India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

नो अलार्म!

18 mins. read
Veena Patil
Veena Patil
18 Mins Read
February 14, 2025
February 14, 2025

Quick Summary

लेखात अलार्म न लावता देवावर विश्वास ठेवून नैसर्गिकरित्या ठरल्यावेळी उठण्याचा अनुभव शेअर केला आहे.

अलार्म लावणे मनात ताण आणि अँग्झायटी वाढवू शकते, म्हणून शक्य असेल तर स्वतःला नैसर्गिक उठण्याची सवय द्या.

टाइम डिफरन्समुळे जेट लॅग होऊ शकतो, त्यामुळे प्रवासापूर्वी शरीराची घड्याळे जुळवण्यासाठी तयारी करणे महत्त्वाचे आहे.

पूर्वेकडच्या देशांना जाताना किमान एक महिना आधी रोज 15 मिनिटांनी लवकर उठण्याची सवय लावा.

पश्चिमेकडच्या देशांना जाताना एक महिना आधी हळूहळू उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे सुरू करा.

टूरवर पर्यटकांसाठी सकाळचा अलार्म देणे आवश्यक ठरू शकते, कारण विमानप्रवासानंतर शरीराचा रिदम बिघडतो.

Published in the Sunday Sakal on 16 February, 2025

‘देवाला नमस्कार कर, थँक्यू म्हण, आणि तुला ज्यावेळी उठायचंय ते देवाला सांग, तो उठवतो आपल्याला, बरोबर त्या वेळी जाग येईल बघ. हो, पण मनापासून कर हं प्रार्थना आणि विश्वास ठेव.‌’ आजी आजोबांनी आणि आई बाबांनी आपल्या पुढच्या पिढीला दिलेला हा कानमंत्र मलाही मिळाला आणि आजतागायत त्याचा अनुभव मी घेतेय. आमच्या बेडरूममध्ये अलार्म क्लॉक नाही. मोबाईलने आपला ताबा घेतल्यावर सुधीरच्या मोबाईलवर त्याने सोडेपाचचा अलार्म सेट करून ठेवलायं. ‌‘इन केस‌’. सुधीर म्हणजे आमच्या घरातलं काळजीवाहू सरकार, त्यामुळे ‌‘इन केस जाग आली नाही तर‌’ त्यासाठी त्याचा हा एक सावधगिरीचा पवित्रा. अर्थात अलार्म वाजायच्या कितीतरी आधी आमचा दिवस सुरू झालेला असतो. जाग आपोआपच येते. देवावर भरोसा जो ठेवलेला असतो.  त्यामुळे का कुणास ठाऊक अलार्म लावणं मला अपराध्यासारखं वाटतं. अलार्म लावायचा विचार नुसता आला तरीही माझं एक मन दुसऱ्या मनाला विचारायला लागतं,`तुझा तुझ्यावर विश्वास नाही? तुला अलार्मची गरज का वाटते? तुला जर तुझ्या सकाळच्या उठण्याची म्हणजे नैसर्गिकरित्या उठण्याची खात्री वाटत नसेल तर तू टीमला  काय खाक खात्री देणार? स्वत:वर नाही पण देवावर तर विश्वास ठेव‌’. हे तुंबळ युद्ध तेव्हाच थांबतं जेव्हा मी ठरवून टाकते `नाही लावत मी अलार्म, मला जाग येईल‌’. आणि जाग येते, ठरल्यावेळी. कधीतरी अलार्म लावावा लागतो आणि मीही तो लावते.

मला आठवतं एकदा मी लंडनला गेले होते. फक्त एका दिवसासाठी, नव्हे एका रात्रीसाठी, मला ‌‘चिटी चिटी बँग बँग‌’ हे नाटक बघायचं होतं. ते आपल्या पर्यटकांना दाखवायचं होतं. पण ‌‘त्यांना ते आवडेल का?‌’ हे बघण्यासाठी मी रात्रीच्या फ्लाइटने निघाले. सकाळी लंडनला पोहोचले, दुपारी आमच्या असोसिएटसोबत मिटिंग केली. रात्री शो बघून हॉटेलवर आले, सकाळी सहाचं फ्लाइट होतं, पहाटे तीन वाजता निघायचं होतं. विंटर असल्याने भारताच्या आणि युकेच्या टाइममध्ये साडेपाच तासांचा फरक. एका दिवसात बॉडी अडॅप्ट करणं शक्य नव्हतं. टाइम डिफरन्समुळे शरीराच्या उडालेल्या गोंधळाने माझा स्वत:वरचा आणि देवावरचा विश्वास डळमळीत झाला. मी हॉटेल रिसेप्शनवर फोन करून त्यांना मॉर्निंग अलार्म द्यायला सांगितला. माझ्या मोबाईलवर अलार्म लावला आणि तरीही खात्री वाटली नाही म्हणून मी आमचा सेव्हियर सुधीरला फोन लावला.`सुधीर प्लीज तुझ्या म्हणजे इंडियन टाइमप्रमाणे सकाळच्या साडेआठ वाजता मला उठव. मोबाईलवर फोन कर किंवा हॉटेलला फोन करून माझ्या रूमला कनेक्ट करायला सांग,‌’ सुधीरने हसत हसत `काय हा मूर्खपणा‌’ म्हणत फोन ठेवला आणि मी शांतपणे झोपी गेले. नंतर जेव्हा मी या गोष्टीचा विचार केला तेव्हा जाणवलं, अलार्म न लावणं माझ्यासाठी किती सोप्पी गोष्ट होती पण तेच अलार्म लावायचा म्हटल्यावर जो स्ट्रेस आला की काही विचारू नका. थोडक्यात नॅचरली जाग येणं हे माझ्यासाठी स्ट्रेस फ्री होतं तर अलार्म लावणं ही गोष्ट खूपच अँग्झायटी निर्माण करणारी होती.

आमच्या टूर्सवर मात्र `पर्यटकांना मॉर्निंग अलार्म देणं‌’ ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्याचं कारण असतं टाइम डिफरन्स. विमानप्रवासाच्या शिणवट्यामुळे बॉडी क्लॉकची ऐशी की तैशी होऊन जाते. `मला जेट लॅग लागत नाही‌’ हा माझा फुकाचा अभिमान चक्काचूर झाल्याचं मला आठवतंय ते माझ्या पहिल्या युएसएच्या भेटीत आणि पहिल्या ऑस्ट्रेलियाच्या भेटीत. ह्या दोन्ही वेळा मी आणि नील आम्ही दोघंच मायलेक गेलो होतो आणि दोन्ही ठिकाणच्या पहिल्याच दिवशी आम्ही आमच्या टूर प्रोग्रॅमची अशी काही वाट लावली की विचारू नका. तेव्हा शहाणपण आलं की उगाच गमजा मारण्यात काही अर्थ नाही. जेट लॅग लागतो, लागू शकतो. अथार्त तो लागायचा नसेल तर थोडी तयारी करून ठेवावी लागते. पूर्वेकडच्या देशांमध्ये जिथे आपल्याआधी सकाळ होते अशा जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, हाँगकाँग, सिंगापूर ह्या देशांमध्ये जाताना किमान एक महिना आधी लवकर उठायची सवय करायची. भारताच्या आणि आपण जाणाऱ्या देशामध्ये टाइम डिफरन्स किती आहे बघून जाण्याआधी महिनाभर रोज पंधरा पंधरा मिनिटं आधी उठायचं आणि जायच्या एक आठवडा आधी त्या देशाचं टाइम जर आपल्या बॉडी क्लॉकशी ॲडजस्ट करता आलं तर निश्चितपणे आपण जेट लॅग वर कंट्रोल करू शकतो. सकाळी लवकर उठणाऱ्यांना पूर्वेकडच्या देशांच्या वेळेशी ॲडजस्ट करणं कठीण जात नाही. याउलट पश्चिमेकडच्या देशांमध्ये म्हणजे दुबई मिडल इस्टर्न वा युरोपियन देशांकडे जाताना एक महिना आधी थोडं थोडं आळशी बनायला सुरुवात करायची. रात्री उशिरा झोपायचं आणि सकाळी उशिरा उठायचं. पर्यटकांचा विचार केला तर जास्तीत जास्त पर्यटक हे मार्च ते ऑक्टोबर ह्या दरम्यान प्रवास करतात. त्यावेळी म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्या आणि बहुतेक सगळ्या युरोपियन देशांमध्ये साडेतीन तासांचा किंवा थोड्या आपल्या जवळच्या म्हणजे ग्रीस टर्की ह्या देशांमध्ये अडीच तासांचा फरक असतो. हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये हा फरक साडेचार आणि साडेतीन तासांचा होतो. युके लंडनच्या बाबतीत तो साडेपाच आणि साडेचार तास असा होतो. आपण कुठे  चाललोय त्याचा विचार करून एक महिना आधीपासून जर आपल्या बॉडीला सवय लावली तर तिथे गेल्यावर त्या वातावरणाशी जमवून घेणं थोडंसं सोप्पं जातं. थोडक्यात सकाळी लवकर उठणाऱ्या पूर्वाभिमुख लोकांना पूर्वेकडच्या देशांना जाणं सोईचं वाटतं, तर सकाळी उशिरा उठणाऱ्या पश्चिमाभिमुख लोकांना पश्चिमेकडच्या देशांना जाणं बरं वाटतं. आणखी दुसरी गोष्ट असते ती विमानप्रवासात आपल्याला ॲडजस्ट करायची. आपण ज्या देशात उतरणार त्या देशात दिवस असेल तर विमानात मस्त झोप काढायची. एअरहोस्टेसला सांगायचं ‌‘डू नॉट डिस्टर्ब प्लीज‌‘. याऊलट आपण ज्या देशात जाणार त्या देशात जर आपण रात्री पोहोचत असू तर विमानात झोपायचं नाही. एखादं पुस्तक वाचायचं, चित्रपट बघायचे.

पूर्वी माझ्यासोबत अनेकदा पद्माताई वाघ ह्या पर्यटक म्हणून अनेक देशात यायच्या. त्या न्यूजपेपरमधली वाचायची राहिलेली कात्रणं घेऊन यायच्या आणि अशा प्रवासात त्याचा फडशा पाडायच्या. एकूणच विमानप्रवासात जागं रहायचं असेल तर आपापली बेगमी आपणच करून ठेवायला हवी. सांगायचा मुद्दा पर्यटकांसाठी मॉर्निंग अलार्म महत्वाचा आणि आमचे टूर मॅनेजर्स त्याची काळजी घेतात. जेव्हा अलार्म हा प्रकार अस्तित्वातच नव्हता तेव्हा लोक असेच देवावर भरवसा ठेवायचे, सूर्योदयापूर्वी उठायचे किंवा रात्री भरपूर पाणी पिऊन झोपायचे म्हणजे सकाळी लघवीला जाण्यासाठी जाग यायचीच. तरीही जनरली `सकाळी अमूक एका वेळी त्या काळी लोक कसे उठायचे बरं‌’ हे गुगलला विचारल्यावर कळलं की अलार्म क्लॉक पहिल्यांदा अस्तित्वात आलं ते 1787 मध्ये. लेवी हचिन्स ह्या अमेरिकन माणसाने पहाटे कामावर जायचंय म्हणून स्वत:साठी अलार्म बनवला. पण तो फक्त पहाटे चार वाजताच वाजायचा. त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे 1847 मध्ये फ्रेंच इन्व्हेंटर ॲन्टोन डियर ह्याने पहिलं मेकॅनिकल अलार्म क्लॉक बनवलं आणि त्याचं पेटंट घेतलं. त्याआधी शेकडो वर्षं ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक, वॉटर क्लॉक, टाऊन स्क्वेअर मधली बेल, फॅक्टरी व्हिसल्स किंवा ज्याला आपण भोंगे म्हणायचो त्या सगळ्यांचा वापर लोक करत होते. आमच्या लहानपणी हे भोंगे वाजलेले आम्ही ऐकलेत. भोंगा वाजला म्हणजे इतके वाजले हे आम्ही एकमेकांना सांगायचो. फ्रेंचमनने पेटंट घेतलं, पण अलार्म क्लॉकचं मास प्रॉडक्शन सुरू झालं 1876 मध्ये अमेरिकन इन्व्हेंटर सेथ थॉमसच्या कंपनीकडून. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशननंतर ‌‘कामावर वेळेत जाणं‌’ सक्तीचं झालं तसंच दुसऱ्या महायुद्धात सैनिकांनाही वेळेवर उठणं कम्पल्सरी बनलं आणि अलार्म क्लॉक इंडस्ट्री फळफळली. आतातर वेगवेगळ्या आवाजांचेही अलार्म आलेत. पण मला वाटतं की अलार्मशिवाय जाग यायला पाहिजे.

अलार्म लावल्यावर तर कुणीही उठू शकेल पण ज्यावेळी एखाद्या कामाने, एखाद्या प्रोजेक्टने, एखाद्या ध्येयाने आपण झपाटलेलो असतो तेव्हा आपोआप जाग येते. रात्रभरच्या झोपेने-विश्रांतीने शरीर चार्ज होतं आणि मन `चलो, आज और अच्छा, कलसे बढ़कर बेहतर कुछ करते हैं, आगे जाते हैं‌’ म्हणत आपण उत्साहात उठतो. सकाळी जाग आल्यावर टुणकन गादीतून उठावसं वाटत असेल तर `वुई आर ऑन द राइट ट्रॅक. वुई रिअली लूक फॉरवर्ड टू समथिंग मोअर मिनिंगफुल‌’ असं म्हणायला हरकत नाही. आपणच आपल्याला तपासायचं. म्हणजे बघा नं, अलार्म न लावता जाग आली पाहिजे. औषध न घेता प्रकृती ठणठणीत राहिली पाहिजे (अपवाद काही आजारांचा), लाफिंग क्लबचं मेंबर न होता मनसोक्त हसता आलं पाहिजे, `टू बी ऑर नॉट टू बी‌’ चं युद्ध न होता मॉनिंग वॉकला जाता आलं पाहिजे. गरम पाणी, चहा अशी कसलीही ब्राइब न देता सकाळी पोट साफ झालं पाहिजे, टेंशनशिवाय, ताण-तणावाशिवाय प्रगती करता आली पाहिजे, सहजपणे नीती नियमांचं पालन करता आलं पाहिजे. खूप कष्ट न घेता मानसिक आणि शारिरीक संतुलन ठेवता आलं पाहिजे, जगन्नियंत्याने एक सुंदर आयुष्य आपल्याला बहाल केलंय त्याचं सौंदर्य आपल्याला आणखी वाढवता आणि खुलवता आलं पाहिजे.


देखो अपना देश

दिल से! प्यार से! सम्मान से!

मध्यप्रदेश हे भारताच्या मध्यभागी वसलेलं राज्य असल्याने या राज्याला ‌‘हिंदुस्थान का दिल‌’ म्हटलं जातं. या राज्यात ज्योतिर्लिंग आणि लेण्यांपासून जंगल सफारीपर्यंत खूप काही आहे. या राज्याचा सांस्कृतिक वारसा राजवाडे, किल्ले, मंदिरे आणि स्तूपांमधूनही जपलेला आपल्याला पहायला मिळतो. इथली खजुराहोची मंदिरे आणि भीमबेटका रॉक शेल्टर ही ठिकाणं प्रसिद्ध आहेत. नर्मदा नदी ही मध्यप्रदेशात उगम पावणारी मुख्य नदी. हिच्या प्रवाहात निर्माण झालेला फोटोजेनिक असा धुंवाधार धबधबा आपल्याला इथे बघायला मिळतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी दोन ज्योतिर्लिंगे इथे पहायला मिळतात. त्यातलं एक म्हणजे महाकालेश्वराचं मंदिर आणि दुसरं म्हणजे नर्मदा आणि कावेरी नद्यांचा संगम जिथे होतो ते ठिकाण म्हणजे ओंकारेश्वर.

गीत, संगीत, कला आणि संस्कृतीची जपणूक करणारं राज्य म्हणजे मध्य प्रदेश. हे शास्त्रीय आणि लोकसंगीतासाठी प्रसिद्ध राज्य आहे. भारतातले प्रसिद्ध गायक तानसेन आणि बैजू बावरा यांचा जन्म ग्वाल्हेरजवळचा. याशिवाय हे राज्य चंद्रशेखर आझाद, अटल बिहारी वाजपेयी, लता मंगेशकर, किशोर कुमार, जया बच्चन अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे जन्मस्थान आहे. शिवाय मध्यप्रदेश म्हणजे शिंदे आणि होळकर घराण्यांची समृद्ध परंपरा. महेश्वर ही अहिल्याबाई होळकरांची भूमी म्हणून ओळखली जाते. तसंच हे महेश्वर आपल्या माहेश्वरी साड्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

या राज्यातलं इंदौर शहर स्ट्रीट फूडसाठी विशेष ओळखलं जातं. इथल्या सराफा बाजारात रात्री 10 नंतर हळूहळू डोसा, पावभाजी, मोमोज अशा स्ट्रीट फूडच्या गाड्या आणि स्टॉल्स लागायला सुरुवात होते. याशिवाय इंदौरमधली ‌‘56 दुकान‌’ ही जागाही खाण्यापिण्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. यात एकूण 56 दुकानं असून अनेक प्रसिद्ध आऊटलेट्स तुम्हाला इथे पहायला मिळतात.

मध्य प्रदेशात प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने सुद्धा आहेत. या राज्यात वाघांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. म्हणून या राज्याला टायगर स्टेट म्हणतात. जंगलप्रेमींना इथल्या बांधवगड राष्टीय उद्यान, कान्हा व्याघ्र प्रकल्प, पन्ना राष्ट्रीय उद्यान आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्प यांसारख्या ठिकाणी जाऊन जंगल सफारीचा अनोखा अनुभव घेता येतो. तसंच या राज्यातलं पेंच नॅशनल पार्क सुद्धा प्रसिद्ध आहे. इथे आपल्याला रॉयल बंगाल टायगर पहायला मिळतात. तुम्हालाही आपल्या देशाच्या हृदयात भटकून यायचं असेल तर चला आमच्यासोबत मध्यप्रदेशात.


अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...

तम्हाला माहीत आहे का? पोस्तोयना केव्हज्‌‍ ही युरोपमधली टुरिस्टस्‌‍ना ॲक्सेसिबल असलेल्या सर्वात मोठ्या केव्ह सिस्टीम्सपैकी एक आहे. या केव्हज्‌‍ स्लोव्हेनियाच्या पोस्तोयना शहराजवळ आहेत. सुमारे 20 लाख वर्षं जुन्या असलेल्या या केव्हज्‌‍ची लांबी 24 किलोमीटर म्हणजेच 15 मैलांपेक्षा जास्त आहे. यांचा शोध प्रथम 1818 मध्ये लागला. या एकमेव केव्हज्‌‍मध्ये आपल्याला जगातली अंडरग्राऊंड ट्रेन राईड घेता येते. 1872 मध्ये बांधण्यात आलेली ही पोस्तोयना ट्रेन ही मुळात हातगाडीच्या स्वरूपात होती. 1924 मध्ये हिचे विद्युतीकरण करण्यात आले आणि ती जगातली एकमेव अंडरग्राऊंड ट्रेन बनली. पर्यटकांना दीड तासांच्या इथल्या टूरमध्ये या केव्हज्‌‍चा सुमारे 5.3 किलोमीटर लांबीचा भाग पाहता येतो. इथे प्रवास करणारे व्हिजिटर्स 3.7 किलोमीटरच्या बोगद्यातून प्रवास करतात आणि इथली आश्चर्यं आ वासून पाहतात. या केव्हज्‌‍मध्ये ओल्म्स हे ब्लाइंड असलेले उभयचर म्हणजेच ॲम्फिबियन प्राणी राहतात. त्यांना बेबी ड्रॅगन्स असंही म्हणतात. हे 100 वर्षं जगतात आणि सुमारे 10 वर्षं अन्नाशिवाय राहू शकतात. या केव्हज्‌‍च्या फॉरमेशन मधला महत्त्वाचा भाग म्हणजे इथले पांढरे चकाकते स्टॅलेग्माईट्स. यांना ब्रिलियंट असं म्हणतात. हे शुद्ध कॅल्साइटचे बनलेले आहे. ते दिव्याखाली चमकतात आणि त्यामुळे अद्भुत दिसतात. हे ह्या केव्हज्‌‍चे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. ह्या केव्हज्‌‍ची निर्मिती पिवका नदीने केलेल्या स्खलनामुळे झाली आहे. ही नदी अजूनही याच्या आतून वाहते. या नदीचा प्रवाह या केव्हज्‌‍च्या अतिदुर्गम भागापर्यंतही जातो. ह्या भागापर्यंत केवळ या क्षेत्रातले तज्ञच जाऊन पोहोचले आहेत. इथल्या नवनवीन टनेल्स आणि चेंबर्सचा शोध अजूनही शास्त्रज्ञ लावत आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मन सैन्याने इंधन साठविण्यासाठीचा डेपो म्हणून या केव्हज्‌‍चा वापर केला. पोस्तोयना केव्हज्‌‍पासून फक्त 9 किलोमीटर अंतरावर प्रेडयामा कॅसल आहे. इथून एक सिक्रेट अंडरग्राऊंड टनेल नेटवर्क आहे जे या कॅसलला केव्हज्‌‍शी जोडते. मध्ययुगीन काळात, या टनेल्सचा वापर शत्रूच्या वेढ्यातून सुटण्यासाठी गुप्त मार्गाप्रमाणे केला जात असे.

पोस्तोयना केव्हज्‌‍मधली ‌‘द स्पॅगेटी हॉल‌’ ही सर्वांत नाजूक आणि सुंदर रचनांपैकी एक आहे. दर डिसेंबरमध्ये पोस्तोयना केव्हज्‌‍मध्ये विविध कलाकारांच्या साथीने ख्रिस्तजन्माचा देखावा सादर केला जातो. त्यावेळी या केव्हज्‌‍चा संपूर्ण मार्ग उजळून निघतो. यावेळी इथल्या कॉन्सर्ट हॉलमध्ये स्पेशल फेस्टिव्ह कॉन्सर्टस्‌‍ सुद्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे जगातलं सर्वांत अनोखं आणि प्रेक्षणीय असं ख्रिसमस सेलिब्रेशन आपल्याला इथे पहायला मिळतं. इथे एक भूमिगत असलेला नैसर्गिक कॉन्सर्ट हॉल सुद्धा आहे. इथलं ॲकोस्टिक उत्तम दर्जाचं आहे. इथे संगीताच्या लाईव्ह मैफिली भरवल्या जातात आणि इथल्या वैशिष्ट्यपूर्ण ॲकोस्टिकमुळे आतमध्ये चालू असलेली कुजबूजही 40 मीटर अंतरापर्यंत आपल्याला स्पष्टपणे ऐकू येते. तुम्हालाही जर या केव्हज्‌‍ना भेट द्यायची असेल तर आमच्यासोबत वीणा वर्ल्डच्या ईस्टर्न युरोप टूरवर चला.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

100 Country Club

जगण्यातल्या आनंदाचं गुपित

आयुष्य जगण्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे, तो अर्थ फिरण्याने येतो. मी वीणा वर्ल्डसोबत आजवर अनेक इंटरनॅशनल टूर्स केल्या आहेत कारण त्यांच्यासोबत टूर करणं खूपच सेफ असतं. एकदा एखादी टूर सिलेक्ट केली आणि पैसे भरले की फक्त त्यांच्या टॅग लाईन प्रमाणे 'बॅग भरो, निकल पडो', एवढंच आपण करायचं असतं, बाकी मुंबई ते मुंबई आपली काळजी त्यांची टीमच घेते. त्यांचे टूर मॅनेजर सुद्धा खूप आपलेपणाने पर्यटकांची काळजी घेतात. म्हणून भविष्यातही मी कायम त्यांच्यासोबत जाणंच पसंत करेन.

मी 'केतकी राणे' मी मालाडला राहते, माझ्या घराजवळच वीणा वर्ल्डचं सेल्स ऑफिस आहे. तिथूनच मी आत्तापर्यंतच्या सगळ्या टूर्स बुक केल्या आहेत. माझं लहानपणापासून ट्रॅव्हलिंग हेच पॅशन होतं, माझे पप्पा कळसुबाईच्या शिखरावर ट्रेकला जायचे ते शाळेत असल्यापासून पाहिलं होतं. कधी कधी मी सुद्धा जायचे त्यांच्याबरोबर, तेव्हाच ठरवलं होतं की मोठं झाल्यावर आपणही पप्पांसारखं फिरायचं, वेगवेगळे डेस्टिनेशन्स पहायचे, वीणा वर्ल्डसोबतच जाण्याचं आणखी एक  इम्पॉर्टंट कारण म्हणजे वीणा पाटील या माझ्या रोल मॉडेल आहेत. त्यांनी स्वतःचं एवढं मोठं जग निर्माण केलंय, हे खूपच भारी आहे.

माझी पहिली इंटरनॅशनल टूर होती बँकॉक-पट्टाया ! त्यावेळी जरा टेन्शन होतं, बरेच प्रश्न होते मनात, टूर मॅनेजरने मला प्रॉपर गाईड केलं. त्यामुळे मी कंफर्टेबल झाले. आता म्हातारं होईपर्यंत शंभर देश फिरायचेच असं ठरवूनच टाकलं आहे मी.  जितके देश पहिले ते सगळे आवडले मला. बँकॉकजवळ कोरल आयलंडच्या इथे अंडर वॉटर ऍक्टिव्हिटी तसंच पॅरासेलिंग करायला खूप मजा आली, तसंच टर्कीला ब्लू मॉस्क म्हणजे मशीद होती ती पाहायला आवडलं. एकदा सिंगापूरला युनिव्हर्सल स्टुडिओला गेले होते, तिथली एकही राईड सोडली नव्हती मी!

मी जेव्हा बाहेर जाते, तेव्हा फारशी खरेदी करत नाही, फक्त त्या त्या देशाची आठवण म्हणून तिथले सोव्हिनिअर्स आणि मॅग्नेटस घेऊन येते. आयफेल टॉवर बघणं हे माझं ड्रीम आहे. टर्कीला जाऊन तिकडे बखलावा  खायची माझी इच्छा आहे.

फिरण्यामुळे जगाकडे बघण्याचा तुमचा पर्स्पेक्टिव्ह वाईडर होऊन जातो, तुमची बऱ्याच लोकांबरोबर मैत्री होते, मुलखावेगळी माणसं भेटतात. भारताइतकंच भारताबाहेरही बघण्यासारखं खूप आहे हे कळतं, तिथली लाइफस्टाइल कळते. फिरल्यामुळे रुटीनमधून बाहेर पडता येतं, परत येताना तुम्ही फ्रेश झालेले असता, नव्या दमाने पुन्हा कामाला लागू शकता. मी येत्या मे मध्ये असणारी युरोप टूरसुद्धा करणार आहे. नवनवीन गोष्टी पाहत जितकं जास्त एक्सप्लोअर करता येईल तितकं जग पहायचं टार्गेटच ठेवलंय मी!


प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्‌‍

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍सोबत समर हॉलिडेज्‌‍

यावर्षी तुम्ही समर हॉलिडेज्‌‍साठी कुठे जाताय? बर्फाच्छादित हिमालयात की शांत निवांत समुद्र किनाऱ्यांवर? भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये तुम्ही या लाँग व्हेकेशनचा आनंद घेऊ शकता.

नॉर्थ इंडिया - द हिमालयन एस्केप

लडाखमध्ये पँगाँग लेकजवळ तुम्ही कॅम्पिंगचा अनुभव घेऊ शकता तसंच रात्रीच्या वेळी स्टारगेझिंगचा आनंद लुटू शकता.

मनालीतल्या देवदारच्या जंगलात असलेल्या हॉटेल्समध्ये मुक्काम करत असाल तर तिथल्या  काचेच्या पॅनोरमिक खिडक्यांमधून दिवसा हिमालयाचं विहंगम दृश्य आणि रात्री ताऱ्यांनी भरलेलं आकाश पाहण्याची संधी मिळेल.

हिमाचलमध्ये तुम्ही हेलिकॉप्टरमधून प्रसिद्ध रोहतांग पास आणि मनालीतल्या हिमालयन लँडस्केपचा सिनिक व्ह्यू एन्जॉय करू शकता.

तुमच्या धकाधकीच्या जीवनातून एक छोटा ब्रेक हवा असेल तर ऋषिकेशमधल्या वेलनेस योगा रिट्रीटमध्ये राहून रिलॅक्स आणि रिज्युव्हिनेट व्हा.

पंजाबमधल्या निसर्गरम्य कंट्रीसाईड फार्ममध्ये राहून ट्रॅक्टर राईड, कंट्रीसाइड सायकलिंग सोबतच इथल्या ट्यूबवेल प्लन्ज पूलमध्ये पोहण्याचा आनंद घ्या आणि लोकल पंजाबी खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या.

प्रसिद्ध टायगर रिझर्व्ह जिम कॉर्बेटमधील लक्झरी जंगल लॉजमध्ये राहून तुम्ही इथे प्रायव्हेट जीप सफारीसुद्धा घेऊ शकता.

साऊथ इंडिया : हिल्स, बीचेस, बॅकवॉटर्स

अलेप्पीच्या बॅकवॉटर्समध्ये सूर्यास्ताचा व्ह्यू पाहत तुमच्या खाजगी हाउसबोट क्रूझमधून प्रवास करू शकता आणि केरळच्या ऑथेंटिक ‌‘साध्या मील‌’चा आस्वाद घेऊ शकता.

कूर्गमध्ये कॉफी प्लांटेशनने वेढलेल्या प्रायव्हेट पूल व्हिलामध्ये किंवा वायनाडमधील रेन फॉरेस्टने वेढलेल्या इको-फ्रेंडली ट्री हाऊसमध्ये राहण्याचा अनुभव घ्या.

अंदमानला समुद्रकिनाऱ्यावर प्रायव्हेट यॉट क्रूझवरून सूर्यास्ताची रम्य दृश्यं पाहू शकता, हॅवलॉक आयलंडवर स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, सी प्लेन किंवा सेमी सब-मरीन राईडचा आनंद घेऊ शकता. तसंच कपल्स इथे फोटो शूट आणि कँडल लाइट डिनरसारख्या अनेक रोमँटिक  गोष्टी अनुभवू शकतात.

नॉर्थ ईस्ट इंडिया : अनटच्ड विल्डरनेस अँड कल्चरल रिट्रीट्स

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जीप सफारी घेऊन तुम्हाला वन हॉर्न ऱ्हाइनो पाहता येईल.

ब्रह्मपुत्रा नदीत लक्झरी क्रुजवरून सूर्यास्ताची विहंगम दृश्यं पाहता येतील.

दार्जिलिंगमधल्या प्रायव्हेट टी इस्टेट्समध्ये राहण्याचा आनंद घ्या.

वेस्टर्न इंडिया : डेझर्ट, रॉयल्टी अँड मोअर

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये प्रायव्हेट डेझर्ट सफारी करा तसंच लक्झरी टेन्टमध्ये रहा.

इथल्या पॅलेसेसमध्ये किंवा हवेल्यांमध्ये राहून शहरात व्हिंटेज कारमधून प्रवास करत रॉयल्टीचा अनुभव घ्या.

महाराष्ट्रातल्या विनयार्डस्‌‍ मध्ये स्टे करा आणि प्रायव्हेट वाइन टेस्टिंग सेशनमध्ये सहभागी व्हा.

आजच आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडेज टीमशी संपर्क करा आणि बूक करा तुमचा प्रायव्हेट हॉलिडे. भारतातल्या सर्व हॉलिडेज्‌‍वर प्रायव्हेट शोफर ड्रिव्हन कार्स तुमच्या दिमतीला आहेतच. शिवाय 24/7 व्हर्चुअल असिस्टन्स सुद्धा आहेच. तेव्हा वाट कसली बघताय?


ऑस्ट्रेलिया आणि ऑटम कलर्स

australia

ऑटम हा पृथ्वीवरचा सर्वांत कलरफुल असा सीझन मानला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला सर्व ऋतूंचा आनंद लुटता येतो. इथल्या तापमानात होत जाणाऱ्या बदलांचा परिणाम इथल्या निसर्गावरही होताना दिसतो. या ऋतूत ऑस्ट्रेलियामध्ये इथल्या झाडांच्या पानांच्या लाल, पिवळा, केशरी या रंगांमधल्या विविध छटा पहायला मिळतात. तुम्हालाही हे ऑटम कलर्स पहायचे असतील तर कॅनबेरा आणि व्हिक्टोरियामध्ये तुम्ही हा सीझन अनुभवू शकता. कॅनबेरामध्ये झाडाच्या पानांचे बदललेले रंग आणि त्यांचं पाण्यात पडणारं प्रतिबिंब पहायचं असेल तर इथल्या बर्ली ग्रीफीन लेकच्या काठावरून फेरफटका मारू शकता. ऑटम फॉलीएज साठी, या ऋतूतल्या रंग बदलासाठी जापनीस मेपल्स ही झाडं प्रसिद्ध आहेत. या झाडांची पानं या काळात त्यांच्या विविध प्रकारांनुसार वेगवेगळ्या रंगांची उधळण करतात. ऑस्ट्रेलियामध्ये हा सीझन साधारण मार्च ते मे या महिन्यांच्या दरम्यान असतो. अशावेळी इथलं सौंदर्य तुम्ही कॅमेऱ्यात पकडलं नाहीत तरच नवल. इन्स्टाग्रामेबल फोटोजसाठी हे ठिकाण म्हणजे तर पर्वणीच. सो, धिस समर, चलो, बॅग भरो, निकल पडो टू ऑस्ट्रेलिया.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
इथूनच का होतो जगप्रवासाचा श्रीगणेशा?
18 mins, read

इथूनच का होतो जगप्रवासाचा श्रीगणेशा?

Published in the Sunday Lokmat Saransh on 26 April 2026 ‘परदेश प्रवास‌’ करायचं म्हटलं किंवा भारताच्या बाहेर पाऊल टाकायचं ठरवलं की मनात एक वेगळीच हलचल सुरू होते. थोडी उत्सुकता, थोडी धाकधूक, थोडी स्व

इट्स टाईम फॉर आफ्रिका
18 mins, read

इट्स टाईम फॉर आफ्रिका

Published in the Sunday Sakal Saptarang on 26 April 2026 आफ्रिका...एक माईलस्टोन आफ्रिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम उभं राहतं ते अद्वितीय, विलोभनीय आणि अक्षरशः अफलातून वाईल्डलाईफ. जगात कुठ

स्वालबार्ड
18 mins, read

स्वालबार्ड

Published in the Sunday Loksatta Lokrang on 26 April 2026 नॉर्थ पोलपासून फक्त १३०० किमीवर असलेलं जगातलं सर्वात उत्तरेकडील शहर! इथे तुम्ही जन्माला येऊ शकत नाही आणि इथे तुम्ही मरणही पावू शकत नाही.

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Our OfficesLocate Us

Located across the country, ready to plan your dream vacation today!

Locate Us

Call us1800 313 5555

Request a quote or chat - we’re here to help anytime!

Write to us

We're always happy to help!

Connect with us

Reviews, podcasts, blogs and more...

Veena world
Associated withIATAIATOTAAITAFI

*Caution: Beware of Fake Promotions or Offers *Please do not believe or engage with any promotional emails, SMS or Web-link which ask you to click on a link and fill in your details. All Veena World authorized email communications are delivered from domain @veenaworld.com or @veenaworld.in or SMS from VNAWLD or 741324. *Veena World bears no liability or responsibility whatsoever for any communication which is fraudulent or misleading in nature and not received from registered domain.

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top