टू शॉप ऑर नॉट टू शॉप?

0 comments
Reading Time: 8 minutes

खरंच! आपण हॉलिडेवर त्या ठिकाणची प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी जातो, मग आपण तिथे शॉपिंग का बरे करतो? जागतिकीकरणामुळे आजकाल जगभर जवळ-जवळ प्रत्येक गोष्ट मिळते. पण तरीसुद्धा काही वस्तूंच्या शॉपिंगची मजा ही त्यांच्या मूळ ठिकाणी लुटण्यातच आहे. प्रत्येक देशात अशी कुठली ना कुठली तरी वस्तू नक्कीच असते जी केवळ तिथेच तयार होते. मग थोडेसे शॉपिंग करायला काहीच हरकत नाही, नाही का?

माझ्या हातातला ड्रेस मी परत हँगरवर लावून ठेवला. लंडनमधल्या एका भव्य शॉपिंग मॉलमध्ये मला सर्वात जास्त आवडलेल्या त्या ड्रेसवर ‘मेड इन इंडिया’ हा टॅग लावला होता. भारतात बनविलेल्या कपड्यांना लंडनमध्ये जाऊन पाऊंडमध्ये खर्च करून परत इंडियामध्ये आणायचे का? हा गहन प्रश्‍न मला पडला होता. भारतात हा ड्रेस किती स्वस्तात मिळेल आणि तोसुद्धा एखाद्या टेलर किंवा छोट्या-मोठ्या डिझायनरकडे तर हवा तसा आपल्या मापाचा शिवूनदेखील मिळेल. किती स्वस्तात बनवून घेतला असेल तो भारतात आणि इथे इतका महाग विकत आहेत. पण अशी स्टाईल मात्र भारतात कधीच बघायला मिळत नाही. शिवून घेतलेले डिझायनरकडचे दोन-तीन कपडे मनासारखे न झाल्याने तसेच कपाटात पडले आहेत. शिवाय मला भारतात शॉपिंगसाठी वेळच मिळत नाही आणि रविवारी आपल्याकडच्या मॉल आणि शॉपिंग सेंटर्सची गर्दीदेखील सहन होत नाही. ‘मेड इन इंडिया’ या ड्रेसने माझ्या मनात विचारांचा गोंधळ उडवून ठेवला.

खरंच! आपण हॉलिडेवर त्या ठिकाणची प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी जातो, मग आपण तिथे शॉपिंग का बरे करतो? आपल्यातल्या काही मंडळींना हॉलिडेवर शॉपिंग केलं नाही तर टूर अपूर्ण वाटते आणि काही जणांना मात्र शॉपिंगचे नाव काढायचे नसते. काही टूर्सवर तर मंडळी प्रत्येक देशातून एखादी छोटी वस्तू विकत घेत प्रवास करतात. माझा असा विचार सुरू असतानाच माझी मुलगी सारा घरात आली. तिचा टी-शर्ट फारच जुना वाटत होता आणि मी काही बोलण्यापूर्वी ती म्हणाली,’काही बोलू नकोस. हा माझ्या आजीने म्हणजे तुझ्या आईने थायलंडवरून खास माझ्यासाठी आणला होता.’ घ्या,आता काय बोलणार मी! पण माझ्या आईची टूर ही तिच्यासाठी त्या टी-शर्टच्या रुपाने एक आठवण होती. एखाद्या टूरवर किंवा हॉलिडेवर जाणे म्हणजे आठवणी गोळा करणे नाही का. आपण प्रवास करून परत आल्यावर तिथे काढलेले फोटो, त्या ट्रिपच्या गप्पा आपल्याला परत-परत त्या जागेचे स्मरण करून त्याची सुखद आठवण करून देतात. आजकाल तर आपण फोटोसुद्धा कमी प्रिंट करतो, ते फोनमध्येच राहतात. मग अशावेळी एखाद्या ठिकाणी घेतलेली वस्तू आपल्याला त्या ठिकाणची आठवण करून देते  हे सर्वात महत्त्वाचं. आणि ह्यासाठीच मला वाटते की आपल्या हॉलिडेवर छोटे मोठे का असेना,आपण शॉपिंग नक्की करावे.

जागतिकीकरणामुळे आजकाल जगभर जवळ-जवळ प्रत्येक गोष्ट मिळते. पण तरीसुद्धा काही वस्तूंच्या शॉपिंगची मजा ही त्यांच्या मूळ ठिकाणी लुटण्यातच आहे. फ्रान्सच्या शॅम्पेन भागात तिथल्या विनीयार्ड्सना भेट देऊन, तिथे तयार होणार्‍या शॅम्पेन बॉटलची खरेदी स्वत: करण्याची मजाच वेगळी. किंवा पर्फ्युमसाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रान्समधील पर्फ्युम फॅक्टरीमध्ये फुलांपासून पर्फ्युमपर्यंतचा प्रवास स्वत:च्या डोळ्यांनी बघितल्यावर तिथे स्वत: पर्फ्युम तयार करून ती पर्फ्युमची बाटली आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देणं हे अविस्मरणीय ठरेल नाही का!

क्रोएशियाच्या कोर्चुला या गावात फिरताना स्कार्वस् ,कपडे व इतर वस्तू विकणार्‍या एका दुकानात आम्ही शिरलो. तेव्हा माझ्या हातातली स्कार्फ काढून, माझ्या हातात दुसरा स्कार्फ देऊन अगदी हक्काने, हा तुला जास्त चांगला दिसेल म्हणणारी ‘मारिया‘ ही मुलगी मला कायमच लक्षात राहील. तो स्कार्फ तिने स्वत: बनविलेला होता व त्यात वापरलेल्या रंगीत धाग्यांची कथा सांगत-संगत पुढे चहा-कॉफी घेत तिचा तो स्कार्फ मी गरज कमी आणि मारियाच्या आठवणीखातर विकत घेतला. मागच्याच आठवड्यात मोरोक्कोला भेट दिली. तेव्हा तिथेच वाढणार्‍या ऑर्गन झाडाच्या फळाच्या बियांपासून बनविलेल्या ब्युटी ऑईलच्या बाटल्यांचे शॉपिंग करण्यात मला जास्त आनंद मिळाला, तो कुठल्याही ‘मेड इन चायना’ सुवीनियर्सची खरेदी करण्यापेक्षा नक्कीच जास्त होता. आपल्या मित्र-मैत्रिणींसाठीसुद्धा ही भेट उत्तम ठरेल हा विचार करत मी ऑर्गन ऑईलच्या बॉटल्सची शॉपिंग करत गेले. मग ते इतर वस्तूंपेक्षा थोडेसे महाग असले तरी हे नक्की मारोक्कोचेच आहे या गोष्टीच्या खात्रीने माझा जीव भांड्यात पडला. तसेच इथल्या सिरॅमिक फॅक्टरीज् खूप प्रसिद्ध आहेत. मग तिथे मोरोक्कोच्या मातीत बनलेले, जेवण बनवायचे खास भांडे ज्याला ‘तजीन’ म्हणतात हे विकत घेणे मला भाग होते. त्यात मी किती वेळा स्वयंपाक बनवीन हे मला ठाऊक नाही पण निदान घरात त्यांचा सुंदर आकार व अनोखे रंग मला नेहमीच माझ्या मारोक्कोच्या ट्रिपची आठवण करतील हे नक्कीच. आपल्या फ्रीजवर लावलेले फ्रीज मॅग्नेट हे आपण जगभर केलेल्या प्रवासाचे प्रतीक बनून आपल्याला रोज वर्ल्ड टूर घडवून आणतात नाही का! प्रत्येक देशात अशी कुठली ना कुठली तरी वस्तू नक्कीच असते जी केवळ तिथेच तयार होते. त्या देशाची अशी एखादी आठवण आपल्या बरोबर नक्कीच परत आणा.

काही वेळा एखाद्या शहरातली दुकाने इतकी प्रसिद्ध होतात की त्या दुकानातून एखादीतरी वस्तू विकत घेण्यासाठी आपण त्याला भेट देतो. उदा. लंडनमधील सेल्फरिजेस आणि हॅरड्स ही भव्य दिव्य दुकाने. ज्या लोकांना शॉपिंग करायला आवडते त्यांच्यासाठी तर ही मेका-मदीनापेक्षा कमी ठरत नाहीत. पण ज्या लोकांना शॉपिंग करायला आवडत नाही त्यांनाही या दुकानांच्या विंडो डिस्प्लेस्मधली आकर्षक विंडो ड्रेसिंग बघत एकही पैसा खर्च न करता विंडो शॉपिंगचा आनंद घेता येतो. खासकरून ख्रिसमस लाईट्स लागले की विंडो डिस्प्लेंमधील आकर्षक मांडणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. ह्या दुकानांची लोकप्रियता इतकी आहे की सेल्फरिजेसची पिवळी आणि हॅरडस्ची हिरवी शॉपिंग बॅग हातात दिसली की तो जणू आपला स्टेट्स सिंबल ठरतो. मग तिथल्या शॉपिंगबरोबर या शॉपिंग बॅग्स्सुद्धा पर्यटकांच्या बॅगेतून परत घरी येतात. पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ही दुकाने वेगवगेळ्या योजना वेळोवेळी राबवतात. फॅशन आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या पॅरिस शहरात ‘गॅलरी लफायात’ ह्या लक्झरी दुकानात आपण केवळ १०-१२ युरोचे तिकीट काढून एक फॅशन शो सुद्धा बघू शकतो. लेटेस्ट स्टाईल, डिझाईन्स इ. गोष्टींची ओळख या फॅशन शोज्मध्ये होते. पण आपल्याला जर आपली स्टाईल अधिक फॅशनेबल करायची असेल तर लंडन, पॅरिस, न्यूयॉर्कमधल्या बहुतेक मॉल्समध्ये आपण पर्सनल स्टाईलिस्टच्या सर्विसेसचा लाभ घेऊ शकतोे तेसुद्धा एकही पैसा खर्च न करता. केवळ अ‍ॅडव्हान्समध्ये ह्या स्टायलिस्टची अपॉइंटमेन्ट घेतली की आपल्याला कुठले कपडे चांगले दिसतात आणि एखाद्या प्रसंगाला, पार्टीला कुठले कपडे शोभून दिसतील असे सर्व मार्गदर्शन आपल्याला मिळते. मग थोडेसे शॉपिंग करायला काहीच हरकत नाही, नाही का?

जगभरात अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मला मिळाल्यामुळे वेगवेगळ्या शहरांमधील विविध मॉल्स व शॉपिंग सेंटर्सना मला भेट देता आली. आपण शॉपिंग करतोय ह्यावर काही सवलत मिळाली तर प्रत्येकालाच बरे वाटते  किंवा अतिशय उत्तम दर्जाची वस्तू अगदी कमी किमतीत मिळाली तर त्या शॉपिंगचा आनंद द्विगुणीत होतो. अशा ‘सेल’चा सर्वात जास्त आनंद मला वारंवार झाला तो म्हणजे अमेरिकेत. इथले आउटलेट मॉल्स हे माझे सर्वात आवडते शॉपिंगचे ठिकाण. सायमन प्रीमीयम शॉपिंग मॉल्स अमेरिकेत ठिकठिकाणी दिसतात. या मॉल्समध्ये ब्रॅन्डेड वस्तू डिस्काउंट्स वर विकल्या जातात आणि तेसुद्धा वर्षभर केव्हाही. एकदा असेच या शॉपिंग मॉलसमोर माझी चप्पल तुटली. तेव्हा अमेरिकेत चांभार शोधण्यापेक्षा मॉलमध्ये ६०-७०% सवलत पाहिल्यावर नवीन जोडे विकत घेणे मला सोयीचे ठरले. एक चप्पल तुटल्यावर चार जोडे विकत घेणे केवळ अमेरिकेतच शक्य आहे.

ब्रॅन्डेड वस्तूंपेक्षा  कुणीतरी आपल्या हाताने काही आर्टिस्टिक व हटके बनविलेल्या गोष्टी आपल्याला आवडत असतील तर ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा देशांमध्ये लोकल मार्केट किंवा फ्ली मार्केट्सना भेट द्या. मेलबर्नचे क्वीन व्हिक्टोरिया मार्केट, लंडनचे कोवेन्ट गार्डन, कॅमडेन मार्केट, स्पिटलफील्डस मार्केट अशा मार्केटमध्ये छोट्या छोट्या स्टॉल्सवर पेंटिंग्ज्, हॅन्डिक्राफ्टस्, हाताने तयार केलेले जॅम्स, चॉकलेट्स इ.पासून कपड्यांपर्यंत विविध एकसेएक अनोख्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात.

स्वस्त आणि मस्त शॉपिंगमध्ये तर आशिया खंडातील देशांचा कुणी हातच धरू शकणार नाही. पण इथल्या मॉल्स व स्ट्रीट मार्केट्समधील इलेक्ट्रॉनिक्स, हॅन्डिक्राफ्टस् व रेडिमेड कपड्यांच्या शॉपिंगबरोबरच प्रसिद्ध आहेत ते इथले टेलर्स. खासकरून थायलंड, चायना, व्हिएतनाम या देशांमध्ये आपले बिझनेस सुट चक्क एका दिवसात शिवून मिळू शकतात. त्यातही जर आपल्याला प्रवास करताना काहीच वेळ मिळाला नाही तर एअरपोर्टच्या ड्युटी फ्री शॉपिंगच्या दुकानात गिफ्ट्स, चॉकलेट्स, पर्फ्युम्ससारखी खरेदी तर नक्कीच होऊ शकते. हॉलिडेवर फिरत असताना त्या ठिकाणाची आठवण म्हणून थोडेसे शॉपिंग करायला काहीच हरकत नाही. मग लंडनमध्ये ‘मेड इन इंडिया’ ड्रेस घेतला तर ब्रिटनचा आणि भारताचा दोघांचाही फायदा होईल,अशा विचाराने हँगरवरचा ड्रेस मी परत हातात घेतला!

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*