Published in the Sunday Maharashtra Times on 26 April 2026
...त्यातील प्रत्येक पद्धत, हालचाल याला एक विशिष्ट अर्थ असतो. थोडक्यात, हा चहा म्हणजे जणू काही भूतकाळ आणि वर्तमानकाळ या दोन्ही काळांना जोडणारा दुवा आहे...
भारतातील खास पेयं कोणती, असा विचार करायला लागलो की आपल्या डोक्यात काय येतं? मसाला चहा, लस्सी, फिल्टर कॉफी, थंडाई, कैरीचं पन्हं... ही आणि अशी सगळीच खास पेयं आपल्याला रिफ्रेश करतात. त्यामुळेच मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, एखाद्या संस्कृतीच्या पोटात शिरण्याचा, ती अनुभवण्याचा खास मार्ग म्हणजे तिथली वैशिष्ट्यपूर्ण ड्रिंक्स. म्हणूनच, आज मी तुम्हाला भारताबाहेरील विभिन्न संस्कृतींमधील मला आवडलेल्या खास ड्रिंक्सबद्दल सांगणार आहे. प्रत्येक पेयाला खास स्थानिक चव आहेच, शिवाय त्याच्यामागे त्याची अशी खास कहाणीही आहे. ही ड्रिंक्स केवळ तहान भागवणारी नसून, त्या त्या प्रदेशातील हवामान, परंपरा आणि लोकजीवन यांचे सुंदर प्रतिबिंबही दाखवतात. त्यातली काही ऋतूंशी जोडलेली असतात तर काही सण-उत्सवांचे प्रतीक असतात आणि काहींच्या मागे तर शतकांपासूनची परंपरा दडलेली असते. ज्यामुळे आपला प्रवासाचा अनुभव अधिक समृद्ध आणि संस्मरणीय बनतो. आज आपण अशाच काही ड्रिंक्सबद्दल बोलणार आहोत.
जपान - माचा टी: जपानमध्ये चहा पिण्याची कला हा अतिशय मनापासून जपलेल्या संस्काराचा भाग आहे. तिथल्या सांस्कृतिक परंपरेत माचा टी ला अतिशय मानाचं स्थान आहे. एकदम बारीक दळलेला ग्रीन टी म्हणजे माचा. त्या चहाचा रंग अतिशय मोहक आणि चव एकदम खास असते. हेता आणि माझ्या गेल्या वर्षीच्या जपान भेटीत आम्ही तिथल्या खास टी सेरेमनीचा अनुभव घेतला. माचा टी तयार करण्याची सगळी विधीवत पद्धत, तो देण्याची अदब, यातून सुसंवाद, आदर, पावित्र्य आणि शुद्धता याची प्रचिती येते. या सेरेमनीत सहभागी होणं म्हणजे जपानी आदरातिथ्य संस्कृतीत शांतपणे रमणं, त्यात तल्लीन होणं असा वेगळाच अनुभव असतो. तो एक प्रकारचा विधीच असतो. त्यातील प्रत्येक पद्धत, हालचाल याला एक विशिष्ट अर्थ असतो. थोडक्यात, हा चहा म्हणजे जणू काही भूतकाळ आणि वर्तमानकाळ या दोन्ही काळांना जोडणारा दुवा आहे.
थायलंड - थाई आइस्ड टी: हा माझ्या भावाचा, राजचा, एकदम आवडता चहा आहे. बँकॉकमधील गजबजलेल्या रस्त्यांवरून फेरफटका मारताना आपल्याला थाई आइस्ड टी विकणारे विक्रेते जागोजागी दिसतात. आकर्षक केशरी रंगाचं हे ड्रिंक आपल्याला त्याच्याकडे खेचून घेतं. दिसायला तर ते मस्त आहेच, शिवाय एकदम ताजंतवानं करणारं आहे. कडक ब्लॅक टी, साखर आणि कंडेन्स्ड मिल्क यांच्यापासून हे पेय बनवतात. त्यात बरेचदा चवीसाठी चक्रीफूल, चिंच आणि इतर मसालेही टाकतात. बर्फ घालून दिलं जाणारं हे गोड आणि फेसाळ ड्रिंक थायलंडसारख्या उष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात शरीराला छानसा हवाहवासा थंडावा देतं. विशेष म्हणजे, हा चहा ट्रान्सपरन्ट ग्लासमध्ये देताना वरून कंडेन्स्ड मिल्क घातलं जातं, जे हळूहळू केशरी चहात मिसळताना एक सुंदर दृश्य तयार करतं. थायलंडमध्ये हा चहा म्हणजे केवळ पेय नसून, तिथल्या रंगतदार आणि चैतन्यमय जीवनशैलीचा एक गोड अनुभव आहे.
इटली - एस्प्रेसो: इटलीत कॉफी हे केवळ एक पेय नाही, ती तर त्यांची जीवनशैली आहे. इटलीत भ्रमंती करताना, मी दुपारी चार वाजल्यानंतर कॉफी न घेण्याचा माझा नियम उंबरठ्याबाहेरच ठेऊन दिलेला होता. इटलीकरांच्या दृष्टीने कॉफी हा अतिशय संवेदनशील विषय आहे. ते दिवसातून कितीही वेळा, चटकन, तसंच उभ्याउभ्या सुद्धा कॉफीचा आस्वाद घेऊ शकतात. एस्प्रेसो बार हे तिथले सोशल हब आहेत. कट्टेच म्हणा ना! तिथे ही मंडळी गप्पा मारण्यासाठी, कळलेलं, समजलेलं एकमेकांना सांगण्यासाठी आणि विसाव्यासाठी एकत्र जमतात. काळजीपूर्वक बनवलेल्या एस्प्रेसोच्या चवीमधून आपल्याला कॉफी बनवण्याच्या कलेबद्दल इटलीत असलेला समर्पणभाव कळतो. इटलीत ‘कॅफे’ म्हटलं की सरळ एस्प्रेसोच दिला जातो. स्थानिक लोक कॉफी घेताना साखर घालायची की नाही यावरही चर्चाच करतात! हा छोटासा कॉफी ब्रेक हा त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील एक आनंदाचा, त्यांना जोडणारा क्षण बनतो.
मोरोक्को - मिंट टी: आदरातिथ्य आणि दोस्ती यांचं खास प्रतीक म्हणजे मोरोक्कन मिंट टी किंवा ‘अत्ये’. तिथल्या घराघरात किंवा कॅफेत हा गोड, तजेलदार चहा दिवसभर मिळू शकतो. गरम पाण्यात चांगला उकळलेला ग्रीन टी, त्याच जोडीला उकळून घेतलेली पुदिन्याची ताजी पानं, त्यात साखरेचा सढळ वापर असा हा चहा. हा चहा बनवणं आणि तो ग्लासमध्ये ओतणं ही एक खास कला आहे. ग्लासमध्ये चहावर चांगला फेस धरावा म्हणून हा चहा काहीशा उंचीवरून ग्लासमध्ये एकदम कलात्मक पद्धतीने ओतला जातो. मोरोक्कोमधील एखाद्या घरात किंवा कॅफेत एकत्र बसून कपभर मिंट टीचा आस्वाद घेणं ही खास अनुभवण्यासारखी गोष्ट आहे. पारंपरिक पद्धतीनुसार हा चहा तीन वेळा ओतून दिला जातो आणि प्रत्येक वेळची चव थोडी वेगळी असते. पहिला कप सौम्य, दुसरा बॅलन्स्ड आणि तिसरा अधिक गोड आणि स्ट्राँग. “पहिला जीवनासारखा कडवट, दुसरा प्रेमासारखा मधुर आणि तिसरा मृत्यूसारखा गहिरा” अशी त्यामागची सुंदर फिलॉसफी सुद्धा ऐकायला मिळते.
इथिओपिया - कॉफी: कॉफीच्या उगमस्थानाचा मान इथिओपियालाही दिला जातो. कॉफी हा तिथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. इथिओपियातील कॉफी सेरेमनी हा परंपरने चालत आलेला मानाचा विधी आहे. त्यात कॉफीच्या बिया भाजणं, मग त्या दळणं आणि नंतर जेबेना या मातीच्या पारंपरिक भांड्यात ती कॉफी उकळणं असा एकंदरीत मस्त मामला असतो. हा समारंभ म्हणजे तिथल्या सामाजिक संस्कृतीचा खास अनुभव असतो. त्यात एकमेकांविषयीचा आदर आणि मैत्री सामावलेली आहे. समृद्ध आणि आगळीवेगळी चव अशी इथल्या कॉफीची खास ओळख आहे. त्यामुळे इथोओपियाच्या प्रवासात आवर्जून करण्याच्या गोष्टींमध्ये या कॉफीपान समारंभाचा समावेश असायलाच हवा.
दक्षिण आफ्रिका - रुईबोस टी: दक्षिण आफ्रिकेतील लोकल टी म्हणजे रुईबोस टी. कॅफिन नसलेला हा हर्बल टी ‘ॲस्पॅलॅथस लिनियरिस’ वनस्पतीच्या पानांपासून बनवतात. मातकट, गोडसर चवीचा हा चहा गरमागरम किंवा आइस्ड अशा दोन्ही प्रकारात लोकप्रिय आहे. उच्च प्रतीच्या अँटी ऑक्सिडंट्ससारख्या औषधी गुणांमुळे तो अधिक प्रसिद्ध झाला आहे. हा चहा दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांच्या दिनक्रमातील अविभाज्य घटक आहे. शिवाय आता ‘टर्मरिक लाते’ प्रमाणे तो जगभरात लोकप्रिय होऊ लागला आहे. त्याची चव आणि आरोग्यदायी गुणधर्म यामुळे तो लोकांच्या पसंतीस पडत आहे. रुईबोस टी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित मानला जातो.
मेक्सिको - टकीला: टकीला हे मेक्सिकोमधील अतिशय लोकप्रिय ड्रिंक आहे. व्यक्तिश: ते माझ्याही आवडीचं आहे. टकीला या शहराच्या आसपासच्या प्रदेशात सापडणाऱ्या ‘ब्लू एगेव्ह’ या वनस्पतीपासून टकीला बनवले जाते, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. एगेव्हच्या कापणीपासून ते डिस्टिलेशन आणि एजिंग करून अखेरीस टकीला तयार करण्यापर्यंत सगळी प्रक्रिया अतिशय किचकट असते. टकीलाच्या चवीचा आस्वाद घेत आपल्याला मेक्सिकोच्या अतिशय व्हायब्रंट संस्कृतीची खास ओळख पटते. टकीलाचे ‘ब्लांको’, ‘रेपोसायडो’ आणि ‘अनेहो’ यांसारखे वेगवेगळे प्रकार असतात, ज्यांची चव वेगवेगळी असते. पारंपरिक पद्धतीने टकीला मीठ आणि लिंबूसह घेतली जाते, पण स्थानिक लोक ती हळूहळू सिप करीत तिच्या चवीचा खरा आनंद घेतात. अनेक ठिकाणी टकीलासोबत ‘सांग्रीता’ नावाचं तिखट-आंबट पेयही दिलं जातं, जे तुमचा हा अनुभव अधिक रंजक बनवतं.
ब्राझील - कायपिरिन्हा: ब्राझीलच्या कायपिरिन्हाला राष्ट्रीय कॉकटेलचा दर्जा आहे. काशासा म्हणजे उसापासून बनलेलं मद्य, लिंबू, साखर आणि बर्फ यांचं तजेलदार मिश्रण. अतिशय साधं पण एकदम चवदार असं हे पेय आहे. ब्राझीलच्या समुद्रकिनाऱ्यावरील बार असोत वा फेस्टिव्हल्स, सर्वत्र या पेयाची मुक्तहस्ते उधळण सुरू असते. गोड, आंबट आणि स्ट्राँग चवींचं हे पेय म्हणजे ब्राझीलच्या उत्साहवर्धक आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचंच प्रतीक आहे. पारंपरिक कायपिरिन्हामध्ये ताजं लिंबू हलकंसं पिळून त्यातला रस काढला जातो, ज्यामुळे त्याची चव अधिक नॅचरल वाटते. काही ठिकाणी फळांच्या विविध फ्लेवर्ससह देखील हे पेय तयार केलं जातं.
ऑस्ट्रेलिया फ्लॅट व्हाईट: फ्लॅट व्हाईट हे कॉफीयुक्त पेय आज ऑस्ट्रेलियाच्या कॉफी संस्कृतीचं प्रतीक बनलं आहे. एस्प्रेसोचा एक शॉट आणि वाफाळत्या दूधापासून बनलेली ही फ्लॅट व्हाईट एकदम मुलायम आणि बॅलन्स्ड चवीसाठी लोकप्रिय आहे. कॉफी बनवण्याची पद्धत ऑस्ट्रेलियातील कॅफेज्नी पुरेपूर आत्मसात केलेली आहे. तिथल्या एखाद्या ओसंडून वाहणाऱ्या कॅफेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या या व्हायब्रंट कॉफी संस्कृतीचा आनंद घेणं हा खास अनुभव ठरतो.
फ्लॅट व्हाईटमध्ये वापरलं जाणारं ‘मायक्रोफोम’ दूध अतिशय स्मूद आणि मखमली असतं, ज्यामुळे कॉफीवर सुंदर लाते आर्ट तयार करता येतं. लोकल बरिस्ताज् त्यांच्या या कौशल्यासाठी जगप्रसिद्ध आहेत.
न्यूझीलंड - सॉव्हिन्यॉन ब्लाँक: न्यूझीलंडची ‘सॉव्हिन्यॉन ब्लाँक’ ही वाईन खुमासदार आणि तजेलदार चवीसाठी तसंच सुगंधी गुणांसाठी जगभरात ओळखली जाते. या वाईनचे काही उत्कृष्ट नमुने खासकरून मार्लबरो प्रदेशात तयार होतात. न्यूझीलंडमधील विनयार्डमध्ये या वैशिष्ट्यपूर्ण वाईनचा आस्वाद घेण्याची तसंच त्या देशातील नावीन्यपूर्ण अशा वाईननिर्मिती तंत्राबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे, या वाईनमध्ये पॅशनफ्रूट, आणि सिट्रस फ्रूट्सचे सूक्ष्म फ्लेवर्स जाणवतात, जे तिला वेगळीच ओळख देतात. अनेक विनयार्ड्समध्ये सायकल टूर करून निसर्गाच्या सान्निध्यात वाईन टेस्टिंगचा आनंद घेता येतो. ज्यामुळे तुमचा अनुभव अधिकच अविस्मरणीय ठरतो.
जमैका - रम पंच: जमैकन रम पंच हे एक खास उत्साहवर्धक, फ्रूट्सने युक्त असं कॉकटेल आहे. त्या आयलंडवरील प्रसिद्ध रम, त्याच्या जोडीला ट्रॉपिकल फ्रूट्सचा ज्यूस आणि त्यावर हलकासा जायफळाचा शिडकावा असं हे मिश्रण असतं. या गोडसर आणि कडक पेयाशिवाय जमैकातील पार्टीज् आणि बीच बार अधुरे आहेत. त्या बेटाच्या जिंदादिलीचं हे पेय म्हणजे प्रतीक आहे.
हवाई - माई ताई: हवाईमधील माई ताई हे ट्रॉपिकल कॉकटेल अतिशय लोकप्रिय आहे. रम, लिंबाचा रस, ऑर्जिएट सिरप आणि संत्र्यापासून तयार केलेलं मद्य यांच्या मिश्रणातून हे कॉकटेल तयार होतं. हवाई आयलंडचा सगळा उत्साह या पेयात सामावलेला आहे. हवाईच्या बीचवर निवांतपणे पडून माई ताई कॉकटेलचा आस्वाद घेणं म्हणजे या आयलंडच्या धुंद वातावरणाचा मनमुराद आनंद लुटण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ‘माई ताई’ या नावाचा अर्थ ताहितियन भाषेत ‘खूप छान’ असा होतो. अनेक ठिकाणी हे कॉकटेल आकर्षक छत्री, चेरी किंवा अननसाच्या तुकड्यांसह सजवून दिलं जातं.
अर्जेंटिना - माते: माते हे एक पारंपरिक दक्षिण अमेरिकन पेय आहे. अर्जेंटिनामध्ये ते अधिक लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याचंही ते आवडतं ड्रिंक आहे. येर्बा माते वनस्पतीच्या वाळलेल्या पानांपासून बनवलेलं हे कॅफिनयुक्त ड्रिंक आहे. ते पिण्यासाठी, आतून पोकळ केलेल्या भोपळ्यात धातूच्या बोंबिला नावाच्या स्ट्रॉचा वापर करतात. त्याचा आस्वाद सावकाश घ्यायचा असतो. त्याला एक खास चव असते. माते हे मित्रमंडळींसोबत एकत्र आनंद घेत प्यायचं पेय आहे. ते एकाच भांड्यातून सर्वांनी आळीपाळीने पिण्याची परंपरा आहे, जी मैत्री आणि आपुलकीचं प्रतीक मानली जाते. याच्या प्रत्येक घोटासोबत नात्यांची गोडी वाढत जाते.
स्पेन - सांग्रिया: हे ड्रिंक आपल्यापैकी बहुतांश जणांना माहीत असेल, तरीही मी त्याचा या यादीत समावेश केला आहे. स्पेनच्या उन्हाळ्यावर उतारा म्हणून हमखास घेतलं जाणारं सांग्रिया हे वाईन पंच आहे. रेड वाईन, सफरचंद, लिंबू किंवा बेरीसारखी फळं, थोडी ब्रँडी किंवा संत्र्याचा रस घालून सांग्रिया बनवतात. काही ठिकाणी व्हाईट वाईनपासून ‘व्हाईट सांग्रिया’सुद्धा बनवतात, जी जास्त हलकी आणि ताजीतवानी करणारी असते.
चीन - बायजिऊ: बायजिऊ हे चिनी पारंपरिक ड्रिंक आहे. जगात सर्वाधिक रिचवलं जाणारं हे मद्य असलं तरी आपल्यापैकी अनेकांनी त्याबद्दल फारसं कधी ऐकलं नसेल. ज्वारी, तांदूळ आणि गहू अशा धान्यांपासून बनवलेल्या बायजिऊची चव एकदम कडक आणि खास असते. चीनमधील सण-उत्सव, मेजवान्या यांचा हे मद्य हमखास भाग असते. त्यात अल्कोहोलचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त असतं. त्याची चवही अनोखी असते. त्यामुळेच चीनच्या मद्य संस्कृतीचा हे पेय अविभाज्य भाग बनले आहे. बायजिऊ पिताना ‘गानबेई’ म्हणजेच एकाच घोटात संपवण्याची परंपरा आहे, जी मैत्री आणि आदर व्यक्त करण्याचा भाग मानली जाते.
व्हिएतनाम - एग कॉफी: माझ्या पंधरा दिवसांच्या व्हिएतनाम ट्रिपमध्ये मी दररोज ज्याचा आस्वाद घेतला असेल असं पेय म्हणजे एग कॉफी! अंड्यातील पिवळा बलक, साखर, कंडेन्स्ड मिल्क आणि रोबस्टा कॉफी यांचं अनोखं व्हिएतनामी मिश्रण म्हणजे एग कॉफी किंवा ‘का फे त्रुंग’. हनोईमध्ये तयार झालेल्या या फेसाळ, गोडसर पेयात विविध चवींचं, मनाला आनंद देणारं एक मिश्रण असतं. विशेष म्हणजे, एग कॉफी सहसा गरम पाण्याच्या भांड्यात ठेवून सर्व्ह केली जाते, त्यामुळे ती जास्त वेळ गरम राहते. तिचं टेक्स्चर इतकं क्रीमी असतं की अनेकांना ती कॉफीपेक्षा डेजर्टसारखीच वाटते.
ही जगभरातल्या निवडक ड्रिंक्सची गोष्ट मी आता इथे थांबवतो. आपण नेहमी एखाद्या खाद्यपदार्थाच्या निमित्ताने एखादं ठिकाण ओळखतो, पण मला असं वाटतं की एखाद्या पेयातूनही एखाद्या ठिकाणाची, संस्कृतीची ओळख निर्माण होऊ शकते. किंबहुना तशी ती असतेही. प्रत्येक पेय तिथली संस्कृती, इतिहास, समाज यांची कहाणी सांगतं. त्याच्या निमित्ताने परंपरा आणि नावीन्य यांचा अनोखा संगम साधला जातो. प्रवासात आपण अनेक दृश्यं पाहतो, स्मारकं अनुभवतो, पण एखाद्या ठिकाणाशी खरी नाळ जुळते ती अशा छोट्या-छोट्या अनुभवांमधूनच. एखाद्या कॅफेच्या कोपऱ्यात शांतपणे घेतलेला कॉफीचा घोट किंवा मित्रमंडळींसोबत हसत खेळत घेतलेलं कॉकटेल, असे क्षणच आपला प्रवास अधिक जिवंत बनवतात. त्या पेयाच्या चवीत तिथलं हवामान, त्या लोकांची जीवनशैली, त्यांची अभिरुची आणि त्यांच्या जगण्याची लय दडलेली असते. अनेकदा एखादी चव, एक सुगंध आपल्याला थेट त्या प्रदेशात परत घेऊन जातो. त्यामुळेच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या नव्या देशात जाल, तेव्हा तिथल्या पेयांकडे फक्त पेय म्हणून न पाहता, त्या संस्कृतीचा एक जिवंत भाग म्हणून ती अनुभवा. त्या निमित्ताने, तुमचा तिथल्या समृद्ध वारशाशी परिचयही होईल. त्यासाठी आवर्जून काढलेला वेळ वाया जाणार नाही हे नक्की. तसंच पुढल्या भारताबाहेरच्या प्रवासात अशा कोणत्या पेयाचा आस्वाद घेण्याचा तुमचा विचार आहे किंवा यापूर्वीच्या प्रवासातील तुमच्या हातातल्या कोणत्या एका छोट्याशा ग्लासने, एका नव्या देशाची, नव्या अनुभवांची दारं तुमच्यासाठी उघडून दिली त्याबद्दल मला न विसरता लिहा. म्हणजे ही पेयगाथा आणखी समृद्ध होत जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेलिब्रेट लाईफ!


























Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.