India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

स्नान : एक कला!

9 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
9 Mins Read
August 31, 2026
August 31, 2026

Quick Summary

प्रागसारख्या शहरात फिरताना हॉटेलच्या बाथरूममधला ग्लास पाहून टूथब्रश आणि चूळ भरण्याच्या सवयीतील सांस्कृतिक फरक लक्षात आला.

जगभर फिरताना बाथरूमचा आकार आणि रचना दुर्लक्षित न करता पाहा, कारण त्यातून स्थानिक संस्कृती, इतिहास आणि ऐषोआरामाची मानसिकता कळते.

अंघोळीची सुरुवात नद्या, तलाव आणि समुद्रात डुबकी मारण्याच्या मूलभूत गरजेतून झाली असावी, आणि पुढे ती दैनंदिन संस्कार बनली.

रोमन थर्मेप्रमाणेच आजच्या वेलनेस स्पामध्ये स्टीम रूम, प्लंज पूल आणि मसाज सेंटरमुळे सामुदायिक आनंददायी अनुभव मिळतो.

स्वित्झर्लंड, बुडापेस्ट, स्लोव्हेनिया आणि ऑस्ट्रियातील वेलनेस बाथ्समध्ये हॉट स्प्रिंग्ज असल्याने खऱ्या अर्थाने आरोग्यदायी विश्रांती मिळते.

इजिप्तमध्ये स्नानविधींमध्ये स्वच्छता, सौंदर्य आणि अध्यात्म यांचा संगम दिसतो, आणि सुगंधी तेलं, अत्तरे, दूध व मधासारखे नैसर्गिक पदार्थ वापरले जात.

Published in Loksatta Lokrang 9th August 2026

...असं म्हणतात की, क्लिओपात्राच्या सौंदर्याचं रहस्य गाढविणीच्या दुधात होतं.

ती गाढविणीच्या दुधाने स्नान करीत असे. इजिप्तमध्ये धार्मिक उपचारआणि ऐषोआराम या दोन्हीत स्नान हा अविभाज्य घटक होता...

मीआणि माझी मुलगी सारा... आमची मागे एकदा सुट्टीत प्रागला जाण्याबद्दल चर्चा सुरू होती. प्रागचा विषय निघाला आणि इथे मी पहिल्यांदा गेले होते त्यावेळची आठवण निघाली. लंडनमध्ये शिकत असताना मी आणि माझी ग्रीक मैत्रीण, मरूसा, आम्ही वीकेंडला प्रागला फिरायला जाणार होतो. सकाळीच भटकंतीसाठी निघायचे अशा बेताने आमची हॉटेलच्या खोलीत आवराआवर सुरू होती. मरूसा दात घासून बाथरूममधून बाहेर आली. तिच्या हातात ग्लास होता. तिला चूळ भरण्यासाठी तो ग्लास हवा होता. हॉटेलच्या बाथरूममध्ये ग्लास का ठेवतात, हे तेव्हा माझ्या लक्षात आलं! आपल्याला हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन चूळ भरण्याची सवय असते. त्यामुळे माझ्या लेखी हॉटेलच्या बाथरूममधील ग्लास म्हणजे टूथब्रश, टूथपेस्ट ठेवण्याचे भांडे. गोष्ट तशी लहानशीच होती. पण त्यातून संस्कृतींमधला, सवयींमधला फरक माझ्या लक्षात आला. आणि विचार आला तो जगभरातल्या हॉटेल्समधील बाथरूम्सचा. हो, बाथरूम्सच! किती वेगवेगळ्या तऱ्हेची असतात ही... मग पर्यटक सुद्धा बाथरूम आवडले म्हणून अमुक एक हॉटेल निवडत असतील का? मी तर जगभरातल्या प्रवासात बेडरूमपेक्षा आकाराने मोठी असलेली बाथरूम्स पाहिली आहेत आणि जेमतेम शिरण्यास जागा आणि कसेबसे कोंबलेले बेसीन अशी स्थिती असलेल्या कॅप्सूल हॉटेलमध्येही मुक्काम केलाय. पर्यटनाच्या ठिकाणचे बाथरूम हा बरेचदा दुर्लक्षित राहणारा, पण तेवढाच आकर्षक भाग आहे. त्या त्या शहरातील बाथरूमचे आकार, रचना यावरून स्थानिक संस्कृती, इतिहास, परंपरा आणि ऐषोआरामाच्या संकल्पना एवढेच नव्हे तर, मानसिकतेचाही उलगडा होऊ शकतो. चला तर, बाथरूमच्या या आकर्षक विश्वात डोकावायला.

रोजच्या अंघोळीची सवय आणि बाथरूम यांची सुरुवात कशी झाली असेल, याबद्दल कधी विचार केलाय का? अंघोळीचा संबंध आपल्या टिकून राहण्याच्या मूलभूत वृत्तीशी आहे. शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी, ताजेतवाने होण्यासाठी नद्या, तलाव, समुद्र यात डुबकी मारण्यास सुरुवात झाली असावी. पुढे पुढे तो एक दैनंदिन संस्कार झाला. त्याच्या पद्धती, नियम आले. जगभरात फिरताना काही प्राचीन स्नानविधींचा परिचय होतो. रोमन स्नानगृहांचे अवशेष सापडतात. इंग्लंडमध्ये तर ‌‘बाथ‌’ नावाचे शहरच आहे. भारतात विकसित झालेले नदीचे घाट आहेत. तर तुर्कस्तानमधील हमामही प्रसिद्ध आहे.

प्राचीन रोम: आज जसे श्रमपरिहारासाठी कॅफेज्‌‍ किंवा क्लब्ज असतात, तसेच स्वरुप प्राचीन काळी रोमन स्नानगृहांचे होते. रोमनांनी ‌‘थर्मे‌’ ही भव्य स्नानगृह संकुले बांधली. त्यात हॉट स्प्रिंग्ज, थंड पाण्याचे कुंड, सौना, मसाज रूम्स, ग्रंथालये होतीच. उद्यानेही होती. तिथे व्यापाराचे सौदे चालत. राजकारणावर चर्चा होत. आनंददायी जीवनशैली हा सामुदायिक अनुभव असतो, या संकल्पनेचा उगम इथलाच. त्यामुळे, आजही आपण स्टीम रूम, प्लंज पूल आणि मसाज सेंटर अशा सुविधांनी सुसज्ज आलिशान हॉटेलच्या स्पामध्ये जातो तेव्हा तिथेही तसाच आनंददायी अनुभव घेता येतो. स्वित्झर्लंड, बुडापेस्ट, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया या ठिकाणी वेलनेस बाथ्स आहेत. या बाथरूम्समध्ये हॉट स्प्रिंग्ज आहेत. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने आरोग्यदायी विश्रांती ठरते.

इजिप्त: स्नानविधींचे उद्गाते अशी प्राचीन इजिप्तची ओळख आहे. या विधींमध्ये स्वच्छता, सौंदर्य आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम दिसतो. पूर्वी नाईल नदीच्या पात्रात किंवा खास बांधलेल्या कुंडात स्नान केले जाई. मुलायम त्वचेसाठी सुगंधी तेले, अत्तरे, दूध, मध यांसारखे  नैसर्गिक पदार्थ वापरले जात. असं म्हणतात की, क्लिओपात्राच्या सौंदर्याचं रहस्य गाढविणीच्या दुधात होतं. ती गाढविणीच्या दुधाने स्नान करीत असे. इजिप्तमध्ये धार्मिक उपचार आणि ऐषोआराम या दोन्हीत स्नान हा अविभाज्य घटक होता. सुगंधी तेलं आणि स्क्रब्ज यांचा वापर तर सर्रास केला जात असे.

तुर्कीये: इथल्या हमामला वारसा आहे तो रोमचा. असं असलं तरी हमामची ठेवण खास तुर्कीये ढंगातील आहे. गरम पाण्याच्या वाफांनी भरलेली दालने, घुमटाकार छत, त्यावरील झरोक्यातून दिसणारे ताऱ्यांचे नजारे, पायाखाली संगमरवरी फरशा असे हमाममधील वातावरण असते. स्नानासाठी येणारी मंडळी प्रथम आराम करतात. मग त्यांना खास स्कबरने मसाज केला जातो. हमाम म्हणजे एकत्र येण्याचे, गप्पा मारण्याचे आणि विश्रांती घेण्याचे ठिकाण. यात शारीरिक स्वच्छता आहेच, पण यातून सामाजिक एकोपाही साध्य होतो. इस्तंबूल आणि कॅपाडोशियातील अनेक हॉटेल्समधील बाथरूम्स आणि स्पा यांची रचना ही हमामवर आधारित आहे. आधुनिक शैलीच्या या बाथरूममध्ये शतकानुशतकांच्या परंपरा आणि सोयीसुविधा यांचा उत्तम संगम साधलेला आहे.

भारत: आपल्याकडे स्नानास कायम पवित्र आणि शक्तीवर्धक मानले गेले आहे. सिंधू संस्कृतीतील अत्याधुनिक सांडपाणी व्यवस्थापन, मोहेंजोदडो मधील महास्नानगृह असा प्राचीन इतिहास आहेच, पण त्याचबरोबर गंगेसारख्या मोठ्या नद्यांवरील घाट, मंदिरांजवळील तलाव यातूनही हे माहात्म्य अधोरेखित होते. येथील पाण्याला दैवी स्पर्श असल्याचे मानले जाते. तेल, फुले, औषधी वनस्पतींनी युक्त पाण्याने स्नान करण्याचा सल्ला आयुर्वेदात दिला जातो. बारव, बावडी म्हणजे पायऱ्यांच्या विहिरी या वास्तुरचनाशास्त्राच्या दृष्टीने अद्भुत आहेत. स्नान, प्रार्थना आणि विश्रांती यासाठी या सार्वजनिक जागांचा वापर केला जाई. भारतातील आलिशान रिसॉर्टस्‌‍ आणि स्पा यांनीही या परंपरांतून प्रेरणा घेतलेली आहे. गुलाबजल, हळद आणि चंदन यांचा वापर या स्पामध्ये करण्यात येतो.

 जपान: जपानमध्ये स्नानास शरीराच्या स्वच्छतेइतकेच आध्यात्मिक महत्त्वही आहे. तेथील ‌‘ऑनसेन‌’ म्हणजे हॉट स्प्रिंग बाथ आणि ‌‘सेन्टो‌’ म्हणजे पब्लिक बाथरूम्स. शरीर स्वच्छता, चिंतन-मनन यांच्यासाठीची ही पब्लिक प्लेसेस आहेत. इथले विधी अतिशय काटेकोर असतात. सेन्टोमध्ये आत शिरण्यापूर्वी हॉट स्प्रिंग्जमध्ये सचैल स्नान करायचे. हे पाणी बऱ्यापैकी कढत असते. त्या पाण्याने स्नान केले की ताजेतवाने वाटते. स्नानाविषयी सजग असलेल्या या जपानी संस्कृतीचा प्रभाव टोकियोतील आधुनिक हॉटेल्सवरही दिसतो. साध्याशा, आटोपशीर बाथरूमच्या बाथटबमधील अंघोळ म्हणजे ‌‘पाण्यात शरीर आणि आत्मा या दोन्हीला तजेला देण्याची ताकद असते‌’ या जपानी श्रद्धेची थेट प्रचिती. ‌‘र्योकान्स‌’ या धर्मशाळांमधील खाजगी ऑनसेन हे डोंगर किंवा उद्यानांच्या दिशेला असतात. या खुल्या आणि मोकळ्या ऑनसेनमधील स्नान म्हणजे एक प्रकारची ध्यानधारणाच की.

रोमन्स बाथ हाऊस, जपानी ऑनसेन, इजिप्तमधील तैलस्नान, भारतातील पायऱ्यांच्या विहिरी... या सर्वच संस्कृतींनी स्नानकलेचा खासा विचार केला असल्याचे आपल्याला दिसते. 19व्या शतकात घरोघरी नळजोडणी करण्याची सोय झाली. त्याने स्नान संस्कृतीत एकदम क्रांती केली. मग स्नान ही चैनीची गोष्ट न राहता दैनंदिन सवय झाली. साबण, सिरॅमिक फरशा आणि वाहते गरम पाणी यांची साथ मिळाल्याने शरीराची स्वच्छता ही बाब सगळ्यांच्या दृष्टीने सुलभ आणि खाजगी बनली.

एक काळ असा होता की हॉटेलातील बाथरूम ही सगळ्यात अनाकर्षक गोष्ट असे. आता मात्र एकापेक्षा एक बाथरूम्स तयार केली जातात. जगातील अशा आकर्षक बाथरूम असलेल्या हॉटेल्समध्ये राहायचं ठरवलं तर त्याचीही एक बकेट लिस्ट तयार करता येईल. आज माझ्या आवडत्या बाथरूम्सची माहिती आणि खासियत समजून घेऊ.

द चेडी अँडरमॅट, स्वित्झर्लंड - बाथरूम म्हणजे खाजगी स्पा. फुर्का स्वीटच्या मध्यभागी एक हॉट टब असून, त्याच्या एका बाजूला सौना आणि दुसऱ्या बाजूला स्टीम रूम आहे. स्कीईंगचा क्षीण घालवण्यासाठी किंवा आल्प्समध्ये दिवसभर भटकंती करून परतल्यावर आराम करण्यासाठीचे हे उत्तम ठिकाण आहे.

कॉनरॅड मालदीव्ह्स रंगाली आयलंड - दोन मजली मुराका स्वीटमध्ये एक बेडरूम आणि बाथरूम यांचा समावेश आहे. या दोन्ही गोष्टी पाण्याखाली 16 फूटांवर आहेत. तिथल्या सर्व कोनांतून समुद्राचे विशाल रूप पाहायला मिळते. पाण्यात डुंबण्याचा, बेडवरच नाश्ता करण्याचा आनंद इथे घेता येतो. इथला मुक्काम म्हणजे स्वर्गसुखच.

 विक रिट्रीट, चिली - सँटियागोच्या दक्षिणेस सुमारे दोन तासांच्या अंतरावर चिलीतील मिलाहुए व्हॅलीमध्ये रंगीबेरंगी विनयार्डस्‌‍नी वेढलेल्या जागेत मुक्काम करायचा असेल तर या रीट्रीटला पर्याय नाही. लांबवर पसरलेले विनयार्डस्‌‍ पाहत, झुल्याच्या आकाराच्या बाथटबमध्ये निवांत स्नान करता येते. इथला खास तयार केलेला फोम-इन्सुलेटेड टब पाणी बराच वेळ गरम ठेवतो.

लु रॉयाल मॉन्सो-रॅफल्स पॅरिस -  पॅरिस या सर्वाधिक रोमँटिक शहरात प्रसिद्ध फ्रेंच वास्तुविशारद फिलीप स्टार्क यांनी हॉटेल, त्यातील आलिशान, स्नानगृह यांची जादुई रचना केलेली आहे. इथल्या बाथरूम्सना भिंतींऐवजी आरसे लावलेले आहेत. सगळीकडे आरसेच आरसे असलेल्या या बाथरूममधील स्नान तल्लीनता देणारे असते. विशेष म्हणजे ही सुविधा स्टँडर्ड स्टुडिओपासून रॉयाल मॉन्सो स्वीटपर्यंत सर्वच रूम्समध्ये उपलब्ध आहे.

लायन सँड्स गेम रिझर्व्ह, साऊथ आफ्रिका -  जंगलातील आलिशान अनुभव. लायन सँड्स गेम रिझर्व्हमध्ये चार लॉजेस आणि दोन व्हिलाज्‌‍ आहेत. इथल्या प्रीमियम ट्री हाऊसमध्ये एक रात्र मुक्काम करता येतो. त्यातील किंगस्टन ट्री हाऊस आलिशान आहे. त्यात मोकळी हवेशीर बेडरूम, रेन शॉवर व डबल व्हॅनिटी असलेले काचेचे ट्री हाऊस बाथरूम आहे. म्हणजे शॉवर घेताना किंवा दात घासताना तारे न्याहाळण्याची सोय!

 पोंटा दोस गान्शोस, ब्राझील - दक्षिण भागातील फ्लोरिआनोपोलिस शहराजवळील एका खाजगी पेनिन्सुलावर हे अद्भुत रिसॉर्ट आहे. त्यात समुद्राच्या दिशेने स्नानगृह आहे. त्यात सौनाचीही सोय आहे. सौनामधून समुद्र पाहता येतो. हे स्नानगृह एखाद्या स्पासारखेच आहे. समुद्राच्या लाटा अनुभवत आलिशान व्हर्लपूल बाथमध्ये निवांतपणे स्नान करता येते. इथे इन्फिनिटी पूलही आहे.

सिक्स सेन्सेस झिल पॅसियन, सेशल्स - सेशल्स आयलंडवरील नॅशनल पार्कमध्ये सिक्स सेन्सेस झिल पॅसियन पूल व्हिलाज्‌‍ आहेत. तिथल्या बाथरूममध्ये बाथ टब, झोपाळा आहे. जंगलाच्या कुशीत स्नान करण्याचा, रमण्याचा हा अनुभव एकदम वेगळाच आहे. ही खुली बाथरूम्स निसर्गाशी एकरुप झाल्यासारखी वाटतात.

 केरळ - इथल्या लक्झरी रिसॉर्टस्‌‍मध्ये नारळाच्या बागा किंवा खाजगी डेक येथे खुल्या बाथरूम्सचा आनंद घेता येतो. शॉवरची सोय आणि टब यांच्यामुळे इथले स्नान एकदम निसर्गरम्य होते.

ही स्नानगृहे खास ठरतात कारण त्यांचा उद्देश केवळ शारीरिक स्वच्छता एवढाच नाहीये. त्यात स्पा आहे. ध्यानधारणेची ठिकाणं आहेत. कुठे प्रायव्हसी जपणं आहे, तर कुठे आसपासच्या निसर्गाशी तादात्म्य पावणं आहे. लक्झरी ही अशी छोट्या छोट्या तपशीलात असते. प्राचीन काळाने प्रथा, परंपरांचे देणे दिले, तर आधुनिक काळाने सुविधा दिल्या. त्यातूनच घराचा एक अदखलपात्र कोपरा ते घरातील सगळ्यात निवांत जागा, असं स्नानगृहाचं  परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. यामुळेच आज स्नानगृह हे जीवनशैली आणि सौंदर्यदृष्टीचं प्रतिबिंब बनलं आहे.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
नॉर्थ ईस्ट बहुरंगी भारताचा आगळावेगळा चेहरा!
9 mins, read

नॉर्थ ईस्ट बहुरंगी भारताचा आगळावेगळा चेहरा!

Published in Sakal Saptrang 6th September 2026 फेस्टिव्हल ऑफ फेस्टिव्हल्स! दरवर्षी डिसेंबरमध्ये नागालँडच्या किसामा हेरिटेज व्हिलेजमध्ये ‌‘हॉर्नबिल फेस्टिव्हल भरतो‌’, जिथे राज्यातील जवळपास सगळ्या

आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल.  वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल
9 mins, read

आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल. वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल

Published in Maharashtra Times 6th September 2026 लेट्स ब्रेक बॅरिअर्स अँड रॉक द वर्ल्ड! काही वर्षांपूर्वी एक प्रश्न नेहमी ऐकायला मिळायचा, “माझ्यासोबत यायला कुणी नाही, मग मी कशी जाऊ?” आज तो प्रश

अपेक्षपलीकडचं वास्तव
9 mins, read

अपेक्षपलीकडचं वास्तव

Published in Maharashtra Times 6th September 2026 ...कारण त्यात कोणतंही अंतर पार करायचं नसतं, कुठल्याही शिखरावर पोहोचायचं नसतं, काहीतरी ‌‘करायचंच‌’ याचं प्रेशर नसतं. हा एक साधा अनुभव असतो... जेव

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!