Language Marathi

काऊंटिंग स्टार्स

बहुधा अमेरिकेचा विचार केला की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या गगनाला भिडणार्‍या उंच इमारती व गजबजलेली शहरे. पण अमेरिकेच्या मध्यभागी कोलोराडो, वायोमिंगसारख्या स्टेट्समध्ये आपल्याला दिसतात त्या खुल्या जागा आणि उंच-उंच पर्वतरांगा. निसर्गसौंदर्याने सजलेल्या ह्या भव्य पण शांत अमेरिकेची ही माझी पहिलीच ओळख होती.

हे ‘‘वन रीपब्लिक म्हणजेच वन डायरेक्शन म्युझिक बँड आहे का?’’ ‘नाही!’ ‘‘मग पटकन त्यांचे एखादे गाणे सांगा मला’’. मी तातडीने आमच्या घरातल्या लहान मुलांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर मेसेज पाठवला. ‘अग तू ओळखतेस यांची गाणी आणि हा म्युझिक बँड, तुला कसे आठवत नाही’? असे म्हणत लगेच वन रीपब्लिकचे ‘काऊंटिंग स्टार्स’ हे गाणं मला पाठवण्यात आलं. पुढच्या दहा मिनिटांत या ‘वन रीपब्लिक’चे कॉन्सर्ट सुरू होणार होते व काहीही माहिती नसताना मला कॉन्सर्टला जायचे नव्हते. अर्थात माझा हा गोंधळ कळताच घरातली मुलं माझी खिल्ली उडवत होती पण माझ्यावर थोडीशी जळतसुद्धा होती. पाश्‍चात्य म्युझिक हा त्यांच्या आवडीचा विषय व त्यात एखाद्या आंतरराष्ट्रीय म्युझिक बँडचा ओरिजनल व लाईव्ह परफॉर्मन्स बघायला  मिळणे ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तसे अमेरिकेत जेव्हा परफॉर्मन्स किंवा स्टेज शोज आयोजित केले जातात तेव्हा ते ओरिजनल आर्टिस्ट्सना घेऊनच आयोजित केले जातात. हीच तर अमेरिकेची खासियत! मग लास वेगासमध्ये सेलिन डिऑनचे गाणे असो किंवा डेविड कॉपरफिल्डची जादू असो, इथे त्या-त्या शोज्च्या मुख्य आर्टिस्टला पाहण्याची मजा काही औरच असते.

मी होते ते अमेरिकेच्या मधोमध स्थित कोलोराडो स्टेटच्या कॅपिटल डेनवरमध्ये. डेनवरची आपल्याला असलेली ओळख आपल्या माधुरी दिक्षितची सासरवाडी म्हणून. कोलोराडोच्या स्कि रिसॉर्टस्ना भेट देण्यासाठी व इथल्या रॉकी मॉऊंटन्सचा आविष्कार पाहण्यासाठी डेनवर हे गेट-वे शहर आहे. यंदाचे ब्रॅन्ड यू. एस. ए म्हणजेच अमेरिकेच्या टूरिझम संस्थेने आयोजित केलेली टूरिझम कॉन्फरन्स ही डेनवरला आयोजित करण्यात आली होती. तिथल्या हॉटेल्स, स्थलदर्शनाच्या कंपनीज् व इतर बिझनेस पार्टनर्सच्या मीटिंग्ज आटोपल्यावर या सर्व कार्यक्रमाची सांगता ही डेनवरजवळच्या ‘रेड रॉक्स अ‍ॅम्फिथिएटर’ मध्ये आयोजित केली होती. म्युझिक कॉन्सर्ट चांगला होणार ह्यात काही शंका नव्हतीच पण त्यापेक्षाही मला आवडले ते हे अ‍ॅम्फिथिएटर. साडे नऊ हजार लोक उभे राहून आनंद लुटू शकतील एवढी क्षमता असणार्‍या या खुल्या अ‍ॅम्फिथिएटरभोवती इथले लाल रंगाचे रॉक्स फारच उठून दिसत होते. 6450 फुटाच्या उंचीवरचे हे अ‍ॅम्फिथिएटर व त्यांच्या भोवतीचे 868 एकरचे ‘रेड रॉक्स पार्क’ म्हणजे निसर्ग जपून त्याचा पुरेपूर आनंद कसा घ्यावा ह्याचे उत्तम उदाहरण होते. संधीप्रकाश होताच हे रॉक्स चमकू लागले व त्यानंतर अंधार होताच सुंदर लाइट अरेंजमेंटने हे रॉक्स प्रकाशित झाले. आकाशात तारे लुकलुक करू लागले व स्टेजवर वन रीपब्लिकचे ‘काऊंटिंग स्टार्स’ हे गाणे सुरू झाले. त्या मनमोहक वातावरणात पुढचे दोन अडीच तास कसे गेले ते कळलेसुद्धा नाही.

डेनवर या शहराची उंची 5280 फूट म्हणजेच एक मैल असल्याने डेनवरला ‘माईल हाय सिटी’ म्हणून ओळखले जाते. डेनवरभोवती कोलोराडो स्टेटमध्ये हिवाळ्यात स्किइंग तर उन्हाळ्यात हायकिंग, कॅम्पिंग, व्हाईट वॉटर राफ्टिंग, बायकिंग आणि अनेक समर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. बहुधा अमेरिकेचा विचार केला की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या गगनाला भिडणार्‍या उंच इमारती व गजबजलेली शहरे. पण अमेरिकेच्या मध्यभागी कोलोराडो, वायोमिंगसारख्या स्टेट्समध्ये आपल्याला दिसतात त्या खुल्या जागा आणि उंच-उंच पर्वतरांगा. कोलोराडो स्टेटमध्ये तर 53 फोर्टीनर्स अगदी अभिमानाने उभी आहेत. ज्या पर्वत-शिखरांची उंची चौदा हजार फुटांपेक्षा अधिक आहे त्या पर्वत शिखरांना ‘फोर्टीनर्स’ हे नाव दिले आहेे. इथल्या नॅशनल पार्कमध्ये बर्फाच्छादित डोंगर-शिखरं, निळेशार शिथील लेक्स, हिरवीगार अल्पाईन झाडं, नद्या, वॉटर फॉल्स आणि सोबत वाळूचे सॅन्ड ड्यून्स अशी निसर्गसौदंर्याची विविध रूपं पाहायला मिळतात. डेनवरजवळच्या रॉकी माऊंटन नॅशनल पार्कमध्येे मी दोन दिवसांचे वास्तव्य केले. लो सीझन असल्याने इथे फार कमी लोक दिसत होते. माझ्या रूमच्या बाल्कनीमधून दिसणार्‍या बर्फाच्छादित डोंगराकडे व त्यासमोर पसरलेल्या लेककडे बघत मला मी युरोपमध्ये असल्याचा भास झाला. निसर्गसौंदर्याने सजलेल्या ह्या भव्य पण शांत अमेरिकेची ही माझी पहिलीच ओळख होती. युरोपशी असलेलं अमेरिकेचं समीकरण केवळ मी एकटीच करत नाही हे मला लवकरच कळलं. कारण कोलोराडोमधल्या स्किइंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘वेल’ या स्कि रिसॉर्टला अमेरिकेचे स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते, तर अगदी स्वित्झर्लंड किंवा ऑस्ट्रियामधल्या अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीजसारखे इथेसुद्धा टोबागन राईड्स, केबल कार्स, स्किइंग आणि स्नो बोर्डिंगसारख्या स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. कोलोराडो शहरातील हॉट स्प्रिंग्सही एक विशेष आकर्षण. जगातले सर्वात मोठे नैसर्गिकरित्या आढळणारे हे हॉट स्प्रिंग्स म्हणजे कोलोराडोचे ग्लेनवूड हॉट स्प्रिंग्स. कोलोराडोमध्ये तीसहून अधिक गरम पाण्याची कुंडं आहेत व त्याभोवती हॉट वॉटर स्प्रिंग रिसॉर्ट्समध्ये आपण हायकिंग, राफ्टिंग, स्किइंग केल्यानंतर मनसोक्त डुंबू शकता. कोलोराडो स्टेटमधल्या प्रॅरी ग्रासलँन्डस्मुळे इथे घोड्यांचे फार महत्त्व आहे आणि एखाद्या आगळ्या-वेगळ्या हॉलिडेसाठी आपण इथे एखाद्या स्टड फार्मवर राहून हॉर्स रायडिंगसुद्धा करू शकतो.

४ जुलै, १८६९ मध्ये इथल्या डीयर ट्रेलमध्ये जगातले पहिले ‘रोडेओ’ आयोजित करण्यात आले. तेजस्वी घोड्यांवर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी तयार झालेली ही काऊबॉईज्ची स्पर्धा आज जगभर प्रसिद्ध आहे. रोडेओचा सीझन हा साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात असतो. शेजारच्या वायोमिंग स्टेटचे तर रोडेओे हे स्टेट स्पोर्ट आहे व इथले कोडी हे शहर ‘रोडेओ कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ म्हणून प्रसिद्ध आहे.

कोलोराडोमधले सर्व पर्यटन हे अर्थातच इथल्या पर्वतरांगांभोवती तयार झालेलं आहे. यातली काही खास आकर्षणे म्हणजे दोन मिलीयन वर्षांच्या कालावधीत गनिसन नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेले गनिसन नॅशनल पार्कचे ब्लॅक कॅनियन. इथल्या मेसा वर्दे नॅशनल पार्कला भेट दिल्यास इ.स ६०० ते इ.स १३००मधल्या युगात वास्तव्य करणार्‍या अमेरिकन नेटीव्ह ट्राईब्सच्या प्राचीन जीवनाची झलक दिसते. अतिशय सुंदर प्रकारे आजही जपून ठेवलेल्या पुएबलोन अमेरिकन ट्राईब्सचे डोंगराच्या कडेला बांधलेले क्लिफ ड्वेलिंग्स हे पाहिलेच पाहिजेत. लेक्स आणि बर्फाच्छादित डोंगराबरोबरच वाळूचे सँड ड्यून्ससुद्धा पहायला मिळतात ते ग्रेट सँड ड्यून्स नॅशनल पार्कमध्ये. नॉर्थ अमेरिकेच्या सर्वात उंच सँड ड्यून्स इथेच दिसतात. कोलोराडो, वायोमिंग, मोनटाना या सर्व स्टेट्सचे अजून एक आकर्षण म्हणजे इथल्या डायनोसॉर साईटस्. युइंटा माउंटन्समध्ये पंधराशेहून अधिक डायनोसॉर फॉसिल्स डोंगरावरच बघायला मिळतात.

भारतीय पर्यटकांमध्ये सर्वात प्रसिद्ध असं अमेरिकन नॅशनल पार्क म्हणजे येलोस्टोन नॅशनल पार्क. वायोमिंग, मोनटाना अणि आयडाहो स्टेट्समध्ये स्थित असलेला हा पार्क केवळ अमेरिकेतलाच नव्हे तर जगातला पहिला नॅशनल पार्क म्हणून ओळखला जातो. जवळ-जवळ नऊ हजार स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेल्या ह्या येलोस्टोन पार्कमध्ये पर्वतरांगा, नद्या, कॅनियन्स, लेक्स याबरोबरच व्होलकॅनोस आणि हॉट स्प्रिंग्स बघायला मिळतात. स्टीम बोट गीझर हे जगातले सर्वात मोठे अ‍ॅक्टिव्ह गीझर याच पार्कमध्ये दिसते आणि इथले सर्वात प्रसिद्ध गीझर म्हणजे ‘ओल्ड फेथफूल गीझर’ जे दर एक्याण्णव मिनिटांत उफाळून येते. या पार्कमध्ये तीनशेहून अधिक हॉट वॉटर गीझर्स दिसतात आणि २९० वॉटर फॉल्स आहेत. इथली खासियत म्हणजे इथल्या गरम पाण्याच्या कुंडाभोवती आढळणारे रेनबो कलर्स. निळे, मोरपंखी, पिवळे आणि नारंगी रंगाचे गरम पाण्याचे हे कुंड जगभर प्रसिद्ध आहे.

अमेरिकेतलेच वर्ल्ड हेरिटेज ठरलेले अजून एक नॅशनल पार्क म्हणजे कॅलिफॉर्नियामधले सिएरा-नेवाडा पर्वतरांगांमधले योसेमिटी नॅशनल पार्क. इथे अनेक  ग्रेनाईटचे डोंगर, ब्रायडल वेल वॉटरफॉल, उंच आणि भव्य सीकोया ट्रीज् हे सर्व टुरीस्टना आकर्षित करते. कॅलिफॉर्नियातल्या इतर नॅशनल पार्कमधले एक प्रसिद्ध पार्क म्हणजे डेथ व्हॅली नॅशनल पार्क. समुद्रसपाटीपासून खाली असलेल्या ह्या पार्कमध्ये डोंगरावर बर्फ दिसतो, तसेच वाइल्ड फ्लावर्स आणि वाइल्ड लाईफ देखील दिसते. अमेरिकेतल्या अनेक ठिकाणांसारखेच अंधार झाल्यावरसुद्धा हे पार्क तेवढेच आकर्षक वाटते. स्टारगेझिंगसाठीच उत्तम असे डार्क स्काईस इथे दिसतात. खरंच, इथल्या हॉलिडेवर आपण तारे मोजत राहू हे नक्की!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*