We're open on 25th September 2026, Friday. Locate Us
Our all offices are open on 25th September 2026, Friday. Locate Us
India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

बुकमार्कपासून बोर्डिंग पासपर्यंत!

9 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
9 Mins Read
September 24, 2026
September 24, 2026

Quick Summary

युकेला पहिल्यांदा गेल्यावर आपल्याला आधीच भेट दिल्यासारखं वाटू शकतं, कारण जुन्या वास्तू आणि भारतीय लोकांचा वावर आठवणी जाग्या करतो.

लंडनमध्ये असताना हाइड पार्कजवळच्या 17 डॅनरेवन स्ट्रीटसारख्या वूडहाऊसच्या ठिकाणांना भेट द्या आणि पुस्तकातलं जग प्रत्यक्ष अनुभवा.

स्कॉटलंडची टूर आखा आणि एडिनबर्गच्या दगडी रस्त्यांवर फिरा, डायगन ॲलीला प्रेरणा देणाऱ्या व्हिक्टोरिया स्ट्रीटवर फेरी मारा.

लहान मुलं असतील तर एडिनबर्गमधील हॅरी पॉटर वॉकिंग टूर अजिबात चुकवू नका आणि व्हायाडक्टवरून धावणाऱ्या जेकोबाईट स्टीम ट्रेनचा अनुभव घ्या.

आऊटलँडरचे चाहते असाल तर इन्व्हरनेसला बेस बनवा, डून कॅसल पाहा आणि ग्लेन कोच्या निसर्गरम्य लँडस्केपमध्ये हरवून जा.

यूकेची टूर प्लॅन करताना लंडनसाठी थोडा वेळ राखून ठेवा आणि मेफेअर व बेलग्रेवियामधून जाणाऱ्या वूडहाउस वॉकचा अनुभव घ्या.

Published in Loksatta Lokrang 27th September 2026

...त्याच्या प्रवासातली प्रत्येक जागा, प्रत्येक अनुभव मला मोरोक्कोच्या त्या सुंदर भूदृश्यांच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांसमोर उभा करता येत होता. कारण...

मी आयुष्यात पहिल्यांदा युकेमध्ये पाऊल ठेवलं ते 1999 मध्ये. पण तिथे गेल्यावर मला वाटलं की मी यापूर्वीही इथे येऊन गेले आहे. भारतीय लोकांचा वावर, जुन्या वास्तू यांच्यामुळे मला भारतातल्या शहरांची आठवण होत असावी असा माझा समज झाला, पण असं नव्हतं. माझ्या कल्पनाविश्वात मी अनेकदा इथे येऊन गेले होते. इथल्या जुन्या दगडी पायवाटांवरून फिरताना किंवा गल्लीबोळात हिंडताना, माझ्या किशोरवयात बहुतेकदा शनिवारी मी मुंबईतील ब्रिटिश लायब्ररीमध्ये जात असे, तो काळ मला आठवला. तिथल्या कपाटातून आमचे आवडते लेखक पी जी वूडहाऊस यांची पुस्तकं शोधून ती वाचत बसणं हा आम्हा मित्रमंडळींचा एककलमी कार्यक्रम असे. जीव्हज्‌‍ अँड वूस्टर किंवा ब्लँडिंग्ज कॅसल या मालिकांतील पुस्तकं सापडली की मग आम्ही त्या कथांमध्ये वूडहाऊसने उभ्या केलेल्या विलक्षण दुनियेत हरवून जायचो. त्या कथांना इंग्लंडच्या ग्रामीण भागाची पार्श्वभूमी होती. तेव्हापासूनच आम्हाला त्या ठिकाणांना भेट देण्याचे वेध लागले होते. अजूनही युकेमध्ये आल्यावर मी तिथल्या हॅट शॉपमध्ये आणि ट्रेन स्टेशनवर आवर्जून जाते आणि किशोरवयात पाहिलेल्या त्या स्वप्नांना उजाळा देते.

माझी शाळेतली मैत्रीण महालक्ष्मी अमेरिकेत राहते. गेली काही वर्षं आम्ही दोघी वर्षातून एक सुट्टी एकत्र साजरी करतो. जुने दिवस आठवत नवीन आठवणी जोडतो. गेल्या वर्षी आम्ही लंडनमध्ये असताना आमचे पाय वूडहाऊसच्या लंडनमधील घरापाशी म्हणजेच 17, डॅनरेवन स्ट्रीट या हाईड पार्कजवळच्या घराकडे वळले. आम्ही घरासमोर उभे राहिलो आणि अलगद किशोरवयात गेलो. त्यांनी शब्दातून रंगवलेलं जग आमच्या सभोवताली अवतीर्ण झालं होतं. अशी पुस्तकात वर्णन केलेली ठिकाणं प्रत्यक्ष पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. म्हणूनच या आठवड्यात आपण प्रवासाची प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांवर एक नजर टाकूया.

वूडहाऊसपासून वँड्सपर्यंत, मुलीसोबतचा स्कॉटलंड प्रवास

माझं बालपण वूडहाऊसच्या शब्दांनी भारलेलं होतं, तर माझ्या मुलीच्या बालजीवनात हॅरी पॉटरने धुमाकूळ घातला होता. जाडजूड पुस्तकं वाचताना त्यात पूर्ण रममाण झालेली सारा मला लख्खपणे आठवते. वाचताना तिचे डोळे आश्चर्याने विस्फारलेले असायचे. त्यानंतर आम्ही स्कॉटलंडची टूर आखली. त्या टूरमध्ये किल्ले होते, व्हिस्की होती, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या टूरवर हॉगवर्टस्‌‍ची मोहिनी होती. आम्ही एडिनबर्गच्या दगडी रस्त्यांवरून हिंडलो, जे के रोलिंगने जिथे बसून कादंबरीची सुरुवातीची प्रकरणं लिहिली, त्या कॅफेमध्ये आम्ही कॉफी घेतली. डायगन ॲलीला प्रेरणा देणाऱ्या व्हिक्टोरिया स्ट्रीटवरच्या जादूगिरीवाल्या दुकानातून फेरी मारली. ग्लेनफिनन ब्रिजवरून हॉगवर्टस्‌‍ एक्सप्रेसप्रमाणे धडधडत जाणारी ट्रेन पाहिली. कसला जादुई अनुभव होता तो!

हायलँड्स - आउटलँडरचं कधीही संपणारं आकर्षण

डायना गॅबिल्डन यांची आऊटलँडर ही काल्पनिक ऐतिहासिक कादंबरी मी वाचली होती. स्कॉटलंडमध्ये त्यावर आधारित टीव्ही सिरीयल आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडणारी ही कादंबरी वाचकाला अठराव्या शतकातील स्कॉटलंडमध्ये घेऊन जाते. या वातावरणात गेलो की कलोडनच्या रणांगणावर उभे राहून जेकोबाईट उठावातील सैनिकांना आदरांजली वाहताना आपण भावूक होतो. या रणांगणावर ‌‘ड्यूक ऑफ कंबरलँड‌’च्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याने चार्ल्स एडवर्डस्‌‍ स्टुअर्ट (बोनी प्रिन्स चार्ली) याच्या सैन्याचा निर्णायक पराभव केला होता. गूढतेने भारलेले हायलँड्स, निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि प्रत्येक वळणावर दिसणारी एखादी गूढ गोष्ट... अशा काही हटके टूर्सही स्कॉटलंडमध्ये करता येतात.

ट्रॅव्हल टिप - यूकेची टूर प्लॅन करीत असाल तर लंडनसाठी थोडा वेळ राखून ठेवा. आमच्यासोबत आलात तर, तुम्हाला मेफेअर आणि बेलग्रेवियामधून जाणाऱ्या सेंट्रल लंडनच्या खास गाइडेड वूडहाउस वॉकचा अनुभवही घेता येईल. हाइड पार्कमध्ये निवांत फेरफटका मारताना जीव्ह्ज तुमच्याही आयुष्यातील समस्या सोडवतोय अशी कल्पना करा. लहान मुलं सोबत असतील तर एडिनबर्गमधील हॅरी पॉटर वॉकिंग टूर अजिबात चुकवू नका. हॅरी पॉटरचे तुम्ही कट्टर चाहते असाल, तर व्हायाडक्टवरून धावणाऱ्या जेकोबाईट स्टीम ट्रेनमधून प्रवास करण्याचा अनुभवही मस्ट आहे! आऊटलँडरचे चाहते असाल, तर इन्व्हरनेसला आपला बेस बनवा. मालिकेतील कॅसल लिओच म्हणून प्रसिद्ध असलेला ‌‘डून कॅसल‌’ पाहा आणि ग्लेन कोच्या नाट्यमय, भव्य निसर्गरम्य लँडस्केपमध्ये हरवून जा. मग यूकेचा प्रवास म्हणजे आपल्या आवडत्या कथांच्या आणि पात्रांच्या जगात प्रवेश केल्यासारखा वाटेल!

जेव्हा पुस्तक वाचण्याआधी आपण प्रवास करतो...

माझे सगळे प्रवास काही पुस्तकांपासून सुरू झालेले नाहीत. कधीकधी आधी प्रवास केला आणि मग त्याला शब्दांची साथ मिळाली. कधी कधी एखाद्या ठिकाणचं अप्रतिम निसर्गसौंदर्य, जिवंत संस्कृती, आध्यात्मिक वातावरण असं काहीतरी अनुभवल्यानंतर वाटलं हे ठिकाण एखाद्या पुस्तकासाठी एकदम योग्य सेटिंग ठरेल!

न्यूझीलंडचंच उदाहरण घेतलं तर नाट्यमय निसर्ग, साहसी खेळ, आणि समृद्ध माओरी संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेला हा देश तिथे जाणाऱ्या प्रत्येकाला थक्क करतो. रोड ट्रिपसाठी तर न्यूझीलंड एकदम परफेक्ट आहे. शुभ्र बर्फाच्छादित साऊथ आल्प्स माऊंटन्स, फिओर्डलँड नॅशनल पार्क आणि लेक टेकापोसारखी निळीशार सरोवरं आपल्याला खुणावत राहतात. म्हणूनच कदाचित ‌‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज‌’ या महाकाव्यात्मक पुस्तकाशी न्यूझीलंडचं नाव आज इतकं घट्ट जोडलं गेलंय. असं असलं तरी गंमत म्हणजे ही पुस्तकं न्यूझीलंड डोळ्यांसमोर ठेवून लिहिलीच नव्हती! इंग्लिश लेखक आणि फिलॉलॉजिस्ट जे. आर. आर. टॉल्किन यांनी विसाव्या शतकाच्या मध्यावर ही पुस्तकं लिहिली. त्यांना मुख्यतः युरोपियन भू-दृश्यं, विशेषतः इंग्लंडचा ग्रामीण परिसर, नॉर्स पुराणकथा आणि मध्ययुगीन साहित्यापासून प्रेरणा मिळाली होती. न्यूझीलंडचा मिडल-अर्थशी संबंध खूप नंतर जोडला गेला. दिग्दर्शक पीटर जॅक्सन यांनी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी न्यूझीलंडची निवड केली आणि मग न्यूझीलंडचं मिडल-अर्थमध्ये रूपांतर झालं!

ट्रॅव्हल टिप -  खऱ्याखुऱ्या मिडल अर्थचा अनुभव घ्यायचा असेल तर माटामाटामधील हॉबिटन टूरला पर्याय नाही. ‌‘मॉर्डोर‌’ची अनुभूती घ्यायची असेल तर टोंगारिरो अल्पाइन क्रॉसिंगवर हायकिंग करा.

‌‘ईट, प्रे, लव्ह‌’ या पुस्तकासोबतही असंच काहीसं घडलं. मी रोममध्ये स्पगेटी ट्वर्ल केली होती. पिझ्झावर ताव मारला होता आणि जिलेटोचे असंख्य फ्लेवर्स चाखले होते. हिरवीगार भातशेती, उष्ण कटिबंधीय वातावरणातील उद्याने पाहिली होती. निसर्गरम्य बालीमध्ये समुद्रकिनारी बसून नारळपाणी प्यायलं होतं. उबुदमध्ये मंदिरात नैवेद्य दाखवला होता आणि हिंदू परंपरांशी नातं सांगणाऱ्या बालिनी तत्त्वज्ञानाशी संगम साधणारे दैनंदिन विधीही पाहिले होते. या सर्व गोष्टी मी एलिझाबेथ गिल्बर्ट यांचं हे भावपूर्ण आत्मकथन वाचण्यापूर्वीच केल्या होत्या. त्यांच्या पुस्तकात, बाली एका शांत, आध्यात्मिक नंदनवनासारखं समोर येतं... समतोल, सौंदर्य आणि आत्मिक उपचारांनी भरलेलं. त्यामुळे नंतर ते पुस्तक वाचणं म्हणजे आपण कधीच न लिहिलेली, पण तरीही कुठेतरी जगलेली डायरी उघडून वाचण्यासारखं होतं!

ट्रॅव्हल टिप - रोममध्ये त्रास्तवेरे येथे पास्ता बनविण्याच्या कार्यशाळेत सहभागी व्हा किंवा जिलेटो हॉपिंग टूर घ्या. बालीतील उबुदमध्ये राईस टेरेस वॉक घ्या, वीणा वर्ल्डच्या लक्झरी टूर्ससोबत बालीमध्ये आत्मिक शुद्धीकरणाची अनुभूती घ्या.

मोरोक्को आणि ‌‘द अल्केमिस्ट‌’

जेव्हा मी मोरोक्कोला गेले, तेव्हा ते माझ्या कल्पनेपलीकडचं निघालं! निळ्या, सोनेरी आणि लाल रंगांनी रंगवलेलं एखादं स्वप्नच जणू... मोरोक्कोचा प्रत्येक अनुभव मनावर कायमचा कोरला गेला. परतल्यानंतर जेव्हा मी पाउलो कोएलोचं ‌‘द अल्केमिस्ट‌’ पुन्हा वाचलं, तेव्हा पुस्तकातल्या प्रत्येक शब्दाला, प्रसंगाला तिथला रंग मिळाला होता. सँटियागोचा शोध आता केवळ एक काल्पनिक कथा राहिली नव्हती. त्याच्या प्रवासातली प्रत्येक जागा, प्रत्येक अनुभव मला मोरोक्कोच्या त्या सुंदर भूदृश्यांच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांसमोर उभा करता येत होता. कारण त्या पुस्तकातलं बरंचसं जग मी स्वतः अनुभवलं होतं!

ट्रॅव्हल टिप - निळ्याशार रस्त्यांसाठी शेफशाउएनला नक्की भेट द्या. आणि सहाराच्या वाळवंटात उंटावरून सफर करीत, तारकांनी भरलेल्या आकाशाखाली एक रात्र घालवा.

पिकनिक कमी, साहसाची पर्वणी - माउंट केनिया

अलीकडेच माझे सहकारी प्रशांत यांनी मला ‌‘नो पिकनिक ऑन माउंट केनिया‌’ हे पुस्तक भेट दिलंय. या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इटालियन युद्धकैद्यांची छावणीतून सुटका आणि त्यानंतर माउंट केनिया सर करण्याचा त्यांचा धाडसी प्रयत्न!

2016 मध्ये टांझानियातील माउंट किलीमांजारो सर केला असल्यामुळे या कथेची कल्पनाच मला रोमांचित करून गेली. उंच पर्वतरांगा माणसाच्या क्षमतांची परीक्षा घेतात, आपल्याला घडवतात आणि सगळ्या बंधनांपासून मुक्तही करतात. म्हणूनच पर्वतांची साद एकदा ऐकू आली की, आपले पाय आपोआप त्या दिशेने वळतात.

ट्रॅव्हल टिप -  माउंट केनियावर चढाई करणं कदाचित प्रत्येकाच्या प्रवासाच्या यादीत नसेल, पण त्याचं भव्य रूप दुरून अनुभवता येतं. मसाई माराच्या विस्तीर्ण मैदानांमध्ये सफारी करताना, वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात, अगदी मनमुराद जगताना पाहताना, सतत सोबत करणाऱ्या माउंट केनियाचं दर्शनही सुखावणारं असतं.

80 दिवसात जगप्रदक्षिणा - कधीही न संपणारा प्रवास

आणि शेवटी उल्लेख करायलाच हवा तो ‌‘ज्यूल व्हर्न‌’ या प्रवासाची आस जागवणाऱ्या लेखकाचा! ‌‘अराऊंड द वर्ल्ड इन 80 डेज‌’ हे केवळ एक पुस्तक नाही, तर ते जगप्रवासाचं आमंत्रणच आहे. लंडनच्या धुक्यात हरवलेल्या पायवाटांपासून ते भारताच्या मसाल्यांच्या सुगंधाने दरवळणाऱ्या वातावरणापर्यंत, समुद्रावरून धावणाऱ्या स्टीमरपासून वाळवंटातून जाणाऱ्या रेल्वेपर्यंत... ज्या ज्या म्हणून प्रवासाच्या शक्यता आहेत, त्या सगळ्या अनुभवताना आपल्याला हे जग किती वेगळं आणि सुंदर आहे याची प्रचिती येते.

पुस्तकं हेच करतात. ती आपल्या मनात कुतूहल जागं करतात. बॅग भरून प्रवासाला निघायला प्रवृत्त करतात आणि पुढचं साहस पुस्तकाच्या पुढच्या पानावर किंवा पुढच्या फ्लाइटमध्ये आपली वाट पाहत असेल, हा विश्वास देतात.

ट्रॅव्हल टिप - 80 दिवसांत जगप्रदक्षिणा करणं  शक्य नसेल पण आयुष्यभरात नक्कीच करता येईल! वीणा वर्ल्डचं ‌‘50 कंट्री चॅलेंज‌’ स्वीकारा आणि एका वेळी एका देशापासून सुरुवात करा.

मग, आता पुढचा प्रवास कुठे?

मागे वळून पाहताना जाणवतं की, काही पुस्तकांनी मला प्रवासाला नेलं, तर काही प्रवासांनी मला वाचनाची गोडी लावली. पण दोघांनीही एकमेकांना समृद्ध केलं. कारण जेव्हा शब्दांची भेट जगाशी होते, तेव्हा फिरण्याची जादू दुप्पट होते! तर मग सांगा, तुम्हाला एका नव्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी कोणतं पुस्तक तुमची वाट पाहतंय?

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
जशी बॅग, तसा स्वभाव!
9 mins, read

जशी बॅग, तसा स्वभाव!

Published in Maharashtra Times 27th September 2026 ...तिथे अशा विसरलेल्या वस्तूंमुळे एअरपोर्टवर किंवा प्रवासात किंवा एका वेगळ्या देशात अपरात्री मोठा प्रश्न उभा राहू शकतो. म्हणून बारकाईने पाहिलंत, त

निसर्गाची अनोखी रंगपंचमी पाहायला, चला जपानला!
9 mins, read

निसर्गाची अनोखी रंगपंचमी पाहायला, चला जपानला!

Published in Sakal Saptrang 27th September 2026 ऑटम फॉलिएज नुकतीच मला न्यू साऊथ वेल्स आणि ऑस्ट्रेलियातील काही मिनिस्टर्सची, भारतातील काही प्रमुख टूर कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत असलेली एक मीटिंग

नॉर्थ ईस्ट बहुरंगी भारताचा आगळावेगळा चेहरा!
9 mins, read

नॉर्थ ईस्ट बहुरंगी भारताचा आगळावेगळा चेहरा!

Published in Sakal Saptrang 6th September 2026 फेस्टिव्हल ऑफ फेस्टिव्हल्स! दरवर्षी डिसेंबरमध्ये नागालँडच्या किसामा हेरिटेज व्हिलेजमध्ये ‌‘हॉर्नबिल फेस्टिव्हल भरतो‌’, जिथे राज्यातील जवळपास सगळ्या

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!