Published in Maharashtra Times. Date 23rd August, 2026
...मला कोणीतरी सांगितलं की “तू झांगजियाजिऐला नक्की जा कारण तिथे ‘अवतार’ सिनेमातले पर्वत पाहायला मिळतील.” बस्स! इतकं माझ्यासाठी पुरेसं होतं...
काही महिन्यांपूर्वी एका पॉडकास्टचं रेकॉर्डिंग करताना माझी को होस्ट आणि आमच्या वीणा वर्ल्डची चीफ प्रॉडक्ट ऑफिसर सुनिला पाटील हिने एक अशी गोष्ट मला सांगितली जी माझ्या कायम लक्षात राहील. तिने सांगितलं की एकदा का तिने एखादं ठिकाण ठरवलं आणि त्याचं बुकिंग केलं की मग ती त्या डेस्टिनेशनबद्दलची काहीही माहिती मिळवत नाही. ना फोटो बघते, ना इन्स्टाग्रामवरची रील्स, ना त्याबद्दलचे व्हिडिओज, ना त्या ठिकाणाबद्दलचा ट्रॅव्हल कंटेट! सुरुवातीला मला हे जरा विचित्रच वाटलं, कारण सध्या आपण सगळेच बरोब्बर याच्या विरुद्ध वागत असतो. एकदा का आपण एखादी ट्रिप बुक केली की मग उत्साहाने त्या ठिकाणाबाबतची अधिक माहिती गोळा करायला सुरुवात करतो. तिथल्या भेट द्यायलाच हव्या अशा सर्वोत्तम जागा कोणत्या? इतर लोकांनी सर्वात जास्त पसंती दिलेले अनुभव कोणते? सगळ्यात जास्त फोटो कुठले काढले जातात? हे सारं आपण पाहतो. त्यामुळे आपल्या मनात त्या ठिकाणाची एक विशिष्ट अशी प्रतिमा तयार होते.
आणि हेच तर सुनिलाच्या वागण्यामागचं साधं कारण होतं. तिला आपल्या पर्यटनातलं सरप्राइज गमवायचं नव्हतं. तिला ते डेस्टिनेशन प्रत्यक्षात जसं आहे तसंच बघायचं होतं. इतर कोणाच्या कॅमेऱ्यातून स्क्रीनवर जसं दिसलंय, तसं पाहण्यात तिला इंटरेस्ट नव्हता. तिच्या या दृष्टीकोनाचा मी जितका विचार करीत गेलो, तितका तो मला पटत गेला. वाटलं, असं तर होत नाहीये ना, की आपल्या ट्रिपची तयारी करण्याच्या नादात आपण नकळत प्रवासातील सर्वात महत्त्वाची गोष्टच त्यातून वजा करतोय?
शोधण्यापासून प्रिव्ह्यूपर्यंत: आपली पर्यटनाची कल्पना आणि पद्धत किती आमूलाग्र बदलली आहे हे पाहिलं की वर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पटकन मिळेल. जेव्हा बहुतेक ट्रिप्स अगदी कमी माहितीच्या आधारावर आखल्या जायच्या, तेव्हा आपण एखादं गाईड वाचायचो, एखाद्या मित्राशी बोलून माहिती मिळवायचो किंवा प्रत्यक्ष नकाशातून त्या ठिकाणाबद्दल जाणून घ्यायचो. मात्र या पलीकडे प्रवासाचा बराचसा भाग हा आपल्याला अज्ञातच असायचा. मग त्या ठिकाणांचा खरा शोध तिकडे गेल्यावरच लागायचा. त्यात कधी चुकीची वळणं घेतली जायची, कधी स्थानिकांची शिफारस कामी यायची, तर काही अनुभव केवळ नशिबाने आपल्याला घेता यायचे.
आज मात्र ही अनिश्चितता जवळपास नष्ट झाली आहे. एखाद्या पर्यटन ठिकाणाचा विचार आपल्या मनात येताच लगेच रील्स, आखीवरेखीव आयटिनरीज्, रिव्ह्यूज, मॅप्स, रेकमेन्डेशन्स असा त्याबाबतच्या माहितीचा ओघ सुरू होतो. मग एखादी जागा नेमकी कशी दिसते, तिथे कुठे उभं राहायचं, काय खायचं, आणि इतकंच नाही तर दिवसाच्या कोणत्या वेळी तुम्हाला तिथला बेस्ट एक्सपिरियन्स मिळेल असं सगळं आपल्याला आधीच पाहायला मिळतं. अनेकदा त्या ठिकाणी न जाताही त्या ट्रिपचं अगदी काटेकोर नियोजन करणंही शक्य होतं.
हे खरं की या बदलामुळे आपलं पर्यटन अधिक सुखकारक आणि एफिशियंट झालं आहे. आता आपण कोणत्याही ठिकाणी अधिक चांगली तयारी करून जातो, त्यामुळे चुका कमी होतात आणि आपला वेळ अधिक चांगल्या प्रकारे वापरला जातो. पण त्याबरोबरच या बदलामुळे आपल्या पर्यटनाच्या अनुभवाचं स्वरूपच पार बदलून गेलं आहे. एकेकाळी नवीन काही शोधणं हीच प्रवासाची ओळख होती. आज मात्र आपण ऑनलाइन बघितलेल्या गोष्टी चेक करण्यासाठीच जणू एखाद्या ठिकाणाला भेट देतो. मग आधी पाहिलेल्या फोटोंसारखेच, त्याच ॲंगलमधून फोटो काढतो.
प्रिव्ह्यूशिवायचा अनुभव: मागे एकदा माझ्या एका मित्राने साऊथ इंडियातील विविध मंदिरांना भेट देण्यासाठी प्रवास केला. त्याने मला त्याच्या या ट्रिपबद्दल सांगितलं तेव्हा त्याने कोणत्या ठिकाणांना भेट दिली यापेक्षा त्याने या प्रवासाकडे कोणत्या दृष्टीने बघितलं हे मला अधिक लक्षणीय वाटलं. हा प्रवास करण्याआधी त्याने या ठिकाणांबद्दलचे व्हिडिओज् किंवा इमेजेस पाहिल्या नव्हत्या. त्याने फक्त या ठिकाणाचा इतिहास आणि महत्त्व सांगणारं पॉडकास्ट ऐकलं होतं. त्या ठिकाणाविषयीचं कुतूहल मनात तयार करण्यासाठी ते पुरेसं होतं. शिवाय असं केल्याने त्याच्या मनात त्या ठिकाणांची चित्रं तयार झाली नाहीत. आणखी एक गोष्ट म्हणजे यातल्या बहुतेक मंदिरांमध्ये मोबाईल न्यायला परवानगी नव्हती, म्हणून या मंदिरांचे फारच कमी फोटोज् ऑनलाईन उपलब्ध होते. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत प्रत्यक्ष तिथे जात नाही, तोपर्यंत तिथे काय आहे याची कल्पनाच येत नाही.
तो जेव्हा त्याचा हा अनुभव सांगत होता तेव्हा त्याच्या बोलण्यातून त्याने नवं काहीतरी शोधल्याची, पाहिल्याची भावना ठळकपणे जाणवत होती. त्या मंदिरांची भव्यता, तिथलं वातावरण, त्यांचा इतिहास याबद्दल त्याच्या मनात आधी कोणतंच चित्र उमटलेलं नव्हतं. त्यामुळे तो जे प्रत्यक्षात पाहत होता, त्याची तुलना आधी स्क्रीनवर पाहिलेल्याशी करण्याची वेळच आली नाही.
या मंदिरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भव्य कलात्मकतेबरोबरच या मंदिरांनी जपलेला दीर्घ इतिहास. यातली अनेक मंदिरं हजारो वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील सामर्थ्यवान ‘चौल’ राजवटीत निर्माण झाली आहेत. या राजवटीने राज्यकारभार करताना कला, स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकी यालाही राजाश्रय दिला होता. या मंदिराच्या रचनेत बारीक कोरीवकाम, उत्तुंग गोपुरे आणि आध्यात्मिक व वैज्ञानिकतेची सांगड घालणारी वास्तुरचना पाहायला मिळते.
तंजावूरमधील श्री बृहदेश्वराच्या मंदिराचं उदाहरण घेतलं तर सुमारे हजार वर्षांपूर्वी उभारलेलं हे मंदिर त्याच्या ग्रॅनाईटमधल्या भव्य रचनेसाठी ओळखलं जातं. विशेषतः त्याचं उंचच उंच विमान, म्हणजे गाभाऱ्यावरील शिखर 60 मीटरपेक्षाही अधिक उंच आहे. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या शिखरावर ठेवण्यात आलेला कळसाचा दगड 80 टन वजनाचा असल्याचा मानला जातो. कोणत्याही आधुनिक मशिनरीशिवाय तो तिथे कसा बसवण्यात आला, हा विषय आजही चर्चेचा ठरला आहे. आता अशी ठिकाणं फक्त फोटोग्राफ्समधून समजू शकत नाहीत. अशा ठिकाणांची भव्यता, तिथली शांतता याचा अनुभव तिथे जाऊनच घेता येतो. त्यामुळेच त्याची ट्रिप खऱ्या अर्थाने वेगळी झाली. तो कशाचंही व्हेरिफिकेशन करीत नव्हता. कोणत्याही पूर्वानुभवाशिवाय तो एकामागून एक गोष्टी, जागा बघत गेला आणि ती ठिकाणं त्याच्यासमोर उलगडत गेली. कदाचित यामुळेच तो अनुभव अतिशय समाधानकारक ठरला असावा.
सरप्राइझची भूमिका: पर्यटनासारखे अनुभव हे काही आपण त्या डेस्टिनेशनला पोहोचल्यावर मग सुरू होत नाहीत, ते जेव्हा आपण ट्रिपचा विचार करू लागतो, प्लॅनिंग करू लागतो आणि ती कशी होईल याची कल्पना करू लागतो तेव्हापासूनच सुरू होतात. या उत्सुकतेमुळे आपली ट्रिप आधिक रंगतदार होते. ही उत्सुकता प्रवास सुरू होण्याआधीच एक इमोशनल, उत्साहपूर्ण वातावरण तयार करते. मात्र या उत्सुकतेचं स्वरूप कसं आहे यावर बरंच काही अवलंबून असतं. ही उत्सुकता जेव्हा कल्पनाशक्तीमधून जन्म घेते तेव्हा ती कुतूहल जागं करते. पण जेव्हा ती माहितीच्या भडिमारातून येते, तेव्हा तिच्यामुळे अपेक्षा निर्माण होतात आणि या अपेक्षांमुळे आपली प्रत्यक्ष अनुभव घ्यायची पद्धतच बदलून जाते. कारण एखाद्या ठिकाणाबद्दल ते कसं दिसतं, तिथे कसं वाटतं, याचं चित्र आपल्या मनात तयार झालेलं असेल, तर मग तिथे गेल्यावर आपण त्या ठिकाणाचा खराखुरा अनुभव घेतच नाही. आपल्या सबकॉन्शस माइंडमध्ये, आपण जे स्क्रीनवर पाहिलं होतं आणि जे प्रत्यक्षात पाहतोय त्याची तुलना सुरू होते. जर प्रत्यक्षातला अनुभव कमी पडला तर मग निराश व्हायला होतं. जर तो तंतोतंत जुळला तर समाधान मिळतं, पण त्यात सरप्राइझ क्वचितच असतं. आणि हाच तर सर्वात महत्त्वाचा फरक आहे. कारण सरप्राइझमुळेच ती टूर संस्मरणीय होते. आपण ज्यांची अपेक्षा, नियोजन केलेलं नसतं, असे क्षण आपल्या जास्त काळ स्मरणात राहतात. अचानक सापडलेला एखादा रस्ता, अजिबात माहिती नसलेलं एखादं ठिकाण किंवा फोटोग्राफपेक्षाही प्रत्यक्षात कितीतरी अधिक प्रभावी वाटणारा एखादा नजारा... ट्रिपच्या आधीच्या ओव्हर एक्सपोजरमुळे या शक्यताच नष्ट होतात.
झांगजियाजिए: मी चायनामधील झांगजियाजिऐला भेट दिली तेव्हा मला असाच अनुभव आला होता. तिथे जाण्याआधी मी अजिबात रिसर्च केला नव्हता, फोटो पाहिले नव्हते का व्हिडिओ बघितले नव्हते. मला कोणीतरी सांगितलं की “तू झांगजियाजिऐला नक्की जा कारण तिथे ‘अवतार’ सिनेमातले पर्वत पाहायला मिळतील.” बस्स! इतकं माझ्यासाठी पुरेसं होतं. मी माझ्या कझिन्सना बरोबर घेतलं आणि आम्ही तिकडे गेलो.
आज लक्षात येतंय की आधी काहीच माहिती नसल्याने आम्ही जेव्हा पहिल्यांदाच झांगजियाजिऐ नॅशनल पार्कमधलं दृश्य बघितलं, ते धुक्यातून डोकावणारे उंच उंच सँडस्टोनचे पहाड पाहिले, तेव्हा ते अजिबात ओळखीचे वाटले नाहीत. ते माझ्यासाठी अगदी नवीन, वेगळं दृश्य होतं. आणि तुम्ही जसजसे पुढे जाता, तसतसं इथलं दृश्य बदलत राहतं. एका क्षणी तुम्ही दाट जंगलातून, एका शांत पायवाटेनं जात असता आणि अचानक झाडांमधून हे भव्य रांगडे कडे समोर दिसू लागतात. थोड्या वेळाने तुम्ही एका केबल कारमधून उंच कड्यावर चढत असता आणि सगळा परिसर तुमच्या खाली उलगडू लागतो. शिखरावर पोहोचल्यावर दृश्य पुन्हा बदलतं. दूरपर्यंत असंख्य दगडी पिलर्स पसरलेले दिसतात. त्यातले काही ढगांमध्ये बुडून गेलेले असतात, तर काही टोकेरी पिलर्स आकाशात घुसलेले असतात. इथे डोंगराच्या कडेवर चिकटून असलेले ग्लास वॉकवेज आहेत, पर्वतातून जाणाऱ्या अरुंद, वळणदार वाटा आहेत आणि अचानकपणे समोर येणारे व्ह्यू पॉइंट्स आहेत. प्रत्येक ठिकाण तुम्हाला या एकाच परिसराची रुपं वेगवेगळ्या कोनातून दाखवतं. काहीच रिपीट झाल्यासारखं वाटत नाही. सगळा परिसर तुमच्यासमोर वेगवेगळ्या स्तरांतून उलगडला जातो आणि प्रत्येक स्तर हा आधीपेक्षा अधिक स्वप्नवत, अधिक अवास्तव वाटतो. हे असं ठिकाण आहे, जे नैसर्गिक न वाटता काल्पनिकच जास्त वाटतं, म्हणूनच बहुदा या ठिकाणावरून अवतार मधल्या तरंगत्या पर्वतांची कल्पना सुचली असावी आणि म्हणूनच ती अतिशय प्रभावी ठरली.
आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्हाला काहीच रिक्रिएट करायचं नव्हतं किंवा आम्हाला सेव्ह करुन ठेवलेला एखादा विशिष्ट व्ह्यू पॉइंटच बघायचा होता असंही नव्हतं. तो परिसर जसजसा आमच्यासमोर उलगडत गेला, तसतसा आम्ही त्याचा आनंद घेतला. आजही जेव्हा त्या ट्रिपची आठवण होते तेव्हा तो परिसर किती अद्भुत होता यापेक्षाही त्या परिसराचा आनंद आम्ही कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय कसा घेतला याचंच मला नवल वाटतं.
यात काहीच वाईट नाही... : खरं सांगायचं तर भरपूर माहिती घेऊन पर्यटन करण्याचा ट्रेंड उगाच आलेला नाही. माहिती सहज उपलब्ध होऊ लागल्याने पर्यटन अधिक सुरक्षित आणि सोपं झालं. दहा वर्षांपूर्वी एखाद्याला आपल्या पहिल्याच परदेश प्रवासाची आखणी करताना जितकं कॉन्फिडंट वाटत असेल, त्यापेक्षा आज पहिल्यांदा परदेशात जाणाऱ्याला अधिक कॉन्फिडंट नक्की वाटतं. रिव्ह्यूजमुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याचे टळतात. व्हिडिओज् बघितल्याने नेमकं काय बघायचं हे कळतं, सविस्तर आयटिनरीज्मुळे कमीत कमी वेळात महत्त्वाचं काय बघायचं हे ठरवता येतं. या सगळ्यामुळे पर्यटनाचं मोठ्या प्रमाणावर डेमोक्रटायझेशन झालंय. आता तुम्ही अधिक एफिशियंटली नियोजन करू शकता, साध्यासाध्या चुका टाळू शकता आणि एखादा अत्यंत महत्त्वाचा अनुभव घ्यायचा राहणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊ शकता. अनेक पर्यटकांसाठी, विशेषतः ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांच्यासाठी अशी तयारी फक्त उपयुक्तच नाही, तर आवश्यक ठरते.
पण प्रश्न आहे तो यातला बॅलन्स कसा सांभाळायचा हा. कारण माहितीमुळे जरी निर्णय घेणं अधिक सोपं जात असलं, तरी माहितीच्या अतिरेकामुळे सगळ्या अनुभवाचीच मजा कमी होते. एखाद्या ठिकाणाची माहिती असणं आणि ते ठिकाण अतिपरिचयाचं असणं यातला फरक विसरता कामा नये.
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे.: या सगळ्यातून मिळालेली एक प्रॅक्टिकल आयडिया म्हणजे आपल्या प्लॅनिंगला एक सीमारेषा असायला हवी. पण आपण अनेक जणं प्लॅनिंगकडे या नजरेनं बघत नाही. आपण असं समजतो की प्रवासाला निघेपर्यंत ते सुरूच असतं आणि इतकंच नाही तर ट्रिपवरही ते सुरू असतं. पाहण्यासाठी ‘अजून एक’ व्हिडिओ नक्की असतो, ‘आणखी एक’ रेकमेंडेशन तपासायचं असतं आणि बघायलाच हवी अशी ‘अजून एक’ जागा ॲड करायची असते. म्हणूनच पर्यटनाच्या प्लॅनिंगकडे दोन टप्प्यांमध्ये बघणं अधिक योग्य ठरेल. यातला पहिला टप्पा व्यवहार्य आहे. म्हणजे तुम्ही डेस्टिनेशन ठरवता, फ्लाइटची तिकिटं काढता, राहण्यासाठी जागा निवडता आणि तुम्हाला तिकडे काय काय करायचं आहे याची एक ढोबळ रूपरेषा ठरवता. हे आवश्यकच असतं. यामुळे सहलीचा आराखडा तयार होतो आणि तुमचा वेळ तिकडे वाया जाणार नाही याची खात्री पटते.
दुसरा टप्पा असा आहे जिथे आपण मर्यादा ओलांडून फारच पुढे जातो. इथेच आपण माहितीच्या लोंढ्यात फसतो आणि अनावश्यक कंटेट पाहू लागतो. मग ट्रिपवरील प्रत्येक क्षण कसा असेल याचं व्हिज्युअलायझेशन सुरू होतं. प्रत्येक व्ह्यू पॉइंटची ओळख करुन घेतली जाते आणि प्रत्येक अनुभव अधिकाधिक परिपूर्ण करण्याची धडपड सुरू होते. आणि हीच ती जागा असते जिथे थांबण्यातच भलं असतं. माहिती वाईट असते म्हणून नाही, तर एका टप्प्यानंतर ती नवं काही सापडण्यातला आनंदच कमी करून टाकते म्हणून.
तुम्हाला काय माहिती आहे आणि तुम्ही काय अनुभवणार आहात यात जे अंतर असतं ना, त्यामुळे पर्यटनातली नवलाई टिकून राहते. कदाचित पहिल्यांदा असं करताना थोडं जड जाईल, कारण आपण प्रत्येक गोष्टीची पूर्ण माहिती करून घ्यायची सवयच लावली आहे. पण पर्यटनाच्या संदर्भात बघाल तर थोड्या गोष्टी माहिती नसणं यात तोटा नाही, तर उलट फायदाच असतो. तेव्हा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ट्रिपचं प्लॅनिंग कराल तेव्हा माहितीवर आधारित निर्णय तर घ्याच, पण ते झालं की मग मात्र सहलीच्या अनुभवासाठी काही जागा मोकळी सोडा. कारण ज्या जगात प्रत्येक गोष्टीचा प्रिव्ह्यू असतो, तिथे पर्यटनाची खरी रंगत तुम्ही त्या ठिकाणाविषयी आधी काही जाणून न घेण्यातच असते. आणि कदाचित हीच ती जपून ठेवण्याची गोष्ट आहे. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सेलिब्रेट लाईफ!






























Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.