Published in Sakal Saptarang 22nd November 2026
मोनो नो अवेअर
दरवर्षी वसंत ऋतूचं आगमन होताच जपानमध्ये संपूर्ण देशावर जणू गुलाबी रंगाची उधळण होते. झाडांच्या फांद्यांवर उमललेली नाजूक गुलाबी फुलं, फुलांनी सजलेले रस्ते आणि उद्यानं... हे दृश्य पाहण्यासाठी जपानमधील माणसंच नव्हे, तर जगभरातील पर्यटकही आतुर असतात. या फुलांना म्हणतात ‘साकुरा’ म्हणजेच चेरी ब्लॉसम आणि हा फुलांचा बहर पाहण्याच्या परंपरेला म्हणतात ‘हानामी’.
साकुराचा हा बहर संपूर्ण जपानमध्ये एकाच वेळी येत नाही. त्याची सुरुवात दक्षिणेकडील ओकिनावा आयलंडवर होते. तिथे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये चेरी ब्लॉसम सीझनची सुरुवात होते. त्यानंतर हा गुलाबी बहर उत्तरेकडे सरकत टोकियो, क्योटो आणि ओसाका येथे मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला पोहोचतो. अखेर एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्यात होक्काइडोमध्ये या फुलांचं आगमन होतं. जपानमध्ये हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्था साकुराच्या फुलण्याचंही रोज निरीक्षण करतात. हा गुलाबी बहर नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे, याच्या बातम्यांकडे लोकांचं लक्ष असतं. साकुराचा बहर अनुभवण्यासाठी योग्य वेळ साधणं हेच सर्वात मोठं आव्हान असतं. कारण एखाद्या ठिकाणचा पूर्ण बहर साधारण आठवडाभरच टिकतो. प्रत्येक वर्षी हिवाळ्यातील तापमानानुसार याच्या तारखा बदलतात. त्यामुळे ठराविक आठवड्याचं नियोजन करून जपानला गेलात, तर फुलं उमलण्याआधी किंवा बहर ओसरल्यानंतर पोहोचण्याची शक्यता असते. यावर उत्तम उपाय म्हणजे प्रवासाच्या तारखांमध्ये थोडी लवचिकता ठेवणं.
हानामीचा इतिहास हजार वर्षांहून जुना आहे. हेयान कालखंडातील राजदरबारी सरदार आणि उमराव झाडांखाली एकत्र जमून कविता सादर करत, निसर्गाचा आनंद घेत. काळ बदलला, परंपरा बदलल्या, पण फुलांचा आनंद घेण्याची ही पद्धत आजही कायम आहे. आज जपानी कुटुंबं, मित्रमंडळी आणि ऑफिसमधील सहकारी उद्यानांमध्ये एकत्र येतात. तिथे खाद्यपदार्थांची रेलचेल असते आणि गप्पा, हशा, फोटो अशा सगळ्यांतून हानामीचा आनंद घेतला जातो. टोकियोमधील उएनो पार्क यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
या सगळ्या उत्साहामागे एक सुंदर जपानी विचार दडलेला आहे. चेरी ब्लॉसमची फुलं जितकी सुंदर, तितकीच क्षणभंगुर. काही दिवसांतच ती झाडांवरून गळून पडतात. जपानी भाषेत ‘मोनो नो अवेअर’ ही संकल्पना आहे. आयुष्यातील सुंदर गोष्टी कायमस्वरूपी नसतात, त्या निघून जाताना मनात निर्माण होणारी हळवी भावना म्हणजे ‘मोनो नो अवेअर’. झाडांवरून अलगद खाली येणारी गुलाबी पाकळी म्हणजे या भावनेचं सर्वात सुंदर प्रतीक.
चेरी ब्लॉसमचा काळ हा जपानमधील पर्यटनाचा सर्वाधिक गर्दीचा हंगाम असल्याने प्रवासाचं आणि हॉटेलचं बुकिंग आधीच करणं महत्त्वाचं आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देताना शक्यतो सकाळची वेळ निवडावी. त्या वेळी सूर्यप्रकाश सौम्य असतो, गर्दी तुलनेने कमी असते आणि फुलांचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. खरं तर जपानमधील चेरी ब्लॉसमचा अनुभव हा केवळ सुंदर फुलं पाहण्यापुरता मर्यादित नाही. हा अनुभव आपल्याला शिकवतो की काही गोष्टी फार काळ टिकत नाहीत, पण त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या आठवणी मात्र आयुष्यभर सोबत राहतात. मग वाट कसली बघताय? चला, साकुराचा हा बहर पाहायला!
उगवत्या सूर्याच्या देशात...
जपान म्हटलं की डोळ्यांसमोर काय येतं? अत्याधुनिक बुलेट ट्रेन, तंत्रज्ञानात आघाडीवर असलेली शहरं, हिस्टॉरिक टेम्पल्स आणि अर्थातच गुलाबी-पांढऱ्या रंगांनी बहरलेली चेरी ब्लॉसमची झाडं! जपानच्या या नाजूक फुलांनी जगभरातील पर्यटकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. आयुष्यात एकदा तरी जपानला जाऊन चेरी ब्लॉसमचा बहर पाहायचाय, ही इच्छा अनेकांच्या बकेट लिस्टमध्ये असते आणि त्यात नवल ते काय? जपानमध्ये वसंत ऋतूची चाहूल लागली की संपूर्ण देशाचं रूप पालटू लागतं. थंडी कमी होते आणि हवेत सुखद गारवा येतो तशा, झाडांच्या फांद्यांवर गुलाबी-पांढऱ्या फुलांच्या कळ्या डोकावू लागतात.
जपानी भाषेत चेरी ब्लॉसमला ‘साकुरा’ म्हणतात. मार्चच्या उत्तरार्धापासून साकुराचा बहर सुरू होतो, मात्र जपानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हा बहर वेगवेगळ्या वेळी अनुभवायला मिळतो. दक्षिणेकडील भागांत आधी फुलं उमलतात, तर उत्तरेकडे हा गुलाबी रंगोत्सव एप्रिल-मे पर्यंत पोहोचतो. त्यामुळे जपानमध्ये ‘चेसिंग चेरी ब्लॉसम’ हाही एक सुंदर प्रवास असतो! या फुलांच्या बहराचा आनंद घेण्याच्या, फुलांचं निरीक्षण करण्याच्या जपानी परंपरेला ‘हानामी’ म्हणतात. पण हा अनुभव फक्त झाडांखाली उभं राहून फुलं पाहण्यापुरता मर्यादित नाही. कुटुंबीय, मित्रमंडळी किंवा सहकाऱ्यांसोबत उद्यानात जाऊन, फुलांच्या सावलीत बसून गप्पा मारणं, खाणं-पिणं आणि निसर्गाचा आनंद घेणं, हा जपानी जीवनशैलीचा एक सुंदर भाग आहे. म्हणूनच जपानमध्ये साकुरा फुलला की जणू संपूर्ण देशच पिकनिकच्या मूडमध्ये जातो!
टोकियोमधील उएनो पार्कमध्ये हजारो चेरी ब्लॉसमची झाडं आहेत. फुलांनी सजलेल्या या उद्यानात लोकलाईट्स, मित्रमंडळी आणि पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मेगुरो नदीच्या दोन्ही काठांवर फुललेली चेरी ब्लॉसमची झाडं तर एखाद्या चित्रात असल्यासारखी दिसतात.
क्योटोमधील ‘फिलॉसॉफर्स पाथ’ हा पायी चालण्याचा मार्ग वसंतऋतूत गुलाबी फुलांनी सुंदर सजतो. दोन्ही बाजूंना फुललेली झाडं, पारंपरिक घरं आणि जवळच असलेली हिस्टॉरिक टेम्पल्स यामुळे इथली भटकंती अगदी प्रसन्न वाटते. ओसाका कॅसल पार्कमध्ये भव्य हिस्टॉरिक कॅसलच्या पार्श्वभूमीवर चेरी ब्लॉसम पाहणं हा एक वेगळाच अनुभव आहे. माऊंट फुजीच्या परिसरातील अराकुरायामा सेंगन पार्कमध्ये गुलाबी चेरी ब्लॉसमच्या फुलांच्या पार्श्वभूमीवर दिसणारा बर्फाच्छादित माऊंट फुजी आणि पाच मजली चुरेइतो पॅगोडा हे दृश्य म्हणजे जपानचं अगदी पोस्टकार्डसारखं रूप. यापेक्षा सुंदर फोटो स्पॉट शोधणं कठीणच!
आणखी उत्तरेकडे गेल्यावर आओमोरी प्रांतातील हिरोसाकी कॅसल पार्कमध्ये सुमारे 2,600 चेरी ब्लॉसमची झाडं पाहायला मिळतात. नारामधील माऊंट योशिनो ही साकुराप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. डोंगरउतारांवर पसरलेली सुमारे 30 हजार चेरीची झाडं फुलली की संपूर्ण डोंगर गुलाबी रंगाने न्हाऊन निघतो. तर हिरोशिमातील सेनकोजी पार्कमधून शहर आणि समुद्राचं विहंगम दृश्य पाहताना चेरी ब्लॉसमचा बहर अनुभवता येतो. म्हणजेच जपानमध्ये तुम्ही कुठेही गेलात, तरी साकुराच्या सौंदर्याची एक वेगळीच झलक तुमची वाट पाहत असते.
जपानमध्ये चेरी ब्लॉसमचा आनंद फक्त दिवसा घेतला जात नाही. रात्रीच्या वेळी झाडांवर विशेष रोषणाई केली जाते. या अनुभवाला ‘योझाकुरा’ म्हणतात. अंधाराच्या पार्श्वभूमीवर उजळून निघालेली गुलाबी-पांढरी फुलं पाहताना आपण जणू एखाद्या स्वप्ननगरीत आहोत असं वाटतं.
साकुरा जपानी खाद्यसंस्कृतीतही आपली जागा निर्माण करतो. चेरी ब्लॉसमच्या काळात साकुरा मोची, साकुरा फ्लेवर्ड मिठाई, चहा आणि इतर खास पदार्थ बाजारात दिसू लागतात. दुकानं, कॅफे, बेकरी आणि अगदी खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवरही गुलाबी रंगाची छटा दिसते. चेरी ब्लॉसमची फुलं काही दिवसांच्या बहरानंतर अलगद गळून पडतात. जपानी जीवनदृष्टीत या क्षणभंगुर सौंदर्याला विशेष महत्त्व आहे. आयुष्यातील सुंदर क्षण कायम टिकत नसले तरी त्यांचा मनमुराद आनंद घ्यावा, हेच जणू साकुरा आपल्याला शिकवतो.
जपानला भेट देण्याची अनेक कारणं आहेत,पण चेरी ब्लॉसमच्या काळात हा देश अनुभवणं म्हणजे त्या सगळ्या कारणांना एक सुंदर गुलाबी किनार लाभणं! कॅमेरा कितीही चांगला असला तरी या सौंदर्याचं पूर्ण चित्र त्यात सामावणार नाही. कारण काही दृश्यं केवळ डोळ्यांनी पाहायची नसतात, तर मनात साठवायची असतात. साकुरा हे त्यापैकीच एक आहे.
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
- जपानी संस्कृतीत चेरी ब्लॉसम हे नव्या सुरुवातीचं आणि आशेचं प्रतीक आहे.
- चेरी ब्लॉसमची फुलं बहुदा गुलाबी आणि पांढऱ्या छटांमध्ये दिसतात.
- काही चेरी ब्लॉसमच्या फुलांना तब्बल 100 पाकळ्या असतात.
- दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकणाऱ्या चेरी ब्लॉसमच्या बहराला ‘साकुरा फ्रंट’ म्हणतात.
- झाडांखाली बसून फुलांचा बहर अनुभवण्याची ‘हानामी’ ही जपानी परंपरा एक हजार वर्षांहून अधिक जुनी आहे.
- फुकुशिमामधील ‘मिहारू ताकीझाकुरा’ हे हजार वर्षांहून अधिक जुनं चेरी ब्लॉसमचं झाड आहे.
- ‘साकुरा मोची’ ही चेरी ब्लॉसम सीझनमधील खास जपानी मिठाई आहे.
- ‘कोनोहाना-साकुया-हिमे’ म्हणजेच ‘ब्लॉसम प्रिन्सेस’ ही शिंतो धर्मातील देवी असून, तिचा संबंध साकुरा म्हणजेच चेरी ब्लॉसम आणि माऊंट फुजीशी जोडला जातो.
- 1912 मध्ये जपान आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचं प्रतीक म्हणून टोकियोने वॉशिंग्टन डी.सी. शहराला चेरीची तब्बल 3,020 झाडं भेट दिली होती.
- जपानच्या 100 येनच्या नाण्यावरही चेरी ब्लॉसमचं चित्र आहे.
बहर साकुराचा जल्लोष मैत्रिणींचा!
जपानमध्ये वसंत ऋतूत उमलणारी साकुराची फुलं जशी अवघ्या निसर्गाला सौंदर्याची गुलाबी किनार देतात, तसंच प्रत्येक स्त्री आपल्या सौंदर्याने, आत्मविश्वासाने आणि उत्साहाने तिचं आयुष्य फुलवत असते. म्हणूनच साकुराचा सुंदर बहर अनुभवायला, वीणा वर्ल्डच्या वुमन्स स्पेशल जपान टूरसोबत तुम्हीही चला, मैत्रिणींसोबत जपानची सफर करायला! टोकियो, क्योटो, ओसाका अशा शहरांची भटकंती, माऊंट फुजीचं निसर्गसौंदर्य, शिंकान्सेनचा रोमांच, चेरी ब्लॉसमच्या गुलाबी छटांमध्ये रंगलेले अविस्मरणीय क्षण आणि शॉपिंगची मजा असा अनुभव या टूरमध्ये घेता येईल. स्वतःसाठी वेळ काढून अनुभवूया हा साकुरासारखाच बहरलेला प्रवास! कारण काही प्रवास फक्त ठिकाणं दाखवत नाहीत, तर आपल्यातलं हरवलेलं चैतन्यही पुन्हा जागं करतात.
मेरा जूता है...
चित्रपटसृष्टीनेही जपानमधील साकुराचं सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. ‘एप्रिल स्टोरी’ चित्रपटात वसंत ऋतूतील टोकियो, विद्यापीठात नव्याने सुरू होणारं आयुष्य आणि चेरी ब्लॉसमने सजलेले रस्ते यांचं नाजूक चित्रण आहे. ‘स्वीट बीन’ चित्रपटात डोरायाकी मिठाईचं दुकान आणि त्यात काम करणाऱ्या तीन व्यक्तींची हृदयस्पर्शी गोष्ट उलगडते. ‘अवर लिटिल सिस्टर’ या चित्रपटात तीन बहिणी आणि त्यांच्या सावत्र बहिणीच्या नात्यांची सुंदर कहाणी आहे. ‘5 सेंटीमीटर्स पर सेकंड’ या प्रसिद्ध जपानी ॲनिमेशनपटात साकुराच्या पाकळ्या दर सेकंदाला पाच सेंटीमीटर वेगाने खाली पडतात, अशी मध्यवर्ती कल्पना आहे. ‘चेरी ब्लॉसम - हानामी’ आणि ‘द लास्ट सामुराय’ हे चित्रपटही प्रसिद्ध आहेत. पडद्यावरचं हे गुलाबी सौंदर्य प्रत्यक्ष पाहायला, तुम्ही कधी जाताय?
आयुष्यात एकदा तरी...
- शिंजुकू ग्योएनच्या बागेत साकुराच्या गुलाबी बहराखाली फेरफटका मारायचाय.
- माउंट फुजी आणि चेरी ब्लॉसमचं स्वप्नवत दृश्य कॅमेऱ्यात टिपायचंय.
- शिंकान्सेन बुलेट ट्रेनमधून वेगवान प्रवास करीत वसंत ऋतूतलं जपान न्याहाळायचंय.
- अराशियामाच्या बांबू वनात निसर्गाच्या सान्निध्यात हरवून जायचंय.
- गोल्डन पॅव्हेलियनच्या सुवर्ण सौंदर्यासोबत साकुराचा बहर अनुभवायचाय.
- फुशिमी इनारीच्या लाल तोरी गेट्समधून जपानी संस्कृती अनुभवायचीय.
- ओशिनो हक्काईच्या निळ्याशार तळ्यात माऊंट फुजीचं प्रतिबिंब पाहायचंय.
- टोकियो स्काय ट्री वरून चेरी ब्लॉसमने सजलेलं शहर न्याहाळायचंय.
- असाकुसाच्या पारंपरिक बाजारपेठेत खरेदी करायचीय.
- शिबुया क्रॉसिंगवर आधुनिक जपान पाहायचाय.
- रात्रीच्या रोषणाईत उजळलेला ‘योझाकुरा’ अनुभवायचाय!
- जपानी किमोनो परिधान करून चेरी ब्लॉसमसोबत फोटोशूट करायचंय.
सेलिब्रेट स्प्रिंग विथ वीणा वर्ल्ड
जपानचा अविस्मरणीय स्प्रिंग सीझन अनुभवण्यासाठी वीणा वर्ल्डकडे आहेत प्रवासाचे अनेक पर्याय.
कस्टमाईज्ड हॉलिडेज: तुम्हाला हवी ती शहरं, हव्या तितक्या दिवसांचा मुक्काम आणि तुम्हाला हवा तितका प्रवासाचा वेग! टोकियोपासून क्योटो आणि ओसाकापर्यंत, तुमच्या सोयीनुसार तुम्ही प्रवासाच्या तारखा ठरवा आणि तुमच्या माणसांसोबत तुमची स्वतःची चेरी ब्लॉसम ट्रिप प्लॅन करा!
हनिमून टूर्स: आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करा जपानच्या गुलाबी साकुरा फुलांच्या साक्षीने! फुलांनी बहरलेल्या वाटांवर एकमेकांचा हात हातात घेऊन फिरण्याचा रोमँटिक अनुभव म्हणजे खास जपान चेरी ब्लॉसम हनिमून टूर!
माइस (MICE) टूर्स: तुमच्या कंपनीच्या गरजांनुसार कॉर्पोरेट मीटिंग्ज् किंवा इन्सेन्टिव्ह टूर्सच्या प्लॅनिंगपासून ते प्रवासातील ॲरेंजमेंट्सपर्यंत, सगळी जबाबदारी वीणा वर्ल्डच्या माइस टीमची!
ग्रुप टूर्स: जपानसाठी वीणा वर्ल्डकडे आहेत अनेक ऑप्शन्स! 7 दिवसांची बेस्ट ऑफ जपान, बेस्ट ऑफ जपान विथ नागोया किंवा बेस्ट ऑफ जपान विथ नारा, 8 दिवसांची स्प्लेंडर्स ऑफ जपान, 9 दिवसांची वंडर्स ऑफ जपान, 11 दिवसांची मार्व्हल्स ऑफ जपान आणि 13 दिवसांची ज्वेल्स ऑफ जपान! काहीतरी वेगळं हवंय? मग 10 दिवसांची जपान विथ कोरिया किंवा 13 दिवसांची जपान विथ चायना ट्रीपही आहेच!
सिनियर्स स्पेशल: सिनियर असलात तर 8 दिवसांची सिनियर्स स्पेशल जपान टूर आहेच की! संपूर्ण प्रवासात अनुभवी टूर मॅनेजरची सोबत आणि एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी रूम शेअरिंगची गॅरंटी! त्यामुळे प्रवासाला निघताना एकटे असालही, पण परतताना मात्र सोबत असतील नवीन मित्रमैत्रिणी आणि आयुष्यभर जपाव्यात अशा आठवणी!
जपानचा चेरी ब्लॉसम सीझन तुमच्यासाठी थांबणार नाही! सो, चलो!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.