We Just Opened 3 New Branches!
We're Open, now in Vadodara, Kochi & Nungambakkam (Chennai).
India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

वर्षातील एकमेव संधी

12 mins. read
Marketing .
Marketing .
12 Mins Read
August 07, 2026
August 07, 2026

Quick Summary

लोसारच्या पूर्वसंध्येला वर्षातून एकदाच तयार होणारा तिबेटियन नूडल सूप गुथुक जरूर चाखा.

गुथुकच्या प्रत्येक बोलमध्ये मीठ, मिरची, कोळसा, लोकर किंवा कागद यांसारखी लपलेली वस्तू असते.

तुमच्या वाट्याला कोणती वस्तू आली त्यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भाग्याचे प्रतीक मानले जाते.

गुथुकसोबत ग्युतोर रात्रीची तयारी आणि कुटुंबीयांसोबतचा एकत्रित आस्वाद हा अनुभव खास बनवतो.

जेवणानंतर ल्यू नावाची पिठाची बाहुली तयार करून ती घराबाहेर फेकल्याने नकारात्मकता दूर होते अशी श्रद्धा आहे.

मार्डी ग्रा काळात न्यू ऑर्लिन्समध्ये किंग केक वर्षातून एकदाच खाल्ला जातो आणि त्यात लहान मूर्ती लपवलेली असते.

Published in Maharashtra Times 9th August 2026

...त्या उकळणाऱ्या भांड्यातले तांदूळ आणि दूध वर येऊनबाहेर सांडल्याबरोबर जमलेल्या लोकांचा एकच जल्लोषऐकू येतो, ‌‘पोंगलो पोंगल‌’...

मध्यंतरी पॉडकास्टच्या एका भागासाठी रिसर्च करीत असताना मी अचानकपणे एका वेगळ्या विषयाकडे आकर्षित झालो. माझ्या रिसर्चचा विषय होता ‌‘लोसार‌’ म्हणजे तिबेटियन नववर्षोत्सव. याबद्दल वाचताना, काही व्हिडिओ बघताना, त्याच्या सेलिब्रेशनमधील एका गोष्टीकडे माझं लक्ष चटकन वेधलं गेलं, ती म्हणजे नूडल्सचा बाऊल. याला तिबेटियन भाषेत ‌‘गुथुक‌’ म्हणतात. हे एक साधंसं, चवदार नूडल सूप आहे. पहाडांमधल्या थंडगार संध्याकाळी ज्याची हमखास आठवण येईल असं सूप. पण गुथुक त्यापेक्षा काहीतरी अधिक आहे. हा पदार्थ वर्षातून एकदाच आणि तोही लोसारच्या पूर्वसंध्येला तयार करून खातात. त्यामुळे तो फक्त जेवणाचा भाग बनत नाही, तर येणाऱ्या नववर्षाची खूणही बनतो.

आणि इथेच माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला. आज आपण कोणताही पदार्थ मनात आलं की ऑर्डर करून मागवू शकतो. मग अशा पदार्थांचं काय जे एखाद्या विशिष्ट दिवशी, खास क्षणांसाठी बनवले जातात आणि ज्यांची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात? तर मग आज आपण जगभरातल्या अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया. असे पदार्थ, जे फेस्टिव्हल्स, आणि परंपरांशी बांधलेले आहेत आणि म्हणून ते वर्षातून फक्त एकदाच तयार केले जातात. कारण काही वेळा विपुलतेपेक्षा दुर्मिळतेमुळे एखाद्या अनुभवाला अधिक अर्थ मिळतो.

गुथुकची रात्र

लोसारच्या पूर्वसंध्येला, तिबेटियन कॅलेंडरप्रमाणे वर्ष संपत आलेलं असताना, तिथल्या घराघरांमध्ये ‌‘ग्युतोर‌’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रात्रीची तयारी सुरू असते. हा फक्त सेलिब्रेशनचा काळ नसतो, तर यावेळी शुद्धीकरण केलं जातं. वर्षातल्या फक्त या रात्रीच गुथुक तयार केला जातो आणि जेवण्यासाठी एकत्र आलेल्या कुटुंबियांसमवेत त्याचा आस्वाद घेतला जातो. या कारणाने हा पदार्थ फक्त प्रतीकात्मक न राहता तो कुटुंबियांना जोडणारा ठरतो. स्वयंपाकघरातली तयारी शांतपणे सुरू असते, पण जेवणाचं टेबल मात्र गप्पा, कुतूहल आणि काही वेगळ्या अपेक्षांनी भरून जातं. गुथुक हे मुळात एक नूडल सूप आहे, पण त्याच्या प्रत्येक बोलमध्ये टाकल्या जाणाऱ्या पिठाच्या लहान लहान गोळ्यांमुळे त्याला जणू खास अर्थ प्राप्त होतो. त्या प्रत्येक गोळ्याच्या आत एक वस्तू किंवा पदार्थ लपलेला असतो. मीठ, मिरची, कोळसा, लोकर आणि काहीवेळा कागद सुद्धा. या प्रत्येकाला एक अर्थ असतो आणि तो ती गोष्ट चावल्यावरच लक्षात येतो. ज्या व्यक्तीला जो पदार्थ येईल, तो जणू त्या व्यक्तीच्या भाग्याचं, भविष्याचं प्रतीक मानला जातो. जेवण जसजसं पुढे सरकतं, तसतसं तिथे असलेल्या व्यक्तींचे स्वभाव समोर येऊ लागतात. ज्याला सूपमधल्या गोळ्यात मीठ आलंय ती व्यक्ती दयाळू ठरते, तर ज्याला मिरची आली आहे, तो तिखट जिभेचा ठरतो. लोकर मिळालेला सौम्य स्वभावाचा आणि ज्याच्या वाट्याला कोळसा आलेला असतो, त्याच्याकडे बघताना सगळ्यांना हसू फुटतं, कारण अशा व्यक्तीचा स्वभाव जरा खट्याळपणाची सीमा ओलांडणारा असल्याचं मानतात. मग जेवणाचं टेबल हे एकमेकांना चिडवण्याची आणि प्रत्येकाच्या वागण्याचे किस्से सांगण्याची जागा बनते. टेबलावरच्या पदार्थांमधून एकमेकांचे फक्त स्वभावच दिसत नाहीत, तर एकमेकांमधील नात्याचे बंधही घट्ट होतात. पण हा कार्यक्रम जेवणाबरोबर संपत नाही. सूपचे बोल उचलले की मग मूड पुन्हा बदलतो. नंतर ‌‘ल्यू‌’ नावाने ओळखली जाणारी एक पिठाची बाहुली तयार केली जाते. ही बाहुली मागील वर्षातील घटनांचं ओझं, नकारात्मकता, दुर्दैव प्रतिकात्मकपणे शोषून घेते असं मानलं जातं. मग ही बाहुली घराबाहेर नेऊन फेकून दिली जाते आणि तसं करताना वाईट नशिबाचा काही भाग मागे रेंगाळू नये म्हणून जोरजोरात आवाज केला जातो. खरंतर ही कृती जराही लक्ष वेधणारी नाही, पण त्यामागचा अर्थ महत्त्वाचा आहे. नवीन सुरुवात करताना मागचं सगळं मागे ठेवून पुढे जायला हवं, हेच यातून अधोरेखित होतं.

जेव्हा अन्नच भाग्य ठरतं...

केवळ वर्षातून एकदाच खाल्ला जातो म्हणून गुथुक विशेष ठरत नाही, तर हा पदार्थ साध्या जेवणाचं रुपांतर एका संस्मरणीय अनुभवात करतो. प्रत्येक घासात एखादा गमतीशीर, प्रतीकात्मक किंवा शुभ संदेश दडलेला असू शकतो ही कल्पनाच विलक्षण आहे. ही संकल्पना इतर संस्कृतींमध्येही पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी तिचं रूप वेगळं असलं तरी त्यातलं साम्य लक्षणीय असतं.

युनायटेड स्टेट्समधील ‌‘न्यू ऑर्लिन्स‌’मध्ये ‌‘किंग केक‌’ हा वर्षातून फक्त एकदाच ‌‘मार्डी ग्रा‌’ सणाच्या काळात पाहायला मिळतो. उत्सवाचे प्रतीक असलेल्या या रंगीबेरंगी केकमध्ये एक लहानशी मूर्ती लपवलेली असते, जी परंपरेनुसार बाळाचं प्रतीक मानली जाते. ज्या कोणाला या मूर्ती असलेला केकचा भाग येतो, तो अतिशय आनंदाने त्याचं स्वागत करतो आणि ती मूर्ती सापडण्यामागच्या परंपरेचा स्वीकारही करतो. ज्याला ती मूर्ती मिळाली आहे, त्याने पुढच्या वर्षी या सणाचा समारंभ त्याच्याकडे साजरा करायचा असतो. ही एकप्रकारे सणाची परंपरा पुढे नेण्याची युक्तीच असते. गुथुकप्रमाणेच इथे तो केक म्हणजे केवळ एक गोड पदार्थ राहत नाही, तर तो एक सामाजिक करारच होतो.

दुसरीकडे ग्रीसमध्ये याच प्रकारची परंपरा ‌‘वासिलोपिता‌’ या नवीन वर्षानिमित्त बनवण्यात येण्याऱ्या केकमधून पाहायला मिळते. या केकमध्ये एक नाणं लपवलेलं असतं. केक कापल्यानंतर त्याचे तुकडे सगळ्या कुटुंबियांना दिले जातात. उपस्थित नसलेल्यांचाही तुकडा ठेवला जातो. मग ज्याच्या तुकड्यामध्ये ते नाणं सापडतं, त्या व्यक्तीला पुढचं वर्ष अतिशय लाभदायी जाईल असं मानलं जातं.

भौगोलिक जवळीक असल्याने या परंपरा एकसारख्या झालेल्या नाहीत, तर त्यामागे एकसारखी मानवी प्रवृत्ती आहे. जेवणाच्या साध्याशा कृतीला अर्थ मिळवून देणं, त्या क्षणाचं रुपांतर भविष्याच्या भाकितात, चिंतनात करणं हे जगाच्या पाठीवर सगळीकडे सारखंच आहे. एकापरीने अशी जेवणं आपल्याला आठवण करुन देतात की अन्न हे फक्त पोट भरण्याचं साधन नाही, तर त्याच्या माध्यमातून संस्कृती कधी विनोदातून आपल्या श्रद्धा व्यक्त करते, आपले एकमेकांशी असलेले संबंध दृढ होतात, तर कधीकधी अगदी खेळकरपणे भविष्याची चाहूलही घेतली जाते.

जेव्हा पदार्थांमधून इतिहास जपला जातो...

वर्षातून फक्त एकदाच केल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी काही पदार्थ असेही असतात ज्यांच्यात इतिहास सामावलेला असतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या, कोणत्याही पुस्तकात नसलेल्या पण स्वयंपाकघरात जन्मलेल्या कहाण्या या पदार्थांच्या माध्यमातून जिवंत होतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे चायनामधील ‌‘मिड ऑटम फेस्टिव्हल‌’साठी बनवण्यात येणारा ‌‘मून केक‌’. आज तो कुटुंबाच्या रियुनियनचं प्रतीक ठरला आहे. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात सगळे कुटुंबीय एकत्र येतात, हा केक कापतात. हा वर्तुळाकार केक पूर्णत्वाचं आणि एकोप्याचं प्रतीक मानला जातो. या वरकरणी हळुवार वाटणाऱ्या परंपरेची पार्श्वभूमी मात्र वादळी आहे. असं म्हणतात की युआन राजवटीच्या काळात मंगोल शासनाविरुद्ध बंडखोरांना एकत्र करण्यासाठी मूनकेकमध्ये गुप्त संदेश लपवून प्रसारित केले जायचे. म्हणजे आज फेस्टिव्हलमध्ये टेबलावर दिसणाऱ्या या केकने कधीकाळी बंडाच्या उर्मीला हवा दिली होती. परिवर्तनाची लाट उसळवली होती.

जगाच्या दुसऱ्या भागात ‌‘हॉट क्रॉस बन‌’ हा पदार्थ फक्त गुड फ्रायडेच्या दिवशीच दिसतो. त्यावरील क्रॉसच्या आकाराची साधी खूण त्याला ख्रिश्चन धर्मातील क्रुसिफिकेशन आणि रिमेब्रन्सशी घट्टपणे जोडते. शतकानुशतके हे बन्स याच दिवशी तयार केले जातात आणि वाटले जातात. काळ बदलला, भोवतालचं जग बदललं, पण या बन्सची प्रतीकात्मकता कायम आहे. गुड फ्रायडेच्या दिवशी बनवलेले हे बन्स कधी खराब होत नाहीत. त्यांना जणू संरक्षक कवच असते, अशी जुनी समजूत आहे. पण या अंधश्रद्धेच्याही पलीकडे महत्त्वाचं काय आहे? तर वर्षानुवर्षे ही परंपरा जपण्यातलं सातत्य. हे पदार्थ आपल्याला हेच सांगतात की अन्न फक्त काळाशी जोडलेलं नसतं, तर त्या काळातल्या आठवणींशीही जोडलेलं असतं.

काळाची नोंद ठेवणारे पदार्थ

काही पदार्थ नशिबाचा संदेश घेऊन येतात, तर काही पदार्थ इतिहासातील चवींचं जतन करतात, पण काही पदार्थ मात्र काळाच्या प्रवाहाची निःशब्द नोंद ठेवणारे असतात. ते विशिष्ट ऋतूंसोबत येतात, सूर्यप्रकाशातील बदलाची चाहूल देतात, किंवा ते दिवसातल्या अशा एखाद्या क्षणाशी जोडलेले असतात, जो क्षण पुन्हा तसाच अनुभवता येत नाही. म्हणूनच हे पदार्थ म्हणजे केवळ जेवण नसतं,तर ते काळाचे संकेत असतात. ते वर्ष पुढे सरकत असल्याची, नवीन पर्व सुरू झाल्याची किंवा एखाद्या सुंदर अध्यायाची सांगता झाल्याची अलगद जाणीव करून देतात.

भारतामध्ये ही गोष्ट ठळकपणे सांगण्याचं काम ‌‘पोंगल‌’ हा सण करतो. याच नावाने साजऱ्या होणाऱ्या कापणीच्या उत्सवादरम्यान पारंपरिक पद्धतीने, सूर्योदयाच्या वेळेला, घराच्या अंगणात मातीच्या भांड्यात हा पदार्थ तयार केला जातो आणि जाणीवपूर्वक तो उतू जाऊ दिला जातो. त्या उकळणाऱ्या भांड्यातले तांदूळ आणि दूध वर येऊन बाहेर सांडल्याबरोबर जमलेल्या लोकांचा एकच जल्लोष ऐकू येतो, ‌‘पोंगलो पोंगल‌’. समृद्धी, भरभराट आणि कृतज्ञतेचा तो उस्फूर्त आविष्कार असतो. पोंगल शिजवण्याची कृतीही याचा अविभाज्य हिस्सा असते. केवळ पोंगल खाणं इतकाच उद्देश नसतो, तर सूर्याच्या पहिल्या किरणांबरोबर त्याचा जन्म होताना अनुभवणं अधिक महत्त्वाचं असतं.

याच काळाच्या ऱ्हिदमचा एक वेगळाच अनुभव रमजानच्या महिन्यात पाहायला मिळतो. भारतातल्या अनेक शहरांमध्ये या दिवसांत ‌‘हलीम‌’चा दरवळ प्रत्येक संध्याकाळी वातावरण व्यापून टाकतो. कधी अनेक तास, तर काहीवेळा रात्रभर मंद आचेवर शिजत ठेवलेला हा पदार्थ बरोबर संध्याकाळी रोजा सोडण्याच्या वेळी तयार होतो. दिवसभराच्या उपवासानंतर त्या पहिल्या घासाची प्रतीक्षा इतकी तीव्र असते की तो केवळ भूक भागवत नाही, तर मनालाही विलक्षण समाधान देऊन जातो. रमजान नसतानाही हलीम खातात, पण रमजानच्या संध्याकाळी तो ज्या क्षणाचा हिस्सा असतो, तो क्षण पुन्हा अनुभवता येत नाही.

जपानमध्ये नववर्षाचं स्वागत ‌‘ओसेची र्योरी‌’ या पारंपरिक पदार्थांच्या देखण्या मेजवानीने केलं जातं. नववर्षाच्या आधीच काळजीपूर्वक तयार केलेल्या या पदार्थातील प्रत्येक घटकाचा एक प्रतीकात्मक अर्थ असतो. या डिशमधले पदार्थ आधीच तयार केले जातात आणि नवीन वर्ष सुरू झाल्यावर पहिले काही दिवस ते खाल्ले जातात. कारण त्या काळात स्वयंपाकालाही विश्रांती देऊन नववर्षाच्या आगमनाचा सन्मान करण्याची परंपरा आहे. समृद्धीचं प्रतीक असलेल्या गोड चेस्टनट्सपासून ते आरोग्याचं प्रतीक असलेल्या ब्लॅक बीन्सपर्यंतचा प्रत्येक घटक हा जणू येणाऱ्या वर्षासाठी आशा आकांक्षा आणि नव्या सुरुवातीची एक सुंदर कथा उलगडतो.

या सगळ्या पदार्थांना जोडणारा दुवा म्हणजे त्यांचं काळाशी असलेलं घट्ट नातं. हे नातं ॲबस्ट्रॅक्ट नसतं, तर ते प्रत्यक्ष अनुभवता येतं. हे पदार्थ सूर्योदय आणि सूर्यास्त, सुगी आणि उपास, आरंभ आणि अंत यांच्याशी जोडलेले आहेत. ते आपल्याला जाणीव करुन देतात की अगदी पुरातन काळापासून अन्न हे फक्त भूक भागवण्याचं साधन नाहीये, तर काळाचा प्रवास समजून घेण्याचं, जीवनातील टप्पे साजरे करण्याचं आणि काळाचं भान देणारं माध्यम आहे.

हरवत चाललेली, वाट पाहण्याची ताकद

एकेकाळी वर्षातून एकदाच तयार होणारे हे पदार्थ आजच्या खाद्यसंस्कृतीसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करतात. आज आपण अशा काळात जगतोय जिथे वाट बघण्याची जागा उपलब्धतेनं घेतली आहे. फक्त विशिष्ट ऋतूतच मिळणारे पदार्थ आता वर्षभर उपलब्ध असतात. पूर्वी जे पदार्थ फक्त ठराविक ठिकाणी, ठराविक काळातच मिळायचे, ते आता मागणीप्रमाणे कुठेही तयार केले जातात, मागवता येतात. या सुविधांमुळे आपली निवड अधिक विस्तारली आहे, पण त्याचबरोबर एखाद्या पदार्थाचं औत्सुक्य आणि त्या त्या क्षणाचं वेगळेपणही विरळ झालं आहे.

असे विशिष्ट दिवसाशी, वेळेशी जोडलेले पदार्थ, आपल्याला एक न दिसणारी अमूल्य गोष्ट देतात, ती म्हणजे विराम! ते वर्षाच्या प्रवाहाला एक सुंदर लय देतात. आतुरतेने वाट पाहण्यासाठी एक क्षण देतात. या पदार्थांचा पहिला घास म्हणजे फक्त स्वाद नसतो, तर त्यामागच्या अनेक आठवणी, आपलेपणा आणि त्यातील सातत्य महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला फक्त त्या पदार्थाचीच आठवण होत नाही, तर गेल्या वर्षी, त्या आधीच्याही वर्षी आपण कुठे होतो, कोणासोबत होतो याचीही आठवण होते. त्यामुळे साहजिकच अन्न हे फक्त पोषणाची गोष्ट राहत नाही, तर ते आठवणी जपण्याचं, काळाशी नातं जोडण्याचं एक सुंदर माध्यम बनतं.

फक्त ठिकाणांचाच नाही, तर काळाचाही प्रवास

ही संकल्पना पर्यटकांना जगाकडे बघण्याची नवीन दृष्टी मिळवून देते. आपण सहसा आपल्या टूरचं प्लॅनिंग करताना देश, शहरं, तिथली महत्त्वाची ठिकाणं यांचाच विचार करतो, पण विशिष्ट क्षणांचा, दिवसांचा विचार सहसा करीत नाही. खरं पाहिलं तर प्रवासातले सर्वात संस्मरणीय अनुभव हे फक्त तुम्ही कुठे जाता यावर नाही, तर कधी जाता यावर सुद्घा अवलंबून असतात. जेव्हा तुम्ही लोसारच्या काळात लडाखमध्ये असता, मिड ऑटम फेस्टिवलच्या वेळी चायनामध्ये असता किंवा पोंगलचा सूर्योदय तुम्ही दक्षिण भारतातल्या लहानशा गावात अनुभवता, तेव्हा तुम्ही त्या त्या ठिकाणच्या संस्कृतीचा अस्सल अनुभव घेता. कारण अशावेळी हे पदार्थ फक्त ताटात वाढले जात नाहीत, तर एका पारंपरिक कथानकाचा अविभाज्य भाग बनून ते तुमच्यासमोर उलगडत असतात.

अर्थात असे अनुभव त्यांच्या संदर्भाशिवाय, स्वतंत्रपणे घेताच येणार नाहीत. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाशिवाय मून केक किंवा रमजानची संध्याकाळ नसताना खाल्लेलं हलीम चविष्ट लागेलही, पण त्याचा आत्मा कुठेतरी हरवलेला असेल. अवतीभवतीचं वातावरण, जमलेली माणसं, त्या पदार्थांची करावी लागलेली प्रतीक्षा आणि त्या क्षणाचं सगळ्यांना असलेलं सामूहिक भान यामुळे त्या पदार्थांना खरा अर्थ, खरी चव आणि पूर्णत्व प्राप्त होतं. अशावेळी पर्यटन म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं राहत नाही, तर तो तिथल्या संस्कृतीचा भाग बनण्याचा अनुभव ठरतो.

कदाचित हेच, हे वर्षातून एकदाच होणारे पदार्थ आपल्याला शिकवतात. ते आपल्याला केवळ नवीन चव चाखण्याचं आमंत्रण देत नाहीत, तर एखाद्या संस्कृतीच्या काळाच्या लयीशी जुळवून घेण्याचं निमंत्रण देतात. थोडं थांबायला, वाट पाहायला आणि एखाद्या नेमक्या क्षणी जो तो अनुभव घ्यायला शिकवतात. म्हणूनच, पुढच्या वेळी एखाद्या प्रवासाचं नियोजन करताना फक्त कुठे जायचं एवढाच विचार करू नका, तर कधी जायचं हाही प्रश्न स्वतःला नक्की विचारा. कारण कधीकधी एखादं ठिकाण अविस्मरणीय बनवणारी गोष्ट म्हणजे ती जागा नसते, तर त्या जागी तुम्ही पोहोचलेला तो अचूक क्षण असतो. आणि खरं तर ज्या अनुभवांसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागते, तेच अनुभव आयुष्यभर मनात रेंगाळत राहतात. आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात, एका नव्या प्रवासकथेसह... ‌‘बॉन ॲपिटेट‌’!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
नॉर्दर्न लाइट्स
12 mins, read

नॉर्दर्न लाइट्स

Published in Sakal Saptarang 9th August 2026 प्रकाशाच्या शोधात जगात असे काही प्रवास असतात, जे आपण एखादं प्रसिद्ध मॉन्युमेंट पाहण्यासाठी करतो. काही प्रवास सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी, काही तिथल्या

स्नान : एक कला!
12 mins, read

स्नान : एक कला!

Published in Loksatta Lokrang 9th August 2026 ...असं म्हणतात की, क्लिओपात्राच्या सौंदर्याचं रहस्य गाढविणीच्या दुधात होतं. ती गाढविणीच्या दुधाने स्नान करीत असे. इजिप्तमध्ये धार्मिक उपचारआणि ऐषोआर

राजस्थान
12 mins, read

राजस्थान

Published in Sakal Saptarang 2nd August 2026 द कॅमल फेअर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या सुमारास राजस्थानातील शांत, निवांत पुष्कर हे छोटंसं वाळवंटी शहर एका आठवड्यासाठी अक्षरशः बदलून जातं. भारतातील

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!