ग उद्याही तसाच राहील याची काळजी घेतली नाही, तर विकासाला अर्थ काय उरणार?

... आणि मग मला आपला महाराष्ट्र आठवतो आणि प्रश्न पडतो, आपल्याकडे कोकण आहे, सह्याद्री आहे, विदर्भातील जंगलं आहेत, किल्ले आहेत, समृद्ध संस्कृती आहे. मग आपण महाराष्ट्राची पर्यटन ओळख तितक्या ताकदीने का उभी करू शकत नाही? पर्यटन म्हणजे केवळ पर्यटकांची संख्या वाढवणं नाही, तर स्थानिक माणसांना रोजगार, त्यांच्या कलेला बाजारपेठ, छोट्या व्यवसायांना संधी आणि संपूर्ण प्रदेशाला आर्थिक बळ देणं आहे. त्यासाठी नुसतं सौंदर्य असून चालत नाही, दूरदृष्टी, नियोजन, पायाभूत सुविधा आणि सातत्य लागतं.

म्हणूनच केरळबद्दल बोलताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते. निसर्गाने आपल्याला काय दिलंय हे महत्त्वाचं आहेच, पण त्या देणगीचं आपण काय केलंय, हा त्याहून मोठा प्रश्न आहे. कारण निसर्ग सौंदर्य देतो, पण त्या सौंदर्याला भविष्य देण्याची जबाबदारी मात्र आपली असते.

 

प्रत्येक कोपऱ्यात एक गोष्ट!

पश्चिम घाट आणि अरबी समुद्राच्या मधोमध वसलेला, हिरवाईने नटलेला एक चिंचोळा भूभाग म्हणजे केरळ! सुमारे 590 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, 44 नद्या, बॅकवॉटर्सचं विस्तीर्ण जाळं आणि दक्षिण भारतातील सर्वांत उंच शिखर अनामुडी... या एवढ्याशा प्रदेशात धुक्याने वेढलेले डोंगर, घनदाट जंगलं आणि सोनेरी समुद्रकिनारे असं कितीतरी वैविध्य सामावलेलं आहे.

मुन्नार: समुद्रसपाटीपासून सुमारे 1,600 मीटर उंचीवर वसलेलं मुन्नार म्हणजे धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या हिरव्यागार चहाच्या मळ्यांचं विस्तीर्ण साम्राज्य! टी म्युझियम, मट्टुपेट्टी डॅम, इको पॉइंट ही इथली प्रसिद्ध ठिकाणे. इथल्या एरविकुलम नॅशनल पार्कमध्ये दक्षिण भारतातील सर्वांत उंच शिखर असलेल्या अनामुडीच्या परिसरात तुम्हाला दुर्मिळ असा निलगिरी ताहर दिसू शकतो. दर 12 वर्षांनी या डोंगरांवर नीलकुरिंजीची निळी-जांभळी फुलं उमलतात आणि संपूर्ण परिसर निळ्या रंगाने न्हाऊन निघतो. याचा पुढचा बहर 2030 मध्ये अपेक्षित आहे.

थेक्कडी आणि पेरियार: थेक्कडी हे भारतातील प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्यांपैकी एक असलेल्या पेरियार टायगर रिझर्व्हसाठी ओळखलं जातं. 1895 मध्ये मुल्लापेरियार डॅमचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इथल्या लेकची निर्मिती झाली. या लेकमध्ये बोटिंग करताना काठावर हत्ती, गौर किंवा हरणं पाणी पिताना दिसू शकतात. जवळच असलेल्या कुमिलीमधील मसाल्यांच्या बागांमध्ये वेलची, मिरी आणि दालचिनीचा सुगंध दरवळत असतो. इथे संध्याकाळी तुम्ही कथकली आणि कलारिपयट्टूचे प्रयोग पाहू शकता, जे कलाविष्कार पाहताना आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होतो!

फोर्ट कोची: फोर्ट कोची म्हणजे जणू इतिहासाचं एक जिवंत पुस्तकच! समुद्रकिनाऱ्यावर उभी असलेली आणि पाण्यात वर-खाली होणारी भलीमोठी चायनीज फिशिंग नेट्स, वास्को द गामाला प्रथम दफन करण्यात आलेलं सेंट फ्रान्सिस चर्च आणि 1568 मध्ये बांधलेलं परदेसी सिनेगॉग... इथल्या प्रत्येक वास्तूमागे एक गोष्ट आहे. मट्टनचेरी डच पॅलेसमध्ये रामायणातील प्रसंग चित्रित करणारी सुंदर भित्तिचित्रं पाहायला मिळतात. कोचीमधील आर्ट कॅफेज्‌‍, बुटीक स्टोअर्स आणि आयलंड्सना जोडणारी भारतातील पहिली वॉटर मेट्रो यामुळे शहराला एक वेगळीच रंगत आली आहे.

अलेप्पीचे बॅकवॉटर्स: 'पूर्वेकडचं व्हेनिस' म्हणून ओळखलं जाणारं अलेप्पी हे केरळच्या बॅकवॉटर्सचं केंद्र आहे. एकेकाळी तांदळाची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या केट्टुवल्लममधून संथ गतीने प्रवास करताना हिरवीगार भातशेती, गावातली घरं आणि वाऱ्यावर डोलणारी नारळाची झाडं पाहता येतात. दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट महिन्यात पुन्नमडा लेकमध्ये नेहरू ट्रॉफी बोट रेस रंगते. 1952 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या भेटीनंतर सुरू झालेली ही शर्यत आज एक मोठा सोहळा बनली आहे. अवाढव्य स्नेक बोट्स, एकाच लयीत वल्ही चालवणारे नाविक आणि जल्लोष करणारे प्रेक्षक... हा अनुभव आणखीनच अविस्मरणीय बनवतात.

वर्कला, कोवलम आणि त्रिवेंद्रम: केरळच्या दक्षिणेकडील भागात निसर्गाने सूर्यास्ताची काही सुंदर दृश्यं जणू राखूनच ठेवली आहेत. वर्कलाचे लालसर लॅटराइट क्लिफ्स्‌‍ अरबी समुद्राच्या दिशेने नाट्यात्मकरित्या खाली उतरतात, तर कोवलमचे चंद्रकोरीच्या आकाराचे बीचेस आणि लाइटहाऊस संध्याकाळ निवांत घालवण्यासाठी अगदी योग्य आहेत. राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरममध्ये भव्य पद्मनाभस्वामी टेम्पल, नेपियर म्युझियम आणि राजा रविवर्मा आर्ट गॅलरी यांतून त्रावणकोरच्या राजवैभवाची ओळख होते. जवळच कोल्लम जिल्ह्यातील जटायू अर्थ सेंटरमध्ये रामायणातील जटायूच्या बलिदानाला समर्पित, 200 फूट लांबीचं जगातील सर्वांत मोठं पक्षीशिल्प पाहायला मिळतं.

अथिरापल्ली - केरळचा गगनभेदी नायगारा: सुमारे 80 फूट उंचीवरून कोसळणारा आणि मोठ्या परिसरात पसरलेला अथिरापल्ली वॉटरफॉल हा चालक्कुडी नदीवरील केरळमधील सर्वांत मोठा वॉटरफॉल आहे. अनेक जण त्याला प्रेमाने 'भारतातील नायगारा' म्हणतात. घनदाट हिरव्यागार रेनफॉरेस्टस्‌‍च्या पार्श्वभूमीवर कोसळणाऱ्या या वॉटरफॉलला ‌‘बाहुबली‌’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे देशभरात विशेष प्रसिद्धी मिळाली. इथून काही किलोमीटर अंतरावर वाझाचल फॉल्सही आहे. त्यात गुरुवायूरच्या पूजनीय श्रीकृष्ण मंदिराच्या शांत आणि भक्तिमय दर्शनाची भर घातली, तर सेंट्रल केरळचा प्रवास निसर्गसौंदर्य आणि आध्यात्मिक अनुभव यांचा सुंदर संगम ठरतो.

 

आयुष्यात एकदा तरी...हे करायचंय!

  • अलेप्पीच्या हाऊसबोटमध्ये एक रात्र घालवायचीय.
  • ट्रॅडिशनल आयुर्वेदिक मसाजचा आनंद घ्यायचाय.
  • पेरियार लेकमध्ये बोटिंग करताना हत्ती पाहायचेत.
  • कथकलीचा मनमोहक प्रयोग पाहायचाय.
  • पारंपरिक साद्या फीस्टचा आस्वाद घ्यायचाय.
  • कुमिलीमध्ये सुगंधी मसाल्यांची खरेदी करायचीय.
  • अथिरापल्ली फॉलच्या पाण्याचे तुषार चेहऱ्यावर घ्यायचेत.
  • वर्कला क्लिफवरून सूर्यास्त पाहायचाय.
  • स्नेक बोट रेसमध्ये जल्लोष करायचाय.
  • मुन्नारच्या टी इस्टेट्समध्ये गरम चहाचा आस्वाद घ्यायचाय.
  • फोर्ट कोचीमधील चायनीज फिशिंग नेट्स पाण्यात जाताना पाहायचीयेत.

 

लाइट्स कॅमेरा ट्रॅव्हल...

केरळच्या सौंदर्याने भारतभरातील चित्रपट निर्मात्यांना नेहमीच आकर्षित केलं आहे. इथल्या निसर्गदृश्यांमध्ये एक वेगळीच सिनेमॅटिक जादू आहे. एस. एस. राजामौली यांच्या ‌‘बाहुबली : द बिगिनिंग‌’ या भव्य ब्लॉकबस्टर चित्रपटात अथिरापल्ली फॉल हा तरुण नायक ज्या प्रचंड फॉलवर चढण्याचं स्वप्न पाहतो, तो आयकॉनिक फॉल म्हणून दिसतो. मणिरत्नम यांच्या ‌‘गुरू‌’ चित्रपटातील पावसात चित्रित झालेलं ‌‘बरसो रे‌’ हे गाणंही याच फॉलचं सौंदर्य खुलवून दाखवतं. मल्याळम चित्रपट 'कुंबलंगी नाइट्स'मधूनही केरळची एक सुंदर, हृदयस्पर्शी झलक पाहायला मिळते. कोचीच्या जवळच्या एका छोट्याशा मासेमारी करणाऱ्या गावात राहणाऱ्या चार भावांची ही हळुवार आणि मनाला भिडणारी गोष्ट कुटुंब, प्रेम, नात्यांमधील जखमा भरून येणं आणि छोट्या छोट्या आनंदांचं महत्त्व सांगते. मल्याळम चित्रपटांच्या कथांमध्ये निसर्ग हा कथेतलं एक पात्र असतो. म्हणूनच संपूर्ण केरळ हेच एखाद्या चित्रपटाच्या सेटसारखं वाटतं.

 

वीणा वर्ल्ड सिनियर्स स्पेशल

गोल्डन इयर्स, ग्रँड सेलिब्रेशन!

केरळ म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी शरीराला आराम देणारं आणि मनाला शांतता देणारं असं एक परिपूर्ण हॉलिडे डेस्टिनेशन आहे. वीणा वर्ल्डच्या सिनियर्स स्पेशल केरळ टूर्समध्ये तुम्ही मुन्नारमधल्या हिरव्यागार टी इस्टेटचं सौंदर्य पाहू शकता, पेरियार लेकमध्ये शांतपणे बोटिंग करू शकता, अलेप्पीच्या बॅकवॉटर्समधून हाऊसबोटने फेरफटका मारायला जाऊ शकता, कथकली नृत्य पाहू शकता आणि फोर्ट कोचीच्या इथे प्रसिद्ध चायनीज फिशिंग नेट्स सुद्धा पाहू शकता. या टूरमध्ये तुम्हाला तुमच्यासारख्याच प्रवासाची आवड असलेल्या, नव्या मित्रमैत्रिणींची सोबत मिळेल. शिवाय प्रत्येक लहानसहान गोष्टीची काळजी घेण्यासाठी टूर मॅनेजर सोबत आहेच. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षण मनापासून अनुभवता येईल. मग वाट कसली पाहताय? चला देवभूमी केरळमध्ये, आयुष्याचा मनमुराद आनंद घ्यायला!

 

अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं!

  • केरळमध्ये 44 नद्या आहेत. त्यांपैकी 41 नद्या पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळतात, तर फक्त तीन नद्या पूर्वेकडे वाहतात.
  • कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट हा 2015 मध्ये जगातील पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारा पहिला एअरपोर्ट ठरला.
  • नैऋत्य मोसमी पावसाचं भारतातील आगमन साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या तारखेला केरळमधून होतं.
  • मुन्नारच्या डोंगरांवर दर 12 वर्षांनी नीलकुरिंजीची फुलं बहरतात.
  • 1991 मध्ये केरळ हे भारतातील संपूर्ण साक्षरतेचा दर्जा प्राप्त करणारं पहिलं राज्य ठरलं.
  • कथकली कलाकारांना आपला मेकअप करण्यासाठी अनेक तास लागू शकतात.
  • वास्को द गामाचा मृत्यू 1524 मध्ये कोची येथे झाला. त्याला सुरुवातीला फोर्ट कोचीतील सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये दफन करण्यात आलं.
  • केरळमधील केट्टुवल्लम नावाच्या हाऊसबोट्सचा वापर पूर्वी बॅकवॉटर्समधून अनेक टन तांदूळ आणि मसाल्यांची वाहतूक करण्यासाठी केला जात असे.
  • केरळमधील प्रत्येक स्नेक बोटमध्ये 100 हून अधिक नाविक असू शकतात.
  • कलारिपयट्टू ही केरळची प्राचीन युद्धकला आजही प्रचलित असलेल्या सर्वांत जुन्या युद्धकलांपैकी एक मानली जाते.

 

स्वागतम्‌‍ केरळम! चला वीणा वर्ल्डसोबत...

तुम्हाला तुमची केरळची गोष्ट लिहायची असेल तर वीणा वर्ल्डकडे आहेत कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍, कॉर्पोरेट अँड माइस (MICE) टूर्स, ग्रुप टूर्स आणि वुमन्स स्पेशल टूर्स असे विविध पर्याय!

कस्टमाईज्ड टूर्स: कुणाला मुन्नारच्या धुक्याने वेढलेल्या चहाच्या मळ्यांमध्ये निवांत सकाळ घालवायची असते, तर कुणाला कोवलमच्या समुद्रकिनाऱ्यावर आराम करायचा असतो. अशा वेगवेगळ्या आवडीनिवडींसाठी वीणा वर्ल्डचे कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍ अगदी योग्य आहेत. चार शहरांचा समावेश असलेली 6 दिवसांची ‌‘केरळ हायलाइट्स‌’ किंवा ‌‘रोमँटिक केरळ‌’ 8 दिवसांची ‌‘हिल्स, बीचेस अँड बॅकवॉटर्स ऑफ केरळ‌’ किंवा छोटेखानी 4 दिवसांची ‌‘मुन्नार अलेप्पी‌’ किंवा ‌‘वायनाड विथ पूल व्हिला‌’ अशा ऑप्शन्सपैकी तुमच्या आवडीचा ऑप्शन निवडा आणि आपल्या पद्धतीने केरळचा आनंद घ्या.

कॉर्पोरेट ट्रॅव्हल (MICE): व्यवसायाच्या निमित्ताने मीटिंग प्लॅन करायची आहे आणि त्याच वेळी टीमला थोडा विरंगुळाही हवाय? तर माइस (MICE) टूर्स हा योग्य ऑप्शन आहे. कॉर्पोरेट मीटिंग्ज, इन्सेंटिव्ह ट्रॅव्हल, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्सचं नियोजन करण्यासाठी वीणा वर्ल्डची माइस (MICE) टीम मदत करते. तुमच्या केरळमधल्या कॉर्पोरेट प्रवासाला कोचीमधील बिझनेसचं वातावरण, अलेप्पीमधील हाऊसबोटवरची संध्याकाळ किंवा मुन्नारमधील थंडगार वातावरणातला निवांत मुक्काम यांची जोड देता येते. कामाच्या निमित्ताने सुरू झालेल्या प्रवासातून तुम्ही केरळच्या सुंदर आठवणी घेऊन घरी परतू शकता.

ग्रुप टूर्स: पहिल्यांदाच केरळला जाताय आणि अनेक प्रश्न असतील, तरवीणा वर्ल्डच्या ऑल-इन्क्लुसिव्ह ग्रुप टूर्स हा बेस्ट ऑप्शन आहे. उत्कृष्ट नियोजन, प्लॅन्ड आयटिनरी आणि अनुभवी टूर मॅनेजरची साथ यामुळे तुम्ही आरामात प्रवासाचा आनंद घेऊ शकता. चार शहरांचा समावेश असलेल्या 6 दिवसांच्या ‌‘हायलाइट्स ऑफ केरळ‌’, 9 दिवसांच्या ‌‘वंडर्स ऑफ केरळ‌’, 11 दिवसांच्या ‌‘बेस्ट ऑफ केरळ‌’ किंवा 12 शहरांचा समावेश असलेल्या 15 दिवसांच्या ‌‘ऑल ऑफ केरळ‌’ यांपैकी तुमच्या आवडीचा पर्याय निवडा. या टूर्समध्ये कोची फोर्ट, मुन्नार, पेरियार, अलेप्पी बॅकवॉटर्स आणि कोवलमचे बीचेस अशा आकर्षणांचा समावेश आहे. केरळसोबत तामिळनाडूही पाहायचंय? मग 8 दिवसांची ‌‘त्रिवेंद्रम कन्याकुमारी रामेश्वरम मदुराई‌’ ही टूर निवडा.

वुमन्स स्पेशल टूर्स: प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या आनंदासाठी एक ब्रेक मिळायलाच हवा! वीणा वर्ल्डच्या 6 आणि 9 दिवसांच्या वुमन्स स्पेशल केरळ टूर्समध्ये अलेप्पीच्या बॅकवॉटर्समधून बोटिंग करा, मुन्नारच्या टी इस्टेट्समध्ये फेरफटका मारा आणि समविचारी मैत्रिणींसोबत कथकली व कलारिपयट्टूचे प्रयोग पाहा. उत्तम प्लॅनिंग, टूर मॅनेजरची सोबत आणि प्लॅन्ड आयटिनरी यामुळे केरळमधील प्रत्येक क्षण तुम्हाला मनापासून अनुभवता येईल. तेव्हा तुमच्या आवडीचा पर्याय निवडा आणि केरळच्या संस्मरणीय आठवणींच्या दिशेने पहिलं पाऊल टाका!

 

वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर

केरळ म्हणजे डोलणारी नारळाची झाडं, धुक्याच्या दुलईत हरवलेले चहाचे मळे, हवेत दरवळणारे सुगंधी मसाले आणि संथपणे वाहणारे बॅकवॉटर्स! पण केरळचा खरा आनंद अनुभवायचा, तर इथला इतिहास, संस्कृती आणि त्यामागच्या रंजक गोष्टीही जाणून घ्यायला हव्यात. आणि हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. कुठे मसाल्यांची उत्तम खरेदी करता येईल, सूर्यास्ताचं सुंदर दृश्य कुठून पाहता येईल, दिवसभर फिरून आल्यावर कुठे आरामात राहता येईल आणि गरमागरम भारतीय जेवणाचा आस्वाद कुठे घेता येईल, हे सारं सांगायला, मी आहे ना! कारण प्रवासात तुम्ही मनसोक्त फिरावं, नवीन अनुभव घ्यावेत आणि छान आठवणी घेऊन परतावं, हीच माझी इच्छा असते ! जेव्हा अलेप्पीच्या बॅकवॉटर्समध्ये हाऊसबोट संथपणे पुढे सरकत असते, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, तोच माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. आता तुम्हीही या माझ्यासोबत अनेकांनी अनुभवलेलं केरळ पाहायला! चलो, बॅग भरो, निकल पडो!

 

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
सुपरमार्केट सफारीज्‌
12 mins, read

सुपरमार्केट सफारीज्‌

Published in Maharashtra Times 1st November 2026 ...आपल्या घरातील चार जणांना सहज पुरेल अशा पदार्थावर ‌‘सिंगल सर्व्हिंग‌’ असं लेबल लावलेलं असतं. सुरुवातीला हे काहीसं गोंधळून टाकणारं असतं, पण एकदा का

नवाबांचे शहर
12 mins, read

नवाबांचे शहर

Published in Loksatta Lokrang 1st November 2026 ...कुपी उघडताच मला एकदम मृद्गंधाची आठवण झाली. तापलेल्या उन्हाने शरीराची काहिली होत असते. तशात पावसाचा शिडकावा झाला की कसा धुंद करणारा मातीचा वास येतो

इंटेलिजंट सिटीज्‌
12 mins, read

इंटेलिजंट सिटीज्‌

Published in Maharashtra Times 25th October 2026 ...एका जुन्या पायवाटेने नवीन रचनेचा हिस्सा व्हायला नकार दिला, आणि याचमुळे शहरातील सर्वात आयकॉनिक इंटरसेक्शन्स अस्तित्वात आली...   काही

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!