Published in Maharashtra Times 27th September 2026
...तिथे अशा विसरलेल्या वस्तूंमुळे एअरपोर्टवर किंवा प्रवासात किंवा एका वेगळ्या देशात अपरात्री मोठा प्रश्न उभा राहू शकतो. म्हणून बारकाईने पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की...
मी भरपूर प्रवास करतो. या माझ्या प्रवासात, अलीकडे मी एअरपोर्टस्वर जरा विचित्र वाटेल अशी एक गोष्ट करू लागलो आहे. तिथे थांबून वाट पाहताना, डिपार्चरचा बोर्ड पाहण्याऐवजी किंवा माझ्या फोनमध्ये डोकं खुपसून बसण्याऐवजी, मी चेक-इनच्या रांगेकडे बघत बसतो. आणि हे असं अनेकदा केल्यामुळे एक भलतीच इंटरेस्टिंग गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. ज्या क्षणी एखादी व्यक्ती आपली बॅग वजन काट्यावर ठेवते, तेव्हाच तिच्याविषयी तुम्हाला काहीतरी कळतं. तिचा संकोच, तिचा आत्मविश्वास, वजन कमी जास्त करण्यासाठी चटकन उघडलेली बॅगेची झिप या सगळ्यातून ती व्यक्ती प्रवास कसा करते ते इतर कशाहीपेक्षा अधिक नेमकेपणानं कळतं. कोणत्याही दोन बॅगा जशा सारख्या दिसत नाहीत, त्याचप्रमाणे प्रवासाकडे बघण्याचे दोन व्यक्तींचे दृष्टीकोन कधीही सारखे नसतात.
चेक इन काउंटरवरच्या ह्याच क्षणांमध्ये लोकांच्या प्रवासाची स्टाइल उघड होते, असं माझ्या लक्षात आलंय. त्यासाठी ते कोणत्या ठिकाणी जात आहेत हे समजण्याची गरज नसते, फक्त त्यांनी आपली बॅग कशी भरली आहे हे पाहूनच त्यांना कसा प्रवास करायला आवडतो, त्यांनी किती प्लॅनिंग केलं आहे आणि जेव्हा ते प्रवासाला निघतात तेव्हा त्यांच्या प्रायोरिटीज काय असतात हे सगळं लक्षात येतं. आणि एकदा का तुम्ही हे न्याहाळू लागलात की मग त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. मला जे वेगवेगळे प्रकार दिसले त्यांचं मग मी सहजच वर्गीकरण करू लागलो. यातल्या प्रत्येक स्टाइलमागे काहीतरी लॉजिक असतं आणि माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर मी यातल्या बहुतेक गोष्टी केल्या आहेत.
यातला पहिला प्रकार? तो तुम्ही नक्कीच बघितला असणार. कदाचित तुम्हीही त्यातलेच एक असाल.
‘काही लागलंच तर...’ प्रकारचे पर्यटक
बहुतेक सगळ्या चेक इन काउंटरवर तुम्हाला हे प्रवासी दिसतात. त्यांची बॅग वजन काट्यावर चढते आणि जणू सगळं जगच काही क्षणासाठी थांबतं, कारण ते वजनाचे आकडे अगदी लक्षपूर्वक पाहत असतात. जर वजनाची मर्यादा ओलांडली गेली तर लगेच बॅग उघडली जाते. आतलं जॅकेट बाहेर येतं, कधी शूज केबिन बॅगमध्ये हलवले जातात. काही वेळा तर अगदी काहीशे ग्रॅमसाठी सामानाची हलवाहलवी केली जाते. जगात सर्वत्र पाहायला मिळणारा हा पॅटर्न आहे. यात प्रवासातील सगळ्या शक्यता लक्षात घेऊन पॅकिंग केलं जातं. म्हणजे जर प्लॅन बदलला तर जास्तीचे कपडे, घातलेले शूज जर कम्फर्टेबल नाही वाटले तर दुसरे असलेले बरे, म्हणून घेतलेले शूज, जी वापरायची कधी वेळच येणार नाही अशी औषधं बरोबर घेणं या गोष्टी येतात. अर्थात या वागण्यामागे लॉजिक आहे. प्रवास म्हणजे अनिश्चितता आणि त्याचं पॅकिंग म्हणजे या अनिश्चिततेसाठी तयार राहणं. सगळ्यात मजेदार भाग म्हणजे या ‘जस्ट इन केस’ म्हणून घेतलेल्या वस्तू सहसा वापरायची वेळच येत नाही. फ्रिक्वेंटली प्रवास करणारे नेहमीच सांगतात की कितीही कपडे बरोबर नेले तरी ते अनेकदा तेच तेच कपडे परत परत वापरतात. मात्र तरीही थोडं जास्तीचं बरोबर घेण्याचा मोह काही सुटत नाही.
याचा परिणाम तुमच्या सगळ्या ट्रिपवर होतो. बॅग्ज जड असल्या की वेग मंदावतो, विशेषतः जिथे नेहमीपेक्षा जास्त चालावं लागणार असतं अशा ठिकाणी. युरोपमधले दगडी फरसबंदीचे रस्ते, रेल्वे स्टेशनवरचे जिने किंवा गर्दीने भरलेल्या एअरपोर्टची नुसती कल्पना करून बघा. या बॅग्जमुळे छोट्या छोट्या, पण सतत सतावणाऱ्या अडचणी वाढतात त्या वेगळ्याच. बॅगेज क्लेमपाशी जास्त वेळ थांबावं लागतं. परत येताना वजनाची मर्यादा सांभाळण्याची कसरत करावी लागते, आणि जर तुम्ही भरपूर शॉपिंग केलं असेल तर मग आणलेल्यातलं काय मागे सोडायचं हे ठरवणं कठीण होऊन जातं.
आणि तरीही अशा प्रकारे पॅकिंग करण्याची पद्धत सुरूच राहते, कारण त्यामुळे आपल्याकडे सगळं असल्याचं जे फीलिंग येतं ते समाधानाचं असतं. जेव्हा आपल्याजवळ जास्तीच्या गोष्टी असतात, तेव्हा येणाऱ्या कोणत्याही प्रसंगासाठी आपण तय्यार आहोत ही भावना बळ देते. मात्र वजनाचा आकडा तपासणं, बॅगेतील सामानाची फिरवाफिरवी आणि सगळं काही वजन मर्यादेत बसवण्याची धडपड, यामुळे चेक इन काउंटरवर मात्र जरा गोंधळल्यासारखं होतं. हे अगदी नेहमीचं दृश्य आहे. अनेकांचा प्रवास नेहमी असाच सुरू होतो.
मिनिमलिस्ट
काही लागलंच तर... या विचारसरणीच्या प्रवाशापासून काही अंतरावर त्याच लाइनीत एक जण असाही उभा असतो, ज्याचा दृष्टीकोन अगदी वेगळा असतो. त्याच्याकडे फक्त एकच बॅग असते. कधी लहानशी सुटकेस, तर कधी फक्त बॅकपॅक. ती वजन काट्यावर ठेवली जाते, ती अगदी अचूक वजन मर्यादेची असते आणि काही सेकंदात त्याचं चेक इन पूर्ण होतं. वजनाची काळजी नाही, वस्तूंची हलवाहलव नाही की फेरविचार नाही. मजेची गोष्ट ही, की कमी बॅगेज म्हणजे कमी प्रवास असं नाही, तर एका वेगळ्या विचारानं प्रवास करणं. ज्यांना नेहमी प्रवास करावा लागतो, ते लोक हळूहळू या पद्धतीकडे वळतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे ट्रिपवर खरंच काय लागतं आणि काय नसलं तरी चालतं याचा त्यांना नेमका अंदाज आलेला असतो. काही प्रवासांनंतर बरोबर काय घ्यायचं याचा पॅटर्न स्पष्ट होऊ लागतो. कोणते कपडे सुटकेसमधून कधीच बाहेर निघत नाहीत, कोणत्या गोष्टी न उघडताच परत आणल्या जातात हे समजत जातं, तसं हळूहळू नेण्याच्या वस्तूंची यादी अधिक काटेकोर होत जाते.
सगळ्यात मोठा फरक प्रवासादरम्यान दिसतो. बॅगा कमी असल्या तर त्या नेणं सोपं जातं. तुम्ही फ्लाइटमधून उतरल्यानंतर लगेजसाठी न थांबता सरळ बाहेर पडू शकता. हॉटेल बदलणं किंवा गजबजलेल्या रस्त्यांवरुन चालणं अशा साध्या गोष्टीही एकदम सोप्या होऊन जातात. कमी बॅगांमुळे वेळेची जी बचत होते ती अनेकदा लक्षात येत नाही. बॅगेज क्लेमसाठी एअरपोर्टनुसार अनेकदा 20 ते 40 मिनिटं थांबावं लागतं, तो वेळ वाचतो. जर तुम्ही अनेक शहरांना भेट देणार असाल तर हा वाचलेला वेळ किती मोठा आहे ते कळतं. जे प्रवासी चेक इन बॅगेज टाळतात, त्यांना कोणत्याही प्लॅनिंगशिवाय जास्तीचा भरपूर वेळ मिळतो.
अर्थात ही पद्धत वापरण्यासाठी आपल्याला एक प्रकारची शिस्त असावी लागते. यासाठी बरोबर न्यायच्या कपड्यांचं प्लॅनिंग अधिक बारकाईने करावं लागतं, नेलेल्यातलेच कपडे पुन्हा पुन्हा वापरावे लागतात. सगळ्यासाठी बॅक अप बरोबर नसेल तरी कम्फर्टेबल राहावं लागतं. पण अनेकांना जास्तीच्या बॅगेजच्या तोट्यापुढे ही तडजोड अधिक चांगली वाटते. भारतातील आघाडीच्या बँकर्सपैकी एक असलेला माझा मित्र सुमित, याच्यासोबत काही महिन्यांपूर्वी प्रवास करताना मी याचा अनुभव घेतला. विमानतळावरचा त्याचा वावर मला खूप काही शिकवून गेला. त्याच्याकडे एकच बॅग असते जी वजनाच्या मर्यादेत असते, त्यामुळे लगेज बेल्ट जणू त्याच्या प्रवासाचा हिस्साच नसतो. कुठलीही रांग, ताटकळणं, एखादा अनावश्यक टप्पा, एखादा अडथळा त्याला सहनच होत नाही. त्याविषयी तो उघडपणे काही बोलत नाही, पण ते लक्षात येतंच. लगेज सांभाळण्यात आपली एनर्जी आणि वेळ वाया घालवायचा नाही असं जणू त्याने ठरवूनच टाकलं आहे. मी जेव्हापासून त्याला ओळखतो, तेव्हापासून त्याला कधीही बॅग चेक इन करताना पाहिलेलं नाही. मला आजपर्यंत भेटलेल्या मिनिमलिस्ट प्रवाशाचं सर्वात उत्तम उदाहरण मी त्याच्या रूपात बघितलं आहे.
पेरेंट ट्रॅव्हलर
हा प्रवाशांचा एक अगदीच वेगळा प्रकार आहे, ज्याचा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला तो कळू शकत नाही. जेव्हा मी माझ्या मुलीला, रायाला बरोबर घेऊन प्रवास सुरू केला, तेव्हा पॅकिंगची जणू व्याख्याच बदलून गेली. चेक इन काउंटर्सवर आमच्या बॅग्ज इतरांसारख्याच दिसत होत्या, म्हणजे सुटकेस, केबिन बॅग्ज, एखादी स्ट्रोलर बॅग असंच, पण त्यांच्या आत जे भरलेलं होतं, ते मात्र अगदी वेगळं होतं. त्या प्रत्येक वस्तूमागे एक कारण होतं. जास्तीचे कपडे, लागलं तर खायचे पदार्थ, आवडते स्नॅक्स, औषधं, प्रवासात तिला गुंतवून ठेवायला छोट्या गोष्टी, यातल्या कशालाच पर्याय नव्हता. सगळं हवंच होतं, कारण जेव्हा तुम्ही लहान मुलांना बरोबर घेऊन प्रवास करता तेव्हा तुम्ही फक्त ट्रिपसाठी पॅकिंग करत नसता, तर परक्या ठिकाणी येऊ शकणाऱ्या अनपेक्षित अडचणींचा विचार करुन तयारी करीत असता.
जर सोलो ट्रॅव्हलर एखादी गोष्ट विसरला तर त्याची फक्त थोडी गैरसोय होते. तुम्ही ती गोष्ट विकत घेऊ शकता, तिच्याशिवाय काम चालवू शकता किंवा तुमचा बेत ॲडजस्ट करू शकता. लहान मुलं सोबत असताना मात्र अशी चूक करायला वावच नसतो. तिथे अशा विसरलेल्या वस्तूंमुळे एअरपोर्टवर किंवा प्रवासात किंवा एका वेगळ्या देशात अपरात्री मोठा प्रश्न उभा राहू शकतो. म्हणून बारकाईने पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की रांगेतील सर्वात शिस्तबद्ध पॅकिंग हे मुलांना बरोबर आणलेल्या पालकांनी केलेलं असतं. बॅगेतील वस्तू उपयोगानुसार ठेवलेल्या असतात. चेक इनमध्ये काय ठेवून चालेल आणि नेहमी काय लागणार आहे? याचा विचार करुन गरजेच्या वस्तू चटकन मिळतील अशा ठिकाणी ठेवल्या जातात. अगदी कोणती बॅग कुठे ठेवायची? याचाही विचार महत्त्वाचा ठरतो.
चेक इन काउंटरवर हे सगळं छोट्या छोट्या कृतींमधून दिसतं. बॅग्ज आत पाठवण्याआधी झटकन केलेली शेवटची तपासणी... अत्यावश्यक सगळ्या वस्तू केबिन बॅगमध्ये आहेत याची खात्री करताना घेतलेला एक हलकासा विराम... अशी मनातल्या मनात वस्तूंची केलेली उजळणी, ही कदाचित नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ घेते.
मी रायासोबत केलेले प्रवास आठवून हे सगळं लिहिलं आहे. पण सहा महिन्यांपूर्वी आमच्या कुटुंबात आणखी एका छोट्या बाळाचं, माझा मुलगा आरव याचं आगमन झालंय. आणि आता मला माहितीये की जेव्हा आम्हा चौघांचं कुटुंब प्रवासाला निघेल तेव्हा मला पुन्हा एकदा एक पालक म्हणून पॅकिंग कसं करायचं हे नव्याने शिकावं लागेल.
सिस्टीम पॅकर
या वेगवेगळ्या स्टाइल्समध्ये एक प्रवासी असाही असतो, जो पॅकिंगकडे एक प्रोसेस म्हणून बघतो. त्यांनी बॅग उघडताक्षणी हा फरक लक्षात येतो. सगळं जागच्या जागी असतं. कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घातलेल्या असतात, कधी त्यांचे रोल्स केलेले असतात. छोट्या छोट्या गोष्टी एकत्र ठेवलेल्या असतात. कागदपत्र, चार्जर्स, गरजेच्या वस्तू या अशा पद्धतीने ठेवलेल्या असतात की कपड्यांचे थर न विस्कटता त्या सहज मिळू शकतील.
बॅगेतल्या जागेचा सुयोग्य वापर व्हावा आणि अनपॅकिंग किंवा रिपॅकिंग करताना होणारा गोंधळ टळावा म्हणून पॅकिंग क्युब्ज, ऑर्गनायझर्स आणि कम्प्रेशन बॅग्ज अशी साधनं निर्माण केली गेली आहेत. पण या साधनांपलीकडे महत्त्वाचं असंत ते ट्रिपचं प्लॅनिंग. सिस्टीम पॅकर्स फक्त बरोबर काय घ्यायचं याचाच विचार करीत नाहीत, तर ते त्या गोष्टी किती वेळा लागतील, कुठे लागतील आणि त्या किती चटकन मिळतील या सगळ्याचा विचार करतात. मग फ्लाइटवर जे जॅकेट लागणार असतं, ते बॅगेच्या तळाशी ठेवलं जात नाही. टॉयलेटरीज अशा पद्धतीने ठेवल्या जातात की सिक्युरिटी चेकला त्रास होत नाही. केबिन बॅगेजमध्ये बदलण्यासाठी कपड्यांचा एक जोड ठेवणं ही गोष्ट सुद्धा मग नियोजनाचाच भाग होते.
या सगळ्याचा परिणाम संपूर्ण ट्रिपवर दिसून येतो. कोणत्या वस्तू कुठे आहेत हे नेमकं माहिती असल्याने हॉटेल चेक इन जलद होतं. कमी काळाचा मुक्काम असेल तर सगळं अनपॅक करण्याची गरज वाटत नाही. सतत लगेज लावावं लागत नसल्याने, दोन शहरांमधला प्रवास अधिक सुटसुटीत होतो. चेक इन काउंटर्सवर या प्रकारचे प्रवासी हे त्यांच्या बॅगच्या आकारामुळे नाही, तर सगळं काही स्मूथली होत असल्यामुळे उठून दिसतात. बॅग वजनाच्या काट्यावर जाते आणि झटक्यात चेक इन होऊन जातं, काही ॲडजस्ट करायचं नसतं की शेवटच्या क्षणाची धांदल नसते.
‘मी जमवून घेईन’ प्रकारचे पर्यटक
आणि मग अशा एका अशा प्रकारचे प्रवासी येतात, जे पॅकिंगकडे अगदी वेगळ्याच नजरेनं बघतात. चेक इन काउंटरवर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून ही वृत्ती दिसून येते. पटकन बॅग उघडून आतल्या गोष्टी चेक करणं, ‘मी ते घेतलंय का?’ असा प्रश्न पडून क्षणभर थांबणं, कधी कधी तर अगदी शेवटच्या क्षणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण विसरलोय हे लक्षात येणं...
हे प्रवासी नेहमी कमीच सामान घेतात, पण त्यामागे काही प्लॅनिंग नसतं. मग ते कधी चार्जर विसरतात, तर कधी जॅकेट बॅगेत भरायचं राहून जातं किंवा मग औषधं किंवा कागदपत्रांसारखी अत्यावश्यक गोष्टही मागे राहते. या अशा गोष्टींची उणीव घरात असताना जाणवत नाही, पण प्रवासात मात्र लगेच जाणवते. या प्रकारच्या प्रवाशांना एअरपोर्ट, हॉटेल लॉबीज आणि लोकल मार्केटमधून हव्या त्या गोष्टींचा पुरवठा सहजपणे होतो. मग ते त्यांच्याकडे घरी असलेल्या वस्तूच परत विकत घेतात, कारण त्या, ते बरोबर आणायला विसरलेले असतात. कधी ती लहानशी गैरसोय असते, तर कधीकधी मात्र ट्रिपच्या सगळ्या टाइमटेबलवरच त्याचा मोठा परिणाम होतो.
मजेचा भाग म्हणजे ही गोष्ट केवळ अनुभव नाही म्हणून घडत नाही, तर नेहमी प्रवास करणारे सुद्धा काही वेळा असंच वागताना दिसतात, कारण त्यांना एकतर खूप घाई झालेली असते किंवा त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी पॅकिंग केलेलं असतं. अर्थात यामागे एक मानसिकताही आहे. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी, प्रॉब्लेम आला की त्याचं सोल्युशन शोधण्याची वृत्ती, तयारी करण्यापेक्षा डेस्टिनेशनवर सगळं मिळेल हा भरवसा... यामुळे काही वेळा ट्रिपला एक उत्स्फूर्ततेचा रंग येतो, मात्र त्याची किंमत मोजावी लागते. नवीन ठिकाणी गरजेच्या गोष्टी शोधण्यात वेळ वाया जातो. घरी जे आहे त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागते. लहानशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्लॅनही बदलण्याची तयारी ठेवावी लागते.
तुमचा टाइप कोणता?
मग तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रवासी आहात असं तुम्हाला वाटतं? याचं एकच बरोबर उत्तर देता येईल असं नाही. आपल्यापैकी बहुतेक जण मिक्स टाइपमध्ये येतील, कारण आपला प्रवासाचा अनुभव, आपण कोणत्या प्रकारच्या ट्रिपवर गेलो आहोत आणि आयुष्यात आपण कोणत्या भूमिकेत आहोत यावर सगळं अवलंबून असतं. पण थोडा वेळ थांबून विचार करण्यासाठी हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तेव्हा आता पुढच्या वेळी बॅग्ज पॅक करताना तुम्ही त्या वेगळ्या प्रकारे करणार का? हाच प्रश्न विचारून आज थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!












































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.