Published in Maharashtra Times. Date 31st May, 2026
अनेक वर्षं या मशीनमधून फार पूर्वीच बंद झालेली, 1970 आणि 80 च्या दशकातली पेयं पुरवली जात होती. ती त्यात कोण आणून भरतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्याच्या बटणांवर प्रश्नचिन्ह काढलेली होती.
वेंडिंग मशीन्स म्हणजे काय आणि त्यांचा उपयोग कसा करता येतो हे सगळं मला माहीत आहे अशी माझी खूप काळ समजूत होती. पण मी जेव्हा पहिल्यांदा जपानला गेलो तेव्हा माझ्या या गैरसमजुतीचा फुगा फुटला. तिथे मी पाहिलं की वेंडिंग मशीन म्हणजे फक्त एक यंत्र नाही तर कल्पकतेनं घडवलेला, लोकांच्या विविध गरजा भागविणारा, अतिशय सुखकर असा एक आविष्कार आहे.
सकाळच्या गार हवेतली गरमागरम कॉफी, ऐन उन्हाळ्यातील थंड पेय, पाऊस पडू लागला तर छत्री, ऑड वेळेच्या भुकेसाठी स्नॅक्स हे सगळंं फक्त एक बटण दाबताच हजर होतं आणि तेही कुठे? तर कधी गजबजलेल्या रस्त्यावर, तर कधी एखाद्या कोपऱ्यातल्या निर्मनुष्य जागी सुद्धा. 2016 मधल्या त्या ट्रिपमध्ये मला कळलं की वेंडिंग मशीन्स किती भन्नाट असू शकतात. त्यानंतर पुढची अनेक वर्षं इंटरेस्टिंग वेंडिंग मशीन्स म्हणजे फक्त जपान अशीच माझी समजूत होती. पण मी अगदी अलीकडे स्वित्झर्लंडमध्ये गेलो होतो, तेव्हा पुन्हा एकदा एका वेंडिंग मशीनने मला वेगळीच जाणीव करून दिली. हे वेंडिंग मशीन काही हाय टेक नव्हतं. ते एक ‘फार्म टू बॉटल’ वेंडिंग मशीन होतं. ग्रामीण भागातल्या लाक्स नावाच्या एका लहानशा गावातलं ते अगदी साधं मशीन होतं. तुम्ही तुमची बाटली घेऊन यायची, मशीनमध्ये नाणं टाकायचं की ताजं ताजं दूध मशीनमधून वाहू लागायचं. कोणा मध्यस्थाची गरज नाही. फक्त भरवसा, टेक्नॉलॉजी आणि स्थानिक उत्पादन यांचा मेळ, बस्स! आणि माझ्या लक्षात आलं की आता वेंडिंग मशीन्स ही केवळ एक सोय किंवा स्नॅक्सपुरती मर्यादित राहिलेली नाहीत, तर जगभरातले समाज कसे वागतात, लोकं कशाला महत्त्व देतात, ऑटोमेशनशी त्यांनी किती जुळवून घेतलं आहे, उपलब्धता आणि वेळेची बचत याची त्यांनी कशी सांगड घातली आहे, या सगळ्याचं प्रतिबिंब आता वेंडिंग मशीन्समध्ये पाहायला मिळतं. तेव्हा आज आपण जगभरातल्या वेंडिंग मशीन्सच्या अद्भुत दुनियेत एक फेरफटका मारूया. जपानपासून स्वित्झर्लंडपर्यंत, युरोपपासून अमेरिकेपर्यंत आणि त्याही पुढे जरा चक्कर मारून येऊया. जुन्या जमान्यातल्या अगदी सुरुवातीच्या मशीन्सपासून ते आधुनिक अनोख्या मशीन्सपर्यंत आणि त्याच्या व्यावहारिक उपयोगांपासून ते थक्क करणाऱ्या कल्पनांपर्यंत वेंडिंग मशीन्सचं विश्व कसं आहे ते पाहूया.
अतिशय प्राचीन कल्पना
आधुनिक वाटणाऱ्या वेंडिंग मशीन्सची पाळंमुळं शोधायला गेलं तर ती अतिशय प्राचीन काळात सापडतात. यांचा सर्वात पहिला अवतार बघायला मिळतो तो चक्क प्राचीन ग्रीसमध्ये आणि सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी. त्या काळातील ‘हिरो ऑफ अलेक्झांड्रिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका इंजिनियरने तेव्हा मंदिरातील तीर्थ मिळण्यासाठी नाणी टाकायचं मशीन तयार केलं होतं. त्यात नाणी टाकल्यावर ठराविक मापात तीर्थ बाहेर येत असे. त्यामागची कल्पना साधी होती. नियंत्रित वापर, सर्वांना समान वाटप आणि सोय यावर ते मशीन आधारलेलं होतं.
त्यानंतर अनेक शतकांनी वेंडिंग मशीन पुन्हा अवतरलं ते एका नव्या अवतारात, 19व्या शतकाच्या अखेरीला. जेव्हा शहरं गजबजू लागली आणि जास्त लोक प्रवास करु लागले, तेव्हा युरोपमध्ये आधुनिक पद्धतीच्या वेंडिंग मशीन्सचा उदय झाला. इंग्लंड आणि जर्मनीमधली पोस्ट ऑफिसेस, ट्रेन स्टेशन्सवर ही मशीन्स दिसू लागली. यातून पोस्टकार्ड, स्टॅम्प्स, चॉकलेट्स खरेदी करता येत असत. प्रवास करणाऱ्या लोकांना लागणाऱ्या छोट्या पण उपयोगाच्या गोष्टींसाठी ही मशीन्स होती. 1890 पर्यंत युरोपच्या बहुसंख्य भागात चॉकलेट वेंडिंग मशीन्स पसरली होती.
20 व्या शतकाच्या आरंभीच्या काळात ‘ऑटोमेट्स’च्या माध्यमातून ही संकल्पना आणखी विकसित करण्यात आली. न्यूयॉर्क आणि ॲमस्टरडॅम यांसारख्या शहरांमध्ये वेंडिंग सिस्टिम्सचा वापर रेस्टॉरंटची सगळी सेवा देण्यासाठी करण्यात येऊ लागला. ग्लास कंपार्टमेंट्समध्ये नाणी टाकल्यावर, मानवी सेवेशिवाय ग्राहकांना गरम जेवण मिळू लागले. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ऑटोमेट्स ही आश्चर्य वाटावं अशी ठिकाणं नव्हती, तर जिथे रोज जेवणासाठी हजारो लोक येत अशी ठिकाणं बनली होती.
वेंडिंग मशीन्सच्या संदर्भातली लक्षणीय बाब म्हणजे ही मशीन्स मानवी व्यवहारांना पर्याय म्हणून निर्माण झाली नव्हती, तर लोकांना सेवा पुरविण्यातल्या प्रॅक्टिकल अडचणींवर उपाय म्हणून, त्यांना गतिमान आणि खात्रीशीर सेवा सहज उपलब्ध व्हावी म्हणून ही मशीन्स अवतरली होती. जगभरात जसजसं सुपरमार्केट्स आणि फास्ट फूड चेन्सचं प्रस्थ वाढू लागलं, तसतशी अनेक देशांमधली वेंडिंग मशीन्स आपोआप मागे पडत गेली. मग ती फक्त स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक्सपुरती उरली आणि ऑफिसेसच्या कॉरिडॉर्समध्येच दिसू लागली. पण त्यांची संकल्पना मात्र शाबूत राहिली आणि जिथे जिथे त्यांची गरज होती, त्या त्या ठिकाणची संस्कृती, तंत्रज्ञान आणि लोकांची गरज लक्षात घेऊन वेंडिंग मशीन्सनी नवा अवतार धारण केला.
युरोपमधील शांततापूर्ण वेंडिंग रिव्होल्यूशन
युरोप खंडाच्या अनेक भागांमध्ये पारंपरिक पध्दतीने किरकोळ विक्री करणारी दुकाने बंद होऊन वेंडिंग मशीन्सनी त्यांची जागा घेतली. छोट्या गावातली दुकानं बंद झाली, जी उरली त्यांची वेळ कमी झाली, दुकानात काम करायला माणसं मिळेनाशी झाली. यामुळे अनेक गावांनी वेंडिंग मशीन्सचा सोपा, सहज पर्याय स्वीकारला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे फ्रान्स. इथल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये आता वेंडिंग मशीन्स बागेत फ्रेंच लोकांचा आवडता पाव, अंडी, चीज, भाज्या, पिझ्झा आणि अगदी ऑयस्टर्सही विकतात. रात्री उशिरापर्यंत ही मशीन्स गावांतील अंधारलेल्या रस्त्यांवर त्यांच्या मंद प्रकाशाने आपलं लक्ष वेधून घेतात आणि दुकानांच्या वेळा संपल्यावरही लोकांना ताजे पदार्थ सहज उपलब्ध करुन देतात.
नेदरलँड्समध्ये मात्र वेंडिंग मशीन्सनी आपलं जुनं, ऐतिहासिक स्वरुप टिकवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या देशातून ऑटोमेट कधीच नष्ट झालं नाही. एफ इ बी ओ आउटलेट्समध्ये आजही वेंडिंग कंपार्टमेंट्समधून तुम्हाला क्रोकेट्स, फ्राइज आणि बर्गर्स मिळतात. तुम्ही पैसे देता, एक छोटंसं दार उघडतं आणि तुमचं जेवण तयार असतं. इतर ठिकाणी जे ‘रेट्रो’ वाटेल ती गोष्ट इथे मात्र एकदम नॉर्मल आहे. इटलीमध्ये तर चवदार पदार्थांच्या राष्ट्रीय ऑब्सेशनचं प्रतिबिंबच तिथल्या वेंडिंग मशीन्समध्ये पाहायला मिळतं. इथली पिझ्झा वेंडिंग मशीन्स तर पीठ मळणं, टॉपिंग्ज ॲड करणं हे करुन तुम्हाला खमंग पिझ्झा काही मिनिटांत देतात.
संपूर्ण युरोपमधला पॅटर्न हेच सांगतो की वेंडिंग मशीन्स म्हणजे मार्केट्स, रेस्टॉरंट्स, कॅफेजना पर्याय नाहीत, तर ती गॅप भरण्याचं काम करतात. दुकानं बंद झाल्यानंतरही पदार्थ मिळणं, ग्रामीण भागातली वस्तूंची किंवा पदार्थांची उपलब्धता आणि बदलती जीवनशैली यावर ही मशीन्स चालतात.
युनायटेड स्टेट्स - घाऊक प्रमाणावरची सोय
युनायटेड स्टेट्समधली वेंडिंग मशीन्स अगदीच वेगळी कहाणी सांगतात. अधिकृत नोंदींप्रमाणे जगात यु.एस.ए. मध्ये सर्वात जास्त वेंडिंग मशीन्स आहेत. पण ती इतक्या सहज सर्वत्र दिसत नाहीत. जपानमध्ये वेंडिंग मशीन्स रस्त्यांवर उभी असतात, त्याउलट अमेरिकेत ती कायम आतमध्ये असतात. कार्यालये, शाळा, हॉस्पिटल्स, एअरपोर्टस्, जिम्स आणि हायवे रेस्ट स्टॉप्स अशा ठिकाणी ती हमखास असतात. जिथे वेळेची कमतरता आहे आणि मानवी सेवेची गरज नाही तिथे तिथे ती असतात. अमेरिकन वेंडिंग मशीन्सनी कायम एकाच गोष्टीला प्राधान्य दिलं आहे आणि ती म्हणजे ‘सोय’. कॅफेटेरियाजमधील सोडा आणि स्नॅक्स मशीन्सच्या रांगा, पेट्रोल स्टेशनच्या कोपऱ्यात एखादं मंदपणे आवाज करणारं ड्रिंक्स मशीन, दोन मीटिंग्जच्यामध्ये पटकन काहीतरी तोंडात टाकायला देणारं किंवा नाईट शिफ्टला भूक भागवणारं मशीन, अशी अनेक उपयुक्त पण पटकन न दिसणारी मशीन्स अमेरिकेत आहेत. इथे वेंडिंग मशीन्सचा वापर अतिशय कल्पकपणे होतो. 20व्या शतकाच्या सुरुवातीला बहुतेक सगळ्या शहरांच्या रस्त्यांवर न्यूजपेपर वेंडिंग बॉक्सच्या रांगा पाहायला मिळायच्या आणि ही मशीन्स प्रामाणिकपणे चालायची. अगदी अलीकडच्या काळात डीव्हीडी वेंडिंग मशीन्समुळे चित्रपट बघण्यासाठी डीव्हीडी भाड्याने घेणं ही सुपर मार्केटच्या बाहेर दोन मिनिटांत करण्याची गोष्ट झाली होती.
आता हे चित्र हळूहळू बदलून त्यात विविधता पाहायला मिळत आहे. काही शहरांमधल्या वेंडिंग मशीन्समधून ताजी सलाड्स, स्मूदीज, कपकेक्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फोनच्या ॲक्सेसरीज मिळू लागल्या आहेत. पॅन्डेमिकच्या काळात, बदललेल्या गरजा ओळखून पीपीई किट्स आणि आरोग्यविषयक आवश्यक वस्तू पुरवणारी मशीन्सही निघाली होती. यु.एस.ए. मधील वेंडिंग मशीन्स काहीतरी नावीन्यपूर्ण किंवा आनंददायी बनवावं म्हणून निर्माण केलेली नसतात. जिथे अन्य काहीही मिळणार नाही अशा ठिकाणीच त्यांची निर्मिती केलेली असते. आणि जो देश कायम धावत असतो, प्रवासाचे आणि कामाचे तास जिथे लांबलचक असतात अशा देशासाठी या प्रकारची मशीन्स एकदम परफेक्ट ठरतात.
अनपेक्षित इनोव्हेशन्स
वेंडिंग मशीन्सच्या पारंपरिक कल्पनांना धक्का देणाऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आज घडत आहेत. कितीतरी मार्केट्समध्ये वेंडिंग मशीन्स जुन्या साच्याप्रमाणे न बनवता, पूर्णपणे नव्याने बनवली जात आहेत. याचं सर्वात लक्षणीय उदाहरण म्हणजे ‘चायना’. बराच काळ वेंडिंग मशीन्स ही तिथल्या लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग नव्हती. पण गेल्या दशकभरात हे चित्र झपाट्याने बदललंय. मोबाईल पेमेंट्स आणि क्यू आर कोड्सची सवय झालेल्या लोकांची संख्या वाढल्यामुळे इथे वेंडिंग मशीन्सही जलद गतीने वापरात आली आणि ती सुद्धा नाणी किंवा नोटांचा टप्पा गाळून. नानजिंगसारख्या शहरांत स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेले जिवंत खेकडे वेंडिंग मशीन्समधून मिळतात. नियंत्रित तापमानात हायबरनेशनमध्ये ठेवलेले असल्याने हे खेकडे एकदम ताजे असतात आणि त्याची गॅरंटीही दिली जाते. हे अतिशय व्यवहार्य आणि तिथल्या संस्कृतीशी जुळणारं आहे, पण इतकं अनपेक्षित आहे की तुम्ही थबकून पाहिल्याशिवाय राहणार नाही.
सिंगापूर आणि साऊथ कोरियामधील वेंडिंग मशीन्स ही अधिक चकाचक, नीटनेटकी आणि अचूक आहेत. या मशीन्समधून लक्झरी कॉस्मेटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, गरम जेवण आणि स्पेशालिटी ड्रिंक्स मिळतात. त्यामुळे ही मशीन्स फक्त स्नॅक्स देणाऱ्या मशीन्सपेक्षा ऑटोमेटेड बुटिक्स अधिक वाटतात. प्रिमियम एक्सपिरियन्सेस आणि तंत्रज्ञानाचा संगम साधणाऱ्या समाजाचं प्रतिबिंबच त्यांच्यात दिसतं.
मिडल ईस्टमध्ये अबुधाबीसारख्या ठिकाणी गोल्ड बार आणि सोन्याची नाणी वेंडिंग मशीन्समधून खरेदी करता येतात आणि ती ही सोन्याच्या आंतरराष्ट्रीय दरामध्ये. एक गिमिक वाटू शकणारी ही गोष्ट प्रत्यक्षात गुंतवणूक म्हणून आणि संपत्तीचं प्रतीक म्हणून सोन्याचं त्या संस्कृतीत असलेलं महत्त्व अधोरेखित करते.
भन्नाट वेंडिंग मशीन्स
काही ठिकाणी वेंडिंग मशीन्सच्या अस्तित्वामुळे अशा काही भन्नाट कहाण्या तयार होतात की ज्या तुम्ही आवर्जून इतरांना सांगता. जपानमधील माऊंट फुजीचंच उदाहरण सांगायचं तर तिथे क्लाईंबिंग सीझनमध्ये शिखराजवळ वेंडिंग मशीन्स बसवण्यात येतात. यामुळे थकलेल्या गिर्यारोहकांना 3800 मीटर्सच्या उंचीवर कोल्ड ड्रिंक किंवा गरमागरम कॉफी मिळण्याची सोय होते. ही मशीन्स या पर्वतावरून दरवर्षी वर-खाली नेली जातात. तसंच इथल्या नैसर्गिक परिसराशी ती मिळतीजुळती वाटावीत म्हणून तशा रंगांनी रंगवली जातात. लॉजिस्टिकल चमत्कार आणि जरासा विक्षिप्तपणा यांचा संगम झाल्यामुळेच हे घडू शकलंय.
आणखी एक उदाहरण सांगायचं तर सिएटलमधलं रहस्यमय सोडा वेंडिंग मशीन. अनेक वर्षं या मशीनमधून फार पूर्वीच बंद झालेली, 1970 आणि 80 च्या दशकातली पेयं पुरवली जात होती. ती त्यात कोण आणून भरतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्याच्या बटणांवर प्रश्नचिन्ह काढलेली होती. स्थानिकांसाठी ती एक आख्यायिकाच ठरली होती आणि एक दिवस अचानक एक हस्ताक्षरातली चिठ्ठी मागे सोडून ते मशीन गायब झालं. कसलंही स्पष्टीकरण नाही, कोणताही शेवटचा संदेश नाही. त्या आख्यायिकेवर जणू आणखी एक थर चढवला गेला. शिवाय लोकांना धक्का देणारं एक स्टॅटिस्टिक म्हणजे वेंडिंग मशीन्स ही शार्कपेक्षा धोकादायक आहेत. जेव्हा अडकलेले स्नॅक्स मशीन हलवून बाहेर काढायचा प्रयत्न केला जातो तेव्हा दरवर्षी काही जणांना किरकोळ जखमा होतात, तर क्वचित एखाद्याचा मृत्यूही ओढवतो. म्हणूनच साध्या मशीनबरोबरही शिस्तीत वागलेलं चांगलं.
समाज कसा काम करतो याचं दर्शन
वेगवेगळ्या देशांमधली वेंडिंग मशीन्स बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे तिथला समाज कसा काम करतो. जपान आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्ये वेंडिंग मशीन्स फोफावली, कारण तिथे विश्वासाची पातळी उच्च होती. हा विश्वास होता की लोक प्रामाणिकपणे पैसे देतील, मशीन्सची मोडतोड करणार नाहीत आणि त्यांची सिस्टिम अपेक्षेप्रमाणे चालेल. युरोपच्या ग्रामीण भागात जिथे मानवी सेवा कमी होत गेली तिथे वेंडिंग मशीन्सनी फारसं लक्ष न वेधता फक्त जागा भरण्याचं काम केलं. अमेरिकेतील सोय आणि तत्काळ उपलब्धता या सूत्रांभोवती उभ्या असलेल्या संस्कृतीचं प्रतिबिंब तिथल्या वेंडिंग मशीन्समध्ये पाहायला मिळतं. आशियाच्या काही भागांमध्ये या मशीन्सनी आनंद आणि उपयुक्तता यातली सीमारेषा धूसर केली. ही मशीन्स पूर्णपणे स्वीकारली जातात की गरजेपुरती वापरली जातात, यावरून सगळीकडचे समाज ऑटोमेशनबरोबर किती जुळवून घेतात ते स्पष्ट होतं.
यातही आता ग्लोबल आणि लोकल ब्रँड्समधला फरक ठळकपणे जाणवतो. कोकाकोलाचं वेंडिंग मशीन सगळीकडे सारखंच दिसतं. पण स्वित्झर्लंडमधलं मिल्क वेंडिंग मशीन किंवा जपानमधील रामन वेंडिंग मशीन मात्र तुम्हाला अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बारकाईने बघता तेव्हा ज्या प्रदेशातून तुम्ही प्रवास करताय तो समजून घ्यायला त्यांची मोठी मदत होते.
फक्त एक बटण आणि मशीनच नाही, तर बरंच काही.
वेंडिंग मशीन्सवर लेख लिहायचा असं ठरवून मी लिहायला बसलो नव्हतो. अनेकांप्रमाणेच कितीतरी वर्षं मी सुध्दा त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. जपानच्या त्या ट्रिपमध्ये मला जाणवलं की किती विचारपूर्वक ही मशीन्स बनवलेली असतात आणि स्वित्झर्लंडमध्ये फार्म टू बॉटल मिल्क मशीनसमोरच्या त्या एका शांत क्षणाने माझा वेंडिंग मशीन्सकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. एकदा का तुम्ही बारकाईने पाहू लागलात की वेंडिंग मशीन ही कोपऱ्यातली वस्तू राहत नाही, तर त्यातून आपल्याला त्या परिसरातल्या कार्यपद्धतीचं दर्शन घडतं. तिथली लोकं कशाला महत्त्व देतात, आणि फारसा गाजावाजा न करता दैनंदिन जीवनातील समस्या कशा सोडवल्या जातात हे जणू ती वेंडिंग मशीन्स सांगत असतात. तेव्हा आता पुढच्या वेळी तुम्ही पर्यटनाला जाल तेव्हा फक्त प्रसिद्ध ठिकाणंच पाहू नका, तर वेंडिंग मशीन्सकडेही लक्ष द्या. त्या मशीन्समधून काय विकलं जातं? ती कुठे ठेवली आहेत? आणि लोक त्यांचा वापर कसा करतात यावरून तुम्ही जिथे गेला आहात त्या ठिकाणाविषयी तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त माहिती नक्कीच मिळेल. आजसाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!




































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.