India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

मॉर्निंग वॉक

18 mins. read
Veena Patil
Veena Patil
18 Mins Read
February 07, 2025
February 07, 2025

Quick Summary

मॉर्निंग वॉकला नियमित सवय लावल्यावर अंगात उत्साह आणि मनात नवे विचार येतात.

वॉकसाठी हलके आणि आरामदायक शूज निवडा, आणि जॉगिंगचा विचार असेल तर योग्य सपोर्ट असलेले पर्याय पाहा.

ॲक्सेसरीज घालून स्मार्ट वाटण्याचा मोह टाळा, कारण जास्त वस्तूंमुळे जडत्व येऊन वॉक बंद पडू शकतो.

पॉडकास्टसाठी एअर पॉड्स फिट होत नसतील तर शॉक्ससारखे हेडफोन्स वापरून उपाय शोधा.

मिनिमल सामान ठेवा, लहान बॅग आणि एकच फूटवेअर पुरेसे ठरते.

प्रवासात ओझे कमी ठेवल्याने आराम वाढतो आणि वॉकसह दिवस अधिक सुखात जातो.

Published in the Sunday Sakal on 09 February, 2025

‘येणार आहेस का वॉकला?‌‘ ‌‘नाही रे मला लिहायचंय आत्ता, अकरा वाजताची डेडलाइन आहे‌‘. ‌‘ओके मी जातो, आज कशावर लिहितेयस?‌‘ ‌‘मॉर्निंग वॉक‌‘ मी बोलले अणि खुर्चीतून उठले. ‌‘सुधीर थांब, मॉर्निंग वॉक वर लिहायचं आणि मॉर्निंग वॉकला दांडी मारायची? ये नहीं हो सकता, बोले तैसा चाले‌‘ माझ्यात एकदम संत भावना जागृत झाली. खुर्चीत बसून मॉर्निंग वॉक वर बोलायचं हा विरोधाभास मला नको होता. मुकाट पण मनापासून आणि उत्साहाने उठले आणि मॉर्निंग वॉक करून आले. एकदा का वॉक झाला नं की अंगात दहा हत्तींचं बळ संचारतं, मनात उत्साहाची कारंजी थुईथुई नाचायला लागतात, नवनवीन विचार सुचायला लागतात, दिवस कसा मस्त जातो. संध्याकाळी ‌‘लव्ह यू जिंदगी‌‘ असं आनंदाने म्हणावंसं वाटतं. आता एवढे या मॉर्निंग वॉकचे फायदे आहेत पण त्या मॉर्निंग वॉक ची नित्यनेमाने सवय लागायला आयुष्याशी चाळीशी यावी लागली. मॉर्निंग वॉकसाठी नेमकी चांगली वेळ कोणती यावर चर्चासत्रं झडली. मॉर्निंग वॉकसाठी कोणते शूज चांगले? मध्येच जॉगिंग वा रनिंग करावंसं वाटलं तर? असे कंबाइन्ड बेनिफिट्‌‍सवाले शूज असतात का? मग शूजचा कलर कोणता घ्यायचा? दोन तीन रंगांचे दोन तीन ब्रँडेड कंपन्यांचे शूज घ्यायचे का? जे शूजचं तेच कपड्यांचं. कॉटन की सिंथेटिक? लूज की घटट, अँकल लेंथ की शॉर्टस्‌‍? कलरफूल की ब्लॅक ॲन्ड व्हाइट? बापरे बाप! कपाटाचा एक मोठा भाग या मॉर्निंग वॉकच्या कपड्यांनीच भरला. बरं हे सगळं प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. नव्या जमान्यात नवनवीन टेकी ॲक्सेसरीज आल्या आणि ‌‘मॉर्निंग वॉकच्या वेळी चालताना आपण स्मार्ट आणि एकदम न्यू एज पर्सन नको का वाटायला?‌‘ या विचाराने ग्रासून मग रिस्ट वॉटर बॉटल, बेल्ट बॅग फॅनी पॅक, हेड बॅन्डस्‌‍, हॅट, आर्म बॅन्डस्‌‍, इयर मफ्स, हेडफोन्स वा एअर पॉड्स, नी सपोर्ट, ह्यांनी कपाटातली आणखी जागा व्यापली. हे सगळं घालून पहिल्या दिवशी मी जेव्हा वॉकला जायला तयार झाले तेव्हा मला ॲस्ट्रॉनॉट असल्यासारखं वाटलं. पाय, कंबर, मनगट, हात, गळा, डोकं, ह्या सगळ्याचा ताबा कोणत्या तरी वस्तूने घेतला होता. म्हणजे मॉर्निंग वॉकला जाताना हलकं वाटायच्या ऐवजी मी एखादी अवजड वस्तू असल्यासारखं मला वाटायला लागलं. परिणाम व्हायचा तोच झाला. मॉर्निंग वॉक बंद झाला. आधीच सगळ्या वस्तू शोधण्यात आणि आणण्यात दमछाक झाली होती आणि त्या घातल्यावर तर जडत्व आल्यासारखं झालं. त्यात माझा आणखी एक प्रॉब्लेम. वॉक करता करता मोबाइलवर पॉडकास्ट ऐकायचे तर त्यासाठी एअर पॉडस नको का? पण माझ्या कानात काही केल्या एअर पॉड्स फिट होईना. मी आणि सुनिलाने युएसए मध्ये अनेक स्टोअर्स धुंडाळली पण माझ्या कानात जाणारे एअर पॉड्स काही मिळाले नाहीत. त्या ॲपलच्या सेल्समनला म्हटलं, ‌‘आय शूड सू यू फॉर नॉट मेकिंग द डिझाइन सुटेबल फॉर ऑल‌‘. तोही तेवढाच मिश्किल, म्हणाला ‌‘दीज आर फॉर नॉर्मल पीपल‌‘. सुनिला म्हणाली, ‌‘इना तुझे कान लहान आहेत. तू हलक्या कानाची‌‘. ऐकावं लागतं काहीही. जरी अर्थ वेगळा असला तरी इथे मी तो बदलला. हलक्या कानाची असल्याने, एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. पण ॲपलने नाही केलं म्हणून काय झालं, सुधीर एकदा जर्मनीला गेला होता तिथून त्याने ‌‘शॉक्स‌‘ चे हेडफोन्स आणले आणि माझा प्रश्न सुटला. माझ्या कानांवर इलाज मिळाला. आता तर ‌‘बोस‌‘ कंपनीनेही कानाच्या पाळीला अडकतील असे इयरफोन्स आणले आहेत. ते कधी घेता येतील त्याची संधी मी शोधतेय. एका गोष्टीचं खूप समाधान वाटलं की आमच्यासारख्यांच्या ह्या सो कॉल्ड सबनॉर्मल ॲबनॉर्मल कानांवर कुणीतरी काम करीत होतं, आमची दखल घेत होतं आणि तिथेच जणू जग जिंकल्याचा आनंद मिळाला. नव्याचे नऊ दिवस प्रमाणे या ॲक्सेसरीज्‌‍वाल्या सगळ्या गोष्टी घालून मॉर्निंग वॉक करण्याचा उत्साह नऊ दिवसही टिकला नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींचा नाद सोडून मी नेहमीप्रमाणे माझ्या साध्या सिंपल अवतारात मोबाइल व शॉक्सच्या हेडफोन्सच्या सहाय्याने वॉक करू लागले. मग मॉर्निंग वॉकला कधीही दांडी मारावीशी वाटली नाही.

जगात फिरताना छोट्या केबीन साइजच्या बॅगसोबत फिरण्यात माझं आयुष्य गेलं. ‌‘जेवढं कमी सामान तेवढा जास्त आराम‌‘ हे तत्व अंगिकारलं. आणि प्रवास हेच माझं आयुष्य असल्याने ते सुखात गेलं. या छोट्याशा बॅगेत सुद्धा मॉर्निंग वॉकचा ट्रॅक सूट आणि स्विमिंग कॉश्चूम असायचा आणि असतो. शूज पायातच असायचे त्यामुळे फक्त एका फॉर्मल फूटवेअरला जागा द्यावी लागायाची. पर्यटकांना मी हा मिनिमलिझमचा सल्ला देत नाहीये कारण, त्यांनी अवश्य नटावं सजावं मिरवावं, भरपूर फोटोज्‌‍ काढावेत, ते फेसबुक इन्स्टावर टाकावेत आणि त्या सगळ्याचा मनसोक्त आनंद घ्यावा. पण तरीही खूप अवजड बॅग घेऊ नये, मीडियम साइजची फोर व्हील सुटकेसच असावी. प्रवासात ओझी वाहून दमायचं नाही. आता तुम्ही टूरवर असताना मॉर्निंग वॉक करायचं म्हणाल तर ते तसं बहुतेकांना अशक्यच. त्यासाठी मग तुम्हाला कस्टमाईज्ड हॉलिडेचीच मदत घ्यावी लागेल. ग्रुप टूरमध्ये आम्हाला तुम्हाला एवढं काही दाखवायचं असतं की ह्या टूर प्रकारात मॉर्निंग वॉकला वेळच नसतो, अर्थात काही हौशी मंडळी ज्यांना लवकर उठायची सवय असते ते मॉर्निंग वॉकसाठी टूरमध्येही वेळ काढतात. एक मात्र लक्षात ठेवायचं की असं मॉर्निंग वॉकला जाताना सुरक्षित ठिकाणीच वॉक करायचा. निर्मनुष्य ठिकाणी जायचं नाही. टूर मॅनेजरला सांगून जायचं. तसंच वॉक करताना फूटपाथ, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल्स ह्यांचाच आधार घ्यायचा, अधेमध्ये कुठेही क्रॉसिंग वा हायवेवर मॉर्निंग वॉक करायचा नाही. म्हणजे माझा हा मूर्खपणा किंवा अतिशहाणपणा करून झालाय, काही झालं नाही पण आता सर्रास जे काही घडताना दिसतंय त्याने अंगावर काटा येतो. युएसएमध्ये युरोपमध्ये कुठेही जिथे मी जायची तेव्हा मॉर्निंग वॉकचं भूत एवढं डोक्यावर असायचं की सकाळी सहा साडेसहा वाजता तडक बाहेर पडून किमान दीड तास वॉक करायचे. त्यावेळी जग एवढं असुरक्षित नव्हतं झालं त्यामुळे निभावलं असं म्हणता येईल. म्हणजे सगळंच जग असं असुरक्षित नाहीये बरंका, उगाचच घाबरायचं नाही. सावधगिरी बाळगायची, खबरदारी घ्यायची एवढंच. जगात अनेक ठिकाणी मॉर्निंग वॉक केला. पण मॉर्निंग वॉकसाठी आवडत्या जागा म्हणजे, स्वित्झर्लंडचं कोणतंही गाव, आपलं भारतातलं मनाली खासकरून हिडिंबा टेम्पलच्या मागचं पाइनफरचं जंगल, लंडनचं केन्सिंग्टन पार्क, स्कॉटलंड आणि न्यूझीलंडमधलं कोणतंही गाव, ऑस्ट्रेलियाचा सिडनी हार्बर ब्रीज आणि ऑपेरा हाऊसचा परिसर... या ठिकाणी गेल्यावर मॉर्निंग वॉक केला नाही असं होत नाही.

काही दिवसांपूर्वी गोरेगावहून शकूमाई चुरी आमची हितचिंतक आणि सासूबाईंची मावस बहीण त्यांना भेटायला आली होती. वय वर्षे नव्वद, पण जशी तिला मी तीस चाळीस वर्षांपूर्वी बघितली तशीच. आवाज खणखणीत, बोलण्यातला उत्साह तोच, उभं राहणं एकदम सरळ, पाठीला अजिबात बाक नाही. ‌‘शकूमाईला म्हटलं, ‌‘काय खातेस तू आणि नक्की काय करतेस की नव्वदीतही मला तू अगदी तीस वर्षांपूर्वी होतीस तशीच दिसतेयस?‌‘ मला वाटलं भाज्या फळं डाएट असं सगळं आमच्यासारखं मोठ्ठं टाइमटेबल ती सांगेल. कारण मला ती जपान वा जगातल्या इतर ठिकाणच्या ‌‘ब्लू झोन्स‌‘ मधून आल्यासारखी वाटली. म्हणजे जीन्स हा एक भाग होता, दुसरं काय हे ऐकायला आम्ही उत्सुक होतो. तसं डाएट असं काही नव्हतंच, ती सर्वप्रकारच्या भाज्याही खात नव्हती. पण एक गोष्ट तिने सांगितली ती म्हणजे वॉक. ती भरपूर चालते. मॉर्निंग वॉक-इव्हिनिंग वॉक-इन बिटविन वॉक हे शक्य तेव्हा ती करतच असते. त्या ठिकाणी बसलेल्या आम्हा सगळ्यांसमोर मॉर्निंग वॉकचं महत्व शकूमाईने उदाहरणासहित धडधडीत उभं केलं होतं.

सहा महिन्यांपूर्वी काश्मीरला श्रीनगरमध्ये झेलम नदीच्या काठावर नव्याने बांधलेल्या वॉटरफ्रंटवर आम्ही वॉक केला. एकतर खूप वर्षांनी काश्मीरला गेलो होतो. मिलिटन्सी आणि टेररिझम बोकाळायच्या आधी, म्हणजे पंचवीस एक वर्षांपूर्वी बुलेवार्ड रोडला मॉर्निंग वॉक घ्यायचो आम्ही, नंतर  अधूनमधून टूर्स जायच्या तेव्हा आर्मीचा खडा पहारा आणि मनात दबा धरून बसलेली एक अदृश्य भीती ह्यामुळे मॉर्निंग वॉकचा विचारही मनात यायचा नाही. आता काश्मीरचा छान कायापलट झालाय. आम्ही वॉक घेत असताना अनेक काश्मिरी मुली, महिला, सिनियर सिटीझन्स वॉक घेताना दिसत होते. काश्मीरमध्ये झालेल्या बदलाचा तो दाखला होता. मॉर्निंग वॉक शरीरासाठी मनासाठी चांगल्या विचारांसाठी, समाजासाठी आणि देशासाठी महत्वाचा घटक आहे असं मला वाटतं. शरीर तंदुरूस्त तर मन सकारात्मक आणि त्यामुळे समाज आणि देश ताकदवान. आणखी एक कनेक्शन मॉर्निग वॉकचं मला मिळालं ते म्हणजे ज्या गावात, ज्या शहरात, ज्या राज्यात आणि ज्या देशात आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला मॉर्निग वॉक घेता येतो ते गाव शहर राज्य आणि देश सुरक्षित.


देखो अपना देश

दिल से! प्यार से! सम्मान से!

लह लडाख हा भारतातील सर्वांत सुंदर केंद्रशासित प्रदेश आहे. हे हिमालयाच्या मधोमध वसलेलं कोल्ड डेझर्ट आहे. लेहमधलं लेह पॅलेस, शांती स्तूप, लेह मार्केट आणि नामग्याल त्सेमो गोम्पा ही प्रमुख आकर्षणे आहेत. आपल्या शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मधली इंडस व्हॅलीही इथलीच. तसंच कारगिल युदधाच्या कथा सांगणारं द्रास वॉर मेमोरियल आपल्याला लडाखमध्ये पहायला मिळतं. इथलं कारगिल विजय स्मारक आपल्याला कारगिल युद्धातल्या जवानांच्या गौरवशाली हौतात्म्याची आठवण करून देतं.

इथल्या नुब्रा व्हॅलीला 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' म्हटलं जातं. बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेलं, श्योक आणि नुब्रा नदीचा संगम असलेलं हे अद्वितीय लँडस्केप आहे. नुब्रा नदीच्या खोऱ्यात डिस्किट मॉनेस्ट्री आहे. ती तिच्या सुंदर वास्तुकला आणि बौद्ध कलाकृतींच्या संग्रहासाठी ओळखली जाते. इथली 106 फूट उंचीची मैत्रेय बुद्धाची मूर्ती प्रसिद्ध आहे. नुब्रा व्हॅलीमध्ये सँड ड्यून्स आहेत. ऍडव्हेंचर ट्रेकर्सना सँड ड्यून्समध्ये सवारी करण्यासाठी डबल हम्प्ड कॅमल्स असतात. नुब्राच्या वाळवंटात रात्री चमचमणाऱ्या अगणित चांदण्यांनी भरलेलं आभाळ पाहणं हा हिमालयातल्या कोल्ड डेझर्टमधला अविस्मरणीय अनुभव असतो.

खार्दुंग ला पास हा जगातला सर्वाधिक उंचीवरचा मोटोरेबल रोड लडाखमध्ये आहे.

लेहमधलं तुर्तुक गाव हे काराकोरम पर्वतरांगांनी वेढलेलं अद्भुत सुंदर गाव आहे. आजवर आपण याला भारतातलं शेवटचं गाव मानत आलो पण माननीय पंतप्रधानांनी मात्र या गावाला भारतातल्या पहिल्या गावाचा दर्जा दिलाय.

लडाखमधला पँगॉन्ग त्सो हा लँड लॉक्ड लेक भारत तिबेटच्या सीमेवर पसरलेला आहे. तिबेटी भाषेतल्या या नावाचा अर्थ होतो लांब किंवा चिंचोळा जादुई तलाव. लेकचं स्फटिकासमान स्वच्छ निळंशार पाणी त्याचं सौंदर्य आणखीनच खुलवतं. हिवाळ्यात या लेकवर आईस स्केटिंग करायला जगभरातून पर्यटक भेट देतात. हा आशियातला सर्वात मोठा, सुमारे 100 किलोमीटर लांबीचा खाऱ्या पाण्याचा लेक आहे. सुपरहिट फिल्म 3 इडियट्स चा शेवट याच लेकच्या काठावर चित्रित करण्यात आला होता.

थुक्पा हे गरमागरम नूडल्स सूप आणि मोमोज्‌‍ हे लडाखमधले लोकप्रिय पदार्थ आहेत. लडाखची इकोनॉमी मोठ्या प्रमाणावर टुरिझमवर अवलंबून आहे. तेव्हा आपणही आवर्जून लडाखला जायला हवं. सो, चलो, बॅग भरो, निकल पडो.


अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...

तैवान हे तैचुंग आणि तैपेई सारख्या गजबजलेल्या शहरांचा अभिमान बाळगणारं एक बेट आहे. सध्या तैवान ‌‘नॅशनलिस्ट चायना‌’ किंवा ‌‘रिपब्लिक ऑफ चायना‌’ म्हणून ओळखलं जातं. हे चीनच्या मुख्य भूमीपासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावरील बेट आहे. याला पोर्तुगीज पूर्वी फॉर्मोसा म्हणत असत. फर्मास म्हणजे सुंदर.

आपल्या जगात अनेक अद्भुत गोष्टी आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे येहलीउ हे वानली डिस्ट्रिक्ट न्यू तैपेई, तैवानमधील केप. या वानली गावाला त्याच्या सागरी इतिहासाशी जोडलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. इथले वानली खेकडे प्रसिद्ध आहेत. येहलीउ हे ठिकाण वरून पहायला गेलं तर ते समुद्रात बुडणाऱ्या महाकाय कासवासारखं दिसतं. त्यामुळे याला ‌‘येहलीउ टर्टल‌‘ असेही म्हणतात. इथलं येहलीउ जिओपार्क हा निसर्गाच्या कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. राजधानी तैपेईपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेलं हे पार्क येणाऱ्या व्हिजिटर्सना आजूबाजूच्या परिसराबद्दल माहिती पुरवतं.

1962 मध्ये, तैवानचे छायाचित्रकार हुआंग-त्से-सिउ यांच्या ‌‘येहलिउ - फॉरसेकन पॅराडाईज‌‘ या फोटोजच्या सिरीजमुळे हा परिसर प्रसिद्ध झाला आणि तैवान आणि चीनमधील पर्यटक हा परिसर पहायला आवर्जून येऊ लागले. हा तैपेईपासून सुमारे 1.7 किमीचा पट्टा आहे. यात नॅचरली तयार झालेले वेगवेगळ्या आकाराचे सेडिमेंटरी रॉक्स आहेत. या पार्कमध्ये सँडस्टोन, मडस्टोन, आणि लाईम स्टोन असे विविध खडक आहेत. येहलिउ हे केप दातून माऊंटन ने फॉर्म झालं आहे. या केपचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पृष्ठभागावर ठिपके असलेले हुडू दगड. इथे नॉर्थ कोस्टवर हे जिओपार्क आहे. इथल्या अनेक रॉक फॉर्मेशन्सना त्यांच्या आकारांवर आधारित काल्पनिक नावे देण्यात आली आहेत. हे जिओपार्क तीन भागात विभागलं आहे. पहिल्या पार्टमध्ये क्वीन्स हेड, फेयरी शू आणि सी कॅन्डल्स अशा आकारांचे, दुसऱ्या पार्टमध्ये ड्रॅगन हेड च्या आकाराचे, तर थर्ड पार्टमध्ये समुद्रात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहा, सील सारखे खडक आहेत. रॉक फॉर्मेशनव्यतिरिक्त हे जिओ पार्क दशलक्ष वर्षे जुन्या असलेल्या सागरी प्राण्यांच्या जीवाश्म अवशेषांचंही आपल्याला दर्शन घडवतं. हे क्षेत्र केवळ भूवैज्ञानिक आश्चर्यच नाही, तर संकटात असलेल्या मरीन इको सिस्टीम, कोस्टल व्हेजिटेशन आणि सी बर्ड्स च्या दृष्टीनेही हे ठिकाण महत्त्वाचं आहे.

तैवानच्या लोककथांमध्ये सुद्धा हे उद्यान प्रसिद्ध आहे. अनेक स्थानिक पौराणिक कथा या लँडस्केपशी निगडित आहेत. 1964 मध्ये या सिनिक एरियाची स्थापना झाली आणि 2001 मध्ये हे ऑफिशियली जिओपार्क म्हणून घोषित करण्यात आलं. आज जगभरातून अनेक लोक हे अद्भुत रॉक्स पाहण्यासाठी इथे व्हिजिट करतात. तैवानमधल्या महत्त्वाच्या भूवैज्ञानिक स्थळांपैकी एक म्हणून, येहलिउ जिओ पार्कच्या सस्टेनेबल टूरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी या पार्कमध्ये चालण्यासाठी विशिष्ट मार्ग म्हणजेच वॉक वे निश्चित करण्यात आला आहे. नुकतेच हे ठिकाण वीणा वर्ल्डच्या ग्रुप टूर्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तुम्हालाही जर निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पहायचा असेल तर चला आमच्यासोबत तैवानला.


आय ॲम द क्वीन

नेहा नलावडे, गोरेगाव

मला एकटीला फिरण्यासाठी घरून परवानगी असते नेहमीच. मी, मुलगा, सून, आणि माझे मिस्टर असं आमचं आनंदी कुटुंब! आम्ही गोरेगावला राहतो. मी वीणा वर्ल्ड सुरु झाल्यापासून एका वर्षातच गोरेगाव वेस्टमधल्या त्यांच्या ऑफिसमधून टूर्स बुक करायला लागले. त्याचं कारण की इथला स्टाफ आणि त्यांचे टूर मॅनेजर्स खूपच आपुलकीने वागतात. टूरवर असताना जेव्हा सगळ्या बायका शॉपिंग करण्यात रमतात, फोटोज काढत राहतात, त्यावेळी टूर मॅनेजर्स पेशंटली सांभाळून घेतात. इतकं छान वाटतं आपल्याला, आपण कुणीतरी व्हीआयपी आहोत की काय असंच वाटू लागतं. मी आत्तापर्यंत बारा टूर्स केल्या असतील वीणा वर्ल्ड बरोबर. भरपूर देशांमध्ये फिरले.

मी 'नेहा नलावडे'! कळायला लागल्यापासून सगळं जग पाहायचं असं मनाशी मी ठरवूनच टाकलं होतं. गेल्या बारा-चौदा वर्षांपासून मी देशात तसंच जगात फिरतेय. देशात फिरणं तर आवडतंच, कारण आपला देश आहे ना, तिथे फिरणं कुणाला नाही आवडणार? पण बाहेरचे देशसुद्धा बघायला आवडतात.

मी आजवर दुबई युरोप यूएस ग्रीस साऊथ आफ्रिका हाँगकाँग सिंगापूर थायलंड मॉरिशस अशा अनेक देशांमध्ये फिरले आहे, पण मला युरोप पुन्हा बघायचा आहे. तिथली शहरं खूपच आकर्षक आहेत. जोपर्यंत मी हिंडू-फिरू शकतेय तोपर्यंत मला फिरत रहायचंय. जपान पहायचाय.  मी एक वर्ष इंटरनॅशनल आणि एक वर्ष डोमेस्टिक टूर्स करते आणि असंच करत राहणार आहे. प्रत्येक सफर लक्षात राहते, वुमन्स स्पेशलच्याच टूर्सबरोबर मी फिरते. सेफ असतं ना वुमन्स स्पेशलबरोबर फिरणं! फिरायला जात असतानाची धाकधूकही राहत नाही.

मला फिरण्याची प्रचंड आवड आहे. म्हणून सुरुवातीला घरच्यांनीच वीणा वर्ल्डची वुमन्स स्पेशल टूर बुक करून दिली. आता ते नेहमीचंच झालंय. काय होतं, एकदा वुमन्स स्पेशल बुक केली की काहीच टेन्शन नसतं ना! मी एकदा त्यांच्या ताब्यात गेले की घरचे आणि मी आम्ही निवांत असतो, जशी टूरवर गेलेय तशीच परत येणार याची खात्रीच असते.

मला फोटोग्राफीची खूप आवड आहे त्यामुळे मी बाहेरच्या देशात गेले की भरपूर फोटो काढते, तिथलं निसर्गसौंदर्य, तिथलं आर्किटेक्चर, कोरीव काम हे सगळं माझ्या कॅमेऱ्यात बंद करून ठेवलंय. खासकरून ग्रीसमध्ये जेव्हा गेले, तेव्हा तिथले समुद्रकिनारे, निळ्या पांढऱ्या कलरची छोटी छोटी घरं, हे सगळं बघायला खूप आवडलं. टेकड्यांवर वसलेली घरं. सगळं खूपच मस्त होतं. तिथे असणाऱ्या वस्त्यांमध्ये गाड्या जातच नाहीत म्हणून आम्ही पायीच फिरलो, मला अजून आस्ट्रेलिया, न्यूझीलंडला जायचंय.

मी खूपच शॉपिंग करते, जिथे कुठे फिरायला जाईन, तिथल्या स्थळांचे सोव्हिनिअर्स आणि मॅग्नेटस आणते. तेवढ्याच माझ्या प्रत्येक देशातल्या आठवणी जपल्या जातात.

वुमन्स स्पेशल टूरमध्ये खूप धम्माल करायला मिळते, फॅशन शो मध्ये भाग घ्यायला मिळतो. आनंद मिळतो आणखी काय हवंय!


प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्‌‍

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍सोबत - युरोपमधल्या अमेझिंग ट्रेन्स

आपल्यापैकी प्रत्येकाचं युरोप खंड एक्स्पलोअर करण्याचं स्वप्न असतं. हा खंड जगातल्या सर्वांत सुंदर आणि निसर्गरम्य अशा रेल्वे प्रवासांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. बर्फाच्छादित डोंगर, विलोभनीय व्हॅलीज, आणि हिरव्यागार जंगलाचा आनंद घेत तुम्ही हा रेल्वे प्रवास अनुभवू शकता. या अमेझिंग ट्रेन्सचे काही ऑप्शन्स:

ग्लेशिअर एक्सप्रेस

या एक्सप्रेसने तुम्ही झरमॅट ते सेंट मॉरिट्झचा प्रवास फक्त आठ तासांत करू शकता.

या निसर्गरम्य प्रवासात ही ट्रेन 91 टनल्स आणि 291 पेक्षा जास्त ब्रिजेसवरून प्रवास करते.

यातल्या एक्सलन्स क्लासमध्ये तुम्हाला गॅरेंटीड विंडो सीट, शॅम्पेन आणि स्टार्टर, रिजनल फाईव्ह कोर्स मिल आणि ग्लेशिअर बारचा ऍक्सेस मिळतो.

बर्निना एक्सप्रेस

ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट ऱ्हिशन रेल्वे लाईन वरून धावणारी ट्रेन स्वित्झर्लंडमधल्या चुर किंवा सेंट मॉरिट्झ पासून इटलीमधल्या टिरानोपर्यंत धावते. याच्या मोठ्ठ्या खिडक्यांमधून आपल्याला पॅनोरमिक व्ह्यू दिसतो.

बर्निना एक्सप्रेसमध्ये तुम्ही समरमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर ऑरगॅनिक हर्बल टी तसंच कॉम्प्लिमेंट्री स्विस चॉकलेट्सचा आस्वाद घेता येऊ शकतो.

गोल्डन पास एक्सप्रेस

ही प्रीमियम ट्रेन सर्विस माँत्रो ते इंटेरलोकन या रूटवर धावते. याच्या इनोव्हेटिव्ह व्ह्रेरिएबल गेजमुळे ही झ्वायझेमन या ठिकाणी बदलायला लागत नाही.

ड्रायव्हर'स आय व्ह्यू घेता येईल अशा व्हीआयपी सीट्सही काही ट्रेन्समध्ये असतात.

या ट्रेनच्या काही डिपार्चर्स मध्ये असलेले रेट्रो स्टाईल कोचेस तुम्हाला नॉस्टॅल्जिक एक्सपिरिअन्स देतात.

आणखी एक निसर्गरम्य गोल्डनपास - ब्रँडेड ट्रेन म्हणजे चॉकलेट ट्रेन. ही ट्रेन माँत्रोपासून  ग्रुयेर आणि काय्ये - नेस्ले चॉकलेट फॅक्टरीपर्यंत जाते. ही ट्रेन साधारण मे महिन्याच्या सुरुवातीपासून ऑक्टोबरपर्यंत चालवली जाते.

ओरिएंट एक्सप्रेस

क्लासिक व्हेनिस सिम्पलॉन ओरिएंट एक्सप्रेस पॅरिस ते व्हेनिस असा लक्झरी प्रवास घडवते. ही एक्सप्रेस तिच्या लक्झुरिअस इंटिरियरसाठी प्रसिद्ध आहे. या एक्सप्रेसने प्रवास करणारे गेस्ट्स प्रायव्हेट केबिन्स किंवा लक्झरी स्वीट्स बुक करू शकतात आणि इथल्या मिशेलीन स्टार लेव्हल क्युझिन आणि पर्सनल बटलर या सेवांचा लाभ घेऊ शकतात.

नोर्वेची फ्लाम रेल्वे

ही रेल्वे युरोपमधल्या सर्वांत स्टीप स्टँडर्ड गेज रेल्वेपैकी एक आहे. जसजशी ट्रेन फ्लॅम ते मिड्रालपर्यंत वर चढते, तसतसे तुम्ही आजूबाजूचा पॅनोरमिक व्ह्यू एन्जॉय करू शकता. या मार्गावर अनेक वॉटरफॉल्स दिसतात. त्यातला क्यॉसफॉसन वॉटरफॉल जगप्रसिद्ध आहे.

जेकोबाईट स्टीम ट्रेन / हॉग्वर्ट्स एक्सप्रेस

ही ट्रेन फोर्ट विल्यम ते मल्लाईगपर्यंत ताशी 50 मीटर वेगाने जाते.

हॅरी पॉटर फिल्म सिरीज हिट झाल्यानंतर 21 आर्चड ब्रीज विशेष प्रसिद्ध झाला. वॉर्नर ब्रदर्सनी त्यांच्या हॅरी पॉटरच्या फिल्म्समध्ये ही ट्रेन हॉग्वर्ट्स एक्सप्रेस म्हणून वापरली तसंच फिल्मच्या शूटिंगसाठी जेकोबाईट रूट वापरला.

अशा या अद्भुत रेल्वेज मध्ये तुम्हाला प्रवास करायचा असेल तर ऍडव्हान्समध्ये सीट बुक करण्यासाठी आजच आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडेज टीमशी संपर्क करा.


बुरा न मानो होली है!

होळी हा रंगांचा आणि आनंदाचा वर्षाव करणारा सण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वृंदावन इथल्या बांके बिहारी मंदिरात, ‌‘फ्लॉवर होळी‌‘ साजरी करतात. यात रंगांऐवजी सुगंधी फुलांच्या पाकळ्या वापरल्या जातात. श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरेतही होळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. हा महिनाभराचा उत्सव फेब्रुवारीमध्ये सुरू होतो आणि मार्चमध्ये भव्य मथुरा होळीच्या सोहळ्याने संपतो. बरसाना लाठमार होळी ही 40 दिवसांची असते, तर 'फलेन की होली' मथुरेपासून 40 किमी अंतरावरच्या फालेन गावात खेळतात. यात एक पुजारी अग्नीतून चालतात. असं म्हणतात की या पुजाऱ्याच्या कुटुंबाला 'प्रल्हादा' प्रमाणेच अग्नी जाळू शकत नाही. सांगला होळी उत्सवात किन्नरी लोक ताक आणि भाजलेल्या सातूच्या पिठापासून बनवलेला तोटू नावाचा गोड पदार्थ गावकऱ्यांना प्रसाद म्हणून देतात. वाराणसीमध्ये मसान होळी साजरी करतात. यात स्थानिक, नागा साधू आणि अघोरी साधू जळत्या चितेवरची राख अंगाला लावून मणिकर्णिका घाटावर होळी खेळतात. उत्सवाची सुरुवात घाटाजवळील मसान मंदिरात भव्य आरतीने होते. अशा या विविध ठिकाणच्या परंपरांनी नटलेल्या भारतात होळीचा सण तुम्ही कुठे साजरा करताय वीणा वर्ल्डसोबत?

www.veenaworld.com

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
इथूनच का होतो जगप्रवासाचा श्रीगणेशा?
18 mins, read

इथूनच का होतो जगप्रवासाचा श्रीगणेशा?

Published in the Sunday Lokmat Saransh on 26 April 2026 ‘परदेश प्रवास‌’ करायचं म्हटलं किंवा भारताच्या बाहेर पाऊल टाकायचं ठरवलं की मनात एक वेगळीच हलचल सुरू होते. थोडी उत्सुकता, थोडी धाकधूक, थोडी स्व

इट्स टाईम फॉर आफ्रिका
18 mins, read

इट्स टाईम फॉर आफ्रिका

Published in the Sunday Sakal Saptarang on 26 April 2026 आफ्रिका...एक माईलस्टोन आफ्रिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम उभं राहतं ते अद्वितीय, विलोभनीय आणि अक्षरशः अफलातून वाईल्डलाईफ. जगात कुठ

स्वालबार्ड
18 mins, read

स्वालबार्ड

Published in the Sunday Loksatta Lokrang on 26 April 2026 नॉर्थ पोलपासून फक्त १३०० किमीवर असलेलं जगातलं सर्वात उत्तरेकडील शहर! इथे तुम्ही जन्माला येऊ शकत नाही आणि इथे तुम्ही मरणही पावू शकत नाही.

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Our OfficesLocate Us

Located across the country, ready to plan your dream vacation today!

Locate Us

Call us1800 313 5555

Request a quote or chat - we’re here to help anytime!

Write to us

We're always happy to help!

Connect with us

Reviews, podcasts, blogs and more...

Veena world
Associated withIATAIATOTAAITAFI

*Caution: Beware of Fake Promotions or Offers *Please do not believe or engage with any promotional emails, SMS or Web-link which ask you to click on a link and fill in your details. All Veena World authorized email communications are delivered from domain @veenaworld.com or @veenaworld.in or SMS from VNAWLD or 741324. *Veena World bears no liability or responsibility whatsoever for any communication which is fraudulent or misleading in nature and not received from registered domain.

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top