Published in Maharashtra Times 26th July 2026
...या प्रवासात हजारो फुलपाखरे विसाव्यासाठी एखाद्या झाडावर घोळका
करून थांबतात आणि ते झाड फुलपाखरांनी झाकून टाकतात. स्थलांतराचा हंगाम
ऐन भरात असताना या फुलपाखरांमुळे संपूर्ण जंगलच केशरी रंगात न्हाऊन निघतं...
‘द ग्रेट मायग्रेशन’ हे शब्द ऐकताक्षणी आपल्याला लगेच आफ्रिका, तिथली विस्तीर्ण गवताळ कुरणं, त्यातल्या धूळीने भरलेल्या मैदानातून धावणारे हजारो विल्डबीस्टस् आणि मगरींनी भरलेली नदी ओलांडण्याचा त्यांचा प्रयत्न... हे सारं काही एका क्षणात दिसायला लागतं. सर्वात जास्त वेळा कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात आलेल्या जगातल्या वन्यजीव घटनांपैकी एक म्हणून हे स्थलांतर प्रसिद्ध आहे. ‘आयुष्यात एकदा तरी बघायलाच हवं असं दृश्य’ असंही या स्थलांतराचं वर्णन केलं जातं. पण मी जेव्हा ग्रेट मायग्रेशनचा अधिक खोलवर विचार करुन, त्यामागचं तथ्य जाणायचा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आलं की माझ्यासारख्या अनेकांना या घटनेबद्दल फक्त वरवरची माहिती आहे.
‘ग्रेट मायग्रेशन’ म्हणजे फक्त नदी ओलांडण्यातला थरार नाही. ती एक स्वतंत्र अशी घटना नाही, जी एकदाच घडते, तर ती पावसाचे प्रमाण, गवताची वाढ, प्रजननाची पद्धत आणि सर्व्हायवल या सगळ्यावर अवलंबून असलेली, वर्षभर चालणारी वर्तुळाकार इकॉलॉजिकल सायकल आहे, आणि हे समजून घेतल्यानंतर माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला की आपण मायग्रेशन ही फक्त आफ्रिकेपुरती मर्यादित गोष्ट आहे, असं का समजतो? खरंतर मायग्रेशन हे जगभरात सगळीकडे होत असतं. भारतात, महासागरांमध्ये, विविध खंडांमध्ये, प्राणी-पक्षी-सागरी जीव, अगदी कीटकसुध्दा ऋतुंनुसार आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी नेहमीच स्थलांतर करीत असतात. तरीही फक्त आफ्रिकेतील त्या सुप्रसिद्ध मायग्रेशन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मायग्रेशनबद्दल आपण सहसा बोलत नाही. म्हणूनच मला या संकल्पनेविषयी लिहावंसं वाटलं. त्यामागे फक्त ग्रेट मायग्रेशनचं खरं रुप दाखवणं इतकाच उद्देश नाहीये, तर या पृथ्वीच्या पाठीवरती स्थलांतर कसं होतं आणि त्यातून काय घडतं हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग!
द ग्रेट आफ्रिकन मायग्रेशन:
टांझानिया-केनियामधील सेरेंगेटी-मारा इकोसिस्टिममधील सुमारे वीस लाख विल्डबीस्टस्, लाखो झेब्रे आणि गॅझेल्स(हरणे) यांची ॲन्युअल सर्क्युलर मुव्हमेंट म्हणजे ‘द ग्रेट मायग्रेशन’. हे भ्रमण फक्त नॅचरल इन्स्टिंक्टमुळे होत नाही, तर प्रामुख्याने पावसाचं प्रमाण आणि चरण्यासाठी ताज्या गवताची उपलब्धता यावर हे अवलंबून असतं. डिसेंबर-जानेवारी, जो प्रजननाचा काळ असतो तेव्हा हे मायग्रेशनचं चक्र साऊथ सेरेंगेटीमधून सुरू होतं. फक्त काही आठवड्यांच्या काळात लाखो विल्डबीस्टस् एकाच वेळी पिल्लांना जन्म देतात. कारण तेव्हा अल्पकालीन पावसामुळे इथे पिल्लांच्या वाढीसाठी पूरक असलेलं नवीन पोषक गवत मोठ्या प्रमाणावर उगवतं. निसर्गाने प्रजनन आणि पोषण याची जोडी घट्ट जुळवलेली आहे. जसजसा कोरडा हंगाम जवळ येतो आणि दक्षिणेतलं गवत कमी कमी होऊ लागतं, तसतसे हे कळप चांगल्या गवताच्या शोधात हळूहळू उत्तरेकडे आणि पूर्वेकडे सरकू लागतात. वर्षाच्या मध्यापर्यंत त्यातले अनेक ग्रुमेटी नदीपर्यंत आणि नंतर मारा नदीपर्यंत पोहोचतात. आपण अनेकदा डॉक्युमेंटरीमध्ये जे क्रॉसिंग बघतो ते हेच. नदीच्या काठावरची कळपांची अस्वस्थता, अचानक होणारी प्राण्यांची गर्दी, त्यांची धावपळ, पाण्यात दबा धरुन बसलेल्या मगरी हे अतिशय अनिश्चित आणि तितकंच अंगावर येणारं असतं. सर्वच प्राणी यातून वाचत नाहीत. त्यांच्यासाठी नदी ओलांडणं म्हणजे पराक्रम गाजवणं नसतं, तर त्यांचा नाइलाज असतो. केनियाच्या मसाई मारामध्ये चरून झाल्यावर जेव्हा ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास अल्पकालीन पाऊस पुन्हा सुरू होणार असतो, तेव्हा हे कळप हळूहळू दक्षिणेकडे सरकू लागतात. नोव्हेंबर अखेरीपर्यंत बहुतेक सगळे कळप साऊथ सेरेंगेटीत परत येतात आणि आपलं मायग्रेशन सायकल पूर्ण करतात. मायग्रेशन ही अखंड प्रक्रिया आहे, ते सुरू होत नाही आणि थांबतही नाही. ते ऋतुचक्राच्या तालावर पुढे पुढे जात राहतं.
मायग्रेशनची पर्यावरणीय भूमिका लक्षात घेतल्यावर त्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला. सततच्या चराईमुळे गवताची अनिर्बंध वाढ रोखली जाते आणि प्राण्यांच्या शेणामुळे जमिनीची सुपीकताही वाढते. सिंह, तरस, चित्ता, मगरी अशा शिकारी प्राण्यांची संख्याही मायग्रेशनवर अवलंबून असते. मायग्रेशन ग्रासलँड इकोसिस्टीमचा आधार असतं. या नजरेनं पाहू लागल्यावर मग मायग्रेशन हा माझ्यासाठी केवळ वाईल्डलाईफ चमत्कार किंवा आफ्रिकेतला एक नाट्यमय इव्हेंट उरला नाही, तर हवामान, वनस्पती आणि जिवंत राहण्याची धडपड या सगळ्यांनी मिळून, हजारो वर्षांपासून घडवलेली एक जितीजागती, चालती-फिरती सिस्टिम बनून गेलं.
द इंडियन मायग्रेशन:
आफ्रिकेतील ग्रेट मायग्रेशन जगाचं लक्ष वेधून घेत असलं तरी आपल्या देशातही तितकीच विलक्षण स्थलांतरं घडत असतात. भारताची भौगोलिक विविधता थक्क करणारी आहे. हिमालयाच्या रांगांपासून ते लांबलचक किनारपट्टीपर्यंत आणि पाणथळ जमिनीपर्यंत ही विविधता पाहायला मिळते, त्यामुळेच या प्रदेशांमध्ये ऋतुंनुसार होणारी स्थलांतरे घडतात.
यातील सर्वात विलक्षण उदाहरण आहे ते ‘आमूर फाल्कन’ या शिकारी पक्ष्याच्या स्थलांतराचं. आकाराने लहान असलेले हे शिकारी पक्षी दरवर्षी सुमारे 20,000 किलोमीटरचा प्रवास करतात. त्यामुळेच ‘जगातील सर्वात लांब अंतराचं स्थलांतर करणारा शिकारी पक्षी’ अशी त्याची ओळख आहे. या पक्ष्यांचं प्रजनन सायबेरिया आणि उत्तर चायनामध्ये होतं. तिथून ते भारतात नॉर्थ ईस्टमध्ये, नागालँडमध्ये येतात आणि मग पुढे आफ्रिकेच्या दक्षिण भागाकडे जातात. दरवर्षी काही आठवडे नागालँडमधील डोयांग रिझर्व्हायरचं आकाश हजारो फाल्कन्सनी भरून जातं. हे ससाणे अरबी समुद्र ओलांडण्याआधी इथे थांबून विश्रांती घेतात आणि आपलं पोटही भरतात.
नोव्हेंबर ते मार्चमध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आणखी एक नाट्यमय स्थलांतर घडतं. ओडिशाच्या किनाऱ्यावर ‘ऑलिव्ह रिडले टर्टल्स’ हजारोंच्या संख्येनं अंडी घालायला एकत्र येतात. या प्रकाराला ‘अरीबाडा’ म्हणजे ‘मास नेस्टिंग’ असं म्हणतात. हजारो कासवांच्या माद्या शिस्तबद्धपणे काही रात्रींमध्ये किनाऱ्यावर येऊन अंडी घालून परत जातात. काही आठवड्यांनंतर या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात आणि फक्त त्यांच्या नैसर्गिक प्रेरणांवर आणि चंद्रप्रकाशाच्या दिशादर्शनावर विश्वास ठेवत समुद्राकडे निघून जातात. हे स्थलांतर जसं कासवांची ही जात वाढण्यासाठी महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे किनाऱ्यावरच्या मरीन इकोसिस्टिमचा समतोल राखण्यासाठीही आवश्यक आहे.
भारतातल्या शहरांमध्येही मायग्रेशन बघायला मिळतं. दरवर्षी हिवाळ्यात नवी मुंबईतील पाणथळ प्रदेशांत आणि ठाण्याच्या खाडीत हजारो फ्लेमिंगो न चुकता येतात. शहरातील आधुनिक उंच इमारती आणि औद्योगिक वसाहतींच्या पार्श्वभूमीवर विहरणारे गुलाबी पक्ष्यांचे थवे हे मोहक दृश्य, देशातील सर्वात अनपेक्षित वन्यजीव दृश्यांपैकी एक ठरतं. या पक्ष्यांच्या उपस्थितीमुळेच महानगरातील पाणथळ प्रदेशांचं पर्यावरणीय महत्त्व लक्षात येतं.
जगात इतरत्र होणारं मायग्रेशन:
वेगवेगळ्या खंडांमधून आणि महासागरांमधून काही प्रजातीच्या प्रजाती जे स्थलांतर करतात त्यांची व्याप्ती सेरेंगेटीमधील वन्यप्राण्यांच्या स्थलांतराशी स्पर्धा करणारी, अनेकदा या प्राण्यांच्या चिकाटीची परीक्षा बघणारी असते.
नॉर्थ अमेरिकेतील मोनार्क फुलपाखरांचं स्थलांतर हे जगातील सर्वात नाजूक आणि तरीही थक्क करून टाकणाऱ्या नैसर्गिक घटनांपैकी एक मानलं जातं. दरवर्षी लाखो मोनार्क फुलपाखरं कॅनडा आणि नॉर्थ अमेरिकेतून हजारो किलोमीटरचं अंतर पार करुन सेंट्रल मेक्सिकोमधल्या अरण्यात स्थलांतर करतात. या वेळी पार केलं जाणारं अंतर तर उल्लेखनीय आहेच, पण त्याहीपेक्षा अनोखी बाब म्हणजे हा प्रवास करणाऱ्या फुलपाखरांपैकी एकही परतीचा प्रवास करुन मूळ ठिकाणी परत येत नाही. स्थलांतराच्या या चक्रात अनेक पिढ्या सहभागी होतात आणि एकदाची शेवटची पिढी दक्षिणेकडचा तो दीर्घ प्रवास पूर्ण करते. या प्रवासात हजारो फुलपाखरे विसाव्यासाठी एखाद्या झाडावर घोळका करून थांबतात आणि ते झाड फुलपाखरांनी झाकून टाकतात. स्थलांतराचा हंगाम ऐन भरात असताना या फुलपाखरांमुळे संपूर्ण जंगलच केशरी रंगात न्हाऊन निघतं. हे दृश्य इतकं विलक्षण असतं की ते जगभरातील शास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना आकर्षित करतं.
मायग्रेशनचा अगदी आगळावेगळा प्रकार बघायला मिळतो तो साऊथ आफ्रिकेजवळच्या महासागरातील वार्षिक ‘सार्डिन रन’ या घटनेमध्ये. अब्जावधी सार्डिन मासे या किनाऱ्यावर उत्तरेच्या दिशेनं प्रवास करतात. त्यामुळे पाण्यात काही किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेले माशांचे थवे तयार होतात. या पाण्याखालच्या हालचालींमुळे तिथे पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात मोठी सामूहिक फूड चेन निर्माण होते. शार्क, डॉल्फिन्स, व्हेल्स, समुद्रपक्षी मोठ्या संख्येने गोळा होऊन या माशांचा पाठलाग सुरू करतात. त्यामुळे महासागराचं रुपांतर एका डायनॅमिक इकोसिस्टिममध्ये होतं. जमिनीवर होणारं स्थलांतर सहजगत्या पाहायला मिळतं, पण सागरी स्थलांतर मात्र पाण्याच्या खाली होत असल्याने नजरेत भरत नाही. सागरातील जलचरांच्या स्थलांतराबद्दल बोलताना ‘हम्पबॅक व्हेल्स’चा उल्लेख अपरिहार्य ठरतो. हे व्हेल्स थंड पाण्यातील त्यांच्या फीडिंग ग्राउंडपासून ते उष्ण कटिबंधातील त्यांच्या ब्रीडिंग ग्राउंडपर्यंतचा हजारो किलोमीटरचा प्रवास दरवर्षी करतात. ऑस्ट्रेलिया, टोंगा, आइसलँड आणि पॅसिफिकच्या काही भागातील व्हेल वॉचिंगसाठी लोकप्रिय असलेली ठिकाणे या ठराविक मौसमात हमखास होणाऱ्या स्थलांतरामुळेच तर अस्तित्वात आली आहेत.
या उदाहरणांकडे एकत्रितपणे पाहताना त्यातला विशिष्ट पॅटर्न लक्षात येतो. मायग्रेशन म्हणजे फक्त एखाद्या खंडापुरती मर्यादित असलेली प्रेक्षणीय घटना नाही, तर हवामान, अन्नाची उपलब्धता, प्रजनन आणि अस्तित्व टिकवणं या सगळ्याला दिलेला बायोलॉजिकल रिस्पॉन्स आहे. जमिनीवर असो, आकाशात असो किंवा महासागराच्या पृष्ठभागाखाली, पृथ्वीच्या पाठीवरील अनेक प्रजाती सतत बदलणाऱ्या ऋतुचक्राशी जुळवून घेत असतात. ही गोष्ट समजल्यावर स्थलांतराकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच बदलतो. मग स्थलांतर म्हणजे फक्त वन्यजीवांशी निगडित नाट्यमय घटना न राहता जगभरातील इकोसिस्टिम सुरळीत आणि संतुलित चालू राहण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत नैसर्गिक शक्तींमधील एक महत्त्वाची प्रक्रिया बनून जातं.
पण असं का घडतं?
या स्थलांतरांकडे बघताना आपल्याला प्रश्न पडतो की या प्रजाती स्थलांतर का करतात? तर याचं उत्तर आहे अस्तित्व टिकवण्यासाठी. मायग्रेशन म्हणजे काही उगाचच केलेली हालचाल नव्हे किंवा साहसाच्या ओढीनेही ते केलं जात नाही. हजारो वर्षांच्या काळात उत्क्रांत झालेली ती एक बायोलॉजिकल स्ट्रॅटेजी आहे. अन्नाची उपलब्धता, प्रजननासाठीची गरज, हवामानातील फरक आणि शिकारी प्राण्यांचा दबाव या कारणांमुळे प्रामुख्याने स्थलांतर केलं जातं. एकाच जागी थांबून तिथले स्थानिक स्रोत संपवण्यापेक्षा प्राणी ऋतुचक्रानुसार स्थलांतर करणं पसंत करतात, कारण त्यामुळे अधिक पोषक आहार मिळून त्यांचं प्रजनन यशस्वी होतं.
सेरेंगेटीसारख्या गवताळ कुरणांच्या प्रदेशात शाकाहारी प्राणी पावसाच्या चक्रानुसार जागा बदलतात, कारण ताजं गवत उगवण्यासाठी पाऊस आवश्यक असतो, तर सागरी इको सिस्टिममधले देवमासे आणि मासे यांचं स्थलांतर हे तापमानातील फरक आणि प्लँक्टनचा बहर यावर अवलंबून असतं. पक्षी स्थलांतर करतात ते एका गोलार्धातील प्रजननाला अनुकूल असलेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी आणि दुसऱ्या गोलार्धातील अन्नाच्या उपलब्धतेमुळे. अगदी फुलपाखरांसारखे कीटकसुध्दा दिवसाची लांबी आणि तापमानातील फरक याचा अंदाज घेऊनच आपल्या स्थलांतरासाठी अचूक वेळ निवडतात.
या प्रवासासाठी त्यांना काही असामान्य दिशादर्शकांची मदत होते. ज्यात पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, आकाशातील सूर्य आणि ताऱ्यांकडून होणारं मार्गदर्शन आणि आनुवांशिक स्मृतींचा कोश याचा समावेश असतो. अशाप्रकारे स्थलांतर समजून घेतलं की मग एक पर्यटक म्हणून आपला त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आपोआपच बदलतो. मग ते फक्त रिव्हर क्रॉसिंगचं नाट्यमय दृश्य किंवा पक्ष्यांनी भरलेल्या आभाळाचा नजारा राहत नाही, तर एक नैसर्गिक यंत्रणा काम कशी करते याचं ते उदाहरण बनतं. जे आपल्याला जाणीव करुन देतं की मानवी वेळापत्रकापलीकडे ऋतूंच्या तालावर या सृष्टीचा कारभार अखंड चालत असतो. जेव्हा आपण आपल्या प्रवासाचा बेत या लयीशी जुळवतो, तेव्हा आपण फक्त त्या ठिकाणालाच भेट देत नाही, तर तिथे घडणाऱ्या अतिशय गतिमान आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील घटनेचे साक्षीदार होत असतो.
आता याकडे मी कसं बघतो?
मायग्रेशन समजून घेतल्यानंतर प्रवासाबद्दलचा माझा दृष्टीकोन मुळापासूनच बदलला. याआधी मी एखाद्या ठिकाणाचा विचार करताना हवामानाचा विचार करायचो. आता मात्र मी स्वतःला वेगळाच प्रश्न विचारतो की मी तिकडे जाईन तेव्हा तिथे काय घडत असेल? ईस्ट आफ्रिकेतील ग्रेट मायग्रेशन मधलं तुम्हाला काय पाहायला मिळेल हे तुम्ही कोणत्या महिन्यात जात आहात यावर अवलंबून असतं. साऊथ सेरेंगेटीमधला प्रजननाचा हंगाम आणि मारा रिव्हर क्रॉसिंग हे अगदीच भिन्न अनुभव आहेत. ओडिशामधलं टर्टल नेस्टिंग हे फारच कमी कालावधीत घडतं. नागालँडमध्ये आमूर फाल्कन हे त्यांच्या पुढील प्रवासाआधी अगदी अल्पकाळ थांबतात. व्हेल्सचं दर्शन हे त्यांच्या फीडिंग आणि ब्रीडिंग सायकलवर अवलंबून असतं. ही सर्व आकर्षणे विशिष्ट काळातच पाहायला मिळतात.
प्रवास म्हणजे केवल भूगोल नव्हे याची जाणीव मला मायग्रेशनमुळे झाली. त्यात टाइमिंग अतिशय महत्त्वाचं आहे. एखादा भूभाग एका ऋतूत अतिशय साधारण दिसेल, पण तोच भाग दुसऱ्या ऋतूत मात्र पूर्णपणे रुप पालटून आपल्यासमोर येऊ शकतो. कधी किनारपट्टीचं रुपांतर ब्रीडिंग ग्राउंडमध्ये होतं, कधी एखादी पाणथळ जागा स्थलांतरित पक्ष्यांनी भरून गेलेली पाहायला मिळते, तर कधी महासागराचा एखादा पट्टा फीडिंग कॉरिडरमध्ये परिवर्तित होतो. जेव्हा या नैसर्गिक चक्रांबरोबर मी माझा प्रवास जुळवून घेतो, तेव्हा मी फक्त एखाद्या ठिकाणाला भेट देत नाही, तर तिथे घडणाऱ्या इकॉलॉजिकल घटनेच्या ऐन भरातील काळाचा साक्षीदार होत असतो. मायग्रेशनच्या अनुभवामुळे निसर्गातील अनिश्चिततेबद्दल मी अधिक जागरूक झालो. म्युझियम्स किंवा स्मारकांप्रमाणे मायग्रेशन हे आपल्या सोयीच्या वेळी होत नाही (पाहता येत नाही). हवामानातील बदलांमुळे त्यांचे पॅटर्न्स बदलू शकतात. नद्यांची पातळी बदलेल, त्याप्रमाणे क्रॉसिंगच्या जागा बदलू शकतात. निसर्ग कोणत्याही परफॉर्मन्सची खात्री देत नाही आणि तेच त्याचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. आपण जे बघतो ते कुणीतरी लिहिलेलं, ठरवलेलं नसतं, तर अगदी नैसर्गिकपणे आणि उत्स्फूर्तपणे आपल्यासमोर घडत असतं. इकोसिस्टिम्स एकमेकींशी अंतर्गतपणे अशाप्रकारे जोडलेल्या असतात की ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. भारतात विश्रांती घेणारा पक्षी सायबेरियाहून आलेला असू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीजवळ दिसणाऱ्या व्हेलने काही महिन्यांपूर्वी अंटार्क्टिकाच्या पाण्यात अन्न मिळवलेलं असू शकतं. भूगर्भातील हालचालींमुळे खंड एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळे हवामान जोडलं जातं, समाज जोडले जातात. या नजरेनं पाहिलं तर पर्यटन म्हणजे फक्त यादीतल्या ठिकाणांवर टिकमार्क करणं नव्हे, तर या विशाल जगाला आकार देणाऱ्या निसर्ग, समाज आणि संस्कृतीची व्यापक लय समजून घेणं. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!



































Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.