Language Marathi

सांगणार की विचारणार?

एखाद्या संघटनेचा लीडर असताना किंवा संपूर्ण देशाची जबाबदारी सांभाळताना ‘विचारायचं की सांगायचं’ ‘विचारणार की सांगणार’ ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. ‘सर्वसुखाय-सर्वहिताय’ असा निर्णय घेताना त्या मुखियाला त्याच्या मनातल्या द्वंद्वावर मात करीत ‘विचारायचं की सांगायचं’ ह्याचा निर्णय घ्यावाच लागतो. विचारणं-सर्व संमतीने सर्वांच्या साथीने गोष्टी करणं कधीही चांगलं पण कधीतरी आपल्याला डायरेक्ट ‘निर्णय सांगणं’ ही गोष्टही करावी लागते

‘प्रियाका जरा इथे येशील, महत्वाचं बोलायचंय’ ‘हो येते नं पण मला सांगा, सांगणार आहात की विचारणार आहात?’ ओ हो! प्रियाका पत्की आमची सेल्स मॅनेजर, तिने अगदी शाल जोडीतला ठेवून दिला. अर्थात त्याला कारणही होतं. मागच्या आठवड्यात कोणतीही चर्चा न करता, कोणाचंही मत न घेता मी एक निर्णय त्यांच्या माथी मारला होता. आता ही वीणा वर्ल्डची पध्दत नाही. सर्वांनी एकत्र यायचं, जो काही प्रॉब्लेम असेल तो सर्वांसमोर टेबलवर मांडायचा आणि मग सर्वानुमते त्यावर निर्णय घ्यायचा हे ठरलेलं. त्यामुळे एवढा मोठा निर्णय त्यांना न विचारता डायरेक्टली सांगितला होता. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरचे आश्‍चर्यमिश्रित भाव माझ्या आजही नजरेसमोर आहेत. ह्या प्रकारानंतर त्यांनी ‘सांगणार आहात की विचारणार आहात?’ हा वाक्यप्रचार वीणा वर्ल्डमध्ये प्रचलित केला असं दिसतंय.

त्याचं झालं असं, जगातून कुठूनही तुम्ही म्हणजे वीणा वर्ल्डचे पर्यटक जेव्हा ऑनलाईन/ऑफलाईन-ब्रांच ऑफिसमधून वा प्रिफर्ड सेल्स पार्टनरकडे बुकिंग करता तेव्हा त्यांच्या बुकिंगनंतरची जी संपूर्ण कार्यवाही असते ती आमच्या मुंबईच्या विद्याविहार येथील कॉर्पोरेट ऑफीसमधून चालते. आम्ही एकूण सहाशे टीम मेंबर्स तिथे सहाव्या आणि सातव्या मजल्यावर असलेल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समधून तुमच्या अथपासून इतिपर्यतच्या सर्व गोष्टींवर काम करीत असतो. का माहीत नाही पण ह्या दोन मजल्यांमध्ये सातव्या मजल्याला जरा जास्त महत्व प्राप्त होत गेलं आणि अधून-मधून जाणवायला लागलं की सहावा आणि सातवा मजला ह्यामध्ये थोडं ‘उच-नीच’ झालंय. पुढे भीती होती की, सातवा मजला सहाव्या मजल्यापेक्षा महत्वाचा असं जर टीमच्या किंवा माणसांच्या मनात घुसलं तर ते ऑर्गनायझेशनला-एकूणच मानसिकतेला धोकादायक. जाणवत होतं पण कळत नव्हतं काय करायचं ते. सहाव्या मजल्यावरून सातव्या मजल्यावर यायला टीममेंबर्स खूश असायचे एखादं प्रमोशन मिळाल्यासारखे, तेच सातव्यावरून सहाव्या मजल्यावर जायचं म्हटलं की चेहर्‍यावरच नाराजी दिसायची, डिमोशन झाल्यासारखं वाटायचं त्यांना. तोच व्ह्यू, तेच ऑफिस, तसंच इंटीरियर पण फिलिंग्ज वेगवेगळी. सातव्या मजल्याचं महत्व अवास्तव आहे हे कळत होतं पण सहाव्याचं महत्व कसं वाढवायचं ह्याचं उत्तर मिळत नव्हतं किंवा त्यावर तशी चर्चा होत नव्हती प्रत्येकाला आपलं वाटायचं की काहीतरी केलं पाहिजे म्हणून.

वीणा वर्ल्डला चार वर्ष झाली, पर्यटकांचा वाढता पाठिंबा आणि वाढता बिझनेस मॅनेज करायला जागा अपूरी पडायला लागली, सुदैवाने बाजूच्या जागा मोकळ्या होत्या त्या घेऊन त्यात एक्स्पान्शन करता आलं. सर्व डिपार्टमेंट्सचं रीलोकेशन करावं लागलं आणि त्यात आम्हाला सहाव्या मजल्याचं महत्व कसं वाढवायचं ह्याचं उत्तर मिळालं. ह्या उत्तराचा एक भाग होता बाह्यांग. माझ्या हॉलिवूड-बॉलिडवूड वाल्या फिल्मी मनाला नेहमी चित्रपटातले प्रसंग आठवतात कोणत्याही अशा प्रॉब्लेमॅटीक सिच्युएशनमध्ये. यावेळी मला आठवलं ते ‘कल हो ना हो’ सिनेमातलं जया भादूरी आणि प्रीटी झिंटा यांचं न चालणारं हॉटेल. मग नेहमीप्रमाणे मसिहा शाहरुख खान लंबाचौडा भाषण देत ते हॉटेल साफसुथरं चकचकीत करायला कशी मदत करतो, मग त्यात जान कशी भरतो आणि त्या रीफर्निश्ड, रिनोव्हेटेड हॉटेलमध्ये गिर्‍हाईक कशी यायला लागतात, जागेचा कसा कायापालट होतो हे दाखवलंय. त्यातला फिल्मीपणा बाजूला ठेवून विचार घेणं महत्वाचं. त्यानुसार आम्ही जागा जरी एकदम ब्राइट असली, व्ह्यू छान असला तरी पूर्ण ब्राइट व्हाइट करायचं ठरवलं. एक डल कलरवालं बंद पार्टीशन होतं दोन डिपार्टमेंट्समध्ये तिथे काच लावली. त्यामुळे जागा मोकळी दिसायला लागली. वीणा वर्ल्डच्या एकूणच ओपन ट्रान्सपरंट पॉलिसीला जागेनेही जणू ‘हम भी साथ है’ म्हणत दूजोरा दिला. बाह्यांग एकदम चकाचक झालं. तरीही खात्री वाटत नव्हती की सहाव्या आणि सातव्या मजल्यावरच्या उच-नीच भावनेचा समूळ नायनाट होईल. जागेचं महत्व आता अवलंबून होतं ते तिथे बसणार्‍या माणसांवर. जर वीणा वर्ल्डचं सर्वात महत्वाचं डिपार्टमेंट सहाव्या मजल्यावर आपण घेतलं तर? आणि सर्वात महत्वाचं होतं सेल्स डिपार्टमेंट. जे अर्ध वर आणि अर्ध खाली असं डिव्हाइड झालं होतं. ते जर सगळच्या सगळं खाली गेलं तर सर्वांनाच सतत खाली जावं लागेल (नाक घासत☺) आणि निश्‍चितपणे सहाव्या मजल्याचं महत्व वाढेल आणि जो भावनिक भेद-भाव कळत नकळत चालू आहे तो थांबेल. हा विचार क्लोज डोअर मिटिंगमध्ये पक्का झाला. पण सांगायचा कसा कारण जेव्हा सांगणार तेव्हा वरची मंडळी खाली जायला नाराज होणार हे शंभर टक्के. बरं विचारायला गेलो तर आम्ही सातव्या मजल्यावरच असणं किती संयुक्तिक आहे हे आम्हाला पटवून देण्यात आमची सेल्स टीम एकदम पटाईत. आणि सेल्स टीमने असं कन्व्हिंसिंग असणं हे त्यांच्या प्रोफाइलचा भाग आणि त्यांच्या जीवनाचं अविभाज्य अंग. आणि त्यांनी जर आपल्याला कन्व्हिन्स केलं तर. आणि अनेकवेळा अशा कन्व्हिंसिगला मी बळी गेलेय. सो विचारणं म्हणजे धोका होता. ‘डायरेक्ट सांगणं’ वीणा वर्ल्ड ओपन-इन्क्लुसिव्ह पॉलिसीच्या विरोधात होतं. अर्थात संपूर्ण सेल्स डिपार्टमेंट म्हणजे एक अतिमहत्वाचं डिपार्टमेंट जेव्हा खाली सहाव्या मजल्यावर जाणार होतं तेव्हा त्याचं महत्व वाढणार होतं, संपूर्ण सेल्स एकाच ठिकाणी झाल्यामुळे त्याचे अनेक फायदे होणार होते. आम्हा सर्वांचा वावर खाली वाढणार होता. अशा वेळी ऑर्गनायझेशनच्या हितासाठी व्हेटो वापरावा लागतो आणि तो मी वापरला. एक दिवस घाई धावपळीत एक छोटीशी मिटिंग घेऊन निर्णय सांगून टाकला. नो चर्चा. ह्या महिन्यात एक्स्पांशन आणि रीनोवेशन पूर्ण होईल, डिपार्टमेंट्स आपल्या नवीन जागी स्थिरावतील. वरच्या मजल्यावरचे सेल्सवालेही येणार्‍या नवीन लोकेशनशी मनाने एकरूप होताहेत. आम्हीही त्यांना हे ट्रांझिशन अजून सोप्प कसं करता येईल ह्याचा प्रामाणिक विचार करतोय.

वीणा वर्ल्डसारखी एखादी छोटी ऑर्गनायझेशन सांभाळताना असो किंवा आपल्या कुटूंबाचं पालकत्व पार पाडताना, एखाद्या संघटनेचा लीडर असताना किंवा संपूर्ण देशाची जबाबदारी सांभाळताना ‘विचारायचं की सांगायचं’ ‘विचारणार की सांगणार’ ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. ‘सर्वसुखाय-सर्वहिताय’ असा निर्णय घेताना त्या मुखियाला त्याच्या मनातल्या द्वंद्वावर मात करीत ‘विचारायचं की सांगायचं’ ह्याचा निर्णय घ्यावाच लागतो. विचारणं-सर्व संमतीने सर्वांच्या साथीने गोष्टी करणं कधीही चांगलं पण कधीतरी आपल्याला डायरेक्ट ‘निर्णय सांगणं’ ही गोष्टही करावी लागते आणि ती करण्याची शक्ती किंवा धमक आत्मसात करावी लागते. कारण ह्या सांगण्यामध्ये होणार्‍या संपूर्ण बर्‍या वाईट परिणामांची जबाबदारी ही त्या लीडरची असते आणि ती घेण्याची मजबूत मानसिकता असावी लागते. खंबीर मानसिकता हा लीडरशीपचा एक पैलूच आहे नाहीका. ‘लेट्स बी स्ट्राँग अ‍ॅन्ड फेस द चॅलेंजेस.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*