We Just Opened 3 New Branches!
We're Open, now in Vadodara, Kochi & Nungambakkam (Chennai).
India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

पूर्वेची सिलिकॉन व्हॅली

12 mins. read
Neil Patil
Neil Patil
12 Mins Read
July 29, 2026
July 29, 2026

Quick Summary

तैपेईला भेट देताना उळाँग टीच्या छोट्या कपांमधली चव चाखा आणि प्रत्येक वेळची वेगळी चव लक्षात ठेवा.

सकाळी पब्लिक पार्क्समध्ये सिनियर सिटिझन्सची ताय ची प्रॅक्टिस पाहा आणि शहराचा शांत ताल अनुभव.

रस्त्यावर स्कूटर्स शिस्तबद्धपणे सिग्नल ओलांडताना पहा आणि तैपेईची सुव्यवस्था जाणून घ्या.

टेकड्यांवरील टी हाऊसेसवरून तैपेई 101 कडे नजर टाकत शहराचा मानवी आणि बहुस्तरीय स्वभाव अनुभव.

तैवानच्या सेमिकंडक्टर सामर्थ्याबद्दल समजून घ्या, कारण टीएसएमसी जगभरातील कस्टम मेड चिप्सपैकी मोठा वाटा तयार करते.

तैपेई फक्त टेक-कॉर्पोरेट नाही तर स्थलांतरे, राजकीय बदल आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांतून घडलेल्या इतिहासाच्या लेयर्सनी भरलेलं आहे.

Published in Maharashtra Times 19th July 2026

...ऊलाँग टी छोट्या छोट्या कपांमधून समोर येत होता. प्रत्येक वेळची चव मागच्या वेळेपेक्षा वेगळी वाटत होती. इथल्या टी कल्चरमध्ये जे गांभीर्य आहे ते केवळ उत्सवी नसून त्याला अनुभवाचा, ज्ञानाचा आधार आहे...

यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशनच्या (YPO) फोरम रिट्रीटसाठी जेव्हा मी तैपेईला उतरलो तेव्हा माझ्या मनात या जागेविषयीची एक साचेबद्ध प्रतिमा आधीच तयार झालेली होती. हे शहर अशा एका देशाची राजधानी आहे, ज्या देशात जगभरात वापरल्या जाणाऱ्या सेमिकंडक्टर्सपैकी सुमारे 65% सेमिकंडक्टर्स बनतात आणि जगभरातील स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, इलेक्ट्रिक वाहने, डेटा सेंटर्स, वैद्यकीय उपकरणं, डिफेन्स सिस्टिम आणि ए.आय. सुविधा मजबूत करणाऱ्या, अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा प्राण असलेल्या चिप्सपैकी जवळजवळ 95% चिप्स बनवल्या जातात. हे माहिती असलं की मग असं शहर हे ग्लास टॉवर्स, अचूक इंजिनियरिंग आणि शांतपणे काम करणाऱ्या टेक्नॉलॉजी पार्क्सनी बनलेलं असेल अशी कल्पना आपण करतो. पूर्वेकडची सिलिकॉन व्हॅली तिथे पाहायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती. पण माझ्या या कल्पना इतक्या झटकन बदलतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. फायनान्शियल डिस्ट्रिक्ट सोडल्यावर लगेच मंदिरांच्या अंगणातून दरवळणारा अगरबत्तीचा सुगंध मला जाणवला. सकाळच्या वेळेत सिनियर सिटिझन्स पब्लिक पार्क्समध्ये ‌‘ताय ची‌’ची प्रॅक्टिस करताना पाहायला मिळाले. त्याचवेळी रस्त्यावरच्या अनेक स्कूटर्स शिस्तबद्धपणे सिग्नल ओलांडताना दिसल्या. शहराच्या क्षितिजाच्या वर असलेल्या टेकड्यांवरची टी हाऊसेस जणू तैपेई 101 कडे नजर खिळवून उभी होती. हे शहर अगदी कोरडं किंवा हायपर कॉर्पोरेट वाटत नव्हतं, तर अनेक स्तरांनी बनलेलं हे शहर मला मानवी संवेदनांनी परिपूर्ण वाटत होतं.

जागतिक स्तरावर हे सेमिकंडक्टर्सचा सर्वाधिक पुरवठा करणारं शहर असलं तरी फक्त ही आकडेवारी म्हणजे तैपेई नव्हे. ते जागतिक अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारं शहर आहेच, पण त्याचबरोबर स्थलांतरे, वसाहतीचा कालखंड, राजकीय बदल आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यातूनही हे शहर घडलं आहे. जपानी, चायनीज, स्थानिक आणि पाश्चिमात्यांचा संमिश्र प्रभाव या शहरावर पाहायला मिळतो. तुम्ही जर इथे एक टेक-पॉवरहाऊस बघायला मिळेल या अपेक्षेनं आला असाल तर इथून जाताना हे शहर त्यापेक्षा आणखी बरंच काही आहे हे तुम्हाला समजलेलं असेल.

आधुनिक जग ज्यावर अवलंबून आहे असं आयलंड: आधुनिक जगाच्या अर्थव्यवस्थेत तैवानचं महत्त्वाचं स्थान आहे. जागतिक तंत्रज्ञानाच्या पुरवठा साखळीमधून जर तैवानला वजा केलं तर जगाचे व्यवहारच ठप्प होतील. या इकोसिस्टीमच्या मध्यभागी असलेली कंपनी म्हणजे तैवान सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (टी एस एम सी). हीच कंपनी जगभरातील अर्ध्याहून अधिक कस्टम मेड चिप्स तयार करते. Apple, NVIDIA, AMD, Qualcomm या कंपन्यांनी डिझाईन केलेले प्रोसेसर्स ही कंपनी तयार करते. त्यामुळे जगातले सर्वात महागडे टेक्नॉलॉजी ब्रँड्स अनेक बाबतीत या आयलंडवरच्या उत्पादनावर अवलंबून आहेत.

तैवानने आपली ही क्षमता दशकानुदशके शांतपणे काम करुन निर्माण केली आहे. त्यांनी कंझ्युमर ब्रँडिंगच्या मागे न लागता ही ताकद निर्माण केली. सर्वोत्तम उत्पादन, उत्पादनापासून जास्तीत जास्त नफा मिळवणे, सखोल संशोधन आणि परिपूर्ण पुरवठा साखळी यावर लक्ष केंद्रित करुन ही ताकद तैवानने कमावली. इतर देशांनी जेव्हा नजरेत भरणारे टेक जायंट्स उभे केले, तेव्हा तैवानने त्यांना चालवण्यासाठी लागणाऱ्या सुविधा निर्माण केल्या. आणि तरीही जेव्हा तुम्ही या स्ट्रॅटेजिकली अतिशय महत्त्वाच्या आयलंडची राजधानी असलेल्या तैपेई येथे उतरता तेव्हा हे शहर डिजिटल युनिव्हर्सचे केंद्रस्थान अजिबात वाटत नाही. या शहरामध्ये स्कायलाईन व्यापणारे भलेमोठे कॉर्पोरेट कॅम्प्स कुठेही पाहायला मिळत नाहीत. त्याऐवजी हे शहर अतिशय संतुलित, आखीवरेखीव आणि तरीही अगदी साधं वाटतं. हा विरोधाभासच तैपेईला अधिक आकर्षक बनवतो.

अनेक लेयर्सनी बनलेलं शहर: आजचं तैपेई नेमकं कसं बनलं आहे हे समजण्यासाठी या शहरात दडलेले इतिहासाचे लेयर्स समजून घ्यावे लागतील. सेमी कंडक्टर्स आणि हाय स्पीड रेल्वेच्या फार पूर्वी, या आयलंडवर ऑस्ट्रोनेशियन आदिवासी समूह राहत होते. आज या शहराच्या बाह्यरुपात त्यांचा प्रभाव थेटपणे दिसत नसला तरीही तैवानच्या सांस्कृतिक पायामध्ये भाषेच्या, अन्नपदार्थांच्या आणि ओळख ठरलेल्या खुणांच्या माध्यमातून तो दिसून येतो.

नंतरच्या काळात बाहेरुन लोंढे आले. 17 व्या शतकात व्यापारासाठी लोक आले. पहिल्यांदा डच, नंतर स्पॅनिश आले आणि त्यांनी इथे आपला जम बसवला. त्यांचा कालखंड तसा छोटा होता पण त्याआधीच तैवानने जागतिक व्यापारी मार्गावर प्रवेश केला होता. सन 1600 च्या अखेरीस हा प्रदेश चिंग साम्राज्याचा भाग झाला होता. त्यामुळे चायनाच्या मुख्य भूमीवरुन इथे फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित आले. मंदिरे उभारण्यात आली, बाजार तयार झाले, तेव्हा रुजलेल्या परंपरा आजच्या लोकजीवनातही बघायला मिळतात.

पण सर्वात निर्णायक प्रकरण सुरू झालं ते 1895 मध्ये जेव्हा तैवान जपानशी जोडण्यात आलं. सुमारे 50 वर्षं तैवानवर जपानी राजवट होती. त्याच्या खुणा आजही दिसतात. जपानी लोकांनी इथे रेल्वेमार्ग आणला, अर्बन प्लॅनिंग फॉर्मलाइझ्ड केलं, हॉट स्प्रिंग्ज कल्चर रुजवलं आणि भव्य प्रशासकीय बिल्डिंग्ज बांधल्या. मुळात जपानी गव्हर्नर जनरलच्या कार्यालयासाठी बांधलेल्या आणि आता राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय म्हणून वापरात असलेल्या इमारतीसमोर तुम्ही उभे राहता तेव्हा वास्तुकलेच्या भव्यतेनं भारावून जाता. दुसऱ्या महायुध्दानंतर तैवान, ‌‘रिपब्लिक ऑफ चायना‌’कडे सोपवण्यात आलं. 1949 मध्ये चायनीज सिव्हिल वॉरमध्ये पराभूत झाल्यानंतर चैंग कै शेक आणि त्यांचं नॅशनलिस्ट सरकार इथे स्थिरावलं. तैपेई अचानक स्थलांतरित सरकारचं मुख्य राजकीय केंद्र बनलं. मेन लँड चायनामधून लाखो लोक इथे आले. त्यांनी त्यांच्यासोबत नवीन पदार्थ, बोलीभाषा आणि पोलिटिकल टेन्शन्स आणली. मग मार्शल लॉ लागू झाला, अनेक दशकांनंतर लोकशाही आली. आज तैपेईमधून फेरफटका मारताना या सगळ्याचं दर्शन घडतं. जपानी राजवटीत बांधलेल्या इमारतीशेजारी चिंग काळातील मंदिरात अगरबत्त्या जळत असतात. अत्याधुनिक ग्लास टॉवरमधून दोन्ही काळ प्रतिबिंबित होत असतात. ते खोटं वाटत नाही तर अस्सल वाटतं. तैपेईनं आपलं भविष्य घडवताना आपला भूतकाळ पुसून टाकलेला नाही, तर त्यावरच आपला भविष्यकाळ उभारला आहे.

इथलं दैनंदिन आयुष्य कसं आहे? तैपेईचं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे ते जसं असायला पाहिजे तसं अजिबात नाही. जागतिक सेमिकंडक्टर इंडस्ट्रीचं मध्यवर्ती केंद्र असूनही हे शहर अजिबात झगमगाटी, आक्रमक किंवा टोकाचं कॉर्पोरेट नाही. शांघाई, दुबई किंवा सिलिकॉन व्हॅलीच्या काही भागात पाहायला मिळतं तसं इथे संपत्तीचं अंगावर येणारं प्रदर्शन पाहायला मिळत नाही. त्याउलट तैपेईमधील लोकांचं दैनंदिन आयुष्य हे संयमित, प्रॅक्टिकल आणि गाजावाजा न करता आपलं काम करण्यात रमलेलं असल्याचं पाहायला मिळतं. याचं एक कारण तैवानच्या ब्रॉडर इंडस्ट्रिअल कल्चरमध्ये दडलेलं असू शकतं. उत्पादनातील उत्कृष्टतेवर ही अर्थव्यवस्था उभी राहिलेली आहे. जिथे अचूकता, उत्पादनक्षमता आणि खर्चावर नियंत्रण यालाच महत्त्व असतं, अशा वातावरणात टीएसएमसी सारख्या कंपन्या काम करतात. उत्पादनातील शिस्तीमुळेच उधळपट्टीपेक्षा कार्यक्षमतेला महत्त्व दिलं जातं. ही विचारधारा फक्त फॅक्टरीजपुरती मर्यादित न राहता ती दैनंदिन जीवनातही अंगिकारलेली पाहायला मिळते. तैपेई आपली आर्थिक ताकद कुठेही प्रदर्शित करीत नाही, ते फक्त आपलं काम शांतपणे करीत राहतं. एम आर टी (मेट्रो) वेळेवर धावते, लोक सहज रांगेत उभे राहतात आणि कोणी सफाई करताना दिसलं नाही तरी सार्वजनिक जागा स्वच्छ असतात. लोक निरुद्देश फिरत नाहीत, पण घाईगडबडीतही नसतात. कार्यालयीन कर्मचारी अगदी साधे कपडे वापरतात. इथेही लक्झरी आहे, पण तिचं प्रदर्शन नाही. इथे हाय एन्ड मॉल्स आणि प्रिमियम कार्स आहेत, पण शहर फक्त त्यांनीच बनलेलं नाही. याच शिस्तीचं प्रतिबिंब इथल्या ट्रॅफिकमध्येही पाहायला मिळतं. तैपेईमध्ये जगातली सर्वात जास्त स्कूटर डेन्सिटी आहे, पण इथल्या चौकांमध्ये कधीही ट्रॅफिक तुंबलेलं दिसत नाही. सिग्नल हिरवा झाल्यावर स्कूटर्सचा घोळका अगदी शिस्तबद्धपणे पुढे सरकतो. प्रथमदर्शनी हे दृश्य अंगावर येतं, पण त्याचीही एक रचना असते जी कधी मोडत नाही.

आणखी एक जाणवणारी गोष्ट म्हणजे लोकांचं सार्वजनिक ठिकाणचं संयमित वागणं. एमआरटी मध्ये लोक अगदी हलक्या आवाजात बोलतात आणि फोनचा वापर क्वचितच करतात. भांडण न करता लोक दुसऱ्यांना बसायला जागा देतात. दैनंदिन जीवन कायद्याने नाही, तर सामाजिक संकेतांवर चालतं. या सुव्यवस्थेला बळकटी मिळते ती काही लहानलहान नागरी व्यवस्थांमुळे. गार्बेज ट्रक्स येतात तेव्हा शास्त्रीय संगीत वाजतं. मग लोक आपापल्या घरातला वर्गीकरण केलेला कचरा घेऊन बाहेर येतात. कन्व्हिनिअन्स स्टोअर्समध्ये बिलं भरता येतात, पार्सल्स घेता येतात, ट्रान्झिट कार्ड रिचार्ज करता येतात, त्यामुळे ती सर्व्हिस हबसारखं काम करतात. एफिशियन्सी इथल्या दैनंदिन जगण्याचाच हिस्सा आहे. महत्त्वाचं म्हणजे तैपेई शहर त्याच्या मूळ रुपातच समाधानी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचं केंद्र असूनही ते आपल्या सामर्थ्य किंवा संपत्तीचं प्रदर्शन करीत नाही. या शहराचा आत्मविश्वास उद्दाम नाही.

खाद्यविश्वाची अनपेक्षित राजधानी: आमच्या या प्रवासातील सर्वाधिक संस्मरणीय जेवणांमधील एक म्हणजे तैवानचा प्रसिद्ध रोस्ट डक. तो आमच्यासमोर कौशल्याने कापून वाढण्याची प्रोसेस पाहणं हा एक अनोखा अनुभव होता. प्रत्येक हालचाल इतकी अचूक, पद्धतशीर आणि बारकाइने केली जात होती की ती एखाद्या शस्त्रक्रियेसारखी वाटत होती. त्या डकची त्वचा अगदी कुरकुरीत होती, जराही जाड नव्हती आणि मांस अगदी कोवळं होतं. ते काही नाट्यमय भोजन नव्हतं, तर जिथे तंत्र महत्त्वाचं असतं असा एक शिस्तबद्ध स्वयंपाक होता. या जेवणात पॅनकेक्स, सॉसेस आणि छान बनवलेल्या इतर पदार्थांचा समावेश होता, त्यामुळे आवडीप्रमाणे जेवणाचा आस्वाद घेणं शक्य झालं.

इथल्या नाईट मार्केट्समध्ये एक वेगळीच उर्जा अनुभवायला मिळाली. जशी संध्याकाळ होते तसे शहरातल्या काही भागांचे व्यवहार फक्त खाण्याभोवती एकवटू लागतात. रस्ते वाहतुकीसाठी बंद होतात, स्टॉल्स उजळतात, हवेत लसूण, सोया सॉस, भाजलेल्या मांसाचा आणि तळलेल्या पदार्थांचा वास दरवळू लागतो. आम्ही रहोए मार्केटमध्ये कुठे कुठे थांबत, एक फेरफटका मारला. क्ले ओव्हनमध्ये बेक केलेले पेपर बन्स खाल्ले, कुरकुरीत चिकन कटलेट्स जी अपेक्षेपेक्षा मोठी होती. त्यांची टेस्ट पाहिली आणि अर्थातच ज्याचा वास आधीच आपलं अस्तित्व जाहीर करतो असं स्टिंकी टोफूही खाल्लं. हा ताजा तळून कोबीच्या लोणच्यासोबत खाल्ला तर अजून छान लागतो. इथली नाईट मार्केट्स ही पर्यटकांसाठी तयार केलेली नाहीत. ती स्थानिकांची गरज भागवणारी आहेत. तिथले स्टॉलधारक वर्षानुवर्षे काही विशिष्ट पदार्थच बनवण्यात अगदी तरबेज आहेत. मात्र चहा ही अशी गोष्ट आहे की जिथे सगळं शहरंच रेंगाळतं. शहराजवळच असलेल्या माओकोंगमध्ये, शहराच्या स्कायलाईनचा नजारा दाखवणाऱ्या एका पारंपरिक टी हाऊसमध्ये आम्ही बसलो होतो. वातावरण अगदी शांत होतं. विचारपूर्वक चहा उकळवला गेला होता. ऊलाँग टी छोट्या छोट्या कपांमधून समोर येत होता. प्रत्येक वेळची चव मागच्या वेळेपेक्षा वेगळी वाटत होती. इथल्या टी कल्चरमध्ये जे गांभीर्य आहे ते केवळ उत्सवी नसून त्याला अनुभवाचा, ज्ञानाचा आधार आहे. इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला चहाची पानं कुठून आणली, किती उंचावरुन, त्यांची ऑक्सिडेशन पातळी आणि उकळविण्याची वेळ याची नीट माहिती दिली. हा अनुभवच इथल्या संस्कृतीचा आधार आहे असं म्हणता येईल. या सगळ्या अनुभवांमध्ये मला जाणवलं ते त्यातील सातत्य. नाईट मार्केटमधील स्टॉलपासून ते डोंगरातल्या टी हाऊसपर्यंत सगळ्याच ठिकाणी कामातली शिस्त पाहायला मिळाली. पाककृतींवर काम केलं होतं, पदार्थांचं प्रमाणही योग्य होतं आणि चवीचा भपका नसून ती अतिशय संतुलित राखली होती.

जगाला अजूनही पूर्णपणे न उलगडलेला देश: तैपेईत काही काळ घालवल्यानंतर त्याच्या अनोख्या ग्लोबल पोझिशनची जाणीव होणं अगदी स्वाभाविकच असतं. तैवान सगळ्याच बाबतीत एक स्वतंत्र देश म्हणून काम करताना दिसतो. तिथे लोकशाही मार्गाने निवडलेले राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांचं स्वतःचं लष्कर आहे. त्यांचा वेगळा पासपोर्ट आणि चलन आहे, तसंच खुल्या चर्चेला आणि स्पर्धात्मक निवडणुकांना वाव देणारी राजकीय प्रणाली आहे. प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य आहे आणि नागरिक अनेक गोष्टीत सक्रिय सहभाग घेतात. मात्र त्याच वेळी तैवानला मिळालेली राजनैतिक मान्यता मात्र मर्यादित आहे. ‌‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना‌’ हा तैवानला आपलाच भूभाग मानतो आणि त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर नक्कीच प्रभाव पडतो. अनेक देशांचे तैवानबरोबर अतिशय दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत, पण ते तैवानला स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र मानत नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये तैवान ‌‘चायनीज तैपेई‌’ या नावाने सहभागी होतो. मात्र युनायटेड नेशन्समध्ये आजही तैवानला सदस्य राष्ट्र म्हणून स्थान नाही.

पर्यटकांना ही गुंतागुंत बाहेरुन दिसून येत नाही. तैपेईमध्ये वावरताना अस्थिरता किंवा तणाव जाणवत नाही. उलट हे शहर सुनियोजित, शिस्त आणि आत्मविश्वासाने भरलेलं असल्याचं जाणवतं. इथल्या कॅफेज आणि युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये राजकीय विषयांवरील चर्चा खुलेपणाने होतात. सार्वजनिक संस्था सुरळीतपणे तरीही कार्यक्षमतेने काम करतात. नागरिकांचाही सार्वजनिक जीवनातील सहभाग म्हणजे फक्त औपचारिकता नसून, तो त्यांच्या संस्कृतीचा नैसर्गिक भाग असल्याचं जाणवतं.

मग तैपेई नेमकं आहे तरी कसं? तैपेई शहरात काही दिवस घालवल्यानंतर मला या शहराचं वर्णन एका शब्दात करणं अवघड वाटतंय. जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारं ते सेमिकंडक्टर पॉवरहाऊस आहे. जिथल्या दैनंदिन जीवनात टी कल्चर आणि नाईट मार्केट्स पूर्णपणे भिनलेली आहेत असं ते एक फूड कॅपिटल सुद्धा आहे. लोकशाही शासनव्यवस्थेचा स्वीकार करीत मर्यादित आंतरराष्ट्रीय मान्यतेच्या, अनोख्या राजकीय वास्तवात, हे शहर स्वत:चा मार्ग आत्मविश्वासाने घडवीत आहे, तर दुसरीकडे माऊंटन्स, हॉट स्प्रिंग्ज आणि सहज उपलब्ध असलेली हिरवळ ही तैपेईची भौगोलिक ओळख आहे. ही सगळी वैशिष्ट्यं एकमेकांशी स्पर्धा करीत नाहीत, उलट ती एकमेकांना पूरक ठरत तैपेईची वेगळी ओळख निर्माण करतात. या ठिकाणी येताना माझ्या मनात प्रामुख्याने सेमिकंडक्टर्स आणि ग्लोबल सप्लाय चेनचेच विचार होते. पण परतताना माझ्या मनात घर करून राहिलं ते इथलं दैनंदिन जीवन, शिस्तबद्ध नागरी व्यवस्था, चहाच्या कपाभोवती रंगणाऱ्या गप्पा आणि स्वतःच्या मूल्यांवर उभ्या राहिलेल्या समाजाचं आत्मविश्वासपूर्ण चित्र.

तुम्ही जर तैपेईला एक टेक्नॉलॉजी हब समजून आलात तर ते तुम्हाला इथे नक्की दिसेल, पण त्याचबरोबर एक सुनियोजित, जमिनीवर पाय घट्ट रोवलेलं आणि मुख्य म्हणजे ज्याला एक मानवी चेहरा आहे असं शहरही तुम्हाला आढळेल. मग तुम्ही कधी प्लॅन करताय?

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
नॉर्दर्न लाइट्स
12 mins, read

नॉर्दर्न लाइट्स

Published in Sakal Saptarang 9th August 2026 प्रकाशाच्या शोधात जगात असे काही प्रवास असतात, जे आपण एखादं प्रसिद्ध मॉन्युमेंट पाहण्यासाठी करतो. काही प्रवास सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी, काही तिथल्या

वर्षातील एकमेव संधी
12 mins, read

वर्षातील एकमेव संधी

Published in Maharashtra Times 9th August 2026 ...त्या उकळणाऱ्या भांड्यातले तांदूळ आणि दूध वर येऊनबाहेर सांडल्याबरोबर जमलेल्या लोकांचा एकच जल्लोषऐकू येतो, ‌‘पोंगलो पोंगल‌’... मध्यंतरी पॉडकास्टच्

स्नान : एक कला!
12 mins, read

स्नान : एक कला!

Published in Loksatta Lokrang 9th August 2026 ...असं म्हणतात की, क्लिओपात्राच्या सौंदर्याचं रहस्य गाढविणीच्या दुधात होतं. ती गाढविणीच्या दुधाने स्नान करीत असे. इजिप्तमध्ये धार्मिक उपचारआणि ऐषोआर

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!