We Just Opened 3 New Branches!
We're Open, now in Vadodara, Kochi & Nungambakkam (Chennai).
India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

गोष्ट सिसिलीची!

8 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
8 Mins Read
July 29, 2026
July 29, 2026

Quick Summary

प्राचीन ग्रीक ॲम्फिथिएटरमध्ये बसल्यावर सर्व बाजूंनी रंगमंच दिसतो आणि पार्श्वभूमीवर माऊंट एटना नजर पडतो.

टेस्टा दि मोरो सिरॅमिक कुंड्यांच्या सौंदर्याला भुलू नका, कारण त्यांच्या मागे भेसूर दंतकथा दडलेली आहे.

टेस्टा दि मोरोच्या कथांमध्ये प्रेम, फसवणूक आणि निष्ठा यांचा संगम आहे, म्हणून या परंपरेचा अर्थ समजून घ्या.

सिसिलीला फक्त आयलंड न मानता विविध संस्कृतींचं मल्टी लेयर्ड मोझाईक समजा, कारण फिनिशियनपासून अरबपर्यंत अनेक वारसे इथे दिसतात.

रोमन भूतकाळाच्या खुणा, जसे दगड, भिंती, स्नानगृहे आणि राजवाडे, पाहण्यासाठी वेळ काढा आणि इतिहासाचा थर अनुभवून घ्या.

सिसिलीमध्ये स्थानिकांचा स्नेह आणि समाजकेंद्री वागणूक अनुभवण्यासारखी आहे, त्यामुळे संवादासाठी थोडा वेळ राखून ठेवा.

Published in Loksatta Lokrang 19th July 2026

...या प्राचीन ग्रीक प्रेक्षागृहाची रचना भारी आहे. तिथे विराजमान

झालो की आपल्याला सर्व बाजूंनी रंगमंच दिसतो आणित्याच्या पार्र्श्वभूमीवर दूर ‌‘माऊंट एटना‌’ दिसतो...

तेअरेबिक मूरिश चेहरे होते. त्यांना शोभेच्या कुंड्यांचा आकार देण्यात आला होता. ते न्याहाळत असताना माझ्या मनात मात्र, ‌‘आपण इटलीत असताना हे अरेबिक चेहरे इथे काय करताहेत?‌’ या प्रश्नाने थैमान घातलं होतं. माझी ही उत्सुकता आमच्या गाईडच्या लक्षात आली. तो म्हणाला, “त्या कुंड्यांच्या सौदर्याला भुलू नका. त्यांच्यामागची कहाणी मोठी भयंकर आहे.” एव्हाना माझं कुतूहल आणखी वाढलं होतं. “आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतलेल्या साथीदारानेच फसवणूक केली तर त्याला काय शिक्षा कराल? जाब विचाराल की त्यांचे मुंडकेच छाटून टाकाल?” गाईडच्या या अनपेक्षित प्रश्नाने मला धक्काच बसला. माझ्या भांबावलेल्या चेहऱ्याकडे बघत त्याने ‌‘टेस्टा दि मोरो‌’ची गोष्ट सांगितली.

‌‘टेस्टा दि मोरो‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिरॅमिकच्या कुंड्यांवर हाताने रंगकाम केले जाते. याच्याशी निगडित दोन दंतकथा सांगितल्या जातात. त्यातली पहिली कथा भेसूर आहे. 11व्या शतकात पालेर्मोमध्ये एका अरबी वस्तीत, एक तरूण मूर, सिसिलियन तरुणीच्या प्रेमात पडला. त्याने ते प्रेम व्यक्तही केलं. ती तरूणीही त्याच्या भावनांना प्रतिसाद देऊ लागली. पण त्या मूरचं लग्न झालेलं होतं ही गोष्ट त्याने त्या तरुणीपासून लपवली होती. त्याचं कुटुंब त्याची वाट पाहतंय हे समजताच त्याच्या विश्वासघाताबद्दल तिने त्याला झोपेतच ठार केलं आणि तो तिला कधीही सोडून जाऊ नये म्हणून त्याचं शीर धडापासून वेगळं करून त्याचं रूपांतर फुलदाणीत केलं. त्यात तुळशीचं रोप लावलं. ते तुळशीचं रोप जोमाने वाढलं. त्यातूनच प्रेरणा घेऊन शेजाऱ्यांनी तशाच डोक्याच्या आकाराच्या सिरॅमिकच्या कुंड्या तयार करण्यास सुरुवात केली. आणि ‌‘टेस्टा दि मोरो‌’(मूरचे डोके) ही सिसिलियन परंपरा सुरू झाली.

तर दुसऱ्या तुलनेने सौम्य कथेत, एक अरबी (मूर) व्यापारी आणि उच्चभ्रू खानदानातील सिसिलियी स्त्री यांचं परस्परांवर प्रेम होतं. कालांतराने त्या व्यापाऱ्याला घरी परतावं लागणार होतं. पण त्या दोघांनाही एकमेकांपासून दूर राहणं असह्य वाटलं आणि त्यांनी कायम एकत्र राहण्याची शपथ घेतली. त्यांच्या या अढळ प्रेमाच्या प्रीत्यर्थ गावकऱ्यांनी त्या दोघांच्या सिरॅमिकच्या कलात्मक अर्धपुतळ्यांची निर्मिती करून ते घरांच्या बाल्कनीत आणि उद्यानात ठेवण्यास सुरूवात केली. आजही हे पुतळे प्रेम, समृद्धी आणि निष्ठेचे प्रतीक म्हणून जपले जातात.

कोणत्याही प्रवासातल्या अशा गोष्टी, आपल्या आठवणी अधिकाधिक समृद्ध करतात. इटलीत तर अशा कितीतरी गोष्टी आहेत. तिथले दगड, रोमन भिंती, ॲम्फिथिएटर, स्नानगृहे आणि राजवाडे असे सगळेच वैभवशाली भूतकाळाचे साक्षीदार आहेत. सिसिलीत रोमन साम्राज्यांच्या बरोबरीनेच आणखीही काही संस्कृती आणि साम्राज्यांची झलक पाहता येते. त्या दृष्टीने सिसिली म्हणजे केवळ एक आयलंड नसून ते विविध साम्राज्यांचे मल्टी लेयर्ड मोझाईक आहे. त्या साम्राज्यांच्या खुणा इथल्या स्थानिकांच्या जगण्यावर अजूनही उमटलेल्या दिसतात.

सिसिलीयन मंडळी बाकीच्या इटलीपेक्षा वेगळी कशी?        

मेडिटेरेनियन सी मध्ये वसलेल्या सिसिलीने तीन हजार वर्षांच्या इतिहासात विविध संस्कृतींची झलक अनुभवलेली आहे. फिनिशियन, ग्रीक, रोमन, बायझेंटाईन, अरब, नॉर्मन, स्पॅनिश आणि इटली या प्रत्येकाचे भाषा, वास्तुकला, खाद्यसंस्कृती आणि चालीरीती यावरील संस्कार अमीट आहेत. ग्रीकांनी सिराक्यूससारखी शहरे वसवली, भव्य नाट्यगृहे उभारली. रोमन लोकांनी प्रशस्त व्हिलाज्‌‍ बांधले, जलवाहिन्यांचे जाळे अंथरले. नॉर्मन लोकांनी उत्तर युरोपीय शैली, इस्लामिक कला यांचे मिश्रण करून पालेर्मोच्या चर्चमध्ये नेत्रदीपक मोझाइकची निर्मिती केली. असे हे समृद्ध सिसिली सन 1861 पासून एकसंध इटलीच्या अधिपत्याखाली आले. तरीही सिसिलीने स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपली.

इथल्या वास्तव्यात मला स्थानिकांचा स्नेह सगळ्यात जास्त भावला. मुख्य भूमी असलेल्या इटलीशी त्यांचे काही अंशी सांस्कृतिक ऋणानुबंध असले तरी इथल्या परंपरा, रीती यावर उत्तर आफ्रिकी, मध्य पूर्व आणि स्पॅनिश वारशाचा पगडा अधिक आहे. हा पगडा आपल्याला खाद्यसंस्कृती, बोलीभाषा आणि सण यामध्येही दिसतो. सिसिलियी मंडळी प्रेमळ आहेत. त्यांचा व्यवहार, त्यांचं वागणं समाजकेंद्री आहे. असं असूनही त्यांचा बाणा स्वतंत्र आहे. शतकानुशतके आत्मनिर्भर असल्याने त्यांच्यात अभिमानी वृत्तीही उपजत आहे.

सिसिली आहे कुठे आणि तिथे जायचं कसं?

युरोपच्या दक्षिण भागात इटली आहे. इटलीच्या एका टोकावर, युरोप आणि आफ्रिका यांच्या बरोबर मध्यभागी आहे रमणीय सिसिली. मेडिटेरेनियन सी मधील सगळ्यात मोठं आयलंड असलेल्या सिसिलीमध्ये माऊंटन्स, सुपीक मैदानी भाग आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा यांचं भन्नाट मिश्रण आहे. तिथल्या पर्वतावरच युरोपमधील सर्वात उंच आणि सक्रिय ज्वालामुखी ‌‘माऊंट एटना‌’ आहे. सिसिलीला टायरेनियन, आयोनियन आणि मेडिटेरेनियन अशा तिन्हीही सागरांचे सान्निध्य लाभलेले आहे.

सिसीलीची जडणघडण या आयलंडवरील जागृत ज्वालामुखींमुळे काही प्रमाणात अग्नीशी निगडित आहे. त्या ज्वालामुखीच्या लाव्ह्यामुळेच एटनाचा उतार एकदम सुपीक झाला आहे. त्या खनिजयुक्त जमिनीत द्राक्षे, ऑलिव्ह आणि संत्री, मोसंबी यांच्या बागा बहरल्या आहेत. युरोपातील वेगवगेळ्या शहरांतून आपण थेट विमानाने सिसिलीत येऊ शकतो. किंवा इटलीतून मेसिनाची सामुद्रधुनी ओलांडत रेल्वे आणि फेरीबोटीच्या मदतीनेही सिसिली गाठता येतं.

कॅटानिया- सुरुवात इथूनच हवी!

आम्ही कॅटानियाला पोहोचलो आणि लगेचच या भन्नाट बेटाचं रंगरुप जाणून घेण्याच्या सफरीवर निघालो. या शहराचा मध्यभाग एखाद्या रंगमंचासारखा आहे. लाव्ह्यामुळे तयार झालेल्या दगडांनी त्याचा दर्शनी भाग घडवलेला आहे. तिथून आम्ही थेट निघालो ते पियाझा डुओमोकडे. तिथले कॅटानिया कॅथेड्रल प्रसिद्ध आहे. बारोक शैलीतील त्याच्या भव्य वक्राकार रचनेला आणि संगमरवरावरील नक्षीकामाला दुपारच्या उन्हाने अद्भुत झळाळी बहाल केलेली होती.

कॅटानिया दिसते सुंदर आणि आपल्या पोटापाण्याचीही काळजी घेते. इथला ‌‘मेर्काटो देला पेश्केरिया‌’ हा मासळी बाजार प्रसिद्ध आहे. ऑक्टोपस, स्वोर्डफिश आणि शिंपल्यांनी खचाखच भरलेल्या स्टॉल्समधून आम्ही फेरफटका मारला. एवढे मासे पाहिल्यावर दुपारच्या जेवणाचा बेत स्पष्टच होता. ताज्या माशांसोबत अरांचिनी (मुख्यत: तांदळापासून बनवलेले कुरकुरीत तळलेले गोळे. त्यात, चीज, भाज्या किंवा मासे यांचे सारण भरलेले असते.) त्यानंतर, खास सिसिलीयन स्वीट कॅनोली याचा आस्वाद घेतला. कॅनोली म्हणजे एक प्रकारची पेस्ट्री. मैद्यापासून बनवलेल्या नळीच्या आकाराच्या, तळून कुरकुरीत केलेल्या आवरणात गोड आणि मलईदार रिकोटा चीज, व्हॅनिला, दालचिनी, चॉकलेटचे तुकडे, पिस्ता किंवा साखरेच्या पाकातील फळांचे तुकडे यांचे सारण असते. आम्ही भोजनाची सांगता कसाटा सिसिलियाना या रंगीबेरंगी केकने केली.

सिसिलीच्या अनेक आवडत्या पदार्थांचे मूळ9व्या ते 11व्या शतकात या आयलंडवर असलेल्या अरबांच्या शासनकाळात आहे. अरबांनी इथे साखर, आंबटगोड फळे, तांदूळ आणि मसाले प्रथम आणले. अरांचिनी हा भातापासून तयार होतो. त्याला नॉर्मन राजवटीत कुरकुरीत ब्रेडक्रम्ब्सचे आवरण मिळाले, तर कसाटाची सुरुवात साध्या रिकोटा आणि स्पाँज केकपासून झाली. हळहळू त्याला साखरेच्या पाकातील फळांचे तुकडे आणि मार्झिपान यांची समृद्ध साथ मिळाली. कॅनोली ही सणासुदीच्या काळातील अरबांची पेस्ट्रीच. ती सिसिलीची ओळख झाली. या पदार्थांचा आस्वाद घेताना हा भूतकाळही आठवतो.

मेडिटेरेनियन सी मधील रत्न - टॉरमिना

कॅटानियाहून निघून आम्ही उत्तरेकडे टॉरमिनामध्ये आलो. आयोनियन समुद्रालगत उंच कड्यावर वसलेलं हे देखणं शहर आहे. इथल्या दगडी भिंतींवरून खाली पसरलेल्या गुलाबी बोगनव्हिलियाच्या वेली, उंच कड्यांशी स्पर्धा करणारं, समुद्राचं हिरवं-निळं पाणी पाहून मी एकदम फिदाच झाले. इथल्या ‌‘तेआत्रो आंतिको‌’ या प्राचीन ग्रीक प्रेक्षागृहाची रचना भारी आहे. तिथे विराजमान झालो की आपल्याला सर्व बाजूंनी रंगमंच दिसतो आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दूर ‌‘माऊंट एटना‌’ दिसतो. संध्याकाळी आम्ही फ्युनिक्युलर ट्रेनने जुन्या शहरात गेलो. हा प्रवास म्हणजे कोर्सो उम्बर्टोमधील भटकंतीची तरंगती सुरुवातच होती. मग मी बुटीक्समध्ये मनसोक्त फिरले आणि अखेरीस रेशमी स्कार्फ, सिरॅमिकच्या छोटेखानी वस्तू आणि पाहताक्षणी आवडलेला लिनन ड्रेस अशी खरेदी करून बाहेर पडले. त्याच रस्त्याने पुढे ‌‘पियाझा 09 एप्रिल‌’ या स्क्वेअरला आले. तिथून काळी-पांढरी चौकोनी फरसबंदी आणि दूरवर दिसणारा माऊंट एटना, तळाशी समुद्रकिनारा असा मोठा पट एकाच वेळी दिसला... आसमंतात आकाशी रंग भरू लागला होता... माझ्या हातात कॅपुचिनो होतं... ही संध्याकाळ कधीच संपू नये असं वाटत होतं.

माऊंट एटना आणि वाईन कंट्री

प्रसिद्ध आणि धगधगत्या माऊंट एटनाला भेट दिल्याशिवाय सिसिलीची सहल पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे सकाळी गाईड सोबत घेऊन आम्ही सगळे पर्वतावर चढाईसाठी निघालो. क्षितिजापर्यंत पसरलेला काळा लाव्हा, त्यावरील रानफुलांची नक्षी, जमिनीतून वाफेचा हलकासा आवाज बाहेर पाडत असलेली छिद्रे... असं सुंदर वातावरण होतं. समुद्रकिनाऱ्यापासून तेवढ्या उंचीवर आल्यावर प्राचीन ग्रीक याला देवांचं स्थान का मानत असतील याची प्रचिती आली.

मग पुढचा टप्पा होता तो सिसिलीच्या विनयार्डस्‌‍चा. मी आजवर चाखलेल्या कोणत्याही वाईनपेक्षा एकदमच वेगळ्या चवीची वाईन एटनाच्या सभोवतालच्या लाव्हामय मातीत तयार होते. त्या मातीतील खनिजांची समृद्धी वाईनमध्येही हलकेच उतरलेली जाणवते. तिथेच आम्ही एका कुटुंबाने राखलेल्या विनयार्डमध्ये गेलो. उन्हात वाळवलेले टोमॅटो आणि गरम पाव यांच्या पेकोरिनो प्लॅटरसोबत, रोसोचीही चव चाखली. त्याच्या मालकासोबत खूप गप्पा झाल्या. वाईन आणि हास्य यांना उधाण आलं होतं.

गॉडफादर ट्रेल

सिसिलीतील काही भाग आपल्याला भलतेच ओळखीचे वाटतात. ज्यांनी ‌‘द गॉडफादर‌’ पाहिला असेल त्यांना ही ओळख पटेल. टॉरमिनापासून अगदी जवळच असलेल्या सावोकातील विटेली बारमध्ये आम्ही आलो. तिथला दगडी भाग अगदी चित्रपटात दाखवलाय तसाच होता. मी मागवलेल्या लेमन ग्रॅनितासोबत त्या आठवणीही जाग्या झाल्या.

तिथून आम्ही फोर्झा डी‌’अग्रो या दुसऱ्या चित्रीकरण स्थळापाशी आलो. चित्रपटकर्त्यांना या जागेची भुरळ का पडली असावी? हे तिथे प्रत्यक्ष उभं राहिल्यावर आमच्या लक्षात आलं.

सिसिली हे निसर्गरम्य तर आहेच, पण त्याचसोबत इथल्या गोष्टी, चवी आणि आठवणी आपल्यापाशी दीर्घकाळ रेंगाळत राहतात. अशा या सिसिलीला भेट देऊन तुम्हीही तुमच्या आठवणींची एक गोष्ट लिहिण्यासाठी सज्ज व्हा!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
नॉर्दर्न लाइट्स
8 mins, read

नॉर्दर्न लाइट्स

Published in Sakal Saptarang 9th August 2026 प्रकाशाच्या शोधात जगात असे काही प्रवास असतात, जे आपण एखादं प्रसिद्ध मॉन्युमेंट पाहण्यासाठी करतो. काही प्रवास सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी, काही तिथल्या

वर्षातील एकमेव संधी
8 mins, read

वर्षातील एकमेव संधी

Published in Maharashtra Times 9th August 2026 ...त्या उकळणाऱ्या भांड्यातले तांदूळ आणि दूध वर येऊनबाहेर सांडल्याबरोबर जमलेल्या लोकांचा एकच जल्लोषऐकू येतो, ‌‘पोंगलो पोंगल‌’... मध्यंतरी पॉडकास्टच्

स्नान : एक कला!
8 mins, read

स्नान : एक कला!

Published in Loksatta Lokrang 9th August 2026 ...असं म्हणतात की, क्लिओपात्राच्या सौंदर्याचं रहस्य गाढविणीच्या दुधात होतं. ती गाढविणीच्या दुधाने स्नान करीत असे. इजिप्तमध्ये धार्मिक उपचारआणि ऐषोआर

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!