Published in loksatta Lokrang. Date 23rd August, 2026
...लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करणाऱ्या देशांमध्ये आईसलँडचा समावेश होतो. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला कुटुंबीय एकमेकांना पुस्तके भेट देतात. या सुंदर परंपरेला...
गेल्या वर्षी मी एका बारशाला गेले होते. आम्ही जमलेले सगळेजण गप्पा मारत होतो. थोड्या वेळाने नामकरणाचा तो क्षण आला. माझ्या मनात विचार आला... पाळण्यात झोपून इकडेतिकडे बघणाऱ्या या बाळाला आसपास काय सुरू आहे याची काहीच कल्पना नाही. इथे जे नाव उच्चारलं जाईल ते त्याला आयुष्यभर साथ करणार आहे. असं असूनही या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयात त्याला मतच नाही. अर्थात, आईवडिलांनी नाव ठेवताना काहीएक विचार केलेला असतो हे खरं, पण अजिबातच न शोभणारं किंवा अर्थहीन नाव असेल तर काय? एका देशाने यावर बराच विचार केला आणि नामकरणासाठी सुसंगत व्यवस्था उभी केली. या देशात नेमिंग कमिटी म्हणजे नामकरण समिती आहे. या देशाचं नाव आहे आईसलँड. इथे नावांना मान्यता देणारी ऑफिशिअल नेमिंग कमिटी आजही कार्यरत आहे. या कमिटीने मान्य केलेल्या नावांच्या यादीबाहेरचं नाव ठेवायचं असेल, तर ते अप्रुव्ह करून घेण्यासाठी रीतसर अर्ज करावा लागतो. आईसलँडिक भाषेचं संवर्धन हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे मग नावांची रचना, व्याकरणदृष्ट्या त्याची योग्यायोग्यता तपासणे, सांस्कृतिक ओळख जपणे आणि नावामुळे किंवा त्याच्या अर्थामुळे एखाद्याला अपराधी किंवा लाजिरवाणे वाटणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी या समितीची. विशेष म्हणजे आईसलँडमध्ये सगळ्यांनाच, अगदी तिथल्या पंतप्रधानांनाही पहिल्या नावानेच हाक मारण्याची प्रथा आहे. त्यामुळे रोजच्या जगण्यात नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच कोणावरही अन्याय होणार नाही, संस्कृतीचे धागे जपले जातील आणि नावाभोवतीचे अभिमानाचे कोंदण कायम राहील, याची काळजी ही समिती घेते.
यातून आईसलँडमधील लोक त्यांचा वारसा, संस्कृती जपत असताना त्यांची ही नावं उच्चारताना आपल्या मात्र जिभेचे तुकडे पडण्याची वेळ येते. शिवाय नावं उच्चारण्यापूर्वी स्वरयंत्राला त्या नावांचा रियाज करावा लागतो, तो वेगळाच! इथून आल्यावर आपल्याला महाकाय ट्रकवरून लांगयोकुत्ल ग्लेशियरची सैर करण्याचा अनुभव सांगावासा वाटतो. रेनिस्फ्याराच्या काळ्या वाळूच्या बीचवर केलेली सैर सांगायची असते. सेल्यालँड्सफॉस वॉटरफॉलच्या पार्श्वभूमीवर भटकत असताना आपण गेरूआ गाणं कसं गुणगुणलं तेही सांगायचं असतं. एवढंच नव्हे तर, सोल्हेमासँदुर या विमानाचे अवशेष असलेल्या ठिकाणावर उभे राहून फोटो कसा काढला हेही सांगायचं असतं. हा सगळा अनुभव सांगताना ही भन्नाट नावं तर उच्चारावी लागतातच ना!
आईसलँडची खासियत म्हणजे इथलं निसर्गसौंदर्य. भूगोलाच्या भाषेत या आयलंडचं वय साधारण 2 कोटी वर्षं आहे. तुलनेने तरूण असलेल्या या आयलंडवर निसर्गाचे सगळे विभ्रम पाहता येतात. त्यात व्होल्कॅनो, ग्लेशियर्स, गीझर्स, वॉटरफॉल्स, हॉट स्प्रिंग्ज आणि काळ्या वाळूचे समुद्रकिनारे असे वैविध्य आहे. अटलांटिक महासागराच्या मध्यावर जिथे नॉर्थ अमेरिकन आणि युरेशियन प्लेट्स एकमेकांपासून दूर होतात, तिथे आईसलँड आहे. हा भाग भूकंप आणि ज्वालामुखीप्रवण असल्याने आईसलँडची भूरचना सतत बदलत असते. त्यावरून आईसलँडला ‘लँड ऑफ आईस अँड फायर’ म्हणजेच ‘आग आणि बर्फाची भूमी’ म्हणतात. ‘आईसलँड’ नावात गारवा असला तरी उन्हाळ्यात या आयलंडवर हिरवाई पसरते. त्या मोसमात गवताळ प्रदेश, शेवाळं पसरलेली लाव्हाची मैदानं आणि रानफुलं यांनी बहुतांश प्रदेशाचं रुप पालटतं. त्याच्या अगदी विरुद्ध स्थिती ‘ग्रीनलँड’ या शेजारी देशाची आहे. हा प्रदेश पूर्णपणे गोठलेला असतो. त्यांच्या विजोड नावांची करामत ही इथे येऊन स्थायिक झालेल्यांनी इतरांची दिशाभूल करण्यासाठी खेळलेली धूर्त खेळी आहे.
अजूनही न उमगलेलं आईसलँडचं निसर्गसौंदर्य
आईसलँड हा नैसर्गिक सौंदर्याचे विविध आविष्कार दाखवणारा देश म्हणून पर्यटकांना भावतो. हा देश म्हणजे निसर्गाच्या जिवंत चमत्कारांचं एक खुलं दालन आहे. निव्वळ ‘जगावेगळं’!
इथली भटकंती सुरू होते ती ‘गोल्डन सर्कल’ या प्रसिद्ध प्रवासी मार्गावरून. ‘थिंगव्हेलिर’ नॅशनल पार्कमध्ये इतिहास आणि भौगोलिक विविधता यांचा अनोखा संगम आहे. इथे आपण एक पाय युरेशियन टेक्टॉनिक प्लेटवर आणि दुसरा नॉर्थ अमेरिकन प्लेटवर ठेवून उभे राहू शकतो. तिथून पुढे आपण ‘स्ट्रोकूर गीझर’ या गरम पाणी हवेत वर फेकणाऱ्या प्रवाहापाशी येतो. मग गुलफॉस वॉटरफॉलचा नाद मन भरून टाकतो. साहसी पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी ‘वॅटनायोकुत्ल ग्लेशियर’ म्हणजे नंदनवनच. युरोपातील ही सगळ्यात मोठी हिमनदी. शतकानुशतकांपासून अस्तित्वात असलेल्या इथल्या बर्फाच्या चादरीवरून चालण्याची मजा काही औरच आहे. स्नो मोबाईलवरून झिपिंगचा थरार अनुभवता येतो किंवा गोठलेल्या, काचमहालासारख्या चकाकत्या निळ्याशार बर्फाळ गुहांची सैरही करता येते.
वॉटरफॉल्स तर इथे सर्वत्र आहेत. त्यातल्या स्कोगाफॉसपाशी बॉलिवूड चित्रपटातील दृश्याला साजेसे फोटोज् काढता येतात. सेल्यालँड्सफॉस येथे पाण्याच्या पडद्यामागून चालण्याचा रोमांचक अनुभव घेता येतो. उत्तरेकडे युरोपमधील सर्वात भव्य डेटिफॉस वॉटरफॉल पाहायला मिळतो. दक्षिणेकडील रेनिस्फ्याराच्या किनाऱ्यावरील काळ्याकभिन्न वाळूचा सुंदर किनारा पाहता येतो. ज्वालामुखीमुळे पसरलेल्या लाव्हाच्या प्रदेशातून सैर करता येते. ज्वालामुखीचे विवर जवळून पाहता येते. तसेच ज्वालामुखीच्या ताज्या उद्रेकातून तयार झालेल्या जमिनीवर पाऊल ठेवण्याची संधीही मिळते. ग्रिम्से आयलंडवर येऊन पायीच आर्क्टिक सर्कल ओलांडता येतं. इथे वन्यजीव संपदेचीही लयलूट आहे. खडकांवर घरटी बांधणारे पफिन पक्षी, हुसाविक किनाऱ्याजवळ दिसणारे महाकाय व्हेल मासे, खास ‘टोल्ट’ चालीसाठी प्रसिद्ध असलेला मोहक आईसलँडिक घोडा. आणि अर्थातच, जगप्रसिद्ध ब्लू लगून तर आहेच. लाव्हाने तयार झालेल्या जमिनीने वेढलेल्या दुधाळ-निळ्या उष्ण पाण्यात उतरून नैसर्गिक लक्झरी स्पा थेरपीचा अनुभव घेता येतो.
आईसलँड एकदम खास आहे!
आईसलँडचा सांस्कृतिक वारसाही समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. नवव्या शतकात इथे स्थायिक झालेल्या नॉर्स मंडळींनी त्यांच्यासोबत आणलेल्या समृद्ध मौखिक कथाकहाण्या पुढे 13 व्या आणि 14 व्या शतकात ‘आईसलँडिक सागा’ म्हणून लिखित स्वरूपात जतन करण्यात आल्या. शौर्य, संघर्ष, सूड, निसर्गाशी झुंज अशा अनेक पैलूंनी या कथा समृद्ध आहेत.
‘थिंगव्हेलिर’ हे आईसलँडमधील सगळ्यात महत्त्वाचं ऐतिहासिक ठिकाण आहे. इसवी सन 930 मध्ये या ठिकाणी ‘अलथिंगी’ या जगातल्या सगळ्यात जुन्या सांसदीय संस्थेची स्थापना केली. लोकशाहीने जिथे जन्म घेतला अशा ठिकाणी वावरण्याची, तसंच युरोप आणि अमेरिका यांना जोडणाऱ्या टेक्टॉनिक प्लेट्सवर एकाच वेळी उभे राहण्याची संधी देणारी अशी जगात फारच मोजकी ठिकाणं आहेत.
आईसलँडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या दोन्ही ऋतूंमध्ये एकदम भिन्न वातावरण असतं. जूनच्या सुरुवातीपासून जुलैच्या सुरुवातीपर्यंत सूर्य मावळतच नाही. मध्यरात्रीही आपण सोनेरी प्रकाशात ट्रेकिंग करू शकतो. तर हिवाळ्यात दिवस अवघ्या 2-3 तासांचा असतो. त्याचवेळी आकाशात ‘नॉर्दर्न लाइट्स’चा नजारा पाहता येतो. हिरव्या, जांभळ्या आणि गुलाबी रंगांच्या छटा आकाशात नृत्य करीत असतात आणि पर्यटक थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहतात.
आईसलँड हा केवळ निसर्गासाठीच नव्हे, तर आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांसाठीही ओळखला जातो. आजही सुमारे 40 टक्के आईसलँडवासी एल्फ्स या परीकथेतील पात्राचं किंवा अदृश्य लोकांचं अस्तित्व असल्याचं मानतात. त्यामुळे काही वेळा रस्त्यांचे मार्गही त्यांना त्रास होऊ नये म्हणून बदलले जातात. तब्बल 74 वर्षे इथे बिअरवर बंदी होती. तर आज 1 मार्च हा ‘बीअर डे’ म्हणून साजरा केला जातो.
पुस्तकांवर आईसलँडकरांचं विशेष प्रेम आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करणाऱ्या देशांमध्ये आईसलँडचा समावेश होतो. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला कुटुंबीय एकमेकांना पुस्तके भेट देतात. या सुंदर परंपरेला योलाबोकाफ्लोद किंवा ख्रिसमस बुक फ्लड असं म्हणतात. विशेष म्हणजे, बर्फाच्छादित थंडीतही वर्षभर आईसक्रीम खाण्याची त्यांची आवड कायम असते!
‘मॅक्डोनाल्ड्स’ने 2009 मध्ये आईसलँडमधून गाशा गुंडाळला. पण त्याने कोणाला काही फरक पडला नाही. आणखी एक सांगायचं तर इथल्या पोलिसांकडे बंदुका नसतात. त्यांची शस्त्रं कुलूपबंद असतात. ती बाहेर काढण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. पोलीस शस्त्रसज्ज असतील तर गुन्हेगारी वाढते, हिंसाचार होतो असं इथल्या लोकांना वाटतं.
भारतातील गजबजलेल्या शहरांची सवय असलेल्या आपल्यासाठी आईसलँड म्हणजे जणू एखाद्या वेगळ्याच विश्वात प्रवेश केल्यासारखा अनुभव असतो. शांत, सुरक्षित आणि निवांत. याच कारणामुळे गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळ ‘ग्लोबल पीस इंडेक्स’मध्ये जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून आईसलँड अग्रस्थानी राहिला आहे.
हिंदी चित्रपट शौकिनांना आईसलँड एकदम परिचयाचा वाटतो. ‘दिलवाले’ चित्रपटामधील ‘गेरुआ’ गाण्यात, शाहरुख खान आणि काजोल यांच्यामागे दिसणारे वॉटरफॉल्स, ग्लेशियर्स आणि काळ्या वाळूचे किनारे हे सगळे इथलेच. आज इथे येणाऱ्या अनेक भारतीय महिला काजोलच्या त्या आयकॉनिक लुकची पुनरावृत्ती म्हणून स्कोगाफॉस किंवा रेनिस्फ्यारा येथे साडी नेसून येतात.
आईसलँडमध्ये आपल्याला स्वतंत्रपणेही फिरता येतं किंवा नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क या स्कॅन्डिनेव्हियन देशांसोबतच्या सहलीतही त्याचा समावेश करता येतो. या देशांमध्ये विमानाने अवघ्या काही तासांत पोहोचता येतं.
वीणा वर्ल्डची खासियत
आईसलँडची सगळी वैशिष्ट्ये अनुभवता येतील अशाच पद्धतीने आम्ही वीणा वर्ल्डतर्फे तिथल्या प्रवासाचं नियोजन करतो. ग्लेशियर वॉक, ब्लू लगूनमधील रिलॅक्स्ड बाथ, गोल्डन सर्कल टूर, नॉर्दर्न लाईट्सचा नजारा... हे सारं काही आमच्या ट्रिप्समध्ये अंतर्भूत असतं. आईसलँडमधील स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासोबतच तिथल्या दंतकथांची मौजही अनुभवता येते. शिवाय मध्यरात्री तळपणाऱ्या सूर्याच्या प्रकाशात हॉट स्प्रिंग्जचा आनंद काही औरच असतो. या टूर्स तुमचा आईसलँडशी सर्वांगीण परिचय होईल याची दक्षता घेतात. पृथ्वीची अफाट ऊर्जा आणि निसर्गाचं शांत आणि नितांतसुंदर रूप यांचा अनोखा संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो. इतकी मोहक पार्श्वभूमी असल्यामुळेच बॉलिवूडलाही इथे येऊन नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. जर तुम्हीही नेहमीच्या प्रवासापलीकडच्या भन्नाट अनुभवाच्या शोधात असाल तर अग्नी, बर्फ आणि निसर्ग यांच्या जादुई अस्तित्वाने थक्क करणारा आईसलँड तुमचं स्वागत करण्यास उत्सुक आहे.
















































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.