India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

जिथे सूर्य मावळत नाही...

9 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
9 Mins Read
June 19, 2026
June 19, 2026

Quick Summary

गुढीपाडव्याच्या गुढीसारखा उंच सजवलेला मेपोल पाहून मिडसोमारचा उत्सव अनुभवण्यासारखा आहे.

मिडसोमारला मेपोलभोवती फेर धरून नाचणारी माणसं आणि पारंपरिक गाणी ऐकण्यासाठी तिथेच थांबा.

21 जूनच्या सर्वाधिक प्रकाशाच्या दिवशी स्वीडिश लोक उन्हाचं आणि फुलांचं स्वागत कसं करतात ते प्रत्यक्ष पाहा.

भारताच्या मकर संक्रांतीसारखीच सूर्यप्रवासाची भावना स्वीडनच्या मिडसोमारमध्येही कृतज्ञता आणि समृद्धी म्हणून साजरी होते.

स्कॅन्डिनेव्हिया म्हणजे डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन, तर नॉर्डिक प्रदेशात फिनलंड, आइसलँडसह इतर देशांचा समावेश होतो.

स्कॅन्डिनेव्हियाचा शोध शहरांपासून सुरू करून हळूहळू निसर्गाकडे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला आहे.

Published in Loksatta Lokrang. Date 21st June, 2026

...शहराचा जुना भाग इतका सुंदर जतन करण्यात आला आहे की तिथे फिरताना आपण एखाद्या परीकथेत असल्याचा भास होतो...

गावातील हिरव्यागार मैदानाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या त्या उंच लाकडी खांबाकडे मी पाहत होते आणि मनात एक विलक्षण ओळखीची भावना दाटून आली. काहीतरी परिचित असल्यासारखं वाटत होतं. रंगीबेरंगी रिबिनी, फुलांची सजावट, उत्सवाचं ते प्रसन्न वातावरण... आणि अचानक मला जाणवलं, अरेच्चा! हे तर आपल्या गुढीसारखंच आहे. फक्त खूपच उंच आहे, इतकंच. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण महाराष्ट्रीयन लोक घराबाहेर जो सुशोभित बांबू उभारतो, त्यावर रेशमी वस्त्र गुंडाळून त्यावर चकचकीत कलश ठेवतो, अगदी तसाच उभारलेला हा खांब वाटत होता. आणि मग त्या खांबाभोवती फेर धरून गाणी म्हणत, हसत-खेळत नाचणारी माणसं दिसली आणि एका क्षणासाठी मला गरब्याचीच आठवण झाली. पण मी उभी होते स्वीडनमध्ये, मुंबईपासून हजारो किलोमीटर दूर. तरीही त्या खांबाने मला क्षणार्धात माझ्या आजीच्या गल्लीची आठवण करून दिली. पण ती गुढी नव्हती, तर तो होता मिडसोमारस्तोंग, म्हणजे मेपोल. आणि त्याभोवती फेर धरून नाचणारी माणसं बेडकांवर आधारित पारंपरिक गाणी गात स्वीडनचा अत्यंत लाडका ग्रीष्मोत्सव मिडसोमार साजरा करीत होती. या सुंदर योगायोगाने मोहित होऊन मी तिथे उभी राहून हसत होते. जगाच्या दोन टोकांवर राहणारी माणसं आनंद व्यक्त करण्यासाठी किती सारख्या पद्धती निवडतात या विचाराने मी भारावून गेले होते.

तसं पाहायला गेलं तर हे सगळे उत्सव एकाच प्रेरणेतून जन्माला आले आहेत. विविध संस्कृतींनी ज्या शक्तीभोवती उत्सवांची निर्मिती केली, ती शक्ती म्हणजे सूर्य. भारतात आपण मकर संक्रांत साजरी करतो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा उत्तरायण सुरू होतं. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. हा सण म्हणजे कापणी, कृतज्ञता, समृद्धी आणि लोकांनी एकत्र येण्याचा सोहळा. तसंच स्वीडनचा मिडसोमार म्हणजे त्याच सूर्यप्रवासाच्या दुसऱ्या टोकाचा उत्सव. वर्षातला सर्वात जास्त प्रकाशाचा दिवस म्हणजे 21 जून... म्हणजेच आजचा दिवस. दीर्घ, अंधाऱ्या हिवाळ्यानंतर स्वीडिश लोक उन्हाचं, उबेचं, फुलांचं आणि मोकळ्या हवेचं स्वागत करण्यासाठी सोहळा आयोजित करतात. जानेवारीत तिळगूळ देताना असो किंवा जूनमध्ये फुलांनी सजवलेल्या मेपोलभोवती नृत्य करताना, माणूस खरंतर एकच गोष्ट साजरी करत असतो ती म्हणजे प्रकाशाचं पुनरागमन, जीवनातील नवचैतन्य आणि उद्याच्या आशेचा उत्सव. मला अनेकदा वाटतं, की आपण एकमेकांपासून जितके वेगळे वाटतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक सारखे आहोत. भूगोल, हवामान, इतिहास आणि परंपरा या उत्सवांना वेगवेगळं रूप देतात. पण शेवटी त्यांचा आत्मा एकच असतो. त्यामुळे जगभर विविध चालीरीतींची एक सुंदर रंगीत वीण तयार होते आणि ही विविधताच आपला प्रवास मोहक आणि समृद्ध बनवते.

स्कॅन्डिनेव्हिया म्हणजे नेमकं काय?: स्वीडन आणि त्याच्या शेजारील देशांना मिळून आपण स्कॅन्डिनेव्हिया म्हणतो. मात्र अनेकजण स्कॅन्डिनेव्हिया आणि नॉर्डिक देश हे शब्द समान अर्थाने वापरतात, जे खरं नाही. परंपरेनुसार स्कॅन्डिनेव्हियामध्ये डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन या तीन देशांचा समावेश होतो. या देशांच्या भाषा, इतिहास आणि सांस्कृतिक परंपरा एकमेकांशी अतिशय जवळच्या आहेत. ‌‘स्कॅन्डिनेव्हिया‌’ हे नाव प्राचीन लॅटिन भाषेतील ‌‘स्कॅन्डिया‌’ या शब्दावरून आलं आहे. रोमन लेखक त्यांच्या परिचयाच्या जगाच्या पलीकडे असलेल्या या उत्तरेकडील रहस्यमय भूमींसाठी हा शब्द वापरत असत. नॉर्डिक प्रदेश मात्र अधिक व्यापक आहे. त्यामध्ये स्कॅन्डिनेव्हियासोबत फिनलंड, आइसलँड तसेच ग्रीनलँड, फारो आयलंड्स आणि ऑलँड यांचाही समावेश होतो. फिनलंडचे आपल्या शेजाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असले तरी तांत्रिकदृष्ट्या तो स्कँडिनेव्हियन देश मानला जात नाही, कारण फिन्निश भाषा पूर्णपणे वेगळ्या जातकुळीतील आहे. थोडक्यात सांगायचं तर सर्व स्कँडिनेव्हियन देश नॉर्डिक आहेत, पण सर्व नॉर्डिक देश स्कँडिनेव्हियन नाहीत. स्कँडिनेव्हियाने मला नेहमीच मोहिनी घातली आहे. तिथली पेस्टल रंगांची घरं, चित्रातल्या दृश्यांसारखी शांत गावं, भव्य किल्ले, शूर योद्ध्यांच्या कथा, आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं निसर्गसौंदर्य... यात ऋतूंच्या नाट्यमय बदलांची भर पडली की हे ठिकाण वर्षातून किमान दोनदा पाहावं असं वाटू लागतं. या प्रदेशाची ओळख करून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याच्या शहरांपासून सुरुवात करून हळूहळू निसर्गाच्या कुशीत शिरणं.

राजधान्या आणि त्यापलीकडे: स्कॅन्डिनेव्हियाचा शोध सुरू होतो त्याच्या राजधान्यांपासून आणि प्रत्येक राजधानीचं व्यक्तिमत्त्व एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. कोपनहेगन आपल्या रंगीबेरंगी जलकिनाऱ्यांनी, राजेशाही प्रासादांनी आणि निवांत जीवनशैलीने आपलं मन जिंकून घेतं, तर स्टॉकहोम हे लेक मॅलारेन आणि बाल्टिक सीच्या संगमावर पसरलेल्या चौदा आयलंड्सवर वसलेलं शहर जगातील सर्वांत सुंदर जलनगरींपैकी एक मानलं जातं. गामला स्तानच्या मध्ययुगीन गल्लीबोळांतून फिरताना इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. भव्य राजवाडा, अरुंद दगडी रस्ते आणि जगप्रसिद्ध वासा म्युझियम हे सगळं मिळून स्टॉकहोमचा अनुभव अविस्मरणीय बनवतात. ओस्लो आधुनिक वास्तुकलेचा आणि निसर्गाचा सुंदर मेळ साधतं, तर हेलसिंकी आपल्या अभिजात नवशास्त्रीय इमारती, आर्ट नुव्हो शैलीतील दर्शनी भाग आणि डिझाईन कल्चरने प्रभाव पाडतं. या प्रदेशातल्या प्रवासातला एक विशेष आनंद म्हणजे शहरांना जोडणाऱ्या फेरी जर्नीज्‌‍ म्हणजेच नौकानयन सफरी. स्टॉकहोम ते हेलसिंकी या ओव्हरनाईट क्रुझेस म्हणजे केवळ एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचण्याचा मार्ग नाही, तर तो स्वतःमध्ये एक अनुभव आहे. बाल्टिक समुद्रात विखुरलेल्या हजारो आयलंड्सच्या अद्भुत चक्रव्यूहातून प्रवास करताना वेळेचं भान हरपून जातं.

मला आठवतं, त्या जहाजावर खरी तर माझी केबिन होती, पण मी मात्र बहुतेक वेळ डेकवर उभी राहून समुद्र, आयलंड्स आणि बदलत जाणाऱ्या प्रकाशाचं दृश्य न्याहाळत होते. हेलसिंकीवरून एका छोट्या बोटप्रवासानंतर आपण पोहोचतो एस्टोनियाची राजधानी तालिनला. हे मध्ययुगीन जादूचं एक अप्रतिम ठिकाण आहे. शहराचा जुना भाग इतका सुंदर जतन करण्यात आला आहे की तिथे फिरताना आपण एखाद्या परीकथेत असल्याचा भास होतो. मॉडर्न नॉर्डिक कॅपिटलच्या सुसंस्कृत आणि समकालीन वातावरणातून तालिनच्या मध्ययुगीन मोहकतेत प्रवेश करणं हा प्रवास उत्तर युरोपातील सर्वोत्तम सहलींपैकी एक आहे.  पण शहरांच्या या सौंदर्यानंतरही स्कॅन्डिनेव्हियाचं खरं वैभव अजून पुढे आहे. कारण शहरांच्या पलीकडे आहेत नॉर्वेचे भव्य फ्योर्डस्‌‍. संपूर्ण स्कॅन्डिनेव्हियाचा सर्वांत मौल्यवान नैसर्गिक ठेवा. कोट्यवधी वर्षांपूर्वी हिमनद्यांनी कोरलेल्या या खोल निळ्या जलमार्गांच्या दोन्ही बाजूंना उभ्या कड्यांचे डोंगर, वॉटरफॉल्स आणि बर्फाच्छादित शिखरे आहेत. त्यांचं प्रतिबिंब शांत, निळ्याशार पाण्यात पडलेलं पाहायला मिळतं. गेरांगरफ्योर्डमधून क्रुझिंग करताना किंवा किनाऱ्यावर विसावलेल्या छोट्या गावांजवळून जाताना जाणवतं की निसर्गाने इथे स्वतःची सर्वात सुंदर कलाकृती निर्माण केली आहे. या निसर्गवैभवाचा कळस गाठायचा असेल तर आणखी उत्तरेकडे जावं. इथे स्कॅन्डिनेव्हियातून आर्क्टिक सर्कल जातं आणि त्या रेषेपलीकडे एक वेगळंच जग उलगडतं. या भागात असंख्य विलक्षण ठिकाणं आहेत, जसं की ट्रॉमसो, होनिंग्सव्हॉग, आल्टा, रोवानिएमी... पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी. इथल्याही कथा, अनुभव आणि अनपेक्षित क्षण तुम्हाला या ठिकाणाच्या प्रेमात पाडतात.

मध्यरात्रीचा सूर्य आणि काळाची जादू: स्कॅन्डिनेव्हियातील उन्हाळ्यातील सर्वात विलक्षण पैलू म्हणजे इथली दृश्यं नव्हेत, तर इथला समर तुम्हाला वेळेकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देऊन जातो. एक दिवस संपला होता. दिवसभर भटकंती करून शरीर थकलं होतं. पायांना विश्रांती हवी होती. पण जेव्हा जेव्हा मी खिडकीबाहेर पाहिलं, तेव्हा समोरचं उजळ आकाश मला सांगत होतं की अजून दुपारच आहे. शरीराला झोप येत होती, पण मन त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. एका क्षणी मी घड्याळात वेळ पाहिली आणि थक्क झाले. जवळजवळ रात्रीचे पावणेबारा वाजले होते आणि तरीही सूर्य क्षितिजावर रेंगाळत होता. काही दिवस मला खरोखरच झोपेसाठी झगडावं लागलं. अखंड प्रकाश जणू मला सतत सांगत होता, आणखी एक फेरफटका मार, आणखी एक फोटो काढ. आणखी एक साहसी अनुभव घे. हा अनुभव एकाच वेळी गोंधळवून टाकणारा आणि जादुई होता. वाटलं की मिडनाईट सन हा इव्हेंट फक्त परिसर बदलत नाही, तर तो तुमचं वेळेशी असलेलं नातं बदलतो. आपण घड्याळाच्या काट्यांवर जगत असतो. दिवस आणि रात्र यांच्या चौकटीत स्वतःला बसवत असतो. पण इथे येऊन जाणवतं की वेळ ही केवळ मोजण्याची गोष्ट नाही; ती अनुभवण्याची गोष्ट आहे. इथे मध्यरात्रीच्या उजळ आकाशाखाली उभं राहण्याचा अनुभव शब्दांत मांडता येत नाही.

जगण्याचं एक तत्त्वज्ञान: स्वीडनमध्ये मिडसोमारच्या उत्सवात मेपोलभोवती नाचणाऱ्या लोकांकडे पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. स्कॅन्डिनेव्हियाची खरी जादू केवळ त्याच्या फ्योर्डस्‌‍मध्ये, भव्य किल्ल््यांमध्ये, किंवा मध्यरात्रीच्या सूर्यात नाही. ती आहे तिथल्या लोकांच्या जगण्याच्या दृष्टिकोनात. डेन्मार्कमधील लोक हायगे जपतात. हे म्हणजे उबदारपणा, आपलेपणा आणि एकत्र वेळ घालवण्याची कला. स्वीडिश लोक लागोमवर विश्वास ठेवतात आणि आयुष्यात प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात असावी, या साध्या पण गहन विषयावर विचार करतात. ते फिका जपतात. कॉफीचा कप, मनमोकळा संवाद आणि धावत्या आयुष्यातला एक छोटासा विराम. नॉर्वेजियन लोक कोसेलिगमध्ये आनंद शोधतात तो साधेपणात, आरामात आणि निसर्गाच्या सान्निध्यात. तर फिनलंडमधील लोक सिसू ही संकल्पना मानतात. ही आहे संकटांसमोर शांतपणे उभं राहण्याची, हार न मानण्याची आणि परिस्थितीवर मात करण्याची अंतःशक्ती. ही सगळी तत्त्वज्ञानं वेगवेगळी असली तरी त्यांचा गाभा एकच आहे. समतोल, निसर्गाशी नातं, सामाजिक भान आणि आयुष्यातील साध्या क्षणांमधला आनंद शोधणं. खरं तर आपल्या सणांच्या मुळाशी सुद्धा ह्याच भावना असतात. एकत्र येणं, कृतज्ञता व्यक्त करणं, ऋतूंचे बदल साजरे करणं, आणि जीवनातल्या छोट्या आनंदांचा आस्वाद घेणं हे तर आपल्याही संस्कृतीचं सार आहे.

तुम्हीही जेव्हा नॉर्डिक देशांना भेट द्याल, तेव्हा केवळ निसर्गसौंदर्याचं कौतुक करून पुढे जाऊ नका. थोडं थांबा. फिका (Fika) चा आस्वाद घ्या. हूगा (Hygge) चा उबदारपणा अनुभवून पाहा. जमलं तर लिके (Lykke)चाही शोध घ्या. लिके म्हणजे डॅनिश भाषेत आनंद! फ्योर्डस्‌‍ची आणि मध्यरात्रीच्या सूर्याची असंख्य छायाचित्रं तुम्ही सोबत घेऊन परताल. पण तुमच्या मनात कायमच्या घर करून राहतील त्या या प्रवासातल्या शांत आठवणी जसं की लाकडी झोपडीत घेतलेली गरम कॉफी, मध्यरात्री उजळलेल्या आकाशाखाली दूरवरून कानावर आलेलं एखाद्या अनोळखी व्यक्तीचं हसू, आणि अचानक मनात उमटलेली ती विलक्षण जाणीव... की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो, तरी मनाच्या तळाशी आपण सगळे या ना त्या मार्गाने एकाच गोष्टीचा उत्सव साजरा करीत असतो...  प्रकाशाचा, आनंदाचा आणि जीवनाचा!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
लोकेशन्स ते लँडमार्क्स
9 mins, read

लोकेशन्स ते लँडमार्क्स

Published in Maharashtra Times Date 21st June, 2026 ...नवीन कॅफेज येतात, तिथले गाईड्स सिनेमाशी संबंधित टूर्स सुरू करतात. मग सोव्हेनियर्समध्येही इतिहासापेक्षा सिनेमाची दृश्यं दिसू लागतात. हळूहळू प्र

या मशीनमध्ये दडलंय काय?
9 mins, read

या मशीनमध्ये दडलंय काय?

Published in Maharashtra Times. Date 31st May, 2026 अनेक वर्षं या मशीनमधून फार पूर्वीच बंद झालेली, 1970 आणि 80 च्या दशकातली पेयं पुरवली जात होती. ती त्यात कोण आणून भरतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्य

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!
9 mins, read

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!

Published in Loksatta Lokrang. Date 31st May, 2026 ...गडद गुलाबी रंगांच्या बोगनवेली उठून दिसत होत्या. सोबत निळ्या कुंड्यांमधली झाडं आणि त्याच्या मागे निळाशार समुद्र असं हे एकदम पोस्टकार्डमध्ये शोभू

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

150+ Veena World Offices
Locate Us
Request a Quote
1800 313 5555
Connect with us

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top