Language Marathi

साध्या साध्या गोष्टी भाग 1

‘श्रध्दा ज्ञान देते, नम्रता मान देते, योग्यता स्थान देते आणि हे तिन्ही मिळाले तर या व्यक्तीला दुनिया सन्मान देते’. हा सुविचार आठवला आणि त्याचं कारण युरोप टूरवरून आलेल्या पर्यटकांची चार-पाच ईमेल्स. “सहल छान झाली, टूर मॅनेजर अमोल सलगरने काय मस्त सर्व्हिस दिली, पण… पण तुम्ही एकच करा, काही पर्यटकांना पुढच्या सहलीत अजिबात स्थान देऊ नका”… हा सर्व पत्रांचा सूर…

‘पर्यटक देवो भव:’ ही आमची मानसिकता. पर्यटक आहेत म्हणून आम्ही आहोत आणि पर्यटकांनी पाठिंबा दिल्यामुळेच वीणा वर्ल्ड उभं राहिलं ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, आणि म्हणतात नं की अंगाच्या कातड्याचे जोडे करून घातले तरी हे ऋण फिटणार नाही तशी कृतज्ञता आजन्म आमच्या पर्यटकांच्या प्रती आम्हा सर्वांची राहिल. आणि म्हणूनच पर्यटकांच्या प्रत्येक सहलीला यशस्वी करण्यात, पर्यटकांना सहलीचा पुरेपूर आनंद मिळवून देण्यात आमची संपूर्ण टीम सतत प्रयत्नशील असते आणि कायम राहिल. हे सर्वकाही असलं तरी आत्तापर्यंत आम्ही दोन पर्यटकांना आणि आता कदाचित ह्या पर्यटकांना ‘राइट ऑफ अ‍ॅडमिशन’ च्या खाली पुढच्या सहलीत प्रवेश करण्यास नम्रपणे नकार देऊ. हे आम्हाला करावं लागलं किंवा लागणार ते आम्हाला गर्व झालाय किंवा आमच्यात उद्दामपणा आलाय म्हणून नव्हे कारण तो कधीच येणार नाही, पण एवढ्याचसाठी की ह्या पर्यटकांचा इतर पर्यटकांना होणारा त्रास वाचविण्यासाठी. ह्या पर्यटकांनी नेमकं काय केलं की पर्यटक देवो भव: म्हणताना आमच्यावर ही वेळ यावी. पर्यटक नंबर एक – ज्येष्ठ व्यक्ती, ऑफिसमध्ये बुकिंगला आल्या आल्याच शिवराळ भाषेत बोलायला सुरुवात. माझ्यापासून, आमच्या संस्थेपासून समोर बसलेल्या त्या मुलीला सर्वांना अपशब्दांचा भडिमार. हे जरा वेगळंच वादळ होतं, त्यामुळे आमची ती टीम मेंबर घाबरली. तिने आमच्या सीनियर टूर मॅनेजर विवेक कोचरेकरला फोन केला की, ‘बाबा ह्यांच्याशी बोल, मला बोलणं अशक्य होतंय’. विवेकने त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, अर्धा तास नम्रतेने संभाषण करूनपण रागाने लालेलाल होऊन डायरेक्ट माझ्याकडे आला आणि म्हणाला, “आपली पॉलिसी काय आहे पर्यटकांना सहलीला प्रवेश द्यायची? म्हणजे आपण कुणाला नाही म्हणू शकतो का, प्रवेश नाकारू शकतो का?” मी म्हटलं असं आपण कधीच केलं नाही. अरे व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती. ते काय बोलतात ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही. त्यांना सांगून बघ की, ‘अहो तुम्ही इतकं वाईट बोलताय तर नका येऊ सहलीला’. विवेक म्हणाला, ‘तेही सांगून झालं पण ते हट्ट धरून बसलेयत की मला यायचंच आहे आणि बुकिंग केल्याशिवाय मी उठणार नाही’. आता माझी वेळ होती निर्णय द्यायची. मी म्हटलं, “घे बुकिंग, कदाचित आज त्यांची मन:स्थिती चांगली नसेल, वुई विल सी द बेटर साइड ऑफ लाइफ…” आणि सहलीवरून आल्यावर आम्ही निखारा पदरात टाकला होता ते आमच्या लक्षात आलं. सहप्रवाशांना काहीही कारण नसताना रोज ह्यांच्या गलिच्छ आणि शिवराळ अपशब्दांचा सामना करावा लागला. त्या पर्यटकांची मी मनोमन माफी मागितली कारण ह्या पर्यटकाला प्रवेश देण्यासाठी मी जबाबदार होते. पण तेव्हापासून कानाला खडा लावला आणि ‘राइट ऑफ अ‍ॅडमिशन’चा राइट वापरला.

दुसरे पर्यटक ज्यांना आम्ही नाही म्हटलं त्या एक महिला होत्या. फिरण्याची प्रचंड आवड पण पर्सनल हायजिनच्या बाबतीत संपूर्ण आनंदी आनंद. पहिल्याच दिवशी आमच्या टूर मॅनेजरला एकदम कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. काही पर्यटकांनी येऊन डायरेक्ट तक्रार केली की आम्ही ह्या बाईंच्या जवळ बसणार नाही. अतिशय अस्वच्छ आहेत आणि प्रचंड वास येतोय. अरे बापरे टूर मॅनेजरसमोर बाका प्रसंग उभा राहिला. सांगायचं कसं ह्यांना, तेही एका महिलेला? त्याच्या अनुभवावरून त्याने त्या ताईंशी नम्रपणे संवाद केला. त्यांना ग्रुप टूर, इतर सहप्रवासी, आपली एक पर्यटक म्हणून जबाबदारी काय असते अशा ग्रुप टूरमध्ये… हे समजावून सांगितले पण पालथ्या घडावर पाणी. लकीली त्या पंचेचाळीस सीटर बसमध्ये बत्तीसंच मंडळी असल्याने पर्यटकांनीही टूर मॅनेजरची असमर्थता जाणली आणि ते मागे जाऊन बसले आणि ह्या महिलेच्या मागच्या पुढच्या सीट्स रिकाम्या ठेवल्या. पर्यटकांच्या अशा सहकार्याबद्दल धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत पण नाही म्हटलं तरी त्रास होतोच. सहल परत आल्यावर आम्ही सर्वांनी त्याबाबतचा वृत्तांत ऐकला आणि अंगावर काटा आला. सर्वानुमते आम्ही दुसर्‍यांदा ‘राइट ऑफ अ‍ॅडमिशन’चा राइट वापरला.

आपल्या पर्यटकांबाबत जगात सगळीकडे एकूणच चांगले पर्यटक, डिसिप्लिन्ड ट्रॅव्हलर्स अशी एक प्रतिमा निर्माण झाली आहे आणि त्याचा आम्हाला वेळोवेळी प्रत्यय येतो. खूप चांगल्या तर्‍हेने देश-विदेशात वीणा वर्ल्डच्या पर्यटकांना वेलकम केलं जातं. गेल्या चार वर्षांचा वीणा वर्ल्डचा कालावधी धरला तर अडीच लाख पर्यटकांत फक्त दोन पर्यटकांसाठी हा ‘राइट ऑफ अ‍ॅडमिशन’ वापरावा लागला. हे प्रमाण नगण्य आहे पण त्यावरून ‘काय करू नये’ ह्याची कल्पना येते.

खरंतर खूप साध्या साध्या गोष्टी असतात. घरात, कुटुंबात, कार्यालयात, संघटनेत, सहलीत, विमानात, बसमध्ये, सहप्रवाशांसोबत असताना आपल्या वागण्याला काही मर्यादा असतात. रागात आपण म्हणतो नं ‘अरे! वेळ काळ स्थळाचं काही भान आहे की नाही?’ आणि तेच नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. आपण एक समाजघटक आहोत आणि आपल्याला त्यामुळेच ह्या मर्यादा पाळायला पाहिजेत. आजचं लिखाण कदाचित थोडंसं हार्श वाटेल, पण पर्यटनाच्या व्यवसायात असल्याने त्यातले ‘डू आणि डोन्टस्’ हे अगदी जवळून पाहायला मिळतात आणि त्याद्वारे थोडंसं हे लिखाण. गोष्टी साध्या असतात पण कधी कधी त्या माहीत नसतात म्हणूनही चुका होतात. किमान तेवढा अवेअरनेस आणण्यासाठी ही धडपड. पुढच्या रविवारी ह्याच विषयावर पुन्हा भेटूया. चूकभूल द्यावी घ्यावी. हॅव अ ग्रेट संडे!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*