युरोपियन जल्लोष 2019

0 comments
Reading Time: 7 minutes

दा विंचीच्या चित्रांपासून ते मोझार्टच्या सिंफनीपर्यंत, आल्प्सच्या हिमशिखरांपासून ते व्हेनिसच्या कालव्यांपर्यंत, ट्युलिप गार्डन्समधल्या बहरापासून ते नॉर्वेच्या मिडनाईट सनपर्यंत, रोममधल्या कलोसियमपासून ते इस्तांबूलमधल्या ग्रँड बझारपर्यंत कला-संस्कृतीचा अखंड चालणारा उत्सव अनुभवण्यासाठी जगाच्या कानाकोपर्‍यातून दरवर्षी पन्नास कोटींहून अधिक लोक युरोपमध्ये पर्यटन करतात, त्यात भारतीय  पर्यटकांची संख्याही लाखोंच्या घरात आहे, सर्वात जास्त पर्यटक युरोपमध्ये घेऊन जाणारी राज्य आहेत महाराष्ट्र आणि गुजरात.

ऑगस्ट सुरू झाला की दिवाळी-ख्रिसमसमधल्या सहलींचं बुकिंग धूमधडाक्यात सुरू असतानाच महाराष्ट्रालाच नव्हे तर आपल्या संपूर्ण भारताला, खासकरून पर्यटन प्रेमींना वेध लागतात ते पुढच्या वर्षीच्या समर व्हेकेशनमधल्या युरोप अमेरिकेतल्या सहलींचे. आत्ताही विचारणा सुरू झालीच आहे की कधी सुरू करताय पुढच्या वर्षीचं बुकिंग. तसं बघायला गेलं तर सर्वांची जगप्रदक्षिणेची-सप्तखंड पादाक्रांत करायची इच्छा किंवा तिची तीव्रता वाढायला लागलीय. आम्ही भारतात किंवा साउथ ईस्ट एशियात म्हणजे सिंगापूर थायलंड मलेशियात संख्याबळाचा विचार करता सर्वात जास्त टूरिस्ट घेऊन जातो. त्यानंतर युरोपच्या पर्यटकांचा नंबर लागतो. अर्थात आपल्या भारतातल्याच नव्हे तर जगातल्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक अ‍ॅस्पिरेशन असतं ते युरोपच्या बाबतीत. प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी युरोपला जायचं असतंच असतं आणि का असू नये, युरोप आहेच अद्वितीय, अप्रतिम आणि अफलातून.

आपल्या रोमांचक इतिहासानं, दीर्घ आणि बहुरंगी परंपरेनं, वैविध्यपूर्ण भूगोलानं, आकर्षक निसर्गानं, थक्क करणार्‍या मानवनिर्मित आश्‍चर्यांनी आणि बहुढंगी लोकजीवनाने जगभरातील पर्यटकांचे मोठ्ठे आकर्षण ठरलेला आणि भेट देणार्‍यांना कधीही निराश न करणारा खंड म्हणजे युरोप, असं आहे तरी काय या खंडामध्ये की ज्यासाठी दरवर्षी करोडो पर्यटक जगाच्या कानाकोपर्‍यातून युरोप पाहायला, अनुभवायला येतात. तर युरोपच्या आकर्षणांची यादी न संपणारी आहे, दा विंचीच्या चित्रांपासून ते मोझार्टच्या मधुर सुरांपर्यत आणि शेक्सपियरच्या अजरामर नाटकांपासून ते रशियन बॅलेपर्यंत कलेच्या प्रांतातील दर्दींसाठी युरोप लोभस आहे. प्राचीन रोमन साम्राज्याच्या अवशेषांपासून ते रशियातील सोव्हिएत काळाच्या खुणांपर्यत आणि जर्मनीमधील ब्रॅडनबर्ग गेटपासून ते पोलंडमधील ऑशवित्झ कॅम्पपर्यंत इथे अनेक ठिकाणे, वास्तू इतिहासप्रेमींना साद घालतात. स्विस आल्प्स्च्या हिममय परिसरापासून ते नॉर्वेमधल्या फियोर्डस्पर्यंत आणि नेदरलँडस्च्या ट्युलिप गार्डनपासून ते क्रोएशियातील प्लिटवाइस नॅशनल पार्कपर्यंत युरोपमधला वैविध्यपूर्ण निसर्ग प्रत्येक ऋतुत आपलं बदलणारं रूप मिरवत असतो. फ्रान्सचा आयफेल टॉवर, जर्मनीतलं कलोन कॅथेड्रल, रशियातील सेंट बॅसिल्स कॅथेड्रल, हंगेरीतील फिशरमन्स बॅस्टियन, टर्कीमधील डोल्माबाशी पॅलेस, रोममधील रोमन फोरम, लंडनचा टॉवर ऑफ लंडन अशा मानव निर्मित आकर्षणांची जादू अनेकांना युरोपकडे खेचून घेते. शिवाय स्पेनचा ‘ला टोमॅटिना’, टर्की हमामचा अनुभव, ब्रिटनमधील हॅरी पॉटर ट्रेन अर्थात जेकोबाइट रेल्वे, व्हेनिसची गोंडोला राईड, कान्सचा फिल्म फेस्टिव्हल, नॉर्वेचा मिडनाइट सन आणि नॉर्दन लाइटस, फिनलँडचा सोना बाथ असे खास युरोपियन एक्सपिरियन्सेस आहेतच. त्यामुळे युरोपला भेट द्यायचे, युरोपची सहल करायचे बहाणे शोधाल तितके कमीच आहेत.

जगातल्या सातही खंडांची आकारमानानुसार क्रमवारी लावली तर लहान आकाराच्या खंडाच्या यादीत युरोपचा क्रमांक वरून दुसरा लागतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या फक्त २% क्षेत्रावर युरोप पसरलेला आहे. म्हणजेच युरोप आकाराने आपल्या आशिया खंडाच्या जेमतेम पावपट आहे. मात्र लोकसंख्येच्याबाबतीत खंडांच्या क्रमवारीत युरोपचा क्रमांक वरून तिसरा लागतो. या खंडाच्या नावाची मुळे ग्रीकपुराण कथेमध्ये आढळतात. एका ग्रीक पुराणकथेनुसार ‘युरोपा’ ही एक फोनेशियन राजकन्या (किंवा क्रीट बेटाची सम्राज्ञी) होती. देवांचा राजा झ्यूस हा तिच्यावर मोहित झाला आणि त्याने बैलाचे रूप घेऊन तिचे अपहरण केले आणि तिला क्रिट बेटावर आणून ठेवले, तिच्यावरून आधी फक्त ग्रीससाठी आणि नंतर सगळ्याच भूभागासाठी युरोप हे नाव प्रचारात आल्याचे मानले जाते.

इतिहासातील रोमन साम्राज्यापासून ते आधुनिक काळातील अत्याधुनिक शहरीकरणापर्यंत या प्रदेशाने अनेक बदल पाहिले, अनुभवले आणि त्यातूनच एक बहुजिनसी संस्कृती निर्माण झाली. आज युरोपची संस्कृती म्हटल्यावर प्रामुख्याने पाश्‍चिमात्य समाज आणि संस्कृती डोळ्यासमोर येते. या समाजाला होमर, प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल पासून ते शेक्सपियर, बायरन, किट्सपर्यंत आणि आधुनिक काळातील अगाथा ख्रिस्ती, गुंथर ग्रास, फ्योदोर दस्तयेवस्की, लिओ-टॉलस्टॉय, आर्थर कॉनन डायल, जे. के. रोलिंगपर्यंतचा साहित्यिक वारसा लाभलेला आहे. शिल्पकला, कोरीवकाम, वास्तुकला, चित्रकला यांबाबतीतही युरोपची परंपरा समृद्ध आहे. ग्रीक मूर्तिकला, रोमन वास्तूकला, मध्ययुगातील बायझेंटाइन कला-परंपरा, गॉथिक वास्तुशैली, रेनेसान्स युगातील कला परंपरा, बारोक कला शैली असा अखंड वाहता राहिलेला कलाकौशल्याचा प्रवाह युरोपमध्ये पाहायला मिळतो. संगीताच्या बाबतीत युरोपच्या भूमीत घडलेल्या आणि उदयाला आलेल्या कलाकारांनी जगभरातील संगीतशौकिनांचे कान तृप्त केले आहेत. बाख, बिथोवन, शुमन, मोझार्ट, स्ट्रॉस, विवाल्डी, रोझिनी अशा कितीतरी अभिजात संगीतकारांची नामावळी सांगता येते तशीच पॉप संगीतातील बिटल्स, पिंक फ्लॉयड, इटन जोन्स, अब्बा, फिल कॉलिन्स, जॉर्ज मायकेल अशी मोठी यादी सांगता येते.

वेगवगेळ्या काळात, राजवटीत आणि शैलीत उभारलेलं वास्तु वैभव हे युरोपचं महत्त्वाचं वैशिष्ठ्य. ग्रीसमधील पार्थेनॉन, रोममधील कलोसियम, मॉस्कोमधील सेंट बॅसिल्स, कॅथेड्रल, बार्सिलोनामधील सॅग्रादा फॅमिलिआ, व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स बॅसिलीका, लंडनमधील बकिंगहॅम पॅलेस, प्रागमधील प्राग कॅसेल, टर्कीमधील ब्ल्यू मॉस्क, बुडापेस्टमधील हंगेरियन पार्लमेंट, पिसाचा मनोरा अशा कितीतरी वास्तू युरोपमधल्या देशांमध्ये युरोपच्या संपन्न वास्तुकलेचं दर्शन घडवत उभ्या आहेत.

सगळ्या जगाला जवळ आणणार्‍या ऑलिम्पिक गेम्सचं उगमस्थान असलेल्या युरोपमध्ये क्रिडा संस्कृती चांगलीच रुजली, बहरली आहे. टेनिसची विम्बल्डन चॅम्पियनशिप, फ्रेंच ओपन, कार रेसिंगची फॉर्म्युला वन, सायकलिंगची टूर डी फ्रान्स, गोल्फची ब्रिटिश ओपन, फूटबॉलची युफा चॅम्पियनशिप, रग्बीची युरोपियन चॅम्पियन्स कप, क्रिकेटचा वर्ल्ड कप, आइस हॉकीची चॅम्पियन्स हॉकी लीग अशा विविध स्पर्धांमुळे युरोपमधील क्रिडा संस्कृती जोपासली गेली आहे. युरोपमधील ग्रीस देशातील अथेन्स या शहरात आधुनिक काळातील ऑलिम्पिक्सचे पुनरुज्जीवन झाले. त्यानंतर आजपयर्र्ंत युरोपमधील पॅरिस, लंडन, स्टॉकहोम, अ‍ॅन्टवर्प, अ‍ॅमस्टरडॅम, बर्लिन, हेलसिंकी, रोम, म्युनिक, मॉस्को, बार्सिलोना या शहरांमध्ये ऑलिम्पिक्स भरले आहे.

चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंतचा कालखंड युरोपच्या इतिहासात रेनेसान्स म्हणून ओळखला जातो. या रेनेसान्सच्या काळात धर्मापासून ते कलेपर्यंत आणि तत्त्वज्ञानापासून ते विज्ञानापर्यंत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवे विचार, नव्या संकल्पना पुढे येऊ लागल्या. याच काळात अभिजात ग्रीक, रोमन कालखंडातील साहित्य, माहिती, राजकीय संकल्पना, सामाजिक वातावरण यावर नव्याने प्रकाश पडला. या रेनेसान्सचा प्रभाव आजही जाणवतो. इतिहास, भूगोल, कलापरंपरा, निसर्ग, लोकजीवन अशा सगळ्याच पैलूंवर आपल्या बहुरंगी, बहुढंगी रूपाने सरस ठरणारा युरोप म्हणूनच जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे आणि पर्यटनात आघाडीवर आहे.

तर अशा ह्या अप्रतिम अद्वितीय आणि अफलातून युरोपला जास्तीत जास्त संख्येने पर्यटकांना नेण्यामध्ये वीणा वर्ल्ड सातत्याने आघाडीवर आहे. गेली दोन वर्ष आपणापैकी जी कुणी मंडळी युरोपला जाऊन आली असतील त्यांना प्रत्येक ठिकाणी वीणा वर्ल्डचे पर्यटक मोठ्या संख्येने सहलीचा आनंद घेताना दिसले असतील ह्यातच सर्व काही आलं. आणि हे समाधानी पर्यटक हीच तर खरी जाहिरात, अधिक बोलायची गरजच नाही. तेव्हा जी मंडळी वाट बघताहेत त्यांच्यासाठी  ‘वीणा वर्ल्ड युरोप अमेरिका 2019’चं बुकिंग आम्ही या महिन्यात लवकरंच सुरू करीत आहोत. उत्कृष्ट सहल कार्यक्रम, कोणतेही छुपे खर्च नसलेली ऑल इन्क्लुसिव्ह टूर प्राईस, व्हिसा करण्यासाठी सहाय्य करणारी डेडीकेटेड अशी मुंबई पुण्यातली नव्वद जणांची टीम आणि सहलीवर आपल्या दिमतीला वीणा वर्ल्डचा मोस्ट केअरिंग टूर मॅनेजर ह्या गोष्टी ओघाने आल्याच, तेव्हा तयार व्हा पर्यटक मंडळी तुमच्या समर 2019च्या युरोप अमेरिका सहलीचं बुकिंग करण्यासाठी. आम्ही सज्ज आहोत तुमच्या स्वागताला. चलो, बॅग भरो, निकल पडो!

Europe, Language, Marathi, World

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*