व्हार बेटावर उतरण्यासाठी आमच्या बोटीच्या कॅप्टनने गळ टाकला आणि अगदी सहज म्हणाला, ‘हं...आता मारा उड्या.’ आम्ही त्या निळ्या पाण्यात स्वत:ला झोकून दिलं आणि अगदी रोजचंच तिथलं येणंजाणं असल्यासारखे पोहत बीचवर पोहोचलो.
छान पिकलेल्या, सूर्यप्रकाशाने उबदार झालेल्या टॉमेटोवर मी सोनेरी रंगाच्या ऑलिव्ह ऑईलचा हलकासा शिडकावा केला, त्यावर थोडी तुळशीची पानं पसरून टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलं... तयार झालेल्या साध्याशा सलाडचा पहिला घास तोंडात टाकला आणि त्या तेलाच्या अंमळ गोडसर चवीमुळे थेट पुन्हा पोहोचले ते सिसिलीमधील ताओरमिना शहरात. मेडिटेरेनियन सी च्या निळ्याशार पाण्याच्या दिशेने तोंड करून थाटलेल्या एका छोट्याशा दुकानातून मी हे तेल विकत घेतलं होतं. हा एकच समुद्र...पण मी तो कितीतरी वेगवेगळ्या ठिकाणांहून पाहिलेला होता. त्या सगळ्या आठवणींचा विचार करत मी मनोमन कृतकृत्य झाले.
मेडिटेरेनियन सी म्हणजे केवळ अथांग पाण्याचा साठा नाही. युरोप, आशिया आणि आफ्रिका अशा तीन खंडांना जोडणारा तो पूल आहे. हा समुद्र 21 देशांच्या सीमांना स्पर्श करतो, नकाशात एकदम मध्यभागी स्थानापन्न झालेला हा समुद्र जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने म्हणजे अवघ्या 14 किलोमीटरच्या पट्ट्याने अटलांटिक महासागराला जोडला गेला आहे. हा एकच एक समुद्र नाही, तर तो समुद्रांचा संच आहे. त्यात, एडियाट्रिक, एजियन, आयोनियन, टायहेनियन, लिगुरियन, लेव्हॅटिन अशा समुद्रांचा समावेश आहे.
हजारो वर्षांत या समुद्राने किनाऱ्यांनाच नव्हे, तर एकेका संस्कृतीला आकार दिलेला आहे. उबदार वातावरणात ऑलिव्ह, द्राक्षं, लिंबू वर्गातील फळं यांच्यासाठी पोषक हवा तयार होत असल्याने भूमध्यसागरी प्रदेशात त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. आरोग्यदायी असण्यासोबतच चवीमुळे त्यांची ख्याती वाढलेली आहे.
'मेरे मोस्ट्रम' म्हणजे ‘आमचा समुद्र’ असा रोमन लोक या समुद्राचा उल्लेख करीत. एकेकाळी रोमन लोकांची या संपूर्ण किनारपट्टीवर सत्ता होती. प्राचीन इजिप्त, फोनिशिया, ग्रीस, कार्थेज, रोम, बायझॅटियम आणि ऑटोमन ही सारी साम्राज्य याच प्रांतात बहरली. ॲम्फी थिएटर, राजप्रासाद, बंदर, बाजारपेठा असा त्यांचा समृद्ध वारसा आजही इथे नांदतो आहे.
समुद्राचं पाणी येऊन जाऊन सगळीकडे सारखंच. पण मेडिटेरेनियन सी वैविध्यपूर्ण आहे. ग्रीसमधील सॅन्टोरिनी, मोरोक्कोतील शेफशाऊन, ट्युनिशियातील सिदीबौ सैद या सगळ्या ठिकाणी निळ्या-पांढऱ्या रंगात न्हाऊन निघालेले रस्ते भेटतात. मार्बेलामधील रोंदा, स्पेनमधील मिजास येथील पांढरी शुभ्र गावेच्या गावे आपल्याला इटली आणि फ्रान्सच्या किनारी भागाची आठवण करून देतात. या लांबच लांब असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील या समांतर गोष्टी म्हणजे जणू मोत्यांची माळच!
आशियालगतचा मेडिटेरेनियन सी
पूर्वेकडे मेडिटेरेनियन सी चा पसारा आशिया खंडापर्यंत पसरलेला आहे. इथल्या समुद्रावर फोनेशियन व्यापार, ग्रीक वसाहती, बायझंटाईन समृध्दी आणि ऑटोमनची भव्यता यांचा प्रभाव आहे. युरोप आणि आशिया यांची सांगड घातली जाते ती तुर्कीमध्ये बोस्फारोसच्या सामुद्रधुनीत. इस्तंबूलमध्ये मी हांगिया सोफियाच्या छायेत, ताज्या ब्रेडच्या गंधासोबत मसाल्यांच्या पदार्थांनी भरलेल्या बाजारातून भटकंती केलेली आहे. इस्तंबूल शहरात आपल्याला युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांचं दर्शन होतं. या भागात आल्यावर टर्किश कॉफी आणि आईस्क्रीमची चव चाखायला अजिबात विसरू नका.
सायप्रसमध्ये 300 दिवस लख्ख सूर्यप्रकाश असतो. ग्रीक मंदिरं, धर्मयुद्धाच्या काळातील किल्ले, व्हेनेशियन भिंती असं बरंच काही या शहरात साठलेलं आहे. त्याच्या किनाऱ्यावर प्रेम आणि सौंदर्याची देवता ॲफ्रोडायटीचा जन्म झाल्याची आख्यायिका आहे. सूर्य क्षितीजाशी एकरुप झाल्यावर गुलाबी-सोनेरी रंगाची आभा पसरली की तिथला नजारा अवर्णनीय दिसतो. तो पाहिल्यावर ही आख्यायिका नसून सत्य घटना असेल असंच वाटायला लागतं. सोबतीला लेबनान आहे. जगातील सर्वात जुने आणि आजही सातत्याने वापरात असलेले बाब्लोस बंदर इथे आहे. या बंदराचा सुमारे सात हजार वर्षांचा इतिहास आहे. इथला फेरफटका म्हणजे थेट इतिहासाच्या पुस्तकातील भटकंती वाटते.
युरोपकडील मेडिटेरेनियन सी
युरोपलगतच्या मेडिटेरेनियन सी च्या किनाऱ्याला अधिक ग्लॅमर, इतिहास आणि किनारी सौंदर्याची साथ मिळते. स्पेनमधील कोस्टा डेल सोल सूर्यप्रकाशात चकाकत असते. तर, मजाससारखी पांढरी शुभ्र गावं डोंगरउताराची शोभा वाढवतात. मार्बेला आणि रोंदा इथल्या मुरीश पद्धतीचं स्थापत्य आपल्याला रोमन साम्राज्याची खूण सांगतं. तसंच बार्सिलोनामधील मेडिटेरेनियन सी मुळे गाऊदीच्या सोनेरी किनाऱ्यांचं स्मरण होतं.
पूर्वेकडे निघालो की फ्रान्सच्या सागरी किनाऱ्यांचं वैभव पाहून नाईस, सेंट ट्रोपेझ आणि व्हॅलीमधल्या इझ या गावाची आठवण होते. या इझमध्ये मी स्वत:च माझ्यासाठी परफ्युम तयार केला होता. त्यात जास्मिनच्या जोडीने सागरी वाऱ्याची झुळुक वाटावी असा गंध मी बाटलीत भरून आणला होता. मोनॅकोमधील भव्यता तिथल्या उच्चभ्रू समाजाला साजेशी आहे तर मार्सेलिसमधील सदैव व्यग्र असलेलं बंदर प्राचीन ग्रीक बंदराची आठवण करून देतं. इटलीतील प्रत्येक किनारी वळणाला सिनेमॅटिक स्पर्श आहे. लिगुरियनमधील साधीशी गावं, अल्माफी किनाऱ्याची निळाई आणि आयुष्यातील सर्वोत्तम पदार्थ जिथे मी खाल्ले ते सिसिली शहर इटलीच्या सिनेमॅटिकपणात भर घालतात. सिसिलीमध्ये लोकल ऑलिव्ह ऑइलचा तडका असलेला ताजा पिझ्झा, कॅनोली आणि ग्रील्ड स्वोर्डफिश याची लज्जत काही औरच होती. रोमच्या प्राचीन काळाच्या खुणा, व्हेनिसमधील कालवे आणि फ्लोरेन्सचा पिझ्झा इथून अगदी तासाभराच्या अंतरावर आहे. त्यामुळे मन आणि पोट दोन्ही तृप्त होतं.
उत्तरेला एडियाट्रिकला लागून असलेल्या क्रोएशियातल्या स्फटिकासारख्या पाण्याकडे पाहताना मी थक्क झाले.व्हार बेटावर उतरण्यासाठी आमच्या बोटीच्या कॅप्टनने गळ टाकला आणि अगदी सहज म्हणाला, ‘हं...आता मारा उड्या.’ आम्ही त्या निळ्या पाण्यात स्वत:ला झोकून दिलं आणि अगदी रोजचंच तिथलं येणंजाणं असल्यासारखे पोहत बीचवर पोहोचलो. या अशा डाल्मेशियन किनाऱ्यावर, गाडी बाजूला उभी करून पाण्यात झोकून देत पोहत एक फेरी मारणं यात कोणाला काही गैर वाटत नाही. डर्बोव्निकची तटबंदी आणि डायक्लेशियन राजप्रासाद ही रोमन आणि व्हेंटियन भूतकाळाची जितीजागती उदाहरणं आहेत.
मेडिटेरेनियन सी मधील बेटं
एखाद्या कॅनव्हासवर वेगवेगळी रत्नं उधळलेली असावीत, तशी मेडिटेरेनियन सी मध्ये चोहोबाजूला बेटं विखुरलेली आहेत.
सिसिलीमध्ये अनेक संस्कृतींचा मिलाफ पहायला मिळतो. ग्रीक मंदिरं, नॉर्मन कॅथेड्रल्स, बोरोक्यू सारखी शहरं इथे आहेत. मी ताओरमिनामध्ये आयोनियन सी मधून सफर केली आहे. तिथून लाबंवर असलेल्या, धूर सोडणाऱ्या माऊंट एटनाची गडद आकृतीही पाहिली आहे.
माल्टा हे छोटंसंच शहर आहे. मात्र तिथे भव्य किल्ले, मेगालिथिक मंदिरं आहेत. ही मंदिरं अश्मयुगाच्याही आधीची मानली जातात. शिवाय, जिथून युद्धाचे हाकारे देण्यात आली ती बंदरं सुद्धा इथे आहेत.
ग्रीक बेटं ही निव्वळ जादू आहे. कलदेराच्या पाण्यात सॅन्टोरिनीमधील पांढरे मनोरे आणि कोबाल्टच्या कौलांचं प्रतिबिंब दिसतं. गोझो, इल्बा, कोरसिया अशी इथली छोटीछोटी बेटं सुद्धा इतिहासाच्या पाऊलखुणा वागवत आहेत.
आफ्रिकेलगतचा मेडिटेरेनियन सी
मेडिटेरेनियन सी च्या दक्षिण किनाऱ्यावर आफ्रिकेतील अनेक जुनी आणि अंचबित करणारी ठिकाणं आहेत. इजिप्तमधले गिझाचे पिरॅमिडस हे कालातीत पहारेकऱ्यासारखे भासतात. नाईल नदीतील प्रवास, लक्सरमधील मंदिरांपासून कैरोतील गजबजलेल्या मार्केट्सपर्यंतचा प्रवास आपल्याला इतिहासाचे तुटलेले धागे जोडण्यास मदत करतो. ट्युनिशिया हा देश माझ्यासाठी एक आश्चर्यच होता. तिथल्या रस्त्यांवरून फेरफटका मारत असताना अगदी सहजपणे फ्रेंच भाषा माझ्या कानावर पडत होती. वसाहतकाळाचीच ही खूण. राजधानी टयुनिसमध्ये मला एक रोमन ॲम्फी थिएटर सापडलं. त्याच्या जीर्ण झालेल्या पत्थरांमधून अजूनही ग्लॅडिएटर्सची जाणीव होत होती.
माझ्या दृष्टीने सगळ्यात आकर्षक क्षण होता तो सिदीबौ सैदमध्ये. तिथे मला पांढऱ्या-निळ्या रस्त्यांना सूर्यप्रकाशामुळे सोनेरी साज मिळाल्याचं देखणं दृश्य दिसलं. ट्युनिशियाचं राष्ट्रीय फूल असलेल्या जास्मिनचा म्हणजे आपल्याकडील जाईच्या फुलाचा सुगंध वातावरणात दरवळत होता. किनारी भागातील हम्ममत आणि सौस इथल्या रिसॉर्ट्समध्ये थर्मल बाथ घेत, पांढऱ्या वाळूवर पहुडण्याचा आनंद घेता आला. मोरोक्कोच्या शेफशाऊन मधल्या निळ्या रांगा बघून जणू स्वप्नात असल्याचा भास झाला.
मेडिटेरेनियन सी ची ओढ का लागते?
मेडिटेरेनियन सी हा कायम समुद्रापेक्षा अधिक काहीतरी मानला गेला आहे. तो प्राचीन जगाचा महामार्ग होता. पर्वत आणि वाळवंटातून प्रवास करणाऱ्यांसाठी हा सुरक्षित आणि जलद मार्ग होता. इथे संस्कृती नांदल्या याचं कारण फक्त इथली सुपीक जमीन आणि खोल बंदरं एवढंच नाहीये. तर इथे सागरापासूनचं अंतर कमी होतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या कल्पनांचं सातत्याने आदानप्रदान होत राहिलं. आज हा भाग पर्यटकांना अद्भुत आणि दुर्मिळ अनुभव घेण्याची संधी देतो. काही तासांच्या प्रवासात आपण एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीमध्ये जाऊ शकतो. प्रत्येक ठिकाणची चव वेगवेगळी आणि शतकांचा इतिहास सोबत बाळगणारी असते.
सकाळी ग्रीक मंदिरात, दुपारी एडियाट्रिकमधली सफर, संध्याकाळी मध्ययुगीन काळापासून अस्तित्त्वात असलेल्या बंदरात बसून वाईनचा आस्वाद घेणं असा कार्यक्रम आखता येतो. इतिहास, सौंदर्य आणि संपर्कातील सहजता याचा अनोखा मिलाफ इथे पहायला मिळतो. त्यामुळेच मेडिटेरेनियन सी च्या जगाची आपल्याला भुरळ पडते. म्हणूनच मी जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी मला पुन्हा पुन्हा इथे यावसं वाटतं. एका खंडातून दुसऱ्या खंडात, एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीत सहज ये जा करता येईल अशी यासारखी दुसरी जागा जगात सापडणं कठीण आहे. म्हणूनच या भागाला एकदा जरी भेट दिली तरी रोमन लोकांप्रमाणेच आपणही याला ‘आमचा समुद्र’ असं सहज म्हणू लागतो.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.