LOKRANGA 190818 Image

लेट्स चेक-इन

0 comments
Reading Time: 7 minutes

“डोंगरावर चढत असताना वाटेतच गाडी थांबते आणि तुम्ही पॅराग्लायडिंगची तयारी करता. रीसॉर्टच्या प्रोफेशनल पॅराग्लायडिंग इन्स्ट्रक्टर बरोबर समोर दिसणार्‍या निळ्याशार पाण्याकडे बघत तुम्ही तुमच्या रीसॉर्टमध्ये चेक-इन करता ते चक्क पॅराग्लायडिंग करत!” चेक-इन करता करताच जेव्हा त्या जागेची खासियत आपल्यासमोर उभारून येते तेव्हा ती जागा पोहोचल्या पोहोचल्याच आपल्या मनात भरते.

डोंगराच्या माथ्यावर उभे राहून मी सभोवती पाहिले. अतिशय सुंदर नजारा होता. तेवढ्यात ‘लेट्स गो’ हे शब्द कानावर पडले आणि डोंगराच्या कडावर मी धावू लागले. पॅरॅशूटमध्ये हवा भरली आणि बघता बघता मी हवेत तरंगत होते. ‘फॅब्युलस! एन्जॉय द राईड नाऊ’ असे माझ्या पॅराग्लायडिंग इन्स्ट्रक्टरचे बोल ऐकून मी पॅराग्लायडिंगचा रोमांचक अनुभव घेऊ लागले. जगात अनेक प्रेक्षणिय स्थळी आपल्याला पॅराग्लायडिंगचा थरारक अनुभव घेता येतो. कल्पना करा की विमानाचा प्रवास करून तुम्ही नुकतेच विमानतळावर लँड होताच आपले सामान घेऊन गाडीने आपल्या रीसॉर्टकडे निघता. डोंगरावर चढत असताना वाटेतच गाडी थांबते आणि तुम्ही पॅराग्लायडिंगची तयारी करता. रीसॉर्टच्या प्रोफेशनल पॅराग्लायडिंग इन्स्ट्रक्टर बरोबर समोर दिसणार्‍या निळ्याशार पाण्याकडे बघत तुम्ही तुमच्या रीसॉर्टमध्ये चेक-इन करता ते चक्क पॅराग्लायडिंग करत! हा अनोखा अनुभव तुम्ही घेऊ शकता ते सल्तनेट ऑफ ओमानच्या मुसनदम पेनिनसुलावर स्थित असलेल्या ‘सिक्स सेन्सेस’ या लक्झरी रीसॉर्टमध्ये. एका बाजूला उंच पर्वतरांगा तर दुसर्‍या बाजूला ‘झिगी बे’ च्या सुंदर बीचवर फेसाळणार्‍या लाटा. इथे आपण अ‍ॅडव्हेंचरस 4×4 व्हील ड्राईव्ह गाडीनेसुद्धा येऊ शकतो किंवा प्रायव्हेट मरिनावर बोटीनेसुद्धा पोहचू शकतो. पण पॅराग्लायडिंग करत चेक-इन करून आपण अगदी जेम्स बॉन्डच्या सिनेमातले एखादे पात्र असण्याचा अनुभवसुद्धा घेऊ शकतो.

जगभ्रमंती करणे आज तसे फार सोपे झाले आहे. अनेक देशांनी आपली दारे पर्यटनासाठी पूर्ण उघडल्याने आज देशादेशांमध्ये पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची एक प्रकारची स्पर्धाच सुरू झाली आहे. विविध नैसर्गिक आकर्षणांनी समृद्ध असलेले देशसुद्धा पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक नवनवीन उपक्रम घेऊन येत आहेत. आज पर्यटकांना आपल्या आवडी-निवडीप्रमाणे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स् ही सुद्धा त्या-त्या डेस्टिनेशनचे आकर्षण बनलेली आहेत. हॉटेलमध्ये वास्तव्य करण्याआधी पहिला टप्पा असतो तो म्हणजे हॉटेल मध्ये चेक-इन करणे. आपले ओळख पत्र किंवा पासपोर्ट आणि क्रेडिट कार्ड गॅरन्टी देऊन आपल्या रिझर्व्हेशनप्रमाणे आपल्या रूमच्या चाव्या घेऊन चेक-इन केल्यावर आपण रूमकडे निघतो. आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे या चेक-इनची वेळ बहुधा दुपारी तीन नंतर असते. काही भव्य-दिव्य हॉटेल्समध्ये चेक-इन करायला तसा बराच वेळ लागतो तर कधी कधी त्या चेक-इन काउंटर वर उभ्या असलेल्या नवशिक्या कर्मचार्‍यांना आपले रिझर्व्हेशन मिळत नाही आणि गोंधळलेले ते आणि थकलेले आपण, संवाद सोडून वाद-विवादाकडे वळतो. लंडनमधल्या सिटी सेंटर हॉटेलमध्ये चेक-इन करताना मला अशाच एका प्रसंगाला तोंड द्यावे लागले. तिथल्या काउंटरवर ईस्ट युरोपियन ट्रेनी होती व तिला काही केल्या माझे रिझर्व्हेशन सापडेना. एक तास कम्प्युटर सिस्टीमवर शोधाशोध केल्यानंतर तिने सर्वात सोपा मार्ग पत्करला, ‘तुझ्या ट्रॅव्हल एजंटने तुझे बुकिंगच केले नाही’ असे तिचे उत्तर मिळताच मला हसावे की रडावे कळेना. जेव्हा मी माझी स्वत:ची ट्रॅव्हल एजंट असल्याने स्वत:च बुकिंग केले होते तेव्हा हे उत्तर अपेक्षित नव्हते. असो! शेवटी तिला कळले की गेला एक तास ती माझे रिझर्र्व्हेेशन ‘पटेल’ या नावानी शोधत असल्याने ते तिला दिसत नव्हते. प्रवासात अशा गमती जमती अनेक वेळा होतच असतात. तसेच सध्या रीनोव्हेशनसाठी बंद असलेल्या मलेशियाच्या गेंटिग हायलन्डस्मध्ये चेक-इन करताना माझ्या पुढे कमीत कमी शंभर लोक असल्याने तिथे संयम बाळगणे गरजेचे होते.

अनेक आयलंडसवर चेक-इनची वेळ उशिराची असली तरी हॉलिडेची सुरुवात ही चेक-इन करण्याच्या आधीच होऊ शकते. मॉरिशस, सेशेल्स, ताहिती यासारख्या बेटांच्या रीसॉर्टवर चेक-इनला वेळ असल्यास आपण रीसॉर्टचा स्विमिंग पूल व इतर सुविधा वापरू शकतो. तर अशा ठिकाणी आपला स्विमिंग कॉश्‍चुम हा बॅगेत सर्वात वर ठेवले की काम झाले. प्रवासाचा थकवा हा चेक-इन करण्याआधीच नाहीसा होऊ शकतो.  झिगी बे सारख्या अनेक हॉटेल्समधली वेगवेगळ्या प्रकारची चेक-इन प्रक्रिया त्रासदायक न ठरता आपल्या हॉलिडेचा एक सुंदर अविस्मरणीय अनुभव ठरते. इंडियन ओशनमधल्या मालदीवच्या बेटांवरील कोरल रीफमधल्या एका बेटावर असलेलं एक रीसॉर्ट जणू पाण्यावर तरंगत आपलं स्वागत करतं. इथे माले एअरपोर्टवरून आपण सी-प्लेनमध्ये बसून त्या बेटांवरून सीनीक फ्लाईटचा आनंद घेत रीसॉर्टवर पोहचू शकतो. तुम्ही हनिमून साजरा करत असाल तर प्रायव्हेट सी-प्लेन राईडसुद्धा घेऊ शकता. तसेच लक्झरी यॉट्स किंवा स्पीड-बोट घेऊन सुद्धा आपण मालदीवच्या अनेक रीसॉर्टस्मध्ये चेक-इन करू शकता. बोटीने प्रवास करत आपल्या हॉटेलमध्ये चेक-इन करण्याचा अनुभव मला दोन वेळा घेता आला. उदयपूरला ‘ताज लेक पॅलेस’ या ताजच्या आयकॉनिक लक्झरी हॉटेलकडे पोहोचण्यासाठी आपल्याला लेक पिचोलामध्ये बोट राईड घेऊन जाता येते. त्यानंतर उतरताच खर्‍या शाही थाटात सुंदर भरतकाम केलेल्या शाही छत्री धारकाबरोबर रॉयल वॉक घेत गुलाबाच्या पाकळ्यांचा आपल्यावर वर्षाव होत आपण हॉटेलमध्ये चेक-इन करतो. इथे आपल्याला एका राजघराण्यात आल्याचा आनंद होत पुढे आपली खातिरदारी शाही थाटात होणार याची खात्री चेक-इन केल्या केल्याच होते. असाच दुसरा सुखद अनुभव मला केरळच्या वेमबनाड लेकवरच्या ‘कोकोनट लगून’ या इको-फ्रेन्डली लक्झरी रीसॉर्टला जाताना मिळाला. या रीसॉर्टला जाण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे बोटीने. त्याच्या जेट्टीवर पोहोचताच नारळाच्या झाडांनी वेढलेल्या त्या बॅकवॉटर कॅनल्समधून दहा मिनिटांच्या बोट राईडनंतर आम्ही कोकोनट लगूनच्या रीसेप्शनवर पोहोचलो. तिथे गजर्‍यांनी आणि नारळ पाणी देऊन माझे स्वागत झाले आणि केरळची खरी ओळख या कोकोनट लगूनमध्ये होणार ह्याची मला खात्री पटली.

चेक-इन करता करताच जेव्हा त्या जागेची खासियत आपल्यासमोर उभारून येते तेव्हा ती जागा पोहोचल्या पोहोचल्याच आपल्या मनात भरते. केनियाच्या मसाई मारामधल्या गव्हर्नस टेन्टेड लॉजला भेट देताना मी विमानातून उतरताच, मला घ्यायला आलेल्या गाडीला बघून मी खूप खूश झाले कारण ही गेम ड्राईव्हची जीप होती. मागे सामान टाकून आमची सफारी सुरू झाली. इथल्या बहुतेक एअर स्ट्रिप्स थेट जंगलात असल्याने आपले चेक-इन होण्याआधीच आपला गेम ड्राईव्ह सुरू होतो. हॉटेल मॅनेजर आणि इतर स्टाफने आपले स्वागत करण्याआधीच जणू इथले जिराफ, झेब्रा आणि हत्तींचे कळप आपले स्वागत करताहेत असे वाटते. हॉटेलमध्ये तर केेनियन ट्राईब्सच्या लोकल गाण्याने अधिकच वेलकम वाटते. थायलंडमधल्या कोह कूदमधल्या सोनेवा किरीमध्ये आपण ब्रेकफास्ट किंवा लंच डे तिथल्या रेनफॉरेस्टमधल्या बांबूने बनवलेल्या ट्री-पॉडमध्ये घेऊ शकतो. इथे आपले जेवण आपला वेटर झिपलायनिंग करत टारझनसारखा झाडावरून उड्या मारत आणतो. जिथे जेवणाचा अनुभव इतका स्पेशल असेल तिथे चेक-इनसुद्धा अर्थातच स्पेशल असणार हे गृहित धरायला काहीच हरकत नाही. सोनेवा किरी हे रीसॉर्ट इतके एक्सक्लुसिव्ह आहे की इथे आपण रीसॉर्टच्या प्रायव्हेट प्लेनने 90 मिनिटांची प्लेन राईड घेऊन इथल्या जंगलातल्या एअरपोर्टवर उतरतो.

एखादे खास सेलिब्रेशन असेल तर दुबईच्या बुर्ज अल अरबच्या छतावर अगदी हॉलिवूड बॉलीवूड स्टाईलमध्ये आपण हेलिकॉप्टर प्रवास करत हेलिपॅडवर उतरून चेक-इन करू शकतो. अनेक लक्झरी हॉटेल्समध्ये तर आजकाल हॉटेल लॉबी नसून आपण पोहोचताच थेट आपल्या रूममध्येच आपले चेक-इन होते. एकेकाळी त्रासदायक वाटणारी ही चेक-इनचा प्रकिया अशा अनेक इनोव्हेटिव हॉटेल्सनी आपल्या हॉलिडेचा एक महत्वाचा आणि आनंद देणारा एक्सायटिंग भाग केल्याने आपला हॉलिडे आज जगभरात अगदी सुखद ठरेल हे नक्की. सो, कम ऑन, लेट्स चेक-इन!

Adventure, Customized Holidays, Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*