Contact Us

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

पिक्चर अभी बाकी है...

12 mins. read
Neil Patil
Neil Patil
12 Mins Read
November 27, 2026
November 27, 2026

Quick Summary

टोकियोला पहिल्यांदा भेट दिल्यावर शिबुया, शिंजुकु, सेन्सो जी आणि शिंकान्सेनसारखी लँडमार्क्स पाहूनही शहराची खरी ओळख चुकू शकते.

दुसऱ्या भेटीत युराकुचोमधल्या ट्रेन ट्रॅकखालील याकितोरी जॉइंटसारखी लपलेली ठिकाणं शोधण्यासाठी वेळ काढा.

टोकियोमध्ये निवांतपणे फिरा, कारण कन्व्हिनियन्स स्टोअरमधला ऑनगिरी स्नॅक घेतानाही जाणवणारी शांतता तुमच्या आयटिनरीत नसते.

‘टू ट्रिप रुल’ लक्षात ठेवा: पहिली ट्रिप म्हणजे ट्रेलर, तर दुसऱ्या ट्रिपमध्ये शहराचा रिदम आणि व्यक्तिमत्त्व जाणवायला सुरुवात होते.

पहिल्या भेटीत लॉजिस्टिक्स आणि फोटोवर जास्त ऊर्जा खर्च होऊ शकते, त्यामुळे दुसऱ्या वेळी कमी ठिकाणं पण खोल अनुभव घ्या.

मेलबर्नसारख्या शहरातही चेकलिस्टशिवाय दुसऱ्या भेटीत गल्ली, स्ट्रीट आर्ट आणि लोकांचं दैनंदिन आयुष्य खऱ्या अर्थाने दिसतं.

Published in Maharashtra Times 29th November 2026

मीटोकियोला पाचपेक्षा जास्त वेळा भेट दिली आहे आणि मी अगदी खात्रीने सांगू शकतो की पहिल्या भेटीत मी खऱ्या अर्थाने टोकियो पाहिलंच नव्हतं. म्हणजे पहिल्या वेळेला मी सगळी महत्त्वाची आकर्षणं पाहिली. शिबुया क्रॉसिंगवर जाऊन आलो, शिंजुकुमध्ये रामेन नूडल्स खाल्ल्या, सेन्सो जी मंदिरासमोर उभं राहून, इतरांप्रमाणेच माझा फोटो काढला, शिंकान्सेन बुलेट ट्रेनने प्रवास केला आणि घरी परतल्यावर सगळ्यांना सांगितलंही की जपानची भेट हा किती विलक्षण अनुभव होता आणि तो खरोखरच तसा होताही. पण मी जेव्हा दुसऱ्यांदा परत जपानला गेलो, तेव्हा मात्र मी कोणत्याही लिस्टनुसार ठिकाणं बघितली नाहीत आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मला टोकियो दिसलं. या भेटीत मला युराकुचोमधल्या ट्रेन ट्रॅकच्या खाली असलेला एक लहानसा ‌‘याकितोरी जॉइंट‌’ सापडला. तिथे शेगडीवर भाजल्या जाणाऱ्या पदार्थांचा दरवळ हवेत पसरला होता. आणि डोक्यावरून जाणाऱ्या ट्रेन्सचा खडखडाट त्या वातावरणात एक वेगळीच लय मिसळत होता.

मी एक पूर्ण दुपार यानाका या जुन्या परिसरात घालवली. हा टोकियोचाच भाग असूनही इथे असं वाटतं की इथलं आधुनिकिकरण करायचं राहूनच गेलं आहे. चिंचोळे रस्ते, लाकडी जुनी घरं, भिंतीवर बसलेल्या मांजरी आणि एखाद्या उद्यानात फिरावं तसे फिरणारे स्थानिक लोक असलेली शांत स्मशानभूमी... टोकियोच्या पहिल्या भेटीत ज्या गोष्टी माझ्या नजरेतून निसटल्या होत्या, त्या दुसऱ्या वेळी मला जाणवू लागल्या. मग तो एखाद्या कन्व्हिनियन्स स्टोअर्समध्ये मध्यरात्री तुम्ही फक्त एक ‌‘ऑनगिरी‌’ स्नॅक घेतलंत तरी कमरेत झुकून अभिवादन करणारा तिथला कर्मचारी असेल किंवा 1 कोटी 40 लाखांची लोकसंख्या असलेल्या टोकियो शहरात जाणवणारी विलक्षण शांतता असेल... यातली कुठलीच गोष्ट माझ्या टूर आयटिनरीमध्ये नव्हती. ती तशी असूच शकत नव्हती, कारण एखाद्या शहरात काय काय पाहायचं याचा विचार करणं थांबवून जेव्हा तुम्ही त्या शहरात निवांतपणे राहण्याचा प्रयत्न करता, तेव्हाच हे तुमच्या नजरेस पडतं आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा एखाद्या शहराला भेट देता, तेव्हाच हे शक्य असतं. मी याला ‌‘टू ट्रिप रुल‌’ म्हणतो. मी जितका जास्त प्रवास करतोय, तितका हा नियम खरा असल्याची माझी खात्री पटत्ये. म्हणूनच एखाद्या ठिकाणी दुसऱ्यांदा गेल्यावरच तुम्हाला त्या ठिकाणाची खरी ओळख पटते यावरचा माझा विश्वास वाढतोय.

पहिली ट्रिप हा ट्रेलर असतो: कोणत्याही ठिकाणाला तुम्ही दिलेली पहिली भेट म्हणजे जणू पूर्ण सिनेमाचा छोटासा ट्रेलरच असते. पहिल्या भेटीत तुम्ही ते ठिकाण जाणून घ्यायचा प्रयत्न करीत असता. त्यावेळी तुम्ही आधी फोटोंमधून बघितलेले लँडमार्क्स टिक करता. पहिल्या वेळी मेट्रो कुठे आहे, कोणत्या एक्झिटने बाहेर पडायचंय, मला हवं आहे ते रेस्टॉरंट हेच आहे का त्याच्यासारख्या नावाचं हे भलतंच रेस्टॉरंट आहे अशा लॉजिस्टिक्समध्ये तुमची सगळी उर्जा खर्च होत असते. तुम्ही बदललेल्या वेळेशी जुळवून घेत असता, नवीन चलनाचा हिशोब समजून घेत असता आणि ज्या वेळेत फक्त चारच ठिकाणं बघू शकता, त्यात सतरा ठिकाणं पाहण्याचा अट्टहास करीत असता. पहिल्या वेळी सगळंच नवं नवं असल्याने एक्साइटमेंट जरा जास्तच असते, पण ‌‘प्रत्येक गोष्ट नवीन असणं‌’ याचा अर्थ हा सुद्धा होतो की तुम्ही फक्त वरवरचा अनुभव घेत आहात. तुम्ही बरंच काही बघता, पण त्यातलं फारसं काही तुमच्या मनात आतपर्यंत पोहोचत नाही. तुम्ही भरपूर फोटो आणि आठवणी घेऊन परत येता खरे, पण जर तुम्हाला कोणी विचारलं की त्या ठिकाणाचा फील कसा होता? त्याची गती, त्याचा ऱ्हिदम, त्या ठिकाणाचं व्यक्तिमत्त्व कसं होतं, तर तुम्हाला पटकन नाही सांगता येत. मग गाइडबुकमध्ये जे लिहिलेलं आहे, तेच तुम्ही तुमच्या शब्दात सांगता. मात्र दुसऱ्या ट्रिपमध्ये त्या ठिकाणाची नेमकी ओळख व्हायला सुरुवात होते.

मेलबर्नने मला हे शिकवलं: मी मेलबर्नमध्ये चार वर्षं राहिलोय. पर्यटक म्हणून थोडा काळ जाणं आणि काही वर्षं एखाद्या ठिकाणी राहणं यात खूप फरक असतो. पण तिथे राहायला जाण्याआधी मी दोन वेळा मेलबर्नला भेट दिली होती. या दोन ट्रिप्समध्ये मी जो फरक अनुभवला, तो मी कधीच विसरू शकणार नाही. पहिल्या वेळी गेलो असताना मी ग्रेट ओशन रोडवर प्रवास केला, फेडरेशन स्क्वेअरभोवती फेरफटका मारला, क्वीन व्हिक्टोरिया मार्केटला भेट दिली आणि एका ब्लॉगवर ज्याची शिफारस वाचली होती त्या कॅफेमध्ये ब्रंच केला. अशा प्रकारे मी मेलबर्नची माझी चेकलिस्ट पूर्ण केली. सुंदर शहर, झकास कॉफी आणि झालं सुद्धा माझं मेलबर्न बघून. पण दुसऱ्यांदा गेलो तेव्हा माझ्याकडे कोणतीही चेकलिस्ट नव्हती आणि त्याच वेळेला मला मेलबर्नची खरी ओळख झाली. ज्या गल्लीकडे पहिल्या भेटीत माझं लक्षही गेलं नव्हतं, अशा एका गल्लीत मी शिरलो आणि तिथे मी जी स्ट्रीट आर्ट बघितली, तेवढी उत्तम कला मी त्याआधी कोणत्याच आर्ट गॅलरीमध्येही बघितली नव्हती. फिट्झरॉय इथल्या एका कॅफेत मी दोन तास बसून फक्त आजूबाजूचं दृश्य बघत होतो. माझ्यासमोर तिथल्या लोकल्सचा जणू दिनक्रमच उलगडत होता. येणारे-जाणारे लोक, सायकलवरुन फिरणारे स्थानिक, कुत्र्याला फिरवायला आलेले लोक आणि वर्तमानपत्र वाचणारे लोक... माझ्या चेकलिस्टमध्ये होतं म्हणून मी सेंट किल्डाला ट्रामने गेलो नाही, तर हॉटेलवर मला कुणीतरी म्हणालं की ‌‘तुम्ही सेंट किल्डाला जा, तुम्हाला ते नक्की आवडेल‌’, म्हणून मी तिथे गेलो आणि मला ते आवडलं सुद्धा.

माझ्या पहिल्या आणि दुसऱ्या ट्रिपच्या मधल्या काळात मेलबर्न जराही बदललेलं नव्हतं, पण माझ्यात बदल झाला होता. पहिल्या भेटीच्या वेळी मी फक्त नवनवीन अनुभव गोळा करणारा एक पर्यटक होतो, पण दुसऱ्या भेटीत मात्र काही दिवसांसाठी का होईना, मी त्या शहराच्याच रोजच्या जगण्याचा एक भाग झालो होतो आणि त्यामुळेच त्या शहरानेही मला त्याचं एक वेगळंच रूप दाखवलं.

दुसऱ्या ट्रिपमध्ये नेमकं काय बदलतं?: जेव्हा तुम्ही एखाद्या डेस्टिनेशनला परत जाता, तेव्हा काय होतं हे आता माझ्या नेमकं लक्षात आलंय आणि जर तुम्हीही वारंवार प्रवास करीत असाल तर माझ्याशी सहमत व्हाल.

तुम्ही रांगा टाळता:  म्हणजे तुम्ही रांग मोडत नाही, तर शब्दशः रांग टाळून पुढे जाता. कारण सगळं काही बघितलंच पाहिजे हे प्रेशर घेणं तुम्ही थांबवता. तुम्ही सॅग्रादा फॅमिलिया आधीच बघितलेलं असल्याने, यावेळी बार्सिलोनामधली सकाळ तुम्ही बोकेरिया मार्केटमध्ये निवांतपणे घालवता. आधीच्या ट्रिपमध्ये तुम्ही न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर पाहिलेला असल्याने दुसऱ्या वेळी तुम्ही अप्पर वेस्ट साईडला एक चक्कर मारता. तिथे तुम्हाला एक वेगळंच शहर बघायला मिळतं, अधिक शांत, हिरवंगार आणि गजबजलेल्या टाईम्स स्क्वेअरपेक्षा अगदी वेगळं!

तुमचे खाण्यापिण्याचे अनुभव बदलतात: तुमच्या पहिल्या ट्रिपमध्ये इंटरनेटवर सुचवलेल्या ठिकाणी खाणं होतं, पण दुसऱ्या भेटीत मात्र तुम्ही अशा ‌‘सुचवलेल्या‌’ ठिकाणांऐवजी सहज रस्त्यात दिसलेल्या ठिकाणांमध्ये जेवता. हनोईमधला एका छोट्याशा स्टॉलवर मिळालेला फो असो किंवा बार्सिलोनाच्या ग्रासिया परिसरातील पाटीही नसलेल्या, अवघ्या चारच टेबल्सच्या वाइन बारमधलं जेवण, माझ्या काही सर्वोत्तम खाद्यआठवणी, या एखाद्या ठिकाणाच्या दुसऱ्या भेटीतल्या आहेत. पहिल्या भेटीत तुम्ही परिचित पर्याय ट्राय केलेले असतात, त्यामुळे दुसऱ्या ट्रिपमध्ये तुम्हाला इन्स्टिंक्टवर भरवसा ठेवून अधिक आकर्षक असं काही अनुभवता येतं.

नेहमीच्या गोष्टीतलं वेगळेपण जाणवतं: ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पहिली ट्रिप ही नेहमीच असामान्य गोष्टींसाठी असते. ऐतिहासिक स्मारकं, निसर्गदृश्य, आयुष्यात एकदाच येणारे क्षण आपण पहिल्या भेटीत पाहून घेतो. दुसरी ट्रिप मात्र साध्या साध्या गोष्टींसाठी असते. तिथले लोकल्स रोज कसा प्रवास करतात, ते ब्रेकफास्टला काय खातात, पर्यटकांची वर्दळ सुरू व्हायच्या आधी सकाळी 7 वाजता ते शहर काय करीत असतं अशा गोष्टी आपल्याला जाणवतात आणि त्याच अधिक इंटरेस्टिंग असतात, कारण त्यातूनच त्या ठिकाणाचं खरं व्यक्तिमत्त्व समोर येतं. आयफेल टॉवर तुम्हाला 1889 मधल्या पॅरिसबद्दल सांगतो, तर एखादा पॅरिसचा रहिवासी ज्या पद्धतीने कॉफी ऑर्डर करतो त्यावरुन तुम्हाला आजचं पॅरिस कळतं.

त्या ठिकाणाशी तुमचं नातं जुळतं: हे ऐकायला जरा ऑड वाटेल पण हे खरं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या शहरात पुन्हा जाता, तेव्हा ते शहर तुमच्यासाठी अनोळखी नसतं. आता तुम्हाला त्या शहराची रचना ओळखीची असते. एखाद्या रस्त्याचा कोपरा तुम्हाला आठवत असतो. स्टेशनच्या कोणत्या बाजूला एक्झिट आहे हे तुम्हाला माहीत असतं. त्यामुळे मग हे तपशील शोधण्यात तुमचा मेंदू गुंतून राहत नाही आणि त्या ऐवजी तुम्ही पहिल्या ट्रिपमध्ये तुमच्या नजरेतून निसटलेले बारीकसारीक तपशील, त्या शहराचा पोत अशा अनेक गोष्टींची नोंद घेऊ लागता. त्यामुळे ते ठिकाण केवळ पोस्टकार्डवरील चित्र न राहता, खऱ्या अर्थाने अनुभवता येतं.

वेगळ्या ठिकाणी न जाता, जुन्याच ठिकाणी परत का जायचं? तुमच्यापैकी काहींना वाटेल की आयुष्य मर्यादित आहे आणि जग अतिशय विशाल. जगभरात 195 देश आहेत आणि मला त्यातले जास्तीत जास्त बघायचेत. मग अजून पोर्तुगाल बघायचा बाकी असताना बार्सिलोनाला परत का जायचं? व्हिएतनामला परत जाण्यापेक्षा कंबोडियाचा विचार का नाही करायचा? अर्थात तुमचा प्रश्न रास्त आहे. मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही कधी नवीन ठिकाणी जाऊच नये, उलट तुम्ही जायलाच हवं. मला हे म्हणायचंय की किती देश पाहिले या नकाशावरच्या खुणा वाढवण्याच्या स्पर्धेत आपण आधी पाहिलेले देश समजून घ्यायला तर कमी पडत नाही ना? याचा विचार करायला हवा.

मी अशा पर्यटकांना भेटलो आहे, ज्यांनी जगभरातील 40 देशांना भेट तर दिलीये, पण त्यातल्या एकाही देशाबद्दल, ते तिथे कोणत्या हॉटेलमध्ये राहिले आणि त्यांनी तिथल्या कोणत्या मॉन्युमेंट्सचे फोटोज्‌‍ काढले यापेक्षा अधिक काहीही सांगू शकले नाहीत. या उलट मी अशाही लोकांना भेटलो आहे ज्यांनी पाचच देश बघितलेत, त्यातल्या तीन देशांना एकापेक्षा अधिक वेळा भेट दिली आहे. पण हे लोक असे किस्से सांगतात की ऐकताना वाटतं तुम्ही सुद्धा त्यावेळी त्यांच्याबरोबर होतात. या दुसऱ्या प्रकारातले लोक जरा कमी प्रवास करतात, पण अधिक गोष्टी अनुभवतात. प्रवासातला हा विरोधाभासच किती सुंदर आहे!

हा नियम कुठे लागू होतो?: प्रत्येक ठिकाणी काही दुसऱ्यांदा जाण्याची गरज नसते. काही ठिकाणं एकदाच भेट देण्यासाठी असतात आणि त्यात काही चूक नाही, पण काही देश आणि शहरं दुसऱ्या भेटीत इतकी सुंदर उलगडतात की पहिली भेट फक्त पूर्वतयारीसाठी असते याबद्दल मी ठाम आहे. माझ्या या यादीत टोकियो सर्वात वरच्या स्थानावर आहे. तीच गोष्ट बार्सिलोनाची. या शहराला इतके वेगवेगळे पैलू आहेत की एका भेटीत तुम्हाला त्याची जेमतेम ओळखच होऊ शकते. व्हिएतनामचीही दुसरी भेट मस्ट आहे. विशेषतः जर पहिल्या वेळी तुम्ही हनोई-हालाँग बे-हो चि मिन्ह सिटी हा क्लासिक रूट केला असेल आणि सेंट्रल कोस्ट अजिबातच पाहिला नसेल तर दुसरी भेट हवीच. न्यूयॉर्कही प्रत्येक भेटीत नव्याने भेटणारं शहर आहे. तुम्ही कोणत्या बरोमध्ये राहताय यावर न्यूयॉर्कचा चेहरा बदलतो आणि खरं तर भारतातही राजस्थान किंवा केरळसारख्या ठिकाणी एकदा भेट दिली असली तरी दुसरी ट्रिप कराच. माझी खात्री आहे तुम्हाला त्यांचं वेगळंच रुप अनुभवायला मिळेल

टू ट्रिप रूल म्हणजे केवळ दोनदा प्रवास करण्याचा नियम नाही. पहिल्यांदा एखाद्या ठिकाणी भेट देणारी व्यक्ती आणि पुन्हा एकदा तिथे गेलेली व्यक्ती यांच्यात जो फरक असतो तो इथे महत्त्वाचा आहे. या फरकामुळेच तर तुमचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही जे शोधत असता ते आणि परत जाताना सोबत घेऊन जाता, तेही बदलतं.

पुन्हा एकदा, त्याच ठिकाणी : तर माझ्या या सगळ्या अनुभवांमधून मी हेच शिकलो आहे की जर एखाद्या डेस्टिनेशनला तुम्ही फक्त एकदाच भेट दिली असेल, तर ती एखाद्या अपूर्ण संभाषणासारखी असते. तुम्ही तिथे गेलात, स्वतःची ओळख करुन दिलीत, थोडं औपचारिक बोललात आणि खऱ्या अर्थाने बोलणं सुरू होण्यापूर्वीच तुम्ही तिथून निघून आलात. पर्यटनाबद्दलचा माझा असा दृष्टिकोन ज्या ठिकाणांमुळे निर्माण झाला ती ठिकाणं म्हणजे टोकियो, मेलबर्न, बार्सिलोना, हनोई. ही सगळी शहरं अशी आहेत की ज्यांचं अंतरंग समजून, त्यांचं कौतुक करायला एक भेट पुरतच नाही. ही अशी ठिकाणं आहेत जिथे मी पुन्हा पुन्हा गेलो, तिथे रमलो. तिथून घरी परतताना माझ्याकडे आधी नसलेली अशी एक गोष्ट होती ती म्हणजे फोटो किंवा सोव्हेनियर नाही, तर वेगळा दृष्टिकोन! दुसरी ट्रिप तुम्हाला हेच तर देते. ती तुम्हाला त्याच ठिकाणचा एक वेगळा अनुभव देते. एखाद्या ठिकाणची दुसरी भेट म्हणजे तुमची त्या ठिकाणाशी झालेली जणू नवी ओळखच असते. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात...

ऐकावं ते नवलच! : वीणा वर्ल्डने फ्लाइट बुकिंग सुविधा सुरू केल्यापासून मी एअरलाइन्स आणि त्यांचं नियोजन कसं होतं याविषयीच्या रंजक गोष्टींचा शोध घ्यायला लागलोय. फ्लाइट रूट्स, एअरपोर्टस्‌‍ची रचना, रनवे इंजिनियरिंग अशा गोष्टी, ज्या खरंतर तांत्रिक असल्याने फारशा रंजक असणार नाहीत असं मला वाटायचं, त्या फारच इंटरेस्टिंग वाटताहेत आणि या आठवड्यात मला समजलेल्या अशाच एका गोष्टीमुळे मी थक्क झालोय. ही गोष्ट आहे जिब्राल्टरबाबत. जिब्राल्टर म्हणजे स्पेनच्या दक्षिण टोकाशी असलेला, ब्रिटिशांच्या ताब्यातला एक लहानसा प्रदेश. हा इतका छोटा आहे की तिथे स्वतंत्रपणे रनवे बांधण्यासाठी जागाच नव्हती. मग त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्पेनच्या मुख्य भूमीला जोडणाऱ्या एकमेव मुख्य रस्त्यावरच हा रनवे बांधला. काही काळाने वाहनांसाठी एक बोगदा तयार करण्यात आला, पण पादचाऱ्यांचं काय? तर आजही इथे विमानतळाच्या धावपट्टीवरून पादचारी चालत रस्ता ओलांडतात. जेव्हा एखादं विमान उतरणार असेल तेव्हा बॅरियर्स लावले जातात आणि विमान उतरल्यावर बॅरियर्स बाजूला केले की लोक रस्ता ओलांडतात. म्हणजे एकाच वेळी तिथे एअरपोर्टही आहे आणि पादचाऱ्यांसाठीचा रस्ताही!

या रनवेवरुन जेव्हा तुमचं विमान उड्डाण करतं, तेव्हा रनवेच्या एका टोकाला मेडिटेरेनियन सी असतो, दुसऱ्या टोकाला अटलांटिक महासागर असतो. तुमच्या डाव्या बाजूला स्पेन असतं, तर तुमच्यासमोर चौदा किलोमीटरवर मोरोक्को असतं आणि या सगळ्यावर 426 मीटर्सचा बुलंद, भक्कम लाईमस्टोनचा पहाड  ‌‘रॉक ऑफ जिब्राल्टर‌’ जणू पहारा देत उभा असतो. जिथे युरोप खंड संपतो आणि आफ्रिका खंड सुरू होतो अशा दोन खंडांमधल्या गॅपमधून तुम्ही टेक ऑफ घेता. यापेक्षा अधिक थरारक एक्झिट जगातल्या अन्य कोणत्याही एअरपोर्टवरून घेता येत नाही.

 

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
निसर्गाची गुलाबी उधळण जपान
12 mins, read

निसर्गाची गुलाबी उधळण जपान

Published in Sakal Saptarang 22nd November 2026 मोनो नो अवेअर दरवर्षी वसंत ऋतूचं आगमन होताच जपानमध्ये संपूर्ण देशावर जणू गुलाबी रंगाची उधळण होते. झाडांच्या फांद्यांवर उमललेली नाजूक गुलाबी फुलं,

डिसेंबरनंतर कुठे?
12 mins, read

डिसेंबरनंतर कुठे?

Published in Maharashtra Times 22nd November2026 ...त्यामुळे सिंहांसारख्या शिकारी प्राण्यांसमोर एकाच वेळी असंख्य पिल्लं असली, तरी त्यांना मर्यादित संख्येनेच शिकार करता येते. परिणामी, अनेक पिल्लं या

अँडीज ते ॲमेझॉन
12 mins, read

अँडीज ते ॲमेझॉन

Published in Loksatta Lokrang 22nd November 2026 ...गरमागरम पेरुव्हियन कॉफीचा जसा आस्ते आस्ते आस्वाद घ्यायचा असतो, तसंच हे शहरही शांतपणे आपल्या मनात झिरपून घ्यावं लागतं...   बघ... तो थुं

Travel Memories Shared
by 9.9 Lakh+ Travellers

Rated 5.0 16.3K+ reviews10.1L+ Happy guests81.5K+ Tours completed

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!