India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

शहरांचं रहस्य उलगडताना

13 mins. read
Neil Patil
Neil Patil
13 Mins Read
July 29, 2026
July 29, 2026

Quick Summary

शहरातील दगडी भिंती, विचित्र रस्त्यांची नावं आणि नद्यांवरील रस्ते यांसारखे क्लू पाहून लपलेला इतिहास शोधा.

फोटोतील हायलाइट्सपुरते थांबू नका; शहराचा जुना नकाशा समजून घेतल्यावरच त्याचा खरा अर्थ उलगडतो.

शहरं अपघाताने आकाराला येत नाहीत; भूमी, पाणी, धर्म, सत्ता आणि महत्त्वाकांक्षा यांमुळे त्यांचा मूळ ढाचा तयार होतो.

टोकियो आणि मेक्सिको सिटीसारख्या गुंतागुंतीच्या शहरांचा भूतकाळ माहिती असेल तरच त्यांच्या वर्तमानातील चेहऱ्याचा अर्थ समजतो.

मेक्सिको सिटीच्या झोकालोचा इतिहास लक्षात ठेवा; लेक टेक्सकोकोचे नैसर्गिक संरक्षण आणि नंतरच्या निचरा प्रकल्पांनी शहर बदललं.

भेट देणं आणि समजून घेणं यात फरक करा; शहराची खरी ओळख त्याच्या आतल्या रचनेतूनच मिळते.

Published in Maharashtra Times. 28th June, 2026

...एखाद्या विभागाला न शोभणारी दगडी भिंत, जरा विचित्र वाटणारी रस्त्यांची विशिष्ट नावं, नद्यांवर बांधलेले रस्ते आणि भूतकाळ माहीत नसल्याने विसंगत वाटणारे विभाग यांचं रहस्य कळण्यासाठी तुमच्या नजरेसमोर दडलेले क्लू समजावे लागतात...

एखाद्या शहरात फेरफेटका मारताना तुम्हाला कधी असं वाटलंय का की या शहरातल्या काही गोष्टींचा उलगडाच होत नाहीये. म्हणजे एखादा रस्ता विनाकारण वळलेला आहे किंवा एखाद्या विभागात फार दाटीवाटीने लोकं राहताहेत, तर दुसरा एखादा विभाग फार हायक्लास आहे किंवा तुम्ही एखाद्या ऐतिहासिक चौकात उभे असताना अचानक मनात आलंय का की इतिहासात घडलेली ती घटना ‌‘इथेच घडली होती का? याच जागेवर?‌’

आता हा विचार मनात तसाच ठेवा, कारण आज मला तुमच्याबरोबर एक वेगळाच अँगल शेअर करायचा आहे. गेली 14 वर्षे जगभरात प्रवास करताना, वेगवेगळ्या शहरांचा वेध घेताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की बहुसंख्य पर्यटक हे फोटो चाळावेत त्याप्रमाणे पर्यटनस्थळं वरवर पाहतात, ते फक्त हायलाइट्स बघतात, पण त्यामागची खरी कहाणी जाणूनच घेत नाहीत. प्रत्येक शहर दिसायला कितीही आधुनिक असलं तरी त्याचा जुना नकाशा वेगळाच असतो. तो खोलवर दडलेला असतो आणि त्यामुळेच पटकन नजरेत भरत नाही. हा नकाशा (म्हणजेच हे शहर!) तिथली भूमी, पाणी, धर्म, सत्ता, जाती-जमाती, विजय, भिती आणि महत्त्वाकांक्षेमुळे आकाराला आलेला असतो. एकदा का हा लपलेला नकाशा तुम्हाला दिसू लागला की मग आपोआप ते शहर तुमच्यासमोर उलगडायला लागतं.

एखाद्या शहराला भेट देणं आणि ते शहर समजून घेणं यातला फरक तो हाच असं मला वाटतं. भेट देणं म्हणजे केवळ तिथे जाऊन येणं तर समजून घेणं म्हणजे त्या शहराची खरी ओळख करून घेणं. शहरं काही अपघाताने आकाराला येत नाहीत, त्यांचं फाऊंडेशन एका विशिष्ट उद्देशाने केलेलं असतं. ही कारणं कधी आध्यात्मिक असतात, कधी स्ट्रॅटेजिक असतात, कधी पर्यावरणाशी संबंधित असतात तर कधी या तिन्हीचं मिश्रण असतं. आधुनिक शहराची स्कायलाईन या कारणांच्या कितीतरी वर, उंच गेलेली असली तरी आतला मूळ ढाचा मात्र कायम असतो आणि त्यावरच शहराचं हृदय धडधडत असतं. मला जे सांगायचं आहे ते अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण मला सर्वात जास्त आवडणाऱ्या दोन शहरांमध्ये जाऊया. टोकियो जे माझं खूप लाडकं शहर आहे आणि मेक्सिको सिटी जे माझ्या पत्नीचं, म्हणजे हेताचं लाडकं शहर आहे. प्रचंड उर्जा आणि कमालीचं सौंदर्य यांबरोबरच ही अतिशय गुंतागुंतीची अशी शहरं आहेत, ज्यांना सभोवतालचा परिसर आणि इतिहासाने घडवलं आहे. या दोन्ही शहरांचा भूतकाळ जर तुम्हाला माहिती असेल तरच त्यांच्या वर्तमानातील चेहऱ्याचा खरा अर्थ तुम्हाला समजू शकतो. आणि याबद्दलच तर हा लेख आहे. चला तर मग, शहरांचं रहस्य उलगडायला!

एक अदृश्य नकाशा: प्रत्येक मोठं शहर ज्या भूमीवर उभं राहिलेलं असतं त्या भूमीची आठवण कायम जपत असतं. काही वेळा त्या स्मृती अगदी ठळकपणे दिसत असतात. म्हणजे एखादं बंदराचं शहर त्याच्या किनाऱ्यामुळेच आजही घडत असतं, एखाद्या टेकडीवरच्या शहराच्या माथ्यावरचा किल्ला इतिहासाची ठळक खूण बनलेला असतो. पण काही वेळा काँक्रिट, हायवे आणि टॉवर्सच्या गदारोळात त्या शहराची मूळची ओळख इतकी आत दडपली जाते की फक्त अतिचौकस आणि जिज्ञासू पर्यटकांनाच ती दिसू शकते. आणि तरीही हा न दिसणारा, ‌‘भूमी, पाणी आणि भौगोलिक उंचीचा नकाशा‌’च शांतपणे त्या शहराचा चेहरा घडवत असतो. आपत्ती कशामुळे येतील आणि त्याही परिस्थितीत लोक त्याच भूमीवर राहायला कसं शिकतील हे तो नकाशा सुद्धा ठरवतो.

मेक्सिको सिटीबद्दल सांगायचं तर आज आपण जसं बघतो त्या पध्दतीने हे शहर कधीच निर्माण होणार नव्हतं. या शहराचं ऐतिहासिक केंद्र ‌‘झोकालो‌’ हे कधीकाळी पर्वतांनी वेढलेल्या एका उथळ सरोवरात- लेक टेक्सकोकोमध्ये अभिमानाने उभं होतं. ॲझटेक लोकांनी ही जागा अपघाताने निवडलेली नव्हती, तर हे स्थळ अतिशय हुशारीने, विचारपूर्वक, श्रध्देनं आणि काही सूचक संदेशांमुळे निवडण्यात आलं होतं. भोवतालच्या सरोवरामुळे त्याला आपोआप नैसर्गिक संरक्षण मिळालं होतं, जमीन सुपीक होती आणि या ठिकाणाला एक सखोल कॉस्मोलॉजिकल संदर्भही होता. पण जेव्हा स्पॅनिश लोकांनी इथे आक्रमण केलं तेव्हा त्यांचा उद्देश पाण्याबरोबर सहजीवनाचा नव्हता, तर त्यांना त्यावर सत्ता गाजवायची होती. त्यामुळे पुढची 400 वर्षं हे सरोवर उपसायचा जणू प्रकल्पच सुरू राहिला, कॅनल्स आणि स्ट्रीम्स काढून त्यामधून तलावाचं पाणी बाहेर फेकलं जाऊ लागलं. 1900 सालापर्यंत लेक टेक्सकोको तर पूर्ण रिकामा झाला होताच, पण त्याचबरोबर पाण्यावर पोसलेली एक स्थानिक संस्कृतीही वाहून गेली होती. त्या जागी उभी राहिली होती एक युरोपियन पध्दतीची राजधानी, जी वरवर पाहायला गेलो तर अढळ होती, पण तिचं अंतरंग मात्र अतिशय नाजूक होतं. आजही जगातल्या इतर कोणत्याही शहराला करावा लागत नसेल असा सामना मेक्सिको सिटीला एका मोठ्या विरोधाभासाशी करावा लागत आहे. या शहरात मोठे पूर येतात कारण ही भूमी मुळात सरोवराची होती, पण तरीही या शहरात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासतो कारण आता ते सरोवरच अस्तित्वात नाही. त्यात भर म्हणून हे शहर झपाट्याने खचत आहे. या शहराचे सगळे विभाग दबलेल्या तलावाच्या मऊ मातीवर उभे असल्याने ते दरवर्षी अनेक सेंटीमीटर्स खाली खचत चालले आहेत. त्यामुळे वसाहतीच्या काळातील कॅथेड्रल्स झुकू लागले आहेत, स्कायस्क्रॅपर्स उभारताना खूप खोलवर पाया खणावा लागतो आहे आणि भूकंपामुळे जमीनही जेलीसारखी थरथरू लागते.

मेक्सिको सिटीची कहाणी पाण्याशी निगडित आहे तर टोकियोची कथा टेक्टोनिक-व्होल्कॅनिक मूव्हमेंट्सशी. ज्यांचा अंदाजच बांधता येत नाही. टोकियो हे शहर ‌‘रिंग ऑफ फायर‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूभागावर वसलेलं आहे. या ठिकाणी जमीन फक्त हलत नाही, तर ती श्वासोच्छ्वास करते, थरथरते आणि अधूनमधून तिचा उद्रेकही होतो. त्यामुळे टोकियो शहर घडवण्यात मानवी नियोजनापेक्षा या अस्थिर भूभागाचाच मोठा वाटा आहे. इतिहासकाळापासूनच हे शहर दोन भिन्न भागांमध्ये विभागलेलं आहे. पूर्वेकडचा भाग ‌‘लो सिटी‌’ म्हणजेच ‌‘शितामाची‌’. हा पूरग्रस्त मैदानांचा सपाट भाग आहे जिथे दाट लोकवस्ती आहे. हा पूर व आग या दोन्ही संकटांच्या छायेतला प्रदेश आहे. पश्चिमेकडचा उंचावरचा भाग ‌‘हाय सिटी‌’ म्हणजेच ‌‘यामानोते‌’. हा थोडासा उंचावरचा आणि म्हणून सुरक्षित भाग आहे. ज्यांना निवडीचं स्वातंत्र्य आणि क्षमता आहे अशा लोकांना हा भाग आवडतो.

आजही हाय सिटी अधिक प्रशस्त, हिरवीगार आणि राहण्यासाठी उत्तम जागा वाटते, तर लो सिटी अतिशय व्हायब्रंट, एकमेकांशी घट्ट जोडलेला भाग वाटतो, जिथे शतकानुशतकांच्या विध्वंसामुळे आणि नवनिर्माणामुळे एक वेगळी जिद्द एकवटलेली पाहायला मिळते. या दोघांच्या बरोबर मध्यभागी आहे ‌‘इडो कॅसल‌’ म्हणजेच आजचा इम्पेरियल पॅलेस. जिथे उंचावरल्या भूभागाची एक कड पाणथळ जमिनीला मिळते अशा ठिकाणी हा पॅलेस बांधलेला आहे. जिथे पाणी आणि उंची याचा वापर नैसर्गिक संरक्षण म्हणून करता येईल अशाच जागेची निवड करण्याची चतुराई इथे स्पष्ट दिसते. याच जागेवरुन टोकियो शहर बाहेरच्या बाजूला विस्तारत गेलं. आजच्या आधुनिक टोकियोमधील ट्रान्सपोर्ट नेटवर्क, बिझनेस डिस्ट्रिक्ट्स आणि रेसिडेन्शियल झोन्सवर याच रचनेचा प्रभाव पाहायला मिळतो.

द डिझाईन: प्रत्येक शहराच्या रचनेमागे एक लॉजिक असतं. जरी ते शतकांपूर्वीचं असेल आणि आजच्या शहरात स्पष्टपणे दिसत नसेल तरीही ते असतं. ते शोधण्याची युक्ती माहीत हवी. एकदा का तुमच्या लक्षात आलं की प्राचीन काळातील लोकांच्या गरजेप्रमाणेच आजच्या काळातील रस्ते बनलेले आहेत, की मग काही रस्ते बाहेरच्या दिशेने का विस्तारतात? काही विभाग अतिशय गजबजलेले तर काही सुव्यवस्थित का असतात? या प्रश्नांचा उलगडा होतो आणि आपण एका वेगळ्याच नजरेने त्या शहराकडे पाहू लागतो. मेक्सिको सिटीमध्ये रुपांतरित होण्याआधी अनेक वर्षांपूर्वी ‌‘तेनोच्तितलान‌’ म्हणून उभारलेल्या शहराचा उद्देश अधिक व्यापक, वैश्विक होता. मशिका(ॲझटेक) लोकांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन केवळ पुराणकथांवर आधारित नव्हता, तर त्यांच्याकडे नागरी नियोजनाचा आराखडा होता. त्याच्या हृदयस्थानी होतं संपूर्ण संस्कृतीचं आध्यात्मिक आणि औपचारिक विधींचं केंद्र- ‌‘टेम्प्लो मेयर‌’. रस्ते आणि कॅनल्स फक्त ठिकाणांना जोडणारे नव्हते, तर खगोलशास्त्रीय घटना, धार्मिक प्रतीके आणि सरोवराच्या नॅचरल जिओग्राफीशी त्यांचा ताळमेळ होता. प्री-हिस्पॅनिक काळात बनलेले या शहरातले अनेक रस्ते अतिशय अचूकपणे गणित करुन बनवावेत तसे बाहेरच्या बाजूला विस्तारत होते. यातलाच एक ‌‘कायेत त्युपा‌’ हा थेट मध्यभागी असलेल्या ट्विन टेम्पल्सकडे घेऊन जाणारा होता. आज तुम्ही जेव्हा ‌‘झोकालो‌’भोवती चालता तेव्हा तुम्ही अनेक शतकांपूर्वी ज्यावरून धर्मगुरू, योध्दे आणि सर्वसामान्य नागरिक चालले होते, त्याच रस्त्यावरुन चालत असता.

आणि मग आले स्पॅनिश. त्यांनी शहर जिंकलं पण त्याची जुनी ओळख पूर्णपणे मिटवली नाही. त्यांनी मध्यवर्ती बिंदू तसाच ठेवला. शहराच्या हृदयस्थानी असलेल्या टेम्प्लो मेयरच्या स्थानाला धक्का लावला नाही, पण त्याच्या शेजारी भव्य कॅथेड्रल उभारून जणू आपल्या सत्तेची घोषणा वास्तूमधून केली. काळाच्या ओघात इथल्या मूलनिवासी लोकांना बाहेर ढकलण्यात आलं आणि इतिहासतज्ञ ज्याचा उल्लेख ‌‘डोनट सिटी‌’ करतात ते शहर निर्माण झालं. बाहेर ढकललेल्या स्थानिकांनी घेरलेले श्रीमंत युरोपियन अशी रचना तयार झाली. आजही तुम्हाला हा स्तरीय फरक चटकन जाणवतो. रस्त्यांवरुन चालताना स्पॅनिश ग्रीड, त्याखाली दडलेलं ॲझटेक कॉस्मिक सेंटर आणि या सगळ्याला कधीकाळी आकार देणारा, पण आता नष्ट झालेला तलाव जाणवत राहतो.

मेक्सिको सिटीची वाढ जर कॉस्मिक अलाइनमेंटमधून झाली होती तर टोकियोची वाढ स्ट्रॅटेजी, संरक्षण आणि सामाजिक रचनेतून झाली आहे. प्रथमदर्शनी पाहाताना टोकियोची रचना गोंधळाची वाटू शकते. वळणारे, फिरणारे, अचानक संपणारे किंवा त्याच जागी आणून गोंधळात टाकणारे रस्ते यामुळे संभ्रमित व्हायला होतं. पण ही अनियमितता जाणीवपूर्वक जोपासलेली आहे. जपानच्या इतिहासातील इडो कालखंडात शोगुनेटने इडो कॅसलभोवती वीस किलोमीटरपर्यंत खंदक,कॅनल्स आणि जलमार्गाचं जाळंच उभारलं होतं. राजाच्या सिंहासनाचं संरक्षण करण्यासाठी योजलेली ही सुरक्षायंत्रणा होती. काळाच्या ओघात याच जलमार्गांनी भोवतालच्या रस्त्यांना आकार दिला. त्यातूनच भुलभुलैयासारखा वाटणारा आसपासचा परिसर निर्माण झाला.

मग आली सामाजिक रचना. एकेकाळी इडोच्या नकाशातूनच तिथली जातीव्यवस्था स्पष्ट दिसायची. कॅसलजवळच्या प्रशस्त, विस्तीर्ण आवारात सामुराई कुटुंबे एकत्रितपणे राहायची. निहोनबाशी आणि गिंझासारख्या गजबजलेल्या कमर्शिअल भागामध्ये व्यापारी आणि कारागीर राहायचे. तर गरीब लोक जिथे पूर आणि आगीचा सतत धोका आहे अशा शहराच्या कडेवरच्या भागात राहायचे. या सगळ्याच्या प्रतिकात्मक केंद्रस्थानी आहे ‌‘निहोनबाशी ब्रिज‌’. हा आहे जपानचा मूळचा ‌‘झिरो पॉइंट‌’. याच जागेवरून जपानच्या अंतर्भागात जाणारे पाच रस्ते (गो कायदो) सुरू होतात. हे रस्ते इडोला जपानच्या प्रत्येक प्रमुख प्रांताशी जोडतात. आज तुम्ही जेव्हा त्या ब्रिजवर उभे राहता, तेव्हा खाली जरी एक्सप्रेस वे असला तरीही प्रत्यक्षात तुम्ही जपानच्या ‌‘किलोमीटर झिरो‌’वर उभे असता हे विसरू नका.

लपलेलं शहर: एकदा का तुम्हाला कळलं की नक्की काय शोधायचं आहे की मग शहरं आपोआप त्यांचं रहस्य उलगडून दाखवायला लागतात. एखाद्या विभागाला न शोभणारी दगडी भिंत, जरा विचित्र वाटणारी रस्त्यांची विशिष्ट नावं, नद्यांवर बांधलेले रस्ते आणि भूतकाळ माहीत नसल्याने विसंगत वाटणारे विभाग यांचं रहस्य कळण्यासाठी तुमच्या नजरेसमोर दडलेले क्लू समजावे लागतात. याला तुम्ही पर्यटकांसाठीची ‌‘डिकोडर रिंग‌’ समजू शकता. जेव्हा त्या शहराचा ऐतिहासिक नकाशा डोक्यात घेऊन तुम्ही मेक्सिको सिटी किंवा टोकियोमध्ये फेरफटका मारता तेव्हा तुम्हाला केवळ समोरच्या इमारतीच दिसत नाहीत, तर काळाचे थर आणि त्यातला इतिहास दिसू लागतो. मग तो जणू तुमच्या कानात आपली कहाणी सांगतो.

आता टोकियोचंच उदाहरण घ्या. जे शहर सतत नव्याने उभारलं जात असतं अशा ठिकाणी पुरातन काही शिल्लक राहिलं असेल याची अपेक्षाच करता येत नाही. तरीही हिबिया, मरुनौशी आणि इम्पिरियल पॅलेसच्या ईस्ट गार्डनमध्ये जिओमेट्रिकल डायग्राम्सप्रमाणे विखुरलेले भव्य शिलाखंड पाहायला मिळतात. कधीकाळी जगातली सर्वात मोठी गढी असलेल्या ईडो कॅसलचे अवशेषही दिसतात.

मेक्सिको सिटीमधील खुणा मात्र अधिक सट्ल आहेत. त्या पटकन कळत नाहीत. कारण स्पॅनिश राज्यकर्त्यांनी स्थानिक वास्तूंच्या वर आपल्या इमारती उभारताना जुन्या वास्तू पुरून टाकल्या. त्यामुळे आजच्या शहराखाली इतिहासाच्या खुणा दबल्या गेल्या. पण रस्त्यातला एखादा हलकासा उतार, एखादा प्रशस्त प्लाझा, झुकलेली कलोनियल वास्तू हेच सांगते की याखाली जुनं काहीतरी दडलेलं आहे.

या शहरांनी त्यांच्या अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरखाली आपला इतिहास गाडला आहे. टोकियोमध्ये निहोनबाशी ब्रिजसारख्या ठिकाणी हे स्पष्टपणे कळतं. हा आहे जपानचा ऐतिहासिक किलोमीटर झिरो पॉइंट. इथे नदीचे सुंदर दृश्य बघायला मिळायचे पण आता तिथे पोस्ट वॉर तेजीमध्ये बांधलेला हायवे आहे. नदी आजही त्याखालून वाहते. संपूर्ण टोकियोमध्ये हाच पॅटर्न बघायला मिळतो. नद्यांचे कॅनल्स केले गेले, कॅनल्स रस्त्यांनी झाकले गेले. मात्र तरीही ‌‘उचिबोरी डोरी‌’ आणि ‌‘सोतोबोरी डोरी‌’ या रस्त्यांच्या नावामधून फार पूर्वीच नष्ट झालेल्या खंदकाच्या आठवणी मात्र आजही जपलेल्या पाहायला मिळतात. टोकियोच्या रस्त्यांच्या केऑटिक वाटणाऱ्या रचनेचा खरा अर्थ कळण्यासाठी ते रस्ते आज अस्तित्वात नसलेल्या पाण्याभोवती निर्माण झाले होते हे कळावं लागतं.

मेक्सिको सिटी ही अशाच पुसल्या गेलेल्या इतिहासाची कहाणी सांगते. कधीकाळी या शहरातही व्हेनिससारखं कॅनल्सचं जाळं होतं, ज्याच्या मदतीने शतकानुशतके वॉटर इकोसिस्टिमचा तोल सांभाळला गेला होता. जेव्हा स्पॅनिश लोकांनी त्या कॅनल्समध्ये भर घातली, तेव्हा त्याचा तोल ढासळला. या शहरातही अनेक रस्ते अचानक वळतात कारण ते आता पुरल्या गेलेल्या जुन्या कॅनल्सच्या भोवतीचे रस्ते होते. आता इथे कुठेच पाणी-कॅनल दिसत नाही, पण त्याची पोकळी मात्र अशा वळणातून जाणवते.

आणि म्हणूनच मला हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. जेव्हा तुम्ही एखाद्या शहराचा ऐतिहासिक नकाशा वाचायला शिकता, तिथले जुने जलमार्ग, विस्मरणात गेलेल्या रचना, त्यांचे प्राचीन उद्देश तुम्हाला कळू लागतात तेव्हा एक साधा फेरफटका, ट्रेझर हंटसारखा रोमांचक होऊन जातो. एखादा वेडावाकडा रस्ता मग क्लू बनतो, एखाद्या कललेल्या इमारतीची कहाणी लक्ष वेधून घेते. एखाद्या परिसराची थोडी वेगळी रचना भूतकाळात डोकावण्याची खिडकी बनते आणि मग ते शहर एखाद्या जिवंत प्राण्याप्रमाणे तुमच्याशी संवाद साधू लागतं. म्हणूनच पर्यटनामधला खरा आनंद हा फक्त नवनवीन ठिकाणं बघण्यात नसतो, तर ती समजून घेण्यात असतो. आता तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणाला भेट देणार असाल, तेव्हा आधी त्या ठिकाणाचा जुना नकाशा समजून घ्या. त्या शहराचा आजचा चेहरा पाहतानाच त्याचं मूळ स्वरूप काय होतं हे जाणून घ्या. एकदा का हे करायला सुरुवात केलीत की मग तुमचा हॉलिडे अधिक अनुभवसंपन्न होईल, कारण मग तुम्ही फक्त भरपूर स्थलदर्शन करणार नाही, तर खूप काही समजून घ्याल आणि यामुळे तुमची ऑर्डिनरी ट्रीपही एक्स्ट्रा-ऑर्डिनरी होऊन जाईल.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
नॉर्दर्न लाइट्स
13 mins, read

नॉर्दर्न लाइट्स

Published in Sakal Saptarang 9th August 2026 प्रकाशाच्या शोधात जगात असे काही प्रवास असतात, जे आपण एखादं प्रसिद्ध मॉन्युमेंट पाहण्यासाठी करतो. काही प्रवास सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी, काही तिथल्या

वर्षातील एकमेव संधी
13 mins, read

वर्षातील एकमेव संधी

Published in Maharashtra Times 9th August 2026 ...त्या उकळणाऱ्या भांड्यातले तांदूळ आणि दूध वर येऊनबाहेर सांडल्याबरोबर जमलेल्या लोकांचा एकच जल्लोषऐकू येतो, ‌‘पोंगलो पोंगल‌’... मध्यंतरी पॉडकास्टच्

स्नान : एक कला!
13 mins, read

स्नान : एक कला!

Published in Loksatta Lokrang 9th August 2026 ...असं म्हणतात की, क्लिओपात्राच्या सौंदर्याचं रहस्य गाढविणीच्या दुधात होतं. ती गाढविणीच्या दुधाने स्नान करीत असे. इजिप्तमध्ये धार्मिक उपचारआणि ऐषोआर

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!