Contact Us

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

अँडीज ते ॲमेझॉन

9 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
9 Mins Read
November 20, 2026
November 20, 2026

Quick Summary

कुस्को जवळच्या सुल्का टेक्सटाइल्स हॅन्डलूम सेंटरमध्ये लायमा, अल्पाका आणि विकुना यांचं अद्भुत जग प्रत्यक्ष पाहा.

इथे कलाकारांकडून हाताने वस्त्र विणण्याची कलाकुसर समजून घ्या, कारण एका वस्त्राला किमान चार महिने लागतात.

माचू पिचूला जाण्यासाठी ओलांतायतांबो ते अगुआस कालिएंतेस ट्रेनचा सुंदर रेल्वे प्रवास करा आणि मोठ्या खिडक्यांचा आनंद घ्या.

अगुआस कालिएंतेसहून माचू पिचूपर्यंत जंगल ट्रेक, इंका ट्रेल, शटल बस किंवा घाटरस्ता यापैकी तुमचा मार्ग निवडा.

माचू पिचू धुक्यातून डोकावताना त्याची भव्यता अनुभवा आणि त्यामागचं नेमकं कारण रहस्यमयच राहू द्या.

परतीच्या प्रवासात धावत्या ट्रेनमधील फॅशन शो चुकवू नका, कारण स्टाफ अल्पाका लोकरीचे स्कार्फ आणि स्वेटर घालून डौल दाखवतात.

...गरमागरम पेरुव्हियन कॉफीचा जसा आस्ते आस्ते आस्वाद घ्यायचा असतो, तसंच हे शहरही शांतपणे आपल्या मनात झिरपून घ्यावं लागतं...

 

बघ... तो थुंकेल तुझ्यावर! मला सावध करण्यात आलं होतं. पण खरं सांगायचं तर मला त्याक्षणी त्या गोष्टीची अजिबातच फिकीर नव्हती. अँडीज पर्वतरांगांमध्ये एका शिखरावर असलेल्या हॅन्डलूम सेंटरच्या अंगणात मी उभी होते. तिथे सगळीकडे लोकर, रंग होतेच, शिवाय लहान मुलांच्या पुस्तकात शोभतील असे गुबगुबीत प्राणीही होते. त्या क्षणी तिथे असणं हेच मला इतकं भारी वाटत होतं की तो लायमा घाबरुन, त्याचा बचाव करण्यासाठी माझ्या अंगावर थुंकू शकेल याची मला जराही भीती वाटत नव्हती आणि कमालीचे गोंडस दिसणारे हे प्राणी असा काही आक्रमकपणा करतील अशी मला अजिबात शक्यता वाटत नव्हती. अर्थात, लायमा का थुंकतात आणि ते एकमेकांवरच कसे थुंकतात... आणि माझ्यासारखे पर्यटक त्यांच्या खिजगणतीतही कसे नसतात, हे मला नंतर समजलं.

पेरूमधल्या कुस्को इथल्या ‌‘सुल्का टेक्सटाइल्स‌’ या पारंपरिक हॅन्डलूम सेंटरच्या अंगणात घडलेला हा अगदी छोटासा प्रसंग. इथेच आम्ही लायमा, अल्पाका, डौलदार विकुना यांचं अद्भुत जग पाहिलं. इंका काळापासून पेरूमध्ये वाहतुकीसाठी लायमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, तर अल्पाकांचा उपयोग मऊशार लोकर मिळवण्यासाठी होतो. तिथे सुप्रसिद्ध सुल्का कुटुंबातील कलाकारानेच आम्हाला वस्त्रांमधली कलाकुसर उलगडून दाखवली. इंकांच्या काळापासून प्रचलित असलेली काही डिझाईन्स, त्यापासून प्रेरणा घेत बनवलेली नवीन डिझाईन्स हे सगळंच भारी होतं. ही सगळी कलाकुसर हाताने केल्याचं समजलं, तेव्हा आश्चर्य वाटलं. त्यात कमालीची सफाई आणि नाजूकपणा होता. एकेका कारागीराने दररोज सहा ते सात तास काम केलं तर एक वस्त्र पूर्ण करण्यासाठी किमान चार महिने लागतात. चार महिने! रंगीबेरंगी स्कार्फ्सच्या खरेदीने आमच्या बॅगा जड झाल्या होत्याच, पण त्याहीपेक्षा अत्यानंदाने आमची हृदये भरून आली होती.

इंका: पर्वतांचे जादूगार

इंकावाल्यांची प्रगल्भता, त्यांचे अफलातून इंजिनिअरिंग, निसर्गाशी असलेले तादाम्य, हे सर्व जादुई आहे. त्यांचं साम्राज्य शतकभरच टिकलं, पण ते आज इतक्या काळानंतरही लाखो लोकांना आकर्षित करीत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे माचू पिचू. इथे पोहोचण्यासाठी ओलांतायतांबो इथून अगुआस कालिएंतेसला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढलो. एखाद्या गोष्टीच्या पुस्तकातून केल्यासारखा हा सुंदर, रेखीव प्रवास होता.

माचू पिचूचा रेल्वे प्रवास

उरुबाम्बा नदीने कोरलेल्या खोल दऱ्यांमधून व्हिस्टा डोम कोचच्या रेल्वेतून आपला डौलदार प्रवास होतो. दोन्ही बाजूंना उंच पर्वत उभे आहेत. रेल्वेगाडीच्या आत उबदारपणा असतो. मोठाल्या खिडक्या, शांत, प्रसन्न संगीताची सोबत... सगळं वातावरणच एकंदरीत आनंददायी, उत्साही आणि स्वागतशील असतं. असा सुंदर प्रवास करीत आम्ही अखेरीस अगुआस कालिएंतेसला पोहोचलो. हाच तो प्रख्यात माचू पिचू टाऊन. इथे पोहोचल्यावर आम्हाला त्या सिटाडेलपर्यंत जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग असल्याची माहिती मिळाली. काही पर्यटक जंगल आणि प्राचीन दगडी मार्गावरील इंका ट्रेल हा ट्रेक निवडतात, तर काही जण तुलनेने छोटा मार्ग निवडतात. काहींची पसंती घाटरस्त्याने, वळणं घेत शटल बसने वरपर्यंत जाण्यास असते.

मुळात हे माचू पिचू का बांधलं गेलं असावं? याचं खरं कारण कोणालाच माहीत नाही. काहींच्या मते, ते इंका सम्राटाचे शाही विश्रांतीस्थळ होते, तर काहींना ते धार्मिक केंद्र वाटते. काहींना त्यात वेधशाळेचा भास होतो, पण आपण प्रत्यक्षात जेव्हा धुक्यातून डोकावणारे माचू पिचू पाहतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते ती त्याच्या भव्यतेची.

रेल्वेचा जेव्हा रॅम्प होतो...

माचू पिचूचे अविस्मरणीय दर्शन झाल्यावर परतीच्या प्रवासात आम्हाला एकदम अनपेक्षित अनुभव मिळाला. तो होता धावत्या ट्रेनमधील फॅशन शो! प्रवासी स्थानापन्न होताच ट्रेनमधल्या स्टाफनी इन्स्पायरिंग म्युझिक सुरू केलं. लाईट डीम झाले आणि अतिशय आत्मविश्वासाने काही कर्मचारी अल्पाका लोकरीचे स्कार्फ आणि स्वेटर घालून डब्यातून डौलदारपणे चालू लागले. या फॅशन शो ला हशा आणि टाळ्यांची साथ मिळाली.

कुस्को: आठवडाभर मुक्काम करावा असं शहर

तिथून कुस्कोला परतल्यावर मला जाणवलं, की पर्यटक या शहराला अगदीच धावती भेट देतात. प्रत्यक्षात या शहरात आणखी जास्त काळ घालवता यायला हवा. कारण माचू पिचूकडे येत असताना रस्त्यात लागणारं एक ठिकाण एवढंच कुस्कोचं महत्त्व नाहीये, तर कुस्कोला स्वत:ची ओळख आहे. गरमागरम पेरुव्हियन कॉफीचा जसा आस्ते आस्ते आस्वाद घ्यायचा असतो, तसंच हे शहरही शांतपणे आपल्या मनात झिरपून घ्यावं लागतं. वसाहतकालीन वास्तू, त्यांचे खास सज्जे, गॅलऱ्या, दगडी रस्ते असा चौफेर जामानिमा असलेला सेंट्रल स्क्वेअर आपल्याला जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या टाईम कॅप्सूलसारखा भासतो. इथे एकेकाळचं इंकांचं सर्वात पवित्र टेम्पल कोरिकांचा आहे. त्याला सोन्याच्या पत्र्यांचा साज होता. पुढे स्पॅनिश लोकांनी त्याचं मॉनेस्ट्रीत रुपांतर केलं. इंकांच्या काळातील भक्कम दगडी बांधकाम, ही वास्तू आजही अभिमानाने मिरवते आहे. कुस्कोमधील संध्याकाळ स्वप्नवत असते. शहरातील दिव्याच्या रोषणाईने डोंगर उतार उजळून निघतात. इथल्या कॉफी शॉप्समध्ये स्थानिक आणि पर्यटकांची गजबज असते. कामाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत, कुस्कोतील स्थानिकांना भेटणं हा माझ्यासाठी आनंदाचा भाग ठरला. इंका संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या या मंडळींनी माझं प्रेमाने स्वागत केलं. या साधेपणामुळे आपण इथे बराच काळ मुक्काम करायला हरकत नाही, असं मला वाटून गेलं.

ॲमेझॉन: पृथ्वीची जीवनदायिनी फुफ्फुसे

थंडगार अँडीज पर्वतरांगांमधून आम्ही थेट पृथ्वीवरील सर्वात विलक्षण ठिकाणांपैकी एक असलेल्या ॲमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये पोहोचलो. आपल्याला पेरू आणि ब्राझील या दोन्ही देशांमधून ॲमेझॉन अनुभवता येते. आम्ही पेरूमध्ये इक्विटोस या शहरातून सुरुवात केली. आम्ही विमानाने तेथे पोहोचलो. हा भाग इतका दुर्गम आहे की तिथे रस्त्याने पोहोचणे अशक्य आहे. पूर्णपणे रेनफॉरेस्टने वेढलेल्या या भागात अंदाजे पाच लाखांची वस्ती आहे. डिसेंबर ते मे महिन्यांत इथे पाऊस पडतो. तेव्हा पाण्याची पातळी प्रचंड वाढते. त्यामुळे काही भागात स्थानिक मंडळी रोजचा प्रवासही होडीतूनच करतात. इकडचे सगळे वेळापत्रक निसर्ग ठरवतो. माणसांना त्याबरहुकुम वागण्याशिवाय पर्याय नसतो.

आम्ही मुक्काम केला तो लॉज साधा होता. वीज असली तर असायची. वाय-फाय सापडणं ही पर्वणीच होती. इथे सोयीसुविधा तुलनेने कमी असल्या तरी जो जगण्याचा अनुभव मिळतो, त्या तुलनेत सोयींची कमतरता जाणवतही नाही. अरुंद जलमार्गांमधून आमच्या बोटी वाट काढीत होत्या. त्यांच्या दुतर्फा प्राचीन रक्षकांप्रमाणे उभे असलेले उंचच उंच वृक्ष होते. या प्रवासात आम्ही पिंक डॉल्फिन्सना पाण्याबाहेर डौलदारपणे खेळताना पाहिलं. मग फिशिंगचाही आनंद घेतला. स्थानिक लोकांची मला कमाल वाटली. तिथे सगळं काही मर्यादित होतं, पण तरीही त्यांचं प्रेम, आतिथ्य मात्र वाखाणण्याजोगं  होतं. आमच्यासाठी त्यांनी खास शाकाहारी फ्राईड राईस तयार केला. पेरूमध्ये चायनीज फ्राईड राईसला ‌‘चायना‌’ म्हणतात आणि लिमामध्येही सर्वत्र ‌‘चिफा‌’ रेस्टॉरंट्स दिसतात. त्यातून पिढ्यानपिढ्यांपूर्वी इथे वास्तव्यास आलेल्या चिनी आणि जपानी समुदायांची ओळख पटते.

ब्राझील: आपल्याच लयीत धुंद

पेरूमधून आम्ही ब्राझीलकडे आलो. तिथे आल्याबरोबरच वातावरणातील बदल आम्हाला जाणवला. पेरू हे शहर गूढ आणि प्राचीन होतं. त्या तुलनेत ब्राझील एकदम जिवंत, लयबद्ध आणि रंगीबेरंगी दिसलं. ‌‘रिओ दि जानेरो‌’ हा तिथल्या उत्साहीपणाचा परमोच्च आविष्कार आहे. डोंगर, समुद्रकिनारे आणि चमचमणाऱ्या निळ्या पाण्याच्या मध्येच रिओ वसलेलं आहे. तिथे आम्ही ‌‘क्राइस्ट द रिडीमर‌’ला गेलो. ते तिथे येणाऱ्या प्रत्येकाचं जणू काही वैयक्तिकरित्या स्वागत करीत असल्याप्रमाणे दोन्ही हात पसरून दिमाखात उभे आहे. तिथून दिसणारं विहंगम दृश्य केवळ अविश्वसनीय! डोंगर, समुद्रकिनारा, शहर आणि जंगल... सारं काही एकमेकांत सुंदरपणे मिसळलेलं आहे. आम्ही शुगरलोफ माऊंटनच्या केबल कारमधून हे दृश्य पाहिलं आणि मग कोपाकबाना बीचवर गेलो. कारण त्याशिवाय रिओची भेट पूर्णच होत नाही.

कार्निव्हल: पृथ्वीवरील खास महोत्सव

रिओ कार्निव्हल हा अभूतपूर्व सोहळा असतो. लेंटच्या म्हणजेच उपवासाच्या सुरुवातीचे प्रतीक म्हणजे हा महोत्सव. शतकानुशतके होत असलेला हा महोत्सव आता नृत्य, संगीत, वेशभूषा, कथाकथन आणि निखळ आनंदाचा भव्य संगम बनला आहे. तिथले चित्ररथ हे कलेचे देखणे नमुने असतात. त्यांचे पोशाख सुंदर असतात. कार्निव्हल दरम्यान जगभरातील लाखो लोक रिओमध्ये येतात. तिकिटं झटपट विकली जातात. वीणा वर्ल्डच्या पर्यटकांना हा अनुभव घेता यावा यासाठी आम्ही वर्षभर आधीच तिकिटं घेऊन ठेवतो.

अर्जेंटिना: टँगोमय प्रवास

पुढे आम्ही अर्जेंटिनात आलो. ब्राझीलची नृत्याची मध्यवर्ती संकल्पना उत्साह आहे असं मानलं, तर अर्जेंटिनामध्ये तो भावनांचा खेळ आहे. ब्युनोस आयरेसमध्ये, त्यातही ला बोकाच्या उत्साही परिसरात, टँगो नृत्य ही त्या भाववृत्तीची अनोखी भाषा आहे. रस्त्याच्या एका रंगीबेरंगी कोपऱ्यावर मी उभी होते. तेव्हा एका देखण्या तरुण कलाकाराने अचानक माझा हात पकडला आणि माझ्यासोबत नाचू लागला. मी माझा तोल सांभाळायच्या आतच त्याने अचूक पोझ दिली. त्याच्या या कर्तबगारीचं त्याला बक्षीस अपेक्षित होतं. मी तो क्षण आजही विसरलेले नाही. व्यावसायिक टँगो नर्तकांचं नृत्य पाहणं हा खास अनुभव असतो. प्रेम, विरह, अभिमान आणि जिव्हाळा यांची ती सुरेख गुंफलेली कथा असते.

पॅटागोनिया: अप्रतिम कलाकृती

साऊथ अमेरिकेच्या साहसी प्रवासात पॅटागोनिया मस्ट आहे. हा परिसर अर्जेंटिना आणि चिली या दोन्ही देशांमध्ये विभागलेला आहे. सूर्यप्रकाशात, निळ्या रंगात चमकणारे प्रचंड हिमनग, आकाशाचं प्रतिबिंब पडलेले स्वच्छ लेक्स आणि निसर्गाने कोरलेल्या शिल्पांप्रमाणे उंच उभे असलेले पर्वत इथे आहेत. आपण निसर्गासमोर किती छोटेसे आहोत याची प्रचिती पॅटागोनियामध्ये येते.

मग... साऊथ अमेरिकेला कधी जायचं?

अँडीज पर्वतातील जिज्ञासू लायमांपासून ते रहस्यमय इंका टेम्पल्सपर्यंत, पिंक डॉल्फिन आणि जंगलात मुक्काम केलेल्या रात्रींपासून ते सांबा डान्सर्स आणि टँगो कलाकारांपर्यंत... सारं वैविध्य साऊथ अमेरिकेत आहे. हा खंडच असा आहे. तो रोज आपल्यासमोर काही ना काही नवे ठेवतो. जर तुम्हाला नव्या वर्षाची सुरुवात अतुलनीय अशा आनंदाने करायची असेल, तर रंग, संगीत आणि उत्सवाने परिपूर्ण अशा कार्निव्हलच्या काळात रिओला जाण्याची हीच ती योग्य वेळ!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
निसर्गाची गुलाबी उधळण जपान
9 mins, read

निसर्गाची गुलाबी उधळण जपान

Published in Sakal Saptarang 22nd November 2026 मोनो नो अवेअर दरवर्षी वसंत ऋतूचं आगमन होताच जपानमध्ये संपूर्ण देशावर जणू गुलाबी रंगाची उधळण होते. झाडांच्या फांद्यांवर उमललेली नाजूक गुलाबी फुलं,

डिसेंबरनंतर कुठे?
9 mins, read

डिसेंबरनंतर कुठे?

Published in Maharashtra Times 22nd November2026 ...त्यामुळे सिंहांसारख्या शिकारी प्राण्यांसमोर एकाच वेळी असंख्य पिल्लं असली, तरी त्यांना मर्यादित संख्येनेच शिकार करता येते. परिणामी, अनेक पिल्लं या

दिव्यमया! प्रसन्नमया! महानया! म्हणजेच देवांचंही लाडकं केरळ
9 mins, read

दिव्यमया! प्रसन्नमया! महानया! म्हणजेच देवांचंही लाडकं केरळ

Published in Sakal Saptarang 1st November 2026 निसर्गाला दिलेली पर्यटनाची दिशा! जगात निसर्गाने सौफ्लदर्य बहाल केलेली अनेक ठिकाणं आहेत. पण त्या सौंदर्याचं संधीत रूपांतर करून स्वतःची वेगळी ओळख निर

Travel Memories Shared
by 9.9 Lakh+ Travellers

Rated 5.0 16.2K+ reviews10.1L+ Happy guests81.1K+ Tours completed

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!