India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

जिथे काळ जिवंत होतो...

12 mins. read
Neil Patil
Neil Patil
12 Mins Read
July 29, 2026
July 29, 2026

Quick Summary

होरोलॉजी क्लासला जा आणि यांत्रिक घड्याळाचे छोटे पार्ट्स जोडताना मनाला मिळणारा सुकून अनुभव.

डोळ्यावर लूप घालून प्रत्येक भाग योग्य ठिकाणी ठेवा आणि घड्याळ सुरू झाल्यावरचा टिकटिकचा आवाज ऐका.

क्योटो गार्डन, स्वित्झर्लंडमधील चर्चच्या घड्याळाचा आवाज आणि प्रागच्या चौकातील ॲस्ट्रॉनॉमिकल घड्याळ पाहून वेळेला अर्थ मिळतो.

वर्कशॉपमधून बाहेर पडताना तुमच्या हातातलं घड्याळ घेऊन काळाच्या प्रवासावर लिहिण्याची प्रेरणा जपून ठेवा.

स्वित्झर्लंडमधील जिनेव्हामधल्या पटेक फिलीप म्युझियममध्ये शतकानुशतके घड्याळ बनवण्याची जिवंत टाइमलाईन पाहा.

‘व्हॅले द ज्यूं’ ला भेट द्या आणि ओडेमास पिगे व जे जे लुकुत्थ यांच्या गुंतागुंतीच्या घड्याळांचा अस्सल अनुभव घ्या.

Published in Maharashtra Times 5th July 2026

...मनगटावरच्या घड्याळांप्रमाणे ही घड्याळं एका कोपऱ्यात गप्प बसून राहत नाहीत, तर सरणाऱ्या प्रत्येक तासाचं रुपांतर ते जणू सांस्कृतिक समारंभात करतात. ही घड्याळं ज्या कहाण्या सांगतात त्या ऐकायला लोक गर्दी करतात...

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझी पत्नी हेता एका टेबलासमोर बसलो होतो, ज्यावर अनेक लहान साधनं मांडलेली होती. ती नाजूक उपकरणं एखाद्या शस्त्रक्रियेच्या तयारीची आठवण करुन देत होती. आमच्यासमोर एका यांत्रिक घड्याळाच्या अंतर्गत गुंतागुंतीची यंत्रणा ओपन केली होती आणि ती जणू आमच्या अटेन्शनची वाट बघत होती. झालं होतं असं की केवळ उत्सुकतेपोटी आम्ही होरोलॉजी म्हणजे घड्याळ बनवण्याच्या क्लासला गेलो होतो. वाटलं होतं, इथे फार तांत्रिक गोष्टी कराव्या लागतील, ज्याचं थोडं दडपणही आलं होतं.

पण मला असं अजिबात वाटलं नव्हतं की साध्या श्वासानेही जे हलू शकतात अशा अगदी लहानलहान पार्टस्‌‍चं काम करताना मनाला एक प्रकारचा सुकून मिळेल. डोळ्यावर लूप चढवून मी जसा घड्याळाचा प्रत्येक भाग जिथे पाहिजे तिथे ठेवायला सुरुवात केली तसतसं भोवतालचं जग माझ्यासाठी जणू अदृश्य होत गेलं. आणि मग तो तसा अगदी साधा, पण कायम स्मरणात राहील असा क्षण आला, जेव्हा ते घड्याळ जिवंत झालं. मला घड्याळ सुरू असल्याची खात्री पटविणारा तो टिकटिकचा हलकासा पण सतत येणारा आवाज ऐकू आला आणि माझं मन एका आगळ्या समाधानानं भरून गेलं.

ते फीलिंग माझ्यासाठी नवीन नव्हतं. असाच अनुभव मी घड्याळ बनवण्याच्या बेंचपासून कितीतरी दूर असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी घेतला होता. क्योटो गार्डनमध्ये मंदिरातील घंटानाद ऐकताना, स्वित्झर्लंडमधील खेडेगावात चर्चच्या घड्याळाचा आवाज ऐकताना आणि प्रागच्या चौकातील त्या ॲस्ट्रॉनॉमिकल घड्याळाचा शतकानुशतके सुरू असलेला खेळ बघताना सुद्धा. यातल्या प्रत्येक क्षणाने मला याचीच जाणीव करुन दिली होती की काही जागा फक्त वेळ सांगत नाहीत, तर त्या वेळेला अर्थही देतात. मी जोडणी केलेलं घड्याळ घेऊन त्या वर्कशॉपमधून बाहेर पडताना माझ्या मनात विचार आला की काळ या संकल्पनेमधून जगाचा घेतलेला वेध फारच इंटरेस्टिंग असेल. माझ्या हातातल्या त्या चिमुकल्या घड्याळानेच मला हा लेख लिहिण्याची प्रेरणा दिली. मग चला जाऊया अशा ठिकाणांच्या प्रवासाला, जिथे काळ फक्त मोजला जात नाही, तर जिवंत होतो.

काळ मोजण्याची कला

त्या वॉच ॲसेम्ब्ली क्लासमुळे माझ्याही हे प्रथमच लक्षात आलं की हातावरच्या घड्याळात दडलेल्या कलाकुसरीकडे लक्ष न देता आपण अगदी सहजपणे घड्याळ वापरतो आणि तेव्हाच होरोलॉजी या शब्दाचा खरा अर्थ माझ्या मनात रुजला. साध्या शब्दांमध्ये सांगायचं तर होरोलॉजी म्हणजे काळ मोजण्याची कला आणि अभ्यासही. पण या साध्या डेफिनेशनमागे प्रत्यक्षात मानवी इतिहासाची एक मोठी कहाणी दडलेली आहे. घड्याळंच नव्हती तेव्हा प्राचीन काळात लोक सूर्य, पाणी आणि वाळूच्या मदतीने वेळेचा अंदाज बांधत असत. पुढे मध्ययुगात युरोपमधील शहरांच्या मध्यवर्ती चौकात उंच क्लॉक टॉवर बांधायला सुरुवात झाली आणि त्यामुळे संपूर्ण शहराला वेळ समजू लागली. इसवी सन 1600 मध्ये निर्माण झालेल्या लंबकाच्या घड्याळांमुळे (पेंड्यूलम क्लॉक) काळाचे मोजमाप अधिक अचूक होऊ लागले. त्यामुळे जगभरात साहसी सागरी सफरी आणि नव्या क्षितिजांचा वेध घेणं सोपं झालं. त्यापाठोपाठ आलेली पॉकेट वॉचेस तर लोकांची सोबतीच बनून गेली. 20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत रिस्ट वॉचेस म्हणजे मनगटी घड्याळं सगळ्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनून गेली होती. या सगळ्या प्रवासातच कधीतरी काळ मोजणं ही केवळ व्यावहारिक गोष्ट न राहता, ती इंजिनियरिंग, सौंदर्य आणि संस्कृतीचा संगम बनून गेली. काळाच्या या प्रवासाला नेमक्या कोणकोणत्या ठिकाणांनी आकार दिला आणि या प्रक्रियेबरोबरचं त्यांचं नातं हीच त्यांची ओळख कशी बनली? चला पाहूया.

काळाचा वारसा

जिथे काळ खरोखरच हातांनी घडवलेला आहे असं वाटतं, अशी जागा म्हणजे स्वित्झर्लंड. तिथल्या फक्त वक्तशीर ट्रेन्समुळे किंवा तिथल्या अल्पाईन व्हॅलीत नियमित गुंजणाऱ्या घंटानादामुळे असं वाटत नाही, तर तिथल्या रोजच्या जीवनात जो काटेकोरपणा आहे, त्यातून हे ठळकपणे जाणवतं. या जगाचं दार उघडतं ते जिनेव्हामधल्या पटेक फिलीप म्युझियममध्ये. या संग्रहालयात मानवी कल्पकतेची जिवंत टाईमलाईन शतकानुशतके सुरू असलेल्या घड्याळ बनवण्याच्या कलेमधून समोर येते. त्याची साक्ष देतात नाजूक एनॅमल पॉकेट वॉचेस आणि मेकॅनिकल मास्टरपीस ठरलेली घड्याळं. पण स्विस होरोलॉजीचा अस्सल अनुभव घ्यायचा असेल तर दूरच्या, शांत-निवांत ‌‘व्हॅले द ज्यूं‌’ ला भेट द्यायला हवी, कारण इथल्याच ‌‘ओडेमास पिगे‌’ आणि ‌‘जे जे लुकुत्थ‌’ या जगप्रसिध्द घड्याळ कंपन्यांनी जगातील सर्वात गुंतागुंतीची घड्याळं जन्माला घातली होती. इथल्या ‌‘ला शो द फाँ‌’ या शहराची रचनाच घड्याळे बनवण्यासाठी सोयीची अशी झाली आहे. इथल्या आर्टिझन्सना पुरेसा प्रकाश मिळेल अशीच इथल्या रस्त्यांची रचना आहे.

हे सगळं पाहिल्यावर एका गोष्टीची मन नोंद घेतं ती म्हणजे, स्वित्झर्लंडमध्ये घड्याळं बनवणं हा फक्त बिझनेस नाही, तर तो वारसा आहे. अतिशय अभिमानाने आणि अत्यंत संयमाने तो पुढच्या पिढीकडे सोपवला जातो. काही गोष्टी सर्वोत्कृष्टरित्या घडवण्यासाठी संयम आणि शांतता आवश्यक असते याची हा वारसा आपल्याला जाणीव करुन देतो.

काळ म्हणजेच झेन

स्वित्झर्लंडचं काळाबरोबरचं नातं जर वारशाचं असेल तर जपानचं नातं तत्त्वज्ञानाचं आहे. इथे काळ फक्त पुढे सरकत नाही, तर एका उद्देशाने, तो दैनंदिन आयुष्याच्या लयीत पुढे जात राहतो. मग तुम्ही टोकियोच्या उर्जायुक्त वातावरणात असा, क्योटोच्या असीम शांततेत किंवा जिथे मंदिरातील वाजणाऱ्या घंटा तास नाही तर क्षण अधोरेखित करतात अशा एखाद्या लहानशा शहरात. पारंपरिक घड्याळांपासून ते क्वार्टझच्या इनोव्हेशनपर्यंतचा जपानचा प्रवास गिंझामधल्या सिको म्युझियममध्ये उलगडतो. यातला नवा टप्पा म्हणजे ‌‘स्प्रिंग्ज ड्राईव्ह‌’. या अनोख्या चळवळीमुळे आता जपानी घड्याळातला सेकंद काटा टिकटिकत नाही तर अतिशय हळूवारपणे पुढे सरकतो, जणू काळाची एक घडी अगदी अलगद उलगडली जाते.

जपानच्या सुप्रसिध्द ब्रँड्सप्रमाणेच नागानोसारख्या गावांमधील स्वतंत्र कारागीर सुध्दा होरोलॉजीला एक वेगळा चेहरा प्राप्त करुन देतात. हे कारागीर झेन तत्त्वज्ञानातील ‌‘वाबी-साबी‌’ला अनुसरून अगदी साधी पण सुंदर घड्याळे तयार करतात. सिटिझन आणि कॅसिओ यांसारखे मोठे ब्रँड्स ही जपानची ताकद आहे. या कंपन्या अत्याधुनिक टेक्नोलॉजी आणि काळजीपूर्वक वस्तू बनविण्याचे मानवी कौशल्य याची सांगड घालताना दिसतात. यावरुन हेच कळतं की जपानी घड्याळे, मग ती मेकॅनिकल असोत किंवा डिजिटल, ती अतिशय मजबूत आणि विशिष्ट उद्देशाने घडवलेली असतात. त्यांचा भर अचूकतेपेक्षा बॅलन्स दाखवण्यावर आणि कारागिरीमधून काळाबद्दलचा आदर व्यक्त करण्यावर असतो.

काळ म्हणजे इंजिनिअरिंग

जर जपानमध्ये काळ म्हणजे युनिफॉर्मिटी असेल तर जर्मनीसाठी काळ म्हणजे शिस्त आणि रचनेतून उभं राहिलेलं इंजिनिअरींग आहे. हे स्पिरीट पाहायला मिळतं ते वरकरणी शांत वाटणाऱ्या, पण प्रत्यक्षात जगातलं घड्याळं बनवण्याचं उत्तम केंद्र असलेल्या ‌‘ग्लास-हू-ट‌’ या ड्रेसडन जवळच्या लहानशा सॅक्सन गावामध्ये. याच गावात जगप्रसिध्द ‌‘ए. लँग ॲंड शॉन‌’, ‌‘नोमोस‌’, ‌‘ग्लास-हू-ट ओरिजिनल‌’ या ब्रँड्सची घड्याळं तयार होतात.

जराही तडजोड न करता अगदी अचूकपणे केलेल्या नेटक्या डिझाईन्ससाठी त्यांची घड्याळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्यशाळा एखाद्या लॅबोरेटरीसारख्या असतात, जिथे सगळं काही अगदी प्रमाणानुसार, परफेक्ट पध्दतीने ॲरेंज केलेलं असतं आणि ती परिपूर्णता येईपर्यंत त्याची टेस्ट घेतलेली असते. मात्र जर्मनीचं घड्याळांशी नातं केवळ हाय एन्डच्या घड्याळांपुरतं मर्यादित नाही. या नात्याची रंजक आणि आकर्षक बाजू बघायला मिळते ती ब्लॅक फॉरेस्टमधल्या पारंपरिक कक्कू क्लॉकच्या रूपाने. या घड्याळांमध्ये तांत्रिक हुशारी आणि कोरीवकामाचा असा मिलाफ झालेला आहे की त्यामुळे काळाला खास चेहरा प्राप्त झाला आहे. लक्झरी क्रोनोग्राफ असो किंवा जरा हटके घड्याळ, जर्मन होरोलॉजीचा डीएनए कायम असतो, तो म्हणजे शिस्त, उद्देश आणि कोणताही शॉर्टकट न घेता इंजिनियरींगमधून निर्माण केलेलं सौंदर्य.

काळ म्हणजे नेव्हिगेशन

स्वित्झर्लंडने घड्याळ बनवण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळवलं, जपानने घड्याळातून फिलॉसॉफी व्यक्त केली तर युनायटेड किंग्डमने घड्याळातून अगदी प्राथमिक स्तरावरची एक गोष्ट जगाला दिली आणि ती म्हणजे काळ ठरवण्याची एकसमान पध्दती. याची कहाणी सुरू होते ग्रीनविचमध्ये जिथे प्राईम मेरिडियन - शून्य अंश रेखांश (लाँजिट्यूड 0 डिग्री) - ठरवण्यात आला आहे आणि जिथे जीएमटी चा जन्म झाला. जेव्हा रेल्वे आणि जगप्रवास करणारे प्रवासी समान वेळ दाखवणाऱ्या घड्याळांची अपेक्षा करत होते, तेव्हा जगभरातील स्थानिक वेळांची स्पर्धा संपवणाऱ्या प्रमाणवेळेची गरज जीएमटीने पूर्ण केली. ब्रिटनचा प्रभाव जमीन ओलांडून पुढे गेला आणि जॉन हॅरिसनच्या मरीन क्रोनोमीटर्सनी समुद्रावरील लाँजिट्यूड मोजण्याची मोठी समस्या सोडवली, ज्यामुळे नेव्हिगेशनमध्ये आमूलाग्र क्रांती झाली आणि आधुनिक काळातील शोधमोहिमा यशस्वी झाल्या. अगदी आजही रॉयल ऑब्झर्वेटरीपासून ते बिग बेनच्या टोल्यांपर्यंत आणि टाऊन स्क्वेअरमध्ये उभ्या ठाकलेल्या क्लॉक टॉवर्सपर्यंत युके म्हणजे अशी जागा वाटते जिथे काळ हा वैश्विक भाषा बनला आहे.

काळ म्हणजे नावीन्य

मग आपण पोहोचतो ‌‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका‌’ मध्ये. युकेने सगळ्या जगाला एकसमान वेळ दिली तर युनायटेड स्टेट्सने ती वापरण्याची पद्धतच बदलून टाकली. अमेरिकेत काळाचे मोजमाप करण्याची पद्धत शतकानुशतकांच्या परंपरेपेक्षा प्रयोग आणि उपलब्धता यातून निर्माण झालेली पाहायला मिळते.

टाइमेक्सचे जन्मस्थान असलेल्या ‌‘कनेक्टिकुट‌’ मधील वॉटरबरी मधल्या घड्याळांमध्ये हे तत्त्व सुरुवातीपासून पाहायला मिळतं. त्यामुळेच इथली घड्याळं दणकट आणि सर्वसामान्यांना परवडणारी असतात. डेट्रॉइटमधील शिनोलामध्ये घड्याळ बनवण्याला कलेची जोड देऊन अभिमानास्पद कलाकृती घडवण्याचा नवा अध्याय लिहिला गेला. ब्रँड्सच्या पलीकडे जाऊन यु.एस.ने तंत्रज्ञानाच्या मदतीने काळाला कायम पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. एव्हिएशन, डिजिटल सिस्टिम्स आणि स्पेस मिशन्स, ॲटोमिक ॲक्युरसी या सगळ्यातून त्यांनी काळाची नोंद कायम नव्या रुपात प्रकट होईल याकडे लक्ष दिलं. या मुक्त, प्रगतिशील दृष्टिकोनातच अमेरिकन होरोलॉजीचं सार सामावलेलं आहे. त्यात वारसा फार कमी आहे, वेगवेगळ्या शक्यतांचा विचार अधिक आहे आणि घड्याळाची संकल्पना अभिनव पद्धतीने तपासण्याचा मोकळेपणा आहे.

काळापेक्षा अधिक काही सांगणारी घड्याळे

वॉच मेकिंग वर्कशॉप्समध्ये आपल्याला काळाचा अगदी वैयक्तिक, खाजगी अनुभव मिळतो. पण जगभरातली काही आयकॉनिक घड्याळं मात्र वेगळाच अनुभव देतात. ती आपल्याला हेच सांगतात की काळ म्हणजे खासगी बाब नसून ती इतरांबरोबर शेअर करण्याची गोष्ट आहे. मनगटावरच्या घड्याळांप्रमाणे ही घड्याळं एका कोपऱ्यात गप्प बसून राहत नाहीत, तर सरणाऱ्या प्रत्येक तासाचं रुपांतर ते जणू सांस्कृतिक समारंभात करतात. ही घड्याळं ज्या कहाण्या सांगतात त्या ऐकायला लोक गर्दी करतात. या घड्याळांमुळे त्या त्या शहराला जणू एक ऱ्हिदम मिळतो. प्रागचं ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक म्हणजे जणू दर तासाला घडणारा मध्ययुगीन थिएटरमधला शोच असतो. म्युनिकमधल्या ग्लॉकनश्पीअलमध्ये संगीत आणि नाचणाऱ्या बाहुल्यांमधून परीकथाच जिवंत होते. साप्पोरोमधला क्लॉक टॉवर म्हणजे बदलत्या काळाकडे बघणाऱ्या इतिहासाचं प्रतीकच जणू आणि बिगबेनचा घंटानाद म्हणजे सगळं जग एका क्षणात ओळखतं अशी लंडनची कानात गुंजणारी ओळखच.

या सगळ्यांमधला समान दुवा म्हणजे ही घड्याळं फक्त वेळ मोजत नाहीत, तर ती काळाची अभिव्यक्ती होतात. त्यांच्या माध्यमातून ते ते ठिकाण जणू आपली सेलिब्रेशनची, आठवण काढण्याची आणि जगण्याची रीत दर तासाला दाखवत असतं.

माझा निष्कर्ष

जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा वेळ ही संकल्पना वेगळी वाटते. रोजच्या रूटीनपेक्षा एखाद्या नवीन परिसरातला, वेगळ्या विभागातला साधा मॉर्निंग वॉकसुध्दा अधिक अर्थपूर्ण वाटतो, कारण तेव्हा आपण अधिक जागरुकपणे, संवेदनशीलतेने परिसराचा आनंद घेत असतो आणि आपलं लक्ष त्यावरच केंद्रित झालेलं असतं. एखाद्या ट्रिपवरचे जे क्षण आपल्या कायम लक्षात राहतात ते कधीच फार मोठे आणि महत्त्वाचे नसतात, उलट अगदी साधे आणि छोटे असतात. अचानकपणे कोणाशी झालेल्या गप्पा, रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या कॅफेतून आलेला सुगंध, अचानक नजरेस पडलेलं सुंदर दृश्य असे क्षण आपल्या कायम लक्षात राहतात. पर्यटनामध्ये काळ विस्तारत जातो, कारण तो तुम्हाला सजग करतो आणि या सजगपणामुळेच हे क्षण महत्त्वाचे ठरतात.

वॉच असेंब्ली क्लासमध्ये मला नेमका हाच धडा मिळाला. एक लहानशी हालचाल घडून येण्यासाठी, इतर वेळी कदाचित मी ज्याकडे दुर्लक्ष केलं असतं अशा अगदी क्षुल्लक गोष्टीकडे मला शांतपणे लक्ष केंद्रित करावं लागलं. अगदी लहान भाग योग्य ठिकाणी ठेवताना नकळत झालेल्या लहान लहान चुका शांतपणे दुरुस्त करण्याचा संयम मी शिकलो. यातून माझ्या लक्षात आलं की घड्याळ तयार करणं असो किंवा एखाद्या डेस्टिनेशनला भेट देणं असो, तुम्ही तिथे मनाने किती उपस्थित आहात, त्यावर तो सगळा अनुभव अवलंबून असतो. घड्याळ सरणाऱ्या काळातला प्रत्येक सेकंद अगदी अचूकपणे प्रत्यक्षात धरून ठेवतं, तर पर्यटन त्यांना संस्मरणीय क्षणात धरुन ठेवतं. दोन्ही गोष्टी आपल्याला हेच सांगतात की वेळ ही फक्त नोंदवण्याची नाही, तर योग्य पद्धतीने वापरण्याची गोष्ट आहे.

मागे वळून बघताना, एका छोट्या घड्याळाच्या जोडणीपासून सुरू झालेला आणि जगभरातील विविध संस्कृतींनी काळवेळ मोजण्याला दिलेल्या आकारांपर्यंत घेऊन गेलेला हा प्रवास मला एक गोष्ट नक्की शिकवून गेला आणि ती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी काळ या संकल्पनेकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलं गेलं आहे. काहींसाठी तो वारसा होता तर काहींसाठी तत्त्वज्ञान, काहींसाठी ते इंजिनियरिंग होतं, तर काहींसाठी एक अभिनव कल्पना. ही विविधता लक्षात आली की मग तुम्ही पर्यटन करताना तुमच्या वेळेकडे अधिक सजगपणे पाहू लागता. वेळेचा आदर करायला शिकता. काळाचा आदर करणं म्हणजे त्याच्या मागे धावणं नव्हे, तर त्याचा अधिक काळजीपूर्वक वापर करणं. मग ते परदेशातल्या एखाद्या चौकातल्या क्लॉक टॉवरसमोर उभे असताना असेल किंवा ट्रिपवर असताना मधेच एखादा शांत क्षण अनुभवताना असेल. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात, तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल - आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल.
12 mins, read

वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल - आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल.

Published in Sakal Saptrang 30th August 2026 लेट्स ब्रेक बॅरिअर्स अँड रॉक द वर्ल्ड! काही वर्षांपूर्वी एक प्रश्न नेहमी ऐकायला मिळायचा, “माझ्यासोबत यायला कुणी नाही, मग मी कशी जाऊ?” आज तो प्रश्न खू

माझा पहिला तास
12 mins, read

माझा पहिला तास

Published in Maharashtra Times 30th August 2026 ...लेहसारख्या ठिकाणाचं निसर्गदृश्य इतकं भव्य आणि प्रभावी असतं की सुरुवातीपासून तुमच्या अवतीभवती असलेले ते उत्तुंग पहाडच तुमच्या टूरचा सूर सेट करतात.

प्रवास सुवर्णमार्गाचा
12 mins, read

प्रवास सुवर्णमार्गाचा

Published in Loksatta Lokrang 30th August 2026 ...एका सुंदर पहाटे मी त्या कमळाच्या आकाराच्या भव्य शिल्पासमोर उभी होते. त्या भव्यतेसमोर मी इवलीशी दिसत होते...   रोज रात्री झोपताना पुस्

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!