Language Marathi

फ्लेक्सी समर व्हेकेशन

आता भारतात आणि परदेशात पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटन करताहेत. आपली भारतीयांची उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे सर्वच पर्यटनस्थळी सुपरपीक सीझन. तरीही अजून भारतातले फक्त एक टक्का पर्यटकच प्रवास करताहेत. हे प्रमाण दहा टक्के किंवा वीस टक्के झालं तर? त्यावर उपाय असणार आहे फ्लेक्सी समर व्हेकेशन…

सध्या आमच्याकडे वीणा वर्ल्डमध्ये ‘फ्लेक्सी ऑफिस टाईम’ ह्या विषयावर चर्चा, सुसंवाद, विसंवाद थोडक्यात तू-तू, मै-मै सुरू आहे. त्याचं झालं असं की जसा मार्च संपतो, दिवस मोठे व्हायला लागतात तसं दहा ते सहा हे ऑफिस टायमिंग खूप उशिराचं वाटायला लागतं. दहा वाजता ऑफिसला जायचं म्हणजे जणू अर्धा दिवस वाया गेल्यासारखा वाटतो बर्‍याच जणांना, म्हणजे सकाळी काम करण्याचा जो उत्साह असतो तो बर्‍यापैकी निघून गेल्यावर कामाला सुरूवात होते असा एक सूर. ते अ‍ॅक्च्युअली खरंही आहे कारण आपण दिवस लवकर उजाडण्याचा, सूर्योदय लवकर होण्याचा फायदा घेत नाही आहोत इतर देेशांसारखा. मार्च ते ऑगस्ट ह्या कालावधीत जर आपण संपूर्ण भारताचं घड्याळ म्हणजे टाईम जर एक तास पुढे केलं तर सर्वांचा एक उत्साही तास भारताच्या एकूणच उद्योगधंदयांमधली एफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस वाढवू शकेल. ‘डे लाइट सेव्हिंग टाईम’ म्हणतात ह्याला हे सर्वश्रृत आहेच. पुन्हा सप्टेंबरमध्ये हे घड्याळ एक तास मागे करायचं, ओरिजिनल टाईम आणून ठेवायचं. आता देशाचं घड्याळ बदलणं ही गोष्ट आपल्या हातात नाही पण आपण जर आपल्या कामात, उद्योगात ह्या लवकर उजाडण्याचा फायदा घेऊ शकलो तर नथिंग लाईक इट. आणि दुसरी गोष्ट अशीही आहे की आमच्या कॉर्पोरेट ऑफिस किंवा बॅक ऑफिसमध्ये आम्ही पाचशे साडेपाचशे मंडळी जी काम करतो त्यात कुणी लवकर उठणारे आहेत तर कुणी उशीरा. कुणाला लवकर कामाला सुरूवात करावी वाटते तर कुणाला रात्री उशिरापर्यंत काम करायला आवडतं. बरं आमचं जगाशी जडलेलं नातंही असं आहे की आमच्या टीमला ऑस्ट्रेलियाशी काम करायचं असतं तेव्हा त्या टीमसाठी कामाचा हा सकाळी वाढलेला एक तास पूर्वेकडच्या देशांशी कम्युनिकेशन करण्यासाठी उपयोगी येईल तर संध्याकाळी उशिरा काम करायला आवडणार्‍यांसाठी युरोप अमेरिकेसाठी चांगला राहिल. पूर्वेकडचे देश साडेपाच-सहा तास पुढे असतात आपल्यापेक्षा तर पश्‍चिमेकडचे साडेपाच- सहा तासांपासून अगदी बारा-तेरा तासांपर्यत मागे आहेत. त्यामुळे फ्लेक्सी टाईम केल्यावर इतर देशांशी डील करणंही सोप्पं जाईल. तसं सेल्स ऑफिसेस दहा ते सात सुरू असतात तेव्हा नियमानुसार आठ तास काम करण्याच्या पध्दतीप्रमाणे ऑलरेडी दहा ते सहा आणि अकरा ते सात ह्या वेळा फ्लेक्सी केलेल्याच आहेत. आता कॉर्पोरेट ऑफिसलाही फ्लेक्सी टाईम आणण्यासाठी आमचा विचार सुरू आहे. आणि जनरली अर्ली रायजर्ससाठी किंवा संध्याकाळी ज्यांना लवकर जायला हवंय आणि त्यांचं काम दहा ते सहा ऐवजी नऊ ते पाच मध्येही होऊ शकतंय त्यांना ही पहिली शिफ्ट द्यायची. ज्यांना सकाळ संध्याकाळ काहीच फरक पडत नाही त्यांना रेग्यूलर दहा ते सहा ही शिफ्ट द्यायची आणि ज्यांना सकाळी वेळ हवाय, कुणाला क्लासेस करायचेत, कुणाला मुलांना शाळेत पोहोचवायचंय अशांसाठी अकरा ते सात ही एक बॅच आणायची असा विचार आहे. ह्यामुळे ऐन गर्दीची वेळ काहींना टाळता येईल. वर्क लाईफ बॅलन्स राखण्यात मदत होईल, आणि थोड्या प्रमाणात का होईना ज्याला जसं हवं तसं टायमिंग मिळेल. अर्थात अकरा ते पाच ह्या वेळात मात्र संपूर्ण टीम ऑफिसमध्ये असेल कारण सर्व डीपार्टमेंट्स इंटर रीलेटेड आहेत. आणि सेल्स ऑफिसेस सुरू असताना सर्वांचीच गरज लागते. तसंच प्रत्येक डीपार्टमेंटचं ह्या तीन शिफ्टचं वर्गीकरणही समसमान झालं पाहिजे. सध्या आम्ही ह्याबाबतीत प्रत्येक डीपार्टमेंटचं पोलिंग घेतोय. पण असं दिसतंय की सर्वसाधारणपणे येत्या जून-जुलैपासून आम्ही ह्या फ्लेक्सी टायमिंगचा अवलंब करू.

जसं एका वेळी सगळी ऑफिसेस सुरू होत असल्याने गर्दीच्या महापूराला सामोरं जायची, आयुष्य दावणीला बांधायची एक सामाजिक समस्या मुंबई-पुणे-दिल्ली-बंगळुरू सारख्या मोठ्या शहरांना भेडसावतेय आणि बर्‍याच संस्था त्यावर तोडगा काढण्यासाठी फ्लेक्सी टायमिंगचा किंवा वेळ बदलण्याचा विचार करताहेत किंवा आचरणात आणताहेत.

त्याचप्रमाणे मला आमच्या पर्यटनक्षेत्राशी निगडीत समस्या दिसतेय ती उन्हाळ्याच्या सुट्टीची, दिवाळीच्या सुट्टीची किंवा ख्रिसमसच्या सुट्टीची. एकाचवेळी जेव्हा प्रचंड संख्येने लोक पर्यटनाला निघतात तेव्हा एकूणच संपूर्ण देशाच्या,

शहरांच्या, एअरपोर्टसच्या, ट्रेन्सच्या, हॉटेल्सच्या, एअरलाईन्सच्या प्रशासनावर त्याचा भार पडतो. किमती अव्वाच्यासव्वा वाढतात. आता मे महिन्यात लेह लडाखला जायचं म्हटलं तर विमानाचं भाडं पन्नास हजाराला जाऊन पोहोचलंय. भूतानचं साठ हजाराला तर युरोपचं एक लाखापर्यंत. तिच गोष्ट हॉटेल्सची. एव्हरीथिंग इज ऑन द राईज आणि मग प्रश्‍न पडतो, नक्की एवढे जास्त पैसे मोजायचे का? बरं पर्यटनस्थळी उसळणारी गर्दी, त्याचं तर काही विचारूच नका. आयफेल टॉवरचं उदाहरणच बघानं. तीन-तीन, चार-चार तास लागतात. सगळ्या स्थलदर्शनाच्या रांगा वाढलेल्या असतात. त्यामुळे मी नेहमी म्हणत असते की शक्य आहे त्यांनी सुट्ट्या वगळून पर्यटन करा शांत आणि निवांतपणे, आणि ज्यांना सुट्टीतच जावं लागतं त्यांनी ह्या सगळ्याची मानसिक तयारी ठेवा, म्हणजे त्रास होत नाही. असो, आज भारतातील लोकसंख्येचा फक्त एक टक्का आणि चायनाच्या लोकसंख्येच्या फक्त दहा टक्के लोक प्रवास करताहेत तेव्हा ही अवस्था आहे. आपले दहा टक्के झाले आणि चायनाचे वीस टक्के तर काय होईल ह्याची कल्पनाच केलेली बरी. साधारणपणे एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत जगभराची समर व्हेकेशन पसरलेली आहे. जर दोन महिन्यांची क्लीअरकट सुट्टी द्यायची असेल तर एप्रिल-मे, मे-जून, जून-जुलै आणि जुलै-ऑगस्ट असं जर काही आपण करू शकलो तर पर्यटनस्थळांच्या गर्दीवर तो उतारा होईल. मुंबईला उन्हाळा एप्रिल-मे मध्ये त्रस्त करतो तर दिल्लीला जून-जुलै मध्ये, एकतर सुट्ट्या अशा डिस्ट्रीब्यूट कराव्या किंवा शाळांच्या सिलॅबसप्रमाणे करावं. खूप विचार करावा लागेल, बरीच परम्यूटेशन्स कॉम्बिनेशन्स करावी लागतील. पण भविष्यात ही समस्या भेडसावणार असेल आणि पाच किंवा दहा वर्षांनी ती उग्र स्वरूप धारण करणार असेल तर त्यावर उपाययोजनेची सुरूवात आजच करावी लागेल. कोणताही बदल हा एवढा सहजासहजी पटकन नाही करता येत. ह्याबाबतीत हाँगकाँगचं उदाहरण चांगलं आहे. हाँगकाँग जरी चायनाच्या अधिपत्याखाली असलं तरी चायनाच्या लोकांना हाँगकाँगमध्ये यायला परमिट घ्यावं लागतं. हाँगकाँगची लोकप्रियता बघता चायनामधून खूप संख्येने टूरिस्ट हाँगकाँगमध्ये येतात, पण जेव्हा जेव्हा हाँगकाँगमध्ये वर्ल्ड इव्हेंट्स असतात सगळं हाँगकाँग चोको ब्लॉक व्हायची चिन्ह दिसतात त्या त्या वेळी चायनीज टूरिस्टना परमिट रेस्ट्रिक्टेड स्वरूपात दिलं जातं किंवा त्यासाठी जास्त फी आकारली जाते. त्यामुळे ऑटोमॅटिकली टूरिस्ट फ्लो कमी होतो आणि सार्‍या जगातून आलेल्या पर्यटकांना आणि आमंत्रितांना गर्दीचा त्रास होत नाही. माझं तर प्रत्येक देशाच्या कॉन्स्युलेटला, एअरलाईनला सांगणं आहे की जेव्हा तुमच्याकडे लो टूरिस्ट ट्रॅफिक आहे तेव्हा व्हिसा फी मध्ये आणि एअरफेअरमध्ये सवलत द्या. निश्‍चितपणे टूरिस्ट फ्लो वाढेल आणि ज्यांना शक्य आहे ती मंडळी अशा वेळी प्रवास करतील. देशाला फायदा होईल, एअरलाईन इंडस्ट्री अदरवाईज जी कायम लॉसमध्ये असते तिला फायदा होईल, हॉटेल्स रिकामी राहाणार नाहीत. संपूर्ण विन-विन सिच्यूएशन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्स्युलेटवर येणारं लोड कमी करता येईल. जो व्हिसा अदरवाईज आठ दिवसात मिळतो तो व्हिसा मिळायला महिना लागतो ह्या समर व्हेकेशनमध्ये. म्हणून तर आम्ही आठ आठ महिने आधी बुकिंग ओपन करतो युरोप अमेरिका ऑस्ट्रेलियाचं, व्हिसाच्या डॉक्यूमेंटस्ची तयारी करणं सोप्पं जातं आणि जिथे जिथे कॉन्स्युलेट स्विकारतात तिथे तिथे पीक सीझन रश सुरू व्हायच्या आत व्हिसा करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात काही कॉन्स्युलेट्स एक वा दोन महिने आधीच व्हिसा अ‍ॅप्लीकेशन घेतात किंवा काही तुमच्या ट्र्रॅव्हलिंग डेटप्रमाणे व्हिसा देतात. ह्या गोष्टी आपल्या कुणाच्याही कंट्रोलमध्ये नसल्या तरी त्रास हा होतोच आणि त्याला उपाय आहे तो डेफर्ड समर व्हेकेशनचा. क्राऊड मॅनेजमेंट फ्रॉम ऑल अँगल्स. भविष्याच्या दृष्टीने रुट कॉज शोधून त्याला फ्युचरिस्टिक सोल्युशन काढणं ही काळाची गरज आहे.

सो मंडळी, आता तुम्ही सर्वजण देशात किंवा परदेशात पर्यटन करण्याच्या तयारीत असाल. तुम्हाला मनापासून शुभेच्छा! हॅप्पी जर्नी बॉन व्होयाज!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*