Contact Us

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

डिसेंबरनंतर कुठे?

12 mins. read
Neil Patil
Neil Patil
12 Mins Read
November 20, 2026
November 20, 2026

Quick Summary

डिसेंबरनंतर पर्यटकांची गर्दी ओसरते आणि मग निसर्गाच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार अद्भुत नैसर्गिक घटना सुरू होतात.

कंबोडियातील टोनले सॅपमध्ये मॉन्सूनमुळे मेकाँगचा पूर येऊन प्रवाहाची दिशा उलटते आणि सरोवर प्रचंड विस्तारते.

नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये अंगकोर वाटला भेट देण्यासाठी हवामान थंड आणि कोरडं असल्याने अनुभव सर्वाधिक सुखद होतो.

कच्छच्या रणात मॉन्सूननंतर पाणी रणात शिरून पावसाळ्यात चमचमणारा पांढराशुभ्र प्रदेश तयार होतो आणि ऑटममध्ये ते पाणी ओसरते.

धोलावीरा येथे प्राचीन हडप्पा संस्कृतीचे अवशेष आणि प्रगत जलव्यवस्थापन पाहायला मिळते, ज्यासाठी युनेस्कोने मान्यता दिली आहे.

साऊथ सेरेंगेटीमध्ये जानेवारी अखेर ते मार्चपर्यंत हजारो जीवांच्या हालचालींमुळे नैसर्गिक सोहळा पाहायला मिळतो.

Published in Maharashtra Times 22nd November2026

...त्यामुळे सिंहांसारख्या शिकारी प्राण्यांसमोर एकाच वेळी असंख्य पिल्लं असली, तरी त्यांना मर्यादित संख्येनेच शिकार करता येते. परिणामी, अनेक पिल्लं या धोक्यातून वाचतात...

‌‘मॉन्सून‌’ हा शब्द अरबी भाषेतील ‌‘मौसिम‌’ या शब्दापासून आला आहे. ‌‘मौसिम‌’ म्हणजे ऋतू किंवा हंगाम. शेकडो वर्षांपूर्वी हिंदी महासागरातून प्रवास करणाऱ्या खलाशांसाठी हे वारे म्हणजे जणू निसर्गाने आखून दिलेलं वेळापत्रकच होतं. उन्हाळ्यात वाहणारे वारे जहाजांना पूर्वेकडून भारताच्या दिशेने आणायचे, तर हिवाळ्यात वाहणारे विरुद्ध दिशेचे वारे त्यांना पुन्हा मायदेशी परत घेऊन जायचे. या निसर्गनियमांबाबत कुणी वाद घालत नसे. या विरुद्ध कोणी वागत नसे. सगळेजण योग्य सीझनची, ऋतूची वाट पाहत आणि मग प्रवासाला निघत.

या निसर्गाच्या दिनदर्शिकेचा विचार माझ्या मनात पुन्हा पुन्हा येतोय, तो डिसेंबरमध्ये भारतीयांच्या सुट्ट्यांचं जे काही चित्र दिसतं, त्यामुळे. आपल्यापैकी जवळजवळ सगळेच जण त्याच पंधरवड्यात, त्याच कारणाने आणि त्याच ठिकाणी फिरायला निघतात. आणि या धावपळीत आपण वर्षातला असा एक काळ अनुभवायचाच विसरून जातो, जेव्हा जगाचं सौंदर्य सर्वाधिक खुललेलं असतं. डिसेंबर सरला की पर्यटकांची गर्दी ओसरते आणि मग निसर्गाने कित्येक शतकांपूर्वीच ठरवून ठेवलेल्या वेळापत्रकानुसार काही अद्भुत गोष्टी घडू लागतात. अशाच सहा विलक्षण नैसर्गिक घटनांविषयी आज जाणून घेऊया!

उलट दिशेनं वाहणारा लेक: कंबोडियातील टोनले सॅप हे साऊथ ईस्ट एशियातील सर्वांत मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. वर्षभरातील जवळपास सहा महिने या सरोवराला मेकाँग नदीशी जोडणारा प्रवाह सरोवरातून बाहेरच्या दिशेने वाहतो. मात्र, मॉन्सूनच्या पावसामुळे मेकाँग नदीला पूर येतो आणि तिच्या पाण्याची पातळी वाढते, तेव्हा या प्रवाहाची दिशा चक्क उलटते! नदीचं पाणी पुन्हा सरोवराच्या दिशेने वाहू लागतं. त्यामुळे कोरड्या ऋतूत साधारण 2,500 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेलं हे सरोवर पावसाळ्यात तब्बल 15,000 चौरस किलोमीटरपर्यंत विस्तारतं. सरोवराच्या काठावर वसलेली गावंही जणू या पाण्याच्या लयीत तरंगू लागतात. ख्मेर साम्राज्याचा उदय आणि विस्तार याच नैसर्गिक चक्राभोवती झाला. या साम्राज्याच्या राजांनी सरोवराच्या उत्तरेला असलेल्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात आपली राजधानी अंगकोर वसवली. बाराव्या शतकाच्या सुरुवातीला राजा सूर्यवर्मन द्वितीय याने याच ठिकाणी भगवान विष्णूंना समर्पित असलेलं भव्य अंगकोर वाट मंदिर उभारलं. पुढे हे मंदिर बौद्ध धर्माचं पवित्र स्थळ बनलं. या मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारतातील प्रसंग अतिशय देखण्या शिल्पांमधून कोरलेले आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ इथल्या भेटीसाठी सर्वाधिक अनुकूल असतो. या महिन्यांमध्ये हवामान थंड आणि कोरडं असतं. मार्च इक्विनॉक्सच्या आसपास तर आणखी एक अद्भुत दृश्य पाहायला मिळतं. सूर्य अगदी मंदिराच्या मध्यवर्ती मनोऱ्याच्या वर उगवतो. जवळपास नऊशे वर्षांपूर्वी मंदिराची रचना करतानाच सूर्याच्या या विशिष्ट स्थानाचा विचार करून ही वास्तुरचना करण्यात आली होती!

दरवर्षी हिवाळ्यात नाहीसा होणारा समुद्र! गुजरातमधील कच्छमध्ये मॉन्सूनच्या काळात, अरबी समुद्राचं पाणी कच्छच्या रणात शिरतं आणि हा भूभाग एखाद्या उथळ, चमचमणाऱ्या सरोवराचं रूप धारण करतो. मात्र, ऑटम सरत जातो तसतसं पाणी हळूहळू ओसरू लागतं. उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि मागे उरतो तो क्षितिजापर्यंत पसरलेला शुभ्र मिठाचा थर! डोळ्यांना दिपवून टाकणारा हा पांढराशुभ्र प्रदेश म्हणजेच कच्छचं रण. धोर्डो गावाजवळ उभारलेल्या भव्य टेंट सिटीमध्ये दरवर्षी रण उत्सवाचं आयोजन केलं जातं. यंदाचा रण उत्सव 1 नोव्हेंबर 2026 ते 7 मार्च 2027 या कालावधीत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतील पौर्णिमेच्या आसपासच्या रात्री चंद्रप्रकाशात न्हाऊन निघणारं पांढरंशुभ्र रण एखाद्या चंदेरी स्वप्ननगरीसारखं भासतं.

याशिवाय रणाच्या परिसरात असलेल्या धोलावीरा येथे सुमारे 4,500 वर्षांपूर्वीच्या हडप्पा संस्कृतीतील एका प्रगत शहराचे अवशेष आजही पाहायला मिळतात. 2021 मध्ये युनेस्कोने या स्थळाचा वर्ल्ड हेरिटेज साइट्सच्या यादीत समावेश केला. धोलावीरा हे प्राचीन जलव्यवस्थापनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. आधीपासूनच कोरड्या असलेल्या या प्रदेशात पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासाठी तिथल्या लोकांनी भव्य जलाशय उभारले होते, वॉटर रिझर्व्हायर्स आणि वॉटर इंजिनिअरिंगची उत्तम व्यवस्था निर्माण केली होती.

जिथे वेळेचं भान ठेवून जन्म घेतात हजारो जीव! टांझानियामधील साऊथ सेरेंगेटीचा प्रदेश जानेवारी अखेरपासून मार्च महिन्यापर्यंत एका विलक्षण नैसर्गिक सोहळ्याचा साक्षीदार ठरतो. नोव्हेंबरमधील पावसाळ्यानंतर न्युटू परिसरातील हिरव्यागार, लुसलुशीत गवताळ मैदानांवर विल्डबीस्ट्‌‍सचे प्रचंड कळप येऊन दाखल होतात. त्यानंतर अवघ्या दोन-तीन आठवड्यांत तिथे तब्बल पाच लाखांपर्यंत पिल्लांचा जन्म होतो! फेब्रुवारीत एका दिवसात अंदाजे तब्बल आठ हजार पिल्लं जन्माला येतात. यामागे निसर्गाची एक व्यवस्था आहे. ही गवताळ मैदानं न्गोरोंगोरोच्या उंच पर्वतीय प्रदेशातून वाहत आलेल्या ज्वालामुखीय राखेपासून तयार झालेल्या सुपीक जमिनीवर वसली आहेत. या मातीतून उगवणारं लहान, मऊ गवत खनिजांनी समृद्ध असतं. त्यामुळे नुकत्याच जन्मलेल्या पिल्लांना दूध पाजणाऱ्या मादी विल्डबीस्ट्‌‍सना आवश्यक पोषण मिळतं. शिवाय संपूर्ण कळपातील माद्या जवळजवळ एकाच काळात पिल्लांना जन्म देतात. त्यामुळे सिंहांसारख्या शिकारी प्राण्यांसमोर एकाच वेळी असंख्य पिल्लं असली, तरी त्यांना मर्यादित संख्येनेच शिकार करता येते. परिणामी, अनेक पिल्लं या धोक्यातून वाचतात. हजारो वर्षांच्या नैसर्गिक उत्क्रांतीतून विकसित झालेली जगण्याची ही अफलातून रणनीती आहे.

दूरवरून आलेल्या थंडीमुळे बनलेली हिमशिल्पं! जपानमधील होक्काइडो आयलंडवर पडणाऱ्या बर्फामागे एक खास भौगोलिक कारण आहे. सायबेरियाकडून येणारे अतिथंड वारे जपानच्या समुद्रावरून प्रवास करताना तिथल्या तुलनेने उबदार पाण्यातील मॉइश्चर स्वतःमध्ये सामावून घेतात. हे वारे पुढे होक्काइडो आयलंडवर पोहोचतात आणि तिथे हिमवृष्टी सुरू होते. फेब्रुवारीपर्यंत सपोरो शहरात जमिनीवर साचलेल्या बर्फाची जाडी जवळपास एक मीटरपर्यंत पोहोचते. 1950 मध्ये स्थानिक शाळेतील काही विद्यार्थ्यांनी ओडोरी पार्कमध्ये बर्फाची सहा शिल्पं तयार केली. विशेष म्हणजे ज्या जागेवर शहरातील रस्त्यांवरून साफ केलेला बर्फ आणून टाकला जात असे, त्याच जागेवर ही शिल्पं उभारण्यात आली होती. ही शिल्पं पाहण्यासाठी तेव्हा जवळपास 50 हजार लोक आले होते. छोट्याशा कल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचं रूपांतर आज जगप्रसिद्ध सपोरो स्नो फेस्टिव्हलमध्ये झालं आहे. आता इथे दरवर्षी 20 लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. या उत्सवाचं 77वं पर्व 4 ते 11 फेब्रुवारी 2027 या काळात आयोजित केलं आहे.

नियोजनबद्ध शहर आणि अनियोजित साहित्यसोहळा!

जयपूरची स्थापना 18 नोव्हेंबर 1727 रोजी राजा सवाई जयसिंह द्वितीय यांनी केली. ते खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासकही होते. विद्वान वास्तुविशारद विद्याधर भट्टाचार्य यांच्या मदतीने त्यांनी जयपूरची रचना आखीवरेखीव आणि शिस्तबद्ध अशा ग्रिड पद्धतीने केली. त्यामुळे भारतातील सर्वांत प्राचीन नियोजनबद्ध शहरांमध्ये जयपूरची गणना होते. 1876 मध्ये ‌‘प्रिन्स ऑफ वेल्स‌’ यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जुन्या शहराला गुलाबी रंगाने रंगवण्यात आलं. राजस्थानी परंपरेत गुलाबी रंग हा आतिथ्य आणि पाहुणचाराचं प्रतीक मानला जातो. तेव्हापासून जयपूरला ‌‘पिंक सिटी‌’ म्हणून ओळखतात. आज या शहराचा ऐतिहासिक तटबंदीयुक्त भाग युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्सच्या यादीत समाविष्ट आहे. याच शहरातील सवाई जयसिंह यांनी उभारलेली वेधशाळा जंतरमंतरदेखील वर्ल्ड हेरिटेज साइट आहे. इथली 27 मीटर उंचीची दगडी सन डायल आजही अचूक वेळ सांगते.

या जयपूरमध्ये दर जानेवारीत एक गोष्ट घडते, ती म्हणजे जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल! तेव्हा या शहराचं रूपांतर एका भव्य ग्रंथालयात होतं. 2006 मध्ये अवघ्या 18 लेखकांच्या सहभागाने आणि मोजक्या वाचकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या साहित्य महोत्सवाने आज जगातील सर्वांत मोठ्या साहित्यिक सोहळ्यांपैकी एक म्हणून लौकिक मिळवला आहे. हा जगातील सर्वांत मोठा मोफत साहित्य महोत्सव आहे. या महोत्सवाचं 20वं पर्व 14 ते 18 जानेवारी 2027 या काळात हॉटेल क्लार्क्स आमेर येथे आयोजित करण्यात येणार आहे. यंदा महोत्सवाचं  20वं वर्ष आणि जयपूर शहराच्या स्थापनेची 300 वर्षं, असा दुहेरी योग जुळून येत आहे.

जानेवारी राजस्थानला भेट देण्यासाठीही सुखद काळ असतो. सकाळचं हवामान आल्हाददायक, तर दुपारचं कोवळ्या उन्हात न्हालेलं असतं. अशा वेळी या ऐतिहासिक शहरात फेरफटका मारत, जगभरातील लेखक, विचारवंत आणि साहित्यप्रेमींच्या गप्पा-चर्चांमध्ये सहभागी होता येतं.

मुखवटा धारण करणारं शहर: हिवाळ्यात व्हेनिसचं व्यक्तिमत्त्वच बदलून जातं. पर्यटक विरळ होतात, कॅनल्सवर धुक्याचा पडदा पसरतो आणि जानेवारीच्या अखेरीस हे शहर मुखवटे धारण करतं. व्हेनिसच्या नागरिकांचा हा कार्निव्हल 1162 मध्ये सुरू झाला. ‌‘पॅट्रिआर्क ऑफ अक्वेलिया‌’वर मिळवलेल्या विजयाचा उत्सव म्हणून व्हेनिसच्या गणराज्याने सेंट मार्क्स स्क्वेअरमध्ये पार्टी साजरी केली आणि तेव्हापासून हा उत्सव सुरू झाला. पण पार्टीपेक्षा त्यात वापरलेले मास्क्स अधिक प्रसिद्ध झाले. युरोपमधल्या ज्या समाजात अतिशय कठोर असा वर्णभेद रुजलेला होता, त्या समाजातल्या उच्चभ्रूंना आणि सर्वसामान्यांना त्यांच्यातील भेद विसरून मिसळण्याचं स्वातंत्र्य देणारे मुखवटे लोकप्रिय झाले नसते तरच नवल. 1797 मध्ये व्हेनिसचे गणराज्य कोसळल्यानंतर कार्निव्हलवर बंदी घालण्यात आली. पुढची दोन शतकं हे शहर शांत राहिलं. 1979 मध्ये हा कार्निव्हल पुन्हा सुरू झाला. दरवर्षी या उत्सवाला सुमारे तीस लाख पर्यटक भेट देतात. 2027 मध्ये 9 फेब्रुवारीला श्रोव्ह ट्युसडेला हा कार्निव्हल संपणार आहे. यातल्या ग्रँड मास्क्ड बॉल्सची तिकिट्स मिळवण्यासाठी शेकडो युरो मोजावे लागतात. पण रस्ते, कॅनल्स आणि कॉस्च्युम्स मात्र फ्री असतात. तुम्ही सकाळी या कार्निव्हलचा मनमुराद आनंद लुटू शकता. गर्दी होण्याआधी, सकाळच्या धुक्यात जेव्हा मास्क घातलेल्या व्यक्ती जणू तरंगत जातात, तेव्हा वाटतं की व्हेनिसचं गणराज्य कधी नष्टच झालं नव्हतं.

डिसेंबरनंतरचा तुमचा प्रवास कोणता? या सहाही ठिकाणांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे योग्य वेळेचं महत्त्व! प्रत्येक ठिकाणाचं सौंदर्य विशिष्ट ऋतूतच खुलतं आणि तिथला अनुभवही त्या विशिष्ट काळाशी जोडलेला आहे. अर्थात, या सगळ्या सहली स्वस्त असतीलच असं नाही.या काळातील प्रवासाचा खर्चही त्यानुसार असतो. पण या सगळ्यांचा मुख्य मुद्दा असा की, हे अनुभव डिसेंबरमधील नेहमीच्या पर्यटनाच्या गर्दीपलीकडचे आहेत. एखादा खास अनुभव घेण्याच्या उद्देशाने आपल्या प्रवासाच्या तारखा ठरवणाऱ्या पर्यटकांना ही ठिकाणं काहीतरी वेगळंच देऊन जातात.

डिसेंबरमध्ये मी स्वतः श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर जाणार आहे. तिथेही डिसेंबर ते एप्रिल हा कोरडा ऋतू असल्याने हा काळ भेटीसाठी उत्तम असतो. कोरड्या काळातील केरळा बॅकवॉटर्सपासून ते जानेवारीच्या कोवळ्या उन्हातील गल्फपर्यंत अशी अनेक ठिकाणं तुम्हाला सापडतील. त्यामुळे पर्यटनस्थळाची निवड करण्यामागचं सोपं सूत्र म्हणजे ठिकाण न ठरवता आधी काय बघायचं आहे, कोणती गोष्ट अधिक रंजक आहे ते पाहा. स्वतःला एक प्रश्न विचारा, फेब्रुवारी महिन्यात जगात अशी कोणती गोष्ट घडते, जी वर्षाच्या इतर कोणत्याही काळात अनुभवता येणार नाही? आणि मग तो अनुभव प्रत्यक्ष घेण्यासाठी तिथे पोहोचा! मी सांगितलेल्या या ठिकाणांपैकी तुमची जी निवड असेल किंवा कदाचित माझ्या यादीत राहून गेलेलं असं एखादं खास ठिकाण तुम्हाला माहीत असेल तर ते मला [email protected] वर मेल करून नक्की कळवा. या निमित्ताने आपल्या प्रवासाच्या गप्पांना एक नवी सुरुवात करूया!

ऐकावं ते नवलच!  वीणा वर्ल्डच्या वेबसाईटवर फ्लाइट बुकिंगची सुविधा सुरू केल्यापासून मी एअरलाईन्स आणि त्यांच्या नियोजनामागचं गणित समजून घेत आहे. एअरलाईन्स आपलं कामकाज कसं आखतात, फ्लाइट्सचं वेळापत्रक कसं ठरतं, याविषयी वाचताना अनेक रंजक गोष्टी मला समजताहेत. या आठवड्याच्या लेखाची सुरुवातच ‌‘ऋतू‌’ या शब्दापासून झाली आहे, तेव्हा या निमित्ताने एअरलाईन्सच्या जगातही ऋतूंचं एक वेगळं वेळापत्रक असतं, हे जाणून घेऊया! एअरलाईन्सच्या वर्षाचे मुख्यतः दोन सीझन्स असतात. पहिला, समर सीझन, जो मार्च महिन्यातील शेवटच्या रविवारपासून ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या रविवारच्या आधीच्या शनिवारपर्यंत असतो. हा साधारण सात महिन्यांचा असतो. दुसरा म्हणजे विंटर सीझन, जो ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या रविवारपासून मार्च महिन्यातील शेवटच्या रविवारच्या आधीच्या शनिवारपर्यंत असतो. जो साधारण पाच महिन्यांचा असतो. या तारखा प्रामुख्याने युरोपमधील घड्याळाच्या वेळेत होणाऱ्या बदलांशी (Daylight Saving Time) जोडलेल्या आहेत. यंदाचा विंटर सीझन 25 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू झाला असून तो 27 मार्च 2027 पर्यंत चालणार आहे.

एअरलाईन्ससाठी हे दोन सीझन्स केवळ कॅलेंडरमधील विभागणी नसतात, तर त्यांच्या संपूर्ण कामकाजाचा आधार असतात. प्रत्येक फ्लाइटचं वेळापत्रक आणि विमानतळांवरील विमानांच्या टेक-ऑफ व लँडिंगसाठीच्या स्लॉट्सचं नियोजन याच दोन सीझन्सनुसार केलं जातं. सीझन बदलण्याच्या दिवशी उत्तर गोलार्धातील एअरलाईन्स आपापलं नवीन वेळापत्रक लागू करतात. काही विमानसेवा सुरू होतात, काही थांबतात, तर हजारो फ्लाइट्सच्या वेळांमध्ये एकाच दिवशी बदल होतात.

या सगळ्या नियोजनासाठी वर्षातून दोनदा म्हणजे जून आणि नोव्हेंबरमध्ये इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या स्लॉट कॉन्फरन्सचं आयोजन केलं जातं. जून महिन्यात विंटर सीझनच्या नियोजनासाठी आणि नोव्हेंबरमध्ये समर सीझनच्या नियोजनासाठी या बैठका होतात. जगभरातील 90 हून अधिक स्लॉट को-ऑर्डिनेटर्स आणि 250 हून अधिक एअरलाईन शेड्युलर्स या परिषदांमध्ये सहभागी होतात. प्रत्येक विमानतळाची क्षमता लक्षात घेऊन कोणत्या एअरलाईनला कोणत्या वेळी विमान उतरवण्याचा किंवा उड्डाण करण्याचा स्लॉट मिळेल, याचं नियोजन इथे केलं जातं. म्हणूनच एखादी फ्लाइट समर सीझनमध्ये उपलब्ध असते, पण विंटर सीझनमध्ये पूर्णपणे बंद होते किंवा याच्या अगदी उलटही घडतं. एखादी विमानसेवा एका सीझनमध्ये दररोज सुरू असते, तर पुढच्या सीझनमध्ये तिची वारंवारता आठवड्यातून काही दिवसांपुरती मर्यादित होऊ शकते.

यामुळेच डिसेंबरनंतरचा प्रवास काहीसा वेगळा भासतो. कारण या काळातील जवळजवळ संपूर्ण प्रवास एअरलाईन्सच्या विंटर शेड्यूलमध्ये येतो, जे 27 मार्च 2027 रोजी संपतं. विशेष म्हणजे, अंगकोर वाट मंदिराच्या मध्यवर्ती मनोऱ्याच्या वर सूर्य उगवण्याच्या विषुवदिनानंतर साधारण आठवडाभरातच हा सीझन संपतो!

निसर्गाचे स्वतःचे ऋतू असतात आणि एअरलाईन्सनीही त्यांच्या कामकाजासाठी एक स्वतंत्र दिनदर्शिका तयार केली आहे. प्रवासाच्या जगात अशा कितीतरी रंजक गोष्टी दडलेल्या आहेत. अशाच एका नव्या गोष्टीसह पुन्हा भेटूया, पुढच्या आठवड्यात! तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
निसर्गाची गुलाबी उधळण जपान
12 mins, read

निसर्गाची गुलाबी उधळण जपान

Published in Sakal Saptarang 22nd November 2026 मोनो नो अवेअर दरवर्षी वसंत ऋतूचं आगमन होताच जपानमध्ये संपूर्ण देशावर जणू गुलाबी रंगाची उधळण होते. झाडांच्या फांद्यांवर उमललेली नाजूक गुलाबी फुलं,

अँडीज ते ॲमेझॉन
12 mins, read

अँडीज ते ॲमेझॉन

...गरमागरम पेरुव्हियन कॉफीचा जसा आस्ते आस्ते आस्वाद घ्यायचा असतो, तसंच हे शहरही शांतपणे आपल्या मनात झिरपून घ्यावं लागतं...   बघ... तो थुंकेल तुझ्यावर! मला सावध करण्यात आलं होतं. पण खरं सांग

दिव्यमया! प्रसन्नमया! महानया! म्हणजेच देवांचंही लाडकं केरळ
12 mins, read

दिव्यमया! प्रसन्नमया! महानया! म्हणजेच देवांचंही लाडकं केरळ

Published in Sakal Saptarang 1st November 2026 निसर्गाला दिलेली पर्यटनाची दिशा! जगात निसर्गाने सौफ्लदर्य बहाल केलेली अनेक ठिकाणं आहेत. पण त्या सौंदर्याचं संधीत रूपांतर करून स्वतःची वेगळी ओळख निर

Travel Memories Shared
by 9.9 Lakh+ Travellers

Rated 5.0 16.2K+ reviews10.1L+ Happy guests81.1K+ Tours completed

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!