Blog

खरीखुरी राणी

लहानपणापासून आपण ऐकत आलेल्या बहुतेक गोष्टींची सुरवात‘एक असतो राजा’ अशीच होत आलेय.मग त्या राजाच्या राणीचा उल्लेख येई. बरं इतिहासात बघावं तर राजांइतक्याच( काहीवेळा त्यांच्यापेक्षाही जास्त) कर्तबगार राण्यांची कमी नाही. पण प्रत्यक्षात बघाल तर घराघरातल्या राणीची अवस्था पत्त्यातल्या राणीसारखीच झालेली दिसते. रोजच्या कामाच्या रामरगाड्यात कसली राणी आणि कसलं काय, पण रुटीनपासून सुट्टी घेऊन, जरा चार दिवस सहलीला गेल्यावरही या राणीची सुटका नाहीच. म्हणजे घरी असताना पतीराजांच्या जेवणांचं बघा, मुलांचे डबे भरा, सासू सासऱ्यांची काळजी घ्या आणि सहलीला गेल्यावरही तेच करा, अरे मग जायचं तरी कशाला सहलीला? हा प्रश्न इतर कोणाच्या मनात आला की नाही माहित नाही, पण अनेक वर्षे फॅमिली टूर्सचे संयोजन, संचलन केल्यानंतर माझ्या मनात मात्र नक्की आला. आता प्रश्न पडला की त्याचं उत्तर शोधल्या शिवाय मला मुळी चैनच पडत नाही. त्यामुळे हे उत्तर शोधताना मला सापडली ‘वुमन्स स्पेशल’सहल. नऊ वर्षांपूर्वी जेंव्हा ही सहल आम्ही लॉन्च केली तेंव्हा आधी नेहमीप्रमाणे अनेकांच्या भुवया ऊंचावल्या गेल्या,‘फक्त महिलांची सहल आणि तिही थेट फॉरेनला? बघा बुवा’अशा थाटाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिक्रिया जोरात उमटल्या. पण माझं निरिक्षण अचूक होतं, घराघरातल्या महिलांना अशी सहल हवीच होती. त्यामुळेच गेल्या नऊ वर्षांमध्ये‘वुमन्स स्पेशल’चा फंडा चांगलाच रुजला आहे. वीणा वर्ल्डच्या सहलींची सुरवात करताना ती वुमन्स स्पेशलने होणं स्वाभाविकच होतं. वीणा वर्ल्डमधून अनेक दिवसांची पेंडिंग असलेली महिलांची एक मागणी आम्ही पूर्ण केली, ती म्हणजे वुमन्स स्पेशलच्या भारतातील स्थळांच्या सहली सुरु केल्या. गोवा, केरळ, काश्मीर तर केलंच पण चक्क ‘लेह-लडाख’ही केलं.

या सगळ्या प्रवासात मला जाणवलं की काळाबरोबर जसं व्यक्तिमत्व प्रगल्भ होतं, मॅच्यौर होतं, त्याचप्रमाणे एखादी संकल्पनाही होते. वुमन्स स्पेशल हे त्याचं आदर्श उदाहरण म्हणावं लागेल. ही सहल सुरू करताना माझ्या डोळ्यासमोर एकच उद्दीष्ट होतं की महिलांना स्वतंत्रपणे सहलीची मजा लुटता आली पाहिजे, चांगल्या अर्थाने मस्त फ्रीक आऊट होता आलं पाहिजे. त्यामुळे नेहमी साडी नेसणाऱ्यांना पंजाबी घालायची संधी द्यायची आणि पंजाबीला जीन्स घालायला लावायची, थोडक्यात महिलांना मनात खोल खोल जपलेल्या इच्छा पूर्ण करायला फुल्ल स्कोप द्यायचा. हळू हळू लक्षात यायला लागलं की वुमन्स स्पेशलचे इतरही पैलू आहेत, म्हणजे एखादीने आयुष्यातील चॅलेंजेसचा अगदी हसत हसत सामना केला आहे, तर दुसरीचा उत्साह इतका उतू जातो की जिथे जाईल तिथे ती उत्साहाची लागणच करुन येते, आणखी कोणी स्वतःवरच फिदा होऊन असे मस्त मस्त कपडे घालते की देखते रहो, कुणी आपल्या मधुर स्वरांनी मैफलीला चार चांद लावते तर कुणी संगीताच्या तालावर फर्मास थिरकते. बर ह्या सगळ्याजणी कुणी स्पेशल होत्या का? तर नाही. पण वुमन्स स्पेशलला आल्यावर त्यांच्यातील स्पेशलपण जागं होताना अनुभवलं आणि जाणवलं की बस्स इथे खरीखुरी राणी, द रिअल स्क्विन पाहायला मिळते. जी सहलीचे सहा सात दिवस फक्त स्वतःसाठी जगते, स्वतःची स्वप्न पूर्ण करते आणि एखाद्या राणीच्या रुबाबात जगण्याला सामोरी जाते. मग काय या क्विन्सचा गौरव आम्ही’इन्स्पिरेशन क्विन’,’सिंगिंग क्विन’, ’स्टाइल क्विन’, एन्थुझियाझम क्विन’,’डान्सिंग क्विन’म्हणून सुरु केला. याचा परिणाम असा झाला की सहल संपल्यानंतरही या राणीपणाचा मुकुट त्या त्या महिलेच्या डोक्यावर अदृश्यपणे कायम राहू लागला आणि तिच्या रोजच्या जगण्याला नवं परिमाण मिळालं, नव्या आत्मविश्वासाने ती अडचणींना सामोरी जाऊ लागली आणि नव्या उत्साहाने आनंदी क्षणांचं स्वागत करु लागली. शिवाय ज्यांच्या डोक्यावर मुकुट नव्हता त्यांनाही जाणिव झाली की आपणही कसला ना कसला मुकुट नक्की मिळवू शकतो. ही जाणिव महत्वाची असते. ही जाणिवच या महिलांना आयुष्यात पुढे जायला नक्की मदत करेल आणि मग घराघरातली महिला ठरेल खरीखुरी राणी.Veena Patil
(Director - Veena World)