Published in Maharashtra Times 6th September 2026
...कारण त्यात कोणतंही अंतर पार करायचं नसतं, कुठल्याही शिखरावर पोहोचायचं नसतं, काहीतरी ‘करायचंच’ याचं प्रेशर नसतं. हा एक साधा अनुभव असतो...
जेव्हा मी पहिल्यांदा जपानला गेलो होतो, तेव्हा तिथे जाण्याआधी इतर अनेक पर्यटकांप्रमाणे मला काय काय पाहायला मिळेल याचा मी अंदाज बांधला होता. आपण सर्वांनीच जपान विशिष्ट चित्रांमधून आधी पाहिलेला असतो. चेरी ब्लॉसम, टोकियोतील शिंजुकुचे निऑन लाइट्स आणि पार्श्वभूमीवर दिसणारा माऊंट फुजी यातून जपान आपल्या ओळखीचा झालेला असतो. त्यामुळे जी ठिकाणं आपण जाण्याआधीच आपल्याला ओळखीची वाटतात, त्यात जपान येतो. पण जेव्हा तुम्ही जपानमध्ये प्रत्यक्षात उतरता तेव्हा मात्र आपण त्याबद्दल जी कल्पना केलेली असते त्यापेक्षाही अधिक वेगळी आणि जबरदस्त गोष्ट तुम्हाला जाणवते. जपानला पहिल्यांदा जाऊन आलेल्या ज्या ज्या पर्यटकांशी मी बोललोय त्या सगळ्यांना हाच अनुभव आलाय. अगदी याच शब्दांमध्ये नाही पण सगळ्यांनी हेच सांगितलं की “असं फीलींग येईल ही अपेक्षा नव्हती”. यात कुठेही निराशा नव्हती, तर त्याच्या उलट अनुभव होता. जपान तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कधीच कमी पडत नाही, तर तो त्यापेक्षा अधिक काहीतरी देतो. पण हे तो अगदी सहजपणे, तरलपणे, वेगवेगळ्या पातळ्यांवर अशा प्रकारे करतो की त्याचे फोटोज् किंवा व्हिडिओज् काढता येत नाहीत. म्हणूनच आज मला नेहमीच्या हायलाइट्सपलीकडे जाऊन जपानला युनिक बनवणाऱ्या वैशिष्ट्यांचा वेध घ्यायचाय. तिथल्या लँडमार्क्सपेक्षाही तिथली फिलॉसॉफी, अंतर्गत रचना आणि वागण्याची पद्धत या सगळ्यातून एक देश कसा काम करतो हे जाणून घ्यायचंय. जेणेकरून जपानकडे बघण्याची नवीन दृष्टी मिळेल.
शांतता आणि सामाजिक सुव्यवस्था: जपानमध्ये लँड झाल्यानंतर पहिल्यांदा जी गोष्ट जाणवते ती म्हणजे शांतता, पण तुम्हाला अपेक्षित असते तशी ती नसते. जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी एक म्हणजे टोकियो. पीक अवर्समध्ये ओसाकाची रेल्वे स्टेशन्स गर्दीने भरून वाहत असतात. शिंकान्सेन (बुलेट ट्रेन) अविश्वसनीय जलद गतीने हजारो लोकांची वाहतूक करीत असते आणि तरीही या सगळ्या धावपळीच्या अंतर्भागात एक शांतपणा भरुन राहिलेला असतो जो जाणीवपूर्वक निर्माण केलेला असतो.
तुम्ही ट्रेनमध्ये पाऊल टाकल्याटाकल्या तो जाणवतो. लोक हळू आवाजात एकमेकांशी बोलत असतात, फोन क्वचितच वाजतात कारण लोक जाणीवपूर्वक आपले फोन सायलेंट मोडवर ठेवतात. जर कोणी बोललंच तर अगदी थोडक्यात, संयमाने आणि आजूबाजूच्या परिस्थितीचं भान ठेवून बोलतात. लोकांनी असंच वागावं यासाठी कुठेही पाट्यांचा भडिमार नाही, तरीही लोक आपणहून, समजून नीट वागतात. इथेच जपानचं वेगळेपण जाणवायला लागतं. या अशा वागण्याचं मूळ सापडतं ते ‘मा’ या सांस्कृतिक संकल्पनेमध्ये. ‘मा’ चा अर्थ ‘विराम’ किंवा ‘स्पेस’ असा होऊ शकतो. यामागे ‘तुम्ही काय करता या इतकंच काय करत नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे’ ही संकल्पना आहे.
याच्याशी सुसंबद्ध अशी दुसरी संकल्पना म्हणजे ‘वा’ किंवा ‘हार्मनी‘. जपानी समाजात समूहातील बॅलन्स टिकवण्यावर विशेष भर दिला जातो. यासाठी लोक स्वतःच्या वैयक्तिक सवयी बदलतात. सार्वजनिक ठिकाणी तुमच्या कृतींचा इतरांवर काय परिणाम होऊ शकतो याचं भान बाळगलं जातं.
जपानमध्ये शांतता लोकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. इथे सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या वागण्यावर प्रत्यक्ष नियंत्रण किंवा देखरेख नसते, पण तरीही इथल्या सिस्टीम्स लक्षणीय पद्धतीने काम करीत असतात. लोक आपणहून रांगेत उभे राहतात. ट्रेन्स केवळ इंजिनियरिंगच्या कौशल्यामुळे वेळेवर नसतात, तर प्रवासीही त्यांचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करतात, म्हणून त्या वेळेवर असतात. सगळं काही ऑर्गनाइज्डली चालण्यासाठी तिथे सामाजिक विश्वासार्हतेचा एक दर्जा राखलेला पाहायला मिळतो.
पहिल्यांदा हे माझ्यासाठी अगदीच अनोळखी वातावरण होतं. आपण अशा वातावरणातून आलो आहोत जे अतिशय व्हायब्रंट, बोलकं आणि उर्जेनं भरलेलं असतं. सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा जणू धबधबाच वाहत असतो. मार्केट्स गजबजलेली असतात, ट्रेन्समधलं वातावरण खेळीमेळीचं असतं आणि मुव्हिंग ट्रॅफिक असतं. त्या सगळ्या केऑसमध्येही एक आपलेपणा असतो. मात्र याचा दुसरा अर्थ हा की आपल्या वावरण्याचा अवतीभवतीच्या लोकांवर काय परिणाम होतो याबद्दल आपण अजिबात जागरूक नसतो. जपानमध्ये मात्र लोक याबद्दल जागरूक असतात. सुरुवातीला हे जरा बंधनकारक वाटतं, पण मग तुम्ही अचानक तुमच्या आवाजाच्या पट्टीबाबत, तुमच्या हालचालींबाबत, एका जागी तुम्ही किती वेळ आणि कसे उभे राहता याबाबत कॉन्शस होऊन जाता आणि तिथल्या व्यवस्थेच्या विरुद्ध न जाता तुम्ही त्या प्रवाहाचा एक भाग बनता. त्या शांततेचं, तिथल्या यत्रंणांचं आणि त्यामुळे सहजपणे होणाऱ्या अवतीभवतीच्या व्यवहारांचं कौतुक करू लागता. आणि मग जेव्हा तुम्ही घरी परतता तेव्हा हीच गोष्ट तुमच्यासोबत घेऊन येता, कारण समाज म्हणून वेगळ्या पद्धतीनं कसं काम करता येतं ते तुम्हाला कळलेलं असतं.
नॅशनल डिझाईन प्रिन्सिपल: संस्कृती आणि वर्तनापेक्षाही जपानची खरी ओळख म्हणजे तिथे सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज्डली काम करतात. जणू काही तुमच्या दैनंदिन आयुष्यासाठीच त्यांची इतक्या काटेकोरपणे रचना झाली असावी. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जपानची व्हेंडिंग मशीन्स संस्कृती. सगळ्या देशभरात मिळून तिथे सुमारे 55 लाख व्हेंडिंग मशीन्स आहेत. ही व्हेंडिंग मशीन्स तुम्हाला शांत रस्त्यांवर, एखाद्या खेडेगावाच्या मध्यभागी, हाइकिंग ट्रेलवर आणि काही वेळा तर जिथे शेकडो मीटर्सच्या परिसरात अन्य काहीच नसतं अशा ठिकाणीही आढळतात. तुम्हाला एकाच मशीनमधून गरम कॉफी आणि कोल्ड टी मिळेल, ज्याचं तापमान अगदी परफेक्ट असतं. ताजी अंडी, छत्र्या, फुलं, नेक टाय, स्नॅक्स, संपूर्ण जेवण असं बरंच काही त्यातून मिळतं आणि सर्वात लक्षणीय भाग म्हणजे ही सगळी मशीन्स तुमच्या अपेक्षेनुसारच काम करतात, त्यात चूक होत नाही. आणि मग तुमच्या लक्षात येतं की या सगळ्यातून जपानचा सोयी-सुविधांकडे बघण्याचा दृष्टीकोनच प्रतीत होतोय. त्यामागचं तत्त्वज्ञान अगदी साधं आहे. ज्या गोष्टींची गरज भासू शकते त्या तात्काळ, खात्रीशीरपणे आणि सहजगत्या उपलब्ध असायलाच हव्यात. प्राथमिक गरजा भागवण्यासाठी फार मोठा खटाटोप करण्याची वेळच येता कामा नये. एकदा का हे तत्त्वज्ञान तुमच्या लक्षात आलं की मग ते अगदी सगळीकडे दिसू लागतं. जपानी ट्रेन्सचंच उदाहरण घ्या. त्या अतिशय काटेकोरपणे धावतात. अगदी एका मिनिटाचा उशीर झाला तरी त्याची दखल घेतली जाते आणि त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली जाते. प्लॅटफॉर्मवरती अगदी स्पष्ट खुणा असतात, माणसं शिस्तीत गाडीत चढतात आणि जिथे गाडीचे दरवाजे उघडतील तिथेच उभी राहतात.
त्याचप्रमाणे जपानची ‘कोनबिनी’ म्हणजे कन्व्हिनियन्स स्टोअर्स आहेत. जिथे तुम्ही जेवण घेऊ शकता, कॅश काढू शकता, बिल्स भरू शकता, पॅकेजेस कुरिअर करू शकता आणि अगदी कागदपत्रांचे प्रिंट आऊट्सही घेऊ शकता. इथल्या शहरांमधील साईन बोर्डस्सुद्धा अगदी सहजपणे कळतील असे सुस्पस्ष्ट असतात. त्यांची रचना अशी असते की जे पाहून पहिल्यांदाच आलेल्या व्यक्तीलाही त्याचं ठिकाण एकट्याने सहज सापडू शकेल.
इथल्या सगळ्या यंत्रणा अचूकपणे चालत असल्याने इथला प्रवास अगदी विनात्रासाचा होऊन जातो. तुमचा शोधाशोध करण्यात, समजून घेण्यात वेळ कमी जातो आणि तुम्ही पूर्णपणे तिथल्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. जपानचं डिझाईनच मुळी दैनंदिन आयुष्यातील अडचणी दूर होतील असं करण्यात आलेलं आहे.
फॉरेस्ट बाथिंग: अनेक देशांमध्ये शहरापासून सुटका म्हणून, एक ब्रेक म्हणून, कामातून सुट्टी म्हणून नाहीतर रोमांचक आऊटिंगचा अनुभव म्हणून निसर्गाकडे बघितलं जातं. जपानमध्ये निसर्ग म्हणजे हे सगळं तर आहेच, पण त्याबरोबरच एक उपचारपद्धती म्हणूनही निसर्गाला महत्त्व आहे. यातूनच ‘शिनरिन योकु’ अर्थात ‘फॉरेस्ट बाथिंग’ ही संकल्पना उगम पावली. या मान्यताप्राप्त वेलनेस उपचार पद्धतीची बीजं अगदी साध्या कल्पनेत रुजलेली आहेत, ती म्हणजे वनात-जंगलात निवांतपणे आणि एकाग्रपणे घालवलेला वेळ तुमच्या तनामनाला अतिशय लाभदायक असतो. शिनरिन योकुची भुरळ सगळ्यांना पडते, कारण त्यात कोणतंही अंतर पार करायचं नसतं, कुठल्याही शिखरावर पोहोचायचं नसतं, काहीतरी ‘करायचंच’ याचं प्रेशर नसतं. हा एक साधा अनुभव असतो. संथपणे चाला, दीर्घश्वसन करा आणि तुमच्या अवतीभवती जे दिसतंय त्यावर लक्ष केंद्रित करा. सिडारच्या झाडांचा गंध, पानांची सळसळ, खोडाचं टेक्श्चर, पाण्याचा नाद, झाडांमधून पाझरणारा प्रकाश या सगळ्याचा परिणाम फक्त अनुभवायचा. यातला सर्वात विशेष भाग म्हणजे जपानने ही फक्त एक तात्त्विक कल्पना म्हणून सोडून दिली नाही, तर त्याला एक सुनियंत्रित, शिस्तबद्ध रूप दिलं. 1982 मध्ये जपानच्या शासनातर्फे सार्वजनिक आरोग्यविषयक उपक्रम म्हणून ‘शिनरिन योकु’ अधिकृतपणे राबवण्यात आलं आणि त्यामुळेच आता जपानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ‘फॉरेस्ट थेरपी रोड्स’ म्हणून राखून ठेवलेले रस्ते पाहायला मिळतात. हे खास राखलेले मार्ग लोकांना जरा संथावण्यासाठी आणि नैसर्गिक वातावरणाशी एकरूप होण्यासाठी जाणीवपूर्वक तयार करण्यात आले आहेत. याचं सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखं उदाहरण म्हणजे याकुशिमा आयलंड. प्राचीन सिडार वृक्षांचे दाट अरण्य, धुकं, शेवाळं आणि शांतता यामुळे ही जागा पर्यटनस्थळ न वाटता उलट वेगळ्याच काळातील गूढरम्य ठिकाण वाटतं. इथल्या काही झाडांचं वय 2000 वर्षांपेक्षाही अधिक असल्याचं मानलं जातं.
निसर्गाशी असलेल्या याच नात्याचा एक वेगळा पैलू जपानी आल्प्समध्ये पाहायला मिळतो. अल्पाइन निसर्ग, अरण्याने झाकलेले रस्ते, गरम पाण्याच्या कुंडांची शहरं आणि वातावरणातील ती धिमी गती, ज्यामुळे तुम्ही आपोआप घाई न करता भवताल निरखून पाहू लागता. एकेकाळी क्योटो आणि इडो यांना जोडणाऱ्या प्राचीन नकासेंदो ट्रेलसारख्या रस्त्यांवरही निसर्गातून सजगतेनं प्रवास करण्याची भावना जपलेली पाहायला मिळते.
भारतामध्ये निसर्गाबरोबरचा आपला अनुभव हा नेहमी तीर्थयात्रा, स्थलदर्शन, कौटुंबिक सहली किंवा साहसी मोहिमांशी जोडलेला असतो. आपण हिल स्टेशन्स, नॅशनल पार्क्स, सागरकिनारे, पहाडी भाग इथे जातो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी बघायचं असतं, कुठेतरी पोहोचायचं असतं किंवा एखादी गोष्ट पूर्ण करायची असते, पण शिनरिन योकुमध्ये जपान आपल्यासमोर एक वेगळा पर्याय ठेवतो आणि तीच जपानकडून आवर्जून घ्यावी अशी, पण सर्वात कमी महत्त्व दिली गेलेली शिकवण आहे. गतिमानता, अचूकता आणि कार्यक्षमता यासाठी जगात ओळखल्या जाणाऱ्या या देशाकडून, त्याच्या बरोब्बर उलट जे शिकायला मिळतं, ते अधिकच प्रभावी वाटतं.
प्रावीण्याचं तत्त्वज्ञान: जपानमध्ये 100 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले 5000 हून अधिक व्यवसाय आहेत. यातले बरेचसे हे कुटुंब चालवत असलेले लघू उद्योग आहेत. त्यात रेस्टॉरंट्सचं प्रमाण लक्षणीय आहे. यातली सर्वात उल्लेखनीय बाब ही त्यांचं वय नसून त्यांची सातत्यपूर्ण गुणवत्ता आहे. क्योटोसारख्या शहरांमध्ये गेली 300-400 वर्षं सातत्याने एकाच प्रकारचे पदार्थ जराही बदल न करता सर्व्ह करणारी रेस्टॉरंट्स आहेत. ते आपला मेन्यू ठराविक काळाने बदलत नाहीत. ते स्वतःच्या उपहारगृहाची चेन निर्माण करीत नाहीत. त्या ऐवजी ते एकच गोष्ट उत्कृष्टपणे करण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि पिढ्यानपिढ्या तेच करीत राहतात. त्यामागे एक शिस्त आहे.
जगात सगळीकडे व्यवसाय हे वाढवण्यासाठीच उभे राहतात. व्यवसायाची वाढ ही त्याचा वाढता आवाका, प्रमाण, उत्पन्न आणि विस्तार यावर मोजली जाते. जपानची मात्र विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे. यात वाढीइतकंच, कधी कधी त्याहीपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं ते सातत्याला. या विचारसरणीचा उगम आहे तो ‘मोनोझुकुरी’ या तत्त्वज्ञानामध्ये. ‘वस्तू बनवण्याची कला’ असा त्याचा जो अनुवाद केला जातो तो प्रत्यक्षात या संकल्पनेला पूर्ण न्याय देऊ शकत नाही, कारण ही संकल्पना फक्त काहीतरी बनवण्यापुरती मर्यादित नाही, तर त्यात ती गोष्ट अतिशय काळजीपूर्वक, अचूकपणे आणि त्या गोष्टीचा आत्मा समजून बनवणं अभिप्रेत आहे. याच्याशी मिळतीजुळती कल्पना म्हणजे ‘शोकुनिन’ म्हणजे आपल्या कामात अतिशय कुशल असलेले कारागीर. ही अशी व्यक्ती असते जिच्यासाठी तिचं काम म्हणजे आयुष्यभर केलेला सुधारणांचा पाठपुरावा असतं. एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवणं हे मुळी ध्येय नसतंच, तर दररोज त्यात सातत्याने थोडी थोडी सुधारणा करणं हे ध्येय असतं. या विचारसरणीचं अतिशय सुंदर दर्शन घडतं ते जपानी खाद्यपदार्थांमध्ये. उदाहरण द्यायचं तर ‘कायसेकि’ या जपानमधल्या मल्टी कोर्स जेवणाचं देता येईल. वर वर पाहता तो फक्त पदार्थांचा एक क्रम वाटतो, पण प्रत्यक्षात मात्र, त्यात ऋतुमानानुसार मिळणारे पदार्थ, चवींचं संतुलन आणि योग्य वेळी योग्य पदार्थ देणं या सगळ्याचा काळजीपूर्वक ताळमेळ घातलेला असतो. यातला प्रत्येक घटक हा त्याच्या दर्जाच्या अत्युच्च स्तरावर असताना निवडण्यात येतो. प्रत्येक डिश देण्यामागे काहीतरी योजना असते. शतकांच्या परंपरेतून निर्माण झालेली एक लय या जेवणाला लाभलेली असते.
हे सगळे व्यवसाय पिढ्यानपिढ्या कसे चालत आले हे समजून घेणं सुद्धा रंजक आहे. व्यवसायाची मालकी कुंटुंबातच पुढे दिली जाते, पण ती आपोआप, वारसाहक्काने मिळत नाही. पुढच्या पिढीला त्यासाठी व्यवसाय शिकावा लागतो, त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि स्वतःला सिद्ध करावं लागतं, तरच तो मिळतो. काही वेळा जर योग्य वारस नसेल तर कौशल्याची परंपरा टिकवण्यासाठी कुटुंबात मूल दत्तक घेतलं जातं. केवळ नाव टिकवण्याला प्राधान्य न देता कामाची गुणवत्ता अबाधित राखण्यावर अधिक भर दिला जातो.
आज जेव्हा आम्ही आमची ऑर्गनायझेशन वाढवत आहोत तेव्हा ही संकल्पना जणू आमचं मिशन ठरली आहे. आमची महत्त्वाकांक्षा केवळ एक यशस्वी ट्रॅव्हल कंपनी उभारण्याची नाही, तर काळाच्या कसोटीवर टिकून राहील असं काहीतरी उभारण्याची आहे. एक अशी कंपनी जिची विश्वासार्हता फक्त आजच नाही, तर पुढच्या अनेक वर्षांमध्ये, दशकांमध्ये टिकून राहील. कारण शेवटी, क्योटोमधील शेकडो वर्षं पुरातन रेस्टॉरंट असो किंवा जगभरातल्या पर्यटकांना सेवा देणारी ट्रॅव्हल कंपनी असो, त्यांच्या यशाचं मोजमाप हे त्यांचा आकार किती मोठा आहे यावरून करता येत नाही, तर ते वर्षानुवर्षं किती सातत्याने दर्जेदार सेवा देतात यावर अवलंबून असतं. याच गोष्टीमुळे एखाद्या व्यवसायाचं रुपांतर संस्थेमध्ये होतं आणि याचं व्यावहारिक दर्शन जपानपेक्षा अधिक चांगलं अन्यत्र कुठेही घडत नाही.
जपान इतका वेगळा का वाटतो?: काही दिवस जपानमध्ये काढल्यानंतर एक पॅटर्न तयार होताना दिसतो. शांत ट्रेन्स, वेल ऑर्गनाईज्ड सिस्टीम, अरण्ये आणि अनेक शतकांपासून चालत आलेली रेस्टॉरंट्स यातली प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे लक्ष वेधून घेते, पण एकत्रितपणे पाहिलं तर या सगळ्या गोष्टी विचार करण्याच्या समान पद्धतीकडे निर्देश करतात.
शांततेमधून आदर व्यक्त होतो, कार्यक्षमतेमुळे अडचणी कमी होतात, निसर्गाशी नातं जोडलं की बॅलन्स साधला जातो, दीर्घकाळ चालणाऱ्या व्यवसायांमुळे प्रभुत्व मिळवण्याबाबतची खोल बांधिलकी दिसून येते आणि यामुळेच हा अनुभव अतिशय संस्मरणीय होतो. हजारो लहानलहान, पण काळजीपूर्वक साकारलेल्या तपशीलांमधून जपान आपल्याला प्रभावित करतो आणि त्यामुळेच जपानच्या प्रत्येक भेटीत तो मला थक्क करून सोडतो. अरिगातो गोझायमसु. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!






































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.