We Just Opened 3 New Branches!
We're Open, now in Vadodara, Kochi & Nungambakkam (Chennai).
India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

लोकेशन्स ते लँडमार्क्स

12 mins. read
Neil Patil
Neil Patil
12 Mins Read
June 19, 2026
June 19, 2026

Quick Summary

चित्रपटांच्या लोकेशन्स पाहताना फक्त दृश्यं नाही तर त्या ठिकाणांमध्ये झालेला बदलही लक्षात घ्या.

पडद्यावर प्रसिद्ध होण्याआधीची साधी रस्ते, स्थानिक कॅफे आणि अस्सल लँडस्केप्स शोधून पाहा.

पँगाँग लेकला भेट देताना ते फक्त फोटोजेनिक स्पॉट नाही तर खडतर प्रवासाचा भाग आहे हे लक्षात ठेवा.

कोची फोर्टसारख्या शहरांमध्ये सिनेमाने ओळख वाढवली नाही तर आधीचीच ओळख अचूक हेरली हे समजून घ्या.

लॉर्ड ऑफ द रिंग्जमध्ये दाखवलेला न्यूझीलंडचा ग्रामीण परिसर प्रसिद्ध होण्याआधी शांत शेतीवाडी करणाऱ्या गावासारखाच ओळखला जात होता.

कॅमेऱ्यात टिपल्यानंतर बदल हळूहळू सुरू होतो, त्यामुळे शूटिंगमुळे स्थानिक जीवनावर काय परिणाम होतो ते निरीक्षण करा.

Published in Maharashtra Times Date 21st June, 2026

...नवीन कॅफेज येतात, तिथले गाईड्स सिनेमाशी संबंधित टूर्स सुरू करतात. मग सोव्हेनियर्समध्येही इतिहासापेक्षा सिनेमाची दृश्यं दिसू लागतात. हळूहळू प्रत्यक्षात बदल दिसायला लागतात...

मला चित्रपट पाहायला खूप आवडतात आणि गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलेल्या चित्रपटांमुळे, मला प्रवास करताना दिसणाऱ्या ठिकाणांकडे बघण्याची एक वेगळीच नजर मिळाली आहे. म्हणजे फक्त विशिष्ट सिनेमातील लोकेशन बघितल्याचं समाधानच मिळालं असं नाही, तर काही डेस्टिनेशन्स सिनेमात झळकल्यानंतर आपोआप कशी बदलत गेली हे सुद्धा मला जाणवलं. सिनेमात दिसल्यामुळे लोकप्रिय झालेल्या अनेक ठिकाणांना मी त्याआधीही भेट दिली होती. पण एखाद्या सिनेमा किंवा सिरिअलचा नवा संदर्भ त्यांना मिळाल्यानंतर जेव्हा मी तिथे जाऊन आलो, तेव्हा प्रत्येक वेळी मला जाणवलं की ती ठिकाणं फक्त प्रसिद्ध झाली नाहीयेत, तर त्यांना जणू नवीन ओळख मिळालीय.

या ठिकाणी शूटिंग होण्यापूर्वी ही ठिकाणं सुद्धा इतर ठिकाणांसारखीच साधी होती आणि त्यांना काही वेगळी ओळख नव्हती. तिथले स्थानिक रोज चालत जायचे असे ते रस्ते होते, खास पर्यटकांसाठी उघडलेल्या कॅफेजऐवजी स्थानिकांसाठीच असलेले कॅफेज होते. या परिसरातल्या निसर्गाशी इथल्या स्थानिकांचं एक वेगळंच नातं होतं, पण बाहेरच्यांच्या दृष्टीने मात्र त्याला विशेष महत्त्व नव्हतं. मग एका कहाणीने त्यांची निवड केली, त्या गोष्टीतला एक प्रसंग तिथे चित्रित झाला आणि अचानक सगळ्या जगाच्या नजरा तिथे रोखल्या गेल्या. म्हणूनच आजचा लेख हा कोणत्या फिल्म लोकेशन्सना भेट द्यावी याची माहिती देणारा नाही, तर एखाद्या ठिकाणाला नवी ओळख मिळाल्यामुळे तिथे जो बदल घडतो, तो आज आपण समजून घेणार आहोत. सिनेमामुळे काळाच्या प्रवाहातला एखादा क्षण कसा गोठतो आणि त्यानंतर ते ठिकाण आपलं पुढचं आयुष्य कसं जगतं, हा आपला आजचा विषय आहे.

कॅमेऱ्यात टिपले जाण्यापूर्वीचे त्या ठिकाणाचे आयुष्य: एखादं ठिकाण फिल्मचं लोकेशन होण्यापूर्वी त्याचं सर्वसाधारण आयुष्य शांतपणे जगत असतं. फिल्म्समध्ये त्या ठिकाणात कोणताही बदल न करता त्या जागेचं अस्सलपणच तर टिपायचं असतं. एखादा रस्ता निवडला जातो, कारण तो अगदी खरा वाटत असतो. एखादं गाव निवडलं जातं, कारण ते चकाचक नसतं तर अगदी साधं असतं. एखादं लँडस्केप निवडलं जातं, कारण तिथे सेट डिझाईनची गरजच नसते. कॅमेऱ्यात टिपले जाण्याच्या आधीपासून या जागांना त्यांचं असं एक स्वतंत्र अस्तित्व असतंच, फक्त जगाचं लक्ष तिकडे वेधलं गेलेलं नसतं. आता ‌‘लडाख‌’चंच उदाहरण घ्या ना. थ्री इडियट्स सिनेमामुळे पँगाँग लेक प्रसिद्ध होण्याच्या कितीतरी आधीपासून हा प्रदेश अस्सल भटके, बाइकर्स आणि इथल्या राकट निसर्गाच्या, शांत लयीतल्या आयुष्याच्या प्रेमात पडलेल्या पर्यटकांना माहिती होता. ते सरोवर म्हणजे फक्त एक फोटोजेनिक स्पॉट नव्हता, तर ते एका खडतर प्रवासाचा  हिस्सा होता.

केरळमधला कोची फोर्ट हे मल्याळम सिनेमाची पार्श्वभूमी म्हणून किंवा इंटरनॅशनल फिल्म्सचं लोकेशन म्हणून लोकप्रिय होण्याआधीपासून एक जितंजागतं शहर होतं. एक असं शहर ज्याला व्यापार, वसाहतकालीन इतिहास आणि रोजच्या व्यवहारांनी आकार दिला होता. तिथले कॅफेज, रस्ते, वॉटरफ्रंट हे सगळं स्थानिकांसाठी आधीपासूनच अस्तित्वात होतं. सिनेमाने त्यांना वेगळी ओळख दिली नाही, तर त्यांची ओळख अचूक हेरली. हाच पॅटर्न आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाहायला मिळतो. ‌‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज‌’ या लोकप्रिय सिनेमात न्यूझीलंडमधील जो ग्रामीण परिसर वापरण्यात आला आहे, तो या सिनेमातून एक काल्पनिक, मायथॉलॉजिकल ठिकाण म्हणून जगप्रसिध्द होण्याआधीपासूनच शेतीवाडी करणाऱ्या स्थानिकांचं शांत निवांत गाव म्हणून ओळखला जात होता.

या सगळ्या ठिकाणांमधील समान धागा म्हणजे इथलं जे मूळचं आयुष्य होतं ते अतिशय खासगी, व्यवहारी आणि बाहेरच्या जगाला फारसं माहिती नसलेलं असं होतं. त्यांच्यासाठी अटेंशनपेक्षा उपयुक्तता जास्त महत्वाची होती. ती ठिकाणं प्रसिद्ध होती म्हणून सिनेमाने त्यांना शोधलं नाही, उलट ती अप्रसिद्ध होती म्हणून त्यांची निवड करण्यात आली. यातच एक गमतीदार विरोधाभास दडलेला आहे. तिथला शांतपणा, साधेपणा, कृत्रिमतेचा अभाव अशा ज्या गोष्टींमुळे ही ठिकाणे पडद्यावर एकदम अस्सल वाटतात, त्याच गोष्टी त्या ठिकाणांवर प्रसिद्धीचा झोत पडला की सगळ्यात आधी धोक्यात येतात.

कॅमेऱ्यामध्ये टिपल्यानंतर: एखाद्या ठिकाणामध्ये होणाऱ्या बदलाची सुरुवात तशी शांतपणेच होते. आधी सिनेमाचा क्रू तिथे येतो, मग पुढचे काही दिवस, काही आठवडे तिथे शूटिंग केलं जातं. तिथे राहणाऱ्या लोकांसाठी हे सगळं योगायोगाने घडलेलं असतं. यातून पुढे काय काय घडू शकेल याची कल्पनाही कोणाला आलेली नसते. पण सिनेमामध्ये क्षण गोठवून ठेवण्याची ताकद असते. भारतामधल्या अनेकांसाठी याचं जिवंत उदाहरण म्हणजे ‌‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे‌’ नंतरचं स्वित्झर्लंड. चित्रपटाआधीपासूनच स्वित्झर्लंड हे युरोपमधलं लोकप्रिय डेस्टिनेशन होतं ते प्रामुख्याने तिथला निसर्गरम्य परिसर, तिथले रेल्वे प्रवास आणि अल्पाईन टाऊन्ससाठी. मात्र सिनेमानंतर तिथल्या काही ठराविक लोकेशन्सना भारतीय पर्यटकांच्या दृष्टीने वेगळंच महत्त्व प्राप्त झालं. तिथली कुरणे, ब्रिजेस, त्याच्या पार्श्वभूमीवरचे बर्फीले पहाड हे फक्त नैसर्गिक सौंदर्याचा आविष्कार न राहता भारतीयांच्या दृष्टीने त्याला एक भावनिक महत्त्व प्राप्त झालं. रोमान्स आणि नॉस्टॅल्जियाचं ते प्रतीक बनलं. या सिनेमाच्या कथेमुळे लोकांचा त्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला.

राजस्थानमधील ज्या हवेल्या आणि जे किल्ले सातत्याने ऐतिहासिक चित्रपट आणि बिग बजेट प्रॉडक्शन्समधून पडद्यावर दिसत राहिले त्यांच्या बाबतीतही हेच घडलं. या वास्तूंना आधीपासूनच एक ऐतिहासिक महत्त्व होतं, पण सिनेमाने जणू त्यांच्यावर नवीन आवरण चढवलं, ज्यामुळे इतिहासापेक्षा या वास्तूंची भव्यता लोकांच्या मनात अधिक ठसली. कॅमेऱ्याने त्या जागांमध्ये प्रत्यक्षात काहीच बदल घडवले नाहीत, पण त्या जागा बघायला येणाऱ्या पर्यटकांची नजर मात्र बदलून टाकली.

याचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं उदाहरण म्हणजे ‌‘डुब्रोव्निक‌’. ‌‘गेम ऑफ थ्रोन्स‌’च्या कितीतरी आधी डुब्रोव्निक हे किनाऱ्यावरचं एक सुंदर, ऐतिहासिक शहर होतं, जिथे मर्यादित प्रमाणात पर्यटक येत असत. मात्र मालिकेसाठी मुख्य चित्रीकरण स्थळ म्हणून वापर झाल्यानंतर हे शहर वर्ल्ड फेमस झालं. मग लोकांना त्याच्या खऱ्या इतिहासापेक्षा या नवीन ओळखीचं जास्त आकर्षण वाटायला लागलं. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की फिल्ममेकर्सनी ही ठिकाणं वापरण्यामागे त्यांची अस्सलता, त्यांची भव्यता, त्यांचे दृश्यात्मक सौंदर्य अशी अतिशय व्यवहार्य कारणं होती. पर्यटन हे काही त्यांचं उद्दिष्ट नव्हतं. पण एकदा का एखादा प्रसंग लोकांच्या मनावर ठसला की मग त्या ठिकाणाशी तो घट्ट जोडला जातो. मग त्या जागेची मूळ ओळख पुसली जाते आणि पडद्यावर ती जागा ज्या कारणासाठी दिसते तीच तिची ओळख बनते. जेव्हा पहिल्यांदा चित्रपटाची कथा आणि ते ठिकाण एकमेकांशी जोडले जातात, तो क्षण म्हणजे त्या जागेचा नवा जन्म असतो.

प्रसिद्धीनंतरचं आयुष्य: एकदा का एखाद्या ठिकाणाला पडद्यावरची ओळख लाभली की मग सगळंच झपाट्याने बदलू लागतं. काही वेळा हे बदल क्रमाक्रमाने होतात, तर काही वेळा अचानक, पण ते नेहमी बोल्डच असतात.

थ्री इडियट्समुळे लडाखकडे मोठ्या प्रमाणावर पर्यटक आकर्षित झाले. त्यामुळे तिथली कनेक्टिव्हिटी सुधारली, निवासाचे अनेक पर्याय निर्माण झाले आणि स्थानिकांसाठी रोजगाराचे नवीन स्रोत निर्माण झाले. मात्र त्याचवेळी वाढत्या पर्यटकांचा भार तिथल्या नाजूक पर्यावरणावर आणि मर्यादित क्षमतेसाठी बनवलेल्या तिथल्या इन्फास्ट्रक्चरवर येऊ लागला. जे कधीकाळी निवांतपणे अनुभवायचं निसर्गरम्य स्थान होतं ते अचानक भरपूर पर्यटकांसाठी झटपट बघण्याचं, फक्त फोटोपुरतं भेट देण्याचं ठिकाण बनून गेलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावरचं असंच एक लक्षणीय उदाहरण म्हणजे आयर्लंडमधील ‌‘स्केलिंग मायकेल‌’. धार्मिक इतिहासासाठी आणि एकांतातील ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जागेला ‌‘स्टार वॉर्स‌’ चित्रपटात स्थान मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी लाभली. तिथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या इतकी वाढली की त्या स्थानाच्या संरक्षणासाठी त्यावर निर्बंध घालावा लागला. प्रसिद्धीमुळे जगाचं लक्ष तर वेधलं, पण त्याचबरोबर प्रवेश, संवर्धन आणि त्या ठिकाणाच्या शाश्वततेसाठी काही कठीण निर्णय घ्यावे लागले. अशा ठिकाणी साधारणपणे सगळ्यात आधी बदल घडतो तो तिथल्या अर्थव्यवस्थेत. नवीन कॅफेज येतात, तिथले गाईड्स सिनेमाशी संबंधित टूर्स सुरू करतात. मग सोव्हेनियर्समध्येही इतिहासापेक्षा सिनेमाची दृश्यं दिसू लागतात. हळूहळू प्रत्यक्षात बदल दिसायला लागतात. लोकांचं कुतूहल शमवण्यासाठी साइनेज, व्ह्यू पॉइंट्स आणि अन्य सुविधा निर्माण केल्या जातात. यात तसं काहीच गैर नाही. अनेक ठिकाणी सिनेमा टूरिझममुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण यामुळे त्या त्या ठिकाणाचं मूळ अस्तित्वच बदलून जातं. ते ठिकाण फक्त स्थानिकांचं न राहता पर्यटकांचं होऊन जातं, जी लोकेशन्स पूर्वी लोकांच्या आयुष्याचा हिस्सा होती, ती मग प्रदर्शनीय बनून जातात, त्यांची माहिती सांगावी लागते, त्यांचं व्यवस्थापन करावं लागतं. एखाद्या ठिकाणाचा दुसरा जन्म किंवा नवीन ओळख ही फक्त प्रसिद्धी घेऊन येत नाही, तर त्यासाठी तडजोडीही अपरिहार्य ठरतात.

स्थानिकांची कहाणी: फिल्मचं लोकेशन म्हणजे पर्यटकांसाठी ते प्रसंग पुन्हा अनुभवण्याचा एक क्षण असतो, मात्र स्थानिकांचं रोजचं जगणं त्या ठिकाणाशी बांधलेलं असतं आणि हाच महत्त्वाचा फरक असतो. राजस्थानच्या काही भागांमध्ये जिथे वारंवार शूटिंग होतं, तिथल्या स्थानिकांना कायम त्याच त्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात, कोणत्या सीनचं शूटिंग कुठे झालं? कोणकोणत्या स्टार्सनी इथे शूटिंग केलंय? हे शूटिंग कधी झालं? हळूहळू त्या जागेचा इतिहास मागे पडतो आणि पर्यटक ज्या सिनेमावरुन ती जागा ओळखतात तोच संदर्भ अधिक ठळक होत जातो. अर्थात या ओळखीतही एक अभिमान असतो. शूटिंगमुळे एखादं लहानसं गाव किंवा तुलनेनं अपरिचित भाग जगासमोर येतो. त्यातून एका बाजूला कामं, नवीन संधी निर्माण होतात, तर दुसऱ्या बाजूला एक प्रकारचा साचलेपणाही येतो, कारण त्याच एका नजरेनं त्या ठिकाणाकडे सतत पाहिलं जातं. जसं की, फोर्ट कोचीमधले स्थानिक हेच सांगतात की पर्यटक फक्त त्यांनी सिनेमात बघितलेल्या भागावर म्हणजे काही कॅफेज, वॉटरफ्रंट, जुने रस्ते यावरच आपलं लक्ष केंद्रित करतात. त्याचवेळी काही गल्ल््यांपलीकडे स्थानिकांचं रोजचं आयुष्य सुरू असतं, ज्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर डुब्रोव्निक शहराच्या नागरिकांनी याविषयी उघडपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इथे येणारे अनेक पर्यटक त्यांनी टीव्हीवर बघितलेल्या काल्पनिक शहराच्या शोधात येतात. त्यांना लोक राहतात ते खरं शहर बघण्यात रसच नसतो. ज्या रस्त्यांवर पूर्वी फक्त तिथल्या नागरिकांचा वावर असायचा, ते रस्ते आता पर्यटकांच्या रहदारीने गजबजलेले असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक फक्त ती जागा किंवा वास्तूच जपत नाहीत, तर त्या जागेच्या जुन्या आठवणीही जपतात. सिनेमाचा हिस्सा होण्याआधी आणि पर्यटकांना ती जागा माहीत होण्याआधी ती नेमकी कशी होती हे त्यांच्या पक्कं लक्षात असतं. म्हणूनच एखाद्या सुप्रसिद्ध जागेत राहणं म्हणजे जणू एकाच वेळी त्या ठिकाणाची दोन रुपं सांभाळण्यासारखं असतं. एक रुप जे जगाला माहीत असतं आणि दुसरं जे आजही घरच्यासारखं असतं.

पर्यटकांच्या नजरेतून: प्रवासाचे बेत ठरण्यापूर्वीच सिनेमाने आपल्या अपेक्षांना आकार द्यायला सुरुवात केलेली असते. जेव्हा आपण त्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा आपल्या मनात त्या ठिकाणाविषयी, ते कसं दिसेल, तिथे काय असेल याबद्दल एक इमेज तयार झालेली असते. सिनेमाने आपलं कुतुहल जागं केलेलं असतं. इतर वेळी कदाचित ज्या डेस्टिनेशन्सचा आपण विचारही केला नसता, अशी ठिकाणं सिनेमामुळे आपल्या नजरेत येतात आणि आपल्याला तिथे जावसं वाटतं. पण सिनेमातल्या विशिष्ट सीनपुरतंच जेव्हा एखाद्या डेस्टिनेशनचं महत्त्व उरतं, तेव्हा खरी समस्या निर्माण होते. लडाखमध्ये अनेकदा पर्यटक पँगाँग लेकजवळ थोडा वेळ थांबतात, थ्री इडियट्स सिनेमाशी संबंधित जागेवर जाऊन फोटो काढतात आणि पुढे निघून जातात. जणू तो लेक हा तिथल्या निसर्गाचा भाग नसून फक्त त्या सिनेमापुरतंच त्याचं अस्तित्व उरलं आहे. त्या सरोवराभोवतालचा परिसर, तिथली गावं, गावांमधले स्थानिक, त्यांच्या आयुष्याचा संथ ऱ्हिदम याकडे अनेकदा कोणाचंच लक्ष जात नाही.

इंटरनॅशनल स्तरावरही पॅरिससारख्या शहरांबाबत आपल्याला हेच अनुभवायला मिळतं. गेल्या दोन दशकातील विविध सिनेमांनी ‌‘पॅरिस‌’ची जी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेली आहे, तीच प्रतिमा मनात घेऊन लोक पॅरिस बघायला येतात. कॅफेज, ब्रिजेस, नदी किनाऱ्यावरचे एकांतातले वॉक... पण प्रत्यक्षात पॅरिस हे एक गजबजलेलं शहर आहे हे बघितल्यावर त्यांना एकतर आश्चर्य तरी वाटतं नाहीतर निराश व्हायला होतं. शहर बदललं आहे ही समस्या नाही, तर इथे येणाऱ्यांच्या अपेक्षा मर्यादित गोष्टींभोवती एकवटलेल्या असतात हा खरा प्रॉब्लेम आहे. एक पर्यटक म्हणून सिनेमातली ठिकाणं पाहणं चुकीचं आहे का? हा प्रश्नच नाहीये. प्रश्न हा आहे की आपण ती कशी बघणार आहोत? म्हणजे सिनेमातील दृश्यामुळे त्या ठिकाणी जावंसं वाटणं ठीक आहे, पण तिथे गेल्यावर त्या दृश्यापलीकडचं त्या ठिकाणाचं अस्तित्वही समजून घ्यायला हवं. अनेकदा असं होतं की प्रवासातला सर्वात अर्थपूर्ण अनुभव, सिनेमातल्या त्या विशिष्ट जागेच्या जरा पुढे गेल्यावर किंवा तिथेच अधिक काळ रेंगाळल्यावर मिळतो, कारण तेव्हा त्या जागेचं खरं रंगरुप तुमच्यासमोर उलगडतं.

जेव्हा प्रसिद्धीचा झोत निघून जातो: सिनेमामध्ये एक विलक्षण ताकद आहे. तो आपल्याला जगाची नव्याने ओळख करुन देतो. आपल्या भावनांना वाट करून देतो आणि आपल्याला नवं काही बघायला उद्युक्त करतो. पण पर्यटन मात्र यापुढचं काहीतरी देतं. पर्यटनामुळे मी एखाद्या जागेविषयी अधिक विचार करू लागतो, कारण सिनेमातील दृश्यापेक्षा त्या जागेत अजून काहीतरी आहे याची जाणीव मला पर्यटनामुळेच होते. कदाचित मी याचा जरा जास्तच विचार करीत असेन. कदाचित एखाद्या ठिकाणाचा अनुभव आपण जसं ते ठिकाण आपल्यासमोर उलगडतं तसाच घ्यायचा असतो - एकावेळी त्याचं एकच रुप पाहात. किंवा कदाचित शहरं, नगरं, निसर्गरम्य परिसर हे कधीच सिंगल डायमेन्शनल नसतात, आपण ते पुरेसे बारकाईने पाहात नाही म्हणून ते आपल्याला एका चौकटीत अडकलेले भासतात.

तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला आवडेल. एखाद्या ठिकाणाची खरंच दोन रुपं असतात का? ती दोन आयुष्य जगतात का? की मीच जरा जास्त खोलात जाऊन विचार करतोय? एखाद्या डेस्टिनेशनला त्याच्याभोवती विणल्या गेलेल्या कथांनी अर्थ प्राप्त होतो? का ती फक्त पार्श्वभूमीचा भाग असतात आणि आपण पुढे निघून आलो की दृश्य बदलल्यासारखी ती मागे पडतात? काहीही असो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं ठिकाण सिनेमात पाहिलेलं म्हणून ओळखाल, तेव्हा कॅमेऱ्यातून दिसण्यापूर्वी ते ठिकाण नक्की काय होतं? हा प्रश्न स्वतःला विचारायला विसरू नका आणि आता ते ठिकाण नेमकं काय बनण्याचा प्रयत्न करीत आहे हे सुद्धा जाणून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
राजस्थान
12 mins, read

राजस्थान

Published in Sakal Saptarang 2nd August 2026 द कॅमल फेअर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या सुमारास राजस्थानातील शांत, निवांत पुष्कर हे छोटंसं वाळवंटी शहर एका आठवड्यासाठी अक्षरशः बदलून जातं. भारतातील

भारताची सुरावट
12 mins, read

भारताची सुरावट

Published in Maharashtra Times 02nd August 2026 ...एकमेकांशी संभाषण करीत असल्यासारखे थोड्या थोड्या वेळाने हॉर्न्स वाजत असतात, रस्त्यावरचे विक्रेते ‌‘वडा पाव‌’ किंवा ‌‘कटिंग चाय‌’च्या आरोळ्या ठोकत अ

इब्न बतूताच्या देशात!
12 mins, read

इब्न बतूताच्या देशात!

Published on Loksatta Lokrang Date 02nd August 2026. ...ते झाकण उचलताच सुगंधाची एक उबदार लाट हवेत पसरली.  लोणच्यातील लिंबू, ऑलिव्ह्ज आणि केशर यांच्या साथीने मंद आचेवर  शिजवलेलं चिकन इतकं मऊ, 

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!