Contact Us

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

किल्ली नसलेलं दार

8 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
8 Mins Read
November 27, 2026
November 27, 2026

Quick Summary

पन्ना नॅशनल पार्कजवळच्या ताज पाषाण गढमध्ये चावी नसते आणि ओपन-डोअर पॉलिसीने प्रवेश होतो.

कडी लावणे वन्यजीवांना आत येऊ नये म्हणून असल्याने जंगलातील नियम समजून घ्या.

मुख्य प्रवेशद्वारापासून सेंट्रल लॉजपर्यंत दहा मिनिटांची पायवाट घेताना मोबाईल सिग्नल्स आणि गोंगाट कमी होतो.

मऊसूत गाद्या आणि आर्टिफिशियल लाइट्सपेक्षा शांतता आणि मोकळेपणा हीच इथली लक्झरी आहे.

दगडी कॉटेजमध्ये बसून पक्ष्यांचे किलबिलाट, पानांची सळसळ आणि प्राण्यांचे आवाज ऐकत जंगलाचा अनुभव घ्या.

बटलरच्या धीम्या लयीतल्या जेवणात राजेशाही ब्रेकफास्ट आणि नदीतला खास मसालेदार मासा यांसारखे स्थानिक स्वाद चाखा.

Published in Loksatta Lokrang 29th November 2026

...“हे सगळे जंगलातले इनकमिंग कॉल्स आहेत”, आमचा गाईड थट्टेने म्हणाला. पण गमतीचा भाग वगळला तर त्यात वर्षानुवर्षांच्या अनुभवातून गाठीशी आलेलं शहाणपण दडलेलं होतं...

 

“ इथे चावी नाही!” मध्यप्रदेशातील पन्ना नॅशनल पार्कलगत, खासगी वनक्षेत्रात वसलेल्या ताज पाषाण गढमध्ये चेक इन करताना तिथल्या मॅनेजरने दिलेला हा पहिला धक्का होता. 12 दगडी कॉटेजेसच्या या सुंदर छोटेखानी फॉरेस्ट लॉजमध्ये आमचा मुक्काम होता. तिथे पितळी चावी किंवा इलेक्ट्रॉनिक की कार्ड असं काही नव्हतं. समोर होते अजय, रिसेप्शन मॅनेजर. त्यांनी सुहास्य वदनाने सांगितलं की आमच्याकडे चावी ही भानगड नाही, तर ‌‘ओपन-डोअर पॉलिसी‌’ आहे.

डबल लॉक, डिजिटल सिक्युरिटी, कोडेड एलिवेटर्स... अशा शहरी जीवनाशी सरावलेल्या मला चावी नसणं ही भलतीच क्रांतिकारक कल्पना वाटली. विमानतळापासून तासभर अंतरावर असलेल्या या कॉटेजेसमध्ये मी आणि माझी अमेरिकेत राहणारी मैत्रीण महालक्ष्मी पोहोचलो होतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर काही दिवस शांत-निवांत वातावरणात घालवावेत आणि नशिबात असेल तर व्याघ्रदर्शन व्हावं अशी आमची माफक अपेक्षा होती. पण आमच्या या साध्याशा प्रवासातला सर्वात अनोखा अनुभव आम्ही कॉटेजमध्ये प्रवेश करण्याआधीच सुरू होईल, याची मी कल्पनाच केली नव्हती. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून अजय हसत म्हणाले, “जंगलात आपण दाराला कडी लावायची ती लोकांना बाहेर ठेवण्यासाठी नव्हे, तर वन्यजीवांनी सहजासहजी आत येऊ नये म्हणून.” ही एका अर्थाने त्या रिसॉर्टची ओळख होती आणि दुसरीकडे हे ऐषोआरामाची व्याख्या नव्याने समजावून देणारं वेगळं विश्व होतं.

पाषाण गढकडे जाणारा रस्ता हा या अनुभवाची सुरुवात होता. मुख्य रस्त्यापासून एक चिंचोळी पायवाट जंगलाकडे वळते. त्या पायवाटेच्या दुतर्फा सागाची झाडं आणि दाट झुडुपं आहेत. शहरातील गोंगाट त्या दाटीने जणू काही शोषून घेतलाय. मुख्य प्रवेशद्वारापासून सेंट्रल लॉजपर्यंत जायला दहा मिनिटं लागतात. हा प्रवास म्हणजे एका जगातून दुसऱ्या जगात प्रवेश करण्याची पूर्वतयारीच होती. जसजशी जंगलाची दाटी वाढत गेली, तसतसे मोबाईलचे सिग्नल्स मंदावले, गप्पा कमी झाल्या आणि मनावरचा ताण हलका होऊन नाहीसा झाला.

आपल्याकडे लक्झरी म्हणजे मऊसूत गाद्या, प्रशस्त खोल्या, महागड्या गोष्टी, मिशेलिन स्टार रेस्टॉरंट्स... पण इथल्या लक्झरीची व्याख्या मात्र वेगळी आहे. इथे लक्झरी कशाच्या असण्यात नाही, तर कशाच्या नसण्यात आहे! ना वाहनांचा गोंगाट, ना सतत खुणावणारे मोबाईल नोटिफिकेशन्स, ना रात्रीच्या आकाशाशी स्पर्धा करणारे आर्टिफिशियल लाइट्स! त्याऐवजी आहे तो मोकळेपणा, मनाला भिडणारी शांतता आणि स्वतःकडे पुन्हा एकदा नव्याने पाहण्याची संधी!

पाषाण गढमधील बारा दगडी कॉटेजेसही या निसर्गाचा अविभाज्य भाग वाटतात. जमिनीपासून थोड्या उंचावर बांधलेल्या या कॉटेजेसमधून आसपासच्या विस्तीर्ण गवताळ प्रदेशाचा आणि प्रत्येक तासाला रंग बदलणाऱ्या जंगलाचा नजारा दिसतो. आपल्या खोलीत आरामात बसून आपण पहाटेचा पक्ष्यांचा किलबिलाट, दुपारी वाऱ्यावर होणारी पानांची सळसळ, संध्याकाळी दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज ऐकू शकतो. यातून क्षणोक्षणी आपल्याला जंगल जाणवत राहते.

एव्हाना आम्हाला कुलूप-किल्ली नसण्यामागचं तत्त्वज्ञान थोडं थोडं उमजू लागलं होतं. निसर्गाच्या राज्यात माणसाच्या मालकी हक्कापेक्षा नियम महत्त्वाचे असतात. इथे आपण कुठल्याही वास्तूचे मालक नसतो, तर त्या जंगलाचे पाहुणे असतो.

पाषाण गढमधल्या जेवणालाही निसर्गाप्रमाणेच धीमी लय आहे. आमचा बटलर करण एकदम शांत स्वभावाचा आणि कमालीचा दक्ष होता. आमच्या आवडीनुसार त्याने तयार केलेले जेवण खास असायचे. एके दुपारी आम्हाला हलकेसे काहीतरी हवे होते, तेव्हा त्याने आमच्यासाठी नदीतला मासा खास मसाले घालून बनवला होता. आमचा ब्रेकफास्ट राजेशाही असायचा. या नाश्त्यात नुकत्याच बेक केलेल्या ब्रेडचे प्रकार, सिझनल फ्रुट्स, आमच्या आवडीनुसार केलेले अंड्यांचे पदार्थ आणि दिल खुश करणारी कॉफी असा थाट असायचा. दूरवरच्या झाडांच्या फांद्यावरून उड्या मारणारे लंगूर पाहत या नाश्त्याचा आस्वाद घेणं हा एकदम बेस्ट अनुभव होता. जंगलात या अशा जेवणाचा आनंद घेतल्याने आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. चवींचं वेगळेपण जाणवतं. पदार्थांचा स्पर्शही अनुभवता येतो. या सगळ्याला सोबत असते ती अर्थपूर्ण गप्पांची किंवा कधीकधी मौनाचीही. टेलिव्हिजनचा आवाज, सतत येत जात असलेल्या वाहनांचा गोंगाट यांच्याऐवजी आपल्याला ऐकू येते ती रातकिड्यांची किरकिर, पक्ष्यांच्या पंखांची फडफड, दूरवरून ऐकू येणारे हरणांचे अर्लाम कॉल्स... शहरातल्या बड्या रेस्टॉरंटमध्ये कितीही आव आणला तरी हा असा तल्लीन करणारा अनुभव घेता येत नाही.

जंगलातल्या सफारींची आपली तयारी सुरू होते ती आवाजांच्या अभ्यासाने. पन्ना नॅशनल पार्कमधील आमच्या पहिल्या सफारीत आमच्या गाईडने आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, सगळ्यात आधी जंगलाची भाषा समजून घ्या. सुरुवातीला ती भाषा समजणं कठीण वाटलं. कारण त्यात पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळ आणि दूरवरून येणारे तऱ्हेतऱ्हेचे आवाज यांची एक सरमिसळ होती. हळूहळू त्यातला एकेक आवाज वेगवेगळा समजू लागला. संभाव्य धोक्याची सूचना देण्यासाठी सांबराने दिलेला अर्लाम, झाडांच्या शेंड्यांवरून लंगूरांनी केलेला कलकलाट आणि अचानक झुडूपांमध्ये पसरलेली शांतता... हे सारं कळायला लागलं. “हे सगळे जंगलातले इनकमिंग कॉल्स आहेत”, आमचा गाईड थट्टेने म्हणाला. पण गमतीचा भाग वगळला तर त्यात वर्षानुवर्षांच्या अनुभवातून गाठीशी आलेलं शहाणपण दडलेलं होतं.

एका सफारीदरम्यान आमच्या गाईडने काही सांगण्यापूर्वीच आम्हाला आसपासच्या वातावरणात एक प्रकारचा तणाव जाणवला. सगळं स्तब्ध झालं... आणि काही क्षणांतच समोरच्या दाट झुडूपांतून एक वाघीण बाहेर आली. अत्यंत रुबाबात, सावकाश पावलं टाकत तिच्या तंद्रीत तिने आमच्या जीपसमोरून रस्ता ओलांडला.

जंगलात वाघाचं दर्शन होणं हा अनुभव शब्दांत मांडणं कठीण आहे. जंगलातल्या तपकिरी रंगाच्या मातीच्या पार्श्वभूमीवर त्या वाघिणीचा चमकदार सोनेरी केशरी रंग, त्यावरील काळे पट्टे उठून दिसत होते, पण त्याहून मोहक होतं ते तिचं अस्तित्व. तिला अजिबात घाई नव्हती. तिने आमच्या अस्तित्वाची जुजबी दखल घेतली आणि ती पुढे गेली. आम्ही तिच्या दर्शनाने भारावून गेलो होतो. त्या क्षणी तिचं जंगलातलं स्थान अगदी स्पष्ट झालं होतं. आम्ही होतो या अद्भुत निसर्गनाट्याचे भाग्यवान प्रेक्षक आणि ती होती या जंगलाची खरी सम्राज्ञी! पन्ना नॅशनल पार्कमधील वाघांची आजची संख्या हे त्यांच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचं यश आहे. गेल्या दशकभरात राबवल्या गेलेल्या पुनर्वसन कार्यक्रमांमुळे वाघांची संख्या पुन्हा वाढून सुमारे 40 पर्यंत आली आहे. याशिवाय आमच्या सफारीदरम्यान आम्हाला गवतात एकमेकांशीमस्ती करणारे, बागडणारे दोन खेळकर बछडेही पाहता आले. तो सगळा अनुभव केवळ अविस्मरणीय होता!

आजकाल आयुष्यातील खास क्षण साजरे करण्यासाठीही अशा सफारींना पसंती मिळू लागली आहे. नवविवाहित जोडप्यांसाठी आम्ही अशा अनेक सफारी हॉलिडेज्‌‍चं आयोजन करतो. या सफारींच्या निमित्ताने जोडप्यांना, गर्दी, धावपळ, मोबाईल नेटवर्कनी भरलेल्या पर्यटनस्थळांपासून दूर अशी स्पेशल जागा मिळते. कॉटेजच्या परिसरात त्यांना निवांत हातात हात घालून फिरता येतं. अशा छोट्या छोट्या क्षणांमधून त्यांच्या नात्याची वीण अधिक घट्ट होत जाते. अशाच एका सफारीदरम्यान आमच्यासोबत जीपमध्ये इंदौरमधील एक कपल होतं. त्यांच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते तिथे आले होते. गप्पांच्या ओघात पत्नी म्हणाली, “आम्ही या आधीही अनेक सफारी केल्या आहेत. पण यावेळी मात्र आम्हाला फक्त जंगल अनुभवायचंय.” मग नवऱ्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकत ती म्हणाली, “तसंही हा आयुष्यभर एका वाघिणीसोबतच राहतो आहे.” त्यावर आम्ही सगळेच खळखळून हसलो.

मात्र या संपूर्ण प्रवासात आम्ही कुलूप किल्लीशिवायचं जग ही कल्पना इतक्या सहजपणे आत्मसात केली, याचं मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलं. पहिल्या दिवशी संध्याकाळी जेवायला बाहेर पडताना माझा हात अगदी नकळत चावीसाठी खिशापाशी गेला. दुसऱ्या दिवशी मला चावीची आठवणच झाली नाही आणि तिसऱ्या दिवशी तर कुलूप किल्लीशिवायच्या प्रवासात मला विलक्षण मोकळं वाटू लागलं.

चेक-आऊटची वेळ आली तेव्हा वाटलं, या ठिकाणी चावी परत करण्याची पद्धत नाहीये, हेच बरंय. कारण तोवर आम्हाला त्या मोकळेपणाची सवय झाली होती. आमची गाडी विमानतळाच्या दिशेने निघाली. आम्ही नोटिफिकेशन्स, मोबाईल नेटवर्क, टाईमटेबलच्या जगात पुन्हा प्रवेश करीत होतो. पाषाण गढ मधील ‌‘नो कीज‌’ पॉलिसीमध्ये एक वेगळंच तत्त्वज्ञान सामावलं होतं. शहरात राहताना आपण सुरक्षिततेच्या नावाखाली कितीतरी थरांची कवचं स्वतःभोवती उभी करीत असतो, पण जंगलात मात्र ती आपोआप गळून पडतात. इथे कोणत्याही भीतीशिवाय वावरणं आपल्याला जमतं. निसर्गात धोक्याचा अभाव नाही, तर निसर्गातील प्रत्येक घटकाच्या सह-अस्तित्वावर आधारलेला एक सुंदर समतोल आहे.

इथे येऊन मला कळलं की खरी लक्झरी म्हणजे वर्तमान क्षणात जगता येणं. सूर्याच्या कोवळ्या किरणांसोबत जाग येणं, तारकांनी भरलेल्या आकाशाखाली निवांतपणे जेवता येणं, रुबाबात रस्ता ओलंडणारी वाघीण पाहायला मिळणं आणि मनावर कोणतंही ओझं न बाळगता शांत झोपणं हीच खरी श्रीमंती आहे. जिथे दारं उघडी असतात, मनावर कसलीही बंधनं नसतात आणि प्रत्येक क्षण मोकळेपणाने जगता येतो, अशा ठिकाणाचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा कुलुपांच्या आणि बंद दरवाजांच्या जगात परतणं मनालाही जड जातं.

जंगल सफारींबद्दल वाढत असलेल्या आकर्षणामुळे आता वीणा वर्ल्डने मध्यप्रदेश, रणथंबोर, गीर यांच्यासोबतच आफ्रिकेचं नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचा मार्गही खुला केला आहे. यात केनियाच्या मसाई मारा आणि टांझानियाच्या सेरेंगेटीच्या विस्तीर्ण मैदानांपासून ते दक्षिण आफ्रिकेच्या क्रुगर नॅशनल पार्कपर्यंतच्या सफारी आहेत. या सफारींमध्ये तुम्हाला सिंह, बिबट्या, हत्ती, गेंडा आणि आफ्रिकन वाईल्ड बफेलो या ‌‘बिग फाईव्ह‌’ प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहता येतं. मादागास्करमध्ये लेमूर पाहण्याचा अनुभव घेता येतो, तर युगांडा आणि रवांडामध्ये गोरिला ट्रॅकिंग मोहिमाही अविस्मरणीय ठरतात. विचारपूर्वक आखलेल्या या सुनियोजित टूर्स पर्यटकांना भारतातील जंगलांपासून आफ्रिकेच्या विस्तीर्ण गवताळ प्रदेशांपर्यंत सहजतेने प्रवास करण्याचा पर्याय देतात.

वन्यजीव संवर्धनाची जाणीव, निसर्गाचं वैभव आणि रानातल्या प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा थरार या सगळ्यांचा सुंदर मिलाफ म्हणजे या टूर्स! मग तुम्हाला यातल्या कोणत्या टूरवर जायचंय?

 

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
सांताक्लॉज म्हणतोय, चलो!
8 mins, read

सांताक्लॉज म्हणतोय, चलो!

Published in Sakal Saptarang 29th November 2026 आखिर साल में, एक हॉलिडे तो बनता ही है!   जगभरातला झगमगाट! ख्रिसमस हा कोण्या एका देशापुरता मर्यादित असलेला फेस्टिव्हल नाही. डिसेंबरमध्ये तुम्

पिक्चर अभी बाकी है...
8 mins, read

पिक्चर अभी बाकी है...

Published in Maharashtra Times 29th November 2026 मीटोकियोला पाचपेक्षा जास्त वेळा भेट दिली आहे आणि मी अगदी खात्रीने सांगू शकतो की पहिल्या भेटीत मी खऱ्या अर्थाने टोकियो पाहिलंच नव्हतं. म्हणजे पहिल्य

निसर्गाची गुलाबी उधळण जपान
8 mins, read

निसर्गाची गुलाबी उधळण जपान

Published in Sakal Saptarang 22nd November 2026 मोनो नो अवेअर दरवर्षी वसंत ऋतूचं आगमन होताच जपानमध्ये संपूर्ण देशावर जणू गुलाबी रंगाची उधळण होते. झाडांच्या फांद्यांवर उमललेली नाजूक गुलाबी फुलं,

Travel Memories Shared
by 9.9 Lakh+ Travellers

Rated 5.0 16.3K+ reviews10.1L+ Happy guests81.5K+ Tours completed

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!