पोलर चॅलेंज

0 comments
Reading Time: 8 minutes

आईसलँडिक नॉर्दन लाइट्स की स्कॅन्डिनेव्हियन नॉर्दन लाइट्स?

‘इथे सूर्यास्ताच्या आत घरी ये’ असं आईने सांगायची सोयच नाही, कारण इथे सूर्य अस्ताला जातच नाही. प्रेशर असल्यासारखा तो सत्तर दिवस ओव्हरटाईम करतो. अर्थात या ओव्हरटाईमचं उट्ट तो काढतो आणि पुढे चक्क तेवढ्या दिवसांची सुट्टी घेतो. अजिबात तोंड दाखवत नाही. जस्ट इमॅजिन, आपल्याकडे एक दिवस सूर्यास्त झालाच नाही किंवा सूर्य उगवलाच नाही तर… ‘रात्र झालीच नाही तर? सकाळ उजाडलीच नाही तर?…’ त्या अनुषंगाने येणार्‍या अनेक आपत्तींचा-गोंधळांचा कल्पनाविलास भले आपण खूप चांगला करू शकू, पण जर तशी परिस्थिती उद्भवली तर त्याचा सामना करणं आपल्याला खूपच कठीण होऊन जाईल.

किती वाजले? नऊ! सकाळचे की रात्रीचे? असा काहीसा गोंधळलेला संवाद जगाच्या त्या टोकावर ऐकू येतो. हे प्रवाशांच्या बाबतीतच घडतं असं नाही तर तिथले लोकल्स्ही कधी-कधी संभ्रमात पडतात. अहो वर्षातले काही दिवस जर रात्र झालीच नाही, सूर्य मध्यान्हीसारखा सदासर्वकाळ डोक्यावर तळपत राहीला, दिवस आणि रात्रीचा ट्रॅकच विसरायला झाला तर असे प्रश्‍न येणारच नाही का. आपलं बरं आहे, म्हणजे निसर्गाच्या आणि भूगोलाच्यादृष्टीने सर्वात भाग्यवान देश कोणता असेल तर तो आपला भारत. निसर्गच इथे आपल्याला सांगतो ‘सकाळ झाली उठा’, ‘रात्र झाली झोपा’. निसर्गाच्या प्रतिकूलतेची फारशी झळ आपल्याला कधी पोहोचलीच नाही. जगाच्या अनेक भागात अशातर्‍हेच्या प्रतिकूलतेचा हसतमुखाने सामना करणारे असंख्य नागरिक जेव्हा बघायला मिळतात तेव्हा आपल्या पदरी पडलेल्या अनुकूलतेला धन्यवाद देतानाच बरंच काही शिकायला मिळतं, व्यवसायामुळे जगाचा कानाकोपरा धुंढाळायला मिळाल्याने अशा अनेक गोष्टी जवळून बघायला मिळाल्या. आज खासकरून लिहावसं वाटलं ते आर्क्टिक सर्कलच्या एक्स्ट्रीमिटीज्विषयी, तिथल्या निसर्गाच्या चमत्कारांविषयी.

पोलर डे, पोलर नाइट, नॉर्थ केप, लॅपलँड, नॉर्डकॅप, व्हाईट नाइट फिनॉमेना, फादर ख्रिसमस, हस्कीज्, आर्क्टिक अ‍ॅडव्हेंचर सामी, बाल्टिक सी, मिडनाइट सन, ओरोरा बोरेआलिस, नॉर्दन लाइट्स, सांताक्लॉज व्हिलेज असे अनेक आगळेवेगळे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात ते आर्क्टिक सर्कलमध्ये, उत्तर ध्रुवाजवळ. रशिया, स्कॅन्डिनेव्हिया, आईसलँड, कॅनडा, अलास्का ह्या सगळ्या देशांचा वरचा भाग किंवा माथा जो आर्क्टिक सर्कलच्या अखत्यारीत येतो त्या भूभागात खूप आधीपासून मनुष्यवस्ती आली आणि अप्रतिम अशा निसर्गसौंदर्यामुळेे पर्यटक तिथे आकर्षित व्हायला लागले.

वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टसाठी आम्ही एकदा लंडनला होतो तेव्हा अचानक ठरवलं, चला ह्यावेळी नॉर्दन लाइट्स बघायला जाऊया. पहिल्यांदा जाणार होतो, कोणताही अभ्यास केला नव्हता, कुठलंही रीझर्व्हेशन नव्हतं, बरं तेव्हा आत्तासारखं आपल्या तळहातावर चुटकीसरशी माहिती देणारं इंटरनेटचं माध्यम प्रभावी झालं नव्हतं. भारतातूनही कुणी नॉर्दन लाइट्सच्या सहली करीत नव्हतं. अ‍ॅबसोल्युटली झीरो नॉलेज. ‘चलो कुछ अलग करते हैं।’ म्हणत आम्ही त्याच दिवशी नॉर्वेचं विमानाचं तिकीट काढलं, आणि पोहोचलो ऑस्लोला. पूर्वी ऑस्लोला गेलो असल्याने माहितीचं शहर होतं, पुन्हा एकदा विगेलँड पार्कला भेट दिली आणि दुसर्‍या दिवशी निघालो ट्रॉम्सोकडे, नॉदर्न लाइट्सचा प्रवास तिथूनच सुरू होणार होता. पहिल्यांदाच एवढ्या थंडीत हा स्कॅन्डिनेव्हियाचा प्रवास आम्ही करणार होतो. नॉदर्न लाइट्सचा सीझन सुरू व्हायच्या आधीच आम्ही तिथे पोहोचल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. फक्त तीन ते चार तासांचा दिवस, ट्रॉम्सोची अर्धी जनता घरात नाहीतर बीयर बारमध्ये. तिथल्या टूरिझमच्या लोकांना भेटून भारतातून इथे टूरिस्ट घेऊन येण्याची इच्छा सांगितली आणि त्यांनी आम्हाला तुम्ही कसा प्रवास करा ह्याची संपूर्ण माहिती दिली. बर्फाने आच्छादलेली शहरं, रस्त्यावर कुणीही नाही, मधूनच मुख्य रस्त्यांवरच्या गाड्यांंचे आवाज, अक्षरश: शुकशुकाट. मॉलमध्ये किंवा ऑफीस बिल्डिंगमध्ये तेवढा लोकांचा वावर. कधी-कधी प्रश्‍न पडायचा, ‘कसे राहतात इथे लोकं?’ ट्रॉम्सोपासून नॉर्थ केपपर्यंतच्या प्रवासात एका एअरपोर्टला पोहोचलो तेव्हा एअरपोर्टवर कुणीही नव्हतं, दाराजवळ गेलो तर कोणतंही कुलूप न लावता दार बंद केलं होतं. आम्ही ते उघडलं आणि आत घुसलो. कळत नव्हतं फ्लाइट येणार आहे की नाही. काही वेळ दोघंच बसून होतो. विमानाला चाळीस मिनीटं असताना दोन मुलं आली, त्यांनी धडाधड काऊंटर सुरू केला. चार प्रवासी आले. एकूण आम्ही सहा प्रवासी आणि ते दोघं एअरपोर्ट अटेंडन्टस्. विमानाची वेळ झाली तसं एक छोटंसं विमान आलं आणि निघालो नॉर्थ केपकडे. बर्फाच्छादित नॉर्थ केपच्या व्हिजिटर सेंटरवरून नॉर्थ पोलकडे पहायचं हे आमचं लक्ष्य. इथून नॉर्थ पोल साधारण अडीच हजार किलोमीटर्सवर, त्यामुळे जगाच्या टोकावर उभं राहण्याचा आनंद जो काही असतो तो अगदी मनमुराद लुटला. ह्याच प्रवासात आम्ही पहिल्यांदा हस्की राईड केली. एस्किमो असल्याचा फील आला, आजही हे हस्की राईड अ‍ॅडव्हेंचर आठवलं की तेवढाच आनंद होतो जेवढा अ‍ॅक्च्युअली ती राईड करताना झाला होता. आम्ही आमची ही साहसी सहल पूर्ण केली ती नॉर्दन लाइट्स बघून. आकाशात होणारी रंगांची उधळण बघणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट होतं आणि ते साध्य केलंं. आम्ही ह्या नॉर्दन लाइट्सच्या कायम आठवणीत राहील अशा सहलीवरून परत आलो आणि भारतातून नॉर्दन लाइट्सच्या सहली सुरू केल्या.

‘नॉर्थ पोल’ म्हणजे कोणाचीही-कोणत्याही देशाची मालकी नसलेला, जगातल्या शेवटच्या वसाहतींपासून सुमारे अडीच हजार किलोमीटर्सवर असलेला ‘उत्तर ध्रुव’. आपल्या सर्वांच्या डोक्यावर असलेला हा भाग. आर्क्टिक महासागर आणि लहानमोठ्या समुद्रांनी वेढलेला. ह्या पोलर रीजनमध्ये, नॉर्थ पोलच्या जवळ असणारे देश म्हणजे अलास्का (युएसए), कॅनडा, ग्रीनलँड (डेन्मार्क), आईसलँड, नॉर्वे, रशिया, फिनलँड आणि स्वीडन. सायबेरिया, युकॉन, ट्रॉम्स, लॅपलँड, टुंड्रा प्रदेश, इनुइट्स, एस्किमो, सामी, इग्लू अशी सगळी शाळेत शिकवलेली नावं ह्या आर्क्टिक पोलर रीजनमधलीच. इथे दोनंच प्रकारचं हवामान, थंड आणि अतिथंड. पोलर बेअर, स्नो आऊल, आर्क्टिक फॉक्स, आर्क्टिक वूल्फ ह्या सर्वांच्या गोष्टींनी आपलं बालपण सजलं होतं तेही सारे इथलेच प्राणी. इनुइट्स, एस्किमो, सामी असे अनेक नावांनी ओळखले जाणारे इथले रहिवासी आजही तेवढंच खडतर आयुष्य जगताहेत. गरीबी-दारिद्य्र-रोगराई ह्यांनी ग्रासल्याने, कॅनडा स्वीडनमध्ये माणसाचा लाईफ स्पॅन जर पंच्याऐंशी वर्ष असेल तर इथे ह्या पोलर रीजनमध्ये तो साठहून खाली आहे. तिथेही पुरुषाने शिकार करून आणायची आणि बाईने रांधायचं, जेवण सगळ्यांना पुरेसं नसेल तर स्वतः उपाशी राहायचं अशाच आपल्यासारख्या पद्धती आहेत. तेल, वायू, खनिजं, गोड पाणी आणि मासे ही संपत्ती आहे पोलर रीजनची. जगातला गोड्या पाण्याचा दहा टक्के साठा आर्क्टिकमध्ये आहे. पण आता एकच धास्ती आहे ती ग्लोबल वॉर्मिंगची. सतत बर्फाळलेला हा प्रदेश तीस वर्षांनी उन्हाळ्याच्या दिवसात बर्फ विरहीत होईल, म्हणजे आर्क्टिकमधला बर्फ बघायचा असेल तर आपल्याला हिवाळ्यात जावं लागेल. हा प्रचंड बर्फाचा साठा वितळल्यावर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल आणि त्याने काही नवीन आव्हानं आपल्यापुढे उभी राहतील. आपण अतिप्रगत लोकं उत्सर्जित करीत असलेल्या कार्बन डायऑक्साइडचा हा प्रसाद किंवा प्रताप. असो. तो खूपच मोठा विषय आहे आणि तज्ञ मंडळी त्यावर काम करताहेत, अर्थात त्यांनी दिलेल्या गाईड लाईन्सने वागणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे पुढचा अनर्थ टाळण्यासाठी.

पोलर रीजनमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात (मे ते सप्टेंबर) मिडनाइट सनच्या वेळी जून-जुलैमधला चोवीस तासांचा दिवस आपल्याला बघायला मिळतो, तर थंडीच्या दिवसात (नोव्हेंबर ते मार्च) जानेवारी-फेब्रुवारीत ह्याच ठिकाणी आपण बघतो चोवीस तासांची रात्र. हिवाळ्यातला नॉर्दन लाइट्सचा चमत्कार म्हणजे निसर्गाचा आशीर्वाद म्हणायला हरकत नाही कारण त्याद्वारे जगभरच्या पर्यटकांची ये-जा इथे सुरू राहते आणि इथल्या इकॉनॉमीला मदत होते. नॉर्दन लाइट्स म्हणजे ‘ओरोरा बोरेआलिस’. ओरोरा म्हणजे रोमन भाषेत सूर्यदेवता तर बोरेआलिस हा उत्तरी वारे दर्शविणारा ग्रीक शब्द. आपल्या पृथ्वीच्या वातावरणातील वेगवेगळे वायू आणि सोलर विंड्स ह्यांची अवकाशात जेव्हा टक्कर घडते तेव्हा मोठा आवाज होतो आणि त्या कोलिजनमूळे वेगवेगळ्या रंगांची उधळण आपल्याला आसमंतात दिसते ह्या पोलर रीजनमधून. हिरवा, पिवळा, गुलाबी रंग आसमंतात असा पसरलेला बघणं हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा. जेव्हा शास्त्रीय कारण शोधलं गेलं नव्हतं तेव्हा तिथल्या रहिवाशांच्या मते, हा रंग किंवा आवाज म्हणजे त्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांचा आत्मा असतो किंवा आपल्या मृत आप्तांचा आत्मा आपल्याशी संवाद साधतो अशा समजुती होत्या, काही ठिकाणी अजूनही तसं मानलं जातं. पण हा नैसर्गिक चमत्कार बघायला आता मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक जायला लागलेत. म्हणून तर यावर्षीची पहिली नॉर्दन लाइट्स टूर हाऊसफुल्ल झाली आणि आता दुसर्‍या सहलीचं बुकिंग सुरू आहे.

अद्भुत, अप्रतिम, अनोखं, चमत्कारीक, विशाल असं हे जग बघायला एक आयुष्य अपूरं आहे. जेवढं जमेल तेवढं बघून घ्यायचं आणि सर्वांना दाखवायचं हा वसा घेतलाय. सतत बॅक ऑफ द माईंड एकच मंत्र असतो,

‘चलो, बॅग भरो, निकल पडो!’

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*