India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

नावात काय आहे?

9 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
9 Mins Read
July 29, 2026
July 29, 2026

Quick Summary

नावांच्या अर्थांमागे कथा असतात, म्हणून प्रवासाला जाताना ठिकाणांच्या नावांची उत्पत्ती जाणून घ्या.

चिली हे नाव बहुधा ‘आयमारा’ भाषेतील ‘चिरी’ म्हणजे ‘थंड’ किंवा ‘त्चिली’ म्हणजे ‘जमिनीचा अंत’ यावरून आले असावे.

चिलीमध्ये अटाकामा वाळवंटातील स्वच्छ आकाशाखाली स्कायगेझिंग करा आणि अँडीजच्या पायथ्याशी वाईनचा आस्वाद घ्या.

पेरूच्या नावाची उगमकथा अस्पष्ट असली तरी बाजारपेठा, हस्तकला आणि अँडीज वाऱ्याचा सुगंध अनुभवून त्याचा अर्थ जुळतो.

आइसलँड आणि ग्रीनलँडच्या नावांमागे दिशाभूल करणारी दंतकथा असली तरी इतिहासकारांच्या मते हवामानानुसार नावे पडली असावीत.

आइसलँडमध्ये नॉर्दर्न लाईट्स पाहत हॉट स्प्रिंग्जमध्ये डुंबा आणि ग्रीनलँडमध्ये हिमनगांच्या जवळून कयाकिंग करा.

Published in 26th July 2026, Loksatta Lokrang

...आइसलँड हिरव्यागार शेवाळ्याने नटलेला आहे, तर ग्रीनलँड

बर्फात गोठलेला टुंड्रा प्रदेश आहे. आक्रमकांची दिशाभूल

करण्यासाठी वायकिंग्जनी ही नावांची अदलाबदल केली...

“ तुमचं नाव छान आहे. त्याचा अर्थ काय?” शिकागोमध्ये अमेरिकन ट्रॅव्हल इंडस्ट्रीच्या वार्षिक कार्यक्रमाला गेले होते. बिझनेस कार्डस्‌‍ची देवाणघेवाण, कॉफीपानासोबत रंगणाऱ्या चर्चा, मार्केटिंग डेस्कवर अंथरलेले नकाशे आणि तिथेच आकार घेणारे नवनवीन व्यावसायिक संबंध... यांनी असे कार्यक्रम भरलेले असतात. अशाच एका डेस्कपाशी आम्ही नवनवीन ठिकाणे, पर्यटकांसाठी सुविधा, आकर्षणे, सध्या काय ट्रेंडिंग आहे... याबद्दल बोलत होतो. त्या दरम्यान, एकाने मला अचानक हा प्रश्न विचारला. या अनपेक्षित प्रश्नाने मी काही क्षण गोंधळले. मग हसून त्याला म्हणाले, “हे भगवान श्रीकृष्णाच्या नावाचं स्त्रीलिंगी रूप आहे. त्याचं इंग्रजीत शब्दशः भाषांतर केलं तर, सुनीला म्हणजे गुड ब्ल्यू.” त्यावर तो हसला आणि म्हणाला, “ओके, सी यू, गुड ब्लू!”

तो संवाद माझ्या मनात रेंगाळत राहिला. त्याचं आणखी एक कारण म्हणजे नावं कशी तयार होतात, याबद्दलचा एक पॉडकास्ट मी तेव्हा नुकताच ऐकला होता. त्यात सांगितलं होतं की अनेक नावं त्यांच्या अर्थावरून ( जसं की नियती म्हणजे भाग्य, जितेश म्हणजे सर्वांवर विजय मिळवणारा) पूर्वजांच्या नावावरून जसं की (रिचर्ड पहिला, रिचर्ड दुसरा), देवदेवतांच्या नावावरून (आदित्य म्हणजे सूर्य) किंवा जन्मस्थानावरून पडलेली असतात. आणि ते ऐकल्यावर माझ्या मनात आलं की आपल्यासाठी व्यक्तींची नावं इतकी महत्त्वाची असतात, तर मग आपण ज्या ठिकाणी प्रवासाला जातो त्या ठिकाणांच्या नावांमागे दडलेली कथा किती रंजक असेल? तेव्हा या आठवड्यात आपण हीच नावांची चर्चा पुढे नेऊया आणि वेगवेगळ्या देशांच्या नावांच्या जन्मकथा ऐकूया.

चिली: आग आणि बर्फाची लांबलचक, अरुंद भूमी - मिरचीच्या आकाराच्या चिलीचा उत्तर ते दक्षिण हा पसारा तब्बल 4300 किलोमीटर आहे. काही ठिकाणी हा देश एवढा अरुंद आहे की गाडीने दोन तासात एका सीमेवरून दुसऱ्या सीमेपर्यंत पोहोचता येतं. त्याचं हे नाव बहुधा ‌‘चिरी‌’ या ‌‘आयमारा‌’ भाषेतील शब्दावरून आलं असावं. त्याचा अर्थ ‌‘थंड‌’. तर काहींच्या मते, त्याच भाषेत ‌‘त्चिली‌’ म्हणजे ‌‘जमिनीचा अंत‌’. दोन्ही अर्थांनी चिलीचा भूगोल साजेसा आहे. चिलीच्या उत्तरेला जगप्रसिद्ध अटाकामा वाळवंट आणि दक्षिणेला पॅटागोनियाचे ग्लेशियर्स, फ्योर्डस आणि बर्फाच्छादित प्रदेश आहेत. एकाच देशात निसर्गाची टोकाची रूपं पाहायला मिळतात. इंग्रजीत त्याचा उच्चार ‌‘चिली‌’ असा होतो आणि तो देश नकाशावर दिसतोही तसाच मिरचीसारखा.

जायलाच हवे कारण: अतिकोरडे अटाकामा वाळवंट, पॅटागोनियातील गोठलेल्या निळ्याशार हिमदऱ्या, समुद्रकिनारे... असलेल्या चिलीत तुम्ही पृथ्वीवरील सर्वात स्वच्छ आकाशाखाली स्कायगेझिंग करू शकता, किंवा अँडीज पर्वतरांगांच्या पायथ्याशी वाईनचा आस्वाद घेऊ शकता. नाव जरी तिखट वाटत असलं, तरी चिलीचे अनुभव मात्र निसर्गाच्या विविध रंगांनी भरलेले आहेत.

पेरू: रहस्यमय गोड नाव - साऊथ अमेरिकेत चिलीच्या अगदी उत्तरेला वसला आहे पेरू हा देश. ‌‘पेरू‌’ हे नाव नेमकं कुठून आलं याची फारशी कोणाला माहिती नाही. स्पॅनिश लोकांना पनामामध्ये भेटलेल्या बिरू नामक स्थानिक प्रमुखावरून हे नाव रूढ झालं असावं, असा एक प्रवाद आहे. तर काहींच्या मते, पेरू हा एखाद्या स्थानिक शब्दाचा झालेला अपभ्रंश आहेे. पण हिंदीत ‌‘पेरू‌’ म्हणजे रसाळ, रंगीबेरंगी आणि तुरट-गोड चवीचं फळ! ‌‘पेरू‌’च्या बाजारपेठांमधून फिरताना पिकलेल्या फळांचा सुगंध, हस्तकला आणि अँडीज पर्वतरांगांमधून येणाऱ्या वाऱ्याचा गंध अनुभवताना हा अर्थ आणखीनच समर्पक वाटतो.

जायलाच हवे कारण: जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या माचू पिचूचं सौंदर्य खास आहे. त्या जोडीला इंका सम्राज्याची राजधानी असलेल्या कुस्को गावाची सैर करता येते. पारंपरिक पेय चिचा मोराडाची चव घेता येते.

आइसलँड आणि ग्रीनलँड: दिशाभूल करणारी नावं - जगातील नावांशी संबंधित गोष्टींमधली ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. नकाशात पाहिल्यावर आपल्याला एक विरोधाभास चटकन दिसतो. आइसलँड हिरव्यागार शेवाळ्याने नटलेला आहे, तर ग्रीनलँड बर्फात गोठलेला टुंड्रा प्रदेश आहे. एक लोकप्रिय दंतकथा सांगते की आक्रमकांची दिशाभूल करण्यासाठी वायकिंग्जनी ही नावांची अदलाबदल केली. पण इतिहासकारांच्या मते, त्यांना आइसलँडमध्ये बर्फ प्रथम दिसला असावा, म्हणून ते आईसलँड, तर ग्रीनलँडच्या किनाऱ्यावर उन्हाळ्यात दिसणाऱ्या हिरवळीच्या पट्ट्यामुळे त्याला ग्रीनलँड हे नाव मिळालं असावं.

जायलाच हवे कारण: आइसलँडमध्ये नॉर्दर्न लाईट्सच्या साक्षीने हॉट स्प्रिंग्जमध्ये डुंबता येतं. ग्रीनलँडमध्ये हिमनगांच्या जवळून कयाकिंग करायला मजा येते. यासोबत इनुइटांच्या संस्कृतीतील हजारो वर्षं जुन्या लोककथा ऐकता येतात.

टर्की: पक्ष्याचं नाव की देशाचं? - टर्की या देशाचा आणि पक्ष्याचा काहीही संबंध नाही. या देशाचे नाव ‌‘तुर्किया‌’ या लॅटिन शब्दावरून आले आहे. त्याचा अर्थ ‌‘तुर्कांची भूमी‌’. मात्र ‌‘टर्की‌’ या पक्ष्याला हे नाव मिळालं ते युरोपीय व्यापाऱ्यांच्या गैरसमजामुळे. त्यांना वाटलं की हा पक्षी युरोपमध्ये आला तो तुर्कस्तानमधील व्यापारी मार्गाने. पण प्रत्यक्षात हा आलाय अमेरिकेतून. शब्दांचा आणि नावांचा प्रवास व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कसा घडतो याचं हे उदाहरण. आता तर तुर्कस्तानने त्यांच्या देशाचं अधिकृत नाव ‌‘तुर्किये‌’ असं केलं आहे.

जायलाच हवे कारण: भव्य ब्लू मॉस्क्स, बोस्फोरसमधील क्रुझ, कॅपाडोशियामधील अद्भुत गुहांचा निसर्गरम्य प्रदेश आणि हॉट एअर बलूनचा आनंद घ्यायचा असेल तर पूर्व आणि पश्चिमी संस्कृती व परंपरांचा संगम साधणाऱ्या या देशाला जरूर भेट द्या.

जपान: उगवत्या सूर्याचा देश - जगाच्या पूर्वेकडे असं म्हटलं की समोर येतो तो जपान. ‌‘जपान‌’ या शब्दाची उत्पत्ती चिनी भाषेतील ‌‘रिबेन‌’ या शब्दापासून झाली आहे. त्याचा अर्थ ‌‘सूर्याचा उदय‌’. म्हणूनच जपानला ‌‘उगवत्या सूर्याचा देश‌’ म्हणतात. जपानी भाषेत या देशाला ‌‘निहोन‌’  किंवा ‌‘निप्पॉन‌’ म्हणतात. हाकोनेच्या पर्वतांवरून होणारा सूर्योदय असो किंवा क्योटोच्या शांत सकाळी अलगद पसरणारी कोवळी सूर्यकिरणे, जपान आपल्याला प्रत्येक नव्या सुरुवातीतलं सौंदर्य अनुभवायला शिकवतो.

जायलाच हवे कारण: टी हाऊसमध्ये माचा टेस्ट करायला, टोकियोतील निऑनच्या दिव्यांच्या झगमगाटात हरवून जायला, शिंकान्सेन बुलेट ट्रेनचा प्रवास करीत वेग आणि शिस्त यांचा अनुभव घ्यायला जपानला जायलाच हवं.

कॅनडा: एका छोट्याशा गावापासून राष्ट्रापर्यंतचा प्रवास! - ‌‘कॅनडा‌’ या नावाचा उगम सेंट लॉरेन्स इरोक्वायन भाषेतल्या ‌‘कनाटा‌’ या शब्दातून झाला. त्याचा अर्थ ‌‘गाव‌’. सोळाव्या शतकात जॅक कार्टियर या प्रदेशात आला तेव्हा तिथल्या स्थानिकांनी त्याला एका गावाचा रस्ता दाखविण्यासाठी ‌‘कनाटा‌’ हा शब्द वापरला. मात्र कार्टियरला त्या संपूर्ण प्रदेशाचं नाव ते वाटलं. हा गैरसमज इतिहासात नोंदला गेला आणि त्याचंच पुढे ‌‘कॅनडा‌’ झालं.

जायलाच हवे कारण: पश्चिमेकडील रॉकी पर्वतरांगांपासून ते क्युबेक सिटीच्या दगडी रस्त्यांपर्यंत कॅनडा विस्तारलेला आहे.

मोरोक्को: पश्चिमेचं साम्राज्य - अरबी भाषेत मोरोक्कोला ‌‘अल-मगरीब‌’ म्हणतात. त्याचा अर्थ पश्चिम. इस्लामिक जगाच्या सगळ्यात पश्चिमेकडील टोकाला वसलेली ही भूमी आहे. त्याचं इंग्रजी नाव या देशाच्या ‌‘माराकेश‌’ या एकेकाळच्या राजधानीच्या शहरावरून आलं आहे. म्हणजेच मोरोक्कोची दोन नावं आणि दोन ओळखी आहेत. म्हणूनच हा विरोधाभासांचा देश वाटतो.

जायलाच हवे कारण: फेझच्या गजबजलेल्या सूक म्हणजे बाजारपेठांमध्ये फिरण्यासाठी, निळाई ल्यालेल्या शहरात पुदिन्याच्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी आणि मेर्झूगाच्या वाळवंटात सूर्यास्त पाहण्यासाठी इथे जायलाच हवं

न्यूझीलंड: माओरी भूमीला, डचांनी दिलेलं नाव -

17 व्या शतकाच्या सुमारास डचांनी या भागाचं नाव ‌‘नोव्हा झीलँडिया‌’ - ‌‘न्यूझीलंड‌’ असे ठेवले. त्याला पार्श्वभूमी होती ती ‌‘झीलंड‌’ (समुद्रभूमी) या डच प्रांताच्या नावाची. पण या इथे युरोपियन येण्याच्या कित्येक शतकांपूर्वी माओरींनी या देशाला ‌‘आओटेआरोआ‌’ हे नाव  दिलंय, ज्याचा अर्थ आहे ‌‘लांब पांढऱ्या ढगांची भूमी‌’.

जायलाच हवे कारण: दक्षिण बेटावरील भव्य फ्योर्डस्‌‍ आणि बर्फाच्छादित पर्वतरांगा, उत्तर बेटावरील ज्वालामुखीचे पठार पाहण्यासाठी आणि ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली पडून माओरींच्या लोककथा ऐकण्यासाठी इथे जा.

भारत (इंडिया): एका नदीपासून मिळालेलं नाव - 

आता आपण आपल्या देशाकडे वळूया. आपल्या भारताला इंडिया हे नाव इंडस नदीमुळे मिळालं. संस्कृतमधील सिंधू हा शब्द पर्शियन भाषेत हिंदू झाला. ग्रीकांनी त्याला इंडोस म्हटलं. पुढे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी ‌‘इंडिया‌’ या नावाला पसंती दिली. पण ही भूमी म्हणजे फक्त इंडिया नाही, तो भारत आहे. भारतात हजारो नावांच्या, हजारो कथांच्या आणि हजारो संस्कृतींच्या वाटा एकत्र येतात. देवांवरून नामकरण झालेली शहरे, नद्यांवरून नावं मिळालेली राज्यं, कवी, संत, विचारवंत आणि तत्त्वज्ञानाच्या स्मृती जपणारे रस्ते... या सगळ्यांचा मिळून भारत बनलाय.

भारतभ्रमण करायलाच हवे कारण: भारत ही एकच कथा नाही. तो हजारो कथांनी विणलेला एक अनुभव आहे. म्हणूनच भारत पूर्णपणे अनुभविण्यासाठी एक जन्म अपुरा आहे!

असो, माझ्या त्या अमेरिका दौऱ्याबद्दल पुन्हा कधीतरी विस्ताराने लिहीन, पण फेअरबँक्समधील एका सांस्कृतिक केंद्रात घडलेला रंजक प्रसंग सांगते. आम्ही तिथे अथाबास्कन संस्कृतीविषयी जाणून घेत होतो. सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान एका स्थानिक कलाकाराने स्वतःची ओळख करून दिली. तो म्हणाला, “माझं नाव हेनोकेटनेह. त्याचे तीन अर्थ आहेत- विसरभोळा, विस्मृतीत गेलेला, किंवा लोकांना दुःख विसरायला लावणारा.” तो हसून पुढे म्हणाला, “मला तिसरा अर्थ आवडतो. मी माझं आयुष्य तसंच जगण्याचा प्रयत्न करतोय.” दैनंदिन जीवनात तो ट्रेविस हे नाव वापरत होता, पण माझ्या तो लक्षात राहिला ते ‌‘हेनोकेटनेह‌’ म्हणूनच. नावांमध्येही जबाबदारीचं भान, भावना दडलेल्या असतात याची मला पुन्हा एकदा जाणीव झाली.

अशी ठिकाणांची नावं आपल्या प्रवासाला वेगळा अर्थ देतात. नावांचे बोर्डस्‌‍ म्हणजे फक्त अक्षरं नसतात, तर ते जागेच्या इतिहास आणि वर्तमानाचे दिशादर्शक असतात. जणू काही हे त्या जागेच्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणारे वाटाडे असतात. म्हणून जाता जाता एक प्रश्न तुम्हालाही विचारते, ‌‘कोणत्याही प्रवासात तुम्हाला एखाद्या नावाने असं झपाटलं आहे का? असं नाव जे काळ उलटला तरीही तुमच्या मनात कायम आहे? किंवा असं एखादं नाव, ज्या फक्त नावाच्या मोहिनीमुळे तुम्हाला त्या ठिकाणी जावंसं वाटलंय?‌’ असेल तर मला नक्की कळवा.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
नॉर्थ ईस्ट बहुरंगी भारताचा आगळावेगळा चेहरा!
9 mins, read

नॉर्थ ईस्ट बहुरंगी भारताचा आगळावेगळा चेहरा!

Published in Sakal Saptrang 6th September 2026 फेस्टिव्हल ऑफ फेस्टिव्हल्स! दरवर्षी डिसेंबरमध्ये नागालँडच्या किसामा हेरिटेज व्हिलेजमध्ये ‌‘हॉर्नबिल फेस्टिव्हल भरतो‌’, जिथे राज्यातील जवळपास सगळ्या

आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल.  वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल
9 mins, read

आय ॲम अनस्टॉपेबल! मी. माय वर्ल्ड. माय ट्रॅव्हल. वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल

Published in Maharashtra Times 6th September 2026 लेट्स ब्रेक बॅरिअर्स अँड रॉक द वर्ल्ड! काही वर्षांपूर्वी एक प्रश्न नेहमी ऐकायला मिळायचा, “माझ्यासोबत यायला कुणी नाही, मग मी कशी जाऊ?” आज तो प्रश

अपेक्षपलीकडचं वास्तव
9 mins, read

अपेक्षपलीकडचं वास्तव

Published in Maharashtra Times 6th September 2026 ...कारण त्यात कोणतंही अंतर पार करायचं नसतं, कुठल्याही शिखरावर पोहोचायचं नसतं, काहीतरी ‌‘करायचंच‌’ याचं प्रेशर नसतं. हा एक साधा अनुभव असतो... जेव

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!