Published in Loksatta Lokrang 11th October 2026
...सूर्यप्रकाशाने उजळलेला एखादा पिवळा रस्ता, हिरवागार निसर्ग, अथांग समुद्राचा निळा रंग किंवा सूर्यास्ताच्या प्रकाशात उजळून निघालेल्या शहराच्या विविध रंगछटा...
सप्टेंबर-ऑक्टोबरचे दिवस सुरू झाले की हवेतला बदल जाणवू लागतो. हळूहळू भारतातून मान्सून माघारी फिरू लागतो आणि त्याची जागा घेतं शरद ऋतूतील स्वच्छ आकाश आणि सौम्य सूर्यप्रकाश. उत्तर गोलार्धात शरद ऋतूच्या आगमनाने निसर्ग सोनेरी, तांबूस आणि लाल रंगछटांनी रंगून जातो, तर दक्षिण गोलार्धात गुलाबी, जांभळ्या आणि पांढऱ्या फुलांनी वसंत ऋतूचं स्वागत होतं. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलात, तरी बदलत्या ऋतूचं स्वागत निसर्ग आपल्या रंगांची नेत्रदीपक उधळण करून करीत असल्याचं जाणवतं.
भारतात हा ऋतुबदल म्हणजे आतुरतेने वाट पाहिलेल्या सणासुदीच्या हंगामाची सुरुवातही असते. हा असा काळ असतो, जेव्हा दर काही आठवड्यांनी एक नवा सण, नव्या परंपरा आणि एकत्र येण्याचं आणखी एक कारण आपल्यासमोर येतं. या संपूर्ण उत्सवी पर्वाच्या केंद्रस्थानी आहे नवरात्र. देवी दुर्गा आणि तिच्या दिव्य रूपांना समर्पित नऊ रात्रींचा उत्सव. स्त्रीमधील शक्ती, ज्ञान, करुणा आणि धैर्याबद्दल संदेश देणारा हा नवरात्रोत्सव आजच्या काळात पूर्वीपेक्षाही अर्थपूर्ण वाटतो.
आज नवरात्रीचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट रंगाशी जोडला जातो. संपूर्ण भारतातील, विशेषतः मुंबईसारख्या शहरांतील लोक, खासकरून महिला त्या दिवसासाठी ठरलेल्या रंगाचे कपडे परिधान करतात त्यामुळे ट्रेन, ऑफिसेस आणि आजूबाजूचा परिसर एखाद्या मोहक चित्रासारखा दिसू लागतो. पर्यटकांसाठीही हा काळ भटकंतीला निघण्यासाठी वर्षातील सर्वात सुंदर काळांपैकी एक असतो. उन्हाळा आणि हिवाळ्याची तीव्रता अजून काहीशी दूर असते, सुट्टीच्या दिवसांमधली गर्दी ओसरलेली असते आणि जगभरातील पर्यटनस्थळं ऋतुबदलामुळे एका वेगळ्याच सौंदर्याने खुलून आलेली असतात.
प्रवास जगणारी, प्रवासच श्वास असलेली आणि प्रवासाची स्वप्नं पाहणारी व्यक्ती म्हणून रंग म्हटलं की मला वेगवेगळी ठिकाणं आठवतात. नुकतीच मी मोरोक्को आणि क्रोएशियाहून परतले. तिथल्या मराकेशच्या उबदार गुलाबी भिंती आणि ॲड्रियाटिक समुद्राचं गडद निळं पाणी माझ्या मनावर कायमची छाप सोडून गेलं. म्हणूनच, नवरात्र साजरं करताना आणि देवी दुर्गेच्या विविध रूपांचा सन्मान करताना, नवरात्रीचे रंग आणि तिचा उत्साही आत्मा अगदी जिवंतपणे अनुभवता येईल अशा आपल्या परिचयाच्या भारतीय शहरांपासून ते दूरवरच्या निसर्गरम्य प्रदेशांपर्यंत, अशी नऊ पर्यटनस्थळं पाहूया.
नारिंगी - नेदरलँड्स
उत्साह, वात्सल्य आणि उर्जा यांचे प्रतीक
हाऊस ऑफ ऑरेंज - नासाऊ, या राजघराण्याच्या प्रभावामुळे नेदरलँड्स आणि नारिंगी रंग हे समानार्थी शब्द झाले आहेत. संपूर्ण नेदरलँड्सला, ‘किंग्ज डे’च्या समारंभाच्या निमित्ताने, नारिंगी रंगाच्या सागराचे रूप प्राप्त होते. सगळ्या डच मंडळींसाठी ‘हाऊस ऑफ ऑरेंज’ हा अभिमानाचा विषय आहे. इथे आपल्याला जिवंत ऊर्जा, वात्सल्य आणि उत्साह अनुभवता येतो. ॲमस्टरडॅममध्ये शहरातून जाणाऱ्या कॅनलमधली क्रूझ राईड घेता येते. त्याचबरोबर तिथली खास लॉक (कुलूप) संस्कृतीही जाणून घेण्यासारखी आहे. एका वसंत ऋतूत मला इथल्या ट्युलिप गार्डनमध्ये भटकंती करण्याची संधी मिळाली होती. तिथे ट्युलिपच्या गडद, देखण्या रंगाचा नजारा पाहिल्यावर मला साहजिकच ‘सिलसिला’ मधल्या गाण्याची आठवण झाली.
पांढरा - सँटोरिनी, ग्रीस
शांतता आणि शुद्धता यांचे प्रतीक
एजियन समुद्रालगतच्या टेकड्यांवर असलेल्या आयकॉनिक पांढऱ्या आणि निळ्या घुमटांकडे नजर टाकली की मनाला शांतता आणि शुद्धता यांची प्रचिती येते. या बेटावरील प्रसन्न आणि निवांत भोवताल पाहताना हरखून जायला होतं. सूर्यप्रकाशामुळे तेजोमय होणाऱ्या पांढऱ्याशुभ्र वास्तू, धरणी आणि सागर यांच्यातील नि:शब्द संवाद या गोष्टी कुठल्या तरी परग्रहावरच्या असाव्यात इतक्या अनोख्या वाटतात. सँटोरिनीमधील माझाच नव्हे, तर या बेटावर असलेल्या सगळ्यांचा आवडता क्षण म्हणजे इथला सूर्यास्त. कॅल्डेरावर सूर्याचे सोनेरी किरण पसरतात तेव्हा निर्माण होणारं दृश्य अद्भुत असतं. यामुळे हे जगातील सर्वाधिक छायाचित्रण झालेल्या ठिकाणांपैकी एक आहे. सँटोरिनी पाहिलं की ग्रीसमधील मायकोनोस, ऱ्होड्स आणि नॅक्सोस यांसारखी शुभ्र गावं कधी एकदा पाहतो अशी आपली स्थिती होते.
लाल - क्योटो, जपान
शक्ती आणि उत्कटता यांचे प्रतीक
क्योटोमधील फुशिमी इनारी श्राइनचे लाल तोरई दरवाजे हे शक्ती, ऊर्जा आणि उत्कटतेची प्रभावी प्रतीके आहेत. जपानी संस्कृतीत लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. तो संरक्षण आणि चैतन्याचं प्रतीक मानला जातो. फुशिमी इनारीच्या जंगलातून वळणावळणाने जाणारे हजारो सिंदूरी रंगाचे तोरई दरवाजे हे गतिशीलतेचे आणि शक्ती-भक्तीचे प्रतिनिधित्व करतात. परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम असलेले क्योटो हे ठिकाण जपानी संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी उत्तम आहे.
रॉयल ब्लू - शेफशाऊएन, मोरोक्को
राजेशाही थाट, अभिजातता व समृद्धीचे प्रतीक
मोरोक्कोच्या उत्तर भागाच्या सफरीत मला शेफशाऊएन नावाचा एक लपलेला खजिना सापडला. ‘मोरोक्कोचे ब्लू पर्ल’ अशी ओळख मिरवणारं हे शहर पूर्णपणे शाही निळ्या रंगात रंगलेलं आहे. हा रंग अभिजातता, अध्यात्म आणि निरामय शांतता यांचं प्रतीक आहे. ही निळाई म्हणजे आकाश आणि स्वर्ग यांचं प्रतिबिंब मानली जाते. त्यातून समृद्धी, शांतता झळकते. निळ्या रंगातील घरं आणि रस्त्यांच्या उतरंडीमुळे या शहराला जगभरात एक वेगळीच ओळख मिळालेली आहे. ‘इन्स्टाग्राम’ प्रेमींसाठी येथे उत्तमोत्तम फोटोजनिक ठिकाणांची लयलूट आहे.
पिवळा पाँडिचेरी, भारत
आनंद, तेज आणि ऊर्जा यांचे प्रतीक
पाँडिचेरीच्या मी पाहताक्षणीच प्रेमात पडले. तिथे पोहोचले तेव्हा तिथल्या देखण्या रस्त्यांमध्ये, विशेषत: फ्रेंच क्वार्टर भागात, मी पार हरवून गेले. पिवळ्या रंगाच्या विविध छटांची तिथे बरसातच झाली होती. मस्टर्ड कलरच्या कलोनियल काळातील इमारती आणि त्यावरील बोगनवेलींची सजावट पाहताना शांतता आणि तेजस्वीपणा जाणवत होता. कधीकाळी फ्रेंच वसाहत असलेल्या या किनारी शहरात आपल्याला भारतीय आणि युरोपीय संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. तिथलं वातावरण एकदम आरामदायी आणि निवांत आहे. मुंबईत म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर राहणाऱ्या मला समुद्र किनाऱ्यावरून सूर्यास्त पाहण्याची सवय आहे. त्यामुळे इथल्या किनाऱ्यावरून सूर्योदय पाहण्याचा अनुभव खास होता.
हिरवा - बाली, इंडोनेशिया
प्रगती, सुसंवाद आणि आरंभ यांचे प्रतीक
दाट हिरवाईने नटलेल्या बालीमध्ये गेल्यावर उबुदमधील हिरव्यागार राईस टेरेसेस, घनदाट जंगले आणि मंदिरे पाहता येतात. या बेटावरील निसर्ग आणि आध्यात्मिक परंपरा यांचा हिरव्या रंगाशी निकटचा संबंध आहे. कारण हिरव्या रंगात नवता, पुनर्निमिती आणि शांतता सामावलेली आहे. टेकड्या आणि दऱ्यांमध्ये असलेली सुप्रसिद्ध तेगल्लालांगमधली भातशेती, त्यावरची उलुवातू आणि तानाहा लोट मंदिरे हा परिसर नेत्रसुखद आहे. मी उबुदमध्येच दगडावर कोरलेलं संपूर्ण रामायण पाहिलं. शहरभर अनेक ठिकाणी हिंदू पद्धतीचे विधीही पाहिले. इथले बीचेस अतिशय सुंदर आहेत. त्या बीचेसवर वॉटरस्पोर्टस्मध्ये सहभागी होण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. अशा या बालीला पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं.
राखाडी - रेक्याविक, आइसलँड
स्थैर्य आणि सामर्थ्य यांचे प्रतीक
ज्वालामुखीमुळे राखाडी रंगात रंगलेल्या रेक्याविक आणि त्या सभोवतालच्या परिसरातील नैसर्गिक आश्चर्यांतून स्थैर्य आणि सामर्थ्य यांची प्रचिती येते. लाव्हा पसरलेला मोठाला भूभाग, उंचावरून वाहत येणाऱ्या हिमनद्या यातून आईसलँडचे ओबडधोबड पण आकर्षक, लोभस सौंदर्य ठायीठायी दिसते. रेक्याविक हे हॉट वॉटर गीझर्ससाठीही प्रसिद्ध आहे. इथल्या ब्लू लगूनमध्ये पोहण्यासारखा दुसरा आनंद नाही. हॉट वॉटर गीझर्स, गुल्फॉस वॉटरफॉल, थिंगवेलिर नॅशनल पार्क या गोल्डन सर्कलची दिवसभराची सैर आनंद देणारी असते. या अग्नी आणि बर्फाच्या भूमीतून पर्यटकांना अरोरा बोरेआलिस म्हणजेच नॉर्दर्न लाईट्सचंही दर्शन घेता येतं.
जांभळा - प्रोवान्स, फ्रान्स
महत्त्वाकांक्षा, गूढता आणि सर्जनशीलतेचं प्रतीक
फ्रान्सच्या प्रोवान्स प्रांतात क्षितीजापर्यंत नजर जाईल तोवर लॅव्हेंडरच्या लांबच लांब पसरलेल्या बागा दिसतात. त्यात जांभळ्या रंगाच्या कितीतरी छटा दिसतात. हा रंग महत्त्वाकांक्षा, गूढता आणि सर्जनशीलता यांचे प्रतीक आहे. हा रंग जादूई असून प्रोत्साहित करणारा आहे. कलात्मक वारसा आणि प्रसन्न निसर्गसौंदर्य यासाठी प्रोवान्स प्रांत ओळखला जातो. शांततेच्या शोधात असणाऱ्यांसाठी तर हे नंदनवन आहे. इकडच्या ग्रोड्स आणि रुसिलिऑन कम्यून्सना आवर्जून भेट द्यावी. उत्तम खाद्यपदार्थ आणि वाईनसाठीही हा प्रांत प्रसिद्ध आहे. त्यामुळे जेव्हा फ्रान्सला जाल तेव्हा फ्रेंच रिव्हिएरासह प्रोवान्स मस्ट आहे.
पिकॉक ग्रीन / मोरपंखी.
आत्मविश्वास, नवचैतन्य आणि विकासाचे प्रतीक
नवरंगातील शेवटचा रंग आहे पिकॉक ग्रीन अर्थात मोरपंखी. हा निळ्या रंगाची शांतता व आत्मविश्वास, आणि हिरव्या रंगाचं नवचैतन्य व तेज आपल्यात सामावून घेतो. मोराच्या भव्य पिसाऱ्यात निळ्या आणि हिरव्या रंगांच्या असंख्य छटा ज्या प्रकारे एकमेकांत मिसळतात, तसाच निसर्गही आपल्या लेक्स आणि ओशन्समध्ये विलक्षण रंगछटांची उधळण करताना दिसतो. हा रंग मला कॅनडातील लेक लुईस आणि मोरेन लेकच्या, ग्लेशियर्समधून आलेल्या निळ्याशार पाण्याकडे, तसंच न्यूझीलंडमधील मिलफोर्ड साउंडच्या गडद हिरव्या पाण्याकडे घेऊन जातो. अशा ठिकाणांहून परतल्यानंतरही मनात एक प्रकारचं चैतन्य, ताजेपणा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एक विलक्षण शांतता बराच काळ रेंगाळत राहते.
नवरात्रीप्रमाणेच प्रवासही आयुष्यातील विविध रंगांचा उत्सव आहे. प्रत्येक प्रवास आपल्या आठवणींमध्ये एक नवा रंग भरतो. सूर्यप्रकाशाने उजळलेला एखादा पिवळा रस्ता, हिरवागार निसर्ग, अथांग समुद्राचा निळा रंग किंवा सूर्यास्ताच्या प्रकाशात उजळून निघालेल्या शहराच्या विविध रंगछटा... असे रंग आपण घरी परतल्यानंतरही आपल्या मनात राहतात आणि आपल्याला प्रवासातील खास क्षणांची आठवण करून देतात.
देवी दुर्गेच्या नऊ रूपांचा उत्सव साजरा करताना, हे रंग आपल्या भविष्यातील प्रवासांनाही प्रेरणा देऊ शकतील. यापैकी कोणतं पर्यटनस्थळ तुम्हाला सर्वाधिक आवडेल आणि तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाला निघाल हे मला नक्की कळवा. या नवरात्रीत तुमचं आयुष्य धैर्य, आनंद आणि असंख्य रंगीबेरंगी प्रवासांनी भरून जावो, यासाठी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सुखद प्रवासाच्याही शुभेच्छा!



































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.