Published in Loksatta Lokrang 30th August 2026
...एका सुंदर पहाटे मी त्या कमळाच्या आकाराच्या भव्य
शिल्पासमोर उभी होते. त्या भव्यतेसमोर मी इवलीशी दिसत होते...
रोज रात्री झोपताना पुस्तकाची काही पानं वाचायची माझी सवय आहे. तशीच काही पानं चाळावीत म्हणून त्या दिवशी एक पुस्तक हातात घेतलं. ते होतं विल्यम डॅलरिम्पल यांचं, ‘द गोल्डन रोड: हाऊ एनशिएंट इंडिया ट्रान्सफॉर्म्ड द वर्ल्ड.’ पुस्तक वाचत असले तरी माझा मूळ स्वभाव प्रवासाचा असल्याचं मला त्याक्षणी पुन्हा जाणवलं. वाचनाच्या निमित्ताने झालेल्या या व्हर्च्युअल प्रवासात पुस्तक हा माझा पासपोर्ट होता आणि डॅलरिम्पल झाले गाईड.
आपल्याकडील रेशीम, मातीची भांडी, मसाले यांचा शतकानुशतके वेगवेगळ्या खंडांपर्यंतचा प्रवास ज्या मार्गाने होत असे त्या ‘सिल्क रोड’चं नाव मी शाळेत असल्यापासून ऐकलं होतं. एवढंच नाही, तर अनेक पर्यटकांसाठी या व्यापारी मार्गावरील प्रवासाचं नियोजनही केलं होतं. डॅलरिम्पल यांनी त्या ओळखीच्याच मार्गाबदद्ल पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन मांडला. व्यापारी मार्गाने वस्तूंचा प्रवास होत होता, तशाच तत्त्वज्ञान, धर्म, गणित अशा संकल्पनाही एका ‘सुवर्णमार्गा’वरून मार्गक्रमण करीत होत्या. त्या संकल्पना रेशमापेक्षाही टिकाऊ, मसाल्यांपेक्षाही परिवर्तनकारी ठरल्या. पुस्तकातून डोकं वर काढल्यावर माझ्या लक्षात आलं की मी नकळतपणे या सुवर्णमार्गावरून प्रवास करू लागले होते. तर आज आपण त्या सुवर्णमार्गावरील पाऊलखुणांचाच वेध घेऊयात.
इंडोनेशिया - सर्वत्र रामायण!
इंडोनेशियात पहिल्यांदा गेले, तेव्हा इथे सगळं आपल्या ओळखीचं कसं काय, याची मला कमाल वाटली. बालीमध्ये बहुतेक घरांच्या बाहेर ‘कनांग सारी’ असते. ताडाच्या पानांनी तयार केलेल्या छोट्याशा तबकात फुलं, तांदूळ, धूप असं काही ना काही अर्पण करण्याची तिथे प्रथा आहे. आपल्याकडे जशी सांजवात करतात ना, तसाच हा सकाळी न चुकता केला जाणारा तिथला विधी.
या देशात थक्क करून टाकणाऱ्या पर्वतरांगा, समुद्रकिनारे आणि नयनरम्य बेटांची लयलूट आहे. त्याचबरोबर, इथली भलीमोठी शिल्पं, पुतळेही आपलं लक्ष वेधून घेतात. एका ट्रॅफिक सर्कलच्या मध्यभागी मला सापडला तो महाभारतातील योद्धा घटोत्कच. एका मंदिराच्या प्रवेशद्वारावरच विराजमान होता महाबली हनुमान. उबुदमध्ये आयुंग नदीत राफ्टिंगचा आनंद घेत असतानाच अचानक नदीच्या काठाजवळील दगडांमध्ये रामायण कोरलेलं दिसलं! त्यानंतर पुन्हा रामकथेची गाठ पडली ती नृत्यातून. संगीत आणि भाषा यांची जातकुळी वेगळी असली तरी कथेचा आत्मा सारखाच होता.
पुराणातल्या कथांनी बालीतील गगनालाही गवसणी घातलेली आहे. बालीमधील ताजं आकर्षण आहे ते ‘गरुडा विष्णू केंचना मूर्ती’चं. अतिविशाल गरुडावर आरूढ झालेले भगवान विष्णू पाहताना भान हरपून जातं. या मूर्तीची उंची 121 मीटर आहे. जगातील सगळ्यात उंच मूर्तींमध्ये हिचा चौथा क्रमांक लागतो. शिवाय हिची रुंदीही सर्वाधिक आहे. गरुडाचे पंख 64 मीटर रुंद पसरलेले आहेत. बालीच्या संस्कृती आणि कल्पनाविश्वावर भारतीय पुराणकथांचं गारूड असल्याचं हे आधुनिक काळातील मूर्तिमंत उदाहरण. बालीची सैर म्हणजे भारतीय महाकाव्यांचं, जावा आणि बाली इथल्या लोकांच्या कल्पनाशक्तीतून उभं राहिलेलं जागृत संग्रहालय आहे, असं वाटतं.
थोडं उत्तरेला जावामध्ये ‘बोरोबुदूर’ हे जगातलं सगळ्यात विशाल बौद्ध स्मारक आहे. या भव्य वर्तुळाकार मंदिराचं बांधकाम नवव्या शतकातील आहे. त्यात बुद्धांच्या जीवनावर आधारित दगडात कोरलेली 2500हून अधिक शिल्पं आहेत. गंगेच्या खोऱ्यात उगम पावलेली बुद्धांची शिकवण हजारो किलोमीटरचा प्रवास करून इथल्या पर्वतातल्या दगडांवर उमटलेली पाहून आपण थक्क होतो. असं हे बोरोबुदूर केवळ प्राचीन स्मारक न राहता, समुद्र ओलांडून गेलेला, अनंतकाळासाठी दगडात कोरून राहिलेला भारताचा ठेवा वाटतो.
थायलंड - अयुथाया, राम आणि स्वाद
सुवर्णमार्गाचा प्रवास इंडोनेशियातून पुढे सरकत उत्तरेकडच्या थायलंडकडे येतो. इथल्या दैनंदिन जीवनात सगळीकडे भारतीय खुणा सापडतात. थायलंडच्या जुन्या राजधानीला ‘अयुथाया’ का म्हणतात, हे माहितीये? हे नामकरण ‘अयोध्या’ या प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीवरून झालेलं आहे. थायलंडच्या सम्राटांनी शतकानुशतके रामनामाची उपाधी धारण केली आहे. ही परंपरा आज अगदी राम दहावे यांच्यापर्यंत सुरू आहे. थायलंडचे राष्ट्रीय महाकाव्य ‘रामाकियेन’ म्हणजे स्थानिक संदर्भ असलेला राममहिमाच.
या देशात सर्वत्र भारतीय झलक दिसते. बँकॉकच्या विमानतळावर आलो की तिथे समुद्र मंथनांचं भलंमोठं शिल्प दिसतं. नागावर उभ्या असलेल्या विष्णूचं दर्शन होतं. इथल्या राजप्रासादांमध्ये भारतीय महाकाव्यांतील प्रसंगांची म्यूरल्स आहेत. त्यांच्या जेवणाला भारतीय स्वादाची लज्जत आहे. अनेक प्रकारच्या लोकप्रिय थाय करींमधल्या मसाल्यांचा उगम भारतातलाच आहे. शतकांपूर्वी भारतातून गेलेल्या हळद, जिरे, धने यांनी आणलेल्या प्राचीन स्वादाची झलक हल्ली तरुणांमध्ये भलतीच प्रिय असलेल्या ग्रीन करीमध्येही जाणवते.
इथे भारतातील धर्मांचा पगडाही जाणवण्याइतपत आहे. हिंदूंच्या धर्मपरंपरेने देवतांचा वारसा दिला, तर बौद्ध धर्माने थायलंडला आध्यात्मिक पीठाचं स्थान दिलं. झळाळत्या सुवर्ण बुद्धमूर्तींपासून आकाशाला भिडणाऱ्या स्तूपांपर्यंत सर्वत्र भारतीय छाप दिसते. इतकंच नाही तर हॉटेल्समध्येही आपल्याला गणेशमूर्ती हमखास दिसते.
कंबोडिया - अंगकोर वाट
सुवर्णमार्गावरील आपल्या प्रवासाचा उत्कर्षबिंदू म्हणजे कंबोडियातील ‘अंगकोर वाट’. एका सुंदर पहाटे मी त्या कमळाच्या आकाराच्या भव्य शिल्पासमोर उभी होते. त्या भव्यतेसमोर मी इवलीशी दिसत होते. मुळात बाराव्या शतकात बांधलेलं हे विष्णूचं मंदिर आहे. त्याचं कालांतराने बौद्ध मंदिर झालं. असं असूनही तिथल्या प्रत्येक दगडावर भारतीय मातीशी असलेलं नातं कोरलेलं आहे. तिथल्या भिंतींवर रामायण आणि महाभारतातील प्रसंग शिल्पबद्ध आहेत. अप्सरांच्या नर्तनाचं नाजूक दगडातील कोरीवकाम अनंत काळ टिकणारं आहे. तसंच, संस्कृत भाषेतील शिलालेख शतकानुशतकांचा वारसा सांगतात. अंगकोर वाट हे जगातील सर्वात मोठं धार्मिक वारसास्थळ आहे. त्याचा आकार व्हॅटिकन सिटीपेक्षाही मोठा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘मंदिर हे विश्वरुपी पर्वत असून भौतिक आणि दैवी जगाला जोडणारा सेतू आहे’, ही त्या वास्तूची संकल्पना अस्सल भारतीय आहे.
श्रीलंका - बुद्धांचे अवशेष
रामायणातही श्रीलंकेला विशेष स्थान आहे. ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ असं तिचं वर्णन करण्यात आलं आहे. इथे पर्यटक रामायणाच्या मार्गावरून प्रवास करीत त्यात उल्लेख असलेली ठिकाणं पाहू शकतात. रामायणाची ओळख पटवणाऱ्या अनेक पाऊलखुणा या प्रवासात सापडतील. नुवारा एलिया जवळच सीता एलिया इथे सीता अम्मन टेम्पल हे छानसं छोटेखानी मंदिर आहे. इथे रावणाने सीतेला बंदिवासात ठेवलं होतं असं म्हणतात. जवळच अशोक वाटिका आहे. इथे सीतेने रामाची वाट पाहिली. उचंच उंच वृक्षांनी हा सगळा परिसर वेढलेला आहे. रावणाने एला इथल्या गुहेत आश्रय घेतल्याचीही कथा सांगितली जाते. हनुमानाने पेटलेल्या शेपटीने लंकादहन केल्याच्या प्रसंगाशी निगडित जागा म्हणजे दक्षिण किनाऱ्यावरील उस्सांगोडा. आता या मार्गावरून प्रवास करताना आपल्याला आजूबाजूला चहाचे मळे, गर्द वनराजीने भरलेल्या डोंगरातून अधूनमधून डोकावणारे वॉटरफॉल्स दिसतात.
भारताच्या दक्षिणेला असलेल्या या बेटावर इ.स.पू. तिसऱ्या शतकात अशोकाच्या काळात बौद्ध धर्म पोहोचला आणि खोलवर रुजला. ‘अनुराधापुरा’ येथे जमिनीत रोवलेले प्रचंड आकाराचे स्तूप आहेत. बुद्धांचे पवित्र अवशेष असल्याने दरवर्षी कोट्यवधी भाविक इथे येतात. तर ‘कँडी’मध्ये दंत मंदिर आहे. तिथे बुद्धांचा दात ठेवण्यात आला आहे, असे मानतात.
म्यानमार - मंदिरांचे विस्तीर्ण मैदान
सुवर्णमार्गाचा प्रवास येतो तो म्यानमारमधल्या ‘बागान’च्या विस्तीर्ण मैदानांवर. नजर जाईल तिथवर मंदिरे आणि स्तूप दिसतात. त्यांची संख्या 2,000 हून अधिक भरेल. नवव्या आणि तेराव्या शतकांच्या दरम्यानच्या काळात त्यांची रचना झालेली आहे. भारतातून येऊन ब्रह्मदेशाच्या मातीत रुजलेल्या बौद्ध शिकवणींचे ते मूर्त रूप आहे. सूर्यास्ताच्या वेळी एखाद्या मंदिरापाशी येऊन दूरवर इरावड्डी नदीचा सोनेरी प्रवाह पाहता येतो. मंडलासारख्या वर्तुळाकार रचनांचे प्रतिमाशास्त्र आणि शहरच्या शहर आध्यात्मिक केंद्रात रुपांतरित करणे या संकल्पनांवरील भारताचा पगडा अगदी स्पष्टपणे दिसतो.
चीन - नालंदाचे प्रवासी
भारतीय तेजाचा स्पर्श चीनलाही झालेला आहे. फॅक्सियन आणि युआन श्वांग हे चिनी भिख्खू पाचव्या आणि सातव्या शतकात भारतात आले आणि नालंदा विद्यापीठात दाखल झाले. त्या काळी नालंदा विद्यापीठात तत्त्वज्ञान आणि विज्ञानावर विचारमंथन होत असे. भारताबद्दलच्या प्राचीन नोंदींमध्ये युआन श्वांगने केलेल्या नोंदी सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जातात. त्याने इथली शहरं, माणसं, मॉनेस्ट्रीज् यांचं सविस्तर वर्णन केलं आहे. वैभवशाली नालंदा विद्यापीठाला त्याने ‘विद्येचं भांडार’ म्हटलं आहे. त्याने भारतातून नेलेल्या बौद्ध धर्मग्रंथांचे अनुवाद शिआन येथे ‘जायंट वाईल्ड गूज पॅगोडा’मध्ये आजही जपून ठेवलेले आहेत. या ग्रंथांनी पूर्व आशियाई बौद्ध धर्माची जडणघडण केली.
आजचा सुवर्णमार्ग
विविध देशांतील सुवर्णमार्गावरून प्रवास करताना डॅलरिम्पल यांचा मुद्दा मला अधिक उमगत गेला. संकल्पनांचा प्रवास दिगंताचा असतो. मंदिरांची पडझड होते. राजवटी कोसळतात, पण तत्त्वज्ञान, कथा आणि आकडे मात्र चिरंतन असतात. न्यूयॉर्कमध्ये आजही योग स्टुडिओ दिसतात. बर्लिनमध्ये आयुर्वेदाचा अभ्यास केला जातो, तसंच बालीमध्ये संस्कृत मंत्रोच्चारण ऐकू येतं. म्हणजेच सुवर्णमार्गाची वाटचाल थांबलेली नाहीये, त्याची पद्धत बदलली आहे. आता हा मार्ग डिजिटल, जागतिक आणि क्षणात सर्वत्र पोहोचणारा झाला आहे.
वसुधैव कुटुंबकम्
डॅलरिम्पल यांनी लिहिलेलं पुस्तक वाचून संपवताना माझ्या लक्षात आलं की ही कथा म्हणजे फक्त इतिहासाची उजळणी नाहीये. त्यात माझ्याही प्रवासांचं प्रतिबिंब पडलेलं होतं. बाली, अयुथाया, अंगकोर वाट, बागान... इथे मी फक्त ठिकाणं पाहिली नव्हती, तर शतकांपूर्वी भारतातून आलेल्या कल्पनांच्या वाटांवरून मार्गक्रमण करीत होते. मी त्यातला एक धागा होते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ असं मानणारी आपली संस्कृती आहे. सुवर्णमार्गावर त्याची प्रचिती मला पदोपदी आली. कल्पना कोण्या एका राष्ट्राच्या मालकीच्या नसतात, त्या मानवजातीचा सामायिक वारसा सांगतात, हेही जाणवलं. म्हणूनच, आपणही प्रवास करायला हवा. वेगवेगळ्या खंडांत पसरलेल्या सुवर्णमार्गाच्या पाऊलखुणांचा शोध घ्यायला हवा. तिथल्या मंदिरांमध्ये नतमस्तक व्हायला हवं आणि हा प्रवास करताना स्वतःशी संवाद साधायला हवा की आज आपण कोणत्या नव्या कल्पनांचे भोई आहोत, आणि त्या उद्या कुठे पोहोचलेल्या असतील?






































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.