हुरेऽऽऽ रविवारी सुट्टी

0 comments
Reading Time: 9 minutes

रविवारची सुट्टी कशी झाली त्याचा माग काढला तर ब्रिटिशांनी १८४३ मध्ये ही सुरू केल्याचं कळलं, मागच्या आठवड्यातील बातमीनुसार भारतीयांना रविवारची पहिली सुट्टी मिळाली ती १० जून, १८९० रोजी आणि ती इंग्रज साहेबाच्या मेहेरबानीने नव्हे तर श्री नारायण मेघाजी लोखंडे या मराठी माणसाने तब्बल सहा वर्ष ब्रिटिशांशी केलेल्या संघर्षानंतर. जर त्या काळी एवढ्या लढ्यानंतर ही रविवारची सुट्टी मिळवलीय तर ती अशी लयाला जाता कामा नये नाही का!

टूबी? ऑर नॉट टू बी? दॅट इज द क्वेश्‍चन. सध्या आमच्याकडे ही त्रिशंकू अवस्था आहे. निर्णय तर घ्यावाच लागणार आहे पण त्यात जास्त लोक हे ‘टू बी’च्या साइडने मनापासून असले पाहिजेत ही इच्छा आहे. आमच्याकडे शक्यतोवर तसा कुठचाही निर्णय लादला जात नाही. संबंधित लोकांशी संवाद-चर्चा-वादविवाद-मताधिक्य या गोष्टी करून घेऊनच प्रश्‍न सोडविण्याची संस्कृती बर्‍यापैकी रूजलीय. अर्थात प्रश्‍न सुटत नसल्याची त्रिशंकू अवस्था आल्यावर थोडा फ्युचरिस्टिक आणि सर्वोपकारी निर्णय घ्यावा लागतो कारण त्रिशंकू अवस्था फार काळ ठेवणं धोक्याचं. ह्याला कदाचित व्हेट्टो असं म्हणतात, हा हा हा .

तर ही त्रिशंकू अवस्था येण्याचं कारण आहे ‘आमची कार्यालयं म्हणजे खासकरुन सेल्स ऑफिसेस रविवारी सुरु असली पाहिजेत की नाही’ हा प्रश्‍न. खरंतर जगभर ट्रॅव्हल कंपन्या किंवा ट्रॅव्हल एजन्सीज ह्या रविवारी बंदच असतात. जगात बर्‍याच ठिकाणी तर शनिवार रविवार हे दोनही दिवस कार्यालयं बंद असतात. दोन दिवस बंद ठेवणं ही पद्धत भारतात तशी उशीरा सुरु झाली पण जागतिकीकरणामुळे ती पद्धत भारताच्या मन:स्थितीत रूजली गेली असं म्हणायला हरकत नाही. भारतात ही दोन दिवस बंदची पद्धत अजूनही फिफ्टी फिफ्टी स्वरूपात आहे. आमचंच बघानं, आठवड्याचा कोणता दिवस जास्त बिझी असतो सेल्सच्या दृष्टीने असं विचारलं तर ‘शनिवार’ हे एकमुखी उत्तर. शनिवारी आमचे ग्राहक म्हणजे पर्यटक ह्यांना फूल डे-हाफ डे-सेकंड सॅटर्डे-फोर्थ सॅटर्डे अशा प्रकारची सुट्टी असल्याने सर्वच सेल्स ऑफिसेसमध्ये शनिवारी पर्यटकांची ये-जा जास्त असते. सेल जास्त होतो त्यामुळे शनिवारी सुट्टी ही संकल्पना सध्या येणार्‍या पाच ते दहा वर्षांसाठी तरी विचाराधिनसुध्दा असणार नाही. तसा विचार नुसता मांडला तरी सर्व सेल्स ऑफिसेस त्याचं मुळापासून उच्चाटन करतील. त्यामुळे तिथे ढुंकूनही बघायचं नाही. अर्थात त्यात एक बदल आम्ही केला. आमच्याकडे टूर मॅनेजर्स ह्या कॅटॅगरीमध्ये मुलांचा भरणा अधिक आहे तसा कॉर्पोरेट ऑफिस आणि सेल्स ऑफिसेसमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. त्यातल्या मुलींची डिमांड होती की घर आणि करियर ही तारेवरची कसरत सांभाळताना रविवारची एक सुट्टी पुरत नाही, आपल्याला काही करता येईल का? शनिवारी ऑफिसेस तर बंद ठेवता येत नाहीत पण मुलींना घरी अधिक वेळ पाहिजे ही गरज होती, त्यामुळे तेव्हा आम्ही सुवर्णमध्य गाठला तो शनिवारच्या स्पेशल लीव्हचा. महिन्यातून दोन शनिवारी किंवा कमी कामाच्या दिवशी किंवा ज्याच्या त्याच्या गरजेच्या दिवशी महिन्याला ह्या दोन अ‍ॅडिशनल स्पेशल लीव्हज घेता येतील असा एक निर्णय घेतला गेला आणि तो सत्कारणी लागला, ती प्रथा अव्याहत सुरू आहे.

पाच वर्षांपूर्वी जेव्हा वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा पहिल्यांदा आमचं ऑफिस म्हणजे आमचं राहतं घर होतं. त्यामध्ये आमची एक स्ट्रॅटेजी मिटिंग झाली होती. पन्नास पंचावन्नजणं आम्ही दाटीवाटीने आमच्या त्या लिव्हिंग रूममध्ये बसलो होतो आणि व्हॉट नेक्स्ट? ह्यावर चर्चा करीत होतो. त्यावेळी आपण रविवारी सेल्स ऑफिसेस सुरू ठेवायलाच हवीत हा मुद्दा आमच्या पुणे ऑफिसचा मॅनेजर संदीप जोशीने मांडला. त्यावेळी अगदी सगळेच रविवार नको पण काही रविवारी आपण आपली सेल्स ऑफिसेस पर्यटकांसाठी सुरू ठेवू शकतो हा निर्णय झाला आणि वर्षातले काही रविवार आम्ही ऑफिसेस सुरू ठेवली. पर्यटकांचीही सोय झाली. ज्यांना आठवडाभरात अजिबात यायला जमत नसे ती मंडळी रविवारी येऊन त्यांचं बुकिंग किंवा व्हिसाची कामं करवून घेत असंत. रविवारमुळे निश्‍चितपणे बुकिंग संख्येत भर पडत होती. सेल्स टीमही खूश होती, संस्थेचा फायदा होता आणि काही पर्यटकांनाही रविवारी ऑफिस सुरू असणं हे सोयीचं झालं होतं. एकूणच विन-विन-विन सिच्युएशन.

पण… इकडे किंतु-परंतुचा विचार मनात घोळायला लागला. हळूहळू एक लक्षात येत होतं की रविवारी जरी फक्त सेल्स ऑफिसेस सुरू असली तरी सर्वच ठिकाणचे मॅनेजर्स, इन्चार्ज तसंच सर्व डिपार्टमेंटमधली कुणी ना कुणी मंडळी त्या रविवारच्या ‘सेल्स ऑफिसेस ओपन’ ह्या पद्धतीमुळे रविवारची सुट्टी असूनही घरी राहूनही बर्‍यापैकी बिझी राहत होती. म्हणजे शरीराने घरी पण मनाने कामात अशी स्थिती. जस्ट इमॅजिन करा ही सिच्युएशन… रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत किंवा एकूणच कुटुंबासोबत मस्त गप्पागोष्टी हसिमजाक सुरू आहे आणि तेवढ्यात ऑफिसमधून फोन येतो आणि घराच्या बाल्कनीत जाऊन ही आई किंवा हे बाबा पंधरा मिनिटं किंवा त्याहूनही जास्त वेळ ते ऑफिसचं काम सोडवत बसलेयत. कुटुंब थोडा वेळ वाट पाहातं, मग कंटाळतं, सौ किंवा श्री ‘हे नेहमीचंच’ असा शेरा मारून मूड ऑफ होऊन आपापल्या कामाला निघून जातात किंवा व्हर्च्युअल वर्ल्डचा-सोशल मिडीयाचा सहारा घेतात. सगळ्याचाच विचका होतो त्या रविवारच्या सुट्टीचा ज्याकडे सर्वजण आठवडाभर आशेने बघत असतात. थोडक्यात रविवारची सुट्टी म्हणजे कम्प्लीट रीज्युवीनेशन, एक परफेक्ट ब्रेक हे स्वप्नं बनून जातं. आणि विरोधाभास असा की जेव्हा पर्यटकांना आम्ही, ‘आखिर एक ब्रेक तो बनताही है’ हे आमच्या जाहिरातीतून आग्रहाने सांगत असतो तिथे आम्ही मात्र ह्या रविवारच्या ऑफिसमुळे आठवडा आठवडा त्यातच गुंफले गेलेलो. ऑफिस सुरू असलं की घरी शांतपणा मिळत नाहीच. आता वर्षभर सतत जगात कुठे ना कुठे सहली सुरू असतात त्यामुळे आम्ही किंवा अर्धी डिपार्टमेंट्स ही त्यात चोवीस तास बिझी असतातच तिथे नो ऑप्शन पण किमान सेल्स ऑफिसेसमधली अणि कॉर्पोरेट ऑफिसमधली अर्धी टीम म्हणजे किमान सहाशे मंडळी ही रविवारची सुट्टी पूर्णपणे घेऊन, टोटली रीफ्रेश होऊन सोमवारी नव्या उत्साहाने जर कामाला सुरुवात करायला लागली तर तब्येती चांगल्या राहतील, मूड चांगला राहिल, आम्ही ज्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत तिथे आणखी चांगली-हसरी आणि मनापासून सेवा देता येईल. ‘सर सलामत तो पगडी पचास’ त्यामुळे प्रत्येकाचं शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहणं महत्वाचं ज्याचा फायदा वैयक्तिकरित्या त्या व्यक्तीला आणि ऑर्गनायझेशनला होणारच होणार. पुन्हा एकदा विन-विन सिच्युएशन, पण तिसर्‍या ‘विन’चं काय म्हणजे आमच्या पर्यटकांचं काय? त्यांची गैरसोय होऊ शकते अणि ज्या पर्यटकांमुळे वीणा वर्ल्ड उभं आहे त्यांची गैरसोय करुन जर एखादा निर्णय घेतला तर तेही बरोबर नाही. मी जेव्हा आता ह्यापुढे आपण रविवारी काम करायचं नाही हा मुद्दा मांडला तेव्हा सेल्स टीमने एकमुखाने नाराजी दर्शवली. त्यांच्या मते ‘वर्षभरातल्या बुकिंगमध्ये रविवारच्या बुकिंगचा वाटा पाच टक्क्याहून जास्त आहे, तेव्हा सहा सात हजार पर्यटकांचं बुकिंग आपण असंच सोडून द्यायचं का?’ त्यांचा मुद्दा रास्त होता. पण मी सुध्दा आधी एक बिझनेस वुमन आहे त्यामुळे होमवर्क करुनच बसले होते. मला तिथे पु.लं चा एक किस्सा आठवला, ‘छत्री खरंच विकत घ्यायची का?’ वर्षातले चार महिने पाऊस पडतो, त्या चार महिन्यातले दोन महिने आपण घरात आणि झोपेत असतो. उरलेल्या दोन महिन्यातला अर्धा वेळ आपण ऑफिसात असतो म्हणजे उरला एक महिना त्यात अर्धा वेळ पाऊस असतो, अर्धा वेळ नसतो म्हणजे उरले पंधरा दिवस….असं करीत करीत छत्री विकत घ्यायची गरजच नाही हे त्यांनी पटवून दिलं होतं. मी सुध्दा तेच केलं सहा हजार पैकी समजा तीन हजार बुकिंग हे आपल्या प्रिफर्ड सेल्स पार्टनर्स कडून असेल जी मंडळी रविवारी किंवा इतर दिवशी पर्यटकांच्या घरी जाऊनही सर्व्हिस देत असतात. म्हणजे राहिले तीन हजार त्यातले दीड हजार हे आपले नेहमी येणारे गेस्ट होते ते अदरवाइज संध्याकाळी किंवा शनिवारी येत होतेच त्यामुळे ते आले असतेच. त्यानंतर उरले दीड हजार ज्यांचा प्रश्‍न होता त्यातील शंभरजणांचा सर्व्हे केल्यावर कळलं की त्यातील पन्नास टक्केंना शनिवारी यायला जमलं असतं पण रविवारी ऑफिस उघडं असल्याने ते रविवारी आले. आता उरले होते साडेसातशे पर्यटक ज्यांचा खरोखर प्रश्‍न होता. त्यावर पाणी सोडायचं? अजिबात नाही. प्रत्येक पर्यटक महत्वाचा आहे. आणि आता त्यांचाही प्रश्‍न आम्ही सोडवलाच तो ‘ऑनलाईन बुकिंग’ने. जमाना बदललाय, पाच वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या स्थितीमध्ये सभोवताली जमीन-आस्मानाचा फरक पडलाय. भारतीयांना ऑनलाईन बुकिंगची सवय झालीय आणि ती सेवा भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या पर्यटकांसाठी खूली आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की अगदी जगाच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक वीणा वर्ल्डच्या सहलींचं बुकिंग करताहेत आणि आमची ऑनलाईन टीम त्या पर्यटकांच्या दिमतीला सज्ज असते. एवढी सर्व मल्लीनाथी केल्यावर जवळजवळ सर्वांचं एकमत होत असताना दिसलं. पर्यटकांनाही ऑनलाईन बुकिंगचा पर्याय उपलब्ध झाला आणि आम्ही ‘रविवारी ऑफिसेस बंद’ या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं.

रविवारची सुट्टी कशी झाली त्याचा माग काढला तर ब्रिटिशांनी १८४३ मध्ये ही सुरू केल्याचं कळलं, मागच्या आठवड्यातील बातमीनुसार भारतीयांना रविवारची पहिली सुट्टी मिळाली ती १० जून, १८९० रोजी आणि ती इंग्रज साहेबाच्या मेहेरबानीने नव्हे तर श्री नारायण मेघाजी लोखंडे या मराठी माणसाने तब्बल सहा वर्ष ब्रिटिशराजशी केलेल्या संघर्षानंतर. जर त्या काळी एवढ्या लढ्यानंतर ही रविवारची सुट्टी मिळवलीय तर ती अशी लयाला जाता कामा नये नाही का! आणखी एक आख्यायिका अशी ऐकायला मिळाली की, ‘देवाने सहा दिवसात जग बनवलं आणि श्रमपरिहार म्हणून त्याने सातव्या दिवशी सुट्टी घेतली. जो दिवस रविवार झाला’. आता जर देवही दमत असतील तर आम्हा पामरांची काय अवस्था. आम्हाला रविवारची सुट्टी मिळालीच पाहिजे नाही का?. सो, पर्यटकहो ‘डोन्ट टेक मी राँग, वुई आर अ‍ॅट युवर सर्व्हिस, ऑलवेज, ह्या रविवारच्या सुट्टीमुळे आता जास्त उत्साहाने आणि आनंदाने’.

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*