Language Marathi

उधाण उत्साहाचं

इतर देशांच्या, राज्यांच्या, संस्थांच्या अतिभव्यतेचा दबाव न वाटता त्यातून जी काही प्रेरणा घेता येईल ती घेता आली पाहिजे, जे वाईट आहे ते सोडून देता आलं पाहिजे. हे सगळं करण्यासाठी आपल्यामध्ये सतत सळसळता उत्साह आपल्या स्वत: ला निर्माण करता आला पाहिजे. ज्याला असा उत्साह सळसळता ठेवता येईल तो बाजी मारेल ह्यात शंकाच नाही.

मागचा आठवडाभर असिस्टंट टूर मॅनेजर्सचं ट्रेनिंग सुरु होतं, शेवटच्या दिवशी मलाही जाऊन त्यांच्याशी संवाद साधायचा होता. त्याच दिवशी देशातला सर्वात मोठा घोटाळा सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकला, सुन्न व्हायला झालं. दिवसरात्र आपण कष्ट करतो तेव्हा कुठे आपली आपल्या कुटुंबाची आपल्या संस्थेतल्या सर्वांची हातातोंडाची मिळवणी होते, किंवा थोडंफार मध्यमवर्गीय आयुष्य आपण मार्गी लावतो. अशावेळी तुम्हा आम्हा संपूर्ण देशाच्या तोंडाला पानं पुसून काही तथाकथित उच्चवर्गीय देशाबाहेर पलायन करतात तेव्हा कुणीतरी एकाने व्यवस्थेचा फायदा घेऊन चालाखीने आपल्या सर्वांना फसवलंय ह्याचं दु:ख जास्त होतं. आपल्यासारखी जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेली, अनुभवाने थोडंफार शहाणपण आलेली माणसं हा आघात पचवू शकतात असं म्हणूया, पण काळजी वाटते ती तरुणांची. त्यांच्यासमोर जी उदाहरणं ह्या द्वारे उभी ठाकतात त्याने काळजाचा ठोका चुकतो कारण चुका करुन कुणालातरी फसवून जास्त मोठी होणारी उदाहरणं रोजच्या रोज ठळकपणे समोर येताहेत. वृत्तपत्रांतून, सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती आदळताहेत. पूर्वी पेपर वाचला नाही किंवा टिव्ही बघायला मिळाला नाही तर गोष्टी काहीजणांना कळायच्या नाहीत ही चांगली गोष्ट होती असं आता म्हणायला हवं. सकाळी वृत्तपत्र उघडायलाच भिती वाटते. मी माझ्यासाठी त्यातून मार्ग काढलाय तो म्हणजे दोन तीन वृत्तपत्रांची संपादकीय पानं वाचायची किंवा सुधीर आधी पेपर वाचतो त्याला विचारायचं, ‘‘आज काय चांगली सकारात्मक बातमी असेल तर सांग’’. हो बघानं, ‘नवी मुंबईमध्ये उलवे कोपर-पनवेल येथील एअरपोर्टचं माननीय पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि पहिली एअरस्ट्रीप येत्या तीन वर्षात सुरु होतेय’, किंवा ‘मुंबई पुणे हे अंतर हायरपरलूप मुळे वीस मिनिटात पार करता येईल’, ह्या बातम्या भविष्याकडे आशेने बघायला लावतात. आपल्या सांताक्रुझ एअरपोर्टची आणखी विमानं उडविण्याची क्षमता आता संपलीय, नवीन एअरपोर्ट झाला नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीला तो मोठा अडथळा ठरेल. त्यामुळे नवीन एअरपोर्टला किंवा त्या प्रोजेक्टला आलेली टाईमलाईन आम्हा सर्वसामान्यांना दिलासा देऊन गेली. काहीतरी घडतंय, बनतंय, तयार होतंय ज्याचा भविष्यात आपल्यालाही फायदा होणार आहे ही गोष्ट मनाला उभारी आणते. खरंतर सर्वच वृत्तपत्र आणि दूरदर्शन वाहिन्यांच्या मुख्य बातम्यांमध्ये किंवा पहिल्या पानावर सकारात्मक बातम्या देण्याची चढाओढ लागली पाहिजे आणि हे माझं मत नाहीये बरं का, आदरणीय एपीजे अब्दुल कलामांनी एकदा त्यांच्या इस्त्राइल तेल अवीव भेटीनंतरचं चिंतन लिहीलं होतं त्यात ते म्हणाले होते की, ‘तेथील वृत्तपत्रात पहिल्या पानावर सकारात्मक जडणघडणीच्या बातम्या होत्या आणि देशात कुठेतरी झालेला बॉम्बस्फोट किंवा आत्महत्या किंवा नकारात्मक निराशाजनक बातम्या (ज्यापासून तसं बघायला गेलं तर कोणत्याही देशाची सुटका नाही) त्या आतल्या पानावर होत्या. काही वृत्तपत्र माननीय एपीजेंचं ते आवाहन पाळतही असतील पण आज आपल्या तरुण पिढीला सकारात्मक बनवायचं असेल, भारताविषयीचा त्यांचा अभिमान अधिक दृढ करायचा असेल तर सकारात्मक बातम्या शोधून त्यांना हायलाईट करायला पाहिजे.

दरवर्षी आम्हाला सहलींवर भविष्यातल्या टूर मॅनेजर्ससाठी असिस्टंट टूर मॅनेजर म्हणून किमान शंभर तरूणांना काम देण्याची क्षमता निर्माण करता आली पाहिजे, त्याप्रमाणे आपला व्यवसाय वाढायला पाहिजे, हे आमचं अलिखित बंधन. पर्यटकांच्या पाठिंब्याने, वीणा वर्ल्ड टीमच्या मेहनतीने, रोजगार निर्मितीमध्ये अंशत: आपलं योगदान आमच्या छोट्याशा राज्यात वीणा वर्ल्डच्या उत्पत्तीपासून गेली चार वर्ष साध्य करता येतेय ही आमच्यादृष्टीने उत्साहवर्धक घटना. आणि अशा उत्साहवर्धक घटना वा गोष्टी आपल्याला सतत निर्माण करता आल्या पाहिजेत. जगातील सर्व देशांमध्ये कोणता देश जास्त आनंदी? असा हॅप्पीनेस इंडेक्स जेव्हा काढला गेला तेव्हा आपल्या शेजारचा, मोठ्या देशांसारखा कोणताही चमचमाट नसलेला, लोककला संस्कृती परंपरा जपणारा चिमुकला भूतान सर्वात जास्त आनंदी देश ठरला. भूतानचा हॅप्पीनेस इंडेक्स वरचढ ठरला. कार्बन फूटप्रिटंच्या ग्लोबल युद्धात तो बाजी मारुन गेला, ‘झिरो कार्बन एमिशन कंट्री’ म्हणून. सुखी आणि आनंदी असण्यासाठी लार्जेस्ट, बिग्गेस्ट, स्ट्राँगेस्ट असण्याची गरज नाही हे उदाहरणासह सप्रमाण सिद्ध केलं ह्या आपल्या शेजारी देशाने. छोट्या देशांना, छोट्या राज्यांना, छोट्या संस्थांना, आपल्या कुटुंबांना सकारात्मक बनवून, त्यांच्यातला उत्साह सतत जागृत राहाण्यासाठी अशी उदाहरणं समोर असली पाहिजेत. इतर बलाढ्य देशांच्या, राज्यांच्या, संस्थांच्या अतिभव्यतेचा दबाव न वाटता त्यातून जी काही प्रेरणा घेता येईल ती घेता आली पाहिजे, जे वाईट आहे ते सोडून देता आलं पाहिजे. हे सगळं करण्यासाठी आपल्यामध्ये सतत सळसळता उत्साह आपल्या स्वत: ला निर्माण करता आला पाहिजे. ज्याला आपल्या स्वत:मध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये असा उत्साह सळसळता ठेवता येईल तो बाजी मारेल ह्यात शंकाच नाही.

असिस्टंट टूर मॅनेजर्सच्या सवांदामध्ये माझा हाच मुद्दा होता ‘उत्साह’. हॅप्पीनेस इंडेक्स सारखा ‘एन्थुझियाजम इंडेक्स’ आपला आपल्याला चेक करता आला पाहिजे, आपला स्वत: चा आणि आपल्या सभोवतालचा. उत्साह हा साथीच्या रोगासारखा आहे तो वेगात पसरत जातो. आपण उत्साही तर सारे उत्साही. संधी मिळाली तर प्रत्येक माणसाला चांगलच बनायचं असतं. खरं आहे ते. कोणाला वाईट बनायला आवडेल? पण तरीही समाजात वाईटांची उत्पत्ती होतच असते, आणि त्याचं खापर ‘संधी मिळाली नाही’ ह्यावर फोडलं जातं. पण संधी काही चालून येत नाही. संधी मिळण्याचं, संधी शोधण्याचं किंवा संधी दिसण्याचं मुळ हे उत्साहात दडलेलं आहे. उत्साही आनंदी हरहुन्नरी माणासांकडे संधी चालून येतात किंवा कोणत्याही गोष्टीतून अगदी आपत्तीतूनही ते संधी शोधतात. उत्साही मन त्यांना सतत अशा तर्‍हेची सकारात्मक बांधणी करण्याची क्षमता देत असतं. माझा प्रश्‍न होता मुलांना तो म्हणजे, ‘तुम्हाला ह्या पर्यटन क्षेत्राची मनापासून आवड आहे का?’ ‘इथे तुम्हाला आपलं भविष्य घडेल असं वाटतंय का?’ ‘कुठेच काही जमत नाही म्हणून किंवा आईवडिलांनी ढकललंय म्हणून तर तुम्ही इथे आला नाहीत नं?’ ‘पर्यटनाच्या ग्लॅमरसोबत ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे त्यामुळे ‘मोडेन पण वाकणार नाही? अशी मनोवृत्ती ह्यात चालत नाही ह्याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे का?’ ‘शाळा कॉलेज सोडल्यानंतर शक्यतोवर कुणाला शिस्तीचा दबडगा चालत नाही पण इथे शिस्त आणि मेहनतीवर भर आहे ते तुम्हाला जमणार आहे का?’… असे अनेक प्रश्‍न त्या संभाषणात मी विचारले. काही प्रश्‍न कुणाला खच्चीकरण करणारे किंवा घाबरवणारे वाटले असतील पण ते वीणा वर्ल्डच्या दृष्टीने आणि व्यक्तिगत भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. मला आवड आहे, माझी कष्ट करण्याची तयारी आहे, मी माझ्या इच्छेने-बॉलीवूडच्या भाषेत ‘पुरे होश-ओ-आवाज के साथ इस क्षेत्र में एन्ट्री कर रहा हूँ।’ असं असेल तर तुमचं इथे मी मनापासून स्वागत करते नाहीतर अजूनही वेळ गेलेली नाही. लाइन बदला, तुमच्या आवडीचं क्षेत्र घ्या आणि तुमचा आमचा वेळ वाचवा जो फार महत्त्वाचा आहे. तर अशा ह्या तावून सुलाखून घेतलेल्या असिस्टंट टूर मॅनेजरसोबत संवाद सुरू केला. एकदा का ते स्वत:च्या आवडीने ह्या क्षेत्रात आले की आमचं दोघांचही काम सोपं होऊन जातं. आवडीचं काम आपल्यात आपोआप उत्साह निर्माण करतं आणि इच्छित यशाकडे घेऊन जातं, आपल्यातल्या कलागुणांना उभारी आणतं, आपल्यातला आत्मविश्‍वास वाढवतं, आपल्यात महत्वाकांक्षा निर्माण करतं, शेवटी महत्वाकांक्षा म्हणजे एखाद्या भल्या उद्दिष्टाचा उत्साहाने केलेला पाठपुरावाच म्हणायचा. या उद्दिष्टांकडे पोहोचताना अनेक अडथळे येतील, अपयश पचवायला लागतील, ‘इट इज पार्ट अ‍ॅन्ड पार्सल ऑफ द सक्सेस गेम’. पण ह्या संपूर्ण वाटचालीत अपयशांचा सामना करताना आपल्यातला उत्साह गमवू नं देण्याची क्षमता आपण आपल्यात निर्माण केली पाहिजे. एकदाका हा सळसळता उत्साह अंगी बाणविण्याची आणि त्याद्वारे आपलं सभोवताल उत्साही करण्याची सवय लागली आणि ह्या उत्साहाला आपल्या खरेपणाची-सत्याची जोड मिळाली की, ‘कोई भी माइका लाल अपना बाल बाका नहीं कर सकता?’ हा बॉलीवूडचा प्रभाव. असो.

तर सांगायचा मुद्दा असा की जगात विधायक आणि विघातक घटना घडतच राहाणार. जगातल्या प्रत्येक देशात प्रॉब्लेम्स आहेत, काही घटना निराशाजनक असतील काही सुन्न करतील, आपण आपल्यालातला उत्साह जराही कमी होऊ द्यायचा नाही. आपल्यात उत्साहाची फॅक्टरी निर्माण करता आली पाहिजे. एकदा का हे झालं की मग यशस्वी आनंदी आणि सुखी आयुष्याचा मार्ग मोकळा झालाच म्हणून समजा. ‘लेट्स इन्क्रीज अवर एन्थुझियाजम इंडेक्स, डे बाय डे, एव्हरी डे!’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*