Language Marathi

दुबईला चला हवा येऊ द्या!

जगाचं पर्यटन ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाही हे अनेकांनी स्वतःच्या उदाहरणासह सिद्ध केलंय. ही व्यक्तिमत्व आम्हाला इन्स्पायर करीत राहतात आणि जग सर्वांसाठी मोस्ट अफोर्डेबल करण्याच्या आमच्या उद्दीष्टाकडे वाटचाल करताना आणखी बळ देतात. झी मराठी, चला हवा येऊ द्या आणि वीणा वर्ल्ड मिळून संपन्न होणारा विश्वदौरा म्हणजे आपल्या सुंदर जगाची एक अनोखी, आनंददायी, अफलातून आणि हास्यमय सफर

वीणा वर्ल्डच्या निर्मितीलाच आम्ही वीडा उचलला की ‘लेट्स मेक द वर्ल्ड मोस्ट अफोर्डेबल फॉर इच अ‍ॅन्ड एव्हरी इंडियन’. आता पर्यटकच म्हणू लागलेत की ‘द वर्ल्ड इज रीअली अफोर्डेबल विथ वीणा वर्ल्ड’ जग अफोर्डेबल करताना बेसिक सर्व्हिसेसमध्ये, त्यांच्या ‘दर्जेदार’ पणावर आच येणार नाही ही खबरदारी आम्ही घेत राहिलो आणि साडेतीन वर्षात अडीच लाख पर्यटक वीणा वर्ल्डसोबत जगाची भ्रमंती करून आले. पर्यटनाने व्यक्तिमत्व चहूबाजूंनी खुलतं हे आम्हीच नाही तर जगातला प्रत्येक छोटा मोठा पर्यटक जाणून आहे, आणि म्हणूनच जग अफोर्डेबल करण्यासाठी आमची संपूर्ण टीम अखंड कार्यरत असते. आम्हाला खात्री आहे की जग अफोर्डेबल करण्याच्या आमच्या मिशनमध्ये आम्ही सदैव यशस्वी होत राहू आणि आमच्या पर्यटकांसाठी, जगभरच्या आमच्या असोसिएट्ससाठी आणि वीणा वर्ल्ड टीमसाठी विन-विन-विन सिच्युएशन निर्माण करीत राहू.

हे जग सुंदर आहे, ते आपल्याला अनेक माध्यमातून दिसत राहतं, कधी बॉलिवूडच्या चित्रपटातून तर कधी व्हॉट्सअ‍ॅपच्या फॉरवर्डमधून तर कधी टीव्हीवरील वेगवेगळ्या कार्यक्रमांतून. जगाचं हे दूरदर्शन कितीही सुखावह असलं तरी जो पर्यंत आपण स्वतः किंवा आपले कुणी आप्तेष्ट तिथे जाऊन येत नाहीत तोपर्यंत ते दुरुन डोंगर साजरे अशा अंतरावरच राहतं. गेली दोन वर्ष आम्ही आपलं सर्वांचं लाडकं, जवळचं कुटुंब शोधत होतो जे आम्हाला सतत आपलंच वाटत आलंय. कोणत्याही हेवेदाव्यांपासून दूर, द्वेषांपासून पल्याड लांब, एकमेकांविरूद्धाच्या कटकारस्थानांपासून कोसो दूर फक्त आनंद देत राहायचा, घरातल्या प्रत्येकाला हसवत राहायचं, त्या हसर्‍या घरासाठी स्वतः सतत कष्ट उपसायचे असं कुटुंब आम्हाला मिळालं ते डॉक्टर निलेश साबळे ह्याचं. डॉक्टरांच्या लेखणीतून साकार झालेला, झी मराठीने घराघरात पोहोचवलेला, संपूर्ण घराला फॅमिली रुममध्ये एकत्र बसून हास्याच्या कारंज्यात न्हाऊन काढणारा ‘चला हवा येवू द्या’चा कार्यक्रम आणि भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपूरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे आणि डॉक्टर निलेश साबळे ह्यांच्या अफलातून अदाकारीतून साकार झालेला हास्यानुभव फक्त भारतीयांनाच नव्हे, बॉलिवूडलाच नव्हे तर जगातल्या प्रत्येक मराठी जाणणार्‍या भारतीयाला आपलासा वाटला. अमेरिकेत राहणारी तरूण पिढीसुध्दा हा कार्यक्रम बघते हे ऐकल्यावर मलाच आश्‍चर्य वाटलं. छोटंस उदाहरण म्हणजे आमच्या अकाउंट्स अ‍ॅन्ड फायनान्सची मॅनेजर अंजली कुलकर्णीचा मुलगा आदित्य एरोस्पेसमध्ये पीएचडी करतोय, इलॉन मस्कच्या टेसला कंपनीमध्ये त्याला इंटर्नशीपसाठी बोलावणं आलंय, कॅज्युअली गप्पा मारताना तो म्हणाला की तिथे अमेरिकेत तो न चुकता ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम बघतो. इंग्रजी माध्यमात शिकलेली, थोडक्यात इंग्रजाळलेली ही मुलं जेव्हा ‘आम्ही मराठी कार्यक्रम बघतो’ किंवा ‘मराठी वृत्तपत्र वाचतो’ असं म्हणतात तेव्हा अभिमान वाटतो. असो. तर असा हा जगभरात पसरलेल्या कुटुंबांच्या घरातला झालेला कार्यक्रम आणि त्याची हास्य पसरविणारी टीम ह्या पर्यटनाद्वारे घडणार्‍या व्यक्तिमत्व विकासासाठी, जगातल्या गमती-जमती त्यांच्या खास शैलीत आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठीचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन वाटली. झी मराठी टीम, डॉक्टर निलेश साबळे आणि टीम, वीणा वर्ल्ड टीम, जगभरातले टूरिझम बोर्डस् आणि एअरलाइन्स ह्या सगळ्याच्या शेड्युल्सची सांगड घालत घालत दीड वर्षांच्या अथक परिश्रमानंतर सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आता आम्ही निघालो विश्‍वदौर्‍यावर. तसं बघायला गेलं तर मोठा प्रोजेक्ट आहे आणि आमची सुनिला पाटील आणि झी मराठी टीम त्यात सध्या बिझी आहे.

झी मराठी वरील, ह्या ‘चला हवा येऊ द्या विश्‍वदौर्‍याचा’ पहिला प्रयोग आहे दुबईमध्ये येत्या एकोणतीस सप्टेंबरला. त्याचा लाईव्ह परफॉर्मन्स दुबईत होणार आहे तसंच आपली ही चला हवा येऊ द्या गँग वेगवेगळ्या पर्यटनस्थळांवर धम्माल उडवून देणार आहे. ह्या विश्‍वदौर्‍याद्वारे पहिल्यांदाच ‘झी मराठी-चला हवा येऊ द्या’ टीम बंदिस्त स्टुडिओमधून बाहेर पडून ओपन एअर अगदी खुल्या रंगमंचावर दिलखुलास वावरणार आहे.

आणि हा खुला रंगमंच जगाच्या सुंदर सुंदर देशांच्या बॅकग्राऊंडवर अतिशय अप्रतिम अशा पर्यटनस्थळांच्या सान्निध्यात असणार आहे बरं का. वर मी म्हटलं होतं की आपण स्वतः किंवा आपली अगदी जवळची माणसं जेव्हा एखाद्या ठिकाणी जातात तेव्हा ते स्थळ, ते राज्य किंवा तो देश थोडा ओळखीचा, जवळचा वाटायला लागतो. ‘चला हवा येऊ द्या’ टीमचा प्रत्येक कलाकार हा आपल्याला स्टार न वाटता कुणीतरी आपल्या घरातला द्वाड खट्ट्याळ भाऊ, मुलगा, बहिण किंवा मुलगी आहे असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. मग ही आपली माणसं जेव्हा ह्या सुंदर सुंदर देशांना भेट देतील, तिथे धम्माल करतील, तिथल्या आप्तेष्टांना भेटतील तेव्हा आपणंच तिथे पोहोचल्याचा आनंद आपल्याला होईल. आणि माझा अनुभव आहे, एकदा का आपली जवळची माणसं तिथे पोहोचली की आपणही कधीतरी पोहोचणारंच हे ठरलेलं असतं. इच्छा असली की सगळं काही शक्य आहे.

विश्‍वदौर्‍यामधील पहिल्या देशाला भेट द्यायला, तिथे शुटींग करायला, तिथल्या भारतीयांना लाईव्ह शो मध्ये भरपूर हसवायला. चला हवा येऊ द्या टीम वर म्हटल्याप्रमाणे सव्वीस सप्टेंबरला दुबईला निघतेय. त्याचवेळी वीणा वर्ल्डच्या पर्यटकांसाठी आम्ही एका पाच दिवसाच्या स्पेशल दुबई टूरचं आयोजन केलं आहे. दुबई-बुर्ज खलिफा, धाऊ क्रुझ, डेझर्ट सफारी, बुर्ज अल अरब, बॉलिवूड पार्क ह्या सगळ्याची मजा लुटता लुटता आपल्या ह्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. मात्र ही एकच सहल आहे त्यामुळे जागा मर्यादित आहेत. तेव्हा शुभस्य शीघ्रम! आणि हो, झी मराठी, वीणा वर्ल्ड, डॉ. निलेश साबळे आणि टीमच्या ह्या विश्‍वदौर्‍याला तुमचे शुभाशिर्वाद हवेत बरं का, हक्काने मागून घेतेय. विश अस हॅप्पी जर्नी!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*