We Just Opened 3 New Branches!
We're Open, now in Vadodara, Kochi & Nungambakkam (Chennai).
India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड निसर्गाने मुक्तहस्ताने रेखाटलेली दोन अद्भुत चित्रं!

13 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
13 Mins Read
August 21, 2026
August 21, 2026

Quick Summary

ॲलिस स्प्रिंग्जमधील ‘स्कूल ऑफ द एयर’ला भेट देऊन आवाजाच्या माध्यमातून दुर्गम मुलांपर्यंत शिक्षण कसं पोहोचतं ते जाणून घ्या.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे ऋतू उलटे असल्याने डिसेंबरमध्येही सूर्यप्रकाश आणि सुट्टीसाठी योग्य वातावरण मिळू शकतं.

ऑस्ट्रेलियातील कांगारू आणि कोआला यांसारखं वन्यजीवन तांबड्या मातीवर आणि निलगिरीच्या झाडांवर प्रत्यक्ष पाहा.

टास्मान सी ओलांडून न्यूझीलंडमध्ये सदर्न आल्प्स, बर्फाच्छादित ग्लेशियर्स आणि हिरव्यागार रेनफॉरेस्टचा अप्रतिम संगम अनुभव.

ऑस्ट्रेलियाचा समुद्रकिनारा आणि शहरं काहीशे किलोमीटरनंतर बदलत असल्याने मार्ग नियोजन करताना अंतरानुसार थांबे ठेवा.

ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ, रेनफॉरेस्ट्स आणि उलुरू तसेच न्यूझीलंडमधील व्हॉल्कॅनो, हॉट स्प्रिंग्ज आणि मिलफोर्ड साऊंड एका प्रवासात पाहण्याचा प्लॅन करा.

Published in Sakal Saptrang. Date 23rd August, 2026

अपसाईड डाऊन

एकदा मी जगाच्या नकाशासमोर उभी होते. नकाशा ओळखीचा वाटत होता, पण तरीही काहीतरी वेगळं जाणवत होतं आणि मग माझ्या लक्षात आलं, की मी जगाचा नकाशा चक्क उलटा पाहत होते. त्यात सदर्न हेमिस्फियर वर आणि नॉर्दर्न हेमिस्फियर खालच्या बाजूला होता.

मी ॲलिस स्प्रिंग्जमधील ‌‘स्कूल ऑफ द एयर‌’ मध्ये होते. आयर्स रॉकपासून तशी जवळच असलेली ही शाळा आहे. या शाळेतील शिक्षक केवळ आवाजाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाच्या विस्तीर्ण, दुर्गम आऊटबॅकमध्ये राहणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचतात. कधी कधी ते हजारो किलोमीटर अंतरही पार करून येतात. आणि तिथल्या भिंतीवर हा नकाशा होता. तो उलटा नकाशा मला बरंच काही सांगून गेला. त्याने मला शांतपणे विचार करायला लावला. मनात आलं, आपण जगाचा नकाशा ज्या पद्धतीने पाहतो, ती काही निसर्गाने ठरवलेली दिशा नाही. तो तसा दिसतो, कारण युरोपीय प्रवाशांनी आणि नकाशाकारांनी तो तसा रेखाटला. आणि नकाशाकारांनी ज्या पद्धतीने जग काढलं, तीच पद्धत आपण स्वीकारली. म्हणून ऑस्ट्रेलिया खाली आहे, एवढंच! भूगोलाचा असा कोणताही नियम नाही की ऑस्ट्रेलिया नेहमी जगाच्या नकाशाच्या तळाशीच असलं पाहिजे. ते वरही असूच शकतं की! आणि खरं सांगायचं तर, नैसर्गिक सौंदर्याचा विचार करता, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड जगाच्या अगदी वरच्या स्थानीच असायला हवेत.

या देशांमध्ये सगळंच जरा वेगळ्या लयीत चालतं आणि तेही विलक्षण आनंददायी पद्धतीने! इथले ऋतूही उलटे असतात. म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फियरमध्ये डिसेंबरची कडाक्याची थंडी सुरू असताना, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वसंत आणि उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. सूर्यप्रकाश, निळं आकाश आणि सुट्टीसाठी अगदी योग्य वातावरण! ऑस्ट्रेलियाचा समुद्रकिनारा प्रत्येक काहीशे किलोमीटरनंतर आपलं रंगरूप बदलतो. ऑस्ट्रेलियातील शहरं उत्साही, चैतन्यमय आणि अगदी राहण्यायोग्य आहेत. आणि इथलं वन्यजीवन? ते तर जगात दुसरीकडे कुठेच आढळत नाही. तांबड्या मातीवर उड्या मारत जाणारे कांगारू, निलगिरीच्या झाडांवर निवांत डुलक्या घेणारे कोआला ही दृश्यं ऑस्ट्रेलियाशिवाय दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार? आणि ऑस्ट्रेलियातील इंडिजिनस संस्कृतीचं या मातीशी, निसर्गाशी आणि आकाशाशी खूप जुनं नातं आहे.

टास्मान सी ओलांडून न्यूझीलंडमध्ये पोहोचलं की गोष्टच बदलते. इथे सदर्न आल्प्सची पर्वतरांग जणू अविश्वसनीय निळ्या सरोवरांतून अचानक उभी ठाकते. बर्फाच्छादित ग्लेशियर्सचा प्रवाह हिरव्यागार रेनफॉरेस्टच्या दिशेने येतो. इथला प्रकाशही इतका स्वच्छ, पारदर्शक असतो, की त्याची अशी चमक जगात फार कमी ठिकाणी जाणवते.

कधीकधी एखाद्या ठिकाणाकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी जगाचा नकाशाच उलटा करावा लागतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड जगाच्या नकाशावर कुठे आहेत, यापेक्षा ते तुमच्या प्रवासाच्या नकाशावर कुठे आहेत, हे महत्त्वाचं आहे! कारण जगाच्या तळाशी असलेले हे दोन देश तुमच्या बकेट लिस्टमध्ये अगदी वरही असू शकतात. चला तर मग, जगाकडे एका वेगळ्या दिशेने... ‌‘अपसाईड डाऊन‌’ पाहूया!

दोन देश. दोन संस्कृती.

ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड म्हणजे प्रत्येकाच्या बकेट लिस्टमधले, जगाच्या टोकावरचे दोन सुंदर देश! ऑस्ट्रेलियाची कहाणी सुरू होते तब्बल 65,000 वर्षांपूर्वी. तेव्हापासून आजपर्यंत ॲबोरिजिनल आणि टोरेस स्ट्रेट आयलँडर लोकांची संस्कृती जिवंत आहे. त्यांच्या ‌‘ड्रीमटाइम‌’च्या कथा, भूमीशी असलेलं नातं, चित्रकला, संगीत, नृत्य आणि पारंपरिक समारंभ ऑस्ट्रेलियाच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहेत.

दुसरीकडे न्यूझीलंड म्हणजे स्थानिक माओरी भाषेत ‌‘आओटेरोआ‌’. सुमारे 1250 सालच्या आसपास पॉलिनेशियन समुद्र प्रवाशांनी शोधलेला हा ग्रुप ऑफ आयलंड्स. माओरी लोकांनी न्यूझीलंडला ‌‘लँड ऑफ द लाँग व्हाईट क्लाऊड‌’ हे नाव दिलं. महान पॉलिनेशियन एक्सप्लोरर कुपे याच्या कथा, माऊंटन्स, रिव्हर्स, समुद्र आणि निसर्गाशी जोडलेल्या माओरी लोककथा, या इथल्या जीवनाचा एक भाग आहेत. माओरी संस्कृती आजही भाषा, संगीत, परंपरा आणि राष्ट्रीय अभिमानातून जिवंत असलेली आपल्याला पाहायला मिळते. ‌‘हाका‌’ या पारंपरिक नृत्यापासून रग्बीच्या मैदानावरच्या ‌‘ऑल ब्लॅक्स‌’पर्यंत माओरी संस्कृतीची झलक आपण पाहू शकतो.

भूगोलाच्या बाबतीत दोन्ही देश म्हणजे निसर्गाचा भव्य सोहळाच! ऑस्ट्रेलिया हा जगातील एकमेव आयलंड कॉन्टिनेन्ट आहे. इथे ग्रेट बॅरियर रीफ, प्राचीन रेनफॉरेस्ट्स, एंडलेस सी शोअर्स आणि लालभडक वाळवंटातील उलुरू आहे. तर न्यूझीलंडमध्ये व्हॉल्कॅनो, हॉट स्प्रिंग्ज, जिओथर्मल व्हॅलीज्‌‍, ग्लेशियर्स आणि मिलफोर्ड साऊंडसारख्या समुद्राने कोरलेल्या व्हॅलीज्‌‍ एकाच प्रवासात पाहायला मिळतात. टास्मान सी या दोन्ही देशांना वेगळं करतो, पण प्रवासाच्या नकाशावर मात्र हे दोन्ही देश एका अद्भुत कथेची दोन प्रकरणं वाटतात.

निसर्गाइतकंच मन जिंकतं ते इथलं खाणं! प्रत्येक चवीमागे निसर्ग, परंपरा आणि स्थलांतरित संस्कृतींची गोष्ट आहे. पण या दोन देशांचं योगदान निसर्ग आणि खाद्यसंस्कृतीपुरतं मर्यादित नाही. न्यूझीलंडने जगाला वाय-फाय तंत्रज्ञानापासून विमानातील ‌‘ब्लॅक बॉक्स‌’पर्यंत, अनेक गोष्टी दिल्या आहेत, ज्या आज आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनल्या आहेत.

या देशांचं उत्सवांचं कॅलेंडरही रंगतदार आहे. सिडनीचा विविड सिडनी फेस्टिव्हल म्हणजे प्रकाश, संगीत आणि कल्पकतेचा उत्सव आहे. नोव्हेंबरमधला मेलबर्न कप संपूर्ण ऑस्ट्रेलियाचं लक्ष वेधून घेतो, तर न्यूझीलंडमध्ये मातारिकी, म्हणजे माओरी नववर्ष, राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरं होतं. आकाशात मातारिकी तारकासमूह दिसू लागला की गतवर्षाचं स्मरण, वर्तमानाचा आनंद आणि नववर्षाची आशा व्यक्त केली जाते.

आणि मग येतं क्रिकेटचं नातं! भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तो भावनांचा विषय आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपासून विश्वचषकापर्यंत, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, शेन वॉर्न यांच्यापासून पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि ट्रॅव्हिस हेडपर्यंत... ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या अनेक पिढ्या भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आठवणींचा भाग आहेत.

सचिन तेंडुलकरची ऑस्ट्रेलियातील शतकं, व्ही. व्ही. एस. लक्ष्मणची ऐतिहासिक खेळी, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताचा 2020-21मधला अविस्मरणीय मालिका विजय या आठवणी क्रिकेटच्या पलीकडे जाऊन दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. इंडियन प्रीमियर लीगमुळे हे नातं आणखी घट्ट झालं आहे. भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू एकत्र खेळतात आणि कोट्यवधी चाहते या खेळाचा आनंद घेतात.

दुसरीकडे क्रिकेटच्या मैदानावर न्यूझीलंडशी दोन हात करताना आपण कितीतरी वेळा जल्लोष केला आहे. यावर्षी भारताचा न्यूझीलंड दौरा 22 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर 2026 दरम्यान होणार असून त्यात पाच T20s, पाच ODI आणि दोन टेस्ट असे एकूण 12 सामने आहेत. ही न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी इनबाऊंड बाय-लॅटरल टूर ठरणार आहे.

अशी ही ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड म्हणजे फक्त फिरायची ठिकाणं नाहीत, तर हा दोन देशांचा, दोन संस्कृतींचा आणि आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा असंख्य आठवणींचा अनुभव आहे!

अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं!

  • ऑस्ट्रेलिया हा जगातील एकमेव असा देश आहे, जो स्वतः एक खंडही आहे. हा देश तीन महासागरांनी वेढलेला आहे.
  • ग्रेट बॅरियर रीफ ही पृथ्वीवरील सर्वांत मोठी सजीव रचना आहे. इथे 9,000हून अधिक प्रजाती आढळतात.
  • वाइतोमो ग्लोवर्म केव्हज्‌‍मध्ये ‌‘ॲरॅक्नोकॅम्पा ल्युमिनोसा‌’ या जगात इतरत्र कुठेही न आढळणाऱ्या प्रजातीचे काजवे आढळतात. त्यांच्या प्रकाशमान धाग्यांमुळे    गुहेचं छत जणू जिवंत तारकांनी भरलेल्या आकाशासारखं दिसतं.
  • ऑस्ट्रेलियातील ‌‘ॲबोरिजिनल संस्कृती‌’ ही जगातील सर्वांत प्राचीन म्हणजे इजिप्तच्या पिरॅमिड्सपेक्षाही हजारो वर्षं जुनी संस्कृती मानली जाते.
  • न्यूझीलंडमध्ये सुमारे 1250 सालापर्यंत मानववस्ती नव्हती. हा मानवाने वसवलेला शेवटचा मोठा भूभाग मानला जातो.
  • जगप्रसिद्ध ‌‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज‌’ आणि ‌‘द हॉबिट‌’ या चित्रपटांमुळे न्यूझीलंडला ‌‘मिडल अर्थ‌’ म्हणतात.
  • न्यूझीलंडची ‌‘क्वीन्सटाऊन सिटी‌’ जगाचं ‌‘ॲडव्हेंचर कॅपिटल‌’ म्हणून ओळखली जाते.
  • बंजी जम्पिंग हा लोकप्रिय साहसी खेळ जगात कमर्शियल स्वरूपात प्रथम न्यूझीलंडमध्येच सुरू झाला.
  • न्यूझीलंडमध्ये जगात सर्वप्रथम 1893 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • न्यूझीलंड मधील 'की' हा जगातील एकमेव ‌‘अल्पाईन पॅरट‌’ आहे जो गाड्यांचे पार्टस्‌‍ तोडण्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • न्यूझीलंडमध्ये ख्रिसमस उन्हाळ्यात साजरा केला जातो.

वीणा वर्ल्ड  वुमन्स स्पेशल आनंदाचा नवा रंग उत्साहाचं नवं निमित्त!

वीणा वर्ल्डच्या 9 दिवसांच्या ‌‘वुमन्स स्पेशल ऑस्ट्रेलिया‌’ टूरमध्ये अनुभवूया सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी ऑपेरा हाऊस आणि सिडनी हार्बर क्रूझ! कुरांडा रेनफॉरेस्टची हिरवाई, गोल्ड कोस्टचे सुंदर समुद्रकिनारे, ग्रेट बॅरियर रीफचं अद्भुत सागरी विश्व, फिलिप आयलंडवरील पेंग्विन परेड, ग्रेट ओशन रोडचा निसर्गरम्य प्रवास आणि हेलिकॉप्टर राईडचा रोमांच! ऑस्ट्रेलियातील ही खास आकर्षणं अनुभवताना मैत्रिणींसोबतच्या गप्पा, हशा आणि नवनव्या आठवणींचीही साथ असेल. शिवाय प्रवासात तुमच्या आवडी-निवडींची काळजी घेणारा टूर मॅनेजर आहेच. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घेता येईल. ही फक्त ऑस्ट्रेलिया पाहण्याची टूर नाही, तर ही आहे स्वतःसाठी वेळ काढण्याची, नव्या मैत्रिणी जोडण्याची, नवे अनुभव जगण्याची आणि स्वतःलाच पुन्हा एकदा ‌‘मी अजून खूप काही करू शकते‌’ असं सांगण्याची संधी!

एक प्रवास, जो सगळं बदलून टाकतो!

ऑस्ट्रेलियातला प्रवास सुरू झाला की सिडनीचं ऑपेरा हाऊस नजरेत भरतं. हे म्हणजे कलेचं शिल्पच जणू! पुढे ग्रेट ओशन रोडचा वळणावळणाचा प्रवास, प्रत्येक वळणावर थांबून पाहावंसं वाटणारं समुद्राचं रूप आणि समोर उभे ठाकलेले ट्वेल्व्ह अपॉझल्स आपल्याला स्तिमित करतात. तब्बल 2,300 किलोमीटर पसरलेली ‌‘ग्रेट बॅरियर रीफ‌’ तिच्या विराटपणाने आपल्याला थक्क करते. तिचं अस्तित्व अंतराळातूनही जाणवतं. मेलबर्न तिथल्या कलात्मक गल्लीबोळांमुळे, छोट्या कॅफेज्‌‍मुळे आणि आपुलकीच्या वातावरणामुळे काही वेळातच आपलंसं वाटायला लागतं.

न्यूझीलंडमध्ये मात्र निसर्गाची लय बदलते. मिलफोर्ड साऊंडचे ढगांना स्पर्श करणारे उंचच उंच कडे आणि त्यातून अलगद उलगडणारे निसर्गाचे अप्रतिम रूप आपल्या नजरेस पडते. अंधारात तारकांसारखे चमकणारे ‌‘वाइतोमो ग्लोवर्म केव्ह्ज‌’ पाहता येतात आणि क्वीन्सटाऊनवर जेट बोटिंग, गोंडोला राईड आणि जगप्रसिद्ध वाईनचा आनंद एकाच दुपारी घेता येतो. आणि या सगळ्याला अर्थ देते ती तिथली माओरी संस्कृती.

आयुष्यात एकदा तरी...

  • सूर्यास्ताच्या वेळी सिडनी हार्बर ब्रिजवरून ऑपेरा हाऊस पाहायचंय.
  • ग्रेट बॅरियर रीफमध्ये स्नॉर्केलिंग करून ‌‘ब्लू प्लॅनेट‌’चा खरा अर्थ अनुभवायचाय.
  • ग्रेट ओशन रोडवर ड्राईव्ह करीत, लाटांच्या साक्षीने ट्वेल्व्ह अपॉझल्सपाशी थांबून तिथला रम्य व्ह्यू पाहायचाय.
  • सूर्य मावळताना फिलिप आयलंडवर हजारो पेंग्विन्सना किनाऱ्यावर परतताना पाहायचं.
  • वाइतोमो ग्लोवर्म केव्ह्जमध्ये, निळं तारकांचं आकाश अनुभवायचंय.
  • हॉबिटन फिल्म सेटला भेट द्यायचीय.
  • पहाटेच्या धुक्यात मिलफोर्ड साऊंडची सफर करीत वॉटरफॉल्सचा जल्लोष कानात साठवून घ्यायचाय.
  • ‌‘ते पुईया‌’मध्ये माओरी सादरीकरण पाहायचंय.

हॉलिवूड बॉलिवूड

काही ठिकाणं आपण पहिल्यांदा पाहतो, पण ती अनोळखी वाटतच नाहीत, कारण पडद्यावरून ती आपल्याला आधीच भेटलेली असतात.

‌‘दिल चाहता है‌’ने ऑस्ट्रेलियाला भारतीय सिनेमाच्या नकाशावर एक खास जागा मिळवून दिली. ‌‘जाने क्यों‌’ या गाण्यातलं सिडनी ऑपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिज पाहताना कित्येक भारतीय ऑस्ट्रेलियाच्या प्रेमात पडले. त्यानंतर ‌‘सलाम नमस्ते‌’ या पूर्णपणे ऑस्ट्रेलियात चित्रित झालेल्या पहिल्या भारतीय चित्रपटाने मेलबर्न आणि ग्रेट ओशन रोडची ओळख लाखो प्रेक्षकांना करून दिली. ‌‘चक दे इंडिया‌’ आणि ‌‘बचना ऐ हसीनो‌’ चित्रपटांनी सिडनीच्या आठवणींना भावनिक रंग दिला. पडद्यावर दिसलेली ही ठिकाणं मग केवळ पर्यटनस्थळं राहिली नाहीत, तर ती सिनेमाच्या आठवणींचा भाग झाली.

दुसरीकडे ‌‘कहो ना प्यार है‌’ ने न्यूझीलंडच्या क्वीन्सटाऊनचं निसर्गरम्य सौंदर्य भारतीय घराघरांत पोहोचवलं. त्यानंतर ‌‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज‌’ने तर संपूर्ण न्यूझीलंडलाच एका भव्य सिनेमाच्या पडद्यावर आणलं. या दोन्हीही देशांत जगभरातील प्रेक्षकांनी आपापल्या आवडत्या कथा जगल्या. म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष उभं राहिल्यावर जाणवतं की आपण जरी इथे पहिल्यांदाच आलो असलो तरीही आपलं मन बाकी त्या ठिकाणी अनेकदा पोहोचून आलंय!

लँड डाऊन अंडर‌’ पाहा वीणा वर्ल्डसोबत!

कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍: तुमच्या स्वप्नातला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा प्रवास आता अगदी तुमच्या मनासारखा घडवण्यासाठी वीणा वर्ल्ड घेऊन आलंय कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍! न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडमधील सेल्फ-ड्राईव्ह किंवा प्रायव्हेट शॉफर ड्राईव्ह, लक्झरी विल्डरनेस लॉजेस, ट्रान्स अल्पाईन सिनिक ट्रेन, फ्रान्झ जोसेफचं ग्लेशियर हेलि-लँडिंग, रोटोरुआचे जिओथर्मल हॉट बाथ्स आणि माओरी कल्चरल इव्हिनिंग्ज, मिलफोर्ड साऊंड क्रूझ,  सनराइज हॉट एअर बलून सफारी, मार्लबरोतील वाईन टेस्टिंग्स आणि लेक टेकापोचं अल्पाइन सौंदर्य क्वीन्सटाऊनची रोमांचक दुनिया, आणि हॉबिटन मूव्ही सेटची जादू... यापैकी काय अनुभवायचं, हे तुम्ही ठरवा! ऑस्ट्रेलियात ग्रेट बॅरियर रीफवर हेलिकॉप्टर किंवा सी प्लेन फ्लाइट, व्हिटसंडेजमधील व्हाईटहेव्हन बीच आणि प्रायव्हेट यॉट अनुभव, निंगलू रीफमध्ये व्हेल शार्क्ससोबत पोहण्याचा थरार, तर उलुरूमध्ये सनसेट आणि फिल्ड ऑफ लाईट, मार्गारेट रिव्हर किंवा बारोसा व्हॅलीतील खास वाईन एक्स्पिरियन्स, ग्रेट ओशन रोडचा सेल्फ-ड्राईव्ह किंवा सिडनी हार्बरवरील डिनर क्रुझ... प्रत्येक अनुभव तुमच्या पसंतीनुसार! मग सांगा, तुम्हाला कुठे जायचंय.

माइस अँड कॉर्पोरेट ग्रुप्स: सिडनीच्या ऑपेरा हाऊसच्या बॅकग्राऊंडवर ऑर्गनाईज केलेली लीडरशिप मीट, शहराची रोषणाई पाहण्यासाठी 200 डेलिगेट्सने घेतलेली हार्बर क्रूझ... खास तुमच्या डेलिगेशनसाठी आयोजित करण्यात आलेली ‌‘माओरी कल्चरल ईव्हनिंग‌’. अशा अनेक अनुभवांनी समृद्ध असलेल्या माइस टूर्स म्हणजे ऑफिशियल्ससाठी पर्वणीच. आजवर वीणा वर्ल्डने 350 हून अधिक कंपन्यांमधील 20 ते 2,000 डेलिगेट्सपर्यंतचे ग्रुप्स यशस्वीपणे हाताळले आहेत. तेव्हा प्रत्येक छोट्या-मोठ्या तपशीलाची जबाबदारी वीणा वर्ल्डची आणि प्रत्येक सुंदर आठवण तुमच्या खात्यात! आणि काय हवं?

ग्रुप टूर्स: तुमच्याकडे 7 दिवस असोत किंवा 21, वीणा वर्ल्डच्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड ग्रुप टूर्स अशा पद्धतीने आखलेल्या आहेत, की या विलक्षण देशांचा अनुभव तुम्हाला हवा तितका सखोल घेता यावा. या टूर्सवर पहिल्या दिवसा पासून तुमच्यासोबत टूर मॅनेजर आहेच. शिवाय इंडियन मील्सची व्यवस्था, व्हिसा गाईडन्स आणि भारतातील विविध शहरांमधून डिपार्चर्सची सुविधा. ऑल- इन्क्लुझिव्ह, ऑल-मॅनेज्ड आणि म्हणूनच एक्स्ट्रा-ऑर्डिनरी!

तेव्हा चला वीणा वर्ल्डसोबत. कारण प्रवास म्हणजे फक्त तुम्ही पाहिलेली ठिकाणं नाहीत, तर त्या ठिकाणांच्या दरम्यान तुम्ही स्वतःमध्ये अनुभवलेला बदलही आहे.

आठवणी घडवणारा तुमचा सहप्रवासी - वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर

पेंग्विन परेड अनुभवायची असेल तर गर्दीच्या आधी पोहोचणं किती महत्त्वाचं आहे, हे मला ठाऊक आहे. ट्वेल्व्ह अपॉझल्सवरून हेलिकॉप्टर राईड केली तर त्यातला प्रत्येक क्षण सार्थकी लागतो, हेही मला माहितीये आणि ते पुईयामधला पारंपरिक माओरी परफॉर्मन्स अगदी समोरून पाहायची मजाही काही औरच असते हे ही मी अनुभवलंय! तुमच्यासाठी इंडियन मील्सची काळजी घेणं असो, किंवा व्हिसा सपोर्ट, आम्ही तुमचा ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड देशांमधला प्रवास असा आखतो, की प्रत्येक ठिकाणी तुम्ही पोहोचता तेव्हा उत्साहात असता. म्हणूनच वीणा वर्ल्डसोबत प्रवास करताना तुम्ही फक्त एकच गोष्ट सोबत घेऊन निघता, ती म्हणजे फिरण्याची आणि आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणींची उत्सुकता! ऑस्ट्रेलिया ते न्यूझीलंड प्रवासाच्या प्रत्येक पायरीवर तुमच्यासोबत, ‌‘मैं हूँ ना!‌’

चवींचा प्रवास

सिडनी हार्बर साईडला सोनसळी प्रकाशात न्हालेलं ऑपेरा हाऊस आणि समोर ताजं सी फूड... ऑस्ट्रेलियाची याहून चांगली चव कुठे अनुभवायला मिळणार? मेलबर्न म्हणजे जगाला खऱ्या ‌‘फ्लॅट व्हाईट‌’ कॉफीची चव शिकवणारं शहर. एमसीजीमधला मीट पाय आणि क्वीन्सलँडचं ग्रिल्ड बारामुंडी खाताना प्रत्येक घासाची स्वतःची कहाणी आहे असं वाटतं.

न्यूझीलंडमध्ये मार्लबरोची ‌‘सॉव्हिन्याँ ब्लाँ‌’ चाखण्यासाठी केलेला प्रवासही सार्थ वाटतो. भव्य सदर्न आल्प्सच्या पार्श्वभूमीवर घेतलेलं वाईनरीतलं निवांत जेवण मन तृप्त करून जातं.

‌‘पावलोव्हा‌’चा जन्म ऑस्ट्रेलियात झाला की न्यूझीलंडमध्ये, यावरचा वाद कधीच संपणार नाही. तर ‌‘माओरी हांगी‌’ हे जमिनीतल्या भट्टीत शिजवलेलं पारंपरिक जेवण, हजारो वर्षं जुन्या संस्कृतीशी जोडणारा अनुभव आहे. मग तुम्हाला यातल्या कशाची चव बघायचीय?

 

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
ನಿಮ್ಮ ಮೆಚ್ಚಿನ ದೇಶ ಯಾವುದು?
13 mins, read

ನಿಮ್ಮ ಮೆಚ್ಚಿನ ದೇಶ ಯಾವುದು?

Published in Vijay Karanaka. Date 23rd August, 2026 ನಮ್ಮ ಅದ್ಭುತ ಭಾರತವನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಎಂದು ಬಿಡಿಸಿ ಹೇಳಬೇಕಿಲ್ಲ ಬಿಡಿ …ಈಗ ಸುಪ್ರೀಂಕೋರ್ಟ್ನ ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿಯಂತೆ ಅಂತಿಮ ತೀರ್ಪು ನೀಡಬೇಕಾದ ಜವಾಬ್ದಾರಿ ನನ್ನದಾಗಿತ್ತು.

रंगों की जादुई रातें नॉर्दर्न लाइट्स
13 mins, read

रंगों की जादुई रातें नॉर्दर्न लाइट्स

Published in Navabharat Times. Date 23rd August, 2026 हम रोशन करते हैं आपकी दुनिया ज़िंदगी में कुछ अनुभव ऐसे होते हैं जिन्हें एक बार देख लेने भर से उन्हें अपनी बकेट लिस्ट में टिक नहीं किया जा सकत

आपण अतिरेक करतोय का
13 mins, read

आपण अतिरेक करतोय का

Published in Maharashtra Times.  Date 23rd August, 2026 ...मला कोणीतरी सांगितलं की “तू झांगजियाजिऐला नक्की जा कारण तिथे ‌‘अवतार‌’ सिनेमातले पर्वत पाहायला मिळतील.” बस्स! इतकं माझ्यासाठी पुरेसं होतं.

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!